आपला स्वभाव ‘काळ्या दगडावरची रेघ’ नसून ‘धुळाक्षरांची पाटी’ आहे. त्याचे विविध पैलू परिवर्तनक्षम असतात आणि त्यावर आपण निश्चित अशी उपाययोजना करू शकतो…
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
सुधीर वनारसे, श्यामला वनारसे
  • ‘स्वभावाला औषध असते’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sun , 07 July 2024
  • ग्रंथनामा शिफारस स्वभावाला औषध असते Swabhavala Aushadh Aste सुधीर वनारसे Sudheer Vanarase श्यामला वनारसे Shyamala Vanarase

औद्योगिक मानसशास्त्रज्ञ सुधीर वनारसे, श्यामला वनारसे यांचे ‘स्वभावाला औषध असते’ हे पुस्तक मार्च १९९५मध्ये प्रकाशित झाले. वर्षभरात त्याचं पुनर्मुद्रणही झालं. आता तीसेक वर्षांनी या पुस्तकाची दुसरी आवृत्ती डायमंड पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित झाली आहे. या पुस्तकातील पहिल्या प्रकरणाचा हा संपादित अंश…

.................................................................................................................................................................

‘आधी होती दासी | पट्टराणी केले तिसी |

तिचे हिंडणे राहीना | मूळ स्वभाव जाईना ॥’

या अभंगामधला ‘मूळ स्वभाव जाईना’ हा भाग आपण एखाद्या म्हणीसारखा वापरतो. उपजत आणि अचल असे गुणावगुण प्रत्येकाचा ‘स्वभाव’ ठरवतात. या स्वभावाला धरूनच माणसे वागतात. कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच राहते, तुपात तळले आणि साखरेत घोळले, तरी कारले आपले कडूच हे सर्व दाखले अचल, अपरिवर्तनीय असे काही ‘मूळ’ माणसामध्ये असते, हे सांगण्यासाठी रचलेले आहेत.

एखादी गोष्ट ‘स्वाभाविक’ आहे, असे म्हटले की, त्यात एक अटळ परिणती येते. त्यात बदल करण्याचा प्रश्नच नाही, अशी ही सर्वसाधारण समजूत आहे. या समजुतीनुसार स्वभाव ही माणसाच्या हातची बाब नाही, एकदा बनला की त्यात बदल नाही, एखादी विपरीत घडण झाली, तर त्याबाबत काही करणे शक्य नाही, आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ती व्यक्ती ‘स्वभावाला’ जबाबदार नाही. यामुळे निसर्ग आणि परिस्थिती या हाताबाहेरच्या गोष्टींवर स्वतःच्या घडणीची जबाबदारी टाकून माणूस मोकळा होतो.

या कल्पनेची आपण जरा चिकित्सा करू, मनमिळाऊ, तुसडा, आळशी, उद्योगी, भिडस्त, सडेतोड, भावनाप्रधान, रुक्ष अशा अनेक विशेषणांनी आपण स्वभावाचे वर्णन करतो. ही वैशिष्ट्ये नैसर्गिक, अटळ आणि अचल आहेत का, हा खरा प्रश्न आहे. एखादे वैशिष्ट्य नैसर्गिक आहे, म्हटले म्हणजे त्या माणसाला ‘तसेच’ वागणे भाग आहे, असा त्याचा अर्थ होतो.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

आता आळशी माणूस कायम आळशी असतो का? मनमिळाऊ माणूस कधीच तोडून बोलू शकत नाही का? तर असे दिसत नाही. कोणतीही व्यक्ती कायम पूर्णपणे आळशी, मनमिळाऊ, प्रामाणिक अशी नसते, तर कोणतीही व्यक्ती कायम पूर्णपणे कामसू, इतरांना दुखावणारी, अप्रामाणिक अशीही नसते, तर ती व्यक्ती या दोन परस्पर विरोधी टोकांच्या मधल्या छटा दाखवत असते.

म्हणजेच आपण सर्व काही वेळा कामसू - यातील व्यक्तीनुसार प्रमाणही कमी जास्त असू शकेल. तसेच काही वेळा आळशी - यातीलही व्यक्तीनुसार प्रमाण कमी जास्त असू शकेल - अशा पद्धतीनेच वागत असतो. आपल्या वागण्यात हे फरकाचे प्रमाणही विशिष्ट मर्यादेतच असते. काहींची जागा कामसूपणाच्या टोकाजवळ, तर काहींची आळशीपणाच्या टोकाजवळ असेल.

त्याचप्रमाणे या दोन टोकांच्या दरम्यान अनेक छटा दाखवणारे वागणे माणसांच्या निरीक्षणात आढळून येईल. त्यात साधारणपणे अगदी टोकाच्या वर्तनाचे प्रमाण कमी आणि मधल्या छटांचे प्रमाण जास्त अशी रचना आढळून येते. अशा प्रकारच्या निरीक्षणांवरून आलेख काढला, तर तो प्रथम कमी, नंतर वाढत जाऊन स्थिरावणारा आणि नंतर कमी होत आलेला असा घंटेच्या आकाराचा (Bell-shaped) दिसतो. या मर्यादादेखील ‘सर्वसाधारण’ स्वरूपाच्या असतात.

‘सहनशक्ती संपली आणि स्फोट झाला’ असे एखाद्या प्रसंगाचे वर्णन आपण करतो, तेव्हा ‘सर्वसाधारण’ मर्यादा या अटळही नसतात आणि अचलही नसतात, हेच व्यक्त होत असते. माणसाच्या वागण्याला मर्यादा असतात त्याबरोबरच शक्यताही असतात. ‘अमका-तमका जन्माचा तर्‍हेवाईक आहे’, असे म्हणताना बोलणार्‍या व्यक्तीचा स्वतःचा वैताग आणि असहाय्यता त्या वर्णनाला चिकटलेली आहे.

मग माणसाला ‘स्वभाव’ असतो म्हणजे काय? की ‘स्वभाव’ म्हणण्यासारखे काही नसतेच? तर एवढेही सैल सोडता येत नाही. माणसांच्या वागण्यात काही स्थिरता, संगती दिसते यात दुमत नाही; पण ती नैसर्गिक, अटळ, अचल अशी मानण्याचे कारण नाही. कारण, माणसांच्या या ‘स्थिर’ वैशिष्ट्यांचे रूप वाढत्या वयात आकाराला येत असते. विकास काळात काही अस्थिर आणि विसंगत वर्तनाचे कालखंडही येऊन जातात. ते पार करून या स्थिरतेकडे माणूस येतो - काही प्रौढ, वयस्क माणसे या स्थिरतेच्या पुढची एक पायरी चढून स्वतःला, दृढपणे एका चौकटीत बंद करतात; पण तेही ‘नैसर्गिक’ नव्हे, ती माणसाची करणी आहे, निसर्गाची किंवा ईश्वराची नव्हे.

माणसाच्या वागणुकीतील बराचसा भाग त्याने स्वतःच अनुभवातून कमावलेला आणि स्वीकारलेला असतो. यातील प्रत्येक बारीकसारीक वळणवाकण त्याने लक्षात घेतलेले नसेलही कदाचित. पण कमावण्याचा आणि निवडीचा भाग स्वभावाच्या स्थिरतेत आणि संगतीत महत्त्वाचा असतो. लाडात वाढलेल्या एखाद्या मुलाला स्वतःच्या परावलंबित्वाचे भान येईपर्यंत तो चांगला मोठा झालेला असेल, आणि तोपर्यंत आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी दुसर्‍या कोणीतरी कष्ट घेण्याची त्याला सवय लागून गेलेली असेल.

एखाद्या आर्थिकदृष्ट्या गरीब घरात वाढलेल्या व्यक्तीला काटकसरीचे महत्त्व इतके वाटू लागते की, ‘सढळपणा’ आणि ‘नासधूस’ याबद्दल त्यांची मते इतरांशी खटकू शकतात. आता लाडावलेपणा किंवा काटकसर ही दोन्ही वैशिष्ट्ये त्या त्या व्यक्तींच्या वागण्यात स्थिरावलेली आहेत, यात शंका नाही; पण ती बदलणेही शक्य असते, हा मुद्दा महत्त्वाचा. फक्त या बदलाची सुरुवात दुसरे कोणी करू शकत नाही. त्या व्यक्तीला ती गरज भासली पाहीजे.

म्हणजेच, आपल्या वर्तनाची स्थिर वैशिष्ट्ये कोणती? त्यापैकी आपल्यालाच तापदायक परिणाम पदरात घालणारी कोणती? या प्रश्नाचे उत्तर ज्याचे त्याने शोधायचे आणि स्वतःला बदलायची गरज कोणत्या बाबतीत भासते, हे पक्के करायचे, हे स्वभावाच्या औषधातले पहिले तत्त्व आहे.

दुसरे असे की, आपापल्या ‘स्वभावाला’ धरून वागण्यात माणसांना समाधान वाटत असते. जरी पर्याय उपलब्ध असले, शक्य असले, तरी त्याची निवड तो आधीच ठरलेल्या एखाद्या तत्त्वानुसार करतो. ‘पुढे पुढे करण्याचा माझा स्वभाव नाही. तसं वागल्याशिवाय या ठिकाणी बढती मिळणार नसेल तर नको मला बढती’, असे म्हणणारा माणूस स्वभावाला धरून वागतो. या वेळी स्वभावाच्या कल्पनेत रास्त काय आणि गैर काय, पसंत काय आणि नापसंत काय; हे ठरवण्याच्या कसोट्या अंतर्भूत झालेल्या आहेत. अशा कसोट्या किंवा निकष असल्यामुळे वर्तनात स्थिरता आणि संगती येतात.

हे निकष अर्थातच त्या त्या व्यक्तीच्या जीवनानुभवातून तयार झालेले असतात. संस्कार, शिकवण यांचाही त्यात वाटा असतो. स्वतःची ‘तत्त्वे’ आडवी आली तर तत्त्वे सोडायची की लाभ सोडायचा हा प्रश्न त्या तत्त्वांच्या तपासणीशी येऊन ठेपतो. तत्त्व म्हणून एखादा हट्टच पुढे केला जातो, तेव्हा काही माणसांच्या बाबतीत ‘कळतं पण वळत नाही’ अशी स्थिती होते. वर्षानुवर्षे ज्या संगतीला धरून वागलो, ती जरी कालबाह्य झाली, तरी सोडवत नाही, ही एक आंतरिक अडचण स्वतःच्या स्वभावावर औषध मिळवताना प्रत्येकाला दूर करावी लागते.

एवढ्या मुद्द्यांवरून लक्षात येईल की, ‘स्वभाव’ म्हणजे काही स्थिर वैशिष्ट्यांची प्रत्येक माणसात आढळणारी रचना होय. ही स्थिरता म्हणजे वागण्याच्या, विचाराच्या, भावनांच्या ज्या शक्यता उपलब्ध असतात, त्यातून सर्वसाधारणपणे होणारी ठरावीक निवड होय. काही वेळा या निवडीचे निकष विवेकाशी निगडित असतात. स्वभावात बदल होतो, म्हणजे एकतर कोणत्याही वैशिष्ट्याची मात्रा बदलते. रागीट माणूस शांत होतो, किंवा मनमिळाऊ माणूस चिडखोर बनतो.

दुसरा प्रकार म्हणजे निकष बदलतात. पहिल्या मुलाच्या बाबतीत कडक शिस्तीचा बडगा धरणारे पालक दुसर्‍या मुलाच्या वेळेपर्यंत थोडे दमाने घ्यायला, सौम्य वागायला, सोडून द्यायला लागतात. प्रत्येकाची स्वभाव रचना वेगळी असते.

एखाद्या वैशिष्ट्याबाबत ‘अगदी एकाला झाकावा आणि दुसर्‍याला काढावा’ असे साम्य आढळले तरी, सर्वार्थी एकासारखी एक माणसे दिसत नाहीत. या रचनेची प्रत्येकाला आपापली जाणीव असते, त्याचप्रमाणे त्या पाठीमागची कारण परंपराही माणसाने काही प्रमाणात लावलेली असते. स्वभावाचा ‘खास माझा’ असा प्रत्यय प्रत्येक ‘मी’ घेतच असतो. हे स्वत्वभान अनेक बाजूंनी ‘माझं बुवा असं आहे’ या वाक्याला अर्थ देत असते. शरीर, वृत्ती, सवयी, संवेदना, मूल्ये या सर्वांचा समावेश ‘मी’पणाच्या जाणीवेत होतो. यापैकी शरीररचना आणि प्रकृती या गोष्टी अनुवंशावर अवलंबून असतात. बाकी सर्व प्रक्रिया अनुभवाने घडत जाणार्‍या आहेत.

स्वभावाच्या बाबतीत अनुवंशिकतेवर अनेकांचा विेशास असतो. त्यामुळे आजोबांच्या वळणावर गेलेला नातू म्हणजे रक्ताचा गुण म्हणूनच ओळखला जातो. अशा काही ठरावीक साम्यांची उदाहरणे घराघरातून चालत आलेली सांगितली जात असतात. परंतु अशी उदाहरणे आणि वैज्ञानिक निष्कर्ष यात फरक आहे. कोणाही व्यक्तीला तिच्या अनुभवात ‘पुष्कळदा’ आढळणार्‍या गोष्टी एकूण अभ्यासक्षेत्राच्या दृष्टीने अत्यल्पच असतात. त्यावरून वैज्ञानिक नियम बनत नाही, पण स्वतःच्या अनुभवाला माणसाच्या लेखी इतके महत्त्व असते की, विज्ञान काहीही सांगत असले तरी, प्रत्यक्ष वागण्यावर परिणाम होतो तो समजुतींचाच.

‘उगीच धंदाबिंदा काढायला जाऊ नकोस. आपल्या रक्तात नाही ते’ असा छातीठोक सल्ला ‘धंदा चालवण्याचे कौशल्य अनुवंशिक असते’, अशा बिनबुडाच्या समजुतीवर भिस्त ठेवून दिलेला बसतो. पण संपादित गुणांचा अनुवंश होत नाही हे वैज्ञानिक सत्य अतिशय सहजपणे अनेकदा गुंडाळून ठेवले जाते. आमच्या एका नातलग बाईंचा असा दृढ विेशास होता की, (समजा) वनारसे आडनावाची माणसे चक्रम असतात. त्यामुळे मुलीसाठी स्थळ बघताना हे आडनाव त्या गाळत असत.

आता आपण क्षणभर धरून चालू की, त्या बाईंच्या अनुभवात चक्रम वनारसे भेटले असतील; पण एकूण वनारसे कुळाच्या तुलनेत हे प्रमाण अत्यल्पच असणार. आणि वनारसेच काय, कुठलेही आडनाव व्यक्तीच्या घडणीत निर्णायक काम बजावत नसते; पण अशा समजुती एकदा तयार झाल्या की, त्यांना छेद देणारी प्रत्यक्ष घटनाही ‘असेल एखादा अपवाद’ असे म्हणून बाजूला सारली जाते. समजुतीत फेरफार करण्याचा निर्णय क्वचितच घेतला जातो.

आपल्या बौद्धिक प्रक्रियांचा हा एक विशेष गुण आहे. पूर्वग्रहांच्या बाबतीत तो स्पष्ट दिसून येतो. पण एकदा एखादी आकलनाची चौकट तयार झाली की, तिची स्थिरता सांभाळण्याचा निर्णयच बहुधा घेतला जातो. ही गोष्ट अनुवंशिकतेवरील विेशासाच्या बाबतीत पुष्कळ व्यापक प्रमाणात दिसते.

अनुवंशाने स्वभाव ठरतो यावर विश्वास बसण्याचे एक सबळ कारण म्हणजे कुलसाम्य. नुसते शारीरिक नव्हे, तर वागण्या-बोलण्यातसुद्धा एकेका घरातील माणसे विशिष्ट प्रकारे वागताना दिसतात. कुठे नीटनेटकेपणा तर, कुठे तापट-भांडखोरपणा, कुठे विद्याव्यासंगाची परंपरा तर कुठे व्यापारी कौशल्य पिढ्यान्पिढ्या चालत येते. मग अशा साम्यांवरून माणसे स्वभावाबद्दल उलट ठोकताळे बांधू लागतात. ‘अमुक घराण्यातील व्यक्ती तमुक स्वभावाचीच असणार, ते त्यांच्या रक्तातच आहे’ इत्यादी कल्पना मग रचल्या जातात.

असा विचार करताना कुटुंब हा एक अगदी प्राथमिक सामाजिक बंध आहे, हे विसरले जाते. जन्मापासून जो परिसर लाभतो, त्यामधून ज्या संवेदना मिळतात, जी भाषा कानावर पडते, ज्या कल्पना व्यक्त होतात, त्याबद्दलचे निर्णय कुटुंबच घेत असते. पायात वाळा, वाळ्याला घागर्‍या, बाळाला पाळणा, पाळण्यावर चिमणाळे, घराची रचना, आईची आणि इतर मुलामाणसांची जाग हा सगळा परिसर मुलापर्यंत जे जे पोचवत जातो, त्याचा काही परिणाम त्याच्या संवेदनांवर, सवयींवर, भाषेवर आणि कल्पनांवर होतच असतो.

अशा प्रकारे एकाच संस्कारात वाढलेल्या व्यक्तींमध्ये साम्य निर्माण होते, परंतु त्याचा ऊठसूट अनुवंशाशी संबंध लावता येत नाही. याच न्यायाने प्रादेशिक, भाषिक, व्यावसायिक, राष्ट्रीय अशा समूहातही काही स्वभाव साधर्म्य दिसेल. त्यात अनुवंशाचा प्रश्नच नसतो.

अनुवंशाच्या आधारे मानवी स्वभावाचा उलगडा करणार्‍या विचाराला एक व्यापक संदर्भही आहे. वंशश्रेष्ठत्वाच्या कल्पना राजकीय आणि सामाजिक वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी फारच उपयुक्त ठरल्या होत्या. यावर हल्ला चढवणारी प्रागतिक विचारांची मंडळी ही परिस्थितीवर माणसाची घडण अवलंबून असते, हे दाखवून देण्यात विशेष रस घेत होती. वंशश्रेष्ठत्वाच्या मुद्यावर विशेषाधिकार राखणार्‍या वर्गाला समान संधीच्या मागणीचा शह दिला गेला. प्रस्थापितांच्या सोयीनुसार अनुवंशाचे महत्त्व फार होते, तर नवसमाज निर्मितीच्या कल्पनेसाठी अनुकूल परिसराला महत्त्व होते.

आपल्याही विचारात भारतीय समाजातील १) जन्मसिद्ध सामाजिक स्थान आणि २) पुनर्जन्म या कल्पना असतील, तर त्यांचीही तपासणी स्वभाव बदलण्याच्या प्रयत्नात अंतर्भूत होईल. भारतीय समाजात अनुवंशाला महत्त्व देणारी जातिव्यवस्था आहे. त्यांच्याशी निगडित एखाद्या जातीत आढळणारे साम्य, रक्ताचा गुण म्हणून ओळखले जाते. त्याबरोबरच जो तो आपल्या कर्माचे फळ भोगत असतो, अशीही कल्पना विचारांमध्ये आहे. त्यानुसार माणसाच्या वागण्यात त्याच्याच पूर्वकर्माचा परिणाम दिसत असतो, असे मानले जाते.

या दोन्ही गोष्टी आपल्या स्वतःच्या विचारात असतील, तर त्यांची तपासणी करावी लागेल. अमूक जातीत जन्मल्यामुळे त्याबाबतीत काही करणे शक्य नाही किंवा गेल्या जन्मीचे कर्म मला भोगावे लागते आहे, अशा तर्‍हेच्या विचारांमुळे बदलाची जबाबदारी माणसे टाळतात. निव्वळ अनुवंशावर स्वभावाची जबाबदारी टाकून स्वतःला असहाय्य समजण्याचे कारण नाही.

मनोविज्ञानातील ‘वर्तनवाद’ या नावाने ओळखली जाणारी विचारसरणी वर्तनावरील परिस्थितीजन्य नियंत्रणाचा कसोशीने अभ्यास करत आलेली आहे. त्यातून वर्तनाचे निदान, नियंत्रण आणि परिवर्तन करण्याची तंत्रे उदयास आली आहेत.

या सर्व विवेचनाचा अर्थ अनुवंशाला हद्दपार करणे असा मात्र मुळीच नाही- जैव-रासायनिक शारीरिक प्रकृती, बांधा, उंची, वर्ण इ. बाह्य वैशिष्ट्ये, काही व्याधी, संगीत क्षेत्रातील विशेष क्षमता यासारख्या गोष्टी अनुवंशावर अवलंबून असल्याचे वैज्ञानिक अभ्यासात आढळून आले आहे. अनुवंशाने जशा मर्यादा पडू शकतात (उदा. मतिमंदत्व) त्याचबरोबर काही शक्यताही खुल्या असतात. आनुवंशिक देणगीपैकी काय आणि कसे व्यक्त होईल, यात परिस्थितीचा वाटा पुष्कळ असतो .

‘खाण तशी माती’, असे म्हणताना काही बीजरूप वैशिष्ट्ये पुढील पिढीत आढळून येतात, एवढाच अर्थ घ्यायचा आहे. त्यावरून डॉक्टरचा मुलगा डॉक्टर किंवा चोराचा मुलगा चोर असा स्वर्ग गाठण्याचे कारण नाही. अनुवंशाचे वाहक घटक वेगवेगळ्या प्रकारे जोडले जाऊ शकतात आणि घराण्यात न आढळलेला गुण मुलात दिसू शकतो. शिवाय परिस्थितीच्या वेगळेपणामुळे घरात चालत आलेल्या गोष्टी नाकारणारी व्यक्तीही निर्माण होते. ज्या बाबतीत अनुवंशाचे महत्त्व वैज्ञानिक कसोटीवर उतरले आहे अशा क्षेत्रातही ‘अतिसंभाव्य’ म्हणजे ‘हमखास’ नव्हे, हेही लक्षात घ्यावे लागते.

अनुवंश की परिस्थिती? असा वाद उभा करून खंडन-मंडन करण्याच्या नादात व्यक्तीचा ‘स्व’ त्यातला आणखी एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे, हे विसरले जाते. या तीन घटकांबाबत आपण तीन जिवंत तत्त्वे हाताळत आहोत, हे भान सुटता कामा नये. अनुवंश ही मूळ मर्यादा आणि शक्यतांची चौकट, परिस्थिती म्हणजे संधी प्राप्त करून देणारी, भरण-पोषण करणारी अनुकूलता किंवा दबाव टाकणारी प्रतिकूलता, आणि व्यक्तीचा ‘स्व’ म्हणजे संधी घ्यावी किंवा नाही, प्रतिकूलतेवर मात करावी की, शरण जावे, याचा निर्णय करणारी शक्ती; ही मांडणी आपल्याला स्वतःच्या स्वभावाचे रूप समजावून घेण्यासाठी उपयुक्त ठरते. यापैकी स्वतःवर लक्ष केंद्रित करण्यावर या पुस्तकाचा विशेष भर आहे.

अनुवंशाने असो की परिस्थितीने असो, माणूस स्वतःची ओळख ज्या मुद्द्यांवर विसंबून ठेवतो, तो ‘स्व-भाव’ लहानपणापासून घडता-घडता प्रौढपणापर्यंत स्थिरावलेला असतो. पहिल्या पाच वर्षांपर्यंत मूलभूत शारीरिक प्रक्रिया व नियंत्रण, मूलभूत सामाजिक प्रतिसाद आणि भावनिक प्रतिक्रिया व प्रवृत्ती यांचा एक सैलसर साचा बनतो. पाचव्या वर्षी मुलामध्ये दिसू लागलेली वैशिष्ट्ये मोठेपणीही दिसून येतात. आता याही ठिकाणी, पहिल्या पाच वर्षात अमुक घडले, म्हणून असे झाले; पण आता काय करणार? असा पवित्रा घेण्याचे कारण नाही.

पहिल्या पाच वर्षांत आईवडिलांच्या चुका झाल्या, त्यामुळे मी कायमचा वाया गेलो, असे गाणे गात बसण्याचा प्रकारही अनावश्यक आहे. स्वतःचे भान आल्यावर अशा खोलवर रुजलेल्या बिघाडावरही मात करता येते. कदाचित त्यासाठी एखाद्या तज्ज्ञाची मदत घ्यावी लागेल, इतकेच. अन्यथा ‘मूळ स्वभाव जाईना’ याच चालीवर ‘पाचव्या वर्षापर्यंतचे संस्कार बदलेनात’ एवढाच बदल व्हायचा!

पाच वर्षांपासून बारा वर्षांपर्यंतचा काळ परिस्थितीचे परिणाम स्पष्टपणे जाणवून देणारा काळ होय. पाचव्या वर्षी बरेचसे साम्य असणारी मुले बाराव्या वर्षापर्यंत बरीच भिन्न झालेली असतात. सर्वसामान्य क्षमता, आरोग्य इत्यादी असणारी पाच वर्षांची मुले पुढच्या कालखंडात कोणत्या आर्थिक, सामाजिक परिस्थितीतून जातात यावर बाराव्या वर्षी त्यांच्यात कोणत्या वैशिष्ट्यांचा विकास झालेला असेल ते अवलंबून असते.

एखादा बालश्रमिक, एखादा गरिबाघरचा, मोठ्या कुटुंबातला मुलगा आणि एखादा उच्च मध्यमवर्गीय एकुलता एक मुलगा यांचे दैनंदिन जीवन आणि अनुभव त्यांना वेगळे बनवत असतात. म्हणजेच, परिस्थितीतील अनुकूलता व प्रतिकूलता यांचा स्वभावावर परिणाम होत असतो.

मनुष्य स्वभावाची बहुसंख्य वैशिष्ट्ये द्विध्रुवात्मक - म्हणजे परस्परविरुद्ध दोन टोकांपर्यंत विस्तारलेली असतात. या टोकांच्या दरम्यान अनेक छटा माणसांच्या वागण्यात दिसतात. आळशी ते उद्योगी असे वैशिष्ट्य घेतल्यास शंभर टक्के आळशी किंवा शंभर टक्के उद्योगी असा कोणीच नसतो. आळशी माणूसही काहीतरी हातपाय हलवतो आणि उद्योगी माणूसही कधीतरी आळशीपणा करतो. यामध्ये माणसाच्या वागण्याला असलेली लवचिकता आणि प्रसंगानुरूप समायोजन करण्याची तयारी यांचा परिणाम स्पष्ट होतो.

दुसरे असे की, या दोन ध्रुवांच्या दरम्यान बहुसंख्य माणसे मध्याजवळ असतात, आणि जसजसे दोन्ही टोकांकडे जावे तसतशी ही संख्या कमीकमी होत जाते. साधे परिचयाचे उदाहरण घेऊ. रागीट ते शांत अशी मापनश्रेणी केल्यास अत्यंत रागीट - सारा वेळ डोक्यात राख घालणारी किंवा अत्यंत शांत - वाटेल ते झाले तरी शांत राहणारी माणसे कमी असतात. बहुसंख्य माणसे कधीमधी रागावणारी असतात. हे वैशिष्ट्य स्वभावाप्रमाणे शारीरिक गुणांनाही लागू पडते. स्वभावाच्या बाबतीत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या श्रेणीवरची आपली जागा आपल्याला बदलता येते.

माणसाच्या कृती, भावाविष्कार, किंवा विचार यांच्या पाठीशी मूळ स्वभाव नामक काही नियंत्रक उभा केला की, वर्तनाचे आकलन, विश्लेषण, अकारणच एका अज्ञाताचे बोट धरून चालू लागते. सिगारेटची सवय जडलेला एखादा माणूस काही दिवस सिगारेट पिणे बंद करतो. त्यानंतर पुन्हा त्याची सिगारेट सुरू झाली की, ‘आला मूळपदावर’ किंवा ‘किती केलं तरी मनुष्य जात्याच स्खलनशील असतो’ असा अर्थ लावला की, मग हे पुनःपुन्हा असेच होणार, होत राहणार, तेव्हा कशाला उगाच धडपड? असे निष्पन्न होते.

त्याऐवजी, या माणसासमोर सिगारेट पिणे किंवा न पिणे हे पर्याय नेहमीच असतात. सिगारेट पिण्याचा पर्याय त्याने दीर्घकाळ वापरला, न पिण्याचा पर्याय त्याने काही काळ वापरला आणि आता तो पुन्हा जुन्या निर्णयाकडे वळला आहे - अशा प्रकारे अर्थ लावला, तर त्याची स्वतःत बदल करण्याची इच्छा अधिक दृढ करण्याची शक्यता खुली राहते. तो सिगारेट सोडू शकेल, हा त्या आकलनाचा भाग राहतो. त्याला व्यसनाधीनतेचा किंवा स्खलनशीलतेचा बळी, ठरवला की, करण्यासारखे काही उरत नाही. याचाच वापर करून व्यसन सोडायचे कष्ट न करता माणसे मानवी स्वभावावर खापर फोडतात.

वस्तुतः आपल्या स्वभाव वैशिष्ट्यांना ‘शिक्के’ समजण्याची चूक आपण करत असतो. त्याचा अगदी वज्रलेप समजण्याचे कारण नाही. या वैशिष्ट्यातून उद्भवणारे वर्तन कोणते? त्याची तीव्रता, प्रमाण, कालावधी, यासारखी वैशिष्ट्ये कोणती? त्यापैकी आपल्याला बदल कोणत्या बाबतीत हवा आहे? ही प्रश्नमालिका सोडवल्यास स्वभावाचे औषध घ्यायला आपण सुरुवात केली आहे, असाच अर्थ होईल.

 समजा, एखादा धांदरट स्वभावाचा माणूस आहे, धांदरटपणा कसा व्यक्त होतो? १) तो एकाच वेळी अनेक गोष्टींचा विचार करून घोटाळतो. २) त्याच्या हालचालीत अनावश्यक आणि वाया जाणार्‍या हालचालींचे प्रमाण जास्त असते. ३) घाई गर्दीत कामे करताना महत्त्वाच्या गोष्टी विसरतात. ४) अनेक कामे अर्धवट, अपूर्ण असतात. आता यापैकी त्याला काय बदलावेसे वाटते? आपण धरून चालू की, तीन आणि चार क्रमांकाच्या गोष्टी त्याला बदलाव्याशा वाटतात. येथवर पोचलेला धांदरट माणूस नक्कीच हा बदल कसा करावा, या पुढच्या टप्यावर पोहचू शकेल.

म्हणजेच, बदल आपल्याला हवा आहे, प्रयत्न आपण करायचे आहेत आणि पर्यायांपैकी कोणता स्वीकारावा, ही निवडही आपलीच आहे.

अशा पद्धतीचा विचार स्वतःच्या स्वभावातील सर्व पैलूंबाबत शक्य आहे. शारीरिक, बौद्धिक, सामाजिक, भावनिक हे पैलू स्वभावामध्ये वेगवेगळ्या प्रकारे झळकत असतात. समग्र ‘स्व’ची जाणीव, बदलाची इच्छा यांच्यामार्फत प्रत्यक्ष बदल घडून येतात. हे पैलू लक्षात घेणे विचाराच्या सोयीसाठी उपयुक्त आहे. त्यातून एकेका वैशिष्ट्यातील विविध घटक सुटे करायला मदत होते. गर्विष्ठ स्वभावाची व्यक्ती या पैलूंपैकी, शारीरिक, बौद्धिक किंवा सामाजिकदृष्ट्या ‘वरचढ’ असणार. हे वरचढ असणे म्हणजे आपल्या श्रेष्ठत्वाची खूण समजत असणार आणि आपण वरचढ आहोत, हे इतरांच्या सतत लक्षात आणून देत असणार.

यातील विचार, भावना आणि कृती यांचे विश्लेषण करून त्या व्यक्तीला स्वतःचा गर्विष्ठपणा कमी करणे शक्य आहे. ही सोय मोठी असली, तरी माणूस या सर्व पैलूंसह एका वेळी एकाच प्रकारे वागत बोलत असतो. त्या वेळी हे शारीरिक, ते मानसिक असे काही नसते.

याबाबत अनेक आडाखे प्रचलित आहेत. विशिष्ट प्रकारच्या शारीरिक बांध्याशी विशिष्ट प्रकारचा स्वभाव निगडित असतो, असे दाखविण्याचे अनेक प्रयत्न आत्तापर्यंत झाले आहेत. परंतु त्यात निर्णायक व्यवस्था अद्याप सापडलेली नाही. प्रत्येक व्यक्तीच्या घडणीत शारीरिक वैशिष्ट्यांना काही ठरावीक सामाजिक प्रतिक्रिया मिळत असतात. ‘नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्नं’ किंवा ‘एक गोरी ती दहा गुण चोरी’ अशा म्हणी याच साच्यांच्या द्योतक आहेत. अशा प्रतिक्रियांमुळे ‘स्व’च्या घडणीत निश्चित दिशा उत्पन्न होतात. विशेषतः आत्मश्रेष्ठत्व किंवा न्यूनत्व भावना शारीरिक वैशिष्ट्यांच्या निमित्ताने स्थिर होत असतात. स्त्रिया आणि पुरुष यांना येणारे अनुभव स्पष्टपणे वेगळेच असतात.

त्यांच्या मुळाशी लिंगभेदानुसार बायकी आणि पुरुषी स्वभावाच्या योग्य मानलेल्या चौकटी असतात. आधुनिक संशोधनात असे आढळून आले आहे की, उत्तम मानसिक आरोग्य असणार्‍या व्यक्तींमध्ये या दोन्ही गुणांचा समतोल साधला गेलेला असतो. उत्तम मानसिक स्वास्थ्य असणारा पुरुष परखड कठोरतेबरोबरच सौम्य, कोमलतेचाही विकास साधत असतो. वेगवेगळ्या प्रसंगी योग्य ती प्रतिक्रिया देण्याची लवचिकता त्याच्या अंगी असते.

तीच गोष्ट चांगल्या कोटीचे मानसिक स्वास्थ्य असणार्‍या स्त्रीची. ती नुसती तथाकधिक ‘स्त्री सुलभ लाज’ भावविवशता गोंजरत बसत नाही, तर तिलाही व्यवहारदक्षता, त्यासाठी रुक्ष पराक्रम गाजवण्याची लवचिकता दाखविता येते. केवळ प्रचलित, साच्यांमध्ये स्वतःला अडकवून टाकल्याने माणसे स्वतःवर अनावश्यक आणि अतिरिक्त मर्यादा घालतात आणि स्वतःची आंतरिक शक्ती कमी करतात. या संशोधनाची माहिती करून न घेता ‘किती केलं तरी बायका त्या बायकाच’ असे म्हणणारे सोयशास्त्री बरेच आहेत.

आपल्या शारीरिक संवेदना, तहान, भूक, झोप, कृतिशीलता, लैंगिकता इत्यादि गोष्टी गरजा म्हणून जाणवतात. त्या भागल्याशिवाय मनुष्य स्वस्थ राहू शकत नाही. याविषयीच्या जाणिवा जैव रासायनिक फेरफारांशी निगडित असतात. यापैकी प्रत्येक बाबतीत माणसामाणसात तीव्रतेचा फरक असतो. त्याचप्रमाणे गरजांचे चक्र किती वेगाने फिरते यातही फरक असतो. याबाबत इतरांशी किंवा स्व-निर्मित आदर्शाशी तुलना करून माणसे स्वतःचे वेगळेपण अनुभवतात.

यातील एक टोकाचा प्रकार म्हणजे स्वतःचे शरीर नाकारणे. याचे दुसरे टोक म्हणजे स्वतःच्या शरीरावर प्रेम करणे. या टोकांच्या दरम्यान माणूस कोठे आहे त्यावरून एक स्वविशेष तयार होतो. स्वतःच्या जिवाला कष्ट घ्यावे की नाही, तमा न बाळगता जीव धोक्यात घालावा की नाही, स्वच्छता, प्रसाधन, कुशलता, ताकद, चिवटपणा, लवचिकता, कसरती अशी कितीतरी तपशिलावर या वैशिष्ट्यांची नियंत्रणे असतात. आरशासमोर उभे राहून आपण कसे दिसतो, याचा भलाबुरा विचार केलाच नाही, अशी व्यक्ती विरळा.

स्वभावातील बदलाची मनःस्वास्थ्याच्या दृष्टीने योग्य दिशा राखण्यासाठी शरीराविषयीची स्वीकारभावना वाढली की नाही, हे एक सुकाणू आहे. वयात येताना शारीरिक वैशिष्ट्यांना फाजील महत्त्व प्राप्त होत असते. ते ओसरुन आपण आहोत ते ठीक आहोत, ही स्थिरता संपादन करावी लागते. स्वतःविषयीच्या स्वीकारभावनेप्रमाणेच सामाजिक व्यवहारातही शरीराला महत्त्व आहे, स्पर्शाला महत्त्व आहे. आईला प्रेमाने विलगणारे मूल असो किंवा हस्तांदोलन करणारे मुत्सही असोत की, ऐतिहासिक कथेमधला काकाच्या पायाला मिठी घालणारा पुतण्या असो, प्रत्येक ठिकाणी कृतींना, स्पर्शाला सांकेतिक आणि नैसर्गिक असे दोन्ही अर्थ प्राप्त झालेले दिसतील.

शारीरिक वैशिष्ट्यांना धरून घडणार्‍या जाणिवांमध्ये लैंगिकता केंद्रस्थानी असते. प्रचलित स्वभाव-प्रतिमा सतत मुलामुलींचे स्वत्व वेगवेगळे घडवण्याचे काम करीत असतात. संगोपन काळात दिल्या जाणार्‍या शिकवणीने, संधींनी आणि मर्यादांनी स्त्रीत्वाची किंवा पुरुषत्वाची जाणीव निर्माण केली जाते. त्यातील संघर्ष किंवा समन्वय यावर स्वभावाची इतरांना जाणवणारी, दिसणारी वैशिष्ट्ये अवलंबून असतात.

या जाणिवा घडत असतानाच बौद्धिक गुणवत्तेमुळे, त्यात काही वेगळ्या दिशा निर्माण होतात. समज, आकलन, चातुर्य इत्यादि नावांनी आपण हा पैलू ओळखतो. यातही अनुवंशाची देणगी पायाभूत असते, तर परिस्थितीतून मिळणारे उद्दीपन व आव्हान यांच्या एकत्र परिणामाने प्रत्यक्ष वागणे नियंत्रित होत असते. परंतु रूपाप्रमाणेच बुद्धीचाही ‘स्व’च्या घडणीवर खोल परिणाम होतो. आपण हुशार आहोत, मध्यम आहोत, ‘ढ’ आहोत अशा कल्पना माणसांची ध्येये ठरवण्यातही काम करतात.

श्रेष्ठता किंवा न्यूनता हे भावात्मक पातळीवर ठरतात आणि कशासाठी, कुठवर प्रयत्न करावे याचेही नियंत्रण करतात. ज्याला चटकन कळते त्याचे शैक्षणिक प्रश्न वेगळे असतात, ज्याला कळायला वेळ लागतो, त्याचे वेगळे होतात. हुशार माणसात अन्य स्वभावविशेष सामान्य माणसांप्रमाणेच आढळू शकतात. घाबरट स्वभावाची हुशार माणसे चमकू शकत नाहीत. अशी उदाहरणे पुष्कळच बघायला मिळतात. याचे कारण बौद्धिक देणगी एक प्रकारचा मूळ अंक आहे. त्याच्या जोडीला जी इतर वैशिष्ट्ये असतील त्यावरून समग्र स्वभाव ठरतो.

सामाजिक पैलूमध्ये तीन गुणांचा समावेश होतो - सामिलकी, बांधीलकी, आणि आपुलकी, सामिलकी म्हणजे आपण आपल्या निकटवर्तीयांमध्ये कोणाला सामील करून घेतो आणि कोणत्या समूहात सामील होऊ इच्छितो. बांधिलकी म्हणजे आपण दुसर्‍याचे वर्तन नियंत्रित करतो आणि दुसर्‍यांकडून आपल्या वर्तनाचे नियंत्रण होऊ देतो, आणि आपुलकी म्हणजे दुसर्‍या व्यक्तींबद्दल आपल्याला प्रेम, स्नेह, जिव्हाळा वाटतो आणि त्यांनाही आपल्याबद्दल वाटावे अशी आपण इच्छा धरतो.

या तीन वैशिष्ट्यांना सामिलकी, बांधिलकी, आपुलकी अनुलक्षून माणसामाणसांच्या वागण्यातल्या स्थिर विशेषांची निर्मिती होते. एकलकोंडा-जगमित्र, नियंत्रक-नियंत्रित, प्रेमळ तुसडा हे स्वभाव-विशेष या मूलभूत प्रतिसादांशी निगडित असतात. यामुळे चारचौघात वावरताना पुढाकार घेऊन काही करणारी, घडवणारी व्यक्ती सामिलकी मिळवू शकणारी लागते, पण व्यक्त करणारी आणि नियंत्रण करू इच्छिणारी असते असे लक्षात येईल.

नियंत्रित राहणे पसंत करणारी माणसे काहीशी सांगकामी, बोलावले तरच पुढे येणारी आणि दुसर्‍याचा होरा पाहून वागणारी असतात असेही दिसेल. या तीनच विशेषांमधूनही अनेक छटांचे नमुने तयार होतात आणि त्यातही शारीरिक आणि बौद्धिक देणगीच्या पायाभूत वैशिष्ट्यांचा स्वतःचा रंग मिसळलेला असतो.

भावनिकदृष्ट्या स्वभावाचे वर्णन करताना रुक्ष ते भावनाप्रधान, आनंदी ते त्रस्त, किंवा व्यक्त करून टाकणारा ते मनातल्या मनात कुढणारा असे विशेष नेहमी वापरले जातात.

याखेरीजही विशिष्ट भावनेला धरून रागीट चिंतातुर, विषादग्रस्त इत्यादि वर्णने केली जातात. या पैलूबाबत एक गोष्ट महत्त्वाची आहे. इतर बाबतीत विशिष्ट निसर्गक्रमाने काही विकासाचे टप्पे गाठले जातात. परंतु, भावनिक विकासात ठरावीक टप्प्याने प्रगल्भता प्राप्त होते असे नाही. सर्वांत ठळकपणे शारीरिक बाबतीत हे टप्पे अगदी स्पष्ट असतात. बौद्धिक विकासात, भाषिक विकासातही असे काही क्रम सांगता येतात. परंतु भावनिक विकासात मात्र असे काही सांगता येत नाही.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

लहान मुलासारखे वागणारी मोठी माणसे पुष्कळदा बघायला मिळतात. याचा स्वभावावरील औषधाच्या दृष्टीने अर्थ असा की, स्वभाव विशेषांपैकी हा अधिक लवचिक म्हणूनच बदल घडण्याला अधिक अनुकूल असा विशेष आहे. पण नेमक्या याच बाबतीत ‘सगळं पटतं हो; पण काय करणार? कळतं पण वळत नाही. ऐन वेळी पहिले पाढे पंचावन्न’ असे सांगितले जाते.

भावनांच्या बाबतीत प्रत्येकाला १) अनुभवाला येणारी भावछटा, २) शारीरिक फेरफार, आणि ३) व्यक्त करण्यासाठी होणारे वर्तन; या तीन घटकांचा विचार करावा लागतो. यापैकी शारीरिक फेरफारातून काही विकार, आजार उद्भवू शकतात. हे फेरफार अनैच्छिक स्वरूपाचे असल्यामुळे एकदा भावनिक प्रतिक्रिया सुरू झाली की, जैव-रासायनिक प्रक्रिया चालू होतातच. सर्वसामान्यपणे भावनिक विकासात ‘नियंत्रण’ या कल्पनेला विशेष महत्त्व दिले जाते. भावना निर्माण झाल्या, तरी त्या दाखवायच्या नाहीत, असे तत्त्व भावनिक नियंत्रणासाठी सांगितले जाते.

यात काही व्यक्ती यश मिळवतातही; पण शारीरिक हानी टळत नाही. यामुळे भावनिक प्रगल्भता याचा एक अर्थ ऊठसूट भावनाविवश होण्याचेच प्रमाण कमी करणे आणि दुसरा, भावना व्यक्त करून जीवन अधिक सुखकर व भावसंपन्न व्हावे म्हणून प्रयत्न करणे. या विशिष्ट प्रगतीवर शेवटच्या प्रकरणात तपशिलवार विचार केलेला आहे. स्वतःचा भावनिक स्वभाव कसा आहे याकडे लक्ष देऊन त्या प्रकरणातील ‘औषध’ ज्याचे त्याला सिद्ध करता येईल.

‘स्वभावाला औषध असते’ - सुधीर वनारसे, श्यामला वनारसे

डायमंड पब्लिकेशन्स, पुणे | पाने – १४० | मूल्य – २५० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......