१७६)
‘एकटा परंतू गर्दीतील मी एक
गर्दीत चिरडले गेले माझे दु:ख
एकटा आज मी निर्जन एकांतात
द्या परत मला हो, हवे मला ते दु :ख।।’
तसे बघायला गेले, तर तुम्ही एकटे असता. तुमच्या भावभावना, तुमचे खरे अंतरंग, तुमच्या मनाचा आतला प्रवास कुणालाच माहीत नसतो. तुम्हाला स्वतःलाही तुमच्या अंतरंगाचा संपूर्ण अंदाज नसतो. ह्या सर्वामुळे आपण एकटे आहोत, ही भावना वाढीस लागते. पण माणूस हा समाजात राहणारा प्राणी आहे. त्यामुळे त्याला सतत समाजात, माणसात, आपल्या लोकात राहावे लागते. गर्दीत राहावे लागते.
नेहमी इतरांचा विचार करून राहावे लागते. त्याला आपल्या भावना मुक्तपणे व्यक्त करता येत नाहीत. त्याला आपल्या भावना दाबून जगावे लागते. दुःख ही भावना सगळ्यात जास्त दाबली जाते. मनात दुःख असते, पण चेहऱ्यावर हास्य ठेवून जगावे लागते.
शेवटी गर्दीत राहताना ह्या गोष्टीची सवय होते. मन आपल्या स्वतःच्या भावना कुठल्या आणि आपल्या दाखवायच्या भावना कुठल्या हे विसरून जाते. आपण सतत माणसात असतो. त्यामुळे दाखवायच्या भावना सतत आपल्या मनात राहतात. आपण खोटे हसत असू, तर आपण साधारणपणे आनंदी स्वभावाचे आहोत अशी आपलीही धारणा होते. आपण आपले खरे दुःख ‘विसरून’ जातो.
पण कुठलीही भावना दाबून ठेवली गेली तरी ती आत राहून अभिव्यक्ती शोधत राहते. तीव्र दुःख खूप काळ आत राहिले की, ते निराश जीवनदृष्टीच्या स्वरूपात बाहेर येते. निराश व्यक्तीला कळत नाही की, ह्या निराशेचा उगम दाबल्या गेलेल्या दुःखात आहे. त्याला वाटत राहते की, आपण इतके आनंदी आहोत, मग आपल्याला हे काय होते आहे.
आयुष्याच्या शेवटी किंवा अगदी तत्त्वज्ञानात्मक पातळीमुळे माणूस एकटा झाला की त्यात शांततेत त्याला ते दुःख अंधुक अंधुक आठवू लागते. त्याला त्या दुःखाचा सामना करावासा वाटतो. पण ते दुःख मनाच्या इतक्या खोल पातळीवर गाडले गेलेले असते की, त्याच्या ते हाती लागत नाही. पायात खोल घुसलेला बारीक काटा सापडत तर नाही, पण त्रास तर देत राहतो अशी अवस्था होते. मग त्याच्या मनात विचार येतात -
‘एकटा आज मी निर्जन एकांतात’
द्या परत मला हो, हवे मला ते दु :ख।।’
दुःखातून मुक्ती साधण्यासाठी त्याला त्या दुःखाला सामोरे जायचे असते.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
१७७)
‘जरि मनास फुटले पंख, अडकले पाय
बघ निरांजनावर येऊन बसला सूर्य
घे उडी पहा गौतमीस आला पूर
मन वाहुनि गेले देह राहिला दूर।।’
ही रुबाई मृत्यूची तयारी आहे की मुक्तीची, असा प्रश्न मनात येत राहतो. ही बहुतेक मुक्तीची चाहूल आहे. एक मोठे स्थित्यंतर येऊ घातलेले आहे. मनाला आता पंख फुटलेले आहेत. त्याला आता पलीकडचे दिसू लागलेले आहे. आतापर्यंत न दिसलेले मोठे सत्य दिसू लागले आहे.
‘बघ निरांजनावर येऊन बसला सूर्य’
मानवी चैतन्याची - कॉन्शसनेसची - ओळख होती. त्याच बरोबर आता मोठे सत्य समोर येऊन उभे ठाकले आहे. गौतम ऋषींच्या तपस्येमुळे गोदावरी पृथ्वीवर आली, अशी आख्यायिका आहे. अशीच आख्यायिका उत्तरप्रदेशातील गौतमी नदीविषयीसुद्धा आहे. ह्या गौतमीला पूर आला ह्याचा अर्थ तपस्येला पूर आला, असाही होऊ शकतो. कृपा झाली आहे, असाही होऊ शकतो.
आता इथून न निघणारा पाय काढून घ्यायचा आहे. हे मानवी अस्तित्व सोडून, भावबंध सोडून ह्या पुरात उडी घ्यायची आहे. मन आता वाहून गेले आहे. देह तर खूप दूर राहिला आहे. आता छोटा निरांजनाचा प्रकाश निमाला आहे. मोठा कैवल्यसूर्याचा प्रकाश घेरून टाकत आहे.
१७८)
‘विसरावे ऐसे जवळ असावे काही
मुक्त हस्त द्यावे असे असावे काही
गाळावे अश्रू दु:ख असावे खोल
कुणी देईल का मज त्या दु:खाची भूल।।’
आपण एकादी गोष्ट आपल्या जवळ आहे, हे विसरून केव्हा जातो? ती गोष्ट आपलीच आहे, ती आता आपल्यापासून दुरावू शकत नाही अशी खात्री आपल्याला पटते तेव्हा. ती आपले ‘सेकंड नेचर’ होऊन जाते तेव्हा. आपल्याला डोळे आहेत, कान आहेत ह्याची आपल्याला जाणीवही नसते. कारण ते अपलाच भाग असतात. आपण म्हणजेच डोळे असतो, कान असतो. त्याप्रमाणे एखादी गोष्ट अगदी आपली होऊन गेलेली आपल्याजवळ असावी.
‘विसरावे ऐसे जवळ असावे काही’
एखादी कला, एखादे नाते, एखादे प्रेम - आपले होऊन गेलेले काहीतरी आपल्या जवळ असावे.
‘मुक्त हस्त द्यावे असे असावे काही’
आपल्याजवळ एखादी गोष्ट इतकी असावी की, जी आपण कितीही मुक्तहस्ते दिली, तरी ती दिल्यावर आपल्याला वाईट वाटू नये. उदाहरण द्यायचे झाले तर ज्ञान. दुःख हा तर मानवी जीवनाचा अविभाज्य भागच आहे. दुःख असणारच आहे तर ते उथळ आणि उल्लू दुःख नको. वैयक्तिक स्वरूपाचे दुःख नको. अथांग आणि खोल असे दुःख हवे. ज्यातून करुणा निर्माण होईल. सहानुभूतीची अथांग क्षमता तयार होईल.
क्षुद्र दुःख माणसाला क्षुद्र बनवते. सखोल दुःख माणसाला उदात्त बनवते, ‘नोबल’ बनवते. ह्या दुःखाची झिंगच वेगळी! हे दुःख आपल्याला मोठे बनवते. माणूस म्हणून उत्क्रांत करते. आपण सुखी असतो तर आपली एवढी प्रगती झाली नसती, अशी भावना तयार करते. हे दुःख एक भूल संपूर्ण आयुष्यावर चढवते. किणीकर असे उदात्त दुःख मागत आहेत. त्याची भूल मागत आहेत.
१७९)
‘पाहिले परंतू ओळख पटली नाही
ऐकले परंतू अर्थ न कळला काही
चाललो कुठे पायांना माहित नव्हते
झोपलो परंतू स्वप्न न माझे होते।।’
मी हे जग पाहिले. मी हे आयुष्य जगलो. पण का जगलो आणि कशासाठी जगलो ह्याविषयी काही कळले नाही. ही जन्मोजन्मीची यात्रा आहे असे म्हणतात, पण पूर्वीच्या प्रवासाबद्दल काही आठवले नाही.तत्त्वज्ञाने खूप ऐकली, पण कुठल्याही तत्त्वज्ञानाचा खरा अर्थ कळला नाही. कशाचीही प्रचिती आली नाही.
हा सगळा प्रवास झाला. मी चालत गेलो, पण पायांना काहीही माहीत नव्हते. आपण कुठे चाललो आहोत, का चाललो आहोत; कशाचा कशाला पत्ता नव्हता. ह्या आयुष्यात मी कित्येक वेळा झोपलो, कित्येक स्वप्ने पडली, पण एकही स्वप्न मला कळले नाही. त्याचा खरा अर्थ कळला नाही, आणि ते का पडले हेसुद्धा समजले नाही.
हे आयुष्याचे स्वप्न माझे नव्हते. ही एक वेगळीच आणि गूढ भूल आहे. मायेचा ठाव कुणाला लागावा. तिच्यामुळे पडलेले स्वप्न कुणाचे स्वप्न आहे हे स्वप्नाच्या नाटकातील एका नटाला कसे कळावे?
१८०)
‘ऋण नक्षत्रांचे असते आकाशाला
ऋण फळाफुलांचे असते या धरतीला
ऋण फेडायाचे राहुन माझे गेले
ऋण फेडायाला पुन्हा पाहिजे मेले।।’
आकाश हे निराकार आहे. त्याच्यात तारे चमकतात म्हणून त्या आकाशाला आकाशपण येते.
फळे आणि फुले फुलतात म्हणून ह्या धरतीला धरतीपण येते. रुबाईमधील पहिल्या दोन ओळी पाहिल्या, तर तिसरी ओळ आपल्याला थोडी गोंधळात टाकते.
‘ऋण फेडायाचे राहुन माझे गेले’
ही ओळ कोण म्हणते आहे. कवी म्हणत असेल तर कसले ऋण फेडायची भाषा तो करतो आहे?
आकाशाला नक्षत्रांचे ऋण असते, धरित्रीला फळाफुलांचे असते, तसे माणसाला कोणाचे असते? त्याला कोणामुळे अर्थ येतो? आणि चौथ्या ओळीत सांगितल्याप्रमाणे ते ऋण फेडण्यासाठी परत एकदा मरायला का पाहिजे आहे?
मला असे वाटते की, ही भावना माणसामधील चिरंतन प्रवासी म्हणतो आहे असा अर्थ लावला की, प्रकरण लक्षात यायला लागते. आकाश आणि नक्षत्र हे जसे नाते आहे, तसेच माणसाचा आत्मा आणि त्याचे शरीर असे नाते आहे. शरीर नसेल तर मानवी दृष्टीत आत्म्याला काय अर्थ राहिला? आत्मा आहे म्हणून शरीर आहे असे म्हणता येते, त्याचप्रमाणे शरीर आहे म्हणून आत्मा आहे असेही म्हणता येते. शरीर आहे म्हणजे ते कर्मांचे ऋण तयार करत राहणार. आणि हे ऋण फेडण्यासाठी आत्म्याला परत परत जन्म घ्यावा लागणार. परत परत 'मरावे' लागणार!
१८१)
‘हा देह तुझा पण देहातिल तू कोण
हा देह तुझा पण देहाविण तू कोण
हा देह जन्मतो वाढत जातो सरतो
ना जन्म मरण ना देहातील तो म्हणतो।।’
अगदी साधी पण आकर्षित करून घेणारी रुबाई. ह्याच्या आधीच्या रुबाईतील कोणामुळे कोणाला अर्थ आहे हाच विषय इथे थोड्या वेगळ्या स्वरुपात मांडला आहे. हा देह तुझा आहे, कबूल! पण ह्या देह माझा आहे, असे म्हणणारा ह्या देहाच्या आतील कोण?
हा देह तुझा आहे कबूल! पण ह्या देहाच्या शिवाय तुला काय अर्थ आहे? हा देह जन्मतो, वाढतो आणि सरून जातो. पण गंमत म्हणजे जन्म आणि मरण हे सत्य नसते असे तो देहात जो कोणी आहे तो म्हणतो. माया खरी असते पण सत्य नसते, हे ह्या इथे पुन्हा एकदा लक्षात घ्यावे लागते. खरे असते असे म्हणायचे कारण ते अनुभवाला येते. सत्य नाही असे म्हणायचे कारण सत्य कधीच लय पावत नाही. माया अनुभवाला येते म्हणून खरी आहे. माया लय पावणारी आहे म्हणून असत्य आहे. जन्म मरण हे मायेचे भाग आहेत. म्हणून जन्म आणि मरण अनुभवाला येतात तरी सत्य नाहीत.
‘ना जन्म मरण ना देहातील तो म्हणतो।।’
१८२)
‘कोरून शिळेवर जन्ममृत्यूची वार्ता
जा ठेवा पणती त्या जागेवर आता
वाचील कुणीतरी होताना उत्खनन
म्हणतील कोण हा, कशास त्याचे स्मरण।।’
कुणी गेल्यावर आपण त्याच्या स्मरणार्थ काहीतरी करतो. स्मारक म्हणा, पुतळा म्हणा, थडगे म्हणा, कबर म्हणा, काही नाहीतर फोटो म्हणा, असे काहीतरी गेलेल्या व्यक्तीच्या स्मरणार्थ उभारले जाते, जतन केले जाते. त्या व्यक्तीच्या स्मरणार्थ दिवा लावला जातो.
पण हे स्मरण करणारेही जातात. कालाचा ओघ इतका मोठा आहे की, तो सगळे पुसून टाकतो. देश, शहरे इतकेच काय संकृतीच्या संकृती पृथ्वीवरून पुसल्या जातात. संस्कृतीच्या संस्कृती विसरल्या जातात. इतका मोठा संहार जिथे सुरू असतो, तिथे एखाद्या व्यक्तीच्या स्मरणाचे काय?
कालाच्या ओघात सगळेच विस्मरणाच्या धुळीमध्ये गाडले जाणार असते. पुढे हजारो वर्षांनी जेव्हा उत्खनन होईल, तेव्हा उत्खनन करणारे एकमेकांना विचारलतील की, हा लेकाचा असा कोण होता की ज्याचे स्मरण करायची गरज इतर लोकांना भासत होती. काय गरज होती स्मरणाची? मानवी जीवन आणि भावना ह्यांना कालाच्या विस्तीर्ण पाटावर फारसे स्थान नाही एवढेच खरे!
१८३)
‘संपली वही मोडले टोक टाकाचे
लिहशील किती रे स्पंदनक्षण श्वासांचे
घे हात उशाला खुशाल दे ताणून
देईल कोण तुज स्वप्न तुझे आणून।।’
आयुष्य जगून झाले आहे. आयुष्याची वही संपून गेली आहे. लिहित्या बुद्धीच्या टाकाचे टोक मोडले आहे. श्वासांच्या गाथा आता अजून किती लिहायच्या? आता सगळा उपद्व्याप सोडून द्यायला पाहिजे. शांतपणे झोपून जायला पाहिजे!आता, अपूर्ण राहिलेले स्वप्न प्राप्त करायचा तो एकच मार्ग उरला आहे. मृत्यूच्या कुशीत कदाचित स्वप्नपूर्ती झाली तर होऊन जाईल!
१८४)
‘सोडूनि वाट ती तुडवित जावे काटे
मोडूनि रांग बाहेर पडावे वाटे
जाईन कुठे जरी अजूनि ठरले नाही
झोपेन जिथे उठवणार कोणी नाही’
ही आणि ह्या पुढची, अशा दोन रुबाया किणीकरांनी त्यांची आई गेल्यावर लिहिल्या! किणीकर त्यांच्या आयुष्यात त्यांना जिकडे जावे वाटेल तिकडे गेले. नौकऱ्या किंवा अर्थार्जन त्यांनी नियमितपणे केले नाही. ते सदैव अस्थिरतेचे आयुष्य जगले. वाट सोडून काटे तुडवत गेले. रांग सोडून भटकले.
आपल्याला निश्चितपणे कुठे जायचे आहे, ह्याचा निश्चित विचार त्यांनी कधी विचार केला नाही.
ह्या सगळ्यामुळे त्यांना स्वतःच्या आईपासून दूर राहायला लागले. त्यांच्या इतर भावांकडे आई राहिली. आता आई गेल्यावर, आपण ह्या अस्थिर आयुष्याची काय किंमत भरली आहे ह्याचा विचार मनात आला.
मानवी आयुष्यातली विफलता अंगावर चाल करून आली. त्या वेदनेतून विचार आला - आता परत हे मानवी आयुष्य नको. एकदाच ह्या जीवनापासून आणि जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका करून घ्यायला हवी.
‘झोपेन जिथे उठवणार कोणी नाही’
त्यांना ध्रुवबाळासारखे अढळपद नको आहे. त्यांना शून्यावस्था हवी आहे. कसलेही अस्तित्व नको आहे. काहीच नको आहे. मुक्तीसुद्धा नको आहे! तो कॉन्शसनेस नको. कॉन्शसनेस वेदनाहीन असू शकेल हा विश्वासच त्या विदग्ध क्षणांमध्ये किणीकरांकडे उरलेला नाहिये! त्यांना फक्त शून्यावस्था हवी आहे. कायमची शून्यावस्था! त्यांना बाकी काही नको आहे!
१८५)
‘गुदमरली होती खिडक्यादारे बंद
विरघळला गोठुनि एक ज्योतिचा थेंब
गडबडुनी लोळती शून्ये अंधारात
हरवता एक शून्याला आला अर्थ’
देह आता थकला आहे! संवेदनांची खिडक्या-दारे बंद झाली आहेत. प्राणशक्ती आता क्षीण झाली आहे. एखादी ज्योत गोठुन आणि विरघळून जावी अशी प्राणशक्तीची अवस्था झाली आहे. ह्या असल्या म्हातारपणाच्या अंधारात कशालाच काही अर्थ उरत नाही.
किणीकर गेले त्याच्या आदल्या वर्षी त्यांच्या आई गेल्या. किणीकर एक्काहतराव्या वर्षी गेले. म्हणजे त्यांच्या आई गेल्या त्या त्यांच्या नव्वदीत! ह्या वयात जगणं आणि मरणं ह्यातील सीमारेषा अस्पष्ट होत जातात!
‘गडबडुनी लोळती शून्ये अंधारात’
जगण्याला अर्थ राहत नाही तसा त्या अर्धवट मरणालाही अर्थ राहत नाही! ती व्यक्ती गेल्यावरच, ह्या अर्धवट अवस्थेतून कायमची सुटल्यावरच मरणाला अर्थ येतो!
‘हरवता एक शून्याला आला अर्थ।।’
.................................................................................................................................................................
या लेखमालिकेतले आधीचे लेख
https://www.aksharnama.com/client/author_articles
.................................................................................................................................................................
१८६)
‘ही युगायुगांची आहे अक्षर यात्रा
एकदाच भरते स्मशानातली जत्रा
खांद्यावर घेउनि शव फिरतो जन्म
राखेंत अश्रुला फुटला हिरवा कोंब ।।’
मानवी जीवनाचा प्रवास ही युगायुगांची अक्षर यात्रा आहे. अक्षर म्हणजे ज्याचा कधीही क्षर होत नाही असे. जे कधीही नाश पावत नाही असे. माणूस संपून जातो, माणसांचे समूह संपतात, संकृती संपतात, पण मानवता संपत नाही.
‘ही युगायुगांची आहे अक्षर यात्रा’
ह्या पाहिल्या ओळीनंतर किणीकर एकदम विषयला कलाटणी देतात -
‘एकदाच भरते स्मशानातली जत्रा
खांद्यावर घेउनि शव फिरतो जन्म’
एक माणूस एका आयुष्यात एकदाच मरतो. त्याला एकदाच स्मशानात नेले जाते. पण मृत्यू मात्र आयुष्यभर त्याची साथ करत त्याच्या बरोबर फिरत असतो. मृत्यूची भीती सतत आपल्याबरोबर असते. मृत्यूची शक्यता सतत आपल्याबरोबर असते.
‘राखेंत अश्रुला फुटला हिरवा कोंब ।।’
मृत्यूनंतर माणसाची राख होते, माती होते. ह्या राखेवर त्या व्यक्तीच्या आठवणीने एखादा अश्रूचा थेंब पडतो. त्या ओलीतून नवे काहीतरी जन्म घेते. ते गवत वगैरे असे काही असायलाच हवे असे काही नाही. ते एखादे पुस्तकसुद्धा असू शकते.
रॉय किणीकर ह्यांच्या निधनानंतर ४२ वर्षांनी त्यांच्या रक्षेवर ह्या पुस्तकाच्या रूपाने अश्रूंचा थेंब पडला!
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
१८७)
‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ
फांदीवर झुलते हिरवी पाऊल धूळ
कानावर आली अनंतातून हाक
विसरूनि पंख पाखरू उडाले एक।।’
अतिशय आशयगर्भ आणि सुंदर रुबाई!ह्या पृथ्वीच्या जड घरट्यामध्ये गडद निळे आभाळ फडफडते आहे. ह्या जड जगतात चैतन्य अनेक रूपांनी फडफडते आहे. संपूर्ण जीवसृष्टीच्या रूपामध्ये फडफडते आहे. चैतन्याच्या फडफडीशी अस्वस्थतेचाही संबंध आहे.
ह्या चैतन्याला जडाच्या साखळी मधून मुक्त व्हायचे आहे. मुमुक्षुची अवस्था. जड अस्तित्व आता सहन होत नाहिये. आजुबाजूला सगळीकडे ‘त्याच्या’ पाऊलखुणा जाणवत आहेत. त्याच्या सृजनामध्ये पदोपदी त्याचे अस्तित्व जाणवत आहे.
‘फांदीवर झुलते हिरवी पाऊल धूळ’
सगळी तडफड, त्याची हाक ऐकण्यासाठी सुरू आहे. सगळी तपस्या, सगळी ज्ञानाची आराधना त्याची हाक ऐकण्यासाठी सुरू आहे. आणि अचानक ती हाक ऐकू येते -
‘कानावर आली अनंतातून हाक’
आणि -
‘विसरूनि पंख पाखरू उडाले एक।।’
आत्म्याचे पाखरू ह्या जगतातून उडून गेले, पण ते कसे उडाले आहे? आपले पंख विसरून उडाले आहे.
पंख जड जगतात उडण्यासाठी असतात. बुद्धीचे पंख आणि ज्ञानाचे पंख सुद्धा इथेच ठेवून जावे लागते, कारण इथल्या बुद्धीला जडाची बाधा झालेली असते. इथले ज्ञान सुद्धा जडाने लिप्त झालेले असते. हे जड पंख मागे ठेवल्याशिवाय वर उडता येत नाही.
रॉय किणीकर आणि उमर खय्याम हे दोघे असे की, त्यांनी कवितेचे पंख घेऊन ‘आध्यात्मिक भरारी’ घेण्याचा प्रयत्न केला. आपले भाग्य असे की, आपल्यासाठी हे रुबायांचे पंख मागे ठेवून हे दोघे त्यांच्या पुढच्या प्रवासाला गेले!
..................................................................................................................................................................
लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.
sjshriniwasjoshi@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment