‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश
ग्रंथनामा - झलक
श्रीमंत माने
  • ‘हा देश आमचा आहे : लोकसभा २०२४ निवडणूक निकालाचा अर्थ’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sun , 29 December 2024
  • ग्रंथनामा झलक हा देश आमचा आहे Ha Desh Aamcha Aahe श्रीमंत माने Shreemant Mane

लोकसभेची अठरावी निवडणूक म्हणजेच २०२४च्या लोकसभा निवडणुकीचे विश्लेषण करणारे पत्रकार श्रीमंत माने यांचे ‘हा देश आमचा आहे : लोकसभा २०२४ निवडणूक निकालाचा अर्थ’ हे पुस्तक नुकतेच मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाला लेखकाने लिहिलेल्या मनोगताचा हा संपादित अंश...

.................................................................................................................................................................

ऑक्टोबर २०२२मधील काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक, त्याच वेळी सुरू असलेली काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ‘कन्याकुमारी ते श्रीनगर’ ही ‘भारत जोडो यात्रा’ आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुका; या साधारणपणे वर्ष-सव्वा वर्षाच्या बदलाच्या, परिवर्तनाच्या राजकीय प्रक्रियेत बरेच चढउतार पाहायला मिळाले. राहुल गांधी त्या चढउताराच्या केंद्रस्थानी होते. देशाची दक्षिणोत्तर टोके जोडणाऱ्या पदयात्रेच्या रूपाने ते त्यांचे राजकीय भवितव्य सावरू पाहत होते. या यात्रेमुळे राहुल गांधींचे भारतीय जनमानसाबद्दलचे आकलन वाढले, त्यातूनच त्यांच्या बोलण्यात - देहबोलीत आत्मविश्वास वाढला असला तरी लोकशाहीत निवडणूक हाच अशा बदलाचा पहिला व शेवटचा निकष असतो. म्हणूनच त्या यात्रेचा श्रीनगर येथे समारोप झाल्यानंतरच्या विधानसभा निवडणुकांवर माझ्यासारख्या अनेकांचे लक्ष होते.

कर्नाटकमधील काँग्रेसच्या दणदणीत विजयानंतर वाटले की, राहुल गांधींना मतदारांची नाडी गवसली आहे. त्याआधी यात्रा सुरू असताना काँग्रेसने हिमाचल प्रदेश जिंकले असले, तरी त्या विजयाचे श्रेय राहुल गांधींना मिळणार नव्हते. कारण त्या छोट्याशा राज्याने भारतीय जनता पक्ष व काँग्रेस यांना आलटूनपालटून सत्ता देण्याचा रिवाज पाळला होता. खऱ्या अर्थाने आधी मे २०२३मधील कर्नाटकच्या आणि वर्षाच्या शेवटी मध्य प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान व तेलंगणा विधानसभा निवडणुकांच्या निकालातून यात्रेचे यशापयश मोजले गेले. लोकसभा निवडणुकीची ‘सेमी फायनल’ म्हणाव्यात, अशा या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या वाट्याला आलेले यश जेमतेम होते.

कर्नाटक व तेलंगणा जिंकले तरी देशभरातील राजकीय पंडित त्याचे संपूर्ण श्रेय राहुल गांधींना द्यायला तयार नव्हते. त्याऐवजी कर्नाटकात डी. के. शिवकुमार व तेलंगणात रेवंत रेड्डी यांनी लढवलेले निवडणूक डावपेच व प्रचाराचा धूमधडाका विश्लेषकांना अधिक प्रिय होता. विशेष म्हणजे, याच जाणकार विश्लेषकांच्या दृष्टीने छत्तीसगढ, मध्य प्रदेश व राजस्थान येथील काँग्रेसचा पराभव मात्र राहुल गांधी व ‘भारत जोडो यात्रे’चा होता. अर्थात, राहुल गांधींच्या बाबतीत अशा पक्षपातामध्ये नवे काही नव्हते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी नेतृत्वात भारताची मान जगात किती उंचावली आहे, हे दाखवणाऱ्या G20 अध्यक्षपदाच्या वर्षभर चाललेल्या इव्हेंटची सांगता झाली होती. अयोध्येतील नवनिर्मित भव्य राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची २२ जानेवारी ही तारीख जाहीर झाली होती. त्या सोहळ्याच्या निमित्ताने देशाच्या कानाकोपऱ्यांत मतदारांच्या घरोघरी संपर्क साधण्याची जय्यत तयारी झाली होती. एकूणच काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला एकतर्फी यश मिळून जाईल, असेच वातावरण दिसत होते.

तथापि, एका कुठल्यातरी कोपऱ्यातून मिळणारे संकेत काही वेगळेच होते. कर्नाटक विधानसभा निवडणुकीवेळीच मणिपूरमध्ये उफाळलेला हिंसाचार, पंतप्रधानांनी तिथे जाऊन दंगलग्रस्तांना दिलासा देण्याची मागणी, शेतकरी व कुस्तीपटूंच्या आंदोलनासह अनेक मुद्द्यांवर सरकारबद्दल व्यक्त होणारा रोष कुठेतरी जमा होईलच, असे मला आतून वाटत होते. म्हणून मग प्रत्येक छोट्या-मोठ्या राजकीय घडामोडी, क्रिया व प्रतिक्रिया, नेत्यांची वक्तव्ये, त्यांना सामान्यांचा प्रतिसाद यावर बारकाईने लक्ष ठेवायला सुरुवात केली.

मधले काही महिने विरोधकांच्या आघाडीची जडणघडण होत होती. तिला ‘इंडिया’ हे नाव दिले गेल्यानंतर उमटलेल्या प्रतिक्रिया संमिश्र होत्या. जितकी राज्ये तितकी राजकीय समीकरणे असलेल्या आपल्या विशालकाय व बहुविध लोकसंस्कृतीच्या देशात लोकसभेची निवडणूक प्रादेशिक मुद्द्यांवर नेण्यात ही आघाडी यशस्वी झाली, तर चित्र बदलू शकते, असे वाटत होते.

अर्थात, या सगळ्याला महाराष्ट्राच्या राजकारणाचे संदर्भ अधिक होते. राहुल गांधींची पहिली यात्रा सुरू होण्यापूर्वीच महाराष्ट्रात शिवसेनेच्या महाफुटीचा राजकीय भूकंप घडून गेला होता. काँग्रेस व सोबतच शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस जितक्या अनपेक्षितपणे सत्तेवर आली होती, तितक्याच अनपेक्षितपणे सत्तेबाहेर फेकली गेली होती. कर्नाटकमधील काँग्रेसच्या विजयामुळे दोन्ही काँग्रेसची शिवसेनेसोबतची महाविकास आघाडी अधिक मजबूत होईल, असे वाटत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसही फुटली. शिवसेना व राष्ट्रवादीच्या फुटीची प्रक्रिया व त्यानंतरच्या न्यायालयीन तसेच निवडणूक आयोगापुढील लढाईत आश्चर्य वाटावे इतके साम्य होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील नवे सरकार मजबूत असतानादेखील ज्यांच्यावर थेट पंतप्रधानांनी जाहीर टीका केली, त्या अजित पवारांना जवळ घेण्याइतकी भाजपची काय मजबुरी असेल, यावर चर्चा झडू लागल्या. भाजपच्याच परंपरागत मतदारांना हे आवडले नसल्याचे स्पष्ट जाणवू लागले. सर्व देशभर भाजपला अनुकूल वातावरण असताना लोकसभेच्या जागांबाबत दुसऱ्या क्रमांकाच्या महाराष्ट्रातील ही बिघाडी धक्का देऊ शकते, असे वाटू लागले.

दरम्यान, राहुल गांधींची दुसरी ‘भारत जोडो न्याय यात्रा’ मणिपूरपासूनच सुरू झाली. ती ईशान्य भारतात किंवा नंतर बिहार, उत्तर प्रदेशात फिरत असताना तिला प्रतिसाद मिळू लागला. मुंबईच्या दिशेने ही यात्रा जसजशी पुढे सरकू लागली, तसा तो प्रतिसाद वाढत चालल्याचे दिसले. दोन्ही यात्रांमधील धार्मिक द्वेषावर प्रेमाचा उपाय या समान मुद्द्याबरोबरच प्रामुख्याने बेरोजगारीचा मुद्दा अधिक ठळकपणे जाणवू लागला.

लोकसभा निवडणूक जाहीर झाली. त्यासोबतच ‘अब की बार, चार सौ पार’ ही घोषणा आली आणि पाठोपाठ राज्यघटना संकटात आल्याचा मुख्य मुद्दा आकार घेऊ लागला. अमृतकाळातील पहिली व एकूण अठरावी लोकसभा निवडणूक, तसेच इतर अनेक बाबींशिवाय ही निवडणूक काहीतरी वेगळी व धक्कादायक वैशिष्ट्ये घेऊन पुढे सरकत चालल्याचे जाणवताच बारीकसारीक नोंदी ठेवायला सुरुवात केली. त्या नोंदींच्या आधारे एक मांडणी साकारत गेली.

संदर्भासाठी म्हणून आधीच्या सगळ्या निवडणुकांची अधिकृत आकडेवारी निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरून काढली. निवडणुकीत निर्णायक ठरू पाहणाऱ्या गरिबी, महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न किंवा अगदीच अनपेक्षितपणे पुढे आलेल्या इलेक्टोरल बाँड्ससारख्या मुद्द्यांचे सामान्य मतदारांना माहीत नसलेले तपशील जमा करायला लागलो. भारतीय जनता पक्ष व काँग्रेस यांचा निवडणूक जाहीरनामा अधिक खोलात जाऊन अभ्यासला. त्यांच्यातील मूलभूत फरक लक्षात आला. सलग तिसऱ्यांदा सत्तेवर येऊ पाहणाऱ्या भाजपपुढे आता नवी आश्वासने काय द्यावीत, हा महत्त्वाचा प्रश्न असल्याचे जाणवले. काँग्रेसकडे मात्र दोन्ही भारत जोडो यात्रांमधून जमा झालेल्या मतदारांच्या अपेक्षांचा मोठा साठा होता.

सात टप्प्यांमधील निवडणुकीचा प्रचार सुरू होण्याच्या आधीच हे इतके सगळे मनात घोळत असल्यामुळे प्रचारसभांमधील नेत्यांची भाषणे, वक्तव्ये व विधाने, आरोप-प्रत्यारोप यांकडेही त्याच दृष्टीने पाहणे शक्य झाले. विविध मुद्द्यांचा परामर्श असा मनात अधिक व कागदावर कमी घेतला जाऊ लागला.

हे जे माझ्या मनात साचत होते व त्यातून निवडणुकीचे काही अंदाज तयार होत होते, तसेच ते प्रमुख राजकीय पक्ष व नेत्यांच्या मनात असावेत. कारण, आधीच्या दोन निवडणुकांप्रमाणे देशव्यापी असा कोणताही मुद्दा या निवडणुकीत नव्हता. अठ्ठावीस राज्ये व आठ केंद्रशासित प्रदेश मिळून छोट्या-मोठ्या छत्तीस प्रांतांमध्ये जणू छत्तीस निवडणुका होत आहेत, असे जाणवत होते. एकच एक असा राष्ट्रीय मुद्दा नसणे सत्ताधारी भाजपसाठी अडचणीचे होते. आपला परंपरागत मतदार टिकवणे हेच नवे आव्हान त्यातून निर्माण झाले.

त्याचमुळे दोन टप्प्यांच्या मतदानानंतर पंतप्रधानांच्या काँग्रेसवरील टीकेची धार वाढली. धार्मिक ध्रुवीकरणाचे प्रयत्न सुरू झाले. एरवी अगदीच मोजक्या पत्रकारांना भेटणारे, मुलाखत देणारे पंतप्रधान एका पाठोपाठ एक असे देशभरातील जवळपास सर्व प्रमुख माध्यमसमूहांना मुलाखती देऊ लागले. ही निवडणूक जिंकण्याची भाजपची व्यूहरचना हळूहळू स्पष्ट झाली. तरीदेखील जाणवत होते की, चारशे जागांची घोषणा व राज्यघटनेचा मुद्दा मतदानाच्या प्रत्येक टप्प्यागणिक तीव्र होऊ लागला आहे. याच्या अधिक खोलात जाण्याची गरज नाही. कारण, या पुस्तकात ते वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये तपशिलाने आले आहेच.

निवडणुकीचा निकाल आला आणि त्याचे वेगवेगळ्या अंगांनी विश्लेषण सुरू झाले. अनेकांना आणीबाणीनंतरच्या १९७७मधील निवडणुकीशी या निवडणुकीचे साधर्म्य दिसले; तर महाराष्ट्रात या निवडणुकीची तुलना १९९८च्या निवडणुकीशी केली गेली. तेव्हा, शरद पवारांनी निवडणूक हातात घेतली होती. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या चारही शाखा व त्यांचे नेते एकत्र आणून सगळ्या धर्मनिरपेक्ष मतांची मोट बांधण्यात त्यांना यश आले होते. विशेष म्हणजे, त्यामुळे दिवंगत रा. सू. गवई तसेच अॅड. प्रकाश आंबेडकर, प्रा. जोगेंद्र कवाडे व रामदास आठवले हे चार नेते खुल्या मतदारसंघांमधून विजयी झाले होते.

देशपातळीवर आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत इंदिरा गांधी यांच्या विरुद्ध मोठी लाट होती. काँग्रेसमधील इंदिराविरोधक आणि भारतीय जनसंघ, समाजवादी पक्ष, लोकदल असे झाडून सगळे आणीबाणीविरोधी पक्ष जनता पार्टीच्या झेंड्याखाली एकत्र आले होते. ती निवडणूक प्रत्यक्षात त्यांनी भारतीय लोकदलाच्या चिन्हावर लढवली. जयप्रकाश नारायण यांचे नेतृत्व या आघाडीला मिळाले. विद्यार्थ्यांच्या मोठ्या आंदोलनाची ताकद होती. इंदिरा गांधींचा दारुण पराभव झाला.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

या वेळी तशी कोणतीही लाट नसताना सत्ताधारी भाजपला धक्का बसला. ४५ वर्षांपूर्वीच्या त्या निवडणुकीशी तुलना करणाऱ्यांच्या मते, व लोकशाही वाचवण्याचे सूत्र दोन्ही निवडणुकांमध्ये समान आहे. सरकारविरुद्ध मोठी लाट दिसली नाही तरी बेरोजगारीच्या मुद्द्यावर तरुण मतदार उदासीन, तर आर्थिक मुद्द्यावर शेतकरी संतप्त होता. त्याहून मोठा भाग धार्मिक सौहार्द व सर्वधर्मसमभावाचा होता. भारत जोडो यात्रा व त्यात सहभागी सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था यांनी त्या दृष्टीने जनमानसाची मशागत केली होती.

सर्वांत महत्त्वाचा मुद्दा आहे, तो मतदारांनी या निकालाद्वारे दिलेल्या संदेशाचा! स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश आहे :

धार्मिक सहजीवनाचा शेकडो वर्षांचा इतिहास जपणाऱ्या या देशात मतदारांना गृहीत धरू नका. हा देश, हे स्वातंत्र्य, हे प्रजासत्ताक आमचे आहे. लाखो-कोट्यवधी भारतीयांनी संघर्ष करून, प्राणाची बाजी लावून हे स्वातंत्र्य व प्रजासत्ताक मिळवले आहे. लोकशाही आम्हाला प्राणांहून प्रिय आहे. तेव्हा, जनतेने ज्या कामासाठी तुम्हाला प्रतिनिधित्व दिले आहे, ते काम प्राधान्याने करा. समाजातील दुबळ्या वर्गाचा विचार करा. सोबतच आकांक्षी समूहांकडे लक्ष द्या. अंत्योदयाचा विचार केंद्रस्थानी ठेवा. शेवटच्या माणसाचे जगणे सुखकर होईल हे पाहा.

निवडणूक निकालाच्या विश्लेषणाकडे वळण्यापूर्वी, प्रत्यक्ष निकालाआधी देशाच्या राजकीय क्षितिजावर बदल होत असल्याचे तीव्रतेने जाणवायला लागले आणि वाटले की, आत्तापर्यंत कुतूहल किंवा स्वाध्याय म्हणून केलेल्या नोंदी पुस्तकरूपाने वाचकांपर्यंत न्यायला हव्यात.

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.

‘हा देश आमचा आहे : लोकसभा २०२४ निवडणूक निकालाचा अर्थ’ - श्रीमंत माने

मनोविकास प्रकाशन, पुणे | पाने - २२४ | मूल्य - ३२५ रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......