‘ने हि वेरेन वेरानि’ : ‘धम्मपदां’चा विचारवारसा सांगत ‘अहिंसेचं तत्त्वज्ञान’ मांडू पाहणारं चिंतनशील नाटक
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
बळवंत मगदूम
  • ‘ने हि वेरेन वेरानि’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Sat , 10 August 2024
  • ग्रंथनामा शिफारस ने हि वेरेन वेरानि धम्मपद Dhammapada

भगवान हिरे हे बोधी रंगभूमीवरील एक महत्त्वाचे नाटककार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यानं नाट्यलेखन करणाऱ्या या नाटककाराच्या नावावर आजअखेर १२ नाटकं आहेत. विषयांचं वैविध्य, प्रयोगशीलता आणि विशिष्ट भूमिकेतून नाट्यलेखन, ही त्रिसूत्री त्यांनी आपल्या नाट्यलेखनात सांभाळलेली दिसते. ‘ने हि वेरेन वेरानि’ हे त्यांचं एक नवं नाटक. हा ‘धम्मपदा’तील एक श्लोक आहे-

‘ने हि वेरेन वेरानि सम्मन्तीध कुदाचनं ।

अ वेरेन च सम्मन्ति एस धम्मो सनन्तनो ।।

(वैरानं वैर कधीही शांत होत नाही, तर न-र्वेरामुळेच वैर शांत होतं.)

याचा चपखल वापर करून नाटककाराने या दोन अंकी नाटकातून ‘अहिंसेचं तत्त्वज्ञान’ सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

‘धम्मपदा’तील ‘यमक वग्गो’ (यमकवर्ग) या पहिल्या भागातील पाचवा श्लोक म्हणजे या नाटकाचं शीर्षक. ‘धम्मपद’ हा मूळ पाली भाषेतील ग्रंथ. हा नीतिपर धार्मिक जीवन कसं जगता येईल, हे सांगणाऱ्या वचनांचा स्फुटसंग्रह आहे. त्यात २६ अध्याय आणि ४२३ श्लोक आहेत. त्यांत सर्व पापांपासून दूर राहावं, कुशल गोष्टी संपादन कराव्यात, स्वत:च्या चित्ताची परिशुद्धी करावी, क्षमाशील वृत्ती ठेवावी, कोणाला त्रास देण्याची किंवा इजा करण्याची प्रवृत्ती ठेवू नये, हे तत्त्वज्ञान सांगितलं आहे.

धम्मपदा’चे जगभरातील अनेक भाषांत अनुवादित झाले आहेत. मराठीत नरेंद्र बोखारे यांनी भदन्त आनंद कौसल्यायन यांच्या हिंदी आवृत्तीवरून केलेला आणि पुरुषोत्तम मंगेश लाड यांचा, हे मराठीतील ‘धम्मपदा’चे प्रसिद्ध अनुवाद आहेत.

‘ने हि वेरेन वेरानि हे’ हे नाटक २०१५च्या ५४व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेत सादर झालं आहे. एका काल्पनिक कथानकाची उभारणी करत पात्रांची वैशिष्ट्यपूर्ण उभारणी, हा नाटकाचा विशेष आहे. ददाना, दलाभ, शिम्ब, रावत. लारी, युग्मन, दिगंत, सम्पाक, कल्पी, तुती, भुई, सांजी, अजानी, पिपीलिका, फाहा, खंजन, टखना, गाजी, दमन अशी २० पात्रे आणि इतर जवळपास ४१ पात्रं या नाटकात आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

ही वेरमणि बेट, दोरो बेट आणि गोरांग बेट या तीन बेटांची कथा आहे. “बेटांची ही नावं वाचून हे नाटक खूप जुन्या काळातील घटनांविषयी आहे, असे वाटेल, पण ते तसं नाही. ते कधीही घडू शकतं. सारं जगच विविध बेटांमध्ये विभाजित झालेलं दिसेल”, असा अभिप्राय ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नोंदवला आहे.  

अवधूत परळकर यांनी म्हटल्याप्रमाणे “रूढ अर्थाने या नाटकात नायक-खलनायक अशी विभागणी नाही. वाट सापडलेले आणि वाट न चुकलेले अशा दोन प्रकारच्या मानवी समूहांतला हा संघर्ष आहे.” अर्थात हा संघर्ष सनातन काळापासून चालत आलेला आहे. नाटककाराने हा संघर्ष ‘धम्मपदां’च्या आधारे उभा केला आहे.

वेरमणि व दोरो या बेटांवरील नागरिक एकमेकांना वैरी समजत असतात. त्यासाठी प्रसंगी कमालीची टोकाची भूमिका घेतात; तर गोरांग या तिसऱ्या बेटावरील नागरिक दारोवासियांच्या कारवायांना मदत करत असतं.

हे नाटक हिंसा आणि अहिंसा, क्रूरता आणि मानवता या दोन प्रवृत्तीतील संघर्ष आहे. एका प्रवृतीचं अजानी प्रतिनिधित्व करतो, तर रावत दुसऱ्या प्रवृत्तीचं. अजानी विस्तारवादी दृष्टीकोन असणारा शासक असतो. त्याला दारो बेटाची दहशत निर्माण करायची असते. “आपल्या जीवनप्रणालीचा चहूओर प्रसार व्हावा. अलमदुनियेत, प्रत्येक बेटावर आपली हुकूमत असावी, राज्य असावं, आपली दहशत कायम राहावी”, हे अजानीचं स्वप्न असतं.

पण ते रावत साकार होऊ देत नाही. अजानी मात्र बेट सोडून पळून जाईपर्यंत आपले प्रयत्न सुरू ठेवतो. त्याला प्रश्न विचारणाऱ्या, त्याच्या मताच्या विरोध करणाऱ्या साऱ्या व्यवस्था तो मोडून काढतो. कुणी अधिकचा विरोध केला, तर त्याचा खून (तरुण, पिपीलिका) करतो. शस्त्रांच्या बळावरच आपलं स्वप्न सत्यात उतरणार असल्यामुळे तो आपली शस्त्रं अधिकाधिक तंत्रशुद्ध, अत्याधुनिक कशी होतील, यासाठी प्रयत्नशील राहतो. त्यासाठी गाजा, दमन, फाहा, पिपीलिका व खंदा या साथीदारांना सतत चेतवतो. त्यांना प्रशिक्षित करून वेरमणि बेटावर हल्ला करण्यासाठी पाठवतो.

अजानी आपल्या अनुयायांना ‘दारोची दहशत चिरायु होवो’ या घोषणेचा अंगीकार करायला लावून त्यांना मनोरंजन, चैन, आराम किंवा मजा – हाजा यासाठी तुमचा जन्म नाही, हे सतत सांगत राहतो. “आपण कसंही करून जिंकण्यासाठीच प्रयत्न करणाऱ्यांच्या जीवनप्रणालीत जन्माला आलो आहोत. आणि या मार्गदात्याच्या प्रतिष्ठेचं आपल्याला संरक्षण करायचंय, ज्याची सुरुवात विश्वाच्या जन्मापासून झाली आहे”, हेही त्यांच्यावर बिंबवत राहतो.

रावत या उलट असतो. तो बेटावरील अनेकांचे खून होऊनही शस्त्राने उत्तर देणं टाळतो. म्हणूनच विशिष्ट प्रकारचा भाला घेऊन आलेल्या शिम्बला उद्देशून रावत म्हणतो, “शस्त्रं युद्धं जिंकतात, शांती नाही बेटा. शस्त्रं केवळ मुडद्यांची संख्या वाढवतात. माणुसकीचा झरा नाही निर्माण करत.” त्यामुळे युद्धानं कधीच कुणाचं भल झालं नाही, या विचारावर तो ठाम असतो, राहतो.

‘भवतु सब्ब मंगलम’ ही त्याची भूमिकाच शेवटी त्याचा प्राण घेते. पण तो अहिंसेची शिकवण देऊनच प्राण सोडतो. रावतनंतर वेरमणि बेटाची धुरा सांभाळणारा दलाभ त्याचाच विचार पुढे घेऊन जातो. इथं हे नाटक संपतं.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

बुद्धाच्या तत्त्वज्ञाना प्रचार करण्यासाठी या नाटकाची रचना केली आहे. यातील वेरमणि बेटावरील हस्तीदेवतेचं प्रार्थनास्थळ, अंतेष्टी, संगीती घेऊन रावत निवडणं, या वैशिष्ट्यपूर्ण घटना आहेत. त्या बौद्ध धर्माशी, बुद्धाच्या चरित्राशी संबधित आहेत. सुरुवातीला रावत अजानीसारखाच आक्रमक असतो. मात्र एका युद्धात जीवित व्यक्तींपेक्षा अधिक लोक मृत्यूमुखी पडतात, कित्येक घरात वंशही उरत नाही, चार दिवस सतत चिता जळत राहतात, हे पाहिल्यानंतर त्याचं मन पुन्हा युद्धाला तयार होत नाही.

रावतची ही कृती कलिंगाच्या युद्धात झालेल्या मनुष्यहानी पाहून व्यथित झालेल्या सम्राट अशोकाची आठवण करून देते. याच अशोकाने पुढे जाऊन प्रचलित वैदिक परंपरा झुगारून हिंसेचा त्याग करत मानवतावादी बौद्ध धर्माचा स्वीकार केला.  

रावत एका प्रसंगात दारो बेटावरील पकडलेल्या सैनिकाला ‘अत्ताही अत्तनो नाथो काई नाथो परोसिय’ हे वचन ऐकवतो. हा ‘धम्मपदा’तील १६०वा श्लोक. तो माणसाला त्याच्या ‘स्व’ची जाणीव करून देतो.

असं असलं, तरी या नाटकात काही उणीवाही आहेत. काल्पनिक कथानक रचताना उभी केलेली पात्रं अदभुततेचा प्रत्यय देत असली, तरी दमन, दिगंत, दलाभ, ददाना ही ‘द’ अद्याक्षराची चार पात्रं आणि त्यांच्याशी निगडित घटनाप्रसंग लक्षात ठेवणं जिकिरीचं होतं. अर्थात ही उणीव मान्य करून हे नाटक ‘अहिंसेचं तत्त्वज्ञान’ चांगल्या प्रकारे मांडण्याचा प्रयत्न करतं, हे नक्की.  

‘ने हि वेरेन वेरानि’ - भगवान कृष्णा हिरे

वैशाली प्रकाशन, पुणे | मूल्य - १५० रुपये.

.................................................................................................................................................................

लेखक बळवंत मारुती मगदूम श्री. आर. आर. पाटील महाविद्यालय, सावळज ता. तासगाव येथे शिक्षक आहेत. 

balvantmagdum2020@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......