'हृदयांतर' : चकचकीत भावनिक नाट्य
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
श्रीकांत ना. कुलकर्णी
  • ‘हृदयानंतर’चं एक पोस्टर
  • Sat , 08 July 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie हृदयांतर Hrudayantar विक्रम फडणीस Vikram Phadnis मुक्ता बर्वे Mukta Barve सुबोध भावे Subodh Bhave

भरपूर पैसा असला की, भौतिक सुखं उपभोगायला मिळतात, हे एक सत्य आहे आणि पैशामुळे 'प्रेम' विकत घेता येत नाही वा त्यातून मिळणारा सुखाचा आनंदही मिळू शकत नाही, हे दुसरं सत्य आहे. 'कौटुंबिक सुख हे पैशानं विकत घेता येत नाही' किंवा 'पैसा या प्यार' हा रूपेरी पडद्यावरचा विषय तसा खूप जुना आहे. बॉलिवुडमधील प्रसिद्ध फॅशन डिझाईनर विक्रम फडणीस यांनी आपल्या पदार्पणातच दिग्दर्शित केलेल्या 'हृदयांतर' चित्रपटात हाच विषय मांडला आहे. मात्र कथेतील थोडंसं वेगळेपण, प्रमुख कलाकारांचा संयत अभिनय आणि विषयाची केलेली चकचकीत मांडणी पाहता 'हृदयांतर' एक वेगळं भावनिक नाट्य असल्याची जाणीव करून देतो. 

विक्रम फडणीस यांनीच लिहिलेल्या या कथेत एका श्रीमंत चौकोनी कुटुंबाची कथा सांगण्यात आली आहे. शेखर-समायरा जोशी आणि त्यांच्या नित्या व न्याशा या दोन मुली हे एक आधुनिक कुटुंब. पैशाच्या दृष्टीनं कसलीच कमतरता नसलेलं एक सुखी कुटुंब. शेखर हा एक यशस्वी हॉटेल उद्योजक, तर समायरा एका बड्या जाहिरात संस्थेत कामाला. मात्र शेखर हा पैशाच्या मागे लागलेला, घरातही सतत ऑफिसच्या कामाला प्राधान्य देणारा आणि त्यामुळे कुटुंबाला फारसं महत्त्व न देणारा अशी समायराची पक्की समजूत झालेली आहे. त्यामुळे छोट्या छोट्या प्रसंगांवरून त्यांच्यात वाद होतात आणि या वादावर कायमचा तोडगा म्हणून ते 'घटस्फोट' घेण्याचा निर्णय घेतात. मात्र अचानक त्यांच्या कौटुंबिक जीवनात एक मोठं वादळ येतं. मोठी मुलगी नित्याला एक दुर्धर रोग असल्याचं निदान होतं आणि दोघेही हादरतात. नित्याचा हा आजार उभयतांमध्ये पुन्हा भावनिक गुंतवणूक कशी करतो? आणि पुन्हा एकदा दोघेही मनानं कसे एकत्र येतात, त्याची हळुवार कहाणी म्हणजे हा चित्रपट.  

दिग्दर्शक विक्रम फडणीस यांनी विषयाचं गांभीर्य टिकवण्यासाठी प्रथमपासूनच कथेची मांडणी अतिशय संयतपणे केली आहे. शेखर-समायरा यांच्यात कौटुंबिक प्रश्नावरून वाद असले तरी त्याचं कोठेही आक्रस्ताळं प्रदर्शन केलेलं नाही. (त्यामुळेच केवळ कुटुंबाला वेळ देता येत नाही म्हणून दोघेही घटस्फोटाच्या टोकाच्या निर्णयापर्यंत आले तरी कसे, अशा प्रश्न सहज पडू शकतो.) अर्थात आपापली बाजू ते जेव्हा आपल्या मित्र-मैत्रिणींसमोर मांडतात, तेव्हा ती पटते.

तरी देखील या क्षुल्लक कारणांऐवजी उभयतांचे 'इगो' दुखावण्याचे काही प्रसंग दाखवले असते, तर घटस्फोटाच्या कारणांना बळकटी मिळाली असती असं सारखं वाटत राहतं. नित्याचा आजार उदभवल्यानंतर शेखर-समायराचं घटस्फोट प्रकरण निवळल्यासारखं वाटतं, मात्र शेवटी समायराच्या एका निवेदनात घटस्फोट मिळून गेल्याचा अगदी सहज उल्लेख येतो. म्हणजे नित्याच्या आजारानं दोघेही हादरलेले असताना आणि अशा वेळी एकत्र राहण्याची गरज दोघांनाही वाटत असताना घटस्फोट मिळण्याच्या अंतिम प्रक्रियेपर्यंत ते जातात तरी कसे ही बाबही खटकते.

मध्यंतरानंतर नित्याचा आजार हाच चित्रपटाचा मुख्य विषय बनून राहतो आणि शेखर-समायराचं घटस्फोट प्रकरण दुय्यम ठरतं. नित्याच्या आजारपणामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळेच शेखर-समायराचं 'हृदयांतर' घडतं, हा चित्रपटाचा मतितार्थ असला तरी 'नित्याचं आजारपण' कथेच्या मुख्य सूत्रावर मात करून जातं ही बाब दुर्लक्षता येत नाही. आणि त्यामुळे  कथेचा शेवट काय असू शकतो याचाही सहज अंदाज येतो. शिवाय मांडणीतील चकचकीतपणा काही प्रमुख त्रुटींवर पांघरून घालण्याचं छान काम करून जातो. आजारावर मात करण्यासाठी 'क्रिश' आणि 'डेव्हिल्स' यांचं वापरलेलं रूपक दिग्दर्शकाच्या कल्पकतेची जाणीव करून देतं. 

सुबोध भावे याने शेखरची भूमिका अतिशय समर्थपणे पेलली आहे. मुलीवरील प्रेमापोटी स्वतःचं चकोट करण्याचा त्याचा प्रसंग हेलावून सोडणारा आहे. मुक्ता बर्वेनेही आपली भूमिका तडफदारपणे रंगवताना 'आई'ची ममता दाखवण्यात कोठेही कसर सोडली नाही. तृष्णिका शिंदे (नित्या) आणि  निष्ठा वैद्य (न्याशा) या मुलींनीही चांगलं काम केलं आहे. हृतिक रोशन, शामक डावर यांचं पडद्यावरील क्षणिक दर्शन सुखावून जातं. सोनाली खरे, अमित खेडेकर यांनीही छोट्याश्या भूमिकेत चांगली छाप पाडली आहे. संगीतकार प्रफुल्ल कार्लेकर यांनी स्वरबद्ध केलेली गाणी कथेला पूरक ठरली आहेत. थोडक्यात 'हृदयांतर' हे एक चकचकीत भावनिक नाट्य उत्तम वठलं आहे.

लेखक ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.
shree_nakul@yahoo.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.   

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख