‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ : प्रखर सामाजिक वास्तवाचं भेदक दर्शन
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
संतोष पाठारे
  • ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’चं एक पोस्टर
  • Mon , 24 July 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा लिपस्टिक अंडर माय बुरखा Lipstick Under My Burkha अलंक्रीता श्रीवास्तव Alankrita Shrivastava प्रकाश झा Prakash Jha

स्त्रीचा वापर उपभोग्य वस्तू म्हणून करणं ही आपली फार जुनी परंपरा आहे. आधुनिक युगात स्त्रियांनी पुरुषांच्या बरोबरीनं उभं राहण्याचा कितीही प्रयत्न केला, तरीही पुरुषी वर्चस्वाला झुगारणं समाजाला अजूनही शक्य झालेलं नाही. चित्रपट माध्यमात तर पुरुषी साम्राज्यच पसरलेलं आहे. निर्मिती, दिग्दर्शन व तंत्रज्ञ म्हणून मोजक्याच स्त्रियांचा चित्रपटसृष्टीत वावर आहे. स्त्री व्यक्तिरेखेला प्राधान्य देणाऱ्या तुरळक चित्रपटांचा अपवाद वगळता चित्रपटातील नायिकांचं अस्तित्व नेहमीच दुय्यम दर्जाचं किंवा पुरुषांच्या लैंगिक भावनांना चेतावण्यासाठी असतं. स्त्री व्यक्तिरेखांना महत्त्व देणारे चित्रपट बहुतांशी कौटुंबिक किंवा स्त्रीच्या महत्त्वाकांक्षी स्वभावाचं चित्रण करणारे असतात. आजच्या काळात घराबाहेर पडलेल्या स्त्रीची मानसिक घुसमट किंवा शरीर विक्रय करणाऱ्या स्त्रियांचं सरधोपट चित्रण करणारी कथानकं परिघाबाहेर गेलेलीच नाहीत. या चित्रपटांनी केवळ सामान्य प्रेक्षकांच्याच नव्हे तर चित्रपटांचं मूल्यमापन करणाऱ्या तथाकथित तज्ज्ञांच्या संवेदनांनादेखील एका मर्यादेत बंदिस्त केलेलं आहे.

त्यामुळेच ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’सारखा सूचक शीर्षक असलेला सिनेमा येऊ घातलाय म्हटल्यावर या संस्कृतीरक्षकांचं धाबं दणाणलं. या सिनेमाचं वेगळेपण त्याच्या शीर्षकापासूनच सुरू होतं. स्त्रीचं सौंदर्य खुलवणारी लिपस्टिक व तिच्या सौंदर्याला बंधनात अडकवणारा बुरखा या दोन परस्परविरोधी प्रतिकांचा या शीर्षकात खुबीनं वापर करण्यात आलाय. हा चित्रपट स्त्रियांच्या लैंगिक भावनांबद्दल थेट भाष्य करतो. सोळा वर्षांच्या तरुणीपासून साठीकडे झुकलेल्या प्रौढ स्त्रियांच्या लैंगिक संवेदनाचा मुक्त आविष्कार घडवतो. स्त्री म्हणून वाट्याला आलेलं चाकोरीबद्ध आयुष्य जगता जगता या स्त्रियांनी जपलेल्या त्यांच्या खाजगी लैंगिक व्यवहाराकडे सहानुभूतीनं पाहण्यास भाग पाडतो आणि अखेरीस आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर झुलणाऱ्या या स्त्रियांची वेदना प्रेक्षकांपर्यंत पोहचवून त्यांना अंतर्मुखही करतो.

भोपाळमधल्या एका हवेलीत चार वेगवेगळ्या कुटुंबात राहणाऱ्या उषा (रत्ना पाठक), शिरिन (कोंकणा सेन), लीला (आहाना कुम्रा) आणि रेहाना (प्लबिता बोरठाकुर) या भिन्नवयीन स्त्रियांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा कोलाज दिग्दर्शिका अलंकृता श्रीवास्तवने यात मांडलाय. या चारही जणींचं आयुष्य आपल्या आसपासच्या स्त्रियांसारखचं सर्वसामान्य आहे. त्यांचे खाजगी अनुभव देखील प्रत्येक स्त्रीला आपलेसे वाटणारे आहेत, पण हे अनुभव मांडण्याची पद्धत मात्र अभिनव आहे. पटकथाकार अलंकृता श्रीवास्तव आणि गजल धलीवान यांना याचं श्रेय द्यायला हवं. प्रत्येक स्त्रीचं एक वैयक्तिक लैंगिक विश्व असतं, तिच्या फँटसी या केवळ तिच्यापुरता मर्यादित असतात. दिग्दर्शिकेनं उषा, शिरिन, लीला आणि रेहाना या प्रातिनिधिक व्यक्तिरेखांच्या माध्यमातून स्त्रियांच्या या फँटसी वर्ल्डमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यासाठी तिने पॉकेट बॉक्स कादंबरीतील पिंकी या पात्राच्या कथनाचा उपयोग करून घेतलाय. उषा, शिरिन, लिला व रेहानात दडलेली पिंकी तिची कथा सांगू लागते आणि ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’तील प्रत्येक स्त्री व्यक्तिरेखेचं लैंगिक विश्व आपल्या समोर खुलं होऊ लागतं.

रेहानाच्या वडिलांचा बुरखा बनवण्याचा उद्योग आहे. त्यांची मानसिकताही त्यांच्या उद्योगाशी निगडीत आहे हा केवळ योगायोग नाही! रेहानाने घराबाहेर पडताना बुरखा घालायलाच हवा हा त्यांचा दंडक! वयात आलेल्या रेहानाला तिच्या वर्गमित्राबद्दल शारिरीक आकर्षण आहे. मित्र-मैत्रिणी सोबत नाईट आऊट करावं अशी तारुण्य सुलभ ओढ आहे. आपण ज्याच्यावर प्रेम करतोय त्याच्याशी इतर मुलींनी लगट केल्यानंतर उफाळून येणारा द्वेषही तिच्या मनात आहे. वडिलांच्या सक्तीमुळे तिला घालाव्या लागणाऱ्या बुरख्यांचा वापर ती मॉलमधील लिपस्टिक, सौंदर्यप्रसाधनं व इतर बायकी साधनं लंपास करण्यासाठी वापरते. व्यवस्थेच्या विरोधात अशा प्रकारे बंड करणारी रेहाना धर्माची सक्ती व तिला अपेक्षित सामाजिक मुक्ती या द्वंद्वात फसत जाते. 

लीलाची गोष्ट रेहानापेक्षा वेगळी नाही. ती एक स्वतंत्र वृत्तीची तरुणी आहे. एका समंजस व सुसंस्कृत मुलाशी (वैभव तत्त्ववादी) साखरपुडा होत असल्याच्या दिवशीच आपल्या मुस्लिम प्रियकराबरोबर सेक्सचा अनुभव घेण्याइतपत ती धाडसी आहे. आपण एका निष्पाप तरुणाला फसवतोय याची जाणीवही तिला आहे, पण आपली विधवा आई मुस्लिम प्रियकराबरोबर लग्न करण्यास परवानगी देणार नाही याचीही तिला खात्री आहे. ‘खानदान की इज्जत’सारख्या शुल्लक गोष्टींना तिच्या लेखी अजिबात महत्त्व नाही, पण जी खात्री तिला स्वतः विषयी आहे तितकी खात्री व प्रामाणिकपणा तिच्या प्रियकराजवळ नाही. पुरुषाचा धर्म हिंदू किंवा मुस्लिम नसतो, तो फक्त पुरुष असतो, याचा प्रत्यय तिला जेव्हा येतो तेव्हा ती कोसळून पडते. 

शिरिनचा दुबईत नोकरी करणारा नवरा (सुशांत सिंग) घरी आला की, त्याला केवळ बायकोचा सहवास हवा असतो. घरात मुलांची संख्या वाढत असतानादेखील कंडोम न वापरणारा आणि शिरिनलाही कोणत्याही संततीनियमनाचा उपाय करू न देणारा शिरिनचा नवरा बाहेरख्यालीही आहे. बायको म्हणजे पैर की जुती या विचारांचा पगडा असणाऱ्या नवऱ्याला धडा शिकवण्याचा शिरिन वेळोवेळी प्रयत्न करते. घराबाहेर पडून स्वतंत्र व्यवसाय करण्याचा प्रयत्न करणारी शिरिन पुरुषी वर्चस्वाखाली दबून जाते. 

उषा हवेलीच्या मालकांपैकी एक! हवेलीच्या जागी टॉवर बांधण्याचे मनसुबे रचणाऱ्या बिल्डर्सशी टक्कर देण्याची जिगर तिच्याकडे आहे. मुलं, सुना, नातवंडात रमणाऱ्या उषाने आपल्या लैंगिक इच्छांच केव्हाच दमन करून टाकलंय. नातवंडाला स्विमिंग पूलवर पोहायला नेताना तिची नजर तरण्याबांड स्विमिंग कोचवर पडते आणि तिच्या लैंगिक भावना उफाळून येतात. स्विमिंग शिकण्याच्या निमित्तानं ती त्याच्याशी जवळीक साधते. मॉलमध्ये जाऊन उषाने स्वतःसाठी स्विमिंग सूट खरेदी करण्याचा प्रसंग हा या चित्रपटातील हायलाईट आहे. आपल्या समाजानं स्त्रियांनी काय करावं, काय करू नये याची जी बंधनं घालून दिली आहेत, त्याचं जोखड घेऊन सामाजिक जीवनात वावरताना स्त्रियांची जी ससेहोलपट होते, त्याचं विदारक दर्शन या प्रसंगातून होतं. या प्रसंगातील विनोदातही आपल्याला अंतर्मुख करण्याची ताकद आहे. स्विमिंग कोचबरोबर मोबाईलवरून संवाद साधणारी, त्याच्या बरोबर उत्तेजक चॅटिंग करताना हस्तमैथुन करणारी उषा तिचं बिंग फुटल्यानंतर हवालदिल होऊन जाते. ज्या मुलांनी तिच्या मतांचा, नात्याचा आदर केला ती मुलं तिच्या लैंगिक भावना समजून घेण्यास अपुरी पडतात. एका प्रौढ स्त्रीनं अशा प्रकारच्या भावनांचं प्रदर्शन करणं म्हणजे महापातकच!

रेहानाने नटणं मुरडणं तिच्या वडिलांच्या दृष्टीनं पाप आहे. शिरिनने बंडखोरी करणं तिच्या नवऱ्याच्या दृष्टीनं अपराध आहे. ज्या गोष्टी पुरुषांनी केल्या तर त्यांच्या पुरुषार्थाचा उदो उदो होतो, त्याच लीलाने केल्या तर तिच्या घराण्याची अब्रू जाते. 

चित्रपटातील पुरुष व्यक्तिरेखांना स्त्रियांची ही बंडखोरी अमान्य आहे. स्त्रीचं तिचं एक भावविश्व, लैंगिक विश्व असू शकतं याची त्यांना जाणीव नाही. हे लैंगिकविश्व विस्कटून टाकण्यानं त्यांचा पुरुषार्थ सिद्ध होतोय. ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’चा प्रदर्शनाचा हक्क आधी नाकारलेल्या आणि काही बदलानंतर संमत केलेल्या आपल्या सेन्सार बोर्डाची मानसिकता या पुरुषी व्यक्तिरेखांपेक्षा वेगळी नाही. 

बुरख्याआड सौंदर्यप्रसाधन दडवणारी रेहाना, सतत काम वासनेनं पछाडलेल्या नवऱ्याला नाकारणारी शिरिन, स्वतःच्या मर्जीनं लैंगिक सुखात पुढाकार घेणारी लीला आणि आपली अतृप्त कामवासना हस्तमैथुननं शमवणारी उषा अशा अस्सल व्यक्तिरेखा आजवर भारतीय पडद्यावर आलेल्या नाहीत.

आपल्या समाजात असलेल्या अशा अनेक रेहाना, शिरिन, लीला व उषाला पडद्यावर आणण्याचं धाडस अलंकृता श्रीवास्तव व निर्माते प्रकाश झा यांनी केलंय. आपण समंजस प्रेक्षकांनी त्यांना स्वीकारलं नाही, तर प्रकाश झा यांना भविष्यात पौराणिक चित्रपट निर्माण करावे लागतील आणि आपल्याला ते पाहण्याची शिक्षा भोगावी लागेल.

.............................................................................................................................................

लेखक सिनेपत्रकार आहेत.

(‘वास्तव रूपवाणी’च्या मे २०१७च्या अंकातून साभार)

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख