अजूनकाही
किथ गे्र या ब्रिटिश लेखकाच्या (जन्म - १९७२) २००८ साली प्रकाशित झालेल्या ‘द ऑस्ट्रिच बॉईज’ या कादंबरीचं नाट्यरूपांतर कार्ल मिलर यांनी केलं. याचाच भारतीय अवतार म्हणजे ‘आनंद एक्सप्रेस’. या मूळ इंग्रजी नाटकाचं भारतीयीकरण आकर्श खुराना यांनी केलं आहे. यासाठी त्यांनी कार्ल मिलर यांच्याशी बरीच चर्चा केली. मूळ इंग्रजी नाटक इंग्लंडमध्ये घडतं, तर ‘आनंद एक्सप्रेस’ मुंबईतल्या बांद्रा, बडोदा, आनंद वगैरे ठिकाणी घडतं. भारतीयीकरण करताना खुराना यांनी अनेक ठिकाणी भारतीय इंग्रजीचा सढळ वापर केला आहे. शिवाय रंगमंचावरील वातावरण एवढं भारतीय आहे की, हे नाटक आपलंच वाटतं.
हे नाटक ‘आद्यम’च्या २०१७ सालासाठी सादर होत असलेल्या नाटकांपैकी एक. अलिकडेच याचे प्रयोग मुंबईत झाले. या नाटकाची निर्मिती ‘रेज प्रॉडक्शन्स’तर्फे करण्यात आली असून नादीर खान याने नाटकाचं दिग्दर्शन केलं आहे. या तरुण दिग्दर्शकानं अल्पावधीत रसिकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याने दिग्दर्शित केलेली अलिकडची इतर नाटकं म्हणजे ‘द गॉड ऑफ कार्नेज’ व ‘द ट्वेल अँग्री ज्युरर्स’.
‘आनंद एक्प्रेस’मध्ये चार तरुण मित्रांची गोष्ट आहे. यातील एक मित्र, आनंदचं नुकतंच अपघातात निधन झालं आहे. जिवंत होता तेव्हा आनंद नेहमी दुग्ध क्रांतीसाठी जगप्रसिद्ध असलेल्या गुजराममधील आनंद या गावाला जाण्याविषयी बोलत असे. केनी, वासिम व नीरज हे त्याचे तीन मित्र ठरवतात की, आनंदची रक्षा आनंद गावात नेणं हीच त्यांच्या प्रिय मित्राला योग्य श्रद्धांजली ठरेल. त्यानुसार ते आनंदची रक्षा असलेलं भांडं घेऊन आनंद गावाच्या दिशेनं प्रवासाला सुरुवात करतात. त्यांचा बांद्रा ते आनंद हा प्रवास हीच नाटकाची कथा आहे. कोणताही प्रवास जसा माणसाला काही ना काही शिकवून जातो, तसंच याही प्रवासाचं आहे. या प्रवासातून परतलेले ते तिघं आता मनानं प्रौढ झालेले असतात. प्रवासातील अनुभवांनी व प्रवासादरम्यान समोर आलेल्या कटू वास्तवानं त्यांच्यात अमूलाग्र बदल होतात. हे सर्व रंगमंचाच्या मर्यादित अवकाशात दाखवणं, हे एक आव्हानच होतं. पण दिग्दर्शक नादीर खान यांनी ते समर्थपणे पेललं आहे.
या तिघांना वाटत असतं की, आनंदच्या रक्षा आनंद गावातच टाकल्या पाहिजेत. त्यानुसार ते तरुणांना शोभेल अशा उत्स्फूर्तपणे लगेच आनंद गावाला जाण्याचा प्लॅन बनवतात आणि बांद्रा स्टेशनला जाऊन गाडी पकडतात. गाडी सुरू झाल्यावर थोड्या वेळानं त्यांच्या लक्षात येतं की, एक म्हणजे ते चुकीच्या गाडीत चढले आहेत. ही गाडी आनंदला जाणारी नसून त्यांना बडोद्याला उतरून दुसरी गाडी पकडली पाहिजे. दुसरं म्हणजे ज्या नीरजला त्यांनी तिकिटं काढण्याचं काम सोपवलं होतं, तो त्याच्या धांदरट स्वभावाप्रमाणे तिकिटं आणि हातातली बॅग तिकीट काऊंटरजवळ विसरून आला आहे. त्या बॅगेमध्ये पैसे आणि दोघांचे मोबार्इल फोन होते. म्हणजे आता तिकीट, पैसे नाहीत आणि मोबार्इलही. अशा स्थितीत त्यांना आनंद गावापर्यंतचा प्रवास करावा लागणार आहे.
तिकीट कलेक्टरनं सांगितल्याप्रमाणे ते बडोद्याला उतरतात आणि पुढच्या प्रवासाची काय सोय करायची, पैशांचं काय करायचं वगैरे चर्चा करतात. तिथं त्यांना एक अँडव्हेंचर स्पोर्टस चालवणारा माणूस भेटतो, जो त्यांना सांगतो की तुम्ही जर अमुक एका उंचीवरून लोकांसमोर बंगी जंप करून दाखवली तर मी तुम्हाला पाच हजार रुपये देईन. पैशासाठी लाचार झालेल्या त्या तिघांपैकी एक कसाबसा तयार होतो आणि पाच हजार रुपये मिळवतो. यातून त्यांची पुढच्या प्रवासाची सोय होते.
त्यातल्या एकाजवळ मोबाईल असतो, पण बॅटरी चार्जर नसल्यामुळे तो मोबाईलचा वापर फार तुरळक करतो. एकदा मैत्रिणीला फोन केल्यावर त्याला कळतं की, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. ते तिघं चक्रावतात. पोलीस आपल्या मागावर का असावेत याचा त्यांना उलगडा होत नाही. म्हणून ते पुन्हा त्या मुलीला फोन करतात. तेव्हा त्यांना कळतं की, त्यांच्या मित्रानं, आनंदनं त्याच्या संगणकावर आपण आत्महत्या करत असल्याची पोस्ट टाकली होती, जी पोलिसांना मिळाली. ज्या ट्रकखाली येऊन आनंदचा अपघाती मृत्यू होतो तो ट्रक ड्रायव्हर तर सुरुवातीपासूनच सांगत असतो की, या मुलानं स्वतःला ट्रकसमोर फेकलं. हा अपघात नसून आत्महत्या आहे. या दोन गोष्टी व तिसरं म्हणजे हे तिघं गेले काही दिवस गायब झालेले असतात. परिणामी पोलीस त्यांचा शोध घेत असतात.
हे सर्व समोर आल्यावर ते तिघंही चक्रावतात. एक म्हणजे पोलीस आपल्याला शोधत आहेत म्हटल्यावर साहजिकच त्यांची पाचावर धारण बसते. दुसरं म्हणजे ज्याला ते अपघात समजत होते, ती आत्महत्या आहे हे सत्य त्यांना पचवायला जड जातं. आपल्यासारखे मित्र असूनही आनंदला आत्महत्या करावीशी वाटली म्हणजे आपली मैत्री त्याला वाचवण्याइतकी समर्थ नव्हती, ही जाणीव त्यांना उदध्वस्त करते. इथं नाटक एक वेगळीच भावनिक उंची गाठतं.
नंतर सुरू होतं खरं नाटक. यात आतापर्यंत आत्महत्या केलेल्या आनंदच्या संदर्भात एकमेकांपासून लपवून ठेवलेली आणि ओशाळं वाटायला लावेल अशी प्रत्येकाजवळची माहिती समोर येते. वासिम सांगतो की, आनंदनं मरण्याअगोदर त्याला फोन करून सांगितलं होतं की, तो त्याच्या वडिलांच्या संगणकावर काम करत असताना त्याच्या हातून चुकून वडिलांनी संगणकावर लिहिलेल्या कादंबरीची फाईल डिलिट झाली. याबद्दल मदत करावी म्हणून तो संगणकाबद्दल चांगली माहिती असलेल्या नीरजला कळकळीची विनंती करतो. पण नीरज काहीतरी फालतू कारणं सांगून जात नाही आणि दुसऱ्याच दिवशी आनंद समोरून येणाऱ्या ट्रकखाली उडी मारतो.
वासिम सांगतो की, कॉलेजमधल्या एका टग्या मुलाशी आनंदची बाचाबाची होते. नंतर तो मुलगा त्याच्या मित्रांच्या मदतीनं आनंदला चांगला पिटून काढतो. हे सर्व वासिम झाडामागं लपून बघत असतो. आता जर आपण आनंदच्या मदतीला गेलो तर आपल्यालाही बेदम मार पडेल म्हणून वासिम मार खाणाऱ्या आनंदला बघत थांबतो. तेव्हाच आनंद अचानक वासिमाला बघतो आणि आपला मित्र आपल्या मदतीला येत नाही, हे बघून त्याच्या डोळ्यात विश्वासघाताची भावना दिसते.
आत्महत्या करण्याच्या काही दिवसच अगोदर आनंदचं त्याच्या मैत्रिणीशी फाटतं. त्याच्या मित्रांच्या अंदाजानुसार याचाही थोडा ताण त्याच्या मनावर होता. त्या प्रवासादरम्यान दोन मित्रांना कळतं की, केनीचं आनंदच्या मैत्रिणीशीच अफेअर सुरू होतं. हे आनंदला माहिती होतं. ही माहिती परिस्थितीला वेगळंच वळण देतं. आपली मैत्रीण व आपला प्रिय मित्र आपल्याला धोका देत होते, या भावनेनं तर आनंदनं आत्महत्या केली नसेल ना? या व अशा प्रश्नांनी नाटकातील ताण वाढत जातो. सुरुवातीला कॉलेजात शिकणाऱ्या, धमाल करणाऱ्या तीन मित्रांची साधी वाटणारी कथा बघताबघता धारदार होते. यात अपेक्षाभंग, विश्वासघात, धोका वगैरे अनेक मूलभूत भावना येतात. त्या त्या प्रमाणात नाटकाची आघातशक्ती वाढत जाते.
या नाटकाचा प्रयोग एनसीपीएमधील जमशेट भाभा थिएटरमध्ये झाला. हा उल्लेख यासाठी महत्त्वाचा आहे, कारण ज्या प्रकारचं नेपथ्य या नाटकासाठी वापरण्यात आलं आहे, त्यासाठी जमशेट भाभा थिएटरसारखं भव्य थिएटर गरजेचं आहे. नाटकातील प्रसंग अनेक ठिकाणी घडतात. बांद्रा इथं झालेला आनंदचा अपघात, नंतर त्या तिघांचं आगगाडीने बडोद्याला जाणं, बंगी जंपचा प्रसंग वगैरे सर्वांचा विचार केल्यास हे नाटक रंगभूमीच्या तशा छोट्या अवकाशात सादर करणं, हे एक आव्हानच होतं. दिग्दर्शकानं यासाठी मल्टिमीडिआचा वापर केल्यामुळे हे जमू शकलं.
यातील महत्त्वाचं नेपथ्य म्हणजे रंगमंचावर भलाथोरला उभा ठोकळा. यातून दिग्दर्शकानं अनेक प्रसंगांचं सूचन केलं आहे. परिणामी हा ठोकळा नाटकातील महत्त्वाच्या पात्रासारखा आहे. याचप्रमाणे नाटकातील प्रकाशयोजनासुद्धा महत्त्वाची आहे. अनेक प्रसंग असलेल्या अशा नाटकात प्रकाशयोजनेद्वारे दिग्दर्शक कथानक एका प्रसंगातून दुसऱ्या प्रसंगात नेतो. यातील बरंचसं श्रेय प्रकाशयोजनाकार आर्घ्या लाहिरी यांचं आहे. हा तरुण गृहस्थ ‘प्रकाशयोजना’ या तशा दुर्लक्षित क्षेत्रात गेली काही वर्षं दखल घ्यावी असं काम करत आहे. या नाटकात त्यानं विविध प्रसंगात प्रसंगानुरूप प्रकाशयोजना केली आहे. नेपथ्यकार फली उनवाला यांनी तर कमाल केली आहे. उनवाला नाटकातील महत्त्वाचं पात्र ठरावं असा तो ठोकळा असा काही बनवला आहे की, त्यातून अनेक प्रसंगात पात्रं प्रसंगाला साजेसं नेपथ्य संवाद म्हणता म्हणता सहज बनवतात.
हे नाटक चार तरुणांच्या जीवनावर आहे. यातील आनंदनं आत्महत्या केलेली असली तरी तो फ्लॅशबॅकद्वारे अनेक प्रसंगात असतो आणि जेव्हा नसतो तेव्हा त्या मोठ्या ठोकळ्यावर बसून खाली रंगमंचावर चाललेले प्रसंग बघत असतो. दिग्दर्शकानं अनेक प्रसंगांत कार्डबोर्डचा वापर करून प्रसंग सूचित केले आहेत. हा प्रकार आता आपल्याकडील रंगभूमीवर स्थिरावला आहे. यामुळे दिग्दर्शकाला कथानकाची गती सांभाळता येते.
चारही तरुणांनी दर्जेदार अभिनय सादर केला आहे. सुकांत गोयल (आनंद), विवान शहा (नीरज), चैतन्य शर्मा (वासिम) व सिद्धार्थ कुमार (केनी) यांनी रंगमंचावर धमाल केली आहे. नाटकाची मांडणी एका घटनेतून दुसरी घटना उलगडत जाणं, अशी पारंपरिक पद्धतीची नाही. यात अनेक ठिकाणी फ्लॅशबॅक आहेत. त्यामुळे कथानक सतत मागेपुढे होत राहतं. नाटकाची सुरुवात होते तेव्हा तीन तरुण रंगमंचावर धमाल करत असतात आणि नाटक संपते तेव्हा तिघंही अंतर्मुख झालेले असतात. हा त्यांचा आणि एका प्रकारे प्रेक्षकांचासुद्धा जो प्रवास होतो, तो या नाटकाचा गाभा आहे.
.............................................................................................................................................
लेखक कादंबरीकार व समीक्षक आहेत.
nashkohl@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment