नागराज मंजुळे : उन्हाच्या कटाविरुद्ध बहरत चाललेला गुलमोहर!
कला-संस्कृती - चलत्-चित्र
महेशकुमार मुंजाळे
  • नागराज मंजुळे
  • Thu , 24 August 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti चलत-चित्र नागराज मंजुळे Nagraj Manjule फँड्री Fandry पिस्तुल्या Pistulya सैराट Sairat

प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मुंजळे यांचा आज ४०वा वाढदिवस. नागराजच्या कलाकृतींचं वैशिष्ट्यच असं की, या तिन्ही नायकांच्या जाती या जातीव्यतिरिक्त अन्य कोणत्याही वंचित घटकातील असत्या तरी हे चित्रपट असेच तंतोतंत घडले असते. जातीअंतावर भाष्य करताना जात दाखवण्याला पर्याय नाही. नागराज स्वतः कोणत्या घटकातून आला, यापेक्षा त्यानं त्याच्या चित्रपटातून, कवितांतून, त्यानं केलेल्या सार्वजनिक वक्तव्यांवरून तो सर्व वंचित घटकांचा नायक म्हणून समोर येतो. आणि हेच समाजासाठी जास्त आश्वासक आहे.

.............................................................................................................................................

ज्या काळात इतर झाडं पानगळ सोसत असतात, तेव्हा गुलमोहर तीव्र उन्हाविरुद्ध विद्रोह करत बहरत असतो! याच गुलमोहराच्या प्रेमात पडलेला, केवळ लेखणीतूनच व्यक्त होणारा नव्हे, तर दृकश्राव्य माध्यमातूनही व्यक्त होऊ पाहणारा एक साहित्यिक म्हणजे नागराज मंजुळे! गुलमोहराच्या प्रेमात पडता पडता, त्यावर कविता लिहिता लिहिता नागराजनं स्वतः गुलमोहराचा गुण घेतला आणि तो प्रस्थापित जगाविरुद्ध बंड करत उभा राहिला. एवढा बहरला की, आज मराठी चित्रपटसृष्टीचा मैलाचा दगड बनून इतिहासरचियता झाला आहे.

वडार या भटक्या विमुक्त जातीत जन्माला आल्यानं त्याला समाजाकडून अनेक कटू अनुभव मिळत गेले. त्या अनुभवांचंच त्यानं संगोपन केलं आणि त्याच अनुभवांच्या भांडवलावर एकसे बढकर एक कलाकृती निर्मिल्या. विज्ञान असं म्हणतं की, प्रत्येक पदार्थ सूक्ष्म अणु-रेणूच्या संयोगातून तयार झालेला असतो, तसं नागराजच्या प्रत्येक कलाकृतीचा अणु-रेणू काढून अभ्यासला तर त्या प्रत्येकात विद्रोह दिसेल. त्याची व्यवस्थेबद्दल असणारी चीड दिसेल.

‘पिस्तुल्या’ या लघुपटापासून दृकश्राव्य माध्यमात प्रवेश केलेला नागराज ‘फँड्री’ या चित्रपटातून मोठ्या पडद्याकडे झेपावला… आणि ‘सैराट’मधून तर गगनालाच भिडला! पिस्तुल जसे संहार किंवा संरक्षण या दोहोंपैकी एक निवडेल, तसंच नागराजचा ‘पिस्तुल्या’ शिक्षण घेईल की, गुन्हेगारी क्षेत्रात ओढला जाईल, या द्वंद्वावर आधारलेला हा लघुपट. ‘पिस्तुल्या’तील मध्यवर्ती पात्र त्याच्या छोट्या बहिणीसाठी शाळेचा ड्रेस चोरल्याचं सांगून समाप्त होतो, तेव्हा शिक्षणासाठी नागराजनं केलेला विद्रोहच अधोरेखित होतो.

सवर्ण-दलित संघर्ष पूर्वापार चालू आहे. पण यातली ‘दलित’ ही संज्ञा एवढी संकुचित झालीय की, त्यातून केवळ काही निवडक जातीच डोळ्यांसमोर येतात. परंतु ‘दलित’ या शब्दाची व्युत्पत्ती अभ्यासल्यास 'दळीत' म्हणजे भरडला गेलेला, शोषित, पीडित वर्ग असं ध्यानात येतं. हा शब्द भारतीय समाजव्यवस्थेस लागू केला तर यातून अनुसूचित जाती-जमाती, भटक्या विमुक्त जाती-जमाती, इतर मागास प्रवर्ग, अगदी ब्राह्मणांपासून मागासातल्या मागास जातीच्या स्त्रिया, अंध-अपंग इत्यादी इत्यादी कित्येक लोक दलित असल्याचंच लक्षात येतं. परंतु आपल्या व्यवस्थेच्या अनुल्लेखानं मारण्याच्या हातोटीमुळे भटक्या विमुक्त जातीजमाती आपोआप बाजूला फेकल्या गेल्या. त्यांच्या समस्या मांडणारा कुणी कैवारी राहिला नाही. म्हणूनच की काय नागराजनं त्या समस्यांना मांडण्याचा विडा उचलला आणि 'सातत्यानं जातीपातीच्या विषयांना हात घालणारा दिग्दर्शक' हा सवर्णांचा ठप्पा सहन करत एकामागून एक चित्रपट देत राहिला.

‘भटक्या विमुक्त जाती म्हणजे गुन्हेगारीची मुळं’ असा समज अजूनही रूढ असताना त्याच विषयाचा लघुपट बनवू पाहणारा नागराज एकाच वेळी गुन्ह्यात सामिल नसणाऱ्या पिस्तुल्यावर पोलीस प्रशासनाची चुकीची कारवाई, अल्पवयीन आरोपी असूनही त्यावर पोलिसांनी वापरलेली दंडुकेशाही, जातीमधील काही करंटे, या सर्वांवर भाष्य करू पाहतो.

‘पिस्तुल्या’नंतर त्याने थेट प्रेमकथेला हात घालणं जरा आश्चर्याचं होतं, पण या प्रेमकथेला त्यानं दिलेली सामाजिक वास्तवाची जाणीव पाहिली की, पुन्हा एकदा नागराजमधला गुलमोहर दिसून येतो!

गुलमोहराचा विद्रोह आणि नागराजची व्यवस्थेबद्दलची चीड एवढी तीव्र असते की, त्याकडे दुर्लक्ष करणं अशक्यच. जर तुमचा नायक गोऱ्या रंगाचा, उंच बांध्याचा, सुबक शरीरयष्टीचा, मधाळ वाणीचा असेल तर माझा नायक त्या विरोधात उभा राहणार; त्याचा वर्ण आम्हा कष्टकऱ्यांप्रमाणे काळा असणार, तो ठेंगणा असणार, त्याची शरीरयष्टी सर्वसाधारणच असणार, त्याचा आवाज घोगरा आणि शब्दफेक मातीतलीच असणार, तरीही तो आमचा नायक असणार, या भूमिकेतून साकारलेला नायक ‘जब्या’ पडद्यावर त्याचं अभिनय कौशल्य दाखवून प्रेक्षकांना जिंकून घेतो, प्रस्थापितांच्या अलिखित नियमात न बसणं प्रेक्षकांच्या स्मरणातून काढून टाकतो, हे खरोखर नागराजचा विद्रोह सफल झाल्याचं द्योतक होय.

‘सैराट’मध्येही तेच. प्रस्थापितांची नायिका विशिष्ट उंचीची, विशिष्ठ शारीरिक बांध्याची, गौर वर्णाची आणि कामुक असावी लागते, पण त्याच वेळी नागराज स्वतःची नायिका म्हणून आर्चीला उभी करताना त्या सर्व नियमांविरुद्ध बंड करतो.

एकीकडे प्रस्थापित कलाकार प्रेक्षकांना नमन करून, मायबाप प्रेक्षकवृंद म्हणत, नतमस्तक होत कला सादर करतात, त्याच वेळी नागराज काळ्या पडद्यासमोर बसणाऱ्या प्रेक्षकांना स्वतःच्या आवाजातच 'इथं जमलेल्या बंडरुनो आणि भुरट्या चोरांनो' संबोधत ‘सैराट’ चालू करतो आणि ‘फँड्री’च्या शेवटी समोर प्रेक्षागृहात बसलेल्या समाजावरच दगड भिरकावतो, तेव्हा तो स्वतःतल्या अतोनात कोलाहलाला वाट करून देत असतो!

‘तुमचे चित्रपट ‘चित्रपट’ म्हणूनच राहतात, त्यांचा समाजवास्तवाशी फारसा संबंध नसतो. तुमच्या चित्रपटात नायक-नायिका समूहासोबत गाण्यांच्या तालावर नाचताना एका विशिष्ट सूत्रबद्ध लयात नाचतात, प्रत्येकाच्या हालचाली ठरवलेल्या असतात. पण आम्ही वास्तवात तसे नाचत नसतो, आनंद व्यक्त करण्याचं माध्यम म्हणून त्या नाचण्याकडे आम्ही पाहतो, तो आनंद व्यक्त करताना तो जल्लोष किती एकसंध दिसतोय, याकडे आमचं लक्ष नसतं. हेच आमचं वास्तव आहे आणि तेच मी मांडणार’ असा आग्रह धरत तो ‘झिंगाट’च्या तालावर स्वतःच्या नायक-नायिकेलाच नव्हे तर संपूर्ण प्रेक्षकवृंदाला नाचवतो.

गोड गुलाबी प्रेमकथा साकारताना प्रियकर-प्रेयसी पळून जाण्यात यशस्वी झाले आणि त्यांचं मीलन झालं म्हणजे कथा सुफळ संपूर्ण झाली असा प्रघात आहे. मात्र तोच नेमका मोडीत काढण्यासाठी, पळून गेल्यानंतर काय काय समस्या येतात याचं वास्तववादी चित्र रेखाटणारा नागराज मंजुळे असतो! लाखो किमतीच्या स्पोर्ट्स बाईकवर हिरोच्या पाठीला बिलगून बसणारी नायिका आमच्या वास्तवात नसते, पण त्याच वेळी मोपेड चालवणाऱ्या आर्चीच्या मागे मुलाला घेऊन बसलेला परश्या जास्त आश्वासक वाटतो. झोपेतून उठली तरी तुमच्या नायिकेचा मेकअप आणि हेअर स्टाईल तसूभरही विस्कळीत झालेली नसते, परंतु त्याच वेळी विस्कटलेला केससंभार घेऊन बादली भरून सार्वजनिक स्वच्छतागृहाकडे निघालेली आर्ची दाखवणं, हाही नागराजचा विद्रोहच आहे.

‘पिस्तुल्या’ वडार, ‘फँड्री’मधला जब्या कैकाडी आणि ‘सैराट’मधला परश्या पारधी जातीचा आहे, परंतु नागराजच्या कलाकृतींचं वैशिष्ट्यच असं की, या तिन्ही नायकांच्या जाती या जातीव्यतिरिक्त अन्य कोणत्याही वंचित घटकातील असत्या तरी हे चित्रपट असेच तंतोतंत घडले असते. जातीअंतावर भाष्य करताना जात दाखवण्याला पर्याय नाही. नागराज स्वतः कोणत्या घटकातून आला, यापेक्षा त्यानं त्याच्या चित्रपटातून, कवितांतून, त्यानं केलेल्या सार्वजनिक वक्तव्यांवरून तो सर्व वंचित घटकांचा नायक म्हणून समोर येतो. आणि हेच समाजासाठी जास्त आश्वासक आहे.

प्रेक्षकांना दैनंदिन आयुष्याचा विसर पडावा, मनोरंजन व्हावं, वेगळ्या जगाची सफर व्हावी या उद्देशानं चित्रपट बनवणाऱ्यांच्या जगात वास्तवाची जहालता दिसावी, स्वतःच्या चेहऱ्यावर असणारे डाग समाजाला दिसावेत, म्हणून आपल्या चित्रपटांना समाजाचा आरसा बनवू पाहणाऱ्या नागराजचा गुलमोहर सदोदित बहरत राहणार… कारण भारतातील एकंदर बदलती राजकीय-सामाजिक परिस्थिती पाहता ‘उन्हाचा कट’ दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे!

.............................................................................................................................................

लेखक महेशकुमार मुंजाळे चित्रपट पटकथा लेखक आहेत.

maheshmunjale@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Bhagyashree Bhagwat

Fri , 01 September 2017

Khoopach chhan!


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख