‘Lynch Files : The Forgotten Saga of Victims of Hate Crime’ या पुस्तकात आजच्या भयावह चित्राची एक बाजू मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे
ग्रंथनामा - दखलपात्र\इंग्रजी पुस्तक
विकास पालवे
  • ‘Lynch Files : The Forgotten Saga of Victims of Hate Crime’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sat , 01 June 2024
  • ग्रंथनामा दखलपात्र लिंच फाइल्स - द फॉरगॉटन सागा ऑफ व्हिक्टिम्स ऑफ हेट क्राइम Lynch Files : The Forgotten Saga of Victims of Hate Crime ज़िया उस सलाम Ziya Us Salam

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना १९२५ साली झाली. हिंदूंचं सर्व क्षेत्रांत वर्चस्व असलेला ‘अखंड हिंदुस्थान’ निर्माण करून अल्पसंख्याक जाती-धर्मांतील नागरिकांचं नागरिकत्व काढून घेऊन, त्यांना ‘दुय्यम नागरिकत्व’ बहाल करणं वा त्यांचा संपूर्ण निर्वंश करणं, हे संघाचं अंतिम उद्दिष्ट. संघाची राजकीय शाखा असलेला भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०१४ साली सत्तेत आल्यापासून सर्व छोट्या-मोठ्या हिंदू संघटनांची संघाच्या अंतिम उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने घोडदौड सुरू आहे.

समाजमाध्यमांतून फार खुबीने पेरला जाणारा अल्पसंख्याक, विशेषतः मुस्लीम द्वेष आपल्याच देशातील एका धर्मातील लोकांना दुसऱ्या धर्मातील लोकांविरोधात उभं राहायला भाग पाडत आहे. नरेंद्र मोदी यांना २००२च्या गुजरात दंगलींनंतर झालेल्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील टीकेचा आणि त्यामुळे सामोऱ्या जावं लागलेल्या अप्रिय परिस्थितीचा चांगलाच अनुभव आहे. त्यामुळे २०१४नंतर मोठ्या दंगली किंवा नरसंहार घडवून आणण्यापेक्षा छोट्या स्तरावर दोन-चार मुस्लिमांना लक्ष्य करणं आणि त्या माध्यमातून इतरांवर दहशत निर्माण करणं, असा कृतिकार्यक्रम आखला गेला असावा! २०१४नंतर देशभरात ठिकठिकाणी झालेल्या ‘झुंडहत्या’ ही त्याचीच परिणती आहे.

‘हिंदू’ वर्तमानपत्रात पत्रकार, सदरलेखक म्हणून आणि ‘फ्रंटलाईन’ या पाक्षिकात सहायक संपादक म्हणून काम केलेल्या ज़िया उस सलाम या लेखकाचं ‘Lynch Files : The Forgotten Saga of Victims of Hate Crime’ हे पुस्तक देशभरात धार्मिक आणि जातीय वर्चस्वाच्या भावनेतून आणि द्वेषपूर्ण मानसिकतेमुळे घडलेल्या अनेक घटनांचा धांडोळा घेतं. हे पुस्तक एकूण पाच ‘फाइलीं’त विभागलेलं आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

१.

मोदी २०१४ साली निवडून आले, तेव्हा जातीय-धार्मिक दंगलींना पूर्णपणे विराम देणार असं म्हणाले होते, पण प्रत्यक्षात मोहसीन शेख, अखलाक यांच्या हत्या झाल्या. मोदी या घटनांवर मौन बाळगून राहिले, असं जिग्नेश मेवानी प्रस्तावनेत मांडतात. लेखक ‘लिंच’ हा शब्द कधी प्रचलित झाला याचा इतिहास पडताळून पाहतो. तो म्हणतो, “एकोणिसाव्या शतकात कृष्णवर्णीयांना गुलाम म्हणून आणलं जायचं. जे पळून जायचा प्रयत्न करायचे, त्यांची जमावाकडून हत्या केली जायची. जे श्वेतवर्णीय गुलामांच्या बाजूने बोलायचे, त्यांचीही हत्या केली जायची, तिथून हा शब्द समाजमनात रुजला आहे.”

लेखक अनेक वर्तमानपत्रांतील बातम्या, मुख्यमंत्र्यांची वक्तव्यं यांचे संदर्भ देऊन ‘झुंडहत्या’ होण्याच्या घटना वाढायला लागल्यानंतर (२०१५ नंतर) मुस्लीम समाज कसा भयभीत होऊन, समाजाच्या मुख्य स्तराच्या उतरंडीतून बाजूला पडून एका कोपऱ्यात सरकू लागला आहे, हे साधार मांडतो. अनेक जण आपल्या पोराबाळांची नावं मुस्लीम वाटणार नाहीत, अशा पद्धतीने ठेवू लागले आहेत, अनेकांनी सार्वजनिक ठिकाणी नमाज अदा करणंदेखील सोडून दिलं आहे.

लेखक म्हणतो की, पूर्वी मुस्लीम समुदायाला प्रवासात असताना ट्रेनमध्ये किंवा बागांमध्ये नमाज अदा करण्याचा अवकाश बहुसंख्य असलेल्या हिंदू समूहाकडून प्राप्त करून दिला जायचा. पण २०१४ नंतर मुस्लीम समुदाय हा ‘इतर’, ‘परका’ या वर्गवारीत ढकलला गेला किंवा सत्ताधारी वर्गाकडून तसा विचार समाजमनात रुजवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोहीम उघडली गेली. परिणामतः आज समाज धार्मिक फाळणी होण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. हे लेखक अनेक घटना संदर्भासह नोंदवून स्पष्ट करतो. 

लेखक गायीच्या नावावर केल्या जाणाऱ्या हिंसाचाराचा पडताळा घेताना डी. एन. झा या नामवंत इतिहासकाराच्या ‘फ्रंटलाईन’ या नियतकालिकातील मुलाखतीत केलेल्या वक्त्यव्याचा संदर्भ देतो. गायीचा स्वातंत्र्यापूर्वीच्या काळापासून कशा पद्धतीने सुरुवातीला हिंदूंचं संघटन करण्यासाठी आणि नंतर राजकीय हेतू साध्य करण्यासाठी वापर केला गेला, हे तो सांगतो.

 मुसलमानांचं भारतात आगमन होण्याआधी गोहत्या होत नव्हती, या हिंदुत्ववादी संघटनांकडून घेतल्या जाणाऱ्या आक्षेपावर उत्तर देताना झा म्हणतात, “केरळमध्ये जवळजवळ ७२ टक्के समुदायांत बीफ खाल्लं जातं. हे परंपरेने चालत आलेलं आहे. ईशान्येकडील राज्यांत बीफ खाणं, ही अगदी सामान्य घटना आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला या देशात काय घडतंय, तेच नीट माहीत नाहीय. ते म्हणतात की, मुस्लीम आणि दलित समुदायातील लोक बीफ खातात. हा दावा पूर्णपणे हास्यास्पद आहे. जर आपण इतिहासात डोकावून पाहिलं, तर आपल्या लक्षात येईल की देवतांना खूश करण्यासाठी गायींचा बळी दिल्याचा उल्लेख आहे. त्या काळात गायींची हत्या होत होती आणि ब्राह्मण गोमांस खात होते यात काही शंका नाही.”

झा आपल्या मुद्यांच्या पुष्टीकरणार्थ एच. एच. विल्सन या ऑक्सफर्डमधील संस्कृत विद्वानाच्या अभ्यासपूर्ण लेखनातील दावे सादर करतात. वेदान्तात २५०पैकी ५० प्राणी असे मानले आहेत की, ज्यांचा बळी दिला जाऊ शकतो आणि त्यांचं मांस खाल्लं तरी चालण्यासारखं असतं. गाय हा त्यांतला प्रमुख प्राणी आहे, असं झा मांडतात.

मुघलांच्या काळात गायींचं संरक्षण केलं गेलं पाहिजे, हा विचार मूळ धरू लागला. त्यामागचं प्रमुख कारण गायींची कमी होणारी संख्या हे होतं, असं निरीक्षण झा अभ्यासाअंती मांडतात. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर गोरक्षिणी सभा वगैरे स्थापन करण्यात आल्या. पण यांचा प्रमुख शत्रू त्या काळात मुसलमान नव्हे तर ब्रिटिश होता.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला या सभांचा मोर्चा मुसलमानांच्या दिशेला वळला. पण वि. दा. सावरकर यांनी मात्र गाय हा एक उपयुक्त पशू आहे, असं म्हणून गोहत्येच्या विरोधात आवाज उठवला नव्हता आणि स्वामी विवेकानंद यांनी तर गोमांस खाण्यामुळे सुदृढ समाज निर्मितीला हातभार लागेल, असं म्हटलं होतं, हे सत्य नोंदवायला लेखक विसरत नाही. 

लेखक काही अभ्यासकांच्या पुस्तकांचा दाखला देऊन गोरक्षेसाठी कधी आणि कोणत्या परिस्थितीत संघटनांची स्थापना झाली, हे दाखवून देतो. एकोणिसाव्या शतकात जेव्हा ब्रिटिशांच्या हे लक्षात आलं की, गाय हा हिंदू आणि मुस्लीम यांच्यात फूट पाडण्यासाठी खूप साहाय्यभूत ठरेल असा घटक आहे, तेव्हा त्यांनी काही उपद्रवी हिंदू संघटनांना हाताशी धरून धार्मिक दुहीची बीजे रोवायला सुरुवात केली.

गायीवरून हिंसाचार होण्याची पहिली घटना १८९० साली नोंदली गेली आहे. गोरक्षक संघटनेच्या नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि या प्रश्नाला राष्ट्रीय स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच मदन मोहन मालवीय, लाला लजपत राय, राजेंद्र प्रसाद या नेत्यांनी काँग्रेस पक्षाला या प्रश्नावर काहीतरी भूमिका घेण्यास भाग पाडलं. हिंदू महासभेनेही हा प्रश्न त्या काळात लावून धरला.

याचा परिणाम असा झाला की, अनेक गो रक्षक मंडळ, गोरक्षक संघटना उदयाला आल्या. आणि या संघटनांचा विरोध प्रामुख्याने मुस्लिमांनाच होता. गोहत्या पूर्णपणे बंद व्हावी आणि गायीला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा द्यावा, अशा मागण्या या संघटनांनी केल्या होत्या. रा. स्व. संघाच्या गोळवलकर यांनीही गोहत्या बंद व्हावी, म्हणून कायदा पारित व्हावा यासाठी सह्यांची मोहीम राबवली होती. या सगळ्या घटनांतून मुस्लिमांना हिंदू समाजापासून अलग पाडण्याचं षड्यंत्र दिसून येतं. या विषारी रोपट्याला आलेली कडवट फळं म्हणजेच मोदी निवडून आल्यानंतर भारतात गायीच्या नावावर घडलेल्या हिंसाचाराच्या घटना.

लेखक वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या काही अलीकडच्या बातम्यांचा संदर्भ देऊन दाखवून देतो की, गोरक्षक संघटनांची संख्या गेल्या काही वर्षांत प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. एकट्या गुजरातमध्ये अशा २०० संघटना आहेत. या संघटनांचे कार्यकर्ते प्राणी घेऊन जात असलेली वाहनं बिनदिक्कतपणे अडवतात, वाहन चालकाकडे वाहनाची कागदपत्रं, प्राण्यांच्या व्यवहारांच्या पावत्या, टोल भरल्याच्या पावत्या, अशी सगळी कागदपत्रं असली, तरी जर वाहन चालक मुस्लीम असेल, तर त्याच्याकडून पैसे उकळले जातात, नकार दिल्यास हत्या केली जाते.

अशा अनेक घटनांचे संदर्भ लेखक देतो. गायीच्या नावावर खंडणी गोळा करण्याचा हा एक व्यवसायच उत्तरेकडील राज्यांत फोफावला आहे, असा निष्कर्ष लेखक काढतो.

लेखकाने भारतीय गौ रक्षक दलाचा संस्थापक असलेल्या पवन पंडित याची मुलाखत घेतली आहे. त्याने अर्थातच गायीच्या नावावर होणाऱ्या हिंसाचाराच्या घटना या आपल्या संघटनेचे कार्यकर्ते करत नसून काही दुष्ट प्रवृत्तीचे लोक, स्थानिक गुंड करत आहेत, असं म्हणून हात झटकण्याचा प्रयत्न केला आहे. पण लेखक त्याच्या प्रत्येक दाव्यासमोर अधिकृत आकडेवारी आणि खरी माहिती सादर करतो.

लेखकाने गोरक्षकांची मुस्लीम विरोधी मानसिकता कशी आकार घेते, त्यापाठीमागे असलेल्या सामाजिक-आर्थिक बाजूंची नेमकी भूमिका काय असते, त्यांना दिलं जाणारं शिक्षण कोणतं असतं, या सगळ्याचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो अशा घटना वाढण्याची दोन प्रमुख कारणं देतो - दोन समाजांत असलेला संवादाचा अभाव आणि बेरोजगारीमुळे आर्थिक बाजू लंगडी असणं. तो पोलिसांनी या सगळ्या घटना घडत असताना दाखवलेली निष्क्रियता ही सत्तेच्या पाठबळातून कशी जन्माला आली आहे, हेदेखील सोदाहरण स्पष्ट करतो.  

२. 

लेखक झुंडहत्येला बळी पडलेल्या निष्पाप नागरिकांची माहिती देतो, त्या घटना कशा घडल्या याची सूत्रबद्ध पद्धतीने मांडणी करतो, त्यात गुंतलेले पोलीस, राजकारणी आणि प्रशासकीय व्यवस्थेचे हितसंबंध उघड करतो. उत्तर प्रदेश राज्यात दादरी येथे २०१५ साली अखलाकची घरात गोमांस असल्याच्या संशयावरून मारहाण करून हत्या झाली, तेव्हा त्याची शारीरिक अवस्था कशी झाली होती, याचं काळजाला चिरणारं वर्णन लेखक करतो. त्याच्या घरच्या माणसांनी या प्रसंगाला कसं तोंड दिलं, याचं वर्णन करतो.

या प्रकरणावर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची प्रतिक्रिया चीड आणणारी आहे. भाजपच्या पश्चिम उत्तर प्रदेश विभागाचा उपाध्यक्ष श्रीचंद शर्मा याने असं म्हटलं होतं की, “अखलाकच्या १७ वर्षांच्या मुलीवर मारेकऱ्यांनी बलात्कार केला नाही म्हणून तिने त्यांच्याप्रती कृतज्ञ असायला हवं.” साध्वी हर्षिता गिरीने अखलाकचं कुटुंब गाव सोडून गेल्यानंतर गावात शुद्धीकरण विधी पार पाडला होता!

लेखक अखलाकचा भाऊ, नातेवाईक यांच्यासोबत झालेल्या चर्चेचा हवाला देऊन प्रत्यक्ष हत्याकांड घडलं तो प्रसंग आणि नंतरची त्यांच्या कुटुंबाची न्यायासाठी चाललेली वणवण मांडतो. 

भाजप सरकार २०१४ साली अस्तित्वात आल्यानंतर झुंडहत्येचा पहिला बळी पुण्यातील मोहसीन शेखचा घेतला गेला. हिंदू राष्ट्र सेनेच्या गुंडांनी केवळ मुस्लीम माणसासारखा दिसतोय म्हणून मोहसीन शेखचा खून केला. मोहसीनच्या कुटुंबाला भरपाई मिळायला चार वर्षं वाट पाहावी लागली. तीही मोहसीनच्या वडिलांनी ‘ह्यूमन राइट्स’ कायद्याखाली हालचाली करायला सुरुवात केली तेव्हा प्राप्त झाली.   

राजस्थानमध्ये २०१७ साली पेहलू खानलादेखील केवळ मुस्लीम असल्यामुळे अधिकृत कागदपत्रं असतानाही गायी कत्तल करण्यासाठीच नेत आहे, या संशयावरून झुंडीने मारून टाकलं. खरं तर पेहलू खानची डेअरी होती. त्याच्याकडे असलेली म्हैस अधिक दूध देत नाही, म्हणून दुभत्या गायी विकत घेऊन तो घराकडे परतत होता आणि वाटेतच तथाकथित गोरक्षकांनी अडवून त्याला जबर मारहाण केली. त्याला इस्पितळात भरती केलं गेलं आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला.

मृत्यूपूर्वी त्याने त्याला मारहाण करणाऱ्या काही व्यक्तींची नावं पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितली होती. त्याला मारहाण करताना ते एकमेकांचा नावानिशी उल्लेख करत होते व आपण बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आहोत असं सांगत होते. त्यावरून त्याने ही नावं घेतली होती. पण पोलिसांनी नीट तपास न केल्यामुळे आधीच नावावर गुन्हे असलेल्या या व्यक्तींची सुटका झाली.

लेखक या निमित्ताने आजूबाजूच्या परिसरात फिरून लोकांमध्ये किती दहशत पसरली आहे याचाही पडताळा घेतो. मारहाणीचे व्हिडिओ पसरवले गेले होते, त्यामागे इतर लोकांच्या मनात दहशत निर्माण करणं हाच हेतू होता. आणि हा हेतू काही प्रमाणात साध्य झाल्याचं लेखकाला आढळून आलं.

अलवारमधील रकबरचाही खून केवळ गायीच्या चोरीच्या संशयावरून केला गेला. त्याला मारहाण झाल्यानंतर पोलिसांनी ४ किमी अंतरावर असणाऱ्या इस्पितळात न्यायला तीन तासांपेक्षा अधिक वेळ लावला. जखमी माणसाला इस्पितळात नेण्यापेक्षा त्यांना गायी गोशाळेत हलवण्यासाठी वाहनांची जमवाजमव करणं जास्त महत्त्वाचं वाटलं.

इतकंच नाही तर ते वाटेत चहा पिण्यासाठीही थांबले होते! विश्व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता नवल किशोरला पोलिसांनी मरणासन्न अवस्थेत पोलिसांच्या गाडीत बसलेल्या रकबरचं छायाचित्र काढू दिलं. किशोरने ते समाजमाध्यमांवर प्रसृत करून ‘हा मृत्यू पोलीस कस्टडीत झालेला असून, त्याचा झुंडहत्येशी काहीही संबंध नाही’ असं लिहिलं! रकबरच्या कुटुंबाला सरकारकडून कोणतीही आर्थिक मदत मिळाली नाही. ‘रकबरच्या सात मुलांनासुद्धा या झुंडीने मारून टाकावं कारण अशीही ती भुकेने मरणारच आहेत’, हे रकबरच्या वडिलांचे उद्गार कोणत्याही संवेदनशील व्यक्तीला खिन्न करणारेच आहेत.

या घटनांचे पडसाद इतर देशांतील वर्तमानपत्रांत कशा पद्धतीने उमटले होते, हे लेखक पाकिस्तानमधील ‘डॉन’ (Dawn) या वर्तमानपत्रात आलेल्या एका झुंडहत्येच्या बातमीचा गोषवारा देऊन अधोरेखित करतो. आपल्या देशातील वर्तमानपत्रांत सुरुवातीच्या चार-पाच घटनांनंतर झुंडहत्येच्या बातम्या पहिल्या पानावर येणं हळूहळू बंद होत गेलं, हे निरीक्षणही लेखक आवर्जून नोंदवतो.

बहुतेक प्रकरणांत मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांना दीर्घ न्यायिक प्रक्रियेतून जात मृत व्यक्तीचं निर्दोषत्व सिद्ध करावं लागतं, कारण झुंडहत्या करणाऱ्या तथाकथित गोरक्षकांच्या दबावाला बळी पडत वा त्यांच्या संगनमताने पोलीस मृत व्यक्ती ही गो तस्कर किंवा गोहत्या करणारी होती, अशी फिर्याद दाखल करतात.

राजस्थानमध्ये घडलेल्या अशा अनेक घटना लेखक देतो. काही घटना घडून गेल्यानंतर स्थानिक नेत्यांच्या दबदब्यामुळे त्या कोणत्याही वर्तमानपत्रांत नोंदल्या गेल्या नाहीत. निवडक ऑनलाईन पोर्टल्सवर या घटनांची दखल घेतली गेली आणि मग काही मोठ्या वर्तमानपत्रांनी त्या बातम्या छापल्या, तेव्हा त्या उजेडात आल्या, त्यांवर चर्चा झाली. अन्यथा त्या घटना कधीच समोर आल्या नसत्या. अशा समोर न आलेल्याही पुष्कळ घटना असू शकतील.

३.

राजस्थान राज्यातील राजसमंद या शहरात २०१७ साली मार्बलचा व्यवसाय करणाऱ्या शंभुलाल या व्यक्तीने अफराजूल या बंगालमधील स्थलांतरित मुस्लीम मजुराची हिंदू स्त्रीसोबत प्रेमप्रकरण सुरू असल्याच्या केवळ संशयावरून हत्या केली होती. पुढे कारवाई होऊन शंभुलालला अटक करण्यात आली. त्या वेळी अनेक हिंदू संघटनांनी शंभुलालच्या कुटुंबीयांसाठी वर्गणी गोळा करून तीन लाख रुपये जमा केले होते. काही वकिलांनी त्याची केस मोफत लढण्याचं ठरवलं. यावरून हत्या करणाऱ्यांना किती आणि कोणकोणत्या मार्गाने संरक्षण आणि पाठिंबा दिला जातो, हे उघड होतं. 

उत्तर प्रदेशमधील हापूर येथे झुंडहत्या करणाऱ्या जमावाने हत्या करताना व्हिडिओ बनवला आणि तो समाजमाध्यमांवरून सर्वदूर पसरवला गेला. हत्या करणाऱ्या प्रमुख आरोपी सिसोदिया नामक व्यक्तीला जामीन मिळाल्यानंतर त्याचं तुरुंगाबाहेर जंगी स्वागत करण्यात आलं, त्याच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या.

झारखंडमध्ये अलिमुद्दीन अन्सारीची २०१७ साली झुंडहत्या करण्यात आली. हत्या करणाऱ्या आरोपींत भाजपचा माध्यम प्रमुख नित्यानंद महातो याचंही नाव होतं. झारखंडमधील फास्ट ट्रॅक कोर्टाने आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. पण वर्षभराच्या कालावधीनंतर उच्च न्यायालयाने ही शिक्षा रहित केली आणि त्यांची सुटका झाली. त्या वेळी हार्वर्ड येथून शिकून आलेले भाजपचे खासदार जयंत सिन्हा यांनी आरोपींचं फुलांच्या माळा घालून स्वागत केलं होतं.

लेखक प्रत्येक झुंड हत्येसमयी प्रस्थापित सरकारमधील कोणी ना कोणी हत्या करणाऱ्यांच्या समर्थनार्थ आणि सुटकेसाठी पुढे येतं, हे अनेक उदाहरणं देऊन मांडतो. हत्या करणारे निर्दोष असल्याचं जनमत घडवण्यासाठी हजारोंचे मोर्चे काढले जातात, सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून ते निर्दोष आहेत, असा घोष सातत्याने उच्चरवात केला जातो. दादरी येथे झालेल्या झुंडहत्येत अखलाक या इसमाला आपले प्राण गमवावे लागले होते. त्याची हत्या करण्याचा आरोप असलेल्या एका आरोपीचा जेव्हा डेंग्यूमुळे मृत्यू झाला, तेव्हा भाजपच्या महेश शर्मा या नेत्याने त्या आरोपीचा मृतदेह तिरंग्यात लपेटला होता. हत्या करणाऱ्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचाच हा प्रकार होता.

अखलाकची हत्या झाल्यानंतर पंतप्रधानांनी आपल्या कुटुंबाचं साधं सांत्वनही केलं नाही, अशी खंत अखलाकच्या भावाने व्यक्त केली होती. हत्येचा आरोप असलेल्या ११ जणांना ‘नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन’ या कंपनीत स्थानिक भाजप आमदाराने कंत्राटी नोकऱ्या मिळवून दिल्या. त्याचा एक छोटा समारंभही झाला. हे हत्या करणाऱ्यांना संरक्षण, आधार देणं आहे.

राजस्थानमध्ये झुंडहत्येच्या घटना घडल्या, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी जवळजवळ महिनाभर या घटनांवर काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती. जेव्हा २३ निवृत्त आयएएस अधिकाऱ्यांनी पत्र लिहून या घटनेचा निषेध नोंदवला, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी मौन सोडलं. पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही. कारण पुढे जेव्हा अशी घटना घडली, तेव्हा त्यांच्या पक्षाचा आमदार ग्यान सिंह आहुजा यांनी असं म्हटलं की, “गोहत्या हा दहशतवादापेक्षाही भयानक गुन्हा आहे. कारण दहशतवादी दोन-तीन माणसांना संपवतात, पण गोहत्येमुळे करोडो लोकांच्या भावनांना धक्का लागतो.” अशा घटना नोंदवून लेखक यामागे कोणत्या राजकीय शक्ती कार्यरत आहेत, याकडे निर्देश करण्याचा प्रयत्न करताना दिसतो.

सरोदवादक उस्ताद अल्लाउद्दीन खा यांच्या मध्य प्रदेशमधील मैहर या शहरात कधीही हिंदू-मुस्लीम तणाव पाहायला मिळाला नव्हता. फाळणीच्या वेळीही इथे कधी हिंसाचार झाला नव्हता. पण २०१७ साली प्रेषित मुहम्मद यांची जयंती साजरी करणाऱ्या कार्यक्रमात काही असहिष्णू हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला आणि वातावरण बिघडलं. त्यातूनच सिराज या युवकाची हत्या करण्यात आली. पण लेखकाच्या संशोधनानुसार या घटनेवर कोणत्याही प्रमुख स्थानिक किंवा राष्ट्रीय वृत्तवाहिनीने कार्यक्रम केला नाही. तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या घटनेवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी घटनास्थळाला भेट दिली, पण हत्या झालेल्या सिराजच्या कुटुंबीयांची भेट घेतली नाही. प्रमुख माध्यमं आणि काही प्रमाणात समाजही हळूहळू या घटनांकडे दुर्लक्ष करू लागला आहे.

लेखक दाखवून देतो की, २०१६-१७ साली अशा हत्यांच्या विरोधात मोर्चे निघत होते, ‘नॉट इन माय नेम’ असे फलक झळकत होते, पण नंतर हे बंद झालं. सोशल मीडियावर केला जाणारा विखारी प्रचार, मुख्य धारेतील माध्यमांतून होणारं एका समूहाचं खलनायिकीकरण यांमुळे लोकांची मानसिकता बदलू लागली. मुस्लीम समूह हा आपल्यापेक्षा भिन्न आहे, ही भावना मागे पडून आता हा समूह बहुसंख्याक हिंदूंसाठी ‘परकेपणा’च्या हद्दीत प्रवेश करता झाला आहे, अशी खंत लेखक व्यक्त करतो.

४.

लेखक केवळ मुस्लिमांवर झालेल्या हल्ल्यांचाच धांडोळा घेतो असं नाही, तर दलितांवर उच्च जातीयांकडून होणाऱ्या हल्ल्यांचाही शोध घेतो आणि सत्य धुंडाळण्याचा प्रयत्न करतो. २०१५ साली उत्तर प्रदेश या राज्यात कानपूर येथे चिम्मा नावाच्या दलित समुदायातील व्यक्तीने (वय ९० वर्षं) आपल्या पत्नीसह मैदानी बाबा या मंदिरात प्रवेश केला म्हणून, संजय तिवारी या तथाकथित उच्च जातीतल्या इसमाने चिम्माला मारहाण केली आणि तेवढ्याने समाधान न झाल्याने त्याच्यावर केरोसीन टाकून त्याला पेटवून दिलं. आजूबाजूचं कोणीही त्यांच्या मदतीला आलं नाही.

११ जुलै २०१६ रोजी गुजरातमधील उना येथे मृत गायींची चामडी काढत असलेल्या तरुणांनी गायींची हत्या केल्याचं कारण देत, चार दलित समुदायातील तरुणांना उच्च वर्गीयांकडून बेदम मारहाण करण्यात आली होती. या तरुणांनी गायीची हत्या केली नव्हती, तर केवळ मेलेल्या गायीची चामडी ते काढत होते. पण संशयाचं भूत डोक्यात बसलेल्या उच्च वर्गातील लोकांनी हे ऐकलं नाही आणि या तरुणांना अर्धनग्न करून काठ्या, रॉड यांचा वापर करत मारहाण केली.

फॉरेन्सिक चाचणीत गायीला सिंहाने मारलं होतं, हे सिद्ध झालं. या घटनेनंतर जिग्नेश मेवानी या तरुण नेत्याने काढलेला मोर्चा, सादर केलेल्या मागण्या यांची चर्चा लेखक करतो. तो दक्षिण आणि ईशान्येकडील राज्यांत घडलेल्या पण मोठ्या प्रमाणात मुख्य प्रवाहातील माध्यमांत नोंद न झालेल्या अनेक झुंडहत्येच्या घटनाही देतो. या घटनांत केवळ मुस्लीमच बळी पडलेले आहेत असं नाही, तर दलित आणि काही तुरळक प्रसंगी हिंदूंनाही याची धग सहन करावी लागलेली आहे.

लेखकाने सर्वोच्च न्यायालयाने झुंडहत्येच्या प्रश्नावर संसदेला कायदा पारित करताना ज्या मार्गदर्शक सूचना केल्या, त्यांचीही सविस्तर चर्चा केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने झुंडहत्येच्या कृत्यांना ‘झुंडशाहीकडून केली गेलेली भयावह कृत्यं’ असं म्हटलं आहे. देशातील वैविध्यपूर्ण सामाजिक घडी विस्कटण्याचं काम अशा कृत्यांमुळे होतं, अशी टिप्पणी करत द्वेष पसरवणं, कट्टरता आदी अनेक विषयांचा ऊहापोहदेखील सर्वोच्च न्यायालयाने केला आहे.

लेखक या घटकाविषयी माहिती देताना वर्तमानपत्रांत या विषयी आलेल्या बातम्या, अग्रलेख यांचा आधार घेतो. त्यामुळे हा विषय अधिक नेटक्या पद्धतीने मांडला गेला आहे.  

५.

लेखक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मा. स. गोळवलकर यांच्या ‘We, or Our Nationhood Defined’ या ग्रंथातील मुस्लीम, ख्रिश्चन आणि एकूणच अल्पसंख्याक समुदायाबद्दल त्यांना दुय्यम नागरिक मानण्याबाबत जे काही विचार मांडलेले आहेत, त्याचा गोषवारा देऊन सद्य काळात त्या विचारांची अंमलबजावणी कशी सुरू आहे, ते सोदाहरण, सप्रमाण स्पष्ट करतो. सगळ्या झुंडहत्यांत दलित आणि मुस्लीम यांना लक्ष्य केलं जातं, त्यांच्याकडे वाहनात गाय सापडणं एवढंच कारण ते गायीचे मारेकरी आहेत, हे स्पष्ट करण्यासाठी पुरेसं असतं, असं लेखक म्हणतो.

गाय घेऊन जाणाऱ्या वाहनाचा चालक हिंदू असेल तर त्याला सोडून दिलं जातं, मुस्लिमांना मात्र मारहाण केली जाते, त्यांच्याकडून पैसे घेतले जातात, गायी गोशाळेत पाठवल्या जातात (मग भले त्या व्यक्तीकडे ती गाय विकत घेतल्याची कागदपत्रं असोत, वाहनाची अधिकृत कागदपत्रं असोत). म्हणजे त्या व्यक्तीचा जीवही जातो आणि ज्याच्या आधारावर त्याच्या कुटुंबातील सदस्यांना जगता येईल, असं साधनही हिरावून घेतलं जातं, असं निरीक्षण लेखक अभ्यासाअंती मांडतो.

पोलीसही अशा व्यक्तींचा उल्लेख काहीही तपास न करता ‘गो तस्कर’ असा करून टाकतात. सरकारधार्जिणा माध्यम समूहदेखील या व्यक्तींच्या उरल्यासुरल्या चारित्र्याचे धिंडवडे काढतो. यातून सामान्य लोकांच्या मनात अशी धारणा आकार घेते की, मुसलमान हे गोहत्या करणारेच असतात. त्यांच्या व्यक्तित्वाबद्दल एक नकारात्मक मनोधारणा घडत जाते. याचा फायदा हिंदुत्ववादी शक्तींना निवडणुकीत होतो.

ज्याची हत्या केली जाते, त्याच्या मागे राहिलेल्या कुटुंबाला अनेक अडचणींचा डोंगर पार करावा लागतो. पोलीस स्थानकांत होणार भेदभाव, हिंदुत्ववादी संघटनांकडून केसेस मागे घेण्यासाठी येणारा दबाव, गावातील लोकांकडून टाकला जाणारा बहिष्कार, अशा अनंत अडचणींना तोंड देता देता न्याय मिळण्याची आस ते सोडून देतात. काहींना आपलं गाव, शहर, राज्य सोडून दूर कुठेतरी निघून जावं लागतं. असं घडणं हे पुन्हा हिंदुत्ववाद्यांच्या पथ्यावरच पडतं.

‘या लोकांनी गुन्हा केला होता, गोहत्येत हे सगळे सामील होते म्हणून आता हे तोंड लपवून जगत आहेत’, असा दुष्प्रचार केला गेला आहे. त्यामुळे झुंडहत्या आणि त्याला मिळणारं राजसत्तेचं पाठबळ, हा अतिशय गंभीर आणि चिंतेचा विषय झालेला आहे. या हत्या करताना क्रौर्याचं केलं जाणारं बीभत्स प्रदर्शन ही त्याहीपेक्षा अधिक चिंताजनक गोष्ट आहे. सर्वसाधारण माणसाच्या मनात वसणारी मानवतेची भावना, इतरांच्या दुःखांप्रती असलेली सहवेदनेची जाणीव मारून टाकण्याचा प्रयत्न अशा घटनांतून केला जातोय, असं खेदानं म्हणावं लागतं.        

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.............................................................................................................................................................

या निमित्तानं हिंदी भाषिक कवी कुमार अंबुज यांच्या ‘क्रूरता’ या कवितेची आठवण होते. या कवितेत कवीने माणसाच्या मनातील करुणा कशी हळूहळू नष्ट होत जाऊन, क्रूरता, हिंस्त्रता सुरुवातीला दबक्या पावलांनी आणि नंतर बेधडकपणे त्यांचं जाहीर समर्थन करण्याइतपत थेट दाखल होते, याचं भयावह चित्र उभं केलंय. हे क्रौर्य धर्मग्रंथ, इतिहास यांच्या नावाखाली आता संघटित होऊ लागलं आहे. स्वत:चं श्रेष्ठत्व प्रस्थापित करण्यासाठी लढाया लढल्या जातात. या लढाया संस्कृती रक्षणासाठी आहेत, हे पटवून दिलं जातं.

या लढायांना जेव्हा अशा तऱ्हेनं तात्त्विक अधिष्ठान दिलं जातं, त्या वेळी जनतेसाठी हे क्रौर्य आदर्श होऊन जातं. अशा परिस्थितीत कोणताही विलाप निरर्थक होऊन जातो. समाजातला एक घटक म्हणून ही क्रूरता आपल्या आत्म्याला टोचण्या देत नाही, शेजारी आपलं सांत्वन नाही करत पण हातात हत्यार देतो, आपल्या मनातली करुणा शोषून घेतली जाते. राजकीय-आर्थिक स्वार्थापोटी हे क्रौर्य माणसांच्या मनात भरवणारे या क्रौर्याला ऐतिहासिक आधार कसे पुरवता येतील, याचे भरघोस प्रयत्न करतात. अशा वातावरणात माणसाच्या संवेदना इतक्या बधिर होऊन जातात की, त्याला प्रेमाची गरज वाटत नाही, कोणालाही क्षमा करण्याची ताकद तो हरवून बसतो.

असा आशय असलेली ही कविता अंबुज यांनी १९९० ते १९९५च्या दरम्यान कधीतरी लिहिलेली आहे. पण ती एखाद्या भयानक भविष्यवाणीसारखी लिहिली गेली होती की काय असं वाटावं, इतका तीमधला आशय आज प्रकर्षाने अनुभवास येतो. ‘लोकांना मारलं जाणं हे आता एक धार्मिक कृत्य समजलं जाईल’ असं तो ‘यथास्थिति में’ या कवितेत लिहितो.

अंबुज यांनी त्यांच्या कवितांत व्यक्त केलेलं हे भयावह चित्र आज दुर्दैवानं मोठ्या गाजावाजासह आकार घेताना दिसत आहे. सलाम यांनी आपल्या ‘Lynch Files : The Forgotten Saga of Victims of Hate Crime’ या पुस्तकात आजच्या भयावह चित्राची एक बाजू मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.

‘Lynch Files : The Forgotten Saga of Victims of Hate Crime’ - Ziya Us Salam
SAGE Publications India Pvt Ltd
पाने : २३२, मूल्य : ४५० रुपये

..................................................................................................................................................................

लेखक विकास पालवे प्रकाशन व्यवसायात कार्यरत आहेत.

vikas_palve@rediffmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......