माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो
ग्रंथनामा - झलक
शेखर देशमुख
  • प्रख्यात, जगविख्यात उर्दू कवी फैज़ अहमद फैज़ आणि ‘फैज़ अहमद फैज़ : लव्ह अँड रेव्होल्युशन’ या त्यांच्या चरित्राचे मुखपृष्ठ
  • Sun , 29 September 2024
  • ग्रंथनामा शिफारस फैज़ अहमद फैज़ Faiz Ahmed Faiz लव्ह अँड रेव्होल्युशन : फैज़ अहमद फैज़ Love and Revolution : Faiz Ahmed Faiz

प्रख्यात, जगविख्यात उर्दू कवी फैज़ अहमद फैज़ यांचं ‘लव्ह अँड रेव्होल्युशन फैज़ अहमद फैज़’ हे त्यांचे नातू अली मदिह हाश्मी यांनी लिहिलेलं पहिलं अधिकृत चरित्र २०१६मध्ये इंग्रजीत प्रकाशित झालं. त्याचा ज्येष्ठ पत्रकार शेखर देशमुख यांनी केलेला मराठी अनुवाद नुकताच लोकवाङ्मय गृहाने प्रकाशित केला आहे. या अनुवादाला देशमुख यांनी लिहिलेल्या मनोगताचा हा संपादित अंश…

.................................................................................................................................................................

नेमकं आठवत नाही, पण १९९३-९४चा सुमार असावा. पत्रकारितेच्या अपरिचित विश्वात उडी घेऊन जेमतेम दीड-दोन वर्षंच उलटली होती. नाइट शिफ्ट संपल्यानंतर रोजच्या शिरस्त्याप्रमाणे पत्रकार, लेखक आणि कलावंतांच्या वर्तुळात फेमस असलेल्या दादरच्या ‘बबन चहावाल्या’कडे गप्पाटप्पा हाकायला बहुधा आम्ही चाललो होतो. त्या वेळच्या हिंदी चित्रपटसृष्टीत वट असलेला ‘महानगर-चंदेरी’तला स्टार पत्रकार राजू पटेल सोबत होता. माटुंगा रोड स्टेशनात लोकल ट्रेनची वाट पाहत असताना माझं मराठी साहित्याच्या गमजा मारणं सुरू होतं. माझा तो तोरा उतरवत राजूने डोळे बारीक करून प्रश्न केला - ‘काम्यू पढ़ा हैं? काफ्का पढ़ा हैं? फैज? पाश? पहले वो पढ़...’

राजूच्या त्या खोचक-बोचक प्रश्नाने माझं मराठीपल्याडचं अज्ञान समोर आलं होतं. माझ्यातली अनभिज्ञता उघड झाली होती. तरीही, त्याचं म्हणणं हसण्यावारी नेत वेळ मारून नेली. मग नंतर कधीतरी गुपचूप एकेक लेखक-कवींचा शोध घेणं सुरू झालं. पण, का कोण जाणे त्यातल्या फ़ैज़ अहमद फ़ैज़ने जरा जास्तच त्रास दिला. खूप झटापट करूनही दोन-पाच लोकप्रिय (प्रेम) कवितांपलीकडे तो समजला नाही.

कुणी म्हणालं, ‘बहुत छोटे हो... और नादान भी...’

आयुष्य पुढे सरकत गेलं. रोजच्या झमेल्यात फ़ैज़ मागे पडला. पण फ़ैज़ आपण वाचलेला नाही, थोडाबहुत प्रयत्न करूनही आपल्याला तो कळलेला नाही, हा डंख होताच.

मधल्या काळात फेलोशिपच्या निमित्ताने महाराष्ट्र, यूपी-बिहार-राजस्थान, दिल्ली-प. बंगाल- मणिपूर, आंध्र-तामिळनाडू अशी भटकंती झाली. त्यादरम्यान कधी स्टेशनातल्या ‘व्हीलर’मधून, कधी शहरांमधल्या पुस्तकांच्या दुकानांतून ग़ालिब, मीर, शहरयार, पाश उचलणं सुरू झालं. त्यांच्या जोडीला न समजलेला फ़ैज़ पुन्हा मनात डोकावू लागला; पण तरीही त्याला गांभीर्यानं भिडावंसं वाटलं नाही. म्हटलं राहू दे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

याच प्रवासात एका टप्प्यावर मार्क्सवादी विचारांशी ओळख झाली, तसा जगाच्या शोषित-पीडितांची वेदना स्वतःमध्ये सामावून असलेला, एकाच दमात प्रीती आणि क्रांतीची भाषा बोलणारा फ़ैज़ पुन्हा खुणावू लागला. कवितेमागचे त्याचे हेतू, त्याचे विचार थोडेबहुत लक्षात येत गेले. तरीही कवितेतले अरेबिक, पर्शियन संस्कृतीतले संदर्भ, प्रतिमा-प्रतीकं, उर्दू भाषेतलं शब्दसौष्ठव असं खूप काही डोक्यात शिरलं नाही.

कुणी म्हणालं, ‘फ़ैज़ ऐसेवैसे नहीं समझ आयेगा... जिंदगी में ठोकरें खानी पडेगी...’

मग, जिवावर बेतलेलं आजारपण येऊन गेलं. कदाचित, लोक म्हणतात, तसं आयुष्यात थोड्याफार वेदना भोगून झाल्या होत्या. याच काळात बौद्ध तत्त्वज्ञान, जे. कृष्णमूर्ती, विनोबा यांच्या जोडीला फ़ैज़ही वाचावासा वाटला. त्यानंतर फ़ैज़चे हिंदीत प्रकाशित झालेले सगळे कवितासंग्रह मिळवण्याचा सपाटा लावला. जमेल तसे ते वाचून काढत गेलो; पण एवढं वाचूनही फ़ैज़ची बहुतांशी कविता, त्यातला भाव, तिची पार्श्वभूमी, कवीला अपेक्षित असलेला अर्थ यातलं बरंच निसटून जात होतं.

कुणी म्हणालं, फ़ैज़ की जिंदगी को समझो... पण कसं? कसून शोध घेतला. काही लेखसंग्रह, एखाद्-दुसरं आठवणपर नोंदी असलेलं पुस्तक असं तुकड्या-तुकड्यांत काहीबाही हाती आलं; पण समग्रपणे फ़ैज़ मिळाला नाही. ऑनलाइन बरंच दिसत होतं. त्यात इंग्लिश पुस्तकांच्या किमती भरमसाट दिसत होत्या आणि उर्दूचा गंध नसल्याने जे काही आहे, त्याचा अदमास येत नव्हता. हे स्पष्टपणे कळत होतं, जोवर फ़ैज़चं चरित्र-आत्मचरित्र रूपानं काही मिळत नाही, हा तिढा सुटणार नाही. त्याची कविता आपल्याला कळणार नाही. पण त्याने आत्मचरित्र लिहिलेलंच नाही, हेही कालांतराने समजलं आणि त्याचं एकसंध स्वरूपातलं चरित्र अद्याप प्रकाशित झालेलं नाही, याचाही अंदाज आला.

म्हणून मग एक विचार डोक्यात आला, इकडून-तिकडून माहिती गोळा करून आपणच फ़ैज़वर एक छोटंसं चरित्रात्मक पुस्तक लिहायला घ्यावं का? पत्रकार मित्र इब्राहिम अफगाण आणि हिंदी चित्रपटसृष्टीतला लेखक मित्र, फैज़च्या कवितांचा चाहता फरीद खान यांना हा विचार बोलून दाखवला. पण तिथेही गाडी पुढे सरकली नाही.

तशातच २०१७मधल्या फेब्रुवारी महिन्यात झपाटून टाकणारी एक घटना घडली. सहकारी संपादक असलेल्या प्रशांत पवारने एक मेल फॉरवर्ड केली. संवादक, जाहिरातकार, लेखक आणि उर्दूचे जाणकार जमील गुलरेज यांच्या ‘कथाकथन’ ग्रुपने फ़ैज़च्या कवितांवर आधारित वाचन-आस्वादनाचा कार्यक्रम ठेवला होता. त्याचीच निमंत्रण-पत्रिका त्या मेलमध्ये जोडलेली होती. नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. खार पश्चिमेला असलेल्या गुलरेज यांच्या शेजारच्या फ्लॅटमध्ये कार्यक्रम व्हायचा होता. प्रशांत आणि त्याची बायको सविता कार्यक्रमस्थळी आधीच पोहोचले होते. उशीर मलासुद्धा झालेला नव्हता, तरीही पोहोचलो तेव्हा फ्लॅटमध्ये पाय ठेवायला जागा नव्हती. कार्यक्रम सुरू झाला, तरी येणारे येतच गेले आणि एका क्षणी काहींना उभं राहून ऐकण्यावाचून पर्याय राहिला नाही. यात मुंबईतल्या कानाकोपऱ्यांतून आलेले विशी-पंचविशीतले काव्यप्रेमी (खरं तर फ़ैज़प्रेमी) तरुण होते. तरुणी होत्या. मध्यमवयीन, वयाने ज्येष्ठ असलेले रसिकही होते.

यातल्या अनेकांनी आपापल्या आवडीनिवडीनुसार एकेक करत फ़ैज़च्या कविता वाचून-गाऊन दाखवल्या. जणू तिथे आलेला प्रत्येक जण फ़ैज़च्या कवितांमध्ये स्वत:ची अभिव्यक्ती शोधत होता. ‘सुब्हे आज़ादी’, ‘बोल’, ‘इन्तिसाब’, ‘ग़म न कर’, ‘ख़्वाब बसेरा’, ‘हम देखेंगे’, ‘कुत्ते’ अशा कितीतरी कविता एक खोलीभर गुंजारव करत राहिल्या. त्यात गायिका-कलावंत अनुष्का निकम यांचा ‘मुझसे पहली सी मुहब्बत’ ही कविता गातानाचा प्रांजळ स्वर मोहरून टाकणारा होता. मुंबई विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागातून आलेल्या विद्यार्थ्यांचं खणकदार सादरीकरण आठवणीत राहणारं होतं.

...............................................................................................................................

ज्यांना फ़ैज़ आकळलाय, त्यांच्या प्रगल्भतेला सलामच आहे. पण ज्यांना अजूनही तो समजून घ्यायचाय, ज्यांना त्याच्या कवितांचा संदर्भासहित आस्वाद घ्यायचाय, भारत-पाकिस्तानच्या राजकीय-लष्करी शत्रुत्वापलीकडे जाऊन आजच्या एकाधिकारशाहीकेंद्री, बहुसंख्याकवादी शासनसत्तांच्या काळातलं फ़ैज़चं महत्त्व जाणून घ्यायचंय, त्यांच्यासाठी अली मदिह हाश्मीलिखित प्रस्तुत चरित्र हा खात्रीचा मार्ग असल्याचा माझा विश्वास आहे. याच विश्वासाच्या बळावर मराठी अनुवादाचा प्रयत्न करून पाहिला आहे.

...............................................................................................................................

आयोजक गुलरेज यांनी कबूल केलं. म्हणाले, आमचा अंदाज चुकला. आजवर एवढी गर्दी आमच्या कुठच्याच बैठकीला झाली नव्हती. हे नेमकं काय होतं? स्थल-काल-देश-सीमा-धर्म-पंथ असं सारं भेदणारं फ़ैज़च्या कवितांचं हे कालातीत गारूड होतं. पण हे गारूड फ़ैज़च्या मृत्यूपश्चात चार दशकं कसं टिकून राहिलं? ग़ालिब आणि इक्बाल या दोहोंनंतर उर्दू साहित्यप्रांतात, विशेषत: कवितेच्या प्रांतात फ़ैज़चं स्थान अढळ कसं राहिलं? भारतात अधिकारशाही मनोवृत्तीच्या सत्तेविरोधात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा लढा पुकारताना, उदारमतवाद्यांना ‘बोल, के लब आज़ाद हैं तेरे’ म्हणणारा फ़ैज़ अधिक जवळचा का वाटत राहिला?

विसाव्या शतकातल्या दुसऱ्या दशकाच्या प्रारंभाला सियालकोट (स्वातंत्र्यपूर्व ब्रिटिशशासित भारत आणि फाळणीनंतरच्या पाकिस्तानातलं शहर) इथं एका तालेवार घराण्यात जन्माला आलेल्या फ़ैज़च्या वाट्याला ऐन उमेदीच्या काळात, मुख्यतः वडिलांच्या मृत्यूनंतर, निष्कांचन अवस्था आली. इथेच कुठे तरी शोषित-उपेक्षितांच्या वाट्याला येणाऱ्या गरिबी, दारिद्र्य, भूक, अत्याचार, अनाचार, या जगण्यातल्या भयाण वास्तवाशी त्याची जानपछान झाली. पुढल्या काळात यातूनच त्याचं साहित्यिक आणि सार्वजनिक व्यक्तिमत्त्व घडत-बहरत गेलं.

भारतीय उपखंडातल्या घुसळणीचा तो काळ होता. एका बाजूला ब्रिटिशांविरोधातली स्वातंत्र्याची चळवळ भारतात मूळ धरू लागली होती. गांधीजी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्याकडे चळवळीची धुरा आलेली होती. दुसरीकडे म. अली जिनांनी द्वि-राष्ट्रवादाच्या सिद्धान्ताला धग देण्यास सुरुवात केली होती. तर तिसरीकडे ‘ऑल इंडिया प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशन’च्या माध्यमातून मुल्कराज आनंद, इस्मत चुगताई, सआदत हसन मंटो, फ़ैज़ हे समकालीन लेखक-कवी पुरोगामी विचारांची कड घेत उर्दू, इंग्रजी साहित्याच्या क्षेत्रात मुशाफिरी करू पाहत होते.

यातले मंटोसह अनेक गरम रक्ताचे साहित्यिक अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जोरकस पुकारा करत मानवी मनाशी दडलेल्या विकार-वासनांचा शोध घेत होते. तर फ़ैज़ माणसातल्या या विकार-वासनांचा स्वीकार करत त्याच्यातल्या सनातन वेदनेला हळुवारपणे हात घालू पाहत होता. ही वेदना वियोगाची होती. अपेक्षाभंगाची होती. पिढ्यांपासून अन्याय-अत्याचार सहन करणाऱ्या शोषित वर्गांची होती. वर्चस्ववाद्यांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या दुर्बळांची होती. हुकूमशाही, दडपशाही व्यवस्थेत भरडल्या गेलेल्या जनसामान्यांची होती. शेतात राबणारा शेतमजूर, कारखान्यांतून अहोरात्र मेहनत घेणारा कामगार, रस्त्यांवर ओझी वाहणारा हमाल, हातावर पोट असलेला ठेलेवाला, टांगेवाला आणि विद्वेषाच्या आगीत होरपळून निघणारे अनाम स्त्री-पुरुष, निरागस मुलं हे त्याच्या कवितांचे नायक-नायिका होते.

प्राध्यापक-कवी-लेखक-पत्रकार-संपादक, विविध संस्कृती-परंपरांचा भाष्यकार, अरबी, फारसी, उर्दू, हिंदी, इंग्लिश, पंजाबी आदी भाषांचा जाणकार अशा बहुढंगी व्यक्तिमत्त्वाचा धनी ठरलेला फ़ैज़ हा फॅसिस्ट मनोवृत्तीच्या सक्त विरोधात होता. अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आणि मुक्त संभाषणाचा खंदा पुरस्कर्ताही होता. किंबहुना, उदारमतवाद, पुरोगामी दृष्टिकोन आणि फॅसिस्ट शक्तींना विरोध ही फ़ैज़ने अंगीकारलेल्या विचारधारेची त्रिसूत्री होती.

ब्रिटिश सत्तेपासून स्वातंत्र्य हे सर्वोच्च ध्येय होतंच. परंतु, वयाच्या विशी-तिशीत मार्क्सवादी विचारांशी झालेल्या परिचयामुळे नि पुढे रशियन राज्यक्रांतीच्या त्याच्यावर झालेल्या गहिऱ्या प्रभावामुळे समाजवादी समाजनिर्मितीचं स्वप्न त्याच्या डोळ्यांत वस्तीला आलं होतं. या स्वप्नांच्या पूर्ततेसाठीच ‘ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस’शी संलग्न असलेल्या अमृतसर लेबर फेडरेशनचं सदस्यत्व स्वीकारून कामगार चळवळीत त्याने काही काळ स्वत:ला झोकून दिलं होतं.

...............................................................................................................................

देशाचे भारत आणि पाकिस्तान असे दोन तुकडे पडले. तत्पूर्वी, एका क्षणी सरदार वल्लभभाई पटेलांना भेटून काँग्रेसचा कार्यकर्ता बनायला निघालेल्या फ़ैज़ने मित्राच्या आग्रहाखातर ‘पाकिस्तान टाइम्स’च्या मुख्य संपादकपदाची जबाबदारी स्वीकारली. फाळणीनंतर स्वतःचा देश म्हणून पाकिस्तानची निवड केली. पण म्हणून पाकिस्तानातल्या नेतृत्वावर आंधळा विश्वास ठेवून जे जे होईल, ते पाहत बसणं पसंत केलं नाही. कालांतराने, जेव्हा नवराष्ट्रातल्या धोरणकर्त्यांचे मनसुबे आणि जनसामान्यांनी पाहिलेली स्वप्नं यांत अंतर पडत गेलं, तेव्हा धर्मकेंद्रित राष्ट्रात काव्य आणि पत्रकारितेच्या माध्यमातून समाजवादी विचारांचा आग्रह लावून धरण्याचं धाडस फ़ैज़ने वारंवार केलं. निर्मितीच्या वेळी दिलेली समताधिष्ठित समाजाची सारी वचनं मोडणाऱ्या पाकिस्तानच्या लष्करी-राजकीय सत्तेविरोधात आवाज उठवला.

...............................................................................................................................

फ़ैज़ वृत्ती-प्रवृत्तीने कवी होता. त्याचा हिंसेपेक्षा अहिंसेवर आणि द्वेषापेक्षा प्रेमावर अधिक विश्वास होता. याचमुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातल्या हिंसक चळवळींनाही त्याचा उघड विरोध राहिला होता. जगाला सर्वात मोठा धोका फॅसिझमपासूनच आहे, हे ओळखून दुसऱ्या महायुद्धादरम्यान सोविएत रशियाची साथ देत जर्मनी, इटली आदी देशांविरोधात उभ्या ठाकलेल्या ब्रिटिश लष्करात सामील होण्याचा निर्णय त्याने घेतला होता. त्यामागचा एकमेव उद्देश, या निमित्ताने फॅसिझमविरोधात चालून आलेली जनजागृतीची संधी न सोडणं हाच होता.

फाळणीची भळाळती जखम मागे ठेवून देश स्वतंत्र झाला. नव्हे, देशाचे भारत आणि पाकिस्तान असे दोन तुकडे पडले. तत्पूर्वी, एका क्षणी सरदार वल्लभभाई पटेलांना भेटून काँग्रेसचा कार्यकर्ता बनायला निघालेल्या फ़ैज़ने मित्राच्या आग्रहाखातर ‘पाकिस्तान टाइम्स’च्या मुख्य संपादकपदाची जबाबदारी स्वीकारली. फाळणीनंतर स्वतःचा देश म्हणून पाकिस्तानची निवड केली. पण म्हणून पाकिस्तानातल्या नेतृत्वावर आंधळा विश्वास ठेवून जे जे होईल, ते पाहत बसणं पसंत केलं नाही. कालांतराने, जेव्हा नवराष्ट्रातल्या धोरणकर्त्यांचे मनसुबे आणि जनसामान्यांनी पाहिलेली स्वप्नं यांत अंतर पडत गेलं, तेव्हा धर्मकेंद्रित राष्ट्रात काव्य आणि पत्रकारितेच्या माध्यमातून समाजवादी विचारांचा आग्रह लावून धरण्याचं धाडस फ़ैज़ने वारंवार केलं. निर्मितीच्या वेळी दिलेली समताधिष्ठित समाजाची सारी वचनं मोडणाऱ्या पाकिस्तानच्या लष्करी-राजकीय सत्तेविरोधात आवाज उठवला.

याचीच शिक्षा म्हणून त्याला अनेकदा तुरुंगात डांबण्यात आलं. त्याच्यावर कायमस्वरूपी पाळत ठेवली गेली. आयुष्याची कितीतरी वर्षं चळवळीत, तुरुंगात तसंच देशाबाहेर विजनवासात घालवल्यामुळेच त्याचं अनुभवविश्व उत्तरोत्तर समृद्ध होत गेलं. याचाच परिणाम म्हणून सुरुवातीला प्रेमाची आळवणी करणारी त्याची कविता कालांतराने मानवी वेदनांचा पट उलगडत वैश्विक होत गेली. नव्हे, त्याच्या कवितेने जणू अवघ्या मानव जातीची वेदना स्वतःमध्ये सामावून घेतली.

निर्मितीच्या काहीच वर्षांत म्हणजेच, जिनांच्या मृत्यूनंतर पाकिस्तान हा देश लष्कराच्या ताब्यात गेला, तो आजतागायत. मुख्यतः १९७०-८० च्या दशकात पाकिस्तानने टोकाचे अत्याचार अनुभवले. या कालखंडात धर्मकेंद्री राजकारणाला पाकिस्तानात बळ येत गेलं. अभिव्यक्ती स्वातंत्र्य लोप पावत गेलं. बुद्धिवादी लोक, डाव्या विचारांच्या संस्था-संघटना, पुरोगामी विचारांचे लेखक-कलावंत आदींना जाणीवपूर्वक लक्ष्य केलं गेलं. अशाने उदारमतवादी, सहिष्णू राष्ट्राचं फ़ैज़सारख्या विवेकनिष्ठ मंडळींनी पाहिलेलं स्वप्न कुठच्या कुठे विरून गेलं.

आताच्या पाकिस्तानात तोंडदेखलं जनतेनं निवडून आणलेलं सरकार असलं तरीही, लष्कराचं वर्चस्व पूर्वीसारखंच कायम आहे. देश दहशतवादाने पोखरलेला आहे. बेरोजगारी, गरिबी हे या देशाचे तातडीचे प्रश्न आहेत. कट्टरवाद्यांनी देश वेठीस धरल्यासारखा आहे. भारतात या घडीला भाजपप्रणित एनडीएचं सरकार आहे. पाकिस्तानच्या तुलनेत उद्योगधंदे, सार्वजनिक व्यवस्था आणि एकूणच अर्थस्थिती तुलनेने चांगली आहे. मात्र, २०१४नंतर सत्तेवर पक्की मांड ठोकलेल्या भाजप सरकारने उघडपणे धर्मकेंद्री बहुसंख्याकवादी राजकारणाचा विघातक मार्ग अवलंबला. या सत्ताकाळात साधू-महंतांना महत्त्व येत गेलं. धर्मभक्ती हीच देशभक्ती बनली. स्वतंत्र विचारांच्या संस्था-संघटना आणि व्यक्तीविरोधात सूडबुद्धीचं राजकारण खेळलं गेलं. देशभक्त विरुद्ध देशद्रोही, शेतकरी विरुद्ध लष्करी जवान, गरीब विरुद्ध श्रीमंत, सवर्ण विरुद्ध दलित-बहुजन अशी समूहा-समूहांत जाणीवपूर्वक फूट पाडली गेली. सरकारविरोधी भूमिका घेणाऱ्या विद्यार्थी नेत्यांविरोधात, झुंडबळीविरोधात दाद मागण्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहिणाऱ्या साहित्यिक-कलावंतांविरोधात देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात आले. परधर्मद्वेषाने पछाडलेल्या झुंडी अल्पसंख्याकांवर हिंसक हल्ले करत सुटल्या आणि सत्ताधाऱ्यांनी झुंडीने बळी घेणाऱ्यांचा हारतुरे घालून सन्मानही केला. याचमुळे कदाचित २०१४ नंतर ७०-८०च्या दशकातल्या पाकिस्तानची हीच पुनरावृत्ती भारतात होऊ लागल्याची भावना भारतातल्या विवेकवादी मंडळींमध्ये बळावली.

८०च्या दशकात फ़ैज़चा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र आलेल्यांविरोधात जनरल झियांच्या लष्करी राजवटीने अशाच प्रकारे देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले होते. पण तेव्हासुद्धा पाकिस्तानतल्या असहमतीदारांच्या तोंडी फ़ैज़च्या विद्रोही कविता होत्या. भारतातही जेव्हा सत्ताधाऱ्यांनी विरोधी विचार दडपून टाकण्याचा प्रयत्न केला, फ़ैज़चेच अर्थवाही शब्द, फ़ैज़च्याच रोमांच उभे करणाऱ्या कविता या मंडळींच्या मुखी आल्या. म्हणजेच, पाकिस्तानच्या इतिहासाची एका पातळीवर पुनरावृत्ती होत असताना, भारतातल्या उर्दू-हिंदी भाषेतल्या अभ्यासक-समीक्षकांसाठी चिंतन-मननाचा विषय बनलेला फ़ैज़ आणि त्याच्या कविता पुन्हा एकदा एक मोलाचा आधार ठरल्या होत्या.

.................................................................................................................................................................

हेहीपाहावाचाअनुभवा

‘हम देखेंगे’, फैज़ अहमद फैज़ आणि CAA व NRC

आपल्याला हव्या होत्या त्या प्रिय देशामध्येच ते जणू निर्वासित बनून राहिले होते

फैज़ अहमद फैज़च्या दोन कविता - खरंच शब्दांच्या खूप पलीकडचं आहे!

फैज़ अहमद फैज़ : माणसाच्या मूलभूत दुःखाबद्दल कळवळा असणारा कवी

.................................................................................................................................................................

फाळणीनंतरच्या काळात एका द्विधा मनःस्थितीत मंटो पाकिस्तानात गेला होता, पण म्हणून भारतीय साहित्यविश्वाने त्याला कधीच बेदखल केलं नव्हतं. त्याला कधीच परका मानलं नव्हतं. त्याचप्रमाणे फ़ैज़ची राष्ट्रीय ओळख पहिल्यापासूनच ‘पाकिस्तानी’ होती, तरीही भारतीय चाहत्यांसाठी तो कायमच ‘अपना फ़ैज़’ होता.

हे तर स्पष्टच होतं, सखोल चिंतन-मननाची पक्की बैठक लाभलेल्या फ़ैज़च्या कवितेने प्रखर वास्तवापासून कधीही फारकत घेतली नव्हती. वास्तवाचं दर्शन घडवताना तिच्यात तरल स्वप्नांचाही प्रभावी मेळ साधला गेला होता. लाघवी शब्दमाधुर्य हे तर तिचं खास वैशिष्ट्यच होतं. अरबी, फारसी, उर्दू, पंजाबी आदी साहित्य आणि लोकपरंपरेतून स्फुरलेल्या प्रतिमा-प्रतीकांचा तिच्यात सुंदर मिलाफ होता. पण म्हणून ती दुर्बोधही बनली नव्हती. किंबहुना, जाणकार-समीक्षकांपासून तळागाळातल्या वाचकांपर्यंतच्या सगळ्यांना आपलंसं करत दीर्घकाळ साथसंगत देण्याची विलक्षण क्षमता तिच्यामध्ये होती. साहजिकच त्या-त्या काळातल्या संगीतकार, गायक-गायिकांना फ़ैज़च्या कविता नि ग़ज़लांनी भुरळ घातली होती.

मेहदी हसन, नूरजहाँ, फरिदा खानम, इक्बाल बानो, नय्यरा नूर, टीना सानी, डॉ. राधिका चोप्रा, शाई गील या जुन्या-नव्या पिढीतल्या आणि यासारख्या अनेकांनी 'गुलों में रंग भरे, बादे-नौबहार चलें' यासारख्या ग़ज़ला नि ‘दश्ते तनहाई में, जाने-जहाँ’, ‘लरजाँ हैं’ किंवा झिया राजवटीला आव्हान देणाऱ्या ‘हम देखेंगे’ यासारख्या आशयगर्भ कविता गाऊन फ़ैज़ला जनसामान्यांपर्यंत पोहोचवलं होतं. याचमुळे बहुधा, फ़ैज़च्या कविता-ग़ज़ला संगीतबद्ध झाल्या म्हणून तो लोकप्रिय झाला, असाही मतप्रवाह बनला होता. काही प्रमाणात आजही तो कायम आहे. परंतु, फ़ैज़च्या कवितेमध्ये वा ग़ज़लेमध्ये अंगभूत अशी लय नसती, नाद आणि ताल नसता, तर ज्या संख्येने आणि ज्या आत्मीयतेने त्या गायिल्या गेल्या, तशा त्या गायिल्या जाण्याचीही शक्यता नव्हती. ही सर्वथा लय, ताल आणि नादाचं भान असलेल्या फ़ैज़च्या कवितेची ताकद होती. पाकिस्तानातल्या दमनकारी व्यवस्थेने एकेकाळी फ़ैज़च्या कवितांना निःसंशय ठोस निमित्त पुरवलं होतं.

एकविसाव्या शतकातल्या दुसऱ्या दशकात, गुलरेज यांच्या ‘कथाकथन’ बैठकीच्या निमित्ताने म्हणा वा भारतातल्या सत्ताधाऱ्यांच्या असहिष्णू वर्तनावर असहमती दर्शवताना म्हणा, तीच फ़ैज़ची कविता अनेकांना बळ देत असल्याचं मला प्रकर्षानं जाणवलं होतं.

फ़ैज़ची कविता समजून घेण्यासाठी कवितेपलीकडच्या फ़ैज़चा शोध नितांत गरजेचा आहे, हे सांगणारा, माझ्या दृष्टीने म्हटला तर हा ‘ट्रिगर पॉइंट’ होता. शोध जारी असताना एक दिवस ‘दी ऑथराइज्ड बायोग्राफी’ असा ठसठशीत उल्लेख असलेल्या रूपा पब्लिकेशन्स निर्मित अली मदिह हाश्मी यांच्या ‘लव्ह अँड रेव्होल्युशन’ (२०१६) या पुस्तकावर नजर पडली. ताबडतोब ते ऑनलाइन मागवलं. उत्कंठेने चाळलं आणि आयुष्यभर देश नि धर्मापलीकडे जाऊन मानवतावादी विचारांचा पुरस्कार करणाऱ्या फैज़च्या अभिजात कवितेपर्यंत नेणारी जादूई किल्ली हाती आल्याचा भास झाला. यथावकाश पुस्तकही वाचून झालं. पण म्हणून आता तरी फ़ैज़ समजला का?

तसा दावा करण्याची माझी अजूनही हिंमत नाही. जिथे दिलीपकुमारसारखा हिंदी चित्रपटसृष्टीतला दर्दी अभिनयसम्राट म्हणाला होता- ‘फ़ैज़साहब के चाहने वालों में कई कितने लोग ऐसे हैं, कोशिशे समझे और कुछ को समझ में नहीं आया, उनमें एक मैं भी हूं, क्योंकि असातिज़ा (शिक्षकांचा गुरू) हैं, इनके कलाम की हर पहलू तक हमारी उपज नहीं पहुंच सकती...’

तिथे आपली काय पत्रास?

अर्थात, ज्यांना फ़ैज़ आकळलाय, त्यांच्या प्रगल्भतेला सलामच आहे. पण ज्यांना अजूनही तो समजून घ्यायचाय, ज्यांना त्याच्या कवितांचा संदर्भासहित आस्वाद घ्यायचाय, भारत-पाकिस्तानच्या राजकीय-लष्करी शत्रुत्वापलीकडे जाऊन आजच्या एकाधिकारशाहीकेंद्री, बहुसंख्याकवादी शासनसत्तांच्या काळातलं फ़ैज़चं महत्त्व जाणून घ्यायचंय, त्यांच्यासाठी अली मदिह हाश्मीलिखित प्रस्तुत चरित्र हा खात्रीचा मार्ग असल्याचा माझा विश्वास आहे. याच विश्वासाच्या बळावर मराठी अनुवादाचा प्रयत्न करून पाहिला आहे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

................................................................................................................................................................

‘हिंदुस्थान हमारी महबूबा सही, मगर पाकिस्तान हमारी मन्कूह (जीवनसाथी) हैं’ म्हणणाऱ्या फ़ैज़चे मराठी भाषक चाहते या अनुवादाचं मनापासून स्वागत करतील, ही आशा आहे. आताचा काळ भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. लष्करी व्यवस्थांनी एकमेकांना दुष्परिणामांची धमकी देण्याचाही आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.

तत्पूर्वी, अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर, नोकरीत आलेलं साचलेपण आणि अपेक्षाभंगाच्या निराशेतून स्वत:ला बाहेर काढण्याच्या धडपडीतून एका झपाटलेल्या क्षणात मार्च २०१९च्या मध्यावर पुस्तकाचा अनुवाद करायला घेतला होता.

सप्टेंबर २०१९मध्ये अनुवादाचा पहिला खर्डा तयार झाला. पण आता पुढे काय करायचं, असा जेव्हा प्रश्न आला, तेव्हा पाकिस्तान-लाहोरस्थित लेखक डॉ. अली मदिह हाश्मी आणि फ़ैज़ यांच्या ज्येष्ठ कन्या सलिमा हाश्मी यांच्या संपर्कात येण्यासाठी ‘पाकिस्तान-इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस अँड डेमॉक्रसी’ या संस्थेच्या माध्यमातून भारत-पाक मैत्रीबाबत महत्त्वाची भूमिका बजावणारे ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक जतीन देसाई यांनी संपर्काचा पूल उभारून दिला. ज्येष्ठ संपादक, माझे पत्रकारितेतले मार्गदर्शक आणि राज्यसभेचे माजी खासदार कुमार केतकर यांनी अनुवादाचा पहिला खर्डा आत्मीयतेनं वाचून संहिता अधिक वाचकस्नेही होण्यासाठी अनुवादामागचे हेतू स्पष्ट करण्याच्या अनुषंगाने अत्यंत मोलाच्या सूचना केल्या. या विषयातला जाणकार पत्रकारमित्र इब्राहिम अफगाण याने संहितेतल्या काव्यओळीत अचूकपणा येण्यासाठी आणि अनुवादाच्या प्रवाहाला आवश्यक ती लय देण्यासाठी यथायोग्य दिशादर्शन केलं. जंग जंग पछाडूनही मला न सापडलेल्या फ़ैज़च्या काही मूळ कविता साथी फरीद खानने आनंदाने शोधून दिल्या.

मूळ चरित्राचे लेखक अलीभाईंनी अत्यंत उदारपणे मराठी वाचकांचा हिंदी-उर्दू स्नेह पाहता फ़ैज़च्या मूळ कवितांचा इंग्लिशमधून अनुवाद न करता, आहे तशा देवनागरीत उपयोगात आणण्याची माझी विनंती मान्य केली. वेळात वेळ काढून मूळ चरित्रातली छायाचित्रं पुरवली आणि मुख्य म्हणजे, संयम राखत माझ्या प्रयत्नांना उत्स्फूर्तपणे दाद देत माझ्यातली उमेदही जागती ठेवली.

सरतेशेवटी आशा एकच आहे. माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो.

‘लव्ह अँड रेव्होल्युशन : फैज़ अहमद फैज़’ – अली मदिह हाश्मी

मराठी अनुवाद – शेखर देशमुख

लोकवाङ्मय गृह, मुंबई | पाने – ४१५ (हार्डबाउंड) | मूल्य – ७०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......