आजच्या तरुण मुलांची भाषा बोलणारा ‘स्पायडरमॅन होमकमिंग’
कला-संस्कृती - इंग्रजी सिनेमा
सुदर्शन चव्हाण
  • ‘स्पायडरमॅन होमकमिंग’ची पोस्टर्स
  • Sat , 15 July 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti इंग्रजी सिनेमा स्पायडरमॅन होमकमिंग Spider-Man: Homecoming सुदर्शन चव्हाण Sudarshan Chavan

साधारणतः १९३० च्या दशकात अमेरिकेत सुपरमॅन कॉमिक्स चालू झाले. तेव्हापासून वेगवेगळे सुपरहिरो आणि त्यांची कॉमिक्स गेली ९० वर्षं जगभर आपलं गारुड पसरवत आहेत. या हिरोंना सिनेमात आणण्याचे प्रयत्नही तेव्हापासूनच सुरू झाले, पण त्यातला पहिला यशस्वी प्रयत्न ठरला तो १९७८ साली... क्रिस्टोफर रीव्हचा ‘सुपरमॅन’.

सुपरहिरोवर बनणाऱ्या सिनेमात लागणारी एक आवश्यक गोष्ट म्हणजे त्याचं प्रचंड मोठं बजेट. या सुपरमॅन सिनेमाकडे ते होतं आणि त्याच्या यशामुळे पुढच्या सिनेमांना ते मिळणं शक्य झालं. जास्त बजेट, भरपूर मार्केटिंग, यामुळे सुपरहिरो फिल्म्स सर्वदूर पोहोचल्या आणि आपल्या जीवनाचा भाग बनल्या. मग ८० च्या दशकात वाढलेली मुलं ही सुपरमॅन फ्रँचाइज पाहतच मोठी झाली. ९० च्या दशकात तेच वेड बॅटमॅन फ्रँचाइजबाबत होतं. आणि २००० चं दशक हे स्पायडरमॅनचं ठरलं.

स्पायडरमॅन हा तसा मुळात बनवण्यात कठीण, कारण त्याचं उंच उडणं, ते आपण राहतो त्या शहरातच असणं, ते शूट करणं आणि हे सर्व विश्वासार्ह वाटेल इतपत कम्प्युटर ग्राफिक्स चांगले ठेवणं, हे सगळंच आव्हानात्मक होतं. म्हणूनच नव्वदच्या दशकात इच्छा असूनही जेम्स कॅमेरून स्पायडरमॅन बनवू शकला नाही. तेव्हा मार्व्हलचा स्वतःचा स्टुडिओही नव्हता. त्यामुळे ही प्रॉपर्टी त्यांनी सोनी स्टुडिओला विकली. कॅमेरूननंतरही बऱ्याच दिग्दर्शकांची नावं स्पायडरमॅनचा दिग्दर्शक म्हणून चर्चिली गेली आणि अखेर तो केला सॅम रायमीनं.

२००२ साली आलेला रायमीचा स्पायडरमॅन आणि २००४ सालचा त्यानेच दिग्दर्शित केलेला त्याचा पुढचा भाग हे आजवरचे सर्वोत्कृष्ट स्पायडरमॅन सिनेमे समजले गेले. कारण पुढच्या १० वर्षांत आलेले तीनही सिनेमे प्रेक्षकांना आवडले नाहीत.

आजची परिस्थिती

२००८ मध्ये ‘द डार्क नाईट’नं सुपरहिरो सिनेमाच्या अनेक शक्यता, त्यांची वैचारिक बैठक आणि कमाईची शक्यता यांच्या संकल्पना मोडीत काढत घवघवीत यश मिळवलं. त्यानंतर काही महिन्यांनी आला तो आयर्नमॅन. कोणाच्याही विशेष ओळखीचा नसणारा हा सुपरहिरो. सिनेमा चांगला होता, पण खरी मजा त्याचे क्रेडिट रोल झाल्यानंतर होती. एका डोळ्यावर पट्टी बांधून सॅम्युएल जॅक्सन समोर येतो आणि म्हणतो, “मी शिल्डचा एजंट आहे आणि मला तुमच्याशी अॅव्हेंजर इनिशिएटिव्हबद्दल बोलायचं आहे.” या एका वाक्यानं सर्व चित्रच बदललं.

आजपर्यंत आपण सुट्या फिल्म्स पाहायचो किंवा एकानंतर एक येणारे भाग पाहायचो, पण मार्व्हल स्टुडिओनं फिल्म माध्यमाचाच एका वेगळ्या अंगानं विचार केला. जिथं एकाच जगात सर्व सुपरहिरो असतील. ते एकमेकांना ओळखत असतील, एकत्र येतील आणि परत वेगवेगळेही लढतील. सर्व घटना एकमेकांशी निगडीत असतील.

प्रत्येक निर्णयासारखंच या बदलालाही दोन बाजू आहेत. फिल्म हे माध्यमच असं आहे की, इथं एखादी फिल्म ही फ्रँचाइजचा भाग असली तरी ती एक स्वतंत्र फिल्म म्हणून, एक पूर्ण कथा बनून उभी राहते. ही शक्यता या प्रयोगात कमी होत जातेय. वर्षाकाठी दोन-तीन सुपरहिरो फिल्म्स येतच राहणार. त्यामुळे या जॉन्रमधील सिनेमांची संख्याही प्रचंड वाढली. त्यामुळे त्यातला तोचतोचपणा वाढला. दिग्दर्शकाची स्वायत्तता हरवत चाललीय. 

सिनेमा तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीनं याला चांगलीच चालना मिळाली किंवा त्या प्रगतीमुळेच अशा सिनेमा विश्वाचा विचार एडगर राईट, केव्हीन फैगी, जॉस व्हेडन या लोकांना करता आला. ज्यामुळे इस्टर एग या प्रकाराला नवीन परिमाण मिळालं. आधीची फिल्म माहिती आहे की, नाही यावरून आता आलेली फिल्म आवडेल की नाही ते ठरू लागलंय. या सिनेमा विश्वाचे माहितगार असणं गरजेचं बनत चाललंय.

बरं हे सर्व करणारे एकटे मार्व्हल आणि त्याचा डिस्ने स्टुडिओच नाहीये, तर मार्व्हलने मागेच फॉक्सला विकलेले एक्स-मेन आहेत, डीसी आणि वार्नर ब्रदर्स आहेत. आणि तेही त्यांच्या हिरोंचं विश्व उभं करत आहेत. आणि या सर्वांच्यामध्ये आपल्याला परत भेटायला आलाय तो आपला लाडका स्पायडरमॅन. 

‘स्पायडरमॅन होमकमिंग’

आज २०१७ मध्ये येणाऱ्या स्पायडरमॅन किंवा कुठल्याही सुपरहिरो फिल्मसमोर आव्हान असेल ते म्हणजे इतर सुपरहिरो फिल्म्सपासून आपण वेगळे आहोत हे पटवून देण्यामध्ये. जे डेडपूल, लोगननं करून दाखवलं. ‘स्पायडरमॅन होमकमिंग’ तसा थोडासा प्रयत्न करतो, पण पूर्णतः नाही. आणि तरीही तो एक उत्तम सिनेमा ठरतो.

स्पायडरमॅन हे पात्र मुळात आपल्याला का आवडतं? कारण तो परफेक्ट नाहीये, तो सोशली ऑकवर्ड आहे, तो हुशार आहे, तो अजून पूर्ण वाढ झालेला मनुष्यही नाहीये, पण तो एक गुणी मुलगा आहे. हे इतर सुपाहिरोंमध्ये न सापडणारे गुण त्याच्यात आहेत, म्हणून तो आपला, जवळचा वाटतो. आणि होमकमिंगने नेमके हेच गुण बरोबर हेरलेत.

आधीच्या पाचही फिल्म्स पीटर पार्करच्या शाळेला जितकं महत्त्व देतात, त्याहून कैक जास्त वेळ होमकमिंग हायस्कूलमध्ये घडते. इथं पीटर हा सोफोमोरचा (आपल्याकडील दहावी पण तिकडचा शिक्षणाचा फॉरमट ८+४ आहे ना की आपल्यासारखा १०+२?) विद्यार्थी आहे. म्हणजे जेमतेम वय पंधरा वर्ष. होमकमिंग नेमका या गोष्टीशी खेळतो. आधीचे स्पायडरमॅन स्वतःवर भारी ठरणाऱ्या मित्रांना नवीन शक्ती मिळाली की, धडा शिकवायचे. टॉम हॉलंडच्या पीटरवर मात्र अशी कुठलीही शारीरिक हिंसा घडत नाही. घडते ती सहज हिंसा (casual violence), ज्याचा कसलाही आकस तो मनात ठेवत नाही. त्याच्यावर काकांच्या महान आदर्शांचं ओझं नाही, मोठी जबाबदारी नाही, दोषीपणाची भावना नाही. आणि प्रेम तुटण्याचं महान दुःखही नाही. कारण ते करण्याचं त्याचं मुळात वयच नाही.

रायमीच्या दोन्ही सिनेमांत हे उत्तम जमवून आणलं होतं. तो सिनेमा स्वतःला तितका गांभीर्यानं घ्यायचाही. इथं जॉन वॉट्स मात्र त्याच्या पीटरला तितका गांभीर्यानं घेत नाही. तितकी जबाबदारी तो पंधरा वर्षाच्या पीटरवर टाकत नाही. इथं मजा आहे ती आधीच्या स्पायडरमॅननं सहज केलेल्या गोष्टी शिकत जाण्याची. म्हणजे तो क्वीन्समध्ये वाढलेल्या स्पायडरमॅनला इमारती नसलेल्या भागातून पळत जायला लावतो. चूक काय, बरोबर काय याचा शोध स्वतः घ्यायला लावतो. मोठ्या जबाबदारीवरचं भाषण द्यायला बेनकाका भेटत नाही. पण मजा करण्याच्या वेळेत, भर पार्टीमधून त्याला बाहेर यावं लागतं आणि त्याला त्याची जबाबदारी कळते.

थोडक्यात सांगायचं तर, आधीचा स्पायडरमॅन उलटा लटकून मेरी जेनला किस करतो हा त्याचा जगप्रसिद्ध सीन. होमकमिंगची मजा त्या फेमस किसमध्ये नसून ‘आता मी पुढे होऊन किस करावं का?’ या पीटरला पडणाऱ्या प्रश्नात आहे.     

मेरी जेनसमोर किंवा इतर काही पात्रांसमोर ‘मी स्पायडरमॅन आहे’ हे सांगणं आधीच्या स्पायडरमॅनच्या जीवनमरणाचा प्रश्न व्हायचं. इथं मात्र पीटर vlog बनवून स्वतःपुरतं उत्तर शोधतो. शिवाय त्यातून विनोदनिर्मिती होत राहते हे विशेष. म्हणून हा स्पायडरमॅन कमी आणि किशोरवयीन समस्या असणारा गोड छोकरा अधिक वाटतो. जो आवडणाऱ्या मुलीच्या पार्टीला तर जातो, पण सोडायला त्याच्या काकूला यावं लागतं, कारण अजून तो ड्रायव्हिंग शिकला नाहीये.

जॉन वॉट्स ज्या सहज प्रकारे या स्पायडरमॅनशी भिडलाय, त्याच्याशी अनेकांना समस्या असू शकते. पण त्याने ते ज्या उत्तम प्रकारे सादर केलंय, ती त्याची मास्टरी म्हणावी लागेल. आपल्याला हसून कंटाळा येईल, इतपत प्रत्येक प्रसंग आपल्याला हसवून सोडतो. सहज हाताळणीमुळे अॅक्शन सीनमध्ये खूप काहीतरी पणाला लागलंय ही भावना तयार होत नाही हे खरं. पण प्रत्येक अॅक्शन सीनमध्ये त्याची त्याची वेगळी मजाही येते, ही दिग्दर्शक जॉन वॉट्सची कमाल.

अशा हाताळणी मागचा विचार करता असंही जाणवतं की, मोठं सिनेमा विश्व उभं करण्यात प्रत्येकच फिल्म ही इन्फिनिटी वॉरकडे जाणारी एक पायरी ठरते. त्यात फार मोठं, फार गंभीरपणे काही करावं हा कल कमी होतो. त्यामुळे या स्पायडरमॅनचं डिझाईन असं सहज असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही त्यांनी या सिनेमाला मार्व्हल स्टुडिओचा लाडका झालेल्या आयर्न मॅनचा पुढचा भाग (आयर्न मॅन ३.५) होऊ दिलं नाही हे बरं झालं.

जॉन वॉट्स आणि होमकमिंगच्या अनेक लेखकांनी केलेली अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी केवळ हिरोलाच नव्हे तर व्हिलनलाही माणूस म्हणून सादर केलंय. (काही वर्षांपूर्वी असं म्हटलं जायचं की, सुपरहिरो फिल्म ही तेवढीच चांगली घडते, जेवढा तिचा खलनायक चांगला रंगवलेला असतो. पण मार्व्हलच्या सिनेमांनी हेही गृहीतक मोडीत काढलंय. चांगल्या खलनायकाशिवाय अनेक उत्तम सिनेमे मार्व्हलने दिलेत.) इथला खलनायक हा मुळात खल प्रवृत्तीचाच नाहीये. त्याला पहिल्याच प्रसंगात बायकोचा फोन येतो, त्याच्या बोटात तो कायम अंगठी म्हणजे लग्नाची निशाणी ठेवतो आणि जग नष्ट करण्याचा किंवा कोणालाही स्वतःहून इजा पोहोचवण्याचा त्याचा मानस नाहीये. तो एक भला सद्गृहस्थ आहे, जो परिस्थितीनं थोडा बदललाय. ज्याचं कास्टिंग म्हणून मायकल कीटन येणं याला काळाचा न्याय म्हणायचं.

कास्टिंग वरून येणारी आणखी महत्त्वाची लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे या सिनेमाचं कास्टिंग आणि त्यातली विविधता. म्हणजे पीटर अजूनही गोरा आणि इंग्लिशच आहे (त्यामुळे तो क्वीन्सचा वाटत नाही हे जरा बाजूला ठेवूया), पण त्याला आवडणारी मुलगी निमगोरी वाटते. त्याचा जवळचा मित्रही नेटिव्ह अमेरिकन आहे. त्याला चिडवणारा सिनियर आधी भारतीयाची भूमिका केलेला आहे. शिवाय यात एक वेगवेगळ्या वंशाचं जोडपं आहे. पीटर स्वतः न्यूयॉर्कचा असल्यामुळे असेल, पण तो इंग्लिशशिवाय इतर भाषा बोलतो. अशी वॉल्ट डिस्ने स्टुडिओच्या लौकिकाला न शोभणारी (पण त्यांच्या राजकीयदृष्ट्या कायम योग्य बाजूला राहण्याच्या मानसिकतेशी सुसंगत) विविधता या कास्टमध्ये आहे.

अशा प्रकारे अगदी खलनायकालाही मनुष्य पातळीवर सादर करणारा, पीटरला एक किशोरवयीन मुलगा आणि त्या वयाच्या समस्या असणारा मुलगा म्हणून सादर करणारा, डेडपूल इतका वेगळा नसला तरी किशोरवयीन मुलांसाठीचा डेडपूल म्हणावा इतका विनोदी असणारा, किल - मॅरी – हुकअप सारखी आजच्या तरुण मुलांची भाषा बोलणारा हा ‘स्पायडरमॅन होमकमिंग’ मला आवडला. अखेर १३ वर्षांनी स्पायडरमॅन परतला हे जाणवलं.

स्पायडरमॅनवरचा चित्रपट इतका सहज हाताळावा का हा एकमेव प्रश्न उरतो. त्यावर मी म्हणेन की, आजच्या काळात तो असाच असणं अपेक्षित आहे. शेवटी सगळ्या हिरोंमध्ये हा एकमेव आपल्यासारखा आहे. त्याला बॅटमॅन इतकं आदर्शांशी पक्कं असून चालणार नाही आणि सुपरमॅन इतका तो मोठा नाही. मॅनहॅटनच्या उंच इमारतींचं आकर्षण त्याच्यात नाही आणि ब्रूकलीनमध्ये राहून त्याबद्दल तयार होणारा आकसही नाही, कारण तो आपल्यासारख्यांच्या मध्ये राहणारा क्वीन्सचा पीटर पार्कर आधी आहे. 

(ता.क. मार्व्हल स्टुडिओचा केविन फैगी असं म्हणाला होता की, मला हॅरी पॉटरसारखं दर शैक्षणिक वर्षाला एक सिनेमा हा फॉरमॅट स्पायडरमॅनसोबत लावायचा आहे. ते शक्य झाल्यास ही अगदी योग्य सुरुवात ठरेल.)

लेखक पुण्याच्या सिने क्राफ्ट इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

chavan.sudarshan@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख