अजूनकाही
चित्रपटांमध्ये संवादांचा, व्हीएफएक्सचा, गाणी आणि इतर गोष्टींचा जास्तीत जास्त वापर होत आहे. या सगळ्यांमध्ये चित्रपट या शब्दातील 'चित्र' कुठेतरी हरवतंय.
म्हणजे सिनेमामध्ये कथा, पटकथा, संवाद इत्यादींना 'थोडंफार' महत्त्व मिळतंय. त्यातही जास्तीत जास्त भर हा तथाकथित 'मेनस्ट्रीम' चित्रपटांना समांतर कथा, खुसखुशीत आणि टाळ्या घेणारे संवाद, नायक, नायिका इत्यादी गोष्टींवर दिला जातोय. यात छायांकन, छायाचित्रण, संगीत, पार्श्वसंगीत, चित्रपटांतील दृश्यांची क्षमता इत्यादी गोष्टी मागे पडत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे व्हिज्युअल कॉमेडी. आता चित्रपटांमध्ये व्हिज्युअल कॉमेडी अगदीच दिसत नाही असं नाही, पण तिचं प्रमाण खूपच कमी झालंय हे नक्की.
'व्हिज्युअल कॉमेडी' म्हणजे काय? तर चार्ली चॅप्लिनच्या चित्रपटातील विनोद, विनोदी दृश्यं व विनोदनिर्मिती या सर्वांचा संगम. म्हणजे उत्तम छायांकन, संगीत व पार्श्वसंगीताचा योग्य वापर, उत्तम (दृश्य) विनोदाचं योग्य प्रकारे केलेलं सादरीकरण, या घटकांचा योग्य वापर करून केलेली विनोदनिर्मिती म्हणजे व्हिज्युअल कॉमेडी.
व्हिज्युअल कॉमेडीमध्ये प्रेक्षक हा महत्त्वाचा दुवा असतो. म्हणजे प्रत्येक फ्रेम, प्रत्येक दृश्य हे प्रेक्षकांपर्यंत कसं पोहोचवायचं आणि प्रेक्षक ते कोणत्या दृष्टिकोनातून पाहील, कसा विचार करेल, या सर्व गोष्टींचा विचार करून तयार करण्यात आलेलं असतं. उदाहरणार्थ, एखादं पात्र शिडीवर चढत आहे. हे शॉट्स टॉप अँगल्स किंवा साइड व्ह्यूमधून दाखवून ते दृश्य परिणामकारक ठरणार नाही आणि अपेक्षित व्हिज्युअल कॉमेडी होणार नाही. यासाठी हे दृश्य भिंतीच्या समोरच्या बाजूनं भरपूर झूम आउट ठेवूनच चित्रित केलं जातं.
यासोबतच संगीत किंवा साउंड इफेक्ट्स (म्हणजे तांत्रिकदृष्ट्या 'फिल्म स्कोअर'. यालाच बॅकग्राऊंड स्कोअर, बॅकग्राऊंड म्युझिक, साउंडट्रॅक असे पर्यायी शब्द आहेत.) व्हिज्युअल कॉमेडीमध्ये महत्त्वाचे असतात. यात बऱ्याच गोष्टींचा समावेश होतो. म्हणजे चित्रपटाच्या संवादांच्या आधी व नंतर असलेलं संगीत, चित्रपटातील गाणी जी साउंडट्रॅकहून निराळी मानली जातात. (बॅकग्राऊंड साउंडमध्ये मूळ पात्राखेरीज इतरही लोक बोलत असतात व सभोवतालचे इतर आवाजही समाविष्ट असतात. पण मूळ घटक संवाद हाच असून त्यावरच भर असतो. तर नॅट साउंडमध्ये विशिष्ट पात्रानं, गोष्टीने केलेले आवाज समाविष्ट असतात. आणि त्यावरच भर असतो.)
त्या प्रसंगामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये सभोवतालच्या गोष्टींचा केलेला वापर, ही व्हिज्युअल कॉमेडीमध्ये सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते. म्हणजे पात्र जर आपल्या घरासमोरील बागेतील झाडांना पाणी घालत असेल तर त्यामध्ये त्याची फजिती कशी व कोणत्या प्रकारे होऊ शकते, यासाठी सामान्य परिस्थितीमध्ये आसपास उपलब्ध असू शकणाऱ्या गोष्टींचा विनोदनिर्मितीसाठी योग्यरीत्या वापर करणं, महत्त्वाचे ठरतं. अशा वेळी तिथं काय काय उपलब्ध असू शकेल? उदा. पात्रं पाइपमध्ये अडकून पडू शकतात, बागकामासाठीचं फावडे वगैरे गोष्टी पायावर पडून लागू शकतं. याशिवाय काय दाखवायचं, कसं दाखवायचं, इत्यादी त्या दिग्दर्शकांच्या कल्पकतेवर अवलंबून असतं.
शेवटची आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे 'अतिशयोक्ती'. तिचा पाया हा 'अशक्यप्राय' गोष्टी करण्यावर भर देणं, हा असू शकतो किंवा बऱ्याचदा असतो.
आजकाल बहुतांशी मेनस्ट्रीम चित्रपटांमध्ये संवादांवर आणि कोट्यांवर आधारित विनोद दिसतात. सिटकॉम कॉमेडी हा प्रकारही कमी होताना दिसतो. त्यामुळे इतर प्रकार मागे पडत आहेत. सुरुवातीच्या (बोलपटांनंरच्या) काळात व्हिज्युअल कॉमेडी बऱ्यापैकी दिसायची. नंतर जॉनी वॉकर, असरानी, जगदीश, वगैरे कलाकार आणि अगदी अलीकडच्या काही दशकांत जॉनी लिवर, राजपाल यादव वगैरे कलाकार व्हिज्युअल कॉमेडीच्या दृश्यांमध्ये दिसायचे. हे प्रमाण हळूहळू कमी होत गेलं आहे. आता तर हे कलाकार आणि ही दृश्यं चित्रपटसृष्टीतून हद्दपार होताना दिसताहेत. कारण आजकाल विनोदी दृश्यंही मुख्य कलाकारच करताना दिसतात. हे विनोदही बहुतेक वेळा केवळ संवादरूपीच असतात. त्यात व्हिज्युअल कॉमेडीचा वापर अगदी मोजक्या ठिकाणी दिसतो.
पाश्चात्य चित्रपटांमध्येही हल्ली व्हिज्युअल कॉमेडी फारशी वापरली जाताना दिसत नाही. शिवाय, भारतात तर लॉरेल अॅण्ड हार्डी, मि. बीन वगैरेंसारखे कार्यक्रमही आढळत नाहीत, जे व्हिज्युअल कॉमेडीवर आधारित असतात. सुरुवातीच्या भारतीय मूकपटांचे बहुतांश विषय धार्मिक कथांवर आधारित असत. त्यामुळे त्यात व्हिज्युअल कॉमेडीला वाव नव्हता. नंतरच्या बोलपटांमध्येही व्हिज्युअल कॉमेडी फारशी दिसत नाही. जी दिसते तीही काही मोजक्या दृश्यांपुरतीच. 'शोले'चं उदाहरण घेऊ. यातील प्रसिद्ध दृश्य म्हणजे जेलरच्या प्रवेशाचा पहिला प्रसंग. हे दृश्य जितकं संवादामुळे प्रसिद्ध आहे, तितकंच त्यातील बारकाव्यामुळे. म्हणजे असरानीचं धडपडणं, अमिताभच्या आधी एका कमी उंचीच्या व्यक्तीचं असणं इत्यादी गोष्टींमुळे तो प्रसंग खुलतो.
दुसऱ्या एका प्रसंगात न्हाव्याकरवी जेलरला सुरंगाविषयी कळतं. तेव्हा तो सर्वांना रांगेत उभे करून टोपलीखालची गरम सळई उचलतो. हे दृश्य म्हणजे म्हणजे व्हिज्युअल कॉमेडी. या दृश्यात योग्य कॅमेरा अँगल्सपासून ते पात्रांचा गैरसमज, त्यांचा उडालेला गोंधळ इत्यादी सगळ्या गोष्टी दिसून येतात. जगदीशनं रंगवलेल्या सुरमा भोपालीचे प्रसंग व्हिज्युअल कॉमेडी म्हणून परिणामकारक ठरतात.
मराठीत लक्ष्मीकांत बेर्डे, विजय पाटकर, विजय चव्हाण वगैरेंच्या चित्रपटांमध्ये व्हिज्युअल कॉमेडी आढळलायची. अलीकडे भरत जाधव, सिद्धार्थ जाधव वगैरे मंडळींच्या चित्रपटांतील काही प्रमाणात हा प्रकार आढळतो. बाकी मराठीत याचं प्रमाण हिंदी चित्रपटांपेक्षाही कमी आहे.
(उदाहरण म्हणून पुन्हा एकदा एका त्यातल्या त्यात प्रसिद्ध चित्रपटाचं नाव घेऊयात.) 'अशी ही बनवाबनवी'मधील लक्ष्मीकांत बेर्डे, सुधीर जोशी, अशोक सराफ वगैरेंचे सर्वच प्रसंग व्हिज्युअल कॉमेडीच्या दृष्टीनं एपिक आहेत. पण त्यातल्या त्यात 'सत्तर रुपये'चा सीन व्हिज्युअल कॉमेडी म्हणून ग्रेट आहे. म्हणजे लक्ष्मीकांतचं आधी दारामागे असणं, महत्त्वाचं म्हणजे त्याचं त्या फ्रेममध्ये असणं आणि नंतर सुधीर जोशी मागे वळल्यानंतर लगेच दार जोरजोरात ठोठावणं, इत्यादी गोष्टी पात्राचं रूपांतर म्हणून पाहताना त्यातील व्हिज्युअल विनोदनिर्मिती लगेच लक्षात येतं.
फक्त व्हिज्युअल कॉमेडी असलेले चित्रपट हाताच्या बोटावर मोजता येतील इतपतच आहेत. यातील बहुतांशी चित्रपट हे चॅप्लिन, अॅटकिन्सन वगैरेंचे आहेत. अगदी थोडे काही इतर काही दिग्दर्शक-अभिनेत्यांचे आहेत. शिवाय एडगर राइटसारखे काही दिग्दर्शक या प्रकारात अजूनही कार्यरत आहेत. त्याचे 'कॉर्नेटो ट्रायोलॉजी'तील - शॉन ऑफ द डेड, हॉट फझ आणि द वर्ल्डस् एण्ड - हे चित्रपट पूर्णतः व्हिज्युअल कॉमेडीसाठी प्रसिद्ध आहेत. बॉलिवुडमध्ये प्रियदर्शनच्या चित्रपटांमध्ये व्हिज्युअल कॉमेडीचा जास्तीत जास्त वापर दिसून येतो.
मात्र असं असलं तरी हा विनोदाचा प्रकार लगेच नाहीसा होईल, असं नाही. तो थोड्याफार दृश्यांमधून डोकावत राहिलच.
लेखक सिनेअभ्यासक आहेत.
shelar.a.b.mrp4765@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment