या पुस्तकातील पानापानांवरील अश्रूंची शाई आपल्या डोळ्यांवरील झापड उघडेल, अशी मला आशा आहे…
ग्रंथनामा - झलक
मनोज झा
  • ‘बाइज्जत बरी : षडयंत्रात बळी गेलेल्या निरपराध्यांच्या कहाण्या’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sun , 21 July 2024
  • ग्रंथनामा झलक बाइज्जत बरी Baa Izzat Bari मनीषा भल्ला Manisha Bhalla अलीमुल्लाह खान Aleemullah Khan

‘बाइज़्जत बरी? : साज़िश के शिकार बेक़ुसूरों की दास्ताँ’ या मनीषा भल्ला, डॉ. अलीमुल्लाह खान लिखित मूळ हिंदी पुस्तकाचा प्रसिद्ध अनुवादक सोनाली नवांगुळ यांनी ‘बाइज्जत बरी : षडयंत्रात बळी गेलेल्या निरपराध्यांच्या कहाण्या’ या नावाने मराठी अनुवाद केला आहे. अक्षर प्रकाशनातर्फे नुकत्याच प्रकाशित झालेल्या या पुस्तकाला राज्यसभा खासदार मनोज झा यांनी लिहिलेलं हे मनोगत…

.................................................................................................................................................................

९/११नंतर आमचं जग पूर्वीसारखं उरलं नाही, हे सांगताना जराही संकोच वाटत नाही. ‘दहशतवाद’ हा शब्द जगभर रचला आणि बिंबवला गेला आणि एका विशिष्ट समुदायाच्या लोकांना लक्ष्य ठरवलं गेलं. २००१मध्ये अमेरिकेत दोन इमारती पाडण्यात आल्या, त्यानंतर त्याच अमेरिकेमुळे मुस्लीम देशांबाबतीत घडवून आणलेली एकापाठोपाठ एक भयंकर दडपशाही जगाने पाहिली. त्याच दरम्यान गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हा भारतीयांच्या ज्ञानाच्या कक्षा वाढवण्यासाठी म्हटलं होतं.

‘ ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’ला बॉम्बनी उडवणारे, बामियान बुद्धाचा पुतळा उद्ध्वस्त करणारे आणि सोमनाथ मंदिर लुटणारे सगळे खरे तर एकाच कबिल्याचे लोक आहेत!’ हे वाक्य या देशातील सगळ्यांत मोठी अल्पसंख्याक लोकसंख्या असणाऱ्या लोकांबद्दल बोलले गेले होते. त्यानंतर काही दिवसांतच गुजरातमध्ये सुनियोजित पद्धतशीरपणे मुसलमानांना मारले गेले. शेजाऱ्यांना ‘बाहेरचं’ करण्याच्या प्रक्रियेचं नाव आहे ‘गुजरात’.

ज्यांनी या कट्टर धार्मिकतेची संहिता लिहिली, ते लोक आज छाती रुंदावून राजकारणी म्हणून मोठ्या ऐटीत फिरतात. बापूंची भूमी असणाऱ्या राज्यात हे सर्व घडलं, याचं दुःख तर आहेच. पण, हे असंच घडत राहिलं आणि बघता बघता मरणासन्न माणुसकी मूक तमाशा होऊन बसली!

मुसलमानांचा गुन्हा इतकाच होता की, त्यांचा धर्म या देशातील अधिकांश लोकांपेक्षा वेगळा होता. अर्जुन अप्पादुराई यांनी संख्येनं कमी असण्याच्या भीतीबद्दल सांगितलं होतं. मात्र ही भीती इतकी जास्त फैलावेल आणि आपल्या संकुचित राष्ट्रवादात कधी नव्हे इतकी अटळ गरजेची ठरेल, याचा अंदाज आपणा सगळ्यांना थोडा उशिराच आला. या भीतीच्या मानसशास्त्रानेच तारिक अहमद दार यांचा १२ मिनिटांचा रस्ता १२ वर्षांचा करून टाकला. ज्या धर्माच्या नावाने भीती आणि भयकंपिततेचं वातावरण निर्माण झालं आणि ज्या धर्माला लोक आज घाबरतात, त्याचा प्रेरणास्रोत ‘अमन’ आणि ‘भाईचारा’ आहे. मात्र या सुनियोजित प्रक्रियेत इस्लामची नाहक बदनामी होत राहिली आणि आपण दिङ्मूढ होऊन पाहत राहिलो.

हीच शत्रुत्वाची भाषाशैली होती आणि हीच विद्वेषाची विचारधारा होती, तिच्या आधारे एकविसाव्या शतकाची पहिली दोन वर्षे जगभरातील मुस्लिमांसाठी विनाशाचा संदेश घेऊन आली. आपल्या देशात ‘इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया’ या संघटनेच्या नावाखाली असंख्य तरुणांना पकडून तुरुंगात डांबण्यात आलं. त्यातले बहुतेक निर्दोष म्हणून सुटले ही वेगळी बाब. तथापि अब्दुल वाहिद शेख आणि तारिक अहमद दार यांच्यासारखे नशिबवान असलेले कमीच, उरलेले आजही तुरुंगात सडत आहेत!

‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’ची इमारत बॉम्बने उडवण्यात आली आणि संपूर्ण जग हादरलं. मुस्लिमांच्या ‘दानवीकरणा’च्या प्रकल्पात सगळेच सहभागी झाले आणि त्याचा परिणाम असा की, निरपराध मुस्लीम तरुणांना ‘मानवतेचा शत्रू’ म्हणून घोषित करण्यात आलं. देशात झालेले सर्व बॉम्बस्फोट मुस्लीम अतिरेकी संघटनांनी केल्याचं जाहीर करण्यात आलं. एकेका संघटनांची नावं कसून समोर आणली गेली. काही नावं तर रचलीही गेली. बऱ्याचशा मुस्लीम मुलांना पोलीस रिमांडमध्ये घेतल्यावर कळलं की, बॉम्बस्फोटात त्यांचा सहभाग होता किंवा ते साखळी बॉम्बस्फोटाचे ‘मास्टरमाइंड’ आहेत.

आपल्या सुसंस्कृत समाजाकडे इतकीशीदेखील फुरसत नाही की, त्यांना या मूक किंकाळ्या ऐकू याव्यात. कदाचित न्यायव्यवस्थेकडेसुद्धा इतकी सवड नाही की, त्यांना थर्ड डिग्री टॉर्चर सहन करणाऱ्या आपल्याच नागरिकांची हाक ऐकू यावी. त्यांना ‘औरंगजेबाची अवलाद’ म्हटलं गेलं आणि ‘देशाचे दुश्मन’ असल्याची हाकाटी केली गेली! आपल्यापैकी किती जण स्वतःच्या मुलाचं नाव ‘औरंगजेब’ ठेवण्याचं धाडस करू शकतात? माझ्या देशात मुसलमानांना त्यांच्या नावाची शिक्षा भोगावी लागते आहे.

‘इन्हीं में जीते इन्हीं बस्तियों में मर रहते

ये चाहते थे मगर किस के नाम पर रहते?

पयम्बरों से ज़मीनें वफ़ा नहीं करतीं

हम ऐसे कौन ख़ुदा थे कि अपने घर रहते’ - (इफ़्तिख़ार आरिफ़)

तसं म्हणायला गेलं, तर आपला देश एक अजब देश आहे! स्फोट नंतर होतात, ते करणाऱ्यांची नावं आधी ठरतात! जस्टिस बिलाल नाजकी यांचे म्हणणं कदाचित बरोबरच आहे- ‘युरोप आणि भारतातील पोलिसांमध्ये एकच फरक आहे. युरोपातले पोलीस सुगावा किंवा पुराव्यांच्या आधारे अपराध्यांपर्यंत पोहोचतात, मात्र आपल्या देशातील पोलीस पहिल्यांदा अपराध्यांना पकडतात आणि मग त्यांच्याकडून सुगावा मिळवतात.’ मुसलमानांवर वेळ आली की, कायदा, न्याय आणि मानवतेचे धडे जास्तच आळवले जातात.

आपल्या इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांची आणि वर्तमानपत्रांची तर बातच निराळी! त्यांच्यावर विश्वास ठेवायचा असेल, तर त्यांच्या मते देशातील प्रत्येक दुसरा-तिसरा मुसलमान माणूस आपल्या पिशवीत हत्यार बाळगून असतो. आणि पाकिस्तानात जाण्याचं स्वप्न बघत असतो! आपले पोलीस न्यायालयात स्व-निर्मित कबुलीजवाबाशिवाय अन्य काहीही सादर करू शकत नाहीत! कबुलीजबाबाबद्दल बोलायचं, तर कदाचित अब्दुल वाहिद शेख यांचे शब्द या पूर्ण कहाणीला जिवंत करतात. ते सांगतात, त्या वेळच्या अत्याचाराची पातळी इतकी तीव्र होती की, त्यांनी मला असं म्हटलं असतं की, अमेरिकेवर हल्ला करणारा तूच होतास ना? तर मी तेही कबूल केलं असतं.

तुरुंग एक अशी जागा आहे, जिथं माणसं काय, दगडही बोलायला लागतात. अबू गारेब, ग्वान्तानामो बे इथले तुरुंगही कदाचित इथूनच प्रेरणा मिळवतात. सामूहिक संमती अशी काही चीज अस्तित्वात नाही, तिला तर ‘मॅन्युफॅक्चर’ केलं जातं, तिची निर्मिती केली जाते, असं नोअम चोम्स्की म्हणतात ते खरं आहे. मुसलमानांच्या विरोधात जगभर मोठे मोठे कारखाने उघडले गेले. या संबंधाने सीआयए आणि मोसादने आपल्या गुप्तचर संघटनांना चांगलं प्रशिक्षण दिलं आहे.

कुठल्याही दहशतवादविषयक प्रकरणांचा निःपक्षपातीपणे तपास करावा किंवा सरकारकडून स्थापन झालेल्या न्यायाधीकरणाची कार्यवाही ऐकावी, इतकंही प्रसारमाध्यमांना जमत नाही. सरकारी वकील जे सांगतील, तितकाच त्यांचा पुरावा. आणि सरकारबद्दलच बोलायचं, तर ते कायद्याचं असं जाळं विणतात की, जो मजबूत असतो, तो ते मोडून निसटतो आणि कमकुवत असणारा त्यात कोळ्यासारखा अडकून स्वतःचं निर्दोषत्व सिद्ध करण्याच्या प्रयत्नात पूर्ण आयुष्य संपवून टाकतो.

मुसलमानांकडून प्रत्येक क्षणी ‘निष्ठे’चे पुरावे मागितले जातात, ‘देशभक्ती’च्या तराजूत त्यांना तोललं जातं. आणि मग घोषणा केली जाते की, मुसलमानांसह त्यांच्या बाजूने बोलणाऱ्यांचीही रवानगी पाकिस्तानात करू! १९६७च्या ‘अन-लॉफुल अ‍ॅक्टिविटीज अ‍ॅक्ट’ या कायद्यांतर्गंत एका संस्थेवर अक्षरशः दोन-दोन वर्षं बंदी घातली जाते आणि दुसरीकडे एका वेगळ्या संस्थेला त्यांना हवा तसा हिंसाचार पसरवण्याची खुलेआम परवानगी दिली जाते. त्याबद्दल उच्चारायची किंवा तिकडं बोट करायची कुणाची काय बिशाद! तसं कराल तर हात छाटले जातील, डोकी उडवली जातील.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

देशाला ‘आई’सारखं स्थान आणि दर्जा असतो. देश आपल्या नागरिकांसोबत आपपर भावाने वागला, तर त्याची प्रतिष्ठा कमी होते. लक्षात असू द्या, अ‍ॅडॉल्फ हिटलरने कायदे करूनच जर्मनीमध्ये ज्यूंना मारलं होतं. आपणही तीच ‘री’ ओढत आहोत का? आपणही तोच इतिहास पुन्हा घडवतो आहोत का? आपल्याला पुन्हा एकदा छळछावण्या तयार करायच्या आहेत का?

अशा परिस्थितीत तुमचा देश ‘तालिबान’ बनला, तर तो केवळ निरपराध तरुणांचा गुन्हा ठरत नाही. यासाठी आपलं सरकार आणि न्यायव्यवस्थाही तितकीच जबाबदार आहे. आपल्या देशातील मुस्लिमांनी विसरायचं ठरवलं, तरी ते मुस्लीम आहेत, ते ‘दुय्यम दर्जा’चे नागरिक आहेत, याची त्यांना पावला पावलावर आठवण करून दिली जाते. आपण आपल्या देशाला अशा प्रकारच्या विचारसरणीतून कसं मुक्त करू शकणार आहोत?

या पुस्तकातील पानापानांवरील अश्रूंची शाई आपल्या डोळ्यांवरील झापड उघडेल, अशी मला आशा आहे. सामान्य जनताच नव्हे तर सत्तेच्या मार्गावरदेखील निर्दोष आणि निरपराध तरुणांच्या हाका ऐकू येतील. आपल्या देशात दररोज बापूंची हत्या होते, हे मी यापूर्वीही अनेकदा लिहिलं आहे. एक दिवस मरायचं असेल तर ते सोपं असेल, जे लोक रोज क्षणोक्षणी मरतात आणि तरीही जिवंत उरतात त्यांना विचारा या वेदनेबद्दल! १० आणि १५ वर्षांच्या तुरुंगवासानंतर जेव्हा जेव्हा एखादी व्यक्ती निर्दोष मुक्त होते, तेव्हा तेव्हा आपली संस्कृती आणि आपला कायदा या दोन्हींचा पराभव होत असतो...

जय हिंद!

.................................................................................................................................................................

‘बाइज्जत बरी : षडयंत्रात बळी गेलेल्या निरपराध्यांच्या कहाण्या’ – मनीषा भल्ला, डॉ. अलीमुल्लाह खान

अनुवाद – सोनाली नवांगुळ

अक्षर प्रकाशन, मुंबई | पाने – २६४ | मूल्य – ३५० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......