झुंडबळीसारख्या समाजस्वास्थ्य बिघडवणाऱ्या घटना अलीकडच्या काळात सातत्याने घडताना दिसतात. मग ते कोल्हापूर असो की नाशिक... उत्तर प्रदेश असो की राजस्थान... हरयाणा असो की मध्य प्रदेश.. देशभरातील अशा घटनांचा सर्वंकष वेध घेणारा अहवाल ‘सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसायची अँड सेक्युलॅरिझम’ या संस्थेने तयार केला आहे. सलोखा संपर्क गटाच्या निशा साळगावकर व प्रमोद मुजुमदार यांनी या अहवालाचा मराठी अनुवाद केला आहे, तर वंदना पलसाने व संजीवनी कुलकर्णी यांनी संपादन केले आहे. या पुस्तिकेतला हा संपादित अंश...
.................................................................................................................................................................
सी.एस.एस.एस.तर्फे करण्यात आलेल्या अभ्यासातून सन २०२३ मध्ये भारतात झुंडबळीच्या एकूण २१ घटना घडल्या. सन २०२२ मध्ये हीच संख्या १६ इतकी होती. याचा अर्थ झुंडबळींच्या घटनांमध्ये २३.५% वाढ झाली. झुंडबळींच्या २१ घटनांपैकी बारा घटना गोमांस वाहतूक किंवा गोवंशीय जनावरे कत्तलखान्यात नेण्याच्या संशयावरून घडल्या होत्या. दोन घटना या मुस्लिम पुरुष मुस्लिमेतर स्त्रीशी सार्वजनिक ठिकाणी बोलताना आढळला किंवा मुस्लिमेतर स्त्रीशी मैत्री, प्रेमाच्या संबंधांच्या संशयावरून घडल्या होत्या. झुंडबळींच्या या एकूण २१ घटनांमध्ये १६ बळी गेले. ते सर्व मुस्लिमधर्मीय होते.
झुंडबळी म्हणजे काय?
झुंडबळी म्हणजे जेव्हा किमान पाच माणसांचा जमाव एकत्रितपणे एखाद्या माणसाला किंवा माणसांच्या समुदायाला मारहाण करतो; त्यांच्या मालमत्तेचे नुकसान करतो; त्यांना शारीरिक दुखापत करतो आणि अशा घटनांमध्ये कधी त्या माणसांचा मृत्यूही होतो अशा प्रकारच्या हल्ल्याला झुंडबळी असे म्हटले जाते. अशा झुंडबळीच्या घटनेत सदर जमावाने लक्ष्य केलेला माणूस / माणसे चुकीच्या पद्धतीने वागून सदर जमावाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक भावना दुखावत आहे असे गृहीत धरले जाते. अशा घटनेत या जमावाची ती भावना किंवा आकलन वस्तुस्थितीवर आधारित आहे अथवा नाही ही बाब विचारात घेतली जात नाही.
२०२३मध्ये भारतातील झुंडबळी : एकूण झुंडबळी २१
महाराष्ट्र चार, आसाम तीन, हरियाणा तीन, उत्तर प्रदेश तीन, बिहार दोन, कर्नाटक दोन, मध्यप्रदेश दोन, दिल्ली एक, झारखंड एक. सन २०२३ मधील झुंडबळी घटनांमध्ये मारले गेलेले, जखमी झालेले आणि अटक झालेले धर्मनिहाय नागरिकांची वर्गवारी -
झुंडबळींच्या एकूण २१ घटनांपैकी १६ घटना भाजपशासित राज्यात घडल्या आहेत. दोन घटना जनता दल युनायटेड आणि राष्ट्रीय जनता पार्टी यांच्या संयुक्त सरकारचे राज्य असलेल्या बिहारमध्ये घडल्या होत्या. तर काँग्रेसचे सरकार असलेल्या राज्यात आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार असलेल्या राज्यात एक घटना घडली होती.
दुःखद गोष्ट अशी की गोमांस जवळ बाळगणे, गोमांस वाहतूक, गोवंश जनावरांची वाहतूक या निमित्तावरून तसेच मुस्लिम पुरुषांनी गैर मुस्लिम महिलांशी मैत्री केली, प्रेम संबंध असले तर या कारणांवरून मुस्लिम पुरुषांना उघड उघड निसंकोचपणे लक्ष्य करण्याचे आणि त्यांना झुंडबळीद्वारे ठार मारण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षात सतत वाढत आहे. झुंडबळी रोखण्यासाठी आणि झुंडबळींच्या गुन्ह्यांच्या तपासासाठी सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्त्वे जारी करून सुद्धा भाजपशासित राज्यांमध्ये झुंडबळी रोखण्यासाठी किंवा गुन्हेगारांवर कारवाई करण्याबाबत दुर्लक्ष केले जाते. भाजपशासित राज्याचे अशा घटनांचे वाढीव प्रमाण बघता हिंदुत्ववादी संघटनांच्या गुन्हेगारांना शिक्षा देण्याबाबत चालढकल केली जात आहे, अशी शंका घेण्यास जागा आहे.
झुंडबळींच्या घटनांची संख्या वाढण्याचे मुख्य कारण शासन याबाबत दुर्बळ आहे किंवा कारवाई करण्यात कमी पडते, हे आहे. हिंदुत्ववादी संघटनांकडून अशा घटनात पुढाकार घेणाऱ्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले जाते, त्यांना प्रोत्साहन दिले जाते. झुंडगिरी करणाऱ्या समुदायाचे नेते आपल्या कृत्याचे व्हिडिओ करून त्या चित्रफिती समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित करतात. त्याचप्रमाणे अशा प्रकारे झुंडबळी ठरणाऱ्या समाजातील लोकांकडून खंडणी वसुलीचे रॅकेट चालविले जाते. यामुळे समाजात झुंडबळी ही एक सर्वसामान्य आणि सर्वमान्य बाब होत चालली आहे. अशा घटनांमुळे सर्वसामान्य नागरिकांना कायदा हातात घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.
सन २०२३ मध्ये भारतातील झुंडबळी घटनांसाठी निमित्त ठरलेली कारणे-
हत्या - १२
लव जिहाद - २
अन्य - ७
एकूण - २१
एकूण झुंडबळींच्या संख्येत वाढ झाली आहे. यापैकी गो-हत्येच्या कारणासाठी बळी पडणाऱ्या घटनांमुळे त्या समाजातील नागरिकांना अनेक प्रकारचे परिणाम सहन करावे लागतात. 'मुस्लिम गोहत्या करतात' अशा प्रचाराचा फटका त्यांना बसतो. भारतातील एकूण झुंडबळीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक बळी हे गो-हत्येच्या कारणाने झाले आहेत. आसाममध्ये अशा प्रकारच्या तीन स्वतंत्र घटनांमध्ये तीन माणसांचा मृत्यू झाला होता. यापैकी पहिल्या घटनेत दारांग पोलिसांनी आसाम मधील हक यांच्या झुंडबळीसाठी पद्मझार येथील आणि शेजारच्या गावातील १४ आरोपींना अटक केली होती. आसाम मधील दुसऱ्या एका घटनेत २१ ऑगस्ट रोजी होजाई जिल्ह्यात हिफजूर रहमान याने गाय चोरली आहे असे जमावाने ठरवले आणि त्याची हत्त्या केली. या घटनेला जबाबदार आठ लोकांना पोलिसांनी अटक केली. आसाम मधील आणखी एका घटनेत मोरिगाव जिल्ह्यात २४ जुलै रोजी सद्दाम हुसेन याला जमावाने ठार मारले. त्यानंतर आणखी दोघांना गाईच्या चोरी संदर्भात जमावाने बेदम मारहाण केली होती. या घटने संदर्भात पाच जणांना अटक करण्यात आली होती.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
बिहारमधील दोन झुंडबळी घटनांमध्ये दोन माणसांना ठार मारण्यात आले होते. नसीम कुरेशी याला सरान जिल्ह्यात बन्शी छापरा तोला जवळील अशाहनी गावात सात मार्च रोजी गोमांस विक्रीच्या संशयावरून क्रूरपणे मारहाण करण्यात आली. ईकमत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना त्याच रात्री त्याचा मृत्यू झाला. बिहारमध्ये २९ जून रोजी दुसरी दुःखदायक घटना घडली होती. ५५ वर्षाचा अपंग मुस्लिम ड्रायव्हर मोहम्मद झहीरुद्दीन हा शरण जिल्ह्यात गोमांस वाहतूक करत आहे या संशयावरून जमावाचा बळी ठरला. तो आपल्या वाहनातून जनावरांची हाडे औषध उद्योगासाठी घेऊन जात होता.
शरण जिल्ह्यातील जलालपूर येथील खोरी पार्कच्या पोलिसहद्दीत ही घटना घडली. गौरा येथे असलेल्या हाडांच्या कारखान्यापर्यंत जाण्यासाठी ट्रकचा रस्ता ताजपुर मार्गे होता. त्या वाटेवर गाडीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने दुरुस्तीसाठी गाडी थांबवावी लागली होती. ड्रायव्हरने मदतीसाठी गावातल्या लोकांना बोलावल्यावर त्यांना ट्रक जवळ मास व हाडांचा वास आला. त्यांनी ट्रकमध्ये काय माल आहे याची चौकशी केली. ड्रायव्हरने सत्य सांगितल्यावरसुद्धा त्यांना गोमासाच्या वाहतुकीची शंका आली आणि त्याच्यावर हल्ला करण्यात आला.
हरयाणातील मेवात भाग मुस्लिमांना गायींच्या कत्तलीसाठी लक्ष्य करून नियमित खंडणी वसुली करण्यासाठी जाळे असलेला अशांत भाग म्हणून प्रसिद्ध आहे. २८ जानेवारी रोजी वारिस खान वय २२ आणि त्याचे मित्र नफिस आणि शौकीन यांच्या गाडीची टक्कर दुसऱ्या एका गाडीबरोबर झाली. या कारणासाठी गोरक्षकांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग करून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. गोरक्षकांचा असा आरोप होता, की हे तिघे गाय घेऊन कत्तलखान्याकडे निघाले होते. गोरक्षक सेंट्रो गाडीतून जात असताना ताउरू - भिवाडी रस्त्यावर त्यांची एका व्हॅनशी टक्कर झाली. या अपघातानंतर झालेल्या हल्ल्यात वारीस खान आणि त्याचे दोन मित्र जखमी झाले. वारिस खान याच्यावर उपचार सुरू असताना तो मरण पावला. तर त्याच्या दोन मित्रांना किरकोळ दुखापती झाल्या. परंतु त्यांचा जीव वाचला. भरतपूर येथील दुसऱ्या एका घटनेत जुनेद (वय ३९) आणि नासिर (वय २१) यांचे गोरक्षकांनी अपहरण केले आणि त्यांना जिवंत जाळले. १६ फेब्रुवारी रोजी दिवाणी येथे जळलेल्या अवस्थेतील वाहन आणि दोन मृतदेह मिळाले. गोरक्षक आणि बजरंग दलाचे काम करणारा मोनू मनेसर याला राजस्थान पोलिसांनी नासिर आणि जुनेदच्या खुनासाठी जबाबदार धरले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
कर्नाटकात एक एप्रिल रोजी इद्रिस पाशा हा कनकपुर तालुक्यातील सतानूर येथे मृत अवस्थेत सापडला. त्यापूर्वी एक तास गोरक्षकांनी त्यांची गाडी अडवून गाडीतील तिघांवर हल्ला केला होता. पाशाच्या कुटुंबाचा असा आरोप होता की त्याच्या शरीरावरील जखमा लक्षात घेता त्याला ठार मारण्यापूर्वी गोरक्षकांनी त्याचा छळ केला होता. सतानूर पोलिसांनी गोरक्षक नेता पुनीत केरेहळ्ळी आणि त्याच्या साथीदारांवर खुनाचा गुन्हा दाखल केला.
महाराष्ट्रात भिवंडी येथील रहिवासी लुकमन सुलेमान अन्सारी हा ८ जून रोजी दोन बैल आणि एक वासरू शहापूर येथून पडघा येथे वाहतूक करत असताना त्याच्यावर राष्ट्रीय बजरंग दल या संघटनेशी संबंधित पंधरा-वीस जणांच्या जमावाने हल्ला केला. या हल्ल्यात अंसारी मारला गेला आणि त्याचे सहकारी अतिक पड्डि (३६) आणि अकिल गुलाम गवंडी (२५) जखमी झाले.
दुसऱ्या एका घटनेत नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी जवळ अफान अन्सारी (३२) आणि नासिर कुरेशी हे दोघे कारमधून मुंबईला मांस नेत असताना त्यांना दहा-पंधरा गोरक्षकांच्या जमावाने अडवून त्यांच्यावर लोखंडी रॉड आणि लाकडी दंडुक्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यापैकी आफान अन्सारी मृत्युमुखी पडला. दुसऱ्या एका घटनेत २३ एप्रिल रोजी लातूरमध्ये गुरांची वाहतूक करणारा असिफ कुरेशी गोरक्षकांकडून पकडला गेला. असिफ कुरेशी याला दोन पोलीस कॉन्स्टेबल आणि तीन होमगार्डच्या समक्ष एका गाईसमोर डोके टेकून माफी मागण्यास सांगितले गेले. या घटनेत पाच जणांवर पोलीस कारवाई करण्यात आली.
आंतरधर्मीय मैत्री आणि परस्पर विश्वासाचे नाते टिकवणारा अवकाश दिवसेंदिवस कमी होत चालल्याचे दिसत आहे. मुस्लिम पुरुष मुस्लिमेतर स्त्रियांबरोबर बोलताना आढळले किंवा संपर्कात असल्याचे समोर आले, तर हिंदुत्ववादी लोक त्यांना लक्ष्य करतात. कर्नाटकात एक जून रोजी तीन मुस्लिम मुले त्यांच्या हिंदू मित्रांबरोबर मंगलुरु येथील सोमेश्वर समुद्रकिनाऱ्यावर मौजमजा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी काही हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. तीन मुली आणि तीन मुले असा हा मित्र-मैत्रिणींचा गट समुद्रकिनाऱ्यावर मजा करत असताना काही लोक त्यांच्या जवळ आले. त्यांनी या तीन मुलांना जाब विचारला. त्यावेळी त्यांच्यात झालेल्या वादावादीमुळे त्यांनी या तीन मुस्लिम मुलांना मारहाण केली आणि हल्लेखोर पळून गेले. या गुन्ह्यासंबंधी पोलिसांनी चार जणांना अटक केली आणि अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले (राज,२०२३).
महाराष्ट्रात १६ ऑगस्ट रोजी एक व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित झाला. या व्हिडिओमध्ये एका मुस्लिम तरुणाला तो हिंदू तरुणी बरोबर जात असताना मुंबईतील बांद्रा टर्मिनसवर मारहाण करण्यात आल्याचे दिसत होते. या व्हिडिओमध्ये त्या मुस्लिम तरुणाला काही पुरुष फरफटत रेल्वे स्टेशनच्या बाहेर नेताना दिसत होते. त्याचवेळी त्याला मारहाण केली जात होती आणि 'जय श्रीराम' तसेच 'लव जिहाद बंद करो' अशा घोषणा देताना दिसत होते.
झुंडबळीसाठी अन्य कारणे : चोरीचा संशय :
२६ सप्टेंबर रोजी उत्तर पूर्व दिल्लीतील नंदनगरी परिसरात २६ वर्षीय इस्रार वाहिद याला जमावाने एका खांबाला बांधून काठी आणि दांडक्यांनी बेदम मारहाण केली. वहीदने चोरी केली आहे अशा संशयावरून त्याला मारहाण करण्यात येत होती. त्याच्या कुटुंबीयांनी असे सांगितले की, या घटनेत तो मारला गेला. वास्तविक तो नंद नगरी येथे गणेश चतुर्थी मांडवात दिली जाणारी केळी घेत होता. वाहिद हा रोजंदारीवर काम करणारा एक कामगार होता. घटनास्थळापासून केवळ पाचशे मीटर अंतरावर सुंदर नगरी येथे तो राहत होता. या घटनेतील आरोपी म्हणून सात जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यापैकी एक सतरा वर्षीय अल्पवयीन तरुण आहे. पोलिसांनी असे सांगितले की या सर्व संशयित आरोपींनी आपण वहीद चोर आहे या संशयावरून त्याला मारहाण केली असे सांगितले. या सहा जणांमध्ये कमाल (२३), मनोज (१९), मोहम्मद युनूस (२०), किशन (१९), पप्पू (२४) आणि लकी (१९) यांचा समावेश आहे. (भंडारी, २०२३).
झारखंड :
वाजिद अन्सारी (२३) हा चान्हो तहसीलमधील पांढरी येथे रंगकाम करणारा मजूर होता. तो सात एप्रिल रोजी माटोली येथे राहणाऱ्या जीवन ओरान यांच्या घरी गेला होता. त्यावेळेस गावकऱ्यांनी अन्सारी याला पकडून एका खांबाला बांधून प्रचंड मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. या घटनेबाबत दोन गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यापैकी मृत अन्सारी याच्या कुटुंबीयांनी त्याच्या खूनाची तक्रार दाखल केली आहे. तर गावकऱ्यांनी अन्सारी याच्या विरुद्ध चोरीची तक्रार दाखल केली आहे. (दि हिंदुस्थान टाइम्स, २०२३).
हरियाणा :
नूह शहरात तीन मुस्लिम पुरुषांना तरुणांच्या विविध गटानी मारहाण केल्याची घटना घडली. या मुस्लिम पुरुषांना त्यांची नावे विचारली गेली. त्या मुस्लिम पुरुषांनी 'वेगळे कपडे का घातले?' असा आक्षेप घेऊन त्यांना मारहाण करण्यात आली. हे हल्ले २५ ऑगस्ट रोजी केले गेले. त्याच दिवशी नूहमध्ये 'ब्रिज मंडल जलाभिषेक यात्रा' काढण्यात आली होती. नासिर हुसेन हा ट्रक ड्रायव्हर आणि त्याचा मदतनीस अश्फाक हे दोघे माल पोहोचवून परत आपल्या घरी निघाले होते. त्यावेळेस एका कारमधून आलेल्या दोघा जणांनी सेक्टर ६५ जवळ त्यांची गाडी अडविली. नासिर आणि अश्फाक यांनी वेगळ्या प्रकारचे कपडे घातले असा अक्षेप घेत त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. (आनंद, २०२३).
मध्य प्रदेश :
मध्य पदेशातील खांडवा येथे सप्टेंबर महिन्यात समाज माध्यमावरील एका पोस्टचे निमित्त करुन जमावाच्या एका गटाकडून एका मुस्लिम माणसाला मारहाण करून भोसकण्यात आल्याची घटना घडली होती. (द बिजनेस स्टैंडर्ड, २०२३).
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
................................................................................................................................................................
उत्तर प्रदेश :
उत्तर प्रदेशातील मोरादाबाद शहरातील ॲल्युमिनियम व्यापारी मोहम्मद असीम हुसेन (वय ४५) यांना १२ जानेवारी रोजी प्रवास करताना चालत्या रेल्वेत त्यांच्या सहप्रवाशांनी पट्ट्याने एक तास प्रचंड मारहाण केली. नंतर त्यांना चालत्या रेल्वेमधून गाडी बाहेर फेकून देण्यात आले. मोहम्मद असीम हुसेन याने वीस वर्षांच्या एका महिलेला लैंगिक त्रास दिला अशी तक्रार नोंदविण्यात आली. (सिंग, २०२३)
१८ ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेशमध्ये आणखी एक धक्कादायक घटना नोंदवली गेली. सीतापुर जिल्ह्यातील एक पुरुष आणि त्याची पत्नी अशा दोघांना शेजाऱ्यापाजाऱ्यांनी लाठ्या काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण केल्यामुळे ते दोघे मरण पावले. राजेपूर गावात राहणाऱ्या अब्बास आणि त्यांची पत्नी कमरूल निशा या दोघांना गावातील लोकांनी ठार मारले होते. ही घटना हरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. नवरा बायको दोघांचाही या मारहाणीत मृत्यू झाला होता. सर्व आरोपी मारहाण करून घटनास्थळावरून पसार झाले होते. या घटनेची पाळेमुळे शोधताना असे समोर आले की काही वर्षांपूर्वी अब्बास यांचा मुलगा शेजारच्या घरातील मुलीसह पळून गेला होता. या घटनेनंतर पोलीस स्टेशनवर गुन्हा नोंदविण्यात आला होता आणि अब्बास यांच्या मुलाला सदर गुन्ह्यात तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. अब्बास यांचा मुलगा तुरुंगातून नुकताच सुटला होता. मुलीच्या कुटुंबातील काही सदस्यांनी या जोडप्यावर हल्ला करण्याचा कट रचला होता (टाइम्स ऑफ इंडिया, २०२३)
उत्तर प्रदेशातील हापुर जिल्ह्यात २४ ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या उत्सवात सामील झालेल्या एका गटाच्या माणसाला इर्शाद मोहम्मद (वय २५) याच्या दुचाकीची धडक बसली. त्यामुळे चिडलेल्या लोकांनी इर्शाद मोहम्मद याच्यावर हल्ला केला. ही घटना लोहारी गावाबाहेर घडली होती. वासिम हा इर्शादला मदत करायला गेला होता. या हल्ल्यात इर्शाद मोहम्मद मारला गेला आणि वासिम हा जखमी झाला. या घटनेसंदर्भात दोन लोकांना अटक करण्यात आली (शर्मा, २०२३)
शासनाची भूमिका :
या झुंडबळी हिंसाचाराला शासन, पोलीस आणि राजकीय प्रतिनिधी या सर्वांनी सर्व बाबतीत दिलेला प्रतिसाद अत्यंत अपुरा आणि सदोष आहे. गेली काही वर्षे झुंडबळीचा धोका आणि घटना सतत वाढत असूनसुद्धा या वारंवार घडणाऱ्या घटनांची नोंद घेण्यात सरकार कमी पडत आहे. या वाढत्या झुंडबळींच्या घटनांची नोंद घेण्यात आणि त्यावर उपाय योजना करण्यास शासन अजिबात उत्सुक नाही याचेच हे निदर्शक आहे. अशा घटनांची अधिकृत नोंद ठेवण्यातील सरकारची अनास्था म्हणजे झुंडबळीच्या वाढत्या प्रकारांना तोंड देण्यास आणि याचा प्रसार रोखण्यात सरकारचे अपयश दर्शविते. शासनाने कारवाई करण्यात दर्शविलेल्या असमर्थतेमुळे निर्दोष नागरिकांना हिंसाचाराचे लक्ष्य बनवण्यासाठी हिंदुत्ववादी आक्रमक टोळ्यांची हिम्मत आणि ताकद वाढत आहे.
‘विद्वेष- हिंसा - बहिष्कार : सामाजिक ऐक्याला सुरूंग!’ - सलोखा संपर्क गट
देणगीमूल्य - ४० रुपये, संपर्क - प्रमोद मुजुमदार - ९३२६५१६२५९
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment