अजूनकाही
साधारणतः दोन वर्षांपूर्वी बातमी आली की, नोलन डंकर्कच्या घटनेवर सिनेमा करतोय. हा एका अर्थानं आश्चर्याचा धक्का होता, कारण आजवर त्याने केलेल्या नऊही सिनेमांमध्ये एकही सिनेमा हा सत्यघटनेवर आधारित नव्हता. त्याहून मोठं आश्चर्य वाटण्याचं कारण म्हणजे त्याची शैली ही मुळात वेळेशी खेळणारी, घटनेचा कालक्रम बदलून ती कथा अधिक परिणामकारक करणारी, शिवाय पात्रंही एका ध्येयानं झपाटलेली, त्यापलीकडचं पाहू न शकणारी, स्वतःच्या सत्यात जगणारी असतात. मग मूळ घडलेल्या घटनेत हे सगळं तो कसा काय साधेल म्हणून डंकर्कबद्दल विशेष उत्सुकता होती. आणि या सर्व पार्श्वभूमीवर आपण ‘डंकर्क’ पाहतो.
सुरुवातीला एका छोट्या शहराच्या निर्मनुष्य रस्त्यावर काही सैनिक चालताना दिसतात. ते खाण्या-पिण्यासाठी काही मदत मिळतेय का याच्या शोधात आहेत. यावरून त्यांची रसद कमी झालीय हे कळतं. काही फ्लायर्स आकाशातून पडतात. अर्थात मुळात घटना खरी असल्यामुळे हा गोबेल्स प्रोपगांडाचा भाग होता याची आठवण होते. आणि अचानक त्यांच्यावर गोळ्यांचा हल्ला सुरू होतो. अर्थात त्या कुठून येत आहेत हे मात्र दिसत नाही. त्यातून जीव वाचवत हे चार-पाच जण पळायला लागतात. मात्र केवळ एकजण जिवंत अवस्थेत आपल्या ब्रिटिश कंपूपर्यंत पाहोचू शकतो. आपण सुरक्षित आहोत याची खात्री झाल्यावर चालत पुढे तो शहराच्या समुद्र किनाऱ्यावर येतो. आणि पहिल्यांदाच आपल्याला दिसतो तो डंकर्कचा समुद्रकिनारा.
हे संबंध दृश्य हा पुढच्या अनुभवासाठी आपली तयारी करवून देतो. कारण सुरुवातीचे फ्लायर्स आपल्याला ब्रिटिश सैनिक कसे कोंडीत सापडलेत याची माहिती देतात. त्या चार-पाच सैनिकांमधून फिन व्हिटहेड (त्या पात्राचं नावही शेवटपर्यंत समोर येत नाही) ज्याप्रमाणे वाचतो, त्यावरून ही कथा वाचलेल्या त्या सुदैवी सैनिकांची असेल हे लक्षात येतं. हल्ला करणारे इथं जसे दिसत नाहीत, तसंच ते सबंध सिनेमातही दिसत नाहीतच. ज्या जमिनीवरून तो पळत होता, ती एके ठिकाणी अचानक संपते. इथून पुढे पळायला जागा नाही. इथं येऊन सर्व तुंबलंय. हे किनाऱ्याच्या पहिल्याच दृश्यामध्ये उघड होतं.
या दृश्याची आणखी एक खुबी म्हणजे डंकर्कचा किनारा आपल्याला या शॉटमध्ये जेव्हा सर्वप्रथम दिसतो, तेव्हा तिथं आपल्याला चार स्तंभ दिसतात. संपूर्ण फ्रेम, समोर दिसणारा किनारा, त्यावर पसरलेले सैनिक या सर्वांना हे स्तंभ तीन समान भागात विभागतात. आणि यातच येतो पूर्ण सिनेमा. कारण तोही या फ्रेमसारखा तीन भागांत विभागला आहे. या सर्व परिस्थितीचा तीन दृष्टिकोनातून केलेला तो विचार आहे. पुढच्या सबंध अनुभवाची सर्व माहिती आणि तयारी हे दृश्य इतक्या सोप्या पद्धतीनं करून देतो.
इथून पुढे सिनेमा तीन जागांमध्ये आणि तीन वेळांमध्ये विभागला जातो. एक, आहे ती बंदराच्या धक्यावर घडते. दुसरी, ब्रिटनच्या किनाऱ्यावरून डंकर्ककडे मदतीसाठी येणाऱ्या एका नागरिकाची आहे, तर तिसरी, जर्मनीच्या लढाऊ विमानांशी डॉगफाईटमध्ये अडकलेल्या एका पायलटची. या कथांच्या वेळा या एक तासापासून एक आठवडा इतक्या वेगवेगळ्या असल्या तरी त्या कधी कधी एकत्र येतात. किंवा एकाच ठिकाणावर दोन वेगवेगळ्या कथांमध्ये आपण एकच घटना परत पाहतो. (जागतिक सिनेमाच्या प्रेक्षकांसाठी हे नक्कीच नवीन नाहीये फातिह अकीन, इनारीतूच्या सिनेमात हे प्रयोग आधीही केलेले आहेत.)
अशा प्रकारे सिनेमा सत्य घटनेवर आधारित असूनही त्यावर नोलनच्या शैलीची छाप दिसून येते. कारण घटनाक्रमात होणाऱ्या सरमिसळीपासून, वेळेशी खेळण्यापर्यंत सर्व काही इथं आहे. हा सिनेमाला इतर युद्धापटांपासून वेगळा ठरवणारा मुद्दा असला तरी तोच काही ठिकाणी सिनेमाला थोडासा मारक जाणवला. कारण या सर्वांत पात्रांबद्दल जी एक प्रचंड ओढ जाणवायला हवी, ती या ढाचानं थोडीशी कमी होते का, असा एक प्रश्न समोर येतो. म्हणजे त्या पात्राची जीव वाचवण्यासाठी चाललेली धडपड कळते. एक माणूस म्हणून आपण त्याच्याशी सहानुभूतही होतो, पण त्या पात्राशी एक भावनिक नातं तयार होणं अपेक्षित आहे, ते मात्र होताना दिसत नाही. (विशेषतः फिन व्हीटमन आणि टॉम हार्डी यांच्या पात्रांबद्दल.)
नोलनच्या काही सिनेमात जाणवणारा हा गुण आहे की, कथेच्या मांडणीतल्या प्रयोगामध्ये कधी कधी पात्राच्या डेव्हलपमेंटला दुय्यम महत्त्व दिलं जातं. हे आधी ‘इन्सेप्शन’, ‘डार्क नाईट राईजेस’मध्ये पाहिलंय. तेच थोडंसं ‘डंकर्क’मधेही परत एकदा घडताना दिसतं. अर्थात मार्क रायलन्सच्या पात्राचा अपवाद वगळता. रायलन्सच्या पात्राचा इतिहास जरी बाजूला काढला तरी, त्या पात्राशी आपण एक नातं बांधू शकतो. त्याचा स्वभाव आपल्याला कळतो. जे इतर पात्रांच्या बाबत होत नाही. इथं ते व्हिज्युअल आहे! टॉम हार्डीसारख्या अभिनेत्याच्या फक्त डोळ्यातून ते येतं!... अशी मतं असू शकतात, पण दिग्दर्शकीयदृष्ट्या मला स्वतःला ते पुरेसं वाटत नाही.
नोलनबद्दलची दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची कथेची मांडणी ही नेहमी परिणाम वाढवणारीच असते असं नव्हे. म्हणजे मेमेंटोमध्ये उलट्या चालणाऱ्या कथेमुळे आपल्याला तो पात्राच्याच स्थितीत (शोर्ट टर्म मेमरी लॉस) नेऊन बसवतो. सरळ आणि उलट्या चालणाऱ्या शेवटाला दोन कथांना एकत्र आणतो. ही मांडणी नक्कीच परिणामकारक आहे. पण डंकर्कच्या बाबतीत हा खरा इतिहास असल्यामुळे म्हणा किंवा आपण अधिक माहिती घेण्याची अपेक्षा केल्यामुळे कथेच्या मांडणीतले काही प्रयोग आपल्याला पात्रांपासून दूर नेणारे वाटू शकतात. उदाहरणार्थ- किलीयन मर्फीचं पात्र सात दिवसांनी बोटीवर अडकलेलं दिसतं. (कथा : वॉटर) ते युद्धाच्या आघातातून सावरलं नाहीये हेही सरळ सरळ मान्य केलं असतं. पण या पात्राला तो मागच्या कथेत (मोलमध्ये छोट्या बोटीवरचा अधिकारी) दाखवतो. मग तिथून तो उपड्या पडलेल्या यु बोटपर्यंत कसा आला? इथपर्यंत कथा पोहोचवेल अशी अपेक्षा उगाच निर्माण होते आणि भ्रमनिरास होतो. (जे मेमेंटोमध्ये होत नाही) हे असं पुढे मागे केल्यामुळेच नोलनचा जो सिग्नेचर शेवट असतो की, कोणीतरी मोनोलॉग बोलतंय आणि कथेचे सर्व धागे एकत्र जुळताना दिसतायत. तो सर्वांत कमी परिणामकारक मला ‘डंकर्क’मध्ये वाटला. (जरी संपूर्ण सिनेमा म्हणून तो त्याच्याच कित्येक सिनेमांहून वरचढ असला तरी)
अर्थात कथा अशी तीन दृष्टिकोनात विभागल्याने आपल्याला एकच घटना वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला मिळते. आणि प्रत्येक वेळी त्या गोष्टीची तीव्रता प्रत्येक दृष्टिकोनातून किती वेगळी असू शकते हे जाणवतं. “मला हा सिनेमा कायम इन दि मोमेंट ठेवायचा होता” हे नोलन म्हणतो, तेव्हा प्रत्येकासाठी तो मोमेंट किती वेगळा असू शकतो हे दाखवण्यासाठी हे डिझाईन असावं असं वाटतं.
संवादलेखन हा ज्याच्या सिनेमाचा एक महत्त्वाचा घटक असतो, अशा नोलनने ‘डंकर्क’मध्ये संवाद हे अत्यंत कमी प्रमाणात वापरले आहेत. हा एक धाडसी आणि यशस्वी निर्णय म्हणायला हवा. यशस्वी यासाठी की त्याने तिन्ही भागातली पात्रं ही प्रातिनिधिक म्हणून समोर येतात. काही एक स्वभावविशेष असणारी माणसं म्हणून ती कधीच समोर येत नाहीत. अर्थात याचे तोटे वर नमूद केलेच आहेत. पण याचा फायदा असा की, आपण त्यांना युद्धातलेच एक आपल्या माहितीचे नसणारे सैनिक समजून त्यांच्यासोबत या नाट्यात घुसतो. आणि सिनेमाच्या अति चर्चिल्या गेलेल्या दृश्य स्वरूपाला त्यानं अधिक वाव मिळतो.
दुसरा सिनेमाबद्दल चर्चिला जाणारा तांत्रिक भाग म्हणजे त्याचं पार्श्वसंगीत. नोलनच्या निमित्ताने (त्याचं VFX शी असणारं वावडं, फिल्मवरती शूट करण्याचा अट्टहास) सिनेमाचे तांत्रिक विषय रोजच्या चर्चेत येत आहेत हे चांगलंच आहे आणि त्याच्या सेलेब्रिटी स्टेट्सचं द्योतकही आहे. त्याबद्दल माझं मत असं की, हँस झीमरचं पार्श्वसंगीत हे इतर चांगल्या पार्श्वसंगीतकारांसारखं ऐकू न येणारं नसतं. मग ते पायरेट्स, शेरलॉक असो वा अगदी फ्रॉस्ट-निक्सन, मिस्टर मॉर्गन्स लास्ट लव्ह यांसारखे शांत सिनेमे असोत. त्याचं पार्श्वसंगीत उठून दिसतं. ते जाणवेल इतपत लाऊड असतं. पण त्याची मेख अशी की आपण त्याला युज टू होऊन जातो. त्या ट्युन्स सुरुवातीला लाऊड वाटतात, पण नंतर आपण त्यांच्याशी सिनेमाला असोसिएट करायला लागतो. तेच ‘डंकर्क’मधेही घडतं. सुरुवातीला साउंड आणि संगीत दोन्ही लाऊड वाटतात. अर्थात त्या दोन्हीचं मिश्रण फार सुंदर केलंय. पण नंतर आपण त्यात बुडून जातो. ‘Grandeur is more important than subtlety sometimes,’ असं म्हणतात. पण इथं आपल्याला दोन्हीचं मिश्रण पाहायला मिळतं.
माझ्या यातल्या बऱ्याच मतांवर बऱ्याच जणांना राग येईल. कारण नोलनचा फॅन हा अगदी धार्मिक आहे. त्यांच्यासाठी म्हणून सांगायचं तर, मला व्यक्तिशः हा दिग्दर्शक प्रचंड आवडतो. त्याने जितक्या जॉन्रमध्ये कामं केली आहेत, त्यात स्वतःची छाप सोडण्यात तो यशस्वी झालाय. त्याची शैली प्रचंड प्रभावी आहे. त्याचा सिनेमा पाहणं हा एक अनुभव असतो किंवा थकवणारा अनुभव असतो म्हणूया. त्याचं संवादलेखनही तितकंच नेमकं असतं. तो सध्या जगातला स्वतःच्या नावावर सिनेमा चालवू शकणारा सर्वांत मोठा दिग्दर्शक आहे हेही मान्य. पण म्हणून मीमांसा करायचीच नाही असं नक्कीच नाहीये. आणि ती न करता त्याला मोठं करून आपण खूप मोठी चूक करतोय.
कारण त्याच्या प्रत्येक सिनेमाचा वाद, हा नोलानचा सर्वोत्कृष्ट सिनेमा आहे का? तो स्पीलबर्गपेक्षाही पुढचा दिग्दर्शक आहे का? या सारख्या फुटकळ तुलनांवर आणून त्यावर चर्चा झडत राहतात. तो महान आहे का, यापेक्षाही तो एका नवख्या छोट्या दिग्दर्शकाच्या धडाडीनं प्रयोग करतो हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. हेच पाहा ना, ‘डंकर्क’मध्ये एवढी सगळी कास्ट हाताशी असताना तो केवळ पाच-सहा पात्रांवर पूर्ण सिनेमा चालवतो. बाकीची सबंध कास्ट ही फेसलेस आहे. उगाच भव्यता आणण्यासाठी भरपूर पात्र आणणं, एका पात्राला जगाचा रक्षणकर्ता बनवणं, हे तो करत बसत नाही. इंटरस्टेलरची भव्यता ही पृथ्वी वाचवण्याच्या कसल्याही दृश्यापेक्षा ती नोलनच्या कल्पनेत आहे. इन्सेप्शनमधल्या तेलाच्या राजकारणाला तो मूळ कथेपासून पूर्ण बाजूला करून फक्त एका चोरीच्या कथेसारखा त्याच्याकडे पाहतो. ‘डंकर्क’सारख्या सत्य घटनेकडे पाहतानाही सर्व काही दाखवण्याचा हव्यास टाळून केवळ मुख्य पात्रांना जेवढं दिसतंय, त्या मर्यादित दृष्टिकोनातून या घटनेकडे पाहू शकतो. त्यामुळे तो महान आहे की, नाही माहिती नाही, पण तो प्रयोगशील आणि धाडशी मात्र नक्कीच आहे. आणि ‘डंकर्क’सारख्या विषयाला या पद्धतीने भिडणं हा त्याचा नवीन प्रयोग आहे.
.............................................................................................................................................
लेखक पुण्याच्या सिने क्राफ्ट इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
chavan.sudarshan@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
ADITYA KORDE
Sun , 30 July 2017
लेख छान लिहिला आहे पण मला मात्र व्यक्तिश: हा चित्रपट नाही आवडला ... लाखो सैनिकाना इंग्लंडने डंकर्क च्या किनाऱ्यावरून काढून घेतले, हे महाप्रचंड काम होते, वरून लुफ्त्वाफेछ्या हजारो विमानांचा भडीमार त्यातली भव्यता ह्यात नाही दिसली मला .... ह्याच दिग्दर्शकाचा म्हणे interstelar हा पिक्चर होता , तो मोबाईल वर पहिला , २ दिवस डोक दुखत होत...
Sudarshan Chavan
Sat , 29 July 2017
खरंच सांगायचं भारतीय युद्धपट या विषयाचा वेगळा असा विचार कधी केलाच नाहीये. युद्धाचा पात्राच्या डेवलपमेंटसाठी वापर करून घेणारा लक्ष्य, मिशन काश्मीर आहेत. प्रत्यक्ष युद्धभूमीवर बोर्डर, टँगो चार्ली आणि LOC कारगिल आहेत. याहाँ आहे. वॉर छोड ना यार, क्या दिल्ली क्या लाहोर ही प्रहसनं आहेत. कोर्ट मार्शल ड्रामा म्हणून 'शौर्य'आहे. नुकताच आलेला गाझी attack मी पाहिला नाहीये, पण चांगली मतं ऐकली आहेत. मद्रास कॅफे, काबुल एक्सप्रेस या इन्व्हेस्टीगेटीव्ह फिल्म्स आहेत. पण आधुनिक युद्धाचा गंभीरपणे विचार करणारे 'आय इन द स्काय' सारखे उदाहरण भारतीय सिनेमात विरळच असावे. (बाकी लिस्टमध्ये बोस आहे, १९७१, हकीकत)
Vineet Bhat
Sat , 29 July 2017
लेख फार आवडला. Dunkirk च्या निमित्ताने भारतात युद्ध विषयावर कसे चित्रपट आले आणि भव्यता व संवेदनशीलता या आयमांवर ते किती परिणामकारक राहिले यावर एक लेख वाचायला आवडेल.