अजूनकाही
‘आनंद’ हा अतिशय गाजलेला चित्रपट. राजेश खन्ना-अमिताभ बच्चन यांच्या भूमिका तर सगळ्यांच्याच स्मरणात ताज्या आहेत. अगदी जॉनी वॉकरही लक्षात राहतो. अमिताश सोबतचा डॉक्टर मित्र म्हणून रमेश देव आणि सीमा देव ही मराठमोळी जोडीही लक्षात राहते. मुकेश (‘कहीं दूर जब दिन ढल जाये’, ‘मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चुने’), मन्ना डे (‘जिंदगी कैसी ये पहेली हाये’) यांचेही सूर कानात घुमत राहतात.
या सोबतच लताच्या आवाजातील एक नितांत गोड गाणं या चित्रपटात आहे. गाणं मूळ बंगाली आहे. त्याच चालीवर गीतकार योगेश यांनी हिंदीत शब्दरचना करून दिली. ते गाणं म्हणजे,
ना जिया लागे ना
तेरे बिना मेरा कही जिया लागे ना
हे गाणं जिच्या तोंडी आहे ती नायिका हिंदी रसिकांना फारशी परिचित नव्हती. ती म्हणजे बंगाली अभिनेत्री सुमिता संन्याल (जन्म ९ ऑक्टोबर १९४५). तिचं परवा, ९ जुलैला वयाच्या ७१ व्या वर्षी कोलकात्यात हृदयविकारानं निधन झालं.
सडपातळ अंगकाठी असलेली सुमिता अतिशय देखणी होती. बंगालीमध्ये चांगली लोकप्रियता मिळवलेल्या सुमिताचे जेमतेम चारच हिंदी चित्रपट आले.
पहिला चित्रपट होता हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘आशिर्वाद’ (१९६८). सुमितासोबत या चित्रपटात अशोककुमार व संजीवकुमार यांच्या भूमिका होत्या. अशोककुमार यांचं लहान मुलांसाठीचं गाजलेलं गाणं ‘रेलगाडी’ याच चित्रपटात आहे. अजून दोन गाणी अशोककुमार यांच्याच आवाजात यात आहेत. मन्ना डे यांचं सुंदर गाणं ‘जीवन से लंबे है बंधू, ये जीवन के रस्ते’ यात आहे.
सुमिता सन्यालच्या वाट्याला दोन गाणी लताच्या आवाजात आलेली आहेत. पहिलं गाणं आहे
इक था बचपन
छोटा सा नन्हा सा बचपन
गुलजार यांनी हे गाणं लिहिताना एक वडील आणि छोटी मुलगी/मुलगा यांच्या संबंधात अतिशय साधी, पण आशयघन ओळ लिहिली आहे -
टेहनी पर चढके जब फुल बुलाते थे
हाथ उसके वो टेहनी तक ना जाते थे
बचपन के दोन नन्हे हाथ उठाकर
वो फुलों से हात मिलाते थे
तरुणपणीचा अशोककुमार लहानग्या सुमिताला कडेवर घेऊन तिची फुलांना हाथ लावण्याची मनोकामना पूर्ण करतो. वसंत देसाईंचं संगीत या चित्रपटाला लाभलं आहे. गाण्याला निसटून गेलेल्या बालपणाच्या हूरहुरीची झाक आहे. एक कारुण्य भरून राहिलं आहे. स्टुडिओत रेकॉर्डिंग म्हणून हे गाणं गाताना दाखवलं गेलंय.
याच चित्रपटातलं दुसरं पावसाचं सुंदर गाणं आहे-
झिर झिर बरसे सावनी आखियां
सावरीया घर आ ऽऽऽ
तेरे संग सब रंग बसंती
तुझ बीन सब सुना ऽऽऽ
गीतकार गुलजारच असल्यामुळे ‘सावनी आखियां’, ‘रंग बसंती’, ‘रेशमिया बुंदनिया’सारख्या उपमा येत राहतात. गाणं अतिशय गोड आहे. या गाण्यात लताचाच आवाज वेगळ्या ट्रॅकवर रेकॉर्ड करून लतालाच साथ म्हणून वापरला आहे. हा प्रयोगही कानाला गोड वाटतो. असा प्रयोग राहुल देव बर्मन यांनी आधी केला होता.
सुमिताला सगळ्यात जास्त लोकप्रियता मिळाली ती ‘आनंद’मुळेच. या चित्रपटातील तिच्या वाट्याला आलेलं गाणं केवळ अफलातून आहे. लता मंगेशकरनं १९७४ ला पहिल्यांदा भारताबाहेर कार्यक्रम सादर केला. हा कार्यक्रम झाला लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये. पाच हजारापेक्षा जास्त क्षमता असलेला हा हॉल तेव्हा गच्च भरला होता. लताने जी काही मोजकीच गाणी या कार्यक्रमासाठी निवडली होती, त्यात या गाण्याचा समावेश होता. (‘मेंदीच्या पानावर’ हे मराठी गाणंही या कार्यक्रमात होतं.) या गाण्याचं मूळ बंगाली गाणं या कार्यक्रमात लतानं सादर केलं होतं.
‘ना जिया लागे ना’ या पहिल्या ओळीनंतर लताचा आवाज टप्प्याटप्प्यानं जो चढत जातो, त्याला तोड नाही. हे गाणं अक्षरश: केवळ लताच आहे म्हणून गाऊ शकते. किंवा केवळ लतासाठीच हे गाणं सलिल चौधरी यांनी रचलं असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरू नये.
गीतकार योगेश यांनी तशी फार कमी गाणी लिहिली आहेत. त्यांना दिलेल्या बंगाली गाण्याच्या चालीवर त्याच भावनेनं ओथंबलेलं हिंदी गीत लिहायचं म्हणजे खरंच कमाल होती. योगेश यांनी आपल्या प्रतिभेनं या गाण्याला पूर्ण न्याय दिला जाईल असेच शब्द लिहिले आहेत. बंगाली गाण्याची पहिली ओळ होती ‘ना मोनो लागे ना’.
जिना भुले थे कहा याद नहीं
तुझको पाया हैं जहा सांस फिर आयी वहीं
जिंदगी हाय तेरे सिवा भाये ना
दोनच कडव्याचं छोटं गाणं आहे. दुसऱ्या कडव्यात ही उत्कटता अजूनच वाढली आहे.
तुम अगर जावो कभी जावो कही
वक्त से कहना जरा वो ठहर जाये वोही
वो घडी वोही रेह ना जाये ना
या सगळ्या गाण्यात जी छोटी छोटी स्वरवाक्यं येत राहतात, ती आपल्या गळ्यातून काढण्यासाठी गायकाला काय कसरत करावी लागली असेल हे आपण लक्ष देऊन ऐकलं तर लक्षात येतं. अशी अतिशय थोडी गाणी आहेत, जिच्यात गायिकीचा अगदी कस लागतो. सतारीचे, व्हायोलिनचे जे तुकडे या गाण्यात येतात, ते स्वतंत्रपणे ऐकावेत इतके सुंदर आहेत. सलिल चौधरी, सचिनदेव बर्मन आणि खय्याम हे असे संगीतकार आहेत की, ज्यांनी आपल्या संगीतात प्रचंड प्रयोग केले. विविध गायकांच्या गळ्यातून ते उत्तमरीत्या उतरवून घेतले.
सुमिताच्या वाट्याला हे अप्रतिम गाणं आलं. ‘मेरे अपने’ (१९७१) आणि ‘गुड्डी’ (१९७१) हे दोन चित्रपट तिला मिळाले, पण यातल्या तिच्या भूमिका छोट्या होत्या. शिवाय गाणी तिच्या वाट्याला आली नाहीत. बंगाली चित्रपटांमध्ये मात्र तिला खूप लोकप्रियता मिळाली. १९९३ पर्यंत ती बंगाली चित्रपटांत काम करत होती.
सुमिताच्या वाट्याला तीनच हिंदी गाणी आली. ‘ना जिया लागे ना’सारख्या गाण्यांनी रसिकांच्या मनात तिला कायमस्वरूपी स्थान मिळालं.
सुमिताच्या आत्म्याला शांती लाभो!
लेखक हिंदी चित्रपट संगीताचे अभ्यासक आहेत.
a.parbhanvi@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment