अजूनकाही
शेतकऱ्यांना वाली कोण, असा प्रश्न जेव्हा विचारला जातो, तेव्हा ‘जाणत्या जनां’कडून जे उत्तर येतं, त्याला फारसा अर्थ नसतो. त्या उत्तरानं आतापर्यत केवळ तात्कालिक समाधान झालेलं दिसून येतं. आपल्याला स्वातंत्र्य मिळून जितकी वर्षं झाली, त्यामध्ये भारतीय शेती आणि भारतीय शेतकऱ्याच्या पदरात मातीच पडली, हे सत्य नाकारता येत नाही.
जगभरामध्ये असे कित्येक देश आहेत, ज्यांच्याकडे शेतीसाठी पुरेशी जमीन नसताना, पाण्याची टंचाई असताना, त्यांनी शेती व्यवसायात स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्या देशांमधील शेतकरी आणि राज्यकर्ते यांच्यातील सुसंवाद त्यांची ध्येयधोरणं यांचं कौतुक करावं लागेल. भारतात मात्र केवळ नागड्या योजनांचा पाऊस आहे.
आजही शेतकरी, त्यांचे शेतीविषयक प्रश्न संपलेले नाहीत. त्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. त्याचा आकडा आपल्याला गांभीर्यानं शेतीविषयक धोरणांमध्ये बदल करण्याचे सुचवतो. मात्र दलाल राजकारणी केवळ निवडणुकांमध्ये विजयाचा गुलाल उधळण्यापुरताच शेतीचा विषय तोंडी लावतात.
या पार्श्वभूमीवर देवेंद्र शिरुरकर या पत्रकाराची ‘विक्रम अँड वेताळ @ हैबतपूर’ ही कादंबरी डोकं झणाणून टाकते. त्यानं ज्या प्रकारे महाराष्ट्रातील राजकारण, त्या राजकारणाची खालावलेली पातळी, त्याचा शेती अन् शेतकऱ्यांवर कशा प्रकारे परिणाम झाला, याचे परिणामकारक चित्रण केले आहे.
आजवर राज्यातील बड्या राजकारण्यांनी आपला स्वार्थ साधत शेतकऱ्यांना ‘बळीचा बकरा’ कशा प्रकारे बनवले, याचे वेगळे दाखले देण्याची गरज नाही. काहीही झाले तरी आपलं घर, राजकारण अन् सत्ता कशी सुरक्षित राहील, याकडे लक्ष देत शेतकऱ्यांचा विश्वासघात करण्याचं काम सत्ताधारी आणि विरोधकांनी केलेलं आहे.
या कादंबरीत हे सारं चित्रण कमालीच्या उद्वेगानं येतं. त्याला वेगळी धार आहे, धग आहे. त्या धगधगीत मात्र बिचारे शेतकरी पोळून निघाले आहेत. ज्यांना ‘जाणते राजकारणी’ म्हणतो, त्यांनी शेतकऱ्यांच्या हातावर काय ठेवलं, शेतकऱ्यांच्या आत्महत्या का थांबत नाहीत, त्यांच्या शेतमालाला हमीभाव का मिळत नाही?
सहकारी कारखान्यांचे खाजगीकरण का आणि कसे झाले, दरवेळी तेच ते राजकारणी का निवडून येतात, आजवर महाराष्ट्रात शेतकरी संघटना किंवा दुसऱ्या तशाच एका विचारधारेच्या पक्षाचा मुख्यमंत्री वा बडा नेता का झाला नाही, शेतकऱ्यांच्या योजना नेहमीच का फसतात, शेतकरी राजकारण्यांच्या आवाहनाला का बळी पडतात, शेतकऱ्यांमध्येदेखील जातीचे राजकारण होते का, त्याला खतपाणी घातले जाते का, यासारखेच अनेक मूलभूत प्रश्न या कादंबरीतून समोर येतात.
कादंबरीचा नायक विक्रम शिंदे हा शेतकरी संघटनेचा पूर्णवेळ कार्यकर्ता आहे. व्यवस्थेनं त्याला नेता व्हावं, अशी परिस्थिती निर्माण केली आहे. त्याच्या पाठीशी गावातील प्रतिष्ठित नागरीक अन् शेतकऱ्यांच्या प्रश्नांची चांगली जाण असणारे, शेतकरी संघटनेचे विचार जगण्यात उतरवलेले भानुदास पाटील आहेत. पत्रकार मित्र अनुराग आहे. दुसरीकडे सतत कोंडीत पकडणारे ‘महाराष्ट्रवादी पक्षा’चे आमदार आबासाहेब पाटील आहेत. ‘लोकशाही जनता पक्षा’चे दिनकरराव पाटील आहेत.
थोडक्यात, काय तर प्रस्थापित विरोधात नवखा विक्रम, अशी ही लढाई आहे. शेतकऱ्यांविषयी तळमळ असणाऱ्या विक्रमनं पंचायत समितीची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय.
त्या निवडणुकीला आबासाहेबांचा मुलगा विश्वजित उभा आहे. आपल्यासोबत मुलालाही राजकारणात उतरवण्याचा त्यांचा मानस आहे. काहीही झालं, तरी राजकारणातील घराणेशाही ही लोकांच्या गळी उतरवण्याचा मोह हा भल्याभल्या राजकारण्यांना आवरत नाही. दोन तीन टर्म आमदार, खासदार होऊनही तुम्ही जनतेचा, गावाचा, शहराचा विकास करू शकत नसाल, तरी तुम्ही चौथ्यांदा, पाचव्यांदा निवडणूक कशी काय लढवता, असा प्रश्न मतदारांना पडत नाही.
ही मंडळी आपला मुलगा, पुतण्या, बहीण, भाचा असं कुणाकुणाला उभं करतात आणि वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करून निवडूनही आणतात. हे सारं कसं शक्य होतं आणि हे प्रत्येक वेळी कसं घडतं, याविषयी जाणून घ्यायचं असल्यास या कादंबरीच्या वाट्याला जावं लागेल. ही वाफाळत्या चहाचे घुटके घेत चवीनं वाचण्याची कादंबरी नाही.
तसं पाहिल्यास केवळ महाराष्ट्राच्या राजकारणापुरता हा विषय सीमित नाही, तर भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये शेती अन् शेतकऱ्यांच्या जगण्याचा प्रश्न किती गंभीर आहे, यावर ही कादंबरी भाष्य करते. ग्रामीण भागातील लोकजीवन, रीतभात, परंपरा, गावगाडा या साऱ्यांचे विलक्षण प्रभावी रेखाटन कादंबरीतून आपल्या समोर येते. भानुदास पाटील शेतकरी संघटनेच्या विचारांचा आहे. तो तसा का आहे, त्यामागील त्याची पार्श्वभूमी लेखकानं ज्या प्रकारे उलगडून सांगितली आहे, त्यातून कादंबरीची वातावरण निर्मिती लक्ष वेधून घेताना दिसते.
विक्रमची पहिली पंचायत समितीची निवडणूक त्या वेळी प्रस्थापितांचा झालेला जळफळाट, जातीवादानं वर काढलेलं डोकं, गाववेशीवर रंगलेल्या गप्पा, रानात होणारं शेतकऱ्यांच होणारं विचारमंथन कादंबरीतून आपल्यासमोर उलगडत जातं.
आपण ज्यांचा जयघोष करतो, ज्यांच्या नावानं हजारो कार्यकर्ते दिवस रात्र एक करतात, पण बड्या नेत्यांना शेतकऱ्यांपेक्षा आपली प्रतिष्ठा अन् सन्मान किती महत्त्वाचा असतो, याचे चित्रण वाचण्यासारखे आहे. केवळ कुण्या एका विशिष्ट विचाराच्या, धोरणाच्या नेत्यावर लेखकाचा रोख वा राग नाही. त्याचे केवळ एकच म्हणणे आहे : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अधोगतीला कारणीभूत कोण?
देवेंद्रची ही पहिली कादंबरी आहे, मात्र ती वाचल्यानंतर त्यात कुठेही नवखेपणा दिसत नाही. कुणाचीही भीडभाड न ठेवता सणसण करत ही कादंबरी आपली वेगळी वाट निर्माण करते. ठरलेल्या मुक्कामावर जाऊन ती पोचते. या प्रवासात मात्र आपल्या डोक्यात प्रश्नांचे हजार भुंगे सोडते. त्याच त्याच राजकारण्यांना मतदान करण्यात तुम्हाला काहीच कसे वाटत नाही, गेल्या पाच पिढ्यांपासून तेच जर मोठ्या आमदारकी, खासदारकी, जिल्हा परिषद यांच्यावर वर्चस्व ठेवणार असतील, तर मग आपण फक्त गुलाल उधाळायचा का, त्यांच्या मिरवणुकांमध्ये नाचायचे का, असा प्रश्न लेखक धाडसानं विचारतो.
विक्रम आमदारकीची निवडणूक लढवायची ठरवतो. दोन टर्म आमदार असलेल्या आबासाहेबांसमोर विक्रम एक प्यादं असतो. आतापर्यंत आबासाहेबांनी जी आमिषं त्याला दाखवली, त्याला तो बळी न पडता त्यांना आव्हान देण्यास तयार होतो.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
विक्रम जीवाचं रान करून विधानसभेची निवडणूक लढवतो खरा, पण जनता त्याला कौल देते का, आबासाहेबाच्या वर्चस्वाला धक्का देते का अन् सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी संघटनेच्या भानुदास पाटलांचा शब्द खरा करून दाखवते का, हे सारे प्रश्न देवेंद्रनं उभे केले आहेत.
महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेलं आहे. पुन्हा एकदा वेगवेगळ्या घडामोडींना वेग आला आहे. जे नेते गेल्या निवडणुकीत एकमेकांचे कौतुक करत होते, तेच आता एकमेकांवर शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप करू लागले आहेत. विविध योजनांचा पाऊस पडू लागला आहे. अशा कालावधीत ही कादंबरी वाचायलाच हवी, हे आवर्जून सांगावेसे वाटते.
या कादंबरीनं शेतकऱ्यांच्या प्रश्नाला, त्यांच्या सद्यस्थितीला, त्यांच्यावर केल्या गेलेल्या अन्यायाला आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ‘जगाचा पोशिंदा’ म्हणून समजल्या गेलेल्या बळीराजाची व्यथा नव्या परिमाणाच्या माध्यमातून मांडली आहे. ती जाणून घेण्यासाठी आणि वेताळरूपी राजकीय नेत्यांनी बळीराजाची जी गत केली आहे, ती समजून घेण्यासाठी कादंबरी वाचणं गरजेचं आहे.
नव्या पिढीलाही ज्या राजकारण्यांनी भुरळ घातली आहे, त्यांचा खरा चेहरा कादंबरीकारानं उघडकीस आणला आहे. केवळ कोणत्या वैयक्तिक आकसापोटी त्यानं हे केलेलं नाही. त्याच्या आरोपांना तर्काची जोड आहे. विश्लेषणात्मक मांडणी आहे. खूप सारे पुरावे आहेत. त्यामुळे ही कादंबरी कुण्या एका विशिष्ट विचारधारेची न राहत नाही. ही कादंबरी जे आपल्यासमोर घडते, पण त्याकडे आपण कळत-नकळत कानाडोळा करतो, त्याकडे सजग वृत्तीनं पाहण्यास प्रवृत्त करते.
.................................................................................................................................................................
‘विक्रम अँड वेताळ @ हैबतपूर’ - देवेंद्र शिरुरकर
देशमुख आणि कंपनी (पब्लिशर्स) प्रा. लि. , पुणे
पाने – ३००, मूल्य – ४५० रुपये.
.................................................................................................................................................................
लेखक युगंधर ताजणे पत्रकार आणि वाचक आहेत.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment