अनेक सहस्रकांचा आपला समग्र इतिहास सांगणाऱ्या ‘द इंडियन्स’ या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद दोन महिन्यांपूर्वी मनोविकासने प्रकाशित केला होता. त्याला वाचकाकडून उंदड प्रतिसाद लाभल्याने त्याची दुसरी सुधारित आवृत्ती प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने हे पुस्तक नेमकं काय आहे, ते कोणत्या भूमिकेतून लिहिलं गेलं आहे, हे सांगणाऱ्या गणेश देवी यांच्या प्रास्ताविकाचा हा संपादित अंश...
.................................................................................................................................................................
काळ ही अस्तित्व असलेली वास्तविक गोष्ट आहे की, ती मनातलीच एक अमूर्त, अमर्याद निरपेक्षत्वाची कल्पना आहे, हे ठरवणे अवघड आहे. काळ मूर्त आहे की अमूर्त, ही अनिश्चितता बाजूला ठेवू. भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांच्यामध्ये चालणाऱ्या अविरत परस्पर प्रक्रियेचा सर्व मानवी व्यवहारांवर खोल ठसा उमटलेला असतो, मग ते व्यवहार व्यक्तिगत असोत की सामूहिक, कौटुंबिक असोत की सामाजिक की राष्ट्रीय. ही गोष्ट आपल्याला मान्य करावीच लागते. वर्तमानकाळातल्या भौतिक, सांस्कृतिक आणि वैचारिक सोयीनुसार आपण समाजाच्या आणि राष्ट्राच्या भूतकाळाची आपली कल्पना साकारून तिच्यात अधिवास करतो आणि तिची वकिली करतो. त्या भूतकाळाचे वैशिष्ट्य असे की, त्याला एकच एक भूतकाळ म्हणता येत नाही. भूतकाळ विविधांगी असतो. प्रत्येक अंगाचे मूल्यमापनही सतत बदलते असते. कोणतेही एकच मूल्यमापन संपूर्ण, वस्तुनिष्ठ आणि अचूक आहे, असे खात्रीलायकरीत्या म्हणता येत नाही. ही अनिश्चितता आपल्याला परिचित आहेच, तरीसुद्धा इतिहास जाणून घेण्याचे प्रस्थापित वैज्ञानिक मानदंड आहेत, हेही आपण लक्षात ठेवले पाहिजे. ते लक्षात घेतले तर कोणत्याही समाजाच्या इतिहासाबद्दलची चर्चा आपल्याला कपोलकल्पित, आभासी स्वप्नरंजनापासून दूर, सुरक्षित ठेवता येईल.
संशोधनाचा विषय म्हणून इतिहास एक मुक्तांगण आहे. बहुमताचे राजकारण आणि एकाधिकारवादी राजवट विवेकशून्य, असमर्थनीय दावे मांडून इतिहास बदलू पाहातात. अशा राजवटी वर्तमानकाळातल्या ज्या समाजगटांबद्दल सूडभावना प्रज्वलित करायची आहे, त्यांच्या पूर्वजांनी गतकाळात केलेल्या अन्यायाबद्दल द्वेषभावना तीव्र करतात. बहुसंख्याकांच्या मनातली स्वत:बद्दलची प्रतिमा उंचावण्यासाठी या राजवटी गतकाळातल्या देदीप्यमान वैभवाच्या भ्रामक प्रतिमा चितारतात. बहुसंख्य लोकांवर प्रभाव पाडून त्यांना अंकित करणे, या राजवटींना गरजेचे असते.
पेशाने शास्त्रज्ञ, पुरातत्त्वविशारद आणि इतिहासकार असलेल्यांनी वर्णिलेल्या ऐतिहासिक वास्तवाचा त्यामुळे किती विपर्यास होतो, याची त्यांना पर्वा नसते. सर्व तर्कसंमत मर्यादा ओलांडून जाणूनबुजून इतिहासाचा विपर्यास करण्याची प्रवृत्ती कशी फोफावत आहे, याचे उदाहरण भारतामध्ये सध्या पाहायला मिळते. इतिहासाकडे पाहाण्याचा शास्त्रशुद्ध दृष्टीकोन आणि अलीकडच्या काही वर्षांत दक्षिण आशिया खंडाचा इतिहास आपल्या डोळ्यादेखत पिरगळून, मोडूनतोडून टाकण्याची वृत्ती यांच्यामधील संघर्ष, हे या अहवालाच्या निर्मितीचे कारण आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
भारत सरकारने भारतीय संस्कृतीचा उगम आणि विकास यांच्या सर्वंकष अभ्यासासाठी एक तज्ज्ञ समिती नेमली आहे, अशी संस्कृती मंत्र्यांची घोषणा ‘प्रेस इन्फर्मेशन ब्युरो’ने १४ सप्टेंबर २०२० रोजी प्रसिद्ध केली. ‘विद्यमान काळाच्या १२ हजार वर्षे आधी उदयाला आलेल्या भारतीय संस्कृतीचा जगातील इतर संस्कृतींच्या संदर्भात उगम आणि विकास कसा झाला, हे पूर्णतया जाणून घेण्यासाठी स्थापन केलेल्या समितीमध्ये पुढील तज्ज्ञ व्यक्तींना पाचारण करण्यात आले आहे.
१. श्री. के. एन. दीक्षित, अध्यक्ष, इंडियन आर्कियॉलॉजी सोसायटी आणि भूतपूर्व सह-महासंचालक, आर्कियॉलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया
२. डॉ. आर. एस. बिश्त, भूतपूर्व सह-महासंचालक आर्कियॉलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया
३. डॉ. बी. आर. मणी, भूतपूर्व महासंचालक, नॅशनल म्युझियम, नवी दिल्ली, भूतपूर्व अतिरिक्त महासंचालक, आर्कियॉलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया
४. प्रा. संतोष शुक्ल, जवाहरलाल नेहरू युनिवर्सिटी, न्यू दिल्ली
५. डॉ. रमेशकुमार पांडे, कुलगुरू, श्री लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ, नवी दिल्ली
६. प्रा. माखनलाल, निर्देशक, दिल्ली इन्स्टिट्यूट ऑफ हेरिटेज मॅनेजमेंट, विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशन, नवी दिल्ली
७. डॉ. जी. एन. श्रीवास्तव, भूतपूर्व अतिरिक्त महासंचालक, जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया
८. न्यायमूर्ती डॉ. मुकुंदकम शर्मा, कुलपती, लालबहादूर शास्त्री संस्कृत विद्यापीठ, दिल्ली आणि पूर्व न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालय
९. प्रा. पी. एन. शास्त्री, कुलगुरू राष्ट्रीय संस्कृत संस्थान, नवी दिल्ली
१०. प्रा. आर. सी. शर्मा, भाषाशास्त्र विभाग प्रमुख, दिल्ली विद्यापीठ
११. प्रा. के. के. मिश्रा, अधिष्ठाता, मानववंशशास्त्र विभाग, युनिव्हर्सिटी ऑफ हैदराबाद आणि पूर्व-संचालक, अँथ्रॉपॉलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया
१२. डॉ. बलराम शुक्ल, संस्कृत विभाग, दिल्ली विद्यापीठ
१३. प्रा. आझाद कौशिक, शास्त्रज्ञ आणि आंतरराष्ट्रीय विचारवंत, कॅनडा;
१४. पं. एम. आर. शर्मा, अध्यक्ष, सन्मार्ग जागतिक ब्राह्मण फेडरेशन, भारत, नवी दिल्ली
१५. संस्कृती मंत्रालयाचा एक प्रतिनिधी आणि आर्कियॉलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचा एक प्रतिनिधी.
उपरोक्त माहिती प्रल्हादसिंग पटेल, राज्यमंत्री, संस्कृती आणि पर्यटन मंत्रालय, भारत सरकार यांनी पुरवली आहे.
वरील समितीच्या आधी २०१७मध्ये श्री.महेश शर्मा, संस्कृती मंत्री असताना अशीच एक समिती नेमण्यात आली होती. त्या समितीमध्ये हेच किंवा असेच १४ सदस्य होते. त्यांची यादी पाहिली तर त्यामध्ये एकही स्त्री सदस्य, उत्तर-पूर्व किंवा दक्षिणेतील राज्यांचा एकही प्रतिनिधी, अनुसूचित जाती आणि जमातीमधील एकही अभ्यासक नाही, हे लक्षात येईल. एवढेच नव्हे तर सर्वच्या सर्व सदस्य हिंदू आहेत, हेही लक्षात येईल.
समितीची रचना पाहाता तिचा उद्देश काय असेल, याबद्दल गंभीर चिंता उपस्थित होते. ‘रॉयटर’ वृत्तसंस्थेने ६ मार्च २०१८ रोजी या समितीबद्दल एक वृत्तांत प्रसिद्ध केला होता. रूपम जैन आणि टॉम लॅसीटर या लेखकांनी नवी दिल्लीमधून कृष्णा एन दास, आदित्य कालरा आणि विपीन दास एम, भुवनेश्वर इथून जतींद्र दास आणि कोलकाता इथून सुब्रतो नागचौधरी या वार्ताहरांनी घेतलेल्या मुलाखतींच्या आधारे तो वृत्तांत तयार केला होता. जॅनेट मॅकब्राईड आणि पीटर हर्शबर्ग यांनी संपादित केलेल्या त्या वृत्तांतात २०१७मधील समितीच्या स्थापनेमागील खरा उद्देश काय असावा, हे मांडण्याचा प्रयत्न होता. त्यातील काही भाग पुढे उद्धृत केला आहे :
“नवी दिल्ली (रॉयटर्स) - गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काही भारतीय अभ्यासकांचा एक गट नवी दिल्लीच्या मध्यवर्ती भागातील पर्णराईतल्या एका शुभ्र बंगल्यामध्ये जमला होता. राष्ट्रीय इतिहासाचे पुनर्लेखन कसे करायचे, यावर त्यांनी चर्चा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘हिंदू राष्ट्रवादी’ सरकारने सहा महिन्यांपूर्वी फारसा गाजावाजा न करता एक तज्ज्ञ समिती स्थापन केली होती. त्या समितीच्या अस्तित्वाचा सविस्तर वृत्तांत आम्ही इथे प्रथमच देत आहोत.
बैठकीचे इतिवृत्त आणि सदस्यांच्या मुलाखती पाहून पुरातत्त्व विभागाने मिळवलेली माहिती आणि डीएनए संशोधन यांचा वापर करून आजचे हिंदू अनेक हजार वर्षांपूर्वी मूळचे एतद्देशीय रहिवासी असलेल्या पूर्वजांपासून व्युत्पन्न झाले आहेत, तसेच प्राचीन हिंदू पुराणग्रंथ कल्पकथा नसून वास्तवकथा आहेत, हे सिद्ध करणे, हा समितीचा मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट होते.
समितीचे सदस्य आणि मोदी सरकारमधील मंत्र्यांशी केलेल्या वार्तालापातून ‘हिंदू राष्ट्रवाद्यां’ची महत्त्वाकांक्षा १३० कोटी लोकांच्या बहुरंगी, बहू-धर्मीय देशावर राजकीय सत्ता प्रस्थापित करण्यापलीकडे जाण्याची आहे, हे सूचित होते. भारत हिंदूंचे, हिंदूंसाठी असलेले राष्ट्र आहे, हा धर्मविचार देशाची ओळख म्हणून अंतिमत: त्यांना प्रस्थापित करायचा आहे.
अनेक आगमने, आक्रमणे आणि परिवर्तने यांमधून निर्माण झालेला आधुनिक भारत एखाद्या नक्षीदार पटचित्रासारखा आहे, असे भारताचे वर्णन ब्रिटिश राजवटीच्या काळापासून केले जाते. ते वर्णन वैविध्यपूर्ण जनसमुदायाच्या वास्तवातून निर्माण झाले आहे. त्या बहुसांस्कृतिक वर्णनाला हिंदू राष्ट्रवादी आव्हान देत आहेत. बहुसंख्य लोक हिंदू आहेत हे खरे असले, तरी सुमारे २४ कोटी लोक, एकूण लोकसंख्येच्या एक पंचमांश हे मुसलमान आणि इतर धर्म मानणारे आहेत, हेही खरे आहे.
समितीचे अध्यक्ष के. एन. दीक्षित रॉयटर्सशी बोलताना म्हणाले, प्राचीन इतिहासाचे पुनर्लेखन करायला सरकारला उपयोग होईल, असा अहवाल तयार करण्याचे काम मला सांगण्यात आले आहे. संस्कृतीमंत्री महेश शर्मा यांनी एका मुलाखतीत समितीचे कार्य भारताचा एकूण इतिहास पुन्हा लिहिण्याच्या कार्याचा एक भाग असल्याचे सांगून वरील विधानाला दुजोरा दिला...
...भारताच्या इतिहासाच्या पुनर्लेखनाची चर्चा पुढे रेटण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) नावाचा एक हिंदू राष्ट्रवादी गट पुढाकार घेत आहे. २०१४मध्ये या गटाने मोदींच्या भारतीय जनता पक्षाला सत्तारूढ होण्यासाठी मदत केली होती. आजमितीला शेती, महामार्ग आणि गृह या खात्यांचे मंत्री ‘आरएसएस'चे सदस्य आहेत.
१७.२ कोटी मुस्लिमांसहित सर्व भारतीयांचे पूर्वज हिंदू होते, भारतमातेचे पुत्र म्हणून त्यांनी आपले हिंदू मूळ मान्य करायला हवे, असा ‘आरएसएस'चा आग्रह आहे. मोदी लहानपणापासून ‘आरएसएस’चे सदस्य आहेत. संस्कृतीमंत्री शर्मा त्यांच्या अधिकृत चरित्रात म्हणतात की, ते अनेक वर्षांपासून ‘आरएसएस’चे निष्ठावान अनुयायी आहेत.
‘हिंदू राष्ट्रवादी’ चळवळीच्या प्रतीकात्मक रंगाचा उल्लेख करून ‘आरएसएस’चे प्रवक्ते मनमोहन वैद्य रॉयटर्सला म्हणाले, ‘भगवा हा भारतीय इतिहासाचा खरा रंग आहे आणि सांस्कृतिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी आम्हाला इतिहास पुन्हा लिहावाच लागणार.’
‘आरएसएस’च्या इतिहास संशोधन विभागाचे प्रमुख बालमुकुंद पांडे म्हणतात की, त्यांची संस्कृतीमंत्री शर्मा यांच्याशी वारंवार भेट होते. भारताचे गतवैभव परत आणायचे असेल, तर प्राचीन भारतीय ग्रंथ मिथ्या नसून सत्य आहेत हे सिद्ध करण्याची वेळ आता आली आहे, असे ते म्हणाले.
रॉयटर्सशी बोलताना शर्मा म्हणाले की, समितीच्या निष्कर्षांना यथावकाश पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करण्यात येईल. सरकारी कागदपत्रांत समितीचा उल्लेख विद्यमान काळाच्या १२ हजार वर्षे आधी उदयाला आलेल्या भारतीय संस्कृतीचा जगातील इतर संस्कृतींच्या संदर्भात उगम आणि विकास कसा झाला, हे पूर्णतया जाणून घेण्यासाठी स्थापन केलेली समिती असा आहे.
‘आधीपासून हिंदू’ हा खरा इतिहास आहे, हे पुस्तकांमध्ये मांडण्यात येईल. केवळ ३-४ हजार वर्षांपूर्वी मध्य आशियामधून भारतात आलेल्या लोकांनी इथे संस्कृती रुजवली असे वर्षानुवर्षे शालेय पाठ्यपुस्तकांत शिकवण्यात येत आले आहे, असे शर्मा म्हणाले.
‘भारतीय संस्कृती म्हणतात त्यापेक्षा जास्त प्राचीन आहे हे पुरातत्त्वीय आणि प्राचीन ग्रंथांतल्या अन्य पुराव्यांनिशी सिद्ध करा' असे आम्हाला सांगण्यात आले आहे, असे रॉयटर्सने मुलाखत घेतलेल्या १२ पैकी ९ सदस्यांनी म्हटले. इतरांनी आपण समितीचे सदस्य असल्याचे मान्य केले पण समितीच्या कार्याविषयी बोलण्यास नकार दिला. समितीमध्ये एक भूगर्भशास्त्रज्ञ, अनेक पुरातत्त्वविशारद आणि संस्कृत भाषेचे अभ्यासक, शिवाय दोन सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील संस्कृतचे एक प्राध्यापक संतोष कुमार शुक्ल यांच्या मते भारताची हिंदू संस्कृती लाखो वर्षे पुरातन आहे. दिल्ली विद्यापीठाच्या भाषा विषयाचे भूतपूर्व प्रमुख आणि समिती सदस्य रमेशचंद्र शर्मा म्हणाले, “मी कोणत्याही विचारसरणीला बांधील नाही.” ते काटेकोरपणे शास्त्रीय दृष्टिकोनाचा अवलंब करतील.
इतिहास, पुरातत्त्व संशोधन आणि कला अखत्यारीत असणाऱ्या संस्कृती मंत्रालयाला भारतीय संघराज्याचे ४०० दशलक्ष डॉलरचे अंदाजपत्रकीय पाठबळ आहे. इतिहासाच्या पुनर्लेखनाच्या मोहिमेसाठी संस्कृती मंत्रालय एक प्रभावशाली ठिकाण आहे.
२०१४च्या मोदींच्या विजयानंतर संस्कृती-मंत्री म्हणून शर्मांची नेमणूक झाली. ते व्यवसायाने वैद्यकीय डॉक्टर असून अनेक हॉस्पिटलांच्या साखळीचे अध्यक्ष आहेत. ‘आरएसएस’कडून मला मार्गदर्शन मिळते, असे ते म्हणाले. हसतमुख आणि मनमिळाऊ असलेल्या शर्मांच्या मध्य-दिल्लीतील घरामध्ये एका बैठकीच्या खोलीच्या दारावर भारतमातेचे एक प्रतिमाचित्र आहे. त्या चित्राच्या खाली ‘आरएसएस’च्या सरसंघचालकांची चित्रे लावलेली आहेत.
गेल्या तीन वर्षांत त्यांच्या मंत्रालयातर्फे शेकडो कार्यशाळा आणि चर्चासत्रे देशभर आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्या बैठकांचा उद्देश आपल्या देदीप्यमान भूतकाळाचे वर्चस्व सिद्ध करणे आणि भारताचे पहिले पंतप्रधान नेहरू आणि त्यांच्या नंतरच्या सरकारांनी बहुतांश स्वातंत्र्योत्तर इतिहासकाळात चालवलेल्या उदारमतवादी सेक्युलर विचाराला उत्तर म्हणून नवीन ताजे कथन तयार करणे असा आहे.”
...........................................................................................................................................
या तज्ज्ञ मंडळींनी केलेल्या कामगिरीतून कोणती गोष्ट स्पष्ट होत असेल? तर ती ही की, संस्कृत भाषेचा उदय सिंधू संस्कृतीच्या नंतरच्या काळातला आहे. हरप्पन संस्कृती आणि वेदिक संस्कृती यांच्यामध्ये एक सातत्य दाखवण्याचा ‘आरएसएस’चा आटापिटा अनाठायी आहे. वर उल्लेखलेल्या डेव्हिड राईश अभ्यास-गटाच्या निष्कर्षांनुसार संस्कृत ही इंडो-आर्यन भाषा बोलणारे लोक हरप्पा संस्कृती लयाला गेल्यावर अनेक शतकांनी मध्यवर्ती आशियाई युरोपच्या गवताळ मैदानी प्रदेशातून (युरेशियन स्टेपी) भारताकडे आले, हे स्पष्ट होते. ‘आरएसएस'पुरस्कृत इतिहासलेखनात संस्कृत भाषिक आर्य लोक भारताकडून जगात त्या काळी प्रसिद्ध असलेल्या वेगवेगळ्या भागात गेले, असा आग्रह दिसतो. त्यांच्या प्रमेयकाला ना पुरातत्त्वीय आधार, ना जनुकशास्त्रीय पुरावा आहे. पुढे उद्धृत केलेल्या सारांशामध्ये डेव्हिड राईश यांनी ‘आरएसएस’च्या सिद्धान्ताच्या नेमकी उलट मांडणी केली आहे.
...........................................................................................................................................
भारतीय भूतकाळाचे पुनर्कथन करण्यासाठी ‘आरएसएस’ जनुकशास्त्र आणि पुरातत्त्वशास्त्र या दोन शास्त्रांचा आधार घेऊ पाहात आहे. आधीच हवे असलेले निष्कर्ष मांडून त्यांच्या पुष्ठ्यर्थ या दोन शास्त्रांच्या संशोधनातील काही पूर्णपणे सिद्ध न झालेले पुरावे निवडून ते उद्धृत करण्यात ‘आरएसएस'ने हातखंडा मिळवला आहे. ते वरदेखले पुरावे समाजमाध्यमांवर वावरणाऱ्या, सहज फसतील अशा लोकांमध्ये फिरवले जातात. बनावट दाव्यांचे सर्रास चलन होत असल्यामुळे विज्ञाननिष्ठ विचारवंत व्यथित झाले आहेत.
सप्टेंबर २०१९मध्ये हार्वर्ड विद्यापीठाच्या वैद्यकशास्त्र विभागाचे डेव्हिड राईश आणि जगभरातील इतर अनेक प्रथितयश विद्यापीठांमधील मान्यवर शास्त्रज्ञ दक्षिण आशियातील पूर्वेतिहासिक जनसमूहांचा ठोस अहवाल तयार करण्यासाठी एकत्र आले. ‘सायन्स' नियतकालिकामध्ये त्यांचा अहवाल प्रसिद्ध झाला. निरनिराळ्या सहभागी विद्यापीठांनीसुद्धा आपापल्या संकेतस्थळांवर तो अहवाल प्रसृत केला. त्या अहवालाचे एकूण ११७ सहलेखक आहेत.
या सर्व तज्ज्ञ मंडळींनी केलेल्या कामगिरीतून कोणती गोष्ट स्पष्ट होत असेल? तर ती ही की, संस्कृत भाषेचा उदय सिंधू संस्कृतीच्या नंतरच्या काळातला आहे. हरप्पन संस्कृती आणि वेदिक संस्कृती यांच्यामध्ये एक सातत्य दाखवण्याचा ‘आरएसएस’चा आटापिटा अनाठायी आहे. वर उल्लेखलेल्या डेव्हिड राईश अभ्यास-गटाच्या निष्कर्षांनुसार संस्कृत ही इंडो-आर्यन भाषा बोलणारे लोक हरप्पा संस्कृती लयाला गेल्यावर अनेक शतकांनी मध्यवर्ती आशियाई युरोपच्या गवताळ मैदानी प्रदेशातून (युरेशियन स्टेपी) भारताकडे आले, हे स्पष्ट होते. ‘आरएसएस'पुरस्कृत इतिहासलेखनात संस्कृत भाषिक आर्य लोक भारताकडून जगात त्या काळी प्रसिद्ध असलेल्या वेगवेगळ्या भागात गेले, असा आग्रह दिसतो. त्यांच्या प्रमेयकाला ना पुरातत्त्वीय आधार, ना जनुकशास्त्रीय पुरावा आहे. पुढे उद्धृत केलेल्या सारांशामध्ये डेव्हिड राईश यांनी ‘आरएसएस’च्या सिद्धान्ताच्या नेमकी उलट मांडणी केली आहे.
दक्षिण आणि मध्य आशियामधील जनसमूहांची घडण
प्रास्ताविक भूमिका : युरेशियामधील शेती, पशुपालन आणि भाषांच्या प्रसरणामधील बदल यांसारख्या महत्त्वाच्या सांस्कृतिक परिवर्तनांची व्याप्ती आणि अनुषंगिक जनसमूहांचे स्थलांतरण विशद करण्यासाठी आम्ही गेल्या आठ हजार वर्षांच्या कालावधीतील ५२३ व्यक्तींचा समग्र जनुकीय माहितीवृत्तांत सादर करीत आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने मध्य-आशिया आणि दक्षिण-आशियाचा उत्तरी प्रदेश इथून मिळवलेल्या माहितीचा समावेश आहे.
निष्कर्ष : शेतीचा उदय झाल्यानंतर सुरू झालेल्या जनसमूहांच्या स्थलांतरांच्या परिणामी संपूर्ण युरेशियामध्ये प्रवाही जनुकीय उतारक्रम (जेनेटिक ग्रेडियंट) तयार झाल्याचे आढळले. त्या उतारक्रमाच्या आधारे सात अत्यंत भिन्न जनसमूहांचे एक प्रारूप तयार होते. युरेशियाच्या नैऋत्य भागात अश्मयुगात सुरू होऊन कांस्ययुगात टिकून राहिलेला एक महत्त्वाचा जनुकीय समूह आढळतो. त्यामध्ये पश्चिम भागात अनाटोलियन कृषकांशी संबंधित पूर्वजांचे गुणविशेष अधिक आढळले तर पूर्वेच्या भागात इराणी कृषक-पूर्वजांचे गुणविशेष जास्त असल्याचे आढळले. मुख्य प्रवाह मध्य आशियातील वाळवंटी मरुद्यानी प्रदेशातही (डेझर्ट ओॲसिस) पोहोचल्याचे दिसते. या स्रोताचे वंशज कांस्ययुगातील बॅक्ट्रिया-मार्जियाना (सध्याच्या अफगाणिस्तान-ताजिकिस्तान) पुरातत्त्वीय संकुलामधील (बीएमएसी) अवशेषांमध्ये सापडले. निरनिराळ्या केंद्रांतून अनेक प्रवाह निघून ठिकठिकाणच्या संकुलांत स्थिरावले (मल्टिपल सेंटर्स ऑफ डोमेस्टिकेशन) असावेत, या पुरातत्त्वीय मूळ निष्कर्षाला जोड देणारा हा जनुकशास्त्रीय पुरावा आहे.
‘बीएमएसी'मधील मुख्य जनसमूहामध्ये स्टेपीमधील पशुपालक पूर्वजांचा जनुकीय आराखडा फारसा आढळला नाही आणि म्हणून त्यांचे वारस नंतर दक्षिण आशियामध्ये दिसत नाहीत. तथापि, ‘बीएमएसी'च्या बाह्य परिघामध्ये स्टेपीमधील पशुपालक जनसमूहाचा जनुकीय आराखडा इस.पू. (इसवी सनापूर्वी) दुसऱ्या सहस्रकामध्ये पोहोचल्याचे आढळले. तसाच आराखडा दक्षिण स्टेपी प्रदेशात त्याच कालखंडात आढळला. दक्षिण आशियाच्या सर्वाधिक उत्तरेला असलेल्या स्वात खोऱ्यामधील प्राचीन व्यक्तींच्या जनुकीय माहितीच्या आधारे स्टेपी पूर्वज पुढे जात इस.पू. दुसऱ्या सहस्रकात दक्षिण आशियात सामावून गेले. दक्षिण आशियातील आधुनिक जनसमूहाच्या पूर्वजांमध्ये त्यांचा ३० टक्के जनुकीय वाटा असल्याचे आढळले. दक्षिण आशियाई जनसमूहांच्या पूर्वजांचे स्टेपी पूर्वजांशी असलेले साधर्म्य लक्षात घेता त्या स्थलांतराचा दोन्ही प्रदेशांवर प्रभाव पडला असावा. इंडो-इराणी आणि बाल्टो-स्लाव्हिक समानधर्मी भाषा त्या पूर्वज जनसमूहांच्या स्थलांतराच्या जोडीने बनत गेल्या असाव्यात.
हॉलोसीन कालखंडाच्या (पृथ्वीवरील सर्वात अलीकडच्या मोठ्या हिमयुगानंतरचा काळ) सुरुवातीच्या इराण आणि दक्षिण आशियाई भूप्रदेशामधील जनसमूहांच्या संमिश्रणातून आधुनिक दक्षिण आशियातील जनसमूहांचे पूर्वज तयार झाले, असा निष्कर्ष परिघावरील दोन पुरातत्त्वीय स्थळांमधील माहितीच्या आधारे निघतो. हे लोक सिंधु खोऱ्यातील संस्कृतीच्या (आयव्हीसी - इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन) संपर्कात येऊन आयव्हीसी जनसमूह तयार झाले असणे शक्य आहे. सिंधू संस्कृतीचा ऱ्हास झाल्यानंतर तेथील जनसमूहांचा एक गट स्टेपी पूर्वज असलेल्या नैऋत्य प्रांतातील समूहांच्या संपर्कात येऊन उत्तर भारतीयांचे पूर्वज (Ancestral North Indians: ANI - एएनआय) हा जनसमूह तयार झाला. दुसरा गट आग्नेय दिशेकडच्या जनसमूहांच्या संपर्कात येऊन दाक्षिणात्य भारतीयांचे पूर्वज (Ancestral South Indians: ASI - एएसआय) हे जनसमूह तयार झाले, जे सध्याच्या दक्षिण भारतीय आदिवासी गटांचे प्रत्यक्ष पूर्वज आहेत. सिंधू संस्कृतीचा ऱ्हास झाल्यानंतर एएनआय आणि एएसआय या दोन्ही जनसमूहांच्या संमिश्रणातून दक्षिण आशियातला मुख्य जनुकीय आराखडा तयार झाला.
निष्कर्ष : इस.पू. तिसऱ्या सहस्रकापासून स्टेपी प्रदेशातून सुरू झालेल्या जनसमूहांच्या स्थलांतराच्या प्रवाहाला धरून इंडो-युरोपीय भाषांचे प्रसारण कसे झाले असावे, याची नोंद आधीच्या अभ्यासांमध्ये घेण्यात आली होती. त्या निष्कर्षांना समांतर जाणारे पुरावे आम्ही केलेल्या जनुकीय पाहाणीत आढळले. स्टेपी प्रदेशातून दक्षिण आशियाकडे जनसमूहांच्या प्रवासाचा कालघटनाक्रम आणि त्यातून इंडोयुरोपीय भाषांचे संक्रमण कसे झाले असावे, हे दिसते.
...........................................................................................................................................
गेली अनेक दशके सांस्कृतिक मंत्रालयाच्या अखत्यारीत कार्य करणाऱ्या भारत मानववंशशास्त्रीय सर्वेक्षण संस्थेमध्ये (अँथ्रोपोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया) आणि जनसमूहांचा जनुकीय आणि मानववंशशास्त्रीय अभ्यास करणाऱ्या इतर अनेक संस्थांमध्ये काम करणाऱ्या शास्त्रज्ञांनी अपार परिश्रम घेऊन अनेक भारतीय जनसमूहांमधील व्यक्तींचे, ज्यांमध्ये आदिवासी जमातींचाही समावेश आहे, डीएनए गोळा करून त्यांच्यावर संशोधन केले आहे. त्या संशोधनानुसार जवळजवळ आजचा प्रत्येक जनसमूह अनेक पूर्वज-समूहांच्या संमिश्रणामधून तयार झाल्याचा निष्कर्ष निघाला आहे. त्या पूर्वज जनसमूहांच्या ओळखीसंबंधी फार तर आपण काही अंदाज बांधू शकतो, पण त्यांची नेमकी ओळख खात्रीलायकरीत्या सांगता येणार नाही. सांस्कृतिक मंत्रालयाला या नवीन प्रकल्पाच्या माध्यमातून काय सिद्ध करायचे आहे, ते आम्हाला माहीत नाही. परंतु त्यांचा उद्देश वांशिक शुद्धता निर्धारित करणे हा असेल तर त्याच्या परिणामी भारतीयांमध्ये बेबनाव तयार होईल, हे नक्की.
...........................................................................................................................................
हिंदुत्ववादी इतिहासलेखनामधून व्यक्त होणारे अवैज्ञानिक दृष्टिकोन आणि दावे यांमुळे व्यथित झालेल्या अनेक शास्त्रज्ञांच्या आक्रोशाचे हेच एक उदाहरण आहे असे नाही. जून २०२२मध्ये ‘न्यू इंडियन एक्स्प्रेस’ वर्तमानपत्रात संस्कृती मंत्रालयाने शुद्ध जातींची जनुकीय खातरजमा करण्याच्या उद्देशाने मानववंशशास्त्रीय सर्वेक्षणासाठी निधी पुरवल्याचे एक वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्या प्रस्तावामुळे शुद्ध वंशाच्या नाझी प्रकल्पाच्या भयाण स्मृती जाग्या होऊन व्यथित झालेल्या शास्त्रज्ञांनी मोठ्या संख्येने ताबडतोब तीव्र प्रतिक्रिया दिली. काही दिवसातच संस्कृती मंत्रालयाला त्यांनी एक खुले पत्र लिहिले. त्यावर शंभरहून अधिक सह्या होत्या. त्यामध्ये देशातल्या आघाडीच्या शास्त्रीय आणि तंत्रवैज्ञानिक संस्थांच्या नामवंत प्राध्यापकांचा समावेश होता. संस्कृती मंत्रालयाच्या सचिवांना त्यांनी लिहिलेले पत्र बोलके आहे :
(१० जानेवारी २०२२) भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाने भारतीय जनसमूहांच्या वेगवेगळ्या गटांचे अनुवंशशास्त्रीय वर्गीकरण करून त्यांच्यातील डीएनएचे साधर्म्य आणि फरक अभ्यासण्यासाठी एका प्रकल्पाला निधीपुरवठा करण्याचे वृत्त माध्यमांमध्ये अलीकडे प्रसिद्ध झाले आहे. संस्कृती मंत्रालयाने ट्वीट करून असे म्हटले आहे की, ‘हे वृत्त दिशाभूल करणारे, खोडसाळ असून वास्तवाला धरून नाही. भारतातील वेगवेगळ्या वंशांच्या शुद्धतेचा तपास घेऊन त्यांचा अनुवंशशास्त्रीय इतिहास निश्चित करण्याचा या प्रकल्पाचा अजिबात हेतू नाही.' या खुलाशाचे आम्ही स्वागत करतो. पण त्याच वेळी संबंधितांनी वंशविषयक, विशेषकरून वांशिक शुद्धतेसंबंधी आत्ताच्या आणि पुढच्या काळात कोणतेही प्रकल्प करणार नाही असे जाहीर करावे. भारतात किंवा अन्य कुठेही वांशिक शुद्धतेचा मागोवा घेण्याची कल्पना अत्यंत चिंताजनक आहे, म्हणूनच आम्ही असे सुचवत आहोत. अशी कोणतीही योजना विवेकशून्य आणि धोकादायक ठरेल.
कारण जीवशास्त्रीयदृष्ट्या मनुष्यजातीची वांशिक विभागणी खूप पूर्वीच बाद झाली आहे. हाडांची रचना, त्वचेचा रंग यासारखे शारीरिक गुणधर्म, श्रद्धा आणि धर्म यांसारखी सामाजिक वैशिष्ट्ये यांच्या आधारे मनुष्यजातीची विभागणी करण्यासाठी वंश (race) या संज्ञेची निर्मिती करण्यात आली होती. अशी विभागणी येनकेनप्रकारेण नैसर्गिक आहे किंवा त्या विभागाणीला जीवशास्त्रीय मान्यता आहे असे गृहीत धरले गेले.
वास्तविक पाहाता कुठल्याही मानवाची आनुवंशिक जीवशास्त्रीय घडण सबंध मानवजातीच्या बाबतीत एकाच जनुकीय समुच्चयातून (gene pool) झाली आहे. जनुकांमुळे घडून येणारे शारीरिक वैशिष्ट्यांचे फरक एकाच वंशाचे समजले जाणाऱ्या गटातच होतात. तथाकथित वेगवेगळ्या वंशाच्या जनुकीय घडणीमध्ये कोणताही फरक असल्याचे आढळलेले नाही, असे ५० वर्षांपूर्वीच एका युगप्रवर्तक संशोधनामध्ये सिद्ध झाले आहे. नंतरच्या संशोधनांमध्ये या निष्कर्षाला पुष्टीच मिळाली आहे.
...धोकादायक म्हणण्याचे कारण असे की शुद्धता हा शब्दप्रयोग याबाबतीत निरर्थक तर आहेच, पण तो वापरला तर काही समाजगट इतरांपेक्षा कमी किंवा जास्त शुद्ध ठरवले जाणार असे त्यातून सूचित होते. इतिहासात याबाबतीत भयानक अन्याय झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. कमी शुद्ध ठरवले गेलेल्या समाजगटांना अधिक शुद्ध ठरवलेले गट सवलती नाकारतात किंवा त्यांचा छळ करतात... मनुष्यांवर वांशिक शिक्के मारणे त्याज्य ठरले आहे आणि तसे करण्याच्या प्रथा भारतात पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न अजिबात होऊ देता नयेत.
गेली अनेक दशके सांस्कृतिक मंत्रालयाच्या अखत्यारीत कार्य करणाऱ्या भारत मानववंशशास्त्रीय सर्वेक्षण संस्थेमध्ये (अँथ्रोपोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया) आणि जनसमूहांचा जनुकीय आणि मानववंशशास्त्रीय अभ्यास करणाऱ्या इतर अनेक संस्थांमध्ये काम करणाऱ्या शास्त्रज्ञांनी अपार परिश्रम घेऊन अनेक भारतीय जनसमूहांमधील व्यक्तींचे, ज्यांमध्ये आदिवासी जमातींचाही समावेश आहे, डीएनए गोळा करून त्यांच्यावर संशोधन केले आहे. त्या संशोधनानुसार जवळजवळ आजचा प्रत्येक जनसमूह अनेक पूर्वज-समूहांच्या संमिश्रणामधून तयार झाल्याचा निष्कर्ष निघाला आहे. त्या पूर्वज जनसमूहांच्या ओळखीसंबंधी फार तर आपण काही अंदाज बांधू शकतो, पण त्यांची नेमकी ओळख खात्रीलायकरीत्या सांगता येणार नाही. सांस्कृतिक मंत्रालयाला या नवीन प्रकल्पाच्या माध्यमातून काय सिद्ध करायचे आहे, ते आम्हाला माहीत नाही. परंतु त्यांचा उद्देश वांशिक शुद्धता निर्धारित करणे हा असेल तर त्याच्या परिणामी भारतीयांमध्ये बेबनाव तयार होईल, हे नक्की.
ती बातमी खोटी आहे असे मंत्रालयाचे म्हणणे आहे. परंतु एएसआयने (Anthropological Survey of India) काही आदिवासी गटांचे नमुने गोळा करून अभ्यासायला सुरुवात केली असल्याचे कळते. हे आदिवासी गट अतिप्राथमिक म्हणून ओळखले जातात. त्याचा अर्थ असा की, पिढ्यानपिढ्या, दीर्घ काळ त्यांचे वास्तव्य भारतातले असावे. नंतर जून २०२२मध्ये ‘द टेलिग्राफ' वर्तमानपत्रात यासंबंधी मी एक लेख लिहिला :
...........................................................................................................................................
वांशिक शुद्धता या कुरूप शब्दप्रयोगाचे भारतात २०२२मध्ये पुनरुत्थापन होत आहे, ही धक्कादायक बाब आहे. ‘न्यू इंडियन एक्स्प्रेस’च्या १ जूनच्या बातमीनुसार सांस्कृतिक मंत्रालयाने डीएनए संशोधनाचे साहित्य आणि उपकरणे यांसाठी निधी पुरवला. त्या संशोधनाचा उद्देश जनुकीय इतिहास आणि भारतातील वांशिक शुद्धता यांचा मागोवा घेणे हा आहे. ज्या शास्त्रज्ञाच्या पुढाकाराने हा प्रकल्प राबवला जाणार आहे, त्याच्या म्हणण्याप्रमाणे, भारतीय जनसमूहांमध्ये गेल्या दहा हजार वर्षांत जनुकांचे उत्परिवर्तन (म्युटेशन) आणि संमिश्रण कसे होत गेले, हे आम्हाला पहायचे आहे. एकूण प्रकार कालबाह्य असून वंशाची कल्पना धोकादायक आहे आणि जनुकीय विज्ञानानुसार अवैज्ञानिक आहे, असे त्या निवेदनात म्हटले आहे. त्या निवेदनकर्त्यांमध्ये अनेक नावाजलेल्या शास्त्रज्ञांचा आणि इतिहासकारांचा समावेश आहे. तो प्रकल्प घटनाबाह्य असून अंगावर काटा उभा करणारा आहे. भारताच्या संदर्भात वांशिक शुद्धता म्हणजे नेमके काय असणार आहे? वांशिक शुद्धतेचे लक्ष्य परजातीय संकराच्या भीतीने ग्रासलेली जातिव्यवस्था आहे की, मध्ययुगीन काळामध्ये स्थलांतर करून भारताकडे आलेले लोक हे लक्ष्य आहे? सध्याच्या राजवटीला काही नागरिकांना दुय्यम दर्जा देण्यासाठी जनुकीय परीक्षेची गरज नाही. समाजात दुफळी माजवण्याचे इतर मार्ग त्यांनी शोधलेच आहेत.
...........................................................................................................................................
जनुक तपासणी म्हणजे द्वेषाला चिथावणी
‘सायन्स’ नियतकालिकामध्ये सप्टेंबर २०१९च्या अंकात दक्षिण आशियाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा एक शोधनिबंध प्रकाशित झाला. दक्षिण आणि मध्य आशियातील जनसमूहांची घडण हे त्या निबंधाचे शीर्षक होते (Science Vol. 365, No. 6457). शेकडो ‘प्राचीन मानव' व्यक्तींचा जनुकीय अभ्यास प्रस्तुत लेखात मांडण्यात आला आहे. २०पेक्षा अधिक देशांतील सर्वोत्तम विज्ञानसंस्थांमधून १०८ शास्त्रज्ञ या अभ्यासासाठी एकत्र आले होते. त्यांनी त्यात असे म्हटले आहे की, हॉलोसीन कालखंडाच्या सुरुवातीच्या काळात मध्य-आशियाच्या सीमाप्रदेशातून इराण आणि दक्षिण आशियातील दोन वेगळे जनसमूह सिंधू खोऱ्यामधील संस्कृतीच्या संपर्कात आले आणि आधुनिक दक्षिण आशियाई जनसमूहांचे पूर्वज त्या संमिश्रणातून तयार झाले. आयव्हीसी लयाला गेल्यानंतर या जनसमूहाचे नैर्ऋत्येकडील स्टेपी प्रदेशातून आलेल्या जनसमूहांशी संमिश्रण होऊन उत्तर भारतीयांचे पूर्वज-जनसमूह (Ancestral North Indians - ANI) तयार झाले, तर स्टेपी प्रदेशाच्या आग्नेय दिशेकडून आलेल्या जनसमूहांशी ‘आयव्हीसी'मधील दुसऱ्या जनसमूहाचे संमिश्रण होऊन दक्षिण भारतीयांचे पूर्वज-जनसमूह (Ancestral South Indians - ASI) तयार झाले. गेल्या काही वर्षांत या निष्कर्षांच्या आधाराने इतर शास्त्रज्ञांनी नवे पुरातत्त्वीय आणि जनुकीय संशोधन केले आहे.
अशा प्रकारचे तांत्रिकदृष्ट्या क्लिष्ट, सखोल वैज्ञानिक संशोधन सहसा सामान्य नागरिकांच्या नजरेबाहेर राहते. असे असले तरी हे संशोधन लक्षणीय आहे. त्याचे मुख्य कारण असे की, सुसंस्कृत जगाने ज्या प्रक्षोभक शब्दांचा त्याग केला आहे, ते शब्द भारतात पुनरुज्जीवित करण्यात येत आहेत. त्यांपैकी ‘शुद्ध’ हा एक मोठा शब्द आहे. वरकरणी त्यामध्ये आक्षेपार्ह काहीच नाही. अन्न, पेय, दागिन्यांचे मौल्यवान धातू यांची भेसळविरहित स्थिती दर्शवण्यासाठी तो वापरला जातो. सर्व भाषांमध्ये एक सोडून सर्व बाबतीत त्याच अर्थाने तो वापरला जातो. युजेनिक्स - सुप्रजननविज्ञान याबाबतीत अपवाद आहे. हे विज्ञान अनैतिक विज्ञान म्हणून धिक्कारले जाते. ‘शुद्ध’ आणि ‘अशुद्ध’ ही विशेषणे ‘रक्ताशी' जोडून वंशवादी विचारसरणीचा पाया रचला जातो.
जर्मन भाषेमध्ये १९३०च्या दशकात ‘शुद्ध आर्यन रक्ताचे नसलेल्या' लोकांसाठी ‘उंटेरमेनशेन' (निम्न दर्जाचे मानव) हा शब्द सर्रास वापरात होता. त्याला आता ९०हून अधिक वर्षे उलटून गेली आहेत. परंतु त्या शब्दाच्या सामाजिक परिणामामुळे झालेल्या भयानक शोकांतिकेमधून अजूनही जग सावरलेले नाही. असे शब्दप्रयोग केवळ अवैज्ञानिक होते आणि अनैतिक राजकारणाचे द्योतक होते असे नाही, तर प्रत्यक्षामध्ये लाखो निष्पाप लोकांना छळछावण्यांमध्ये पाठवण्यासाठी आणि मृत्यूच्या ढिगाऱ्यात गाडून टाकण्यासाठी एक वैचारिक हत्यार बनले. १९व्या शतकातील जोहान फित्शे यांच्या ‘फोकिश नॅशनॅलिझम' (सामूहिक राष्ट्रवाद) या पुस्तकातील विचार, सामाजिक पुनर्रचना करण्यासाठी ‘युजेनिक्स'चा वापर करण्याचा प्रस्ताव, हिटलरची स्टॉर्म ट्रूपर ही स्वयंसेवकांची झंझावाती फौज आणि जर्मनीचे तंत्रवैज्ञानिक सामर्थ्य या चार खांबांवर हिटलरवाद फोफावला.
सर्बियन, पोलिश, ज्यू, जिप्सी, आशियाई लोक हे ‘शुद्ध आर्य रक्ता’चे लोक नाहीत, म्हणून त्यांना जगण्याचा अधिकार नाही, असे म्हणत हिटलरने त्यांच्या विरोधात हिंसेचे आणि क्रौर्याचे समर्थन केले. राज्यावर आल्यानंतर दोन वर्षांत हिटलरने ज्यू लोकांना सैन्यात भरतीसाठी मनाई केली आणि त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात जर्मन रक्त आणि प्रतिष्ठा अबाधित ठेवण्यासाठी सर्वात लाजिरवाणा असा कायदा केला. शुद्ध रक्ताचे जर्मन आणि अशुद्ध ज्यू यांच्यामध्ये विवाह आणि लैंगिक संबंध कायद्यान्वये गुन्हा ठरवण्यात आले.
वांशिक शुद्धता या कुरूप शब्दप्रयोगाचे भारतात २०२२मध्ये पुनरुत्थापन होत आहे, ही धक्कादायक बाब आहे. ‘न्यू इंडियन एक्स्प्रेस’च्या १ जूनच्या बातमीनुसार सांस्कृतिक मंत्रालयाने डीएनए संशोधनाचे साहित्य आणि उपकरणे यांसाठी निधी पुरवला. त्या संशोधनाचा उद्देश जनुकीय इतिहास आणि भारतातील वांशिक शुद्धता यांचा मागोवा घेणे हा आहे. ज्या शास्त्रज्ञाच्या पुढाकाराने हा प्रकल्प राबवला जाणार आहे, त्याच्या म्हणण्याप्रमाणे, भारतीय जनसमूहांमध्ये गेल्या दहा हजार वर्षांत जनुकांचे उत्परिवर्तन (म्युटेशन) आणि संमिश्रण कसे होत गेले, हे आम्हाला पहायचे आहे.
त्यापुढे जाऊन ते म्हणतात, त्यानंतर आम्हाला जुनकीय इतिहासाचे स्वच्छ आकलन होईल. भारतातील वांशिक शुद्धतेचा मागोवा घेण्याच्या कामी त्या संशोधनाचा उपयोग आहे, असेही आपल्याला म्हणता येईल. सांस्कृतिक मंत्रालयाने बातमी खोटी असल्याचे तत्परतेने जाहीर केले. वरील विधान करणाऱ्या शास्त्रज्ञाने बातमीतून अंग काढून घेतले व आपल्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला असे म्हटले. पण मूळ विधान आणि नंतर झालेले खंडन हे लक्षात घेऊन भारतातल्या नावाजलेल्या शास्त्रज्ञांनी संयुक्तपणे एक निवेदन प्रसिद्ध केले.
एकूण प्रकार कालबाह्य असून वंशाची कल्पना धोकादायक आहे आणि जनुकीय विज्ञानानुसार अवैज्ञानिक आहे, असे त्या निवेदनात म्हटले आहे. त्या निवेदनकर्त्यांमध्ये अनेक नावाजलेल्या शास्त्रज्ञांचा आणि इतिहासकारांचा समावेश आहे. तो प्रकल्प घटनाबाह्य असून अंगावर काटा उभा करणारा आहे. भारताच्या संदर्भात वांशिक शुद्धता म्हणजे नेमके काय असणार आहे? वांशिक शुद्धतेचे लक्ष्य परजातीय संकराच्या भीतीने ग्रासलेली जातिव्यवस्था आहे की, मध्ययुगीन काळामध्ये स्थलांतर करून भारताकडे आलेले लोक हे लक्ष्य आहे? सध्याच्या राजवटीला काही नागरिकांना दुय्यम दर्जा देण्यासाठी जनुकीय परीक्षेची गरज नाही. समाजात दुफळी माजवण्याचे इतर मार्ग त्यांनी शोधलेच आहेत.
...........................................................................................................................................
हिटलर सत्तेवर येण्याच्या अर्धशतक आधीपासून आर्यांच्या इतिहासपूर्वकालीन वास्तव्यस्थानाबद्दल अशाच तऱ्हेचे वेगवेगळे विचार मांडायला सुरुवात झाली होती. शंभराहून अधिक उत्तमोत्तम शास्त्रज्ञांच्या समूहाने असे अवाजवी दावे खोडले असूनसुद्धा तीच खेळी पुन्हा खेळली जात आहे. ‘आरएसएस’ने त्यांच्या आग्रही सांस्कृतिक मांडणीसाठी एक वाळूचा किल्ला बांधला आहे. सांस्कृतिक मंत्रालयाला त्यासाठी मिथ्या-विज्ञानाचा देखावा तयार करायचा आहे का? त्या प्रकल्पामुळे आदिवासींचे सांस्कृतिक स्थान हिरावले जाईल, विज्ञान एका अवैध कामासाठी वापरले जाईल, इतकेच नव्हे तर तथाकथित शुद्ध आणि अशुद्ध नागरिकांमधील सामाजिक भेदभावाला वैधता मिळेल. जनुकीय चाचणी करता करता शाब्दिक चिथावणी सुरू होईल आणि घटनेने बहाल केलेले समान नागरिकत्व द्वेष आणि ढळढळीत अन्याय यांमध्ये गुरफटून जाईल. शुद्ध हे काही केवळ एक निष्पाप विशेषण नाही. वंशाशी जोडले तर ते दुष्ट बनू शकते. सुसंस्कृत समाजामध्ये अशा कोणत्याही प्रकल्पाला थारा न देण्याचे जाहीर आश्वासन सांस्कृतिक मंत्रालय लोकांना देईल, अशी आशा आपण करू या.
...........................................................................................................................................
जनुकीय चाचणीसाठी निवडलेल्या ‘जनसमूहांची' यादी पाहिली तर या प्रकल्पाच्या मुळाशी काय आहे, याचा सहज बोध होईल. महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्याचे नेहाली लोक, अंदमान बेटांतील जारवा आणि निकोबारी तसेच ओरिसामधील मालपहाडी आणि कोंढ अशा मुख्यत्वेकरून विलग पडलेल्या भाषागटांचा त्यामध्ये समावेश आहे.
वीसेक वर्षांपूर्वी बहुराष्ट्रीय औषधकंपन्या अशाच ‘विशुद्ध पेशीं’च्या शोधात होत्या. ‘विशुद्ध पेशी’ नाही मिळाल्या म्हणून तो शोध मिथ्या भ्रमंती ठरला होता. जनुकशास्त्रामध्ये ही गोष्ट सिद्ध झाली असताना पुन्हा या प्रकल्पामध्ये आदिवासींची तपासणी कशासाठी? मातेकडून (स्त्रीबीज) येणारा सामायिक मायटोकाँड्रियल डीएनए भारतातील वेगवेगळ्या जनसमूहांमध्ये असल्याचे आढळले आहे. तसाच तो या विलग पडलेल्या गटातही असल्याचे आढळले तर ते आदिवासी इथले मूळ निवासी नाहीत हे सिद्ध होईल.
ते सिद्ध झाले तर हडप्पा (आयव्हीसी) पूर्वकाळात संस्कृत बोलणारे लोक भारतातून पश्चिमेकडे, उर्वरित आशियामध्ये आणि उत्तरेकडे स्टेपी भूप्रदेशात स्थलांतर करते झाले, या अवैज्ञानिक दाव्याचा प्रचार करण्याचा मार्ग मोकळा होईल. सिंधू खोऱ्यातील संस्कृतीच्या काळापासून संस्कृत भाषा प्रचलित होती, असा इतिहास सिद्ध करण्याचा ‘आरएसएस'ला ध्यास लागला आहे. संस्कृत भाषा भारतात प्रथम विकसित झाली आणि तिचा प्रभाव इतरत्र पसरून भारताबाहेर अनेक भाषा निर्माण झाल्या, यासंबंधी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही.
हिटलर सत्तेवर येण्याच्या अर्धशतक आधीपासून आर्यांच्या इतिहासपूर्वकालीन वास्तव्यस्थानाबद्दल अशाच तऱ्हेचे वेगवेगळे विचार मांडायला सुरुवात झाली होती. शंभराहून अधिक उत्तमोत्तम शास्त्रज्ञांच्या समूहाने असे अवाजवी दावे खोडले असूनसुद्धा तीच खेळी पुन्हा खेळली जात आहे. ‘आरएसएस’ने त्यांच्या आग्रही सांस्कृतिक मांडणीसाठी एक वाळूचा किल्ला बांधला आहे. सांस्कृतिक मंत्रालयाला त्यासाठी मिथ्या-विज्ञानाचा देखावा तयार करायचा आहे का? त्या प्रकल्पामुळे आदिवासींचे सांस्कृतिक स्थान हिरावले जाईल, विज्ञान एका अवैध कामासाठी वापरले जाईल, इतकेच नव्हे तर तथाकथित शुद्ध आणि अशुद्ध नागरिकांमधील सामाजिक भेदभावाला वैधता मिळेल. जनुकीय चाचणी करता करता शाब्दिक चिथावणी सुरू होईल आणि घटनेने बहाल केलेले समान नागरिकत्व द्वेष आणि ढळढळीत अन्याय यांमध्ये गुरफटून जाईल.
शुद्ध हे काही केवळ एक निष्पाप विशेषण नाही. वंशाशी जोडले तर ते दुष्ट बनू शकते. सुसंस्कृत समाजामध्ये अशा कोणत्याही प्रकल्पाला थारा न देण्याचे जाहीर आश्वासन सांस्कृतिक मंत्रालय लोकांना देईल, अशी आशा आपण करू या.
सुरुवातीला मी तामिळनाडूच्या आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मंत्र्यांची, तसेच पश्चिम बंगाल सरकारच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. दोन्ही सांस्कृतिक मंत्र्यांबरोबर माझ्या दीर्घ बैठका झाल्या. त्यामध्ये ‘आरएसएस’प्रणित प्रकल्पाला उत्तरादाखल अहवाल तयार करण्यासाठी स्वतंत्र समित्या तयार कराव्यात, अशी चर्चा झाली. दोघांनीही त्या कल्पनेचे स्वागत केले. तथापि, या पाठपुराव्यासाठी वाटतो त्यापेक्षा जास्त वेळ लागेल हे लक्षात आल्यानंतर आपण स्वत:च वैज्ञानिक दृष्टीने एक अहवाल तयार करण्यासाठी संशोधकांचा एक गट बनवणे आवश्यक आहे, असे मला जाणवले.
कामाची तातडी लक्षात घेऊन अमेरिकेतील इतिहासाचे अध्यापक प्रा. राजमोहन गांधी आणि प्रा विनय लाल यांना पत्र लिहून भारताच्या गतकाळासंबंधी एक अहवाल तयार करण्यासाठी अभ्यासकांचा एक गट एकत्र करता येईल का, असे विचारले. ऑक्टोबर २०२०मधली ही गोष्ट आहे. दोघांनाही या कामाचे महत्त्व पटले. त्यांच्या मापनाला अनुसरून मी भारतशास्त्र (Indology) आणि पुरातत्त्वशास्त्र (archaeology) यांचे अध्ययन करणाऱ्या संस्था, त्याचप्रमाणे भारतीय भूतकाळाच्या सर्व अंगांबद्दल ग्रंथलेखन केलेल्या अनेकांशी संपर्क साधायला सुरुवात केली. काहीही म्हणा, विषयाचा आवाका विशाल आहे आणि आव्हानेही प्रचंड आहेत. थोड्या अवधीत असे मोठे काम हाती घेणे वेडेपणाचे म्हणता येईल. पण वैचारिक औचित्य पुनर्स्थापित व्हावे म्हणून केलेल्या आवाहनाला अभ्यासकांचा पुरेसा प्रतिसाद नक्की मिळेल, या आशेच्या जोरावर मी चिकाटी सोडली नाही. तसा तो मिळालाही याचा मला आनंद आहे. जवळजवळ दोनशे जणांशी संपर्क साधला होता, त्यापैकी ८८ जणांनी सहभागासाठी मान्यता दिली. इतरांपैकी बहुतेक जणांनी उपलब्ध वेळ अपुरा असल्याच्या कारणामुळे इच्छा असूनही असमर्थ असल्याचे कळवले.
या अहवालामध्ये नावाजलेल्या विद्वानांनी लिहिलेल्या शंभरेक प्रकरणांमध्ये भारताच्या दीर्घ इतिहासाची आणि जनसमूहांची सलग आणि असलग कहाणी सांगितली आहे. जनसमूहांचे स्थलांतर, सामाजिक आणि राजकीय संघटनांचा उदय, तत्त्वज्ञान (philosophy) आणि पराविज्ञान (metaphysics) यांचा विकास, भाषा आणि कलावैविध्य, महत्त्वाच्या सामाजिक चळवळी, भारतीय वैचारिकता आणि संस्कृती यावरील वसाहतवादाचा प्रभाव, भारताचा दीर्घ स्वातंत्र्यलढा आणि स्वतंत्र भारताची जडणघडण या सर्वांचे एक व्यापक, सम्यक चित्र सादर करण्याचा हा प्रयत्न आहे.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
‘होमो सेपियन’ मानवाच्या उदयापासून आजच्या २१व्या शतकापर्यंतचा विस्तृत असा कालावधी विचारात घेतला आहे. आपल्या समजातील भारताला आकार देणाऱ्या वेगवेगळ्या प्रांतांना, श्रद्धाविषयांना आणि भाषांना योग्य स्थान मिळावे, असा हेतू त्यामागे आहे. बदल आणि स्थित्यंतरे सर्व ठिकाणी एकाच वेळी घडत नाहीत, याकडे इतिहासलेखनात दुर्लक्ष होते. सर्व विभाग प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक अशा अवस्थांमध्ये एकसमयावच्छेदेकरून प्रवेश करत नाहीत. भारतीय उपखंडांत एखादे राज्य, प्रांत किंवा आर्थिक-सांस्कृतिक विभाग आधुनिक मूल्ये आणि संकल्पना स्वीकारतो, पण त्याच वेळी इतर विभाग मागासलेल्या अवस्थेत असल्याचेही दिसते.
लोकांचे सांस्कृतिक व्यवहार आणि सामाजिक प्रथा एकाच वेळी भिन्न काळात ‘जगत’ असल्याचे आश्चर्यकारक वास्तव काळाच्या एकाच मुशीत बसवू पाहाणे व्यर्थ आहे. राजघराण्यांच्या वंशावळी नव्हेत, तर भारतीय जनसमूह या अहवालाच्या केंद्रस्थानी आहेत. तथापि, राजसत्तेला केंद्रस्थानी ठेवल्याशिवाय इतिहासाच्या अनेक पैलूंची चर्चा करता येत नाही.
लेखकांना त्यांच्या त्यांच्या क्षेत्राचे स्वरूप ठरवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य होते. त्याअर्थाने हा अहवाल या उपखंडाचे एकजिनसी सादरीकरण नसून ते एक विविधांगी सामूहिक सादरीकरण आहे. महत्त्वाचे म्हणजे सहभागी लेखकांचा समूहसुद्धा वैविध्यपूर्ण आहे. त्यामध्ये स्त्री-पुरुष, सामाजिक-प्रांतिक आणि धार्मिक समतोलसुद्धा आहे. आपापल्या विषयाकडे पाहाण्याच्या प्रत्येक सहलेखकाच्या स्वतंत्र वैयक्तिक दृष्टिकोनामुळे एकंदरीत अहवाल पुरेसा चौफेर झाला आहे.
संस्थात्मक परिघाच्या बाहेर या सामूहिक बौद्धिक प्रयोगामध्ये सामील झाल्याबद्दल मी सर्व अभ्यासकांचा ऋणी आहे. गेली दीडशे वर्षे भारतातील इतिहास आणि इतिहासलेखनाचे क्षेत्र अतिशय सृजनशील राहिले आहे. सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक इतिहासाच्या प्रत्येक पैलूबद्दल आपल्याकडे विपुल ग्रंथसंपदा असल्याने त्यात भर घालणे अनावश्यक वाटू शकते. परंतु प्राचीन भारताबद्दलचा हिंदुत्वाचा कार्यक्रम ज्या बेफाट वेगाने आणि आक्रमकपणे राबवला जात आहे, त्यामुळे छोटा तरीही सर्वसमावेशक असा इतिहासाचा वृत्तांत लिहिणे गरजेचे होते. इतिहासाच्या विशाल क्षेत्रात अजून किती गोष्टी माहीत करून घ्यायला हव्यात आणि अजून काय पूर्ण करणे बाकी आहे, हे पाहण्यासाठीही अशा अहवालाची गरज आहे.
अहवालाच्या अनुक्रमणिकेतील विषय व लेखकांची नावे यांवर नजर फिरवली, तर एका दृष्टिक्षेपात विषयाचा आवाका आणि त्याची रचना यांचा अंदाज येईल.
भारताच्या भूतकाळातील एकूण एक कालखंड इथे ग्रथित झाले आहेत, असे आम्ही दूरान्वयानेसुद्धा सूचित करू इच्छित नाही. तसा दावा करणे अशक्य आहे, कारण ती असाध्य गोष्ट आहे. सतत चालू राहावे, असे हे काम आहे. थोड्या थोड्या कालांतराने यातील विषयांची पुनर्मांडणी, दुरुस्ती आणि सुधारणा करत राहायला हवी. अतिरेकी विभाजक शक्तींनी भारतीयांच्या मनाचा ताबा घेऊन, लोकांची एकजूट साधणाऱ्या संविधानाला क्षती पोहोचवू नये म्हणून हे काम आवश्यक आहे.
.................................................................................................................................................................
‘द इंडियन्स : अनेक सहस्त्रकांचा आपला समग्र इतिहास’ - संपादन - गणेश देवी | टोनी जोसेफ | रवी कोरीसेट्टर
अनुवाद : शेखर साठे | प्रमोद मुजुमदार | नितिन जारंडीकर | ज्ञानदा आसोलकर
मनोविकास प्रकाशन, पुणे | पाने - ७५४ | मूल्य - ८९९ रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment