ही कादंबरी स्त्रीवादीचं सोंग न घेता पात्रांच्या सामूहिक शहाणपणाने आणि सामूहिक हतबलतेमधून झालेल्या साक्षात्कारातून स्वत:चा मुक्तीवादी ‘मोक्ष’ शोधत राहते...
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
राहुल विद्या माने
  • ‘विहिरीची मुलगी’ या ऐश्वर्या रेवडकर
  • Sat , 29 June 2024
  • ग्रंथनामा शिफारस विहिरीची मुलगी Vihirichi Mulgi ऐश्वर्या रेवडकर Aishwarya Revadkar

‘विहिरीची मुलगी’ या ऐश्वर्या रेवडकर यांच्या कादंबरीची समीक्षा करण्याची माझी बौद्धिक योग्यता व साहित्यिक क्षमता नाही. पण भावनांचे कल्लोळ आणि दुर्गुणांचे षडरिपू भिनलेल्या एका साध्या माणसाला या कादंबरीतून काय मिळाले, हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे.

या कादंबरीची नायिका, मीरा विचारांच्या-भावनेच्या शिवाराच्या पलीकडे जाऊन रुजत रुजत, ठिबक सिंचनासारखी आपल्या अंतर्मनाच्या वावरात टप टप पडत जाते. आणि समर्पण भावाने आपल्या दगडासम ‘पुरुषी’ जाणिवेला मृदु करण्याचा वसा घेऊन गात राहते- “मज तुझी आठवण येते; झाडांशी निजलो आपण, झाडांशी पुन्हा उगवावे...”

ही कादंबरी परिस्थितीची हतबलता सोसून धैर्याने आस्थापूर्वक जगण्याचा आधार शोधत जाण्याचा एक प्रवास अनुभव आहे. यातील घरं, माणसं वैयक्तिक आयुष्यातील दु:खानं विस्कटलेली आहेत. कुणाचं बालपण, कुणाचं वैवाहिक जीवन, कुणाचं तारुण्य, कुणाचं प्रेम-जीवन, कुणाचं सांसारिक सुख, अशा अनेक पातळ्यांवर मनावर आघात झालेली माणसं, या कादंबरीत भेटतात. ती आपल्याच निराशेच्या चक्रात हरवून गेलेली आहेत आणि तरीही त्यांनी आपल्यापुरता जगण्याचा काही तरी सकारात्मक सूर शोधण्याचा प्रयत्न चालवलेला आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

वडील-मुलगी, मुलगी-आई, मुलगी-सावत्र आई, मुलगी-सावत्र वडील, आई-सावत्र वडील, मुलगी-आजी, मुलगी-बॉयफ्रेंड, मुलगी-प्रियकर अशा प्रत्येक नात्यांची  वीण का उसवलेली आहे, हे समजून घेताना आपल्या मनाची तगमग होते. या व्यक्तींच्या आयुष्यात तडफडीचं अस्वस्थ वादळ आणण्यात दोष कुणाचाच नाही, हे पण आपल्याला पुढे कळून चुकतं. आयुष्याच्या नाजूक क्षणी यातील प्रत्येक नात्याने एकमेकाला आधार देण्याची आपली जबाबदारी निभावलेली आहे, असं आपल्याला कळत जातं. 

मेलोड्रॅमॅटिक सिनेमातील पात्रे जशी आपल्या ‘लार्जर दॅन लाइफ’ मनोविश्वाचा भाग होऊन जातात, अगदी तसेच या कादंबरीतील पात्रे आपल्या मनाला हलवून जातात. कुणाचेच चुकले नाही, पण प्रत्येक जण काहीतरी दुखलं-खुपलं म्हणून न्यायाची दाद मागत आहे : “मला आनंदी जीवन जगायचं आहे, मला माझ्या मायेचा-प्रेमाचा अनुशेष मिळू दे, मला माझे हरवलेले सौख्य मिळू दे... हे दयाघना!”

या कादंबरीत प्रत्येक पात्राच्या दृष्टीकोनातून मानसिक आरोग्याचे वेगवेगळे पदर समोर येतात. युवा, लग्नानंतर बाळ झाल्यानंतर मानसिक आरोग्यामध्ये होणारे बदल दिसतात, त्याची विविध लक्षणं समजून घ्यायला मदत होते. वयाच्या, नात्याच्या आणि आजारांच्या विविध पातळ्यांवर मानसिक आजाराच्या विविध अवस्था समजून घ्यायला मदत होते. सकारात्मक समुपदेशनाबरोबर आनंदी जगण्याची चावी शोधण्यासाठी प्रोत्साहन देणारा आत्म-संवाद, स्व-सूचना आणि आत्मविश्वास जगावणारा डॉक्टर / समुपदेशक आणि रुग्ण यांमधील संवादाचं महत्त्व अधोरेखित होतं.

एकमेकांना समजून घेण्यात या कथेतील पात्रे व्यस्त आहेत. एकमेकांच्या दु:खाच्या कारणांचा शोध घेत, ते एकमेकांच्या आधारे सुखाच्या मृगजळाजवळ जाऊ पाहत आहेत. सशक्तीकरणाची भूक या पात्रांत दिसते. मीराच्या सावत्र आईला, निशाला उतारवयात स्कूटर शिकायची असते. मीराच्या मैत्रिणींना करियरच्या महत्त्वाकांक्षा असतात. स्वत: मीराला आयुष्यात समाजकार्य, संशोधनातील करियर असं आणखी बरंच काही करायचं असतं. मीराच्या एका मैत्रिणीला परदेशात जाऊन काय काय करायचं असतं.    

मीराचे वडील, अविनाश हे या कथेतील प्रगतीशील पुरुषाचं उत्कृष्ट उदाहरण ठरावं. ते आपल्या मुलीला स्वतंत्र व्यक्तिमत्त्व बनण्यासाठी पूर्ण वाव देतात. मीराच्या शारीरिक आरोग्याचं भान ठेवून आणि मासिक पाळीसारख्या संवेदनशील विषयावर कोवळ्या वयात तिच्याशी संवाद करतात. यातून मीराच्या निर्भय, बंडखोर आणि उत्तुंग आव्हानांना तोंड द्यायला सज्ज असलेल्या व्यक्तिमत्त्वाला एक बहार येते.

मीरा कोण आहे, याचा ही कादंबरी वेगवेगळ्या अंगानं वेध घेते. ती लहानपणापासून डॉ. दाभोलकर यांच्या विचारांनी प्रेरित झालेली मुलगी असते. तिला सावत्र वडिलांच्या घरी एका अवघड प्रसंगाला सामोरं जावं लागतं. त्यातून बाहेर येण्यासाठीसुद्धा वडीलांचा समंजसपणा कामी येतो.

मीराचा ‘बॉयफ्रेंड’ आणि ती ज्यावर वेड्यासारखे प्रेम करते, तो ‘प्रियकर’, या दोन मुलांबरोबर उथळ व सखोल प्रेमाबद्दल आध्यात्मिक व व्यावहारिक पातळीवरील संवाद होतात. ती ज्या मल्हारवर वेड्यासारखे प्रेम करते आणि ज्या यशकडे सुरुवातीपासून आकर्षित झालेली असते, त्या दोघांच्या आठवणी, भास आणि त्यांच्याबद्दलचे स्वप्न, यामुळे तारुण्यातील एका मुलीच्या मनातील ओढीच्या लाटा-लहरी आपल्यापर्यंत पोचतात!  

मीराच्या प्रवासाच्या माध्यमातून तिच्या व्यक्तिमत्त्वातील उत्क्रांतीसुद्धा उलगडत जाते. तिचे तिच्यापासून तुटलेल्या आईच्या घराचा शोध घेत जाणे, तिच्याशी संवाद करण्यासाठी तिला करावा लागलेला मानसिक संघर्ष, तिच्या जीवनात आलेले युवा पुरुष, यांच्याबरोबर तिला प्रेम-वासना-आसक्तीबद्दल झालेले वेगवेगळे दृष्टान्त, यामुळे ती अधिक समृद्ध, व्यापक होत जाते. हे सगळे होताना तिला बरंच सोसावे लागते. या प्रवासात बऱ्याच वेळा ती अडखळते, ठेचाळते, कोसळते... कधी तिच्या स्वाभिमानाचा, कधी तिच्या शीलाचा आणि कधी तिच्या प्रामाणिक हळव्या मनाचा अपमान होतो.

अशा दुखावलेल्या प्रहरांमध्ये आपल्या आयुष्यात आपण विश्वासू व्यक्तींशी हितगुज करतो, गुंतागुंत कशी सोडवावी, याबद्दल संवाद करतो. मीरा हे हितगुज तिच्या नात्यातील जवळच्या अशा मैत्रिणीशी करते. पण त्यापेक्षासुद्धा ती निसर्गाशी जास्त समरसतेने अबोल संवाद साधते. तिला भेटलेला समुद्र, आंब्याचे झाड, बीचवर भेटलेली कुत्र्याचे पिल्लू, नदी, मंदिर, गवतफूल, पवनचक्की, चिमणी, आकाश, पाऊस हे तिचे सखे सोबती आहेत.

मीराला पडणारी स्वप्नंही मन मोहून घेतात. तिला विहिरीचं स्वप्न पडतं. विहिरीमध्ये जीव द्यायला गेलेल्या कुमारी गर्भवतीचं स्वप्न पडतं. ती त्या महिलेशी संवाद साधते आणि तिला वाचवून घरी घेऊन येते. तिला तिच्या आजीचं स्वप्न पडतं. तिच्यामुळे, कदाचित अनुवांशिक कारणांमुळे मीराच्या आईला मानसिक आजार झाला असेल. त्या स्वप्नात आजी आणि तिच्या गर्भातून येणाऱ्या हजारो मुली या तिला आपल्या बहिणी वाटतात. मीराची स्वप्नं हे स्वतंत्र विश्व असलेलं एक समांतर प्रतीक वाटतं.   

पारंपरिक समाजात कलंक समजल्या जाणाऱ्या बऱ्याच चालीरितीबद्दल मीरा, तिच्या मैत्रिणी धारदार मतं मांडतात. योनिशुचितेच्या आग्रहावर उठवलेलं प्रश्नचिन्ह, लग्नाआधी आणि लग्नाबाहेरील लैंगिक संबंध, हस्तमैथुन्य, लैंगिक सुखाची अभिव्यक्ती, मासिक पाळीमध्ये घरी करावयाचं कामकाज, शारीरिक सुखाची भूक, या सर्व गोष्टींना तर्कनिष्ठ, परिवर्तनाच्या नजरेतून पाहता येईल आणि व्यक्तीस्वातंत्र्य आणि मुक्ती यांच्या चष्म्यातून कसं जगता येईल, याबद्दल या मैत्रिणी आणि इतर पात्रं व्यक्त होत राहतात. 

यात मीरा महिलांच्या आरोग्याबद्दल प्रचलित असलेल्या पारंपरिक अंधश्रद्धांचा समाचारसुद्धा घेते. मासिक पाळीमुळे पाळला जाणारा विटाळ, मूल नसलेल्या महिलेला वाळीत टाकणं, ‘तुळशी विवाह’मधील पुरुषसत्ताक कथानक, त्यामुळे होणारी मीराची कोंडी, मानसिक आजाराबद्दल बऱ्याच गैरसमजुती पाळणारा समाज, यामुळे आपल्या समाजाला चांगलंच गालबोट लागलं आहे.

याव्यतिरिक्त महिलांच्या विशेष आरोग्य समस्यांबद्दल उदा. बायपोलार डिसऑर्डर, PCOD आणि पोस्टपार्टम सायकोसिस याबद्दल मीरा आणि या कादंबरीतील पात्रं खुलेपणाने बोलतात. कलंक व भीती असलेल्या मुद्द्यांविषयी आपल्या समाजात संवेदनशीलता, ज्ञान आणि विवेकी दृष्टीकोन याचा अभाव कमी करण्याचा प्रयत्न या चर्चांतून होतो. 

समकालीन समाजातील बऱ्याच चुकीच्या चालीरितीचासुद्धा मीरा समाचार घेते. स्त्री सक्षमीकरणाच्या नावाखाली पितृसत्ताक शोषणाची मूल्यं रुजवण्याचा प्रयत्न कसा आजच्या काळात केला जातो; स्त्रीच्या आयुष्यात येणाऱ्या संकटांसाठी तिलाच दोष देण्याची मानसिकता कशी सर्वत्र असते; स्त्रियांना स्वातंत्र्य देण्याच्या नावाखाली सौंदर्य स्पर्धातील त्यांचं बाजारू वस्तूकरण, त्याबद्दल ती सांगू पाहते.

याबरोबरच स्त्रियांबद्दल आपल्या समाजात प्रचलित असलेल्या साचेबद्ध प्रतिमांचं सखोल विश्लेषण एका शिक्षण संस्थेतील वर्गाच्या प्रसंगातून ठळकपणे सांगितलं आहे. हे सांगण्याची शैली मात्र उपरोधिक विनोदाची आहे. 

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.............................................................................................................................................................

या कादंबरीला स्त्रीवादाच्या कप्प्यात टाकावं, तर मीराकडे स्वत:चं काही शहाणपण नाही, असा अर्थ होईल आणि ते अन्यायकारक ठरेल. मीरा विवेकी जगण्याची ‘कोशिश’ करू पाहणाऱ्या अनेक महिलांची प्रतिनिधी आहे.    

मीराचा तिला पडलेल्या प्रश्नांच्या मालिकेच्या उत्तरांचा शोध आणि त्यामार्फत स्वत:चं अस्तित्त्व कोरण्याचा, आयुष्य घडवण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत थांबत नाही. स्वत:च्या शरीरामार्फत सुखाचे दरवाजे उघडण्याचा राजमार्ग आहे, याबद्दल तिला भेटणारे स्त्री-सहप्रवासी सांगत राहतात. हे सहप्रवासी कधी तिच्या मैत्रिणी असतात, कधी समुपदेशक, कधी डॉक्टर, कधी सामाजिक कार्यकर्ते, कधी नात्यातील जवळचे-लांबचे सुहृद! त्या सर्वांचं एकच म्हणणं असतं- आनंदाची गळाभेट घेण्यासाठी सुखाच्या पुरुषसत्ताक कल्पनांमधून मुक्ती मिळवणं, हा एक आणि एकच उपाय आहे.

शेवटी मीरा एकाच निष्कर्षापर्यंत पोचते, “नेहमी मी हे शरीर दुसऱ्याच्या नजरेतून पाहिले. स्वत:कडे असं नेहमी दुसऱ्याच्या नजरेतून कशाला पाहायचं? हे माझं शरीर आहे. याला कसं पाहायचं ते मी ठरवणार. समाजाच्या हाती मी माझ्या शरीराचं नियंत्रण देणार नाही. माझं शरीर आहे, तर सत्ता माझी हवी.”  (पृ. २१८)

ही कादंबरी स्त्रीवादीचं सोंग न घेता पात्रांच्या सामूहिक शहाणपणाने आणि सामूहिक हतबलतेमधून झालेल्या साक्षात्कारातून स्वत:चा मुक्तीवादी ‘मोक्ष’ शोधत राहते.

‘विहिरीची मुलगी’ - ऐश्वर्या रेवडकर | न्यू एरा पब्लिशिंग हाऊस, पुणे | पाने - २७४ | मूल्य - ३५० रुपये.

.................................................................................................................................................................

लेखक राहुल विद्या माने अनुवादक, मुक्त पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ता आहेत.

nirvaanaindia@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......