अजूनकाही
शशांक बंगाली नावाच्या पत्रकारानं एकदा सहज गप्पांमध्ये त्याच्या लग्नाचा किस्सा सांगितला. त्याचं लग्न झालं मॉरिशसमध्ये. त्यानं भली मोठी रक्कम मोजून मॉरिशसमधील एक वेडिंग फोटोग्राफर बुक केला. लग्न झालं. त्यानंतर महिना झाला तरी फोटोग्राफरकडून लग्नाचे फोटो काही शशांकला मिळाले नव्हते. तोपर्यंत फोटोग्राफर दुसऱ्या ऑर्डर्समध्ये बिझी असावा. जे मित्र लग्नाला येऊ शकले नाहीत, ते शशांकच्या मागे लागले की किमान फेसबुकवर काही फोटो तरी टाक. शेवटी यानं सगळ्या नातेवाईकांकडून आणि मित्रांकडून त्यांनी मोबाईलने काढलेले फोटो मागवून घेतले. ते फेसबूकवर शेअर केले. बऱ्याच जणांकडे अर्थात आय फोन होता. कालांतरानं फोटोग्राफरनं फोटो याला दिले. ते पाहिल्यावर शशांकला प्रश्न पडला की, आपण इतकी भली मोठी रक्कम मोजून वेडिंग फोटोग्राफरला का ऑर्डर दिली? वेडिंग फोटोग्राफरनं काढलेले फोटो आणि नातेवाईकांनी आय फोनवर काढलेले फोटो यात फार काही गुणात्मक फरक त्याला दिसत नव्हता. उलट तो म्हणाला की, नातेवाईकांचे फोटो हे जास्त नैसर्गिकपणे (कॅंडिड) काढलेले वाटत होते. आम्ही एकत्र काम करत असतानाही शशांक काही व्हिडिओ आयफोनवर बनवत होता, जे थेट नंतर ‘Los Angeles Times’च्या वेबसाईटवर अपलोड केले गेले.
रॉनी सेन नावाचा कलकत्त्याचा फोटोग्राफर आहे. तरुण पिढीतील एक सर्वांत चांगला फोटोग्राफर. २०१६ साली त्याला जगप्रसिद्ध एजन्सी ‘Getty Images’ आणि ‘Instagram’ ची दहा दजार डॉलर्सची ग्रॅंट मिळाली. जे काम पुढे घेऊन जाण्यासाठी त्याला हे पैसे मिळाले, ते काम त्यानं झारखंडमधील कोळशाच्या खाणीत केलं होतं. मी ते फोटो पाहिले आणि हादरून गेलो. पण त्यापेक्षा मोठा धक्का मला तेव्हा बसला, जेव्हा मला कळलं की, ते सर्व फोटो हे आय फोन 5 च्या कॅमेरानं काढलेले होते. कारण भला मोठा DSLR कॅमेरा घेऊन कदाचित त्याला त्या खाणींमध्ये प्रवेशच मिळाला नसता.
बऱ्याचदा कित्येक मित्र इनबॉक्समध्ये मेसेज करून कॅमेरा कोणता घ्यायचा याविषयी सल्ला विचारतात. बऱ्याच जणांचा फक्त हौस म्हणून किंवा कुटुंबाचे, समारंभांचे फोटो काढणं एवढाच उद्देश असतो. आणि माझं उत्तर असतं की, मोबाईल आहे ना? मग बास झालं. त्यावरच प्रॅक्टिस चालू ठेवा. हा सल्ला कित्येकांना पटत नाही. मग महिना दोन महिन्यात फेसबुकवर लाख दोन लाखांना कॅमेरा घेतल्याच्या पोस्ट दिसतात. त्याला ‘माझ्या स्वप्नांचा पाठलाग सुरू’ अशी फिल्मी शीर्षकं दिसतात. मग पुढचे चार सहा महिने घराच्या परसातल्या फुलांचे, पावासाळा आला की, झाडांच्या पानांवर साचलेल्या पाण्याचे किंवा सध्या पाच सात जणांनी मिळून केलेल्या पंढरपूरच्या वारीत काढलेले फोटो दिसू लागतात. आजूबाजूच्या तलावांची लॅंडस्केप्स किंवा मग जंगलात जाऊन टेलिस्कोपिक लेन्स वापरून काढलेले काही पक्ष्यांचे फोटो दिसतात. आणि मग हळूहळू ही पॅशन कमी होते. स्वतःचे पैसे घालून फार काळ हे चालू ठेवता येत नाही. आणि मग तो कॅमेरा जो धूळ खात पडतो, तो क्वचित कधीतरी धूळ पुसण्यासाठी बाहेर काढला जातो. हे कित्येकांच्या बाबतीत घडतं. अगदी माझ्याही बाबतीत सुरुवातीला हेच घडलं. कालांतरानं एक साचलेपण येतं. नवून काही सुचत नाही आणि ते सुचलं नाही तर आपण ज्याला पॅशन समजत होतो, ती पॅशन नव्हती याची जाणीव कित्येकांना होते. मग अशा वेळी आपली दृष्टी बदलावी लागते. आजूबाजूच्या दैनंदिन जीवनात सौदर्य शोधावं लागतं. पण प्रत्येक जण त्यात यशस्वी होतोच असं नाही. बहुंसख्य लोक फोटोग्राफीचा नाद सोडून देतात. माझ्याच मित्र परिवारात सध्या डझनभर कॅमेरे असेच धूळ खात शेवटच्या घटका मोजत आहेत.
हेच कारण आहे की, मी सहसा कुणालाही कॅमेरा घेण्यापूर्वी मोबाईल कॅमेरानं सुरुवात करा म्हणून सल्ला देतो. कारण इथून पुढचं फोटोग्राफीचं भविष्य हे मोबाईल फोटोग्राफीच असणार आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायला हवं. आत्ताचे मोबाईल कॅमेरे हे खूपच चांगल्या दर्जाचे आहेत आणि पुढच्या पाच-सात वर्षांत त्यांच्यात प्रचंड क्रांती होणार आहे हे सत्य आहे. जोपर्यंत तुम्ही छंद म्हणून फोटो काढताय आणि तुम्हाला ते छायाचित्र मोठ्या आकारात एनलार्ज करायचं नाहीये, तोपर्यंत मोबाईलनं फोटो काढायला काहीच हरकत नाही. गेल्या दोन वर्षांत पाच हजाराच्या साध्या रेड मी 2 या मॉडेलच्या मोबाईल कॅमेरानं मी बरेचसे फोटो काढतोय. ते काढताना मोबाईल फोटोग्राफीचे काही फायदे माझ्या लक्षात आले.
सध्याची फोटोग्राफी कला ही बाजाराच्या आहारी गेलेली आहे. आपण ज्याला फोटोग्राफी म्हणतो, त्याला जागतिक फोटोग्राफीच्या दुनियेत काय स्थान आहे, हे कित्येकांना माहीत नसतं. कोणत्याही कॅमेरा किंवा लेन्सची जाहिरात पाहिली तर लक्षात येईल की, तो कॅमेरा किंवा लेन्स छायाचित्रात बोके (छायाचित्रातील मुख्य विषयाच्या पाठीमागील जागा धूसर झाल्यावर मिळणारा इफेक्ट) किती छान टिपतो याविषयी जाहिरात केली जाते. आणि हे टिपणं खरं तर सर्वांत सोपं असतं. खरी ताकद तेव्हा दिसते, जेव्हा फ्रेममधील सर्वच्या सर्व भाग हा दृश्य आहे आणि तरीही ती फ्रेम विस्कळीत होत नाही. रघू राय यांची छायाचित्रं पाहिली तर हा मुद्दा लक्षात येईल. पण कॅमेरा कंपन्यांना त्याच्याशी काही देणं-घेणं नसतं. त्यांना फक्त सर्व गोष्टी सोप्या करून द्यायच्या असतात. जेणेकरून जास्तीत जास्त लोक फोटोग्राफीकडे आकर्षित होतील आणि कंपनीचा खप वाढेल. एखाद्या वीस-बावीस वर्षाच्या चित्रकाराला भेटलं आणि त्याच वयाच्या फोटोग्राफरला भेटलं की फरक लगेच जाणवतो. एखादा चित्रकार हा अगदी लहानपणापासून चित्र काढत काढत तिथपर्यंत पोहचलेला असतो. त्याला रंगांविषयी मुद्दलात काही जाणीव असते. पण तेच फोटोग्राफरचं पहा. दोन-सहा महिन्यांपूर्वी त्याला कलेचं काही माहीत नसतं आणि अचानक हातात कॅमेरा येतो. तो फोटोग्राफर कम कलाकार म्हणून मिरवायला लागतो. मग विविध लेन्स घे आणि फोटोशॉपमध्ये रंग भडक करून फोटो फेसबुकवर टाकले जातात. जे पाहिले तर मळमलायला लागतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर मोबाईल कॅमेऱ्याला असलेल्या कित्येक मर्यादाच त्याचा पहिला प्लस पॉइंट होऊन जातो. त्यामुळे मोबाईलनं फोटो काढताना त्या फोटोतला आशय तुम्हाला उत्तम रीतीनं पकडता यावा लागतो. निव्वळ फुल फ्रेम कॅमेरा आणि उत्तम क्वालिटीची लेन्स वापरून, अतिशय शार्प असे निव्वळ डोळ्यांना सुखावणारे फोटो काढून कोणीही वेळ मारून नेऊ शकत नाही.
दुसरं म्हणजे मोबाईलला झूम नसतं. झूम केलं तर फोटोचा दर्जा खराब होतो. त्यामुळे मोबाईल कॅमेरानं मी तरी कधी झूम करून फोटो काढत नाही. त्यामुळे साहजिकच तुम्हाला लोकांच्या जवळ जावं लागतं. त्यातून लोकांशी संवाद होतो. कोणतंही छायाचित्र भावनिकदृष्ट्या तेव्हा जास्त भावतं, जेव्हा ते एका वेगळ्या दृष्टिकोनातून काढलेलं असतं. जेव्हा तुम्ही लोकांच्या जास्त जवळ जाऊन छायाचित्र काढता, तेव्हा ते पाहणाऱ्यालादेखील लोकांच्या जवळ घेऊन जातं. रॉबर्ट कापा नावाचा प्रसिद्ध छायाचित्रकर म्हणायचा ‘If your photographs aren't good enough, you're not close enough’. कापा यांचं तत्त्वज्ञान हे अंतरानं व भावनांनीदेखील विषयाच्या जवळ जायला सांगतं.
DSLR कॅमेराचा सर्वांत मोठा तोटा मला वाटतो, तो म्हणजे कॅमेरा पाहून अजूनही लोक संशयानं पाहतात. DSLR कॅमेरा म्हणजे प्रेसचा माणूस अशी धारणा अजूनही लोकांच्या मनात पक्की आहे. त्यामुळे तुम्ही एखाद्या रस्त्यावरून फोटो काढत फिरत असाल तर फुटाफुटावर तुम्हाला अडवून लोक तुमची चौकशी करतात. लोकांना त्यांच्या पर्सनल स्पेसमध्ये फोटोग्राफरचं अतिक्रमण नको असतं. बरं आपला फोटो काढण्याचा उद्देश चांगला असतो. त्यामुळे लोकांना स्पष्टीकरण दिलं की, ९० टक्के वेळा कोणी तुम्हाला शिवीगाळ करत नाही. पण यात वेळ खूप वाया जातो. पण या तुलनेत मोबाईल कॅमेरा वापरून फोटो काढत असाल तर फार कोणी अडवत नाही. लोकांना तुम्ही फोटो का काढताय याविषयी स्पष्टीकरण देत बसावं लागत नाही. कारण तुम्ही पर्यटक असाल असा कित्येकांचा समज होतो. ही अडचण पर्यटन किंवा धार्मिक स्थळांवर फोटोग्राफी करताना येत नाही. तिथल्या लोकांना फोटोग्राफर पाहायची सवय असते. पण एखाद्या जुन्या शहरी भागातून जाताना तुम्हाला फोटो काढण्यालायक काही दिसलं आणि तुम्ही कॅमेरा बाहेर काढला की लोकं जमा झालेच समजा. त्यात गेल्या काही वर्षांत आतंकवादी हल्ल्यांपासून वातावरण खूप संवेदनशील झालंय. कित्येक ठिकाणी कॅमेरा घेऊन जायला परवानगी मिळत नाही. अशा वेळी मोबाईल कॅमेरा खूपच उपयोगी पडतो.
आजकाल सर्वच फोटो काढतात. कॅमेरा घेतला की पहिल्या वर्षभरात वाराणसी, पुष्कर, राजस्थानची वारी केली जाते. कॅमेरा बनवनाऱ्या कंपन्यादेखील त्यांच्या माहितीपुस्तकात अशाच ठिकाणची छायाचित्रं छापतात. त्यामुळे कित्येकांना समज असतो की, कॅमेरा घेऊन या पर्यटन स्थळांना भेट दिल्याशिवाय आपल्या करिअरचा काही श्रीगणेशा होत नाही. पण जागतिक पटलावर या क्षेत्राची वस्तुस्थिती वेगळी आहे. इथं फोटोग्राफीच्या व्याख्याही बदलेल्या आहेत. तुम्ही सुंदर ठिकाणी जाऊन किती सुंदर छायाचित्रं काढता, यापेक्षा तुमच्या आजूबाजूचं कंटाळवाणं वाटणारं जग तुम्ही फोटोग्राफीतून वेगळ्या नजरेनं मांडू शकता का, याला खूप महत्त्व आहे. स्ट्रीट फोटोग्राफी किंवा पर्सनल स्टोरीजना खूप महत्त्व आहे. मग अशा वेळी आपण सतत कॅमेरा गळ्यात अडकवून फिरू तर शकणार नाही. पण मोबाईल कॅमेरा हा सतत आपल्या सोबत असतो. त्यामुळे समोर फ्रेम दिसत असताना कॅमेरा नाही असं सहसा होत नाही. त्यातून सतत आजूबाजूला फ्रेम पाहण्याची एक अजब सवय लागून जाते. आपल्या आजूबाजूचं नेहमीचच जग एका वेगळ्या नजरेनं मांडायची सवय. आणि यासाठी खर्चही नसतो. परिणामी तुम्ही तुमची पॅशन आयुष्यभर जपू शकण्याच्या शक्यता वाढतात.
DSLR कॅमेरा हा कमी सूर्यप्रकाशात चांगल्या दर्जाचं छायाचित्र देतो. मोबाईल कॅमेरानं कमी सूर्यप्रकाशात काढलेल्या छायाचित्रांना दर्जा कमी असतो. पण दर्जा कमी असतो म्हणजे नेमकं काय? तर कमी सूर्यप्रकाशात काढलेल्या छायाचित्रांमध्ये एक धुसरता आणि ग्रेन्स येतात. पण कित्येकांना माहीत नसतं की, या ग्रेन्स आणि धुसरतेचंसुद्धा एक सौदर्य असतं. कसं माहीत असणार? कारण कंपण्या सांगतात की, आमचा कॅमेरा हा जास्तीत जास्त स्पष्ट छायाचित्रं काढतो, ज्यात अजिबात ग्रेन्स दिसत नाहीत. पण आपल्याला खरंच आजूबाजूच्या गोष्टी या कॅमेरा दाखवतो तितक्या स्पष्ट, शार्प दिसतात का हो? सत्यजित रे यांच्या ब्लॅक अँड व्हाईट सिनेमाच्या प्रिंटमध्ये खूप ग्रेन्स आणि धुसरता असते. पण म्हणून का ते आपल्याला भावत नाहीत का? निश्चितच भावतात, कारण त्यातील आशय खोल असतो. खरं तर सत्यजित रे यांनी त्यांच्या सिनेमाच्या कॅमेरामनला हेन्री कार्टर ब्रेसा यांची छायाचित्रं दाखवली होती. आणि या छायाचित्रात आहे तसं टेक्श्चर आणि ग्रेन्स मला सिनेमात हवेत अशी स्पष्ट सूचनाही दिली होती. तरीही ज्यांना शार्प आणि स्वच्छ स्पष्ट छायाचित्र ही गरज वाटते, त्यांच्यासाठी मोबाईल असलेली मोबाईल कॅमेरातील ही उणीवदेखील येत्या काळात निश्चितच नष्ट होईल यात शंका नाही. त्या दृष्टीनं सर्व कंपन्या संशोधन करत आहेत.
बऱ्याचदा ही मोबाईलनं काढलेली छायाचित्रं एखाद्या पुस्तकासाठी वापरायची असतील किंवा त्यांचं पुस्तकच करायचं असेल तर, हा प्रश्न कित्येकांना पडतो. तर वस्तुस्थिती अशी आहे की, मोबाईलमधून काढलेल्या फोटोंचं पुस्तक करायचं असेल तरी काही अडचण नसते. साधारण १० बाय १२ इंचाच्या आकाराचं पुस्तक छापण्याएवढ्या दर्जाचे फोटो मोबाईल कॅमेरा काढून देतो. रॉनी सेन यानं आयफोन 5 नं काढलेल्या फोटोंचं पुस्तक ‘End of Time’ नावानं आलेलं आहे. त्याचा दर्जा उत्तम आहे. छायाचित्रं ग्रेनी आणि धुसर आहेत. पण ती भावनिकदृष्ट्या खूपच भावतात. कारण त्यात आशय उत्तम आहे. कोळसा खाणीत तर धूळ आणि धूर मुबलक असतो. त्यामुळे तुम्हाला छायाचित्रातील धुसरता थेट त्या खाणीत घेऊन जाते.
रॉनी सेन यांच्या पुस्तकाची व्हिडिओ लिंक
हौस म्हणून फोटो काढताना किमान साठ सत्तर हजाराचा कॅमेरा आणि त्यानं काढलेले फोटो पोस्ट प्रोसेस करण्यासाठी किमान तीस ते चाळीस हजाराचा लॅपटॉप लागतो. म्हणजे लाखभराचा खर्च आला. मोबाईलमुळे हा खर्च पाच दहा हजाराच्या घरात येतो. मोबाईलवर काढलेला फोटो त्वरित मोबाईलमध्येच पोस्ट प्रोसेसिंग करता येतो. वेळ वाचतो. बऱ्याचदा काढलेले फोटो हे सोशल मीडियावर शेअर करणं एवढाच उद्देश असतो. त्यामुळे मोबाईल फोटोग्राफी सोयीची पडते.
शेवटी कुणीतरी फोटोग्राफीचा सारांश एका वाक्यात माडंलाय. ‘Light makes photograph. Not camera and lenses.’ हेच ते तत्त्व ज्याद्वारे तुम्हीही सुंदर छायाचित्रं काढू शकता. त्यासाठी लाखो रुपयांच्या कॅमेऱ्यांची गरज असतेच असं नाही. त्यातही ज्यांना फोटोग्राफी करिअर म्हणून निवडायचं आहे, त्यांना कॅमेरा घ्यायला हरकत नाही. परंतु त्यापूर्वी मोबाईल फोटोग्राफी ट्राय करून पाहायला काय हरकत आहे? कारण इथून पुढचा काळ फोटोग्राफी करिअरसाठी खूप अवघड असणार आहे. प्रत्येकाकडे मोबाईल कॅमेरा आणि क्षणार्धात छायाचित्र पोस्ट प्रोसेस करून देणारी अप्लिकेशन्स असतील. मग फोटोग्राफरला कोण काम देणार? दिवसेंदिवस शशांक बंगालीसारखा विचार करणाऱ्या लोकांची संख्या वाढतच जाणार आहे. त्यामुळे मोबाईल फोटोग्राफीच्या अनुषंगाने मी ही धोक्याची घंटा वाजवायचंसुद्धा काम इथं करतो आहे.
.............................................................................................................................................
लेखक नामांकित फोटोग्राफर आहेत.
indrajitmk804@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment