अजूनकाही
‘समाजस्वास्थ्य’ अस्वस्थ करणारं आहे.
हे मी वर्तमानाबद्दल बोलत नसून अतुल पेठेच्या नाटकाबद्दल बोलत आहे. ते आहे र. धों. कर्वे यांच्या जीवनकार्यावर आधारित. या नाटकाचं लेखन, क्राफ्ट, त्यातील कलाकारांचे सादरीकरण याविषयी लिहिणं गौण वाटावं इतकं ते नाटक सादर करण्याची असोशी (passion) जबरदस्त (passionate) आहे. आणि ती मिशनरी अतुल पेठेमध्ये आहे... आणि ती दिसतेच. रंगकर्मी हे विशेषण त्याच्यासारख्यांना चुकीचं ठरेल, कारण कला त्याच्यासाठी फार महत्त्वाची नसून विचारांचा प्रसार त्याच्या लेखी महत्त्वाचा असतो. याआधी नाटकातले असे अनेक प्रयोग त्याने केले आहेत. ज्यांची प्रयोगसंख्या ‘बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नमूद होत नाही. होऊही शकत नाही, तरीही अत्यंत महत्त्वाची आहे. मुळात आता व्यावसायिक रंगभूमीवर होणाऱ्या काही नाटकांना ‘प्रयोग’ न म्हणता ‘खेळ’ म्हणणं जास्त उचित ठरेल. ते निव्वळ लाईव्ह आहे, म्हणून त्याला ‘प्रयोग’ म्हटलं तर, तो अधिकार वाद्यवृंद, तमाशा आणि सर्कशीलाही द्यावा लागेल.
Relevant विषय
लैंगिक शिक्षण हा नाटकाचा विषय आहे आणि दुर्दैवानं तो आजही समर्पक आहे. संततिनियमन, शरीरसंबंध, योनीसुचिता, समलैंगिकता यावर गेल्या शतकात, तीस-चाळीसच्या दशकात, कर्वेंनी मांडलेले परखड विचार जर आजही तितकेच समर्पक वाटत असतील तर, आपला समाज एका डबक्यासारखा आहे का, हा विचार मनात येतो. संपत्ती संचयाला सुरुवात झाल्यावर समाजस्वास्थ्य टिकवण्यासाठीच विवाहसंस्थेची सुरुवात झाली असावी. टोळ्यांनी वंश-वर्ण, मग धर्म, पंथ आणि जात-पात आणली. विवाहसंस्थेमुळे योनीसुचिता आली. वर्णसंकर होऊ किंवा ठरू लागले. सुचितेची बंधनं झाली. ती उल्लंघनं व्यभिचार वा स्वैराचार ठरू लागला. इतकंच नव्हे तर त्याविषयी बोलणंही अनैतिक, अश्लील ठरू लागलं. हस्तमैथुन आणि संभोग पाप ठरू लागलं. ‘जन्म हेच पाप’ हे अध्यात्म झालं.
हे आणि असे विचार सामान्यांचेच नव्हे तर महात्म्यांचेही होते. आत्मसंयम हाच संततिनियमनाचा उत्तम उपाय आहे, हे गांधींचं मत कर्वेंनी तेव्हाही खोडलं होतं. आणि त्याचे परिणामही भोगले होते. काहींच्या मते शृंगारातील संदिग्धता/ खाजगीपणा गेला तर त्यात नजाकत काय उरली. शृंगार हा काही चर्चेचा विषय नसून करण्याचा विषय आहे, हे जितकं खरं आहे तितकंच ते अनैतिक नाही आणि पाप तर नाहीच नाही, हे कर्वे ठासून सांगत होते. आणि म्हणून तेव्हाचे कर्मठ, सनातनी त्यांच्या विरोधात दंड थोपटून उभे ठाकले होते. त्यानंतर अनेक वर्षांनी ओशोनं म्हटलं की, ‘संभोगाचा उच्चतम क्षण हा समाधीप्राप्त असतो’. त्याचीही खिल्ली उडवली गेली. एकीकडे काळानुरूप सामाजिक रूढी-परंपरांना छेद दिला जात होता, पण दुसरीकडे व्यक्तिगत आचार-विचारांवरील निर्बंध उठवण्यावर मात्र धार्मिक मज्जाव कायम होता. कारण कर्व्यांच्याच मते ‘तसं झालं तर धर्माचं महत्त्वच नष्ट होईल ही भीती होती.’ या नाटकात हे सगळं अत्यंत ढोबळ पद्धतीनं मांडलंय. अगदी सामान्य प्रेक्षकाला कळेल असं. विरोधकालाही विचार करायला लावेल असं.
Irrelevant प्रेक्षक
प्रयोग पाहायला आलेल्या प्रेक्षकांकडे पाहून मला ‘Irrelevant प्रेक्षक’ असं म्हणावं लागतंय. प्रयोगाला भालचंद्र नेमाडे, मेघना पेठे, चित्रा पालेकर, अवधूत परळकर, पुरुषोत्तम बेर्डे, अनिल गवस, सुषमा देशपांडे, मंगेश सातपुते... ही आणि याच विचारांची वाटावी अशीच सगळी मंडळी प्रेक्षक होती. अशा मंडळींसमोर हा विषय मांडण्यात काय हशील आहे? एक ऐकीव किस्सा सांगतो, म्हणजे मी काय म्हणतोय ते लगेच कळेल. (खरा खोटा हे महत्त्वाचं नसून, त्यातलं मर्म जास्त महत्त्वाचं आहे.) गप्पांच्या ओघात एकदा बाळासाहेबांनी य. दि. फडकेंना विचारलं की, ‘तुम्ही म्हणता की माझ्यापेक्षा प्रबोधनकार हे जास्त प्रभावी वक्ते होते. पण आज तुम्ही बघाल तर त्यांच्यापेक्षा माझ्या सभेला गर्दी जास्त असते.’ यावर य. दि. म्हणाले, ‘तुमच्या सभेला ‘होयबां’ची गर्दी असते. प्रबोधनकारांच्या सभेला सुरुवातीला विरोधक असणारा सभेच्या शेवटी, किंचित का होईना, त्यांच्या विचारांचा झालेला असतो.’
टिळक, गांधी, सावरकर, आंबेडकर यांचे विचार असलेल्या नाटकांना वा कलाकृतींना लाभणारा प्रेक्षक हा त्या विचारांचाच समर्थक असतो. कारण विरुद्ध विचार ऐकायची त्याची तयारी नसते.
प्रेक्षकांचंही ध्रुवीकरण होतंय का? तर होतंय (किंवा झालंय) असं मला वाटतं.
मग अशा नाटकांनी ‘समाजस्वास्थ्य’ सुधारेल ही अपेक्षा करावी का? तर करावी. कारण कुंपणावरचे काही असतीलच की!
तेव्हा हे नाटक अत्यंत महत्त्वाचं आहे. ते पाहिलंच पाहिजे. त्याचे फार प्रयोग होणार नाहीत, हे लक्षात ठेवा. पण त्याचं आश्चर्य वाटू नये, कारण अजूनही प्रेक्षकस्वास्थ्य काही ठीक नाहीय. पण त्याबाबतीत आशावादी असणंही काही चुकीचं नाही.
लेखक चित्रपट व नाट्यदिग्दर्शक आणि लेखक आहेत.
mahendrateredesai@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment