अजूनकाही
'भीती' ही एक मानवी प्रवृत्ती आहे. कोणत्याही गोष्टीची एकदा का भीती बसली की, त्या भीतीच्या दहशतीखाली वावरणारे अनेक जण असतात. आणि त्याचा फायदा घेऊन त्या भीतीच्या नावाखाली तुम्हाला नाचवणारेही भेटू शकतात. त्यामधून निर्माण झालेले अनेक प्रश्न जाचक आणि घातक ठरू शकतात. अशाच मनोव्यापाराच्या खेळाच्या चक्रव्यूहात एक पोरसवदा तरुण कसा अडकत जातो आणि त्याची नंतर सुटका कशी होते याचे मनोज्ञ दर्शन 'मांजा' या नवीन चित्रपटातून होते. 'सायकॉलॉजिकल थ्रिलर' असलेल्या या चित्रपटात अगदी फार मोठे अगम्य रहस्य नसले तरी शेवटपर्यँत गुरफुटून ठेवण्यात आलेल्या या रहस्यात प्रेक्षक गुंतत जातो. रहस्याचा उलगडा करण्यासाठी वापरलेले शेवटचे धक्कातंत्र मात्र खूपच प्रभावी आहे. त्यामुळे रहस्याची उकल होईपर्यँत प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यात दिग्दर्शकाला चांगले यश मिळाले आहे.
शिवाय शाळा-कॉलेजमध्ये जाणाऱ्या आपल्या मुलांकडे बारकाईने लक्ष ठेवणे ही पालक म्हणून आई-वडिलांची जबाबदारी असतेच, परंतु अगदीच वेळ आली तर त्यांच्या समस्या वेळीच लक्षात घेऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हेही त्यांचे प्रथम कर्तव्य असते, असेही हा चित्रपट सूचित करून जातो. त्यामुळे तरुण आणि त्यांच्या पालकांनी आवर्जून पाहावा असा हा चित्रपट आहे.
'मांजा'मध्ये पाहायला मिळते ती एका आई-मुलाची आणि मुलाच्या जिवलग मित्राची कथा. प्रामुख्याने या तिघांभोवतीच या चित्रपटाची कथा फिरत राहते. समिधा (आश्विनी भावे) आणि तिचा मुलगा जयदीप (रोहित फाळके) हे जयदीपच्या शिक्षणानिमित्त गोव्याहून लोणावळ्याला येतात. समिधाला तिच्या नवऱ्याकडून होणारा भयंकर जाच हे त्याचे मुख्य कारण असते. (चित्रपटाच्या सुरुवातीलाच बसमधून प्रवास करत असलेली समिधा नवऱ्याचा फोटो फाडून चुरगाळून टाकते, या दृश्यातून हे चांगले सूचित करण्यात आले आहे.) लोणावळ्याला आलेली समिधाची मैत्रीण वीणा (अपूर्वा अरोरा) आणि तिचा पती सौरभ (मोहन कपूर) यांच्या मदतीने लोणावळ्यातील त्यांचे नवजीवन सुरू होते. जयदीप हा स्वभावाने अबोल, शामळू आणि भित्रा असतो. कॉलेजमध्ये त्याला पहिल्यांदाच भेटलेला त्याचा मित्र 'व्हिकी' (सुमेध मुदगलकर) हा स्वभावाने अतिशय आक्रमक आणि 'ओव्हरस्मार्ट' आहे. त्याच्यात दडलेली मनोविकृती जयदीपच्या लक्षात येत नाही. जयदीपचा स्वभाव लक्षात घेऊन व्हिकी प्रत्येक गोष्टीत त्याच्यावर वर्चस्व गाजवितो आणि हळूहळू जयदीप त्याच्या हातचे 'बाहुले' बनतो.
जयदीप आपल्या हातचे 'बाहुले' बनल्याची खात्री होताच महत्त्वाकांक्षी व्हिकी त्याला हव्या असलेल्या गोष्टी जयदीपच्या मदतीने हस्तगत करण्याचा प्रयत्न करतो. 'माया' नावाच्या मुलीवर असलेले व्हिकीचे प्रेम आणि तिच्यासाठी त्याने टाकलेला 'डाव' याच्या जाळ्यात जयदीप अडकतो आणि ही गोष्ट सहन न झाल्याने नाईलाजाने तो आपल्या आईला सारे काही सांगतो. व्हिकीने टाकलेल्या या जाळ्यातून जयदीपची सुटका होण्यासाठी आणि व्हिकीचे सत्यरूप उघडकीस आणण्यासाठी समिधा कोणते पाऊल उचलते याचे 'रहस्य' जाणून घेण्यासाठी 'मांजा' पडद्यावर पाहणेच जास्त चांगले.
दिग्दर्शक जतीन वागळे यांनीच या चित्रपटाची कथा आणि पटकथा लिहिली आहे. मनोव्यापाराच्या या खेळात गुंतवण्यासाठी लिहिलेले खास संवाद खूप कामी आले आहेत. या चित्रपटातील रहस्याची उकल शेवटच्या काही मिनिटांत केली असली तरी तोपर्यँत रहस्याचे विणलेले जाळे गुरफुटून ठेवण्यात दिग्दर्शकाला चांगले यश मिळाले आहे. पटकथेतील काही त्रुटी मात्र निश्चित जाणवतात. समिधा व्हिकीचा 'माया'बाबतचा प्लॅन अगदी सुरुवातीलाच प्राचार्य (कॉलेज व्यवस्थापन) तसेच वीणा आणि सौरभला सांगते (विशेषतः माया ही वीणा आणि सौरभची मुलगी असूनदेखील,) परंतु दोघेही त्यावर विश्वास ठेवत नाहीत हे मुळीच पटत नाही. किंवा दोघांनी विश्वास ठेवण्यास नकार दिल्यावर समिधा पोलिसांकडे का जात नाही याचे कोडे उलगडत नाही.
तसेच चित्रपटाच्या प्रारंभी कॉलेजमध्ये एका अपघाताच्या चौकशीसाठी आलेला पोलीस अधिकारी 'ते कृत्य एखाद्या माथेफिरूचे असावे' असा उल्लेख करतो आणि त्याच कृत्याची कबुली नंतर व्हिकी जयदीपजवळ बोलताना देतो. त्याबाबतचा 'योग्य' तो खुलासा नंतर होण्याची आवश्यकता होती. त्यामुळे त्याबाबतचा संभ्रम कायम राहतो. व्हिकीला रंगेहाथ पकडण्यासाठी निघालेल्या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर रचण्यात आलेले दुर्गा-भवानीचे गाणेही रसभंग करून जाते.
आपल्या पहिल्याच चित्रपटात मनोविकृत असलेल्या 'व्हिकी'च्या भूमिकेत शुभम मुदगलने खूप प्रभावी काम केले आहे. अभिनयातील त्याच्या काही लकबी 'डर' चित्रपटातील शाहरुख खानची आठवण करून देतात. सशाला मारण्याच्या प्रसंग जयदीपला सांगताना तसेच पुलावरून जयदीपला खाली फेकून देण्याची धमकी देणारा प्रसंग त्याने खूपच प्रभावीपणे केला आहे. रोहित फाळके यानेही अबोल, भित्रा जयदीप चांगला उभा केला आहे. अश्विनी भावे यांनी समिधाच्या भूमिकेत आपल्या 'आईपणा'ला न्याय दिला आहे. 'माया' झालेल्या शिवानी टांकसाळेला मात्र फारसा वाव नाही.
थोडक्यात, 'सायकॉलॉजिकल थ्रिलर' म्हणून 'मांजा' एक प्रभावी चित्रपट ठरला आहे. मराठी चित्रपट आणखी प्रगल्भ होत चालला आहे, याचेही हा चित्रपट एक निदर्शक मानता येईल.
लेखक ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.
shree_nakul@yahoo.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment