अजूनकाही
‘घेतलंय स्टेअरिंग हाती’ हा पद्मरेखा धनकर यांचा नवा कवितासंग्रह नुकताच शब्दालय प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे. या संग्रहाला प्रसिद्ध कवयित्री डॉ. प्रज्ञा दया पवार यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश…
.................................................................................................................................................................
‘घेतलंय स्टेअरिंग हाती’ हा पद्मरेखा धनकर यांचा कवितासंग्रह शीर्षकातूनच नव्या स्त्री-भानाची ग्वाही देणारा, स्त्रीच्या कर्तेपणाला अधोरेखित करणारा आणि अनेकस्तरीय वास्तवाच्या गुंतागुंतीचा तीव्र, रोकडा प्रत्यय देणारा कवितासंग्रह आहे.
नव्वदोत्तर मराठी कवितेच्या प्रवाहाशी पद्मरेखा यांच्या कवितेचे अन्योन्य नाते आहे. आशयविश्व, कवितेची रूपे, प्रतिमासृष्टी आणि त्याच्याशी अभिन्नपणे जोडला गेलेला बहुआयामी भोवताल, अशा सर्व पातळ्यांवर धनकर यांची कविता नव्वदोत्तर अभिव्यक्तीच्या ठळक खुणा स्वतःमध्ये वागवते. त्यांच्या कवितेत नव्वदोत्तरी पहिल्या दशकात लिहित्या झालेल्या स्त्रीवादी कवयित्रींच्या कवितेचा पायरव ऐकू येतो, परंतु तो पचवून, त्या प्रभावांचे आंतरिकीकरण करून पद्मरेखा त्यांच्या स्वतःच्या कवितागत अनुभवांचा ठसा उमटवण्यात यशस्वी झाल्या आहेत.
एखादा कवी / कवयित्री कुठले पूर्वसुरी आपले मानतो/ मानते, हेदेखील अनेक अर्थाने महत्त्वाचे असते. आपली वाड्मयीन भूमी नेमकी कोणती आहे? कोणत्या मातीवर आपण उभे आहोत? कशाशी आहे नेमका आपला अनुबंध? हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. याबाबत धनकर यांचे नाते मराठीतील स्त्रीवादी कवितेच्या नवायनाशी, त्यात निहित असलेल्या विद्रोहाच्या स्फोटक, ज्वालाग्राही अभिव्यक्तीशी, पितृसत्ताक व्यवस्थाशरण मानसिकतेशी द्रोह करणाऱ्या बंडखोरीशी आहे.
त्यांच्या संग्रहाचे ‘घेतलंय स्टेअरिंग हाती’ हे शीर्षकच याचा ढळढळीत पुरावा आहे! ही कृती ‘स्व’ला केंद्रस्थानी आणणारी आहे. परिघाबाहेर असलेल्या स्त्रीला तिच्या दुय्यम स्थानावरून कर्तेपणाकडे आणण्याचा प्रवास पद्मरेखा प्रस्तुत संग्रहातून अधोरेखित करतात. स्थानांतरणाची ही प्रक्रिया त्यांच्या नव्या संग्रहातील प्रभावी आशयसूत्र आहे.
पद्मरेखा यांच्या भावनिष्ठ पण शोषणाची बहुस्तरीयता आकळून घेणाऱ्या बुद्धिजन्य संवेदनस्वभावातून हे प्रतिमित वास्तव आकारले आहे. साहजिकच ‘स्त्रियांची कविता’ या वर्णनप्रधान वैशिष्ट्याला ओलांडून ती आणखी मोठा पैस स्वतःमध्ये सामावून घेते.
शिवाय पद्मरेखा यांचा एक कवयित्री म्हणून होत असलेल्या विकासाचा नवा टप्पा या अर्थानेही या संग्रहाचा विचार करता येईल. स्त्रीची पारंपरिक संहिता मोडणारी आणि नवी मानुषशील उर्ध्वगामी संहिता रचू पाहणारी कवयित्री तिच्या सतेज मुद्रेसह हाती स्टेअरिंग घेत व्यक्त होताना दिसते आहे.
विशेष बाब म्हणजे इथे कवितागत निवेदक आणि कवितागत निवेदकाच्या मागे असलेला गर्भित निवेदक यात भिन्नत्व नाहीच! हे दोन्ही आवाज इथे एकमेकांत सरमिसळून गेले आहेत; किंबहुना दोन्हींमध्ये एकात्मता आहे, असे गृहीत धरता येईल इतके तादात्म्य आहे. पद्मरेखा धनकर या जित्याजागत्या हाडामांसाच्या स्त्री-माणसालाच पद्मरेखा यांनी कवितेत खेचून आणले आहे. ‘पेपर बिईंग’ आणि ‘रिअल बिईंग’ हे कोटीक्रम पद्मरेखा इथे उधळून लावताना दिसतात.
‘माझी कविता हेच माझे आत्मचरित्र आहे, माझी रोजनिशी आहे’, हे साठोत्तरी कवींनी गौरवांकित केलेले विधान ‘घेतलंय स्टेअरिंग हाती’ हा संग्रह वाचताना प्रकर्षाने आठवते. ‘लेटरहेड’, ‘घेतलंय स्टेअरिंग हाती’, ‘छिनाल’, ‘मी तुझी लग्नाची सरोगेट’, ‘लेडीबर्ड’, ‘ऐ झगडालू औरत’, ‘चहा प्यायला चहाटपरीवर’, ‘सौभाग्याची व्याख्या बदलायला हवी’, ‘कैद’, ‘त्या येतात’, यांसारख्या कवितांमधून पद्मरेखा धनकर यांच्या आत्मनिष्ठ संज्ञेचा लोलक प्रखरपणे प्रदिप्त झाला आहे.
‘आता सोडलीय मी डावी सीट
घेतलंय स्टेअरिंग हाती
आता मीच ठरविणार
प्रवासाची लांबी...’ (पृ. - ४)
अथवा
‘आता कुठल्याच मिषां (शां) ना
पडणार नाही बळी
माझी जमीन
माझा अधिकार
साड्डा हक्क येथे रख..’ (पृ. ९)
असा विद्रोही स्वर या संग्रहात आधिक्याने व्यक्त झाला आहे.
स्त्रीत्व हे एक सांस्कृतिक रचित आहे. त्यामागे पितृसत्ताक, जात- वर्ग - नवभांडवलप्रधान जटीलता आहे. त्याचे सूक्ष्म वाचन, अर्थनिर्णयन विश्लेषण करून पुरुषधार्जिण्या राजकारणाला शह देणाऱ्या कविता, हे या संग्रहाचे बलस्थान आहे.
विधानात्मक गद्यसदृश शैलीतून त्यांच्या अधिकतर कविता व्यक्त होतात, हे पुरेसे बोलके आहे. अर्थात ही विधानात्मकता त्यांच्या काव्यगत अनुभवांमधून प्रतिमांकित होऊन येते, म्हणून ती केवळ पृष्ठस्तरावर राहात नाही. वैचारिकतेला प्रवाहीपण देणारी तरल अनुभूती संग्रहात ठायी ठायी प्रत्ययाला येते. मुळात या कवितेचे स्त्रीवादी विचारविश्वाशी असलेले जोडलेपण संग्रहाला महत्त्वाचे आयाम प्राप्त करून देते.
१९७५च्या स्त्री- मुक्ती चळवळीने परंपरेकडे बघण्याचे नवे भान दिले. स्त्रीवादी विचारसरणीने ‘स्त्री ही घडवली जाते आणि ती एक सांस्कृतिक रचित असल्याचे’ सांगितले. नैसर्गिकतेच्या, जैविकतेच्या (उदा. लाजरी, त्यागमयी, सोशिक, कष्टाळू, ममता-वात्सल्यभावाने ओतप्रोत असलेली इ.इ.) अवगुंठनात बेमालूम लपवलेल्या गुलामीच्या असंख्य कहाण्या उघड केल्या.
धर्मग्रंथांमधून, प्राक्कथांमधून, मिथ्यकथांमधून स्त्रियांच्या शोषणाला अधिमान्यता मिळवून देणारे आधार आपल्याकडे मुक्ता मांग, ताराबाई शिंदे, यांच्यापासून अनेक महानुभावांनी उघडकीस आणले. या मुक्तिदायी प्रवाहाचा खळाळ वारंवार अडवला गेला. पुन्हा पुन्हा तेच तुरुंग तिच्याभोवती उभारले जाऊ लागले.
अलीकडच्या उन्मादी, हिंसेने भारलेल्या, तद्दन एकारलेल्या राष्ट्रवादी प्रारुपात समस्त स्त्रीसमूहाला बंदिस्त केले जाईल का, अशी शंका यावी इतके समकालीन वातावरण विषारी होताना आपण अनुभवत आहोत. अशा वेळी पद्मरेखा यांची कविता झगडालू औरत बनून जरड संस्कृतीच्या राठ मुळांवर प्रश्नांचे बेदम आघात करते. भुकेच्या पोटात विद्रोहाची भूक असते, हे तळमळून सांगू पाहते. आपलं सत्त्व, आपलं तत्त्व, प्रसवू पाहतंय नवं जग; अशा आगळ्यावेगळ्या पाणीदार कुशीचा नवा भूप्रदेश वसवू पाहते. स्त्री-पुरुष मैत्रभावनेच्या मुक्त निळ्या आभाळाखाली वाफभरला गरम चहा पिण्याचं सख्यांना आवतण देते आणि मर्यादांची अमर्याद कुंपणं मोडून काढावी लागतील, असं ठणकावून सांगते.
‘म्हणूनच सख्यांनो
संस्कृतीची दगडं हाती घेऊन
मॉबलिंचींगसाठी तयार
गर्दीसमोर
सत्तेसमोर
ठाकावं लागेल उभं
लिंगसापेक्ष मक्तेदारी
मर्यादांची अमर्याद कुंपणं
काढावी लागतील मोडून…’ (पृ. ३०)
पुरुषनिरपेक्ष स्वतंत्र, स्वायत्त अस्तित्व उभं करण्याची, स्व-ओळखीचं ‘लेटरहेड’ छापून घेण्याची कांक्षा बाळगणारी स्त्रीप्रतिमा ही या संग्रहातील शीर्ष प्रतिमा आहे.
धनकर स्त्री-प्रश्नांकडे केवळ सुट्या पद्धतीने पाहत नाहीत. स्त्री-प्रश्नांची व्यापकता, त्याची विषम पाळमुळं समग्र व्यवस्थेतच कशी रुतली आहेत, याचे भान त्यांची कविता सहसा सोडत नाही. विविध पेच, भोवंडून टाकणारी गतानुगतिकता, मानवी अस्तित्वाला पडणारे पीळ त्यांची कविता आकळून घेते. जागतिकीकरणोत्तर वास्तवाचे उलटे भेसूर पाय ती डोळसपणे न्याहाळते. जाणिवांचा स्तर एकपदरी होण्यापासून त्यांची कविता स्वतःचा बचाव करू पाहते.
‘चेटूक पसरलंय काळावर’, ‘इतना सन्नाटा क्यों हैं भाई’, ‘शहराचा शताब्दीग्रंथ’, ‘मारणार नाही गाय’, ‘पाटी काही फुटत नाही’, ‘मुलं चित्र काढण्यात दंग’, ‘ही कच्ची लिंब’ या कविता त्यांच्या रुंदावत जाणाऱ्या मार्गावरची सुचिन्हं म्हणता येतील.
प्रेमभावनेच्या चिरपरिचित वळणांपेक्षा पद्मरेखा वेगळी वाट रेखण्याची चाह धरतात. समतेचं तत्त्व आणि मैत्रीचं नातं, हे स्त्री-पुरुष प्रेमभावाचं आधुनिक संयुग स्थापित करू पाहतात. पुरुषाचं पारंपरिक मिथक नाकारताना त्या स्त्री-पुरुषांत द्वैत मानणारं विभाजन मुळातून नाकारतात. पद्मरेखा यांच्या भूमिकेतील हे महत्त्वाचे वळण आहे. या दृष्टीने त्या आणखी पुढे गेल्या, तर बऱ्याच अनवट वाटा त्यांना भविष्यात सापडू शकतील.
‘आत ये’ या कवितेत पुरुषी शिक्क्यात गच्च बसवलेल्या सोबत्याला अहंकाराचं किटाळ पाणी बाहेर फेकून देण्यासाठी उद्युक्त केलं जातं. हजारो वर्षांचं माणूसपण पुसून टाकणारं ओझं त्यागून उंबरठ्याचं नवं माप ओलांडताना ‘तुझीच तुला होऊ दे नवी ओळख / तुझं वात्सल्याचं अमृत/ झरु दे ना स्तन्य होऊन/’ ही पुरुषातल्या मातृत्वभावाला आवाहन करणारी साद घातली जाते. नव्या पुरुषाचं आगमन सुचवू पाहणारी, माणूस म्हणून स्वतःकडे बघायला लावणारी ही पुरुषरुपे दखलपात्र आहेत.
पुरुषातल्या अंधाऱ्या तळघराचं दर्शन घडवून त्या ठरीव साच्यातून त्याला उपसून बाहेर काढून त्याच्यात असलेल्या मार्दवाची, कोमलतेची, वात्सल्याची ओळख त्याला करून देऊ पाहणारी स्त्री इथे दिसते. ही केवळ स्त्रीचीच नैसर्गिक गुणविशेषणे आहेत, या रचितावर साचलेला शेंदूर खरवडणाऱ्या कवितांमधून नवे कालभान, नवे मूल्यभान प्रकट होते.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
स्त्रीच्या लैंगिकतेचा मोकळाढाकळा, धीट, सेन्शुअस उच्चार ही या कवितेची आणखी जमेची बाजू आहे. व्याज रोमँटिकपणा, संकेताधिष्ठितता, धूसरता यांना ओलांडून ती निखळ शारीर होते. ‘रेनकोट’, ‘तुझ्यासाठी घ्यायचा होता एक शर्ट’ यातील थेटपणा लक्षणीय आहे. अर्थात अशी कवितागत उदाहरणे अल्प स्वरूपात आहेत. या संग्रहाचा मुळातला कंद हा स्त्रीपुरुष संबंधातील क्रौर्य, संवेदनशून्य कोरडा व्यवहार आणि त्यातून आलेल्या अपार वेदनेवरचं तिखट, उपरोधिक भाष्य आहे.
अर्थात स्त्री-पुरुषांच्या संमिलनातून, एकमयतेतूनच पुढची वाटचाल सुकर होणार आहे, यावर पद्मरेखा यांचा विश्वास आहे. ही कविता पुरुषद्वेष्टेपणापासून मुक्त आहे आणि पुरुष हा आपला मित्र, सहोदर, भागीदार आहे, असायला हवा या व्यापक शहाणीवेचा उच्चार ही या कवितेची मौलिकता आहे.
जागतिकीकरणोत्तर काळात केवळ महानगरातच नव्हे तर ग्रामीण भागातही वर्गजाणीव प्रबळ झाली. त्याचे रूपांतर स्तरीकरणात झालेले आहे. त्यातून उद्भवणारे, प्रतिष्ठित झालेले मध्यमवर्गीय नॉर्म्स स्त्रियांना मागे, आणखी मागे खेचणारे आहेत.
धनकर यांच्यासारख्या कवयित्री चंद्रपूरसारख्या ग्रामीण तोंडवळा असलेला पर्यावरणात राहून लेखन करतात. आधीची सरंजामी व्यवस्था अलीकडच्या काही दशकांपासून अधिकच हिंस्त्र परिवेश धारण करू लागली आहे. अशा भूगोलातून आणि दुःखाने, काट्याकुट्यांनी भरलेल्या स्त्रियांच्या इतिहासातून चालताना पुढच्या वाटा अम्लान होणार नाहीत, याची शाश्वती देणाऱ्या ‘घेतलंय स्टेअरिंग हाती’ या कवितासंग्रहाचे मी मनापासून स्वागत करते!
पद्मरेखा यांनी थोडासा ठहराव बाळगला आणि अधिक खोल पाण्यात त्या उतरल्या, तर त्यांना चिंतनाचे अनन्य प्रदेश नक्कीच गवसतील आणि स्त्रीप्रश्नांसह एकूणच मानवी अस्तित्वानुभावाच्या मूलभूत पेचांना त्या अधिक ताकदीने सामोऱ्या जातील, असा विश्वास वाटतो.
.................................................................................................................................................................
‘घेतलंय स्टेरिंग हाती’ – पद्मरेखा धनकर
शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर | पान –१२० | मूल्य – २५० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment