लेखक बाळासाहेब लबडे यांची ‘चिंबोरेयुद्ध’ ही कादंबरी १ जून २०२४ रोजी जळगावच्या अथर्व पब्लिकेशनतर्फे प्रकाशित झाली आहे. या नव्याकोऱ्या कादंबरीतील हा एक संपादित अंश…
.................................................................................................................................................................
लाल्या सांगू लागला. आधी माणूस म्हणून होतो त्या वेळची गोष्ट आहे. किती तरी वस्तू ऑनलाईन असतात. एक जाहिरात वाचली की, लगेच दुसरी जाहिरात येते. बबल फिल्टर चालूच असतो. माझ्या देशाचा जास्तीत जास्त पैसा जाहिरातीत खर्च होतो. ‘मेरा देश बदल रहा हैं | आगे बढ रहा हैं हल्ली मी जाहिरात पाहण्याचा आनंद घेत असतो. सत्ता आली की, जाहिरातींची संख्या वाढते. जाहिरात पासष्टावी कला. ती नव्या गुलामीची, शोषणाची ही सुरुवात असते. प्रत्येक वस्तू आपली किंमत घेऊन येते. तसा ब्रँडसुद्धा घेऊन येते. आपणास वाटते ह्या ब्रँडची वस्तू आपल्याकडे असली की, आपलं स्टँडर्ड ब्राँन्डेड आहे. ‘जंगली रमी पे आओ ना महाराज | ट्वेन्टी फोर बाय सेवन | हाजीर हैं! आपके लिए |’ अशा एकापाठोपाठ एक हव्या असणाऱ्या आणि नको असणाऱ्या कितीतरी जाहिरातींना मी लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करत आलो आहे. पण आता लाईक, शेअर आणि कमेंट, तेच ते तेच ते. थकतोच ना माणूस. मोबाइलचा कंटाळा आला आहे. त्या फोबियातून बाहेर पडण्यासाठी काय करावं? हा प्रश्न आहे. आजकाल लोक मानसशास्त्रज्ञाकडे जातात. मी ठरवले आहे आपल्या मनाला आपणच वळण लावायचे. खरेदीच्या शेवटच्या वस्तूकडे वळायचे. ते ही ‘लकी गिफ्ट’च्या.
दिवाळी सुरू झाली आहे. ह्या दिवाळीत आपली संस्कृती जपा. वस्तू विकत घ्या. आणि वस्तू मिळेपर्यंत लकी गिफ्ट घ्या. अमका तमका दिवाळी अंक म्हणजे आपली संस्कृती असा आमचा शेजारी म्हणत असतो. त्यामुळे विकत घेऊन वाचा. वाचन संस्कृती वाढवा. असा आज माहोल तो तयार करत असतो. म्हणून मी नावाजलेला ‘सत्यकथा पानोपानी’ हा दिवाळी अंक मागवला आहे. त्यावर ‘लकी गिफ्ट’ आहे. दुकानांच्या बाहेर बोर्ड असतात अगदी कमी किमतीत म्हणजे पन्नास टक्के घसघशीत सूट. साठ टक्के सूट. प्रत्यक्षात सुटेची वस्तू संपलेली असते. नाहीतर एक्सपायरी झालेली असते. मग दुकानदार आपल्या गळ्यात कुठली ना कुठली वस्तू मारतो. ग्राहकाचं आणि दुकानदाराचं घासाघासीचं किमतीचं गणित सारख चालू असतं. सगळीकडे मला ‘आहे रे’- ‘आहे रे’ असेच म्हणणारे भेटतात. तर कधी ‘नाही रे’ म्हणणारे भेटतात. शेवटी रडगाणे गाण्यापेक्षा जीवनात आहे, ते सुंदर बनवण्याची कला जमायला हवी.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
आजच्या काळात आपण मान्य करायला हवं की, जग हे एक मार्केट आहे. फायद्यातोट्याचं गणित मानवी संबंधातही चालू असते. बाकी माणसांचे काहीच प्रकार असू शकत नाहीत. मी ऑनलाईन दिवाळी अंक मागवला. त्या सोबत ‘लकी गिफ्ट’ म्हणून पत्रिका आली.
पत्रिकाकथा मी वाचली. ती चिंबोऱ्याच्या जीवनावर आहे. दिवाळीअंक खास असा कथेला वाहिलेला आहे. कुठे काय फ्री आहे याच्या शोधात मी असतो. मोबाईलवर तर खूपच अशा जाहिराती असतात. शेअर करून थकतो. पण गिफ्ट काही मिळत नाही. पण इथं असं नाही गिफ्ट डायरेक्ट घरी आलं आहे. मला कथा वाचनाचा रेहमानी किडा आहे. एकदा का माझ्या वाचनाची तंद्री लागली की, समाधीच लागते. मग मी इकडे तिकडे पहात नाही. गुंग आणि फक्त गुंग. बाकी काही नाही. ही पत्रिकेतील रूपक कथा मला जरा वेगळीच वाटली. ही माझीच कथा आहे असंच वाचताना वाटलं. मी अचंबित होत गेलो. कथेत पवित्र चिंबोऱ्याची पूजा केल्यानंतर काय झाले, याचा अनुभव सांगितला आहे. आणि जर ह्या पत्रिकेचा अपमान केला तर या कथेत जे सांगीतले आहे तसे होईल.
एखादा गिफ्ट पाठवत असतो ते चांगल्यासाठी. ही काय असली चिंबोऱ्याची कथा. या लेखकाचे नाव मी वाचले तर फारच वेगळे वाटले. म्हणजे ‘चिंबोरीमॅन’ असं होतं. असं कसं नाव असू शकतं? म्हणून मी त्याच्या कथेखाली पत्ता होता तो पाहिला. पण संपर्क क्रमांक नव्हता. त्या शेजारी कंसात असं लिहिलं होतं. (माणूस म्हणून काही दिवस शिल्लक आणि दुसऱ्या वाचकाचेही) हे असं काही मी आत्तापर्यंत कुठल्या कथेखाली मजकूर पाहिला नव्हता. त्यामुळे अचंबित झालो. असा पत्ता व नाव देणारी ही पत्रिका पहिलीच होती. नाहीतर खाली असते ‘जय संतोषी माँ’, ‘जय शिवशंकर’ वगैरे वगैरे....
मी थोडा घाबरलो. वाचली आणि ती पत्रिका मी कचऱ्याच्या डब्यात टाकून दिली. ही पत्रिका प्रकाशित होऊन दोनच दिवस झाले होते. या पत्रिकेचा मी दुसरा वाचक आहे का? मनात चमकून गेलं. तशी मनात भीती निर्माण झाली. लेखकाप्रमाणे माझेही थोडेच दिवस शिल्लक राहिलेत का? छे! माझ्याआधी हे कुणीतरी वाचलं असेल. हे असं काय होऊ शकते का? पण पत्रिकेला दोनच दिवस झालेत. ‘दुकानदार हा काही वाचक होऊ शकत नाही’. मागे कुणीतरी बोलल्याचं आठवतंय. म्हणजे पत्रिकेतील पहिला बळी माझा असावा का? पुलाला वगैरे देतात तसा. ‘नाही हो! छे! वाचनाने कधी कुणाचा बळी गेला आहे का?’ मी माझ्या मनाला समजावले. बळी! कल्पना भयानक आहे. म्हणजे शिरच्छेद किंवा गाडून टाकणे किंवा भयानक मौत. नाही मला अजून जगायचं आहे. एवढ्या लवकर मरून कसं चालेल. समजा मी ही कथा मेलवर वाचली असती तर, अशी आफत आली नसती. ई-अंक आहे का? यापुढे मला विचारायला हवं. म्हणजे चिंतेचा किडा डोक्यात वळवळणार नाही. अंनिसवाल्यांना सांगायला हवं. असे लोक कसे अंधश्रद्धा पसरवत असतात. मी अंनिसचा जिल्हाध्यक्ष गाठला. तो म्हणाला, ‘बरं, झालं तुम्ही माझ्याकडं आलात. हे असं काम आपल्या सगळ्यांना मिळून करायचं आहे. समाजात विज्ञानाधिष्ठित दृष्टीकोन रूजवायला हवा.’ मी त्याला सगळा विषय समजावून सांगितला. तो म्हणाला, ‘आपण तक्रार पोलीस स्टेशनमध्ये केली असती, पण तुम्ही ती पत्रिकाच टाकून दिली. पुरावा नष्ट झाला.’
मग मी विचार केला, आपण प्रत्यक्ष दुकानदाराकडे जाऊन त्याची कानउखाडणी करू.
.................................................................................................................................................................
‘‘ज्याच्याकडे बंदा त्याचा नाही वांदा’ असे म्हणत उजेडात विरोध व अंधारात दिलजमाई करत सत्ता आहे तोवर हात धुऊन घेणाऱ्या व सत्तेगणिक निष्ठा बदलणाऱ्या चिंबोरीवृत्तीच्या माणसांची ही कथा आहे. म्हणजेच शासन व शोषण, नमन व दमन ही नीती स्वीकारलेल्यांची कथा आहे. ह्या दोन्ही वृत्तींच्यांनी लोकशाहीच्या नावावर छुपी भांडवलशाहीच निर्माण केली आहे. जिथे पोषणकर्तेच शोषणकर्ते आहेत. इथे थिंकटॅंकवाले चिंबोरे ‘किंगमेकर’ बनून जोमात वावरतात, तर काही सत्तेत अथवा विरोधात न राहता ‘वेट ॲण्ड वॉच’ची भूमिका घेऊन संधीची वाट पाहतात.
बहुसंख्याकांना भावनिक मुद्द्यांमध्ये गुंतवत मूळ विषयांना बगल देण्यात काही मग्न असतात, तर काही आश्वासनांची खैरात करत मनोरंजन करणाऱ्या वावड्या उठवताना दिसतात. काही शहाणे तीव्र राष्ट्रभक्तीतून गुलाम निर्माण करायचे ते तंत्र विकसित करतात. व ज्यांना कोणतीच लायकी नाही, ते सगळ्या समित्यांतून घुसताना दिसतात.
मार्क्सवाद, आणीबाणी, जागतिकीकरण, सोशल मीडिया, निवडणुकांचं संख्याशास्त्र, आंतरराष्ट्रीय पुंजीवाद, ह्यांचा खल होतानाच आधुनिक युद्धतंत्र, सायबरहल्ले व रासायनिक युद्धसामग्रीसह रोगजंतू शरीरात घुसडण्याच्या कारस्थानावरही ऊहापोह होतो. चिंबोरवाडीतील चिबोऱ्यांचे राजकारण, चिंबोरजनतेला संभ्रमावस्थेत ढकलून, शोषणाचे नवे आयाम निर्माण करत, सतत सत्तेवर राहण्यासाठी, महायुद्धाची चिंबोरघाई त्यांच्यावर लादत तर नाही ना? असा प्रश्न ही कादंबरी निर्माण करते.”
- दामोदर मावजो (‘ज्ञानपीठ’विजेते कोकणी कादंबरीकार, गोवा)
.................................................................................................................................................................
मी सरळ दुकानदाराला फोन लावला. तो म्हणाला, ‘आत्मनिर्भर बना’. तो लेखक वाचकांना तपासतो आहे. किती लोक जागे आहेत. आपण टेलिग्रामवर बोलूया मी मोकळा झाल्यावर.’ मी तो फोन ठेवण्याच्या आत माझ्या मनातील भीती व्यक्त करून टाकली. तो बोलू लागला. म्हणाला,
‘‘हा लेखक कोण आहे, हे माहीत नाही. दरवर्षी तो दिवाळी अंकासोबत एक पत्रिकाकथा पाठवतो. म्हणजे मला शंका आहे. तो तोच असावा का? कारण प्रत्येक वर्षी तो नवीन टोपननाव धारण करत असतो. त्याचा पत्ताही बदलत असतो. पण त्याची कथा प्रचंड वाचली जाते. मला काय माझे अंक खपण्याशी मतलब. एक तर आजचा वाचक ई-माध्यमांवर आहे. त्यामुळे छापील अंकाला विचारतो कोण? त्याच्यामुळे जर माझ्या अंकाची विक्रमी विक्री होत असेल, तर मी बाकीच्या चौकशा कशाला करू. राजा मरू नाहीतर, राणी मरू, मला काही घेणे देणे नाही. मला फक्त व्यवहाराशी मतलब आहे. पण एक मात्र खरे त्याची पत्रिका कथा माझं काही वाईटही करत नाही. जे व्हायचं ते दुसऱ्या वाचकाचं होईल. माझ्या प्रती विक्रमी खपतात. हीच माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. ठेवतो फोन. रात्री टेलिग्रामवर बोलुया.”
त्यानंतर मी रात्री त्याच्या मॅसेजची वाट पाहू लागलो. रात्री आठ वाजता माझा फोन मॅसेज अलर्ट टोन वाजला. मी त्वरित वाचले. आम्ही बोललो त्याच्यापुढेच त्याने बोलायला सुरुवात केली. सरसर मॅसेजचा पाऊस पडत होता. मोबाईल टिंगटिंग वाजत होता. तोही टायपत होता, मी ही टायपत होतो.
तो म्हणाला, “एकमात्र खरे आहे. तो दुभंग आहे. त्याच्या पत्रिकाकथेत जो शेवट असतो, तो तसाच घडतो. मग वाचकांना ती सत्यकथा वाटायला लागते. त्यामुळे ही सत्यकथा वाचण्यासाठी वाचक कमालीचे उत्सुक असतात. पण भाग्य फळफळतं ते फक्त दुसऱ्या वाचकाचं किंवा वाटोळं होतं ते दुसऱ्या वाचकाचं. त्यामुळे त्याची पत्रिकाकथा मी वाचून जशीच्या तशी प्रेसकडं पाठवत असतो.”
मी म्हणालो, “असे कसे लेखक निवडता तुम्ही. त्याचं नाव हवं ना बाजारात.” तो म्हणाला,
“तो कुठे मोठा लेखक आहे. पत्रिकाकथालेखक आहे. दोन मेंदूचा उलटासुलटा. आम्हाला दिवाळी अंक मिळतो. त्याच्याबरोबर आम्ही गिफ्ट म्हणून त्याची पत्रिकाकथा पाठवतो. मागच्या कथेचं एक वेगळेपणच होतं. म्हणजे एक वाचक आमच्या दुकानात आला. माझा शोध घेत. हातात भला मोठा पुष्पगुच्छ घेऊन. भलं मोठं गिफ्ट घेऊन. मला तर आश्चर्यच वाटलं. मला काही त्यानं बोलू दिलं नाही. तो म्हणाला, ‘तुमचे सगळे अंक एकट्यालाच विकत घ्यायचे आहेत. तुमच्या गिफ्टमध्ये जी पत्रिकाकथा ‘लॉटरी’ लिहिलेली आहे तो लेखक कुठे आहे? त्याला मला भेटायचं आहे. आणि भरपूर बक्षीस द्यायचं आहे. त्याची कथा मी वाचली. आणि मला एक कोटी रुपयाची लॉटरी लागली. तो लेखक चमत्कारी, पुरोगामी लेखक आहे. त्याच्या कथेत जे असतं ते खरं होतं. असा नवसाला पावणारा लेखक दुर्मीळच म्हणायचा. या वर्षी तुमचा अंक मला मिळाला नाही. त्यावर मी म्हणालो, ‘एकदा त्या लेखकाची पत्रिकाकथा वाचली की, परत त्याला पाठवलेला अंक त्याला मिळत नाही. काय होत असावं काही कळत नाही? आम्हीही त्या लेखकाच्या शोधात आहोत. पण प्रत्येक पत्रिकाकथेला त्याचा पत्ता वेगळा असतो. कुणीतरी वाचक संदेश घेऊन येत नाही. तोपर्यंत आम्ही त्याची कथा पोचत नाही, असं समजतो.”
दुकानदाराला मी म्हटले, “मला तर आता त्या लेखकाचं कुतूहल आणि भीती वाटायला लागली आहे.” त्यावर तो आपल्या यापूर्वीच्या वाचकांचा अनुभव सांगू लागला, “त्या आधीच्या वेळची पत्रिका कथा वेगळीचं होती. एक वाचक आमच्या दुकानात आला. तो त्या कथा लेखकाला शिव्या द्यायला लागला. म्हणाला, ‘मला काय माहीत मी तुमचा दुसरा वाचक आहे. तुमची पत्रिकाकथा मनहूस आहे. प्रतिगामी आहे. लोकांचं चांगल करता येत नसेल तर वाईट तरी करू नका. असे लेखक कशाला पाळता तुम्ही. आम्ही आमच्या ‘नवरा बचाव संघटने’त हा विषय घेतला आहे. लवकरच तुमच्या दुकानावर आम्ही मोर्चा घेऊन येतो.”
मी म्हणालो, “अहो, झालं तरी काय?”
त्यावर तो चिडून म्हणला, “त्या मनहूस कथेत नायकाची बायको त्याला शेवटी पत्रिकेचा अपमान केल्याने लाटण्याने मारते.”
“मग पुढं काय झालं त्यात? एवढं रागावण्यासारखं काय झालं” मी आश्चर्याने म्हणालो.
“काय झालं विचारता?” त्याने शर्टवर करून माझ्याकडे पाठ केली. पाठीवर चांगले काळेनिळे वळ उठले होते. पाठ सुजली होती. मी हात लावून स्पर्श करायचा प्रयत्न केला.
तो म्हणाला, “थांबा झोबतंय! ज्याची जळती त्यालाच कळतं! त्या कथा लेखकावर तुम्ही कार्यवाही करा. नाही तर मीच लाटणे मोर्चा काढतो.”
“माफ करा मला. परत अशी चूक होणार नाही. हा लेखक सोयीनुसार भूमिका घेणारा दिसतो.” मी त्याची माफी मागितली. आणि विषय थोडक्यात संपला.
“आधी चूक करता. मग माफी मागता हे शोभतं का तुम्हाला?”
“अहो, याची दुसरी बाजू तरी पहा”
“एक वाचक दोन वर्षांपूर्वी असाच दुकानामध्ये आला. तो आनंदी होता. हातात गुलाबाचं फूल घेऊन आला. आल्या आल्याच त्याने प्रश्न विचारला,
“कुठाय तो तुमचा पत्रिकाकथालेखक?” मला काय बोलावं ते कळतं नव्हतं.
“म्हणजे म्हणजे कोण? आज काय झालं?”
हा कथेचा दुसरा वाचक असावा. असा अंदाज मी घेतला. पुढे काय होणार याचं वाटुळं झालं का? चांगलं झालं? या संभ्रमातच मी.
“क.. क.. काय झालं?” असं त्या वाचकाला मी विचारलं. त्यावर तो आनंदीत होऊन म्हणाला, “ते लेखक नाहीत ते साधुपुरुष आहेत. त्यांची वाणी सत्यवचनी आहे. अशा महानुभावांचा मला आशीर्वाद घ्यायचा आहे. कुठे आहेत त्यांची चरकमले? ते मध्यममार्गी दिसतात? मी खास त्यांचे आभार मानायला आलो आहे.”
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.............................................................................................................................................................
माझा चेहरा उजळला.
“असं काय त्यानी चांगलं केलं?” त्यावर तो म्हणाला, “मी त्यांच्या कथेचा दुसरा वाचक आहे. ‘सामिल’ ही त्यांची कथा वाचली. त्या कथेतील निवेदकाचा भाऊ भावाशी अत्यंत क्रूर वागतो. शेवटी त्यास पश्चात्ताप होऊन तो भावाच्या चरणाशी माफी मागतो.”
मी उत्साहात म्हणालो, “असं आहे तर…”
तो म्हणाला, “माझा भाऊ राक्षस होता. आज तो माणसात आला. हे फार मोठे उपकार झालेत. कुठे आहे तो लेखक?” परत मी तो निनावी लेखक कसा आहे हे सांगितले. मग त्याने मला गुलाबाचे फुल देऊन आभार मानले. तो निघून गेला. त्या दुकानदाराचं मी सगळं ऐकलं. आणि मीही निमूटपणे खाली मान घालून टेलिग्रामच्या चॅटमधून बाहेर पडलो. दुकानदाराने हात झटकले होते.
आता मला लेखकाचा शोध घ्यायचा होता. त्याला भेटल्याशिवाय मला काही चैन पडणार नव्हती. दुसऱ्या बाजूस मी विज्ञाननिष्ठ होऊन माझ्या मनाला समजावत होतो. अशा भाकडकथा काही खऱ्या असत नाहीत…
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment