‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही
ग्रंथनामा - झलक
मेघा पानसरे
  • ‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sun , 29 December 2024
  • ग्रंथनामा झलक रशिया Russia मेघा पानसरे Megha Pansare

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागाच्या प्रमुख आणि रशियन भाषा अभ्यासक डॉ. मेघा पानसरे यांचा ‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ हा मोठ्या आकारातील, संपूर्ण रंगीत छपाई असलेला वैशिष्ट्यपूर्ण, संग्राह्य ग्रंथ नुकताच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृति मंडळातर्फे प्रकाशित झाला आहे. या ग्रंथाला लेखिकेने लिहिलेल्या मनोगताचा हा संपादित अंश...

.................................................................................................................................................................

मराठी भाषिकांना रशिया व रशियन संस्कृतीचा परिचय करून देणाऱ्या ‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ या पुस्तकाची निर्मिती ही माझ्यासाठी एक अत्यंत आनंदाची बाब आहे.

जीवनातील साधारण ३५ वर्षे सातत्यानं एक विद्यार्थी, शिक्षक व संशोधक या नात्याने माझा रशियन भाषा, साहित्य व संस्कृती या विषयाचा अभ्यास सुरू राहिला. या दीर्घ काळात अवगत केलेलं ज्ञान, अनुभव रशियन भाषेच्या भावी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची इच्छा असणं, ही एक स्वाभाविक गोष्ट होती. विदेशी भाषेचं अध्यापन करत असताना नेहमीच भाषिक कौशल्ये शिकवण्यास प्राथमिकता असते. भाषेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हळूहळू त्या परक्या देशाच्या संस्कृतीचा परिचय होत असतो. परंतु काही वर्षं विदेशी भाषा शिकूनही ज्या प्रमाणात त्यांना त्या संस्कृतीची ओळख व्हायला हवी, तशी होत नाही, असा अनुभव अध्यापक म्हणून मला स्वतःला सतत येत होता.

जी विदेशी भाषा आपण शिकतो, त्या भाषेबरोबरच ती भाषा बोलणाऱ्या लोकांबद्दलही एक प्रकारचं कुतूहलपूर्ण सुप्त आकर्षण जाणवत राहतं, हा माझाही एक अनुभव आहे. परंतु कोणत्याही देशाची संस्कृती ही एकरेषीय, एकस्तरीय, एकमितीय व सहज उलगडणारी बाब नसते. विशेषतः रशियासारख्या भौगोलिकदृष्ट्या दूरस्थ व सांस्कृतिकदृष्ट्या अनोळखी देशाची संस्कृती समजून घेणं, ही अतिशय गुंतागुंतीची गोष्ट असते.

१९८०च्या दशकात जेव्हा मी ‘शिवाजी विद्यापीठा’त रशियन भाषा शिकत होते, तेव्हा ‘भारत-सोविएत मैत्री व सहकार्य करारा’अंतर्गत एक सोविएत शिक्षक सहकुटुंब एक-दोन वर्षांसाठी येत असत. ते विद्यापीठातील क्वार्टरमध्येच राहात असत. तेव्हा त्यांचं व्यक्तिमत्त्व, जगण्याची रीत, कुटुंब प्रत्यक्ष पाहता आलं. विद्यार्थिदशेत असल्यापासूनच रशियन संस्कृती समजून घेण्याची तीव्र इच्छा माझ्याही अंतर्यामी होती. परंतु अशी तीव्र इच्छा ही एक वैश्विक बाब असल्याचं मला काही वर्षांपूर्वी समजलं.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

सेंट पीटर्सबर्गमधील विद्यापीठात हिंदी भाषा शिकत असताना भारतीय लोक व संस्कृती, याबद्दल त्याच प्रकारचं आकर्षण जाणवत होतं, असं तच्याना या माझ्या रशियन मैत्रिणीनं मला सांगितलं. आमचे अनुभव अगदी सारखे होते. आम्ही दोघी समवयीन असल्यानं तो काळही सारखाच होता. आम्ही इकडे रशियन लोक, जनजीवन, कला, साहित्य, संगीत, चित्रपट यांच्या प्रेमात होतो; तर तिकडे तच्याना आणि तिचे मित्र-मैत्रिणी भारतीय लोक आणि संस्कृतीच्या प्रेमात असत.

तेव्हा आजच्यासारखी विविध इलेक्ट्रॉनिक माध्यमं नव्हती. त्यामुळे अवांतर वाचन हेच एखादा देश समजून घेण्याचं साधन उपलब्ध होतं. सोविएत रशियातून येणारं बालसाहित्य, अतिशय सुरेख मासिकं आणि विविध विषयांवरची पुस्तकं वाचून आमची तृष्णा बऱ्यापैकी भागत असे. परंतु २२ वर्षांची असताना स्कॉलरशिपवर मॉस्को-सेंट पीटर्सबर्गला जाण्याची, दोन महिने तिथे राहण्याची संधी मिळाली आणि तत्कालीन सोविएत समाजव्यवस्था प्रत्यक्ष पाहता आली.

हा एक अतिशय महत्त्वाचा अनुभव होता. विद्यार्थिदशेत संस्कृती परिचयाची नकळत सुरू झालेली ही प्रक्रिया आजही सुरूच आहे, हे मला स्पष्टपणे जाणवतं. सातत्यानं साहित्याचं वाचन, भाषांतर व अनेक वेळा रशियाला भेट दिल्यानंतरही रशिया व रशियन लोक, तिथली संस्कृती यामध्ये अद्याप कितीतरी असं आहे, जे माझ्यासाठी अज्ञात आहे. आजही काही ना काही नवं वैशिष्ट्य अचानक समजून येतं.

तात्पर्य, संस्कृतीचा परिचय हा एक दीर्घकालीन अनुभव असतो. भाषा शिकण्यास सुरुवात केल्यापासून ते आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून रशियन भाषेच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश या पुस्तकाच्या निर्मितीमागे आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. त्यानुसार पुस्तकाची रचना करण्याचा प्रयत्न इथे केला आहे.

रशिया हा राजकीयदृष्ट्या जगातील एक प्रमुख देश आहे. तो संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीच्या पाच कायम सदस्यांपैकी एक आहे. सोविएत युनियन या जगातील पहिल्या समाजवादी देशाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, समाजवादी व्यवस्थेत शिक्षणापासून अंतरिक्ष संशोधन अशा सर्वच क्षेत्रात केलेली नेत्रदीपक प्रगती, दुसऱ्या महायुद्धातील शौर्यपूर्ण कामगिरी व शीतयुद्ध काळापासून द्विध्रुवीय जगातील अमेरिकेसारख्या महासत्तेशी स्पर्धा, अशा अनेक कारणांनी प्रसारमाध्यमांतून जागतिक स्तरावर रशिया चर्चेत राहात आला आहे.

 

आपल्या शालेय अभ्यासक्रमांतून या देशाचा अल्प परिचय मुलांना होत असतो. चाळिशीच्या वरील वयोगटात असलेल्या सर्वसामान्य, मध्यमवर्गीय मराठी लोकांना सोविएत रशियन बालसाहित्याची चांगली ओळख होती. अनेक पिढ्या त्या बालसाहित्याची मौज लुटत वाढल्या. टॉलस्टॉयच्या गोष्टी, सुंदर वसिलीसा यासारख्या रशियन लोककथा, चूक आणि गेक, देनिसच्या गोष्टी, इवान अशा साहित्यातून त्यांची रशियाशी ओळख झाली. रशियाशी त्यांचं एक भावनिक नातं जुळलं.

शिवाय स्वातंत्र्यानंतर अनेक दशकांतील भारत-रशिया मैत्रीचे ते साक्षीदार आहेत. आज तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या भोक्त्या नव्या पिढीला प्रसारमाध्यमांतन रशिया या देशाबद्दल सतत काही ना काही माहिती मिळत असते. महाराष्ट्रातील अनेक पर्यटन कंपन्यांसाठी रशिया हे आकर्षण आहे.

सोविएत काळापासून हजारो भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी रशियात जात आले आहेत. आजही वैद्यकीय व इंजिनिअरिंग क्षेत्रासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी अनेक मराठी मुलं-मुली रशियातील विद्यापीठांत जातात. उद्योग-व्यापार, संरक्षण क्षेत्रात रशिया-भारत संबंध पूर्वीसारखेच दृढ आहेत. दोन्ही देशांमध्ये शासकीय स्तरावर काही ना काही सांस्कृतिक देवाणघेवाण होत असते.

रशियात ‘भारत महोत्सव’ व भारतात ‘रशिया महोत्सव’ आयोजित करण्याची एक दीर्घ परंपरा दोन्ही देशांत आहे. अनुवादाच्या माध्यमातून रशियन साहित्याची ओळख आपल्याला होते. असा विविध स्तरांवर मराठी लोकांचा रशियाशी संबंध येत असतो. परंतु असं असलं तरीही रशिया आणि रशियाचं सांस्कृतिक जीवन यावर एकही पुस्तक मराठीत उपलब्ध नाही. त्यामुळे सर्वसाधारणपणे मराठी लोकांना रशियाबद्दल फार कमी माहिती आहे. तेव्हा रशियन भाषेच्या विद्यार्थ्यांबरोबरच सामान्य मराठी माणसाला रशियाची सांस्कृतिक ओळख भौगोलिक करून देण्याचा हा एक गंभीर प्रयत्न आहे.

यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटन स्थळे यांचा एका रशियन भाषा जाणणाऱ्या व्यक्तीच्या दृष्टीतून वेध घेतला आहे. भाषा अभ्यासक म्हणून सुरुवातीस जाणवणारं रशियाचं आकर्षण, कालांतरानं तिथल्या शिक्षक-अभ्यासकांशी झालेली मैत्री, तो देश आणि तिथल्या लोकांना समजून घेताना त्या देशाबद्दल वाटू लागलेलं प्रेम व आत्मीयता; शिवाय रशियन क्रांती व समाजवादी विचारप्रणाली याकडे असलेला व्यक्तिगत कल यांच्या प्रभावातून स्वतःला सोडवून घेत हळूहळू अनेक गोष्टींकडे वस्तुनिष्ठ दृष्टीतून पाहायला शिकण्यासाठी दीर्घ काळ जावा लागतो. ती वेळ आता आली आहे असं वाटतं. रशियाचा किमान एक प्राथमिक परिचय या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचेल.

 

‘रशियन’ असणं म्हणजे काय? किंवा रशियाची राष्ट्रीय ओळख काय आहे? हा प्रश्न साधारण एक हजार वर्षं अनेक रशियन तत्त्वज्ञ, विचारवंत, साहित्यिक, समीक्षक, चित्रकार, संगीतकार, कलाकार चित्रपट निर्माते, राजकीय व्यक्ती यांच्या कार्याचा केंद्रबिंदू राहिला आहे. रशियन सांस्कृतिक स्व-अभिव्यक्तीत कायमच त्यांच्या राष्ट्रीय ओळखीचे प्रश्न झिरपत आले आहेत. त्यामुळे रशियन संस्कृती समजून घेणं, ही परदेशी लोकांसाठी एक जटिल प्रक्रिया आहे.

प्रत्येक ऐतिहासिक युगाची स्वतःची अशी एक संस्कृतीची व्याख्या असते. विख्यात रशियन लेखक व सांस्कृतिक इतिहासकार यूरी लोत्मन (१९२२-१९९३) यांच्या मते, संस्कृती हे मानवी समाजाचं पर्यावरण आहे. माणूस जिवंत राहण्यासाठी निसर्गाचा सामना करताना स्वतःचं असं एक वातावरण निर्माण करतो. हे वातावरण आंतरिकही असतं आणि बाह्यही असतं. त्यामुळे संस्कृती ही एक आत्मिक संकल्पना आहे. ती लोकांच्या कल्पना, विचार, समज, भावना यांच्याशी जोडलेली असते. वस्तू, साधनं आणि यंत्रांशी नव्हे. तो एक ज्ञानाचा, माहितीचा वारसा असतो. मानवी समाज त्याचा संचय करतो, त्याचं जतन करतो आणि तो नव्या पिढीकडे सुपूर्द करतो.

रशियन लोकांचा असाच एक समृद्ध वारसा हजारो वर्षांच्या प्रवासातून आजच्या पिढीकडे आला आहे. त्यामध्ये इतिहासातून जडणघडण होत आलेलं त्यांचं खास रशियन व्यक्तिमत्त्व, वर्तमान दैनंदिन जगणं, सामाजिक जीवन, तिथली मिथकं, प्रतीकं, निसर्ग, जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन, वैचारिक बहुविधता, कला- साहित्य, भावभावना, संगीत, वेदना-दुःखं आणि विजयाचे हर्ष-उत्सव, राजकीय बदल व अस्थिरता, भवितव्याची अनिश्चितता हे सारं काही येतं. त्यामध्ये अर्थातच इतर संस्कृतींशी काही प्रमाणात साम्य, तर अनेक प्रमाणात वेगळेपण जाणवतं. काही वैश्विक मानवी अंश दिसतात, तर काही खास रशियन तत्त्वं जाणवतात.

इतिहासाच्या प्रक्रियेत रशियन माणसानं अतिशय खडतर काळ पाहिला आहे. या दीर्घ वाटचालीमध्ये काही महत्त्वपूर्ण वळणं आहेत. त्यांना विविध ऐतिहासिक व राजकीय अर्थछटा आहेत. खरं तर रशियातील प्रत्येकच सांस्कृतिक घटितांना सोविएतपूर्व, सोविएत व उत्तर-सोविएत अशा दृष्टीकोनातून पाहावं लागतं.

प्राचीन रूसचा उदय, इस्टर्न ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन धर्माचा स्वीकार, त्सारशाही, ततार राज्य, साम्राज्यवाद, ऑक्टोबर क्रांती, समाजवादी व्यवस्था, गृहयुद्ध, लेनिनचा मृत्यू, स्तालिन सत्तेचा उदय, दडपशाही व भय, दुसरं महायुद्ध व त्यातून झालेली राष्ट्राची सर्वांगीण हानी, स्तालिनचा मृत्यू, शिक्षण व जीवनमानात प्रगती, शिथिल राजकीय कालखंड, त्यापाठोपाठ अर्थव्यवस्था व संस्कृतीचे गोठलेपण, गर्बचोवच्या नेतृत्वाखाली ‘पिरिस्त्रोइका- ग्लासनस्त’ धोरण, पूर्व युरोपात साम्यवादाचं कोसळणं आणि खुद्द रशियात साम्यवादी व्यवस्थेचा अस्त... अशा व्यापक व आव्हानात्मक अनुभवांतून रशियन समाज गेला.

 

रशियन माणसाचं सुख-दुःख, हर्ष-वेदना, देशप्रेम, बलिदान-त्याग, जगण्याची आकांक्षा या एका दृष्टीनं अद्वितीय आहेत. इतिहास समजल्याशिवाय वर्तमान समजत नाही. त्यामुळे रशियन माणसाचा हा शतकांचा प्रवास ‘रशियाचा संक्षिप्त इतिहास’ या प्रकरणात दिलेला आहे. त्यातून काही ठळक व्यक्ती व घटना समोर येतात. रशियाच्या इतिहासाचा वेध घेताना राजकीय स्थित्यंतरांची नोंद अपरिहार्य आहे. परंतु ती रशियन संस्कृतीची एक महत्त्वाची ओळख आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे.

युरोप व आशियाचा मिलाफ, अति उत्तरेकडील भौगोलिक स्थान व निसर्गाचा वैशिष्ट्यपूर्ण अनुभव हा सुद्धा त्यांच्या जीवनानुभवाचा गाभा राहिला आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीची विविधता, नद्या-समुद्रांची विपुलता, संपन्न वनस्पती-प्राणीविश्व व रंगविशिष्ट ऋतू यातून रशियाचं अनोखेपण आणि त्याच्या संस्कृतीचा भौगोलिक बंध हे समजून घेता येतं. केवळ तीन महिन्यांच्या सूर्यप्रकाशात वर्षभरासाठी ऊब, ऊर्जा व उत्साह शरीर-मनात साठवून हे लोक उर्वरित वर्ष रंगविहीन सफेद भोवतालात व्यतीत करतात. भविष्यात नियमितपणे येणाऱ्या गोठलेल्या दिवसांसाठी निवास, अन्न व वस्त्र यांची तजवीज करतात. तेव्हा रशियन निवास रचना व त्यांची घराची संकल्पना समजून घेणं आवश्यक ठरतं.

या पुस्तकात रशियन माणसाचं घर आणि घराशी संबंधित भावभावना स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. खुश्चोव्का, दाचा या नव्या संकल्पना समजून घेणं रोचक आहे. घराप्रमाणेच रशियन पेहरावाचा संबंध सुद्धा त्यांच्या भौगोलिकतेशी आहे. त्याचप्रमाणे विवाह व कुटुंब व्यवस्था आणि त्यांच्याशी संबंधित प्रथा रशियन संस्कृतीचं वेगळेपण अधोरेखित करतात. विविध राजकीय प्रवाहांनी माणसाचं दैनंदिन जगणं कसं प्रभावित होतं, हे अगदी स्पष्ट समजून येतं.

शिवाय विवाह- कुटुंबासारख्या सामाजिक संस्था समजून घेत असताना लिंगभाव दृष्टी अतिशय महत्त्वाची ठरते. कुटुंबाचं केंद्र असलेली रशियन स्त्री एका बाजूला लिंगभाव विषमतेची बळी असली, तरी राज्यव्यवस्था तिला सामाजिक जीवनात सार्वजनिक उत्पादनात महत्त्वाचं स्थान देते, हेसुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. रशियन स्त्री ही खरोखरच रशियन समाजाचा कणा आहे.

 

जगभरात वैशिष्ट्यपूर्ण मानली गेलेली सोविएत शिक्षणपद्धती समाजवादी तत्त्वप्रणालीच्या पायावर उभी होती. दरिद्री, वंचित, निरक्षर समाजाला शिक्षित व उच्चशिक्षित करून आत्मसन्मान देणारं, विचार करण्यास समर्थ बनवणारं मोफत व दर्जेदार शिक्षण देशाला प्रगतीकडे नेऊ शकतं, हे त्यातून सिद्ध झालं. क्रांतीनंतर राष्ट्रीय उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न, काही यशस्वी, तर काही अयशस्वी योजना, बदललेली जीवनशैली, स्त्रियांना घरकामातून बाहेर काढून सार्वजनिक उत्पादनात सहभागी करून घेण्यासाठी राबवलेले प्रयोग अशा अनेक बाबी एक विदेशी वाचक म्हणून समजून घेणं महत्त्वाचं आहे. पण त्याचबरोबर खास रशियन शैलीचं खानपान आपल्याला नक्कीच आकर्षित करू शकतं.

अनेक भारतीयांना रशियन भोजनातील मांसाचा, विशेषतः बीफ व वोकाचा वापर स्वीकारता येत नाही. परंतु तो त्यांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यांच्या खाद्यपदार्थांचं वैविध्य नक्कीच स्वारस्यपूर्ण आहे. रशियातील सण-उत्सव हेसुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्यांत त्यांच्या संस्कृतीचं प्रतिबिंब आहे. रशियन समाजात रूढ असलेल्या अनेक अंधश्रद्धा पाहून मराठी वाचकांना नक्कीच आश्चर्य वाटतं. अर्थात, सर्वच लोक काही त्यांच्यावर विश्वास ठेवत नाहीत. पण अनेक बाबतीत त्यांचं आपल्या समाजातील अंधश्रद्धांशी साम्य जाणवतं, तर काही बाबतीत वेगळेपणही जाणवतं.

धर्म हा रशियन जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. रशियात ऑर्थोडॉक्स धर्म येण्याचा इतिहासही रोचक आहे. परंतु सोविएत काळात देशाला एक निधर्मी राष्ट्र बनवण्याचे प्रयत्न झाले. जुन्या पिढीला तिचे क्रांतिपूर्व काळातील संस्कार मनातून काढून टाकणं शक्य झालं नाही. परंतु नवी पिढी बऱ्याच अंशी नास्तिक व धर्मनिरपेक्ष बनली. उत्तर-सोविएत काळात पुन्हा धर्माचा रशियन लोकांच्या जीवनात प्रवेश झाला. धर्म ही बाब राजकीय सत्तेच्या विचारप्रणालीनुसार नागरिकांच्या जीवनात विशिष्ट असं स्थान मिळवत असते, हे स्पष्ट होतं.

रशियातील प्रसारमाध्यमांचं स्वरूपसुद्धा राजकीय व्यवस्थेनुसार बदलत आलं आहे. तेथील प्रसारमाध्यमांचा विकास व त्यातील बदलांची प्रक्रिया एकूणच आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा विचार करता महत्त्वाची आहे.

भाषा, साहित्य व कला हा कोणत्याही समाजजीवनाचा जिवंत आरसा असतो. रशियन साहित्य-कला आणि त्यातील विविध प्रवाह जागतिक साहित्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचे आहेत. अनेक जागतिक दर्जाचे लेखक-कवी-कलाकार आपल्या सृजनातून सातत्यानं रशियातील वास्तव व्यक्त करत आले आहेत. साहित्यिक-कवी व कलाकारांचं राजकीय सत्तेला भय वाटणं, हीच त्यांच्या सर्जनशील सामर्थ्याची ओळख आहे. त्यांच्या वेदना- यातना, त्यांचं योगदान कायमच रशियन लोकांना आत्मिक बळ देत आलं आहे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

२१व्या शतकात जसे लाखो रशियन पर्यटक भारतास, विशेषतः गोवा, राजस्थान, केरळ अशा राज्यांना भेट देऊ लागले; तसेच भारतीय, मराठी लोकही मोठ्या संख्येने रशियाला पर्यटनासाठी भेट देऊ लागले आहेत. अशा पर्यटकांना रशियन भाषेचं अज्ञान हा एक मोठाच अडथळा असतो. परंतु रशियास भेट देण्यापूर्वी रशियन संस्कृती व तथील ऐतिहासिक स्थळांची माहिती असल्यास रशिया सफर नक्कीच आनंददायी होऊ शकते. त्यामुळे या पुस्तकात मराठी पर्यटकांसाठी एक संपूर्ण प्रकरण समर्पित केलेलं आहे. ते त्यांना रशियाची, विशेषतः काही मोठ्या शहरांची प्राथमिक ओळख देण्यास पुरेसं ठरावं.

सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही, तसेच ग्रामीण रशियाचे चित्रण नाही, ही या पुस्तकाची क्षीण बाजू आहे. परंतु माझ्या दृष्टीनं तो एका स्वतंत्र पुस्तकाचा विषय आहे. पुस्तकाच्या सुरुवातीस ‘भारत-रशिया अनुबंध’ याबद्दल संक्षिप्त माहिती वाचकांसाठी देण्याची गरज मला वाटली. तसेच पुस्तकात अनेक नव्या सांस्कृतिक गोष्टी समजून घेण्यास मदतकारक अशा चित्र-छायाचित्रांचा समावेश करण्याची आवश्यकता लक्षात घेतली आहे. त्यानुसार शक्यतो इंटरनेटवर पुनर्वापरासाठी मुक्तपणे उपलब्ध अशी चित्रं निवडली आहेत. त्यांचे संदर्भ पुस्तकाच्या शेवटी दिले आहेत.

रशियन नावांना काही अर्थ असतात. ते रशियन भाषेच्या ज्ञानाशिवाय वाचकांपर्यंत पोहोचणं शक्य नसतं. त्यामुळेच रशियन विशेष नामं मराठी वाचकांना क्लिष्ट, कठीण वाटतात. रशियन व्यक्ती, शहरं, ठिकाणं आणि संस्था यांच्या नावाचं मराठी प्रतिलेखन- लिप्यंतरण याबाबतीत काही निर्णय घेणं आवश्यक होतं. मूळ रशियन नावांच्या शब्दातील स्वराघात लक्षात घेऊन त्या उच्चारानुसार मराठीतील नावं असावीत, असा प्रयत्न केला आहे. काही बाबतीत रशियन नाव जिथे पहिल्यांदा आलं असेल, तिथे पूर्वी इंग्रजी उच्चारावरून रूढ झालेली रशियन नावं कंसात देण्याचा एक पर्याय स्वीकारला आहे.

उदाहरणार्थ, ल्येव तल्स्तोय (लिओ टॉलस्टॉय) व प्योत्र (पीटर) इत्यादी. बहुसंख्य मूळ रशियन नावं तशीच ठेवली आहेत. परंतु काही ठिकाणी वाचकांची सवय लक्षात घेऊन रूढ नावंच ठेवावी लागली. उदाहरणार्थ, ‘रसीया’ऐवजी ‘रशिया’, ‘सांक्त पितिरबूर्ग’ऐवजी ‘सेंट पीटर्सबर्ग’ आणि ‘मस्क्वा’ऐवजी ‘मॉस्को’ इत्यादी. परंतु तरीही रशियन-मराठी प्रतिलेखन- लिप्यंतरणाचे काही प्रश्न अद्याप सोडवता आलेले नाहीत. काही रशियन ध्वनींना मराठी पर्याय नाही.

पुस्तकाचं काम जवळजवळ पूर्ण झालं असताना फेब्रुवारी २०२२मध्ये रशिया-युक्रेन युद्ध सुरू झालं. ‘रशियाचा संक्षिप्त इतिहास’ या प्रकरणात शेवटी त्याबद्दल थोडक्यात विश्लेषण दिलं आहे.

पुस्तक प्रकाशनाच्या या प्रसंगी कॉ. गोविंद पानसरे यांचे स्मरण होणं स्वाभाविक आहे. माझ्या सर्वच लेखनाचे ते पहिले वाचक-श्रोते असत. असं पुस्तक लिहिण्याची माझी आकांक्षा आहे आणि मी त्यावर काम करते आहे, हे त्यांना माहीत होतं. पण ते वाचून दाखवण्याची आणि त्यांची मतं समजून घेण्याची संधी मला मिळाली नाही, याचं खरोखरच दुःख आहे. त्यांची स्मृती मला कायम अधिक नैतिक, अधिक विवेकी व अधिक कृतिशील बनण्यास प्रेरित करते. हे पुस्तक मी त्यांच्या प्रेरणादायी स्मृतीस अर्पण करत आहे.

‘रशिया - युरेशियन भूमी आणि संस्कृती’ - डॉ. मेघा पानसरे,

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृति मंडळ, मुंबई | पाने - ४६४ (मोठा आकार, संपूर्ण रंगीत) | मूल्य - २२८ रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......