१३०)
‘का सतार तुटता उठतो वाजवणारा
अन् ओल खुणाही ठेऊनि गेल्या गारा
बघ चाफा सुकला मावळला तो गंध
दे सोडुनि वेड्या शोधायाचा छंद।।’
ह्या जगात गोष्टी संपत असतात. पण वेगवेगळ्या प्रकारे संपत असतात. सतारीची तार तुटल्यावर वाजवणारा वाजवणे सोडून उठून जातो. खरं तर काही कारण नसते. कारण गाणे वाजवणाऱ्याच्या मनात राहत असते. गारा पडतात, विरून जातात, पण मागे काही ओल्या खुणा ठेवून जातात, पण हा नियम नाही. चाफा सुकला की, तो गंध मागे ठेवून जात नाही.
संपण्याचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत. प्रत्येकाच्या मनाच्या जडण-घडणीप्रमाणे - गाणे म्हणा, ओल्या खुणा म्हणा, मागे राहतात किंवा चाफ्याच्या गंधाप्रमाणे राहातही नाहीत. प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेऊन तिचा शोध घ्यायचा. तिच्या मागे मागे जायचे, हे संवेदनशील मनाचे लक्षण आहे. प्रत्येक संपणे त्या मनात एक कविता बनून उरून राहते. एक शोध म्हणून त्या मनाच्या मागे लागून राहते. हा छंद सोडायला लागतो. नाहीतर खूप दुःख भोगायला लागते. सतार तुटल्यावर मनात उरलेल्या गाण्याचा फारसा विचार न करता निघून जाणे चांगले.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
१३१)
‘त्या छंदापायी वाट तुडविशी खोटी
मोडली वाट अन मोडून गेली काठी
ती तुझीच माती जिथे टेकशी माथे
मांडीवर घेईन बाळाला ती म्हणते।।’
ही रुबाई ह्या आधीच्या रुबाईशी संलग्न आहे. हरवलेल्या गोष्टींचा, सोडून गेलेल्या गोष्टींचा, शोध घेण्याच्या छंद वाईट. अनेक वाटा व्यर्थपणे तुडवाव्या लागतात. ह्या नादात वाट मोडून जाते. आधाराची काठी मोडून जाते. थकून-भागून आपण माथे टेकावे, तर लक्षात येते की, आपण आपल्या स्वतःच्या मातीवरच विश्रांतीसाठी माथे टेकले आहे. म्हणजे ह्या प्रकारात मृत्यूनंतरच विश्रांती मिळते. शेवटची ओळ खास किणीकरी औपरोधिक शैलीत लिहिली गेली आहे -
‘मांडीवर घेईन बाळाला ती म्हणते।।’
ह्या मातीची आपण बाळे आहोत, हे खरे आहे, पण, ही आई आपल्या मृत्यूनंतरच आपल्याला मांडीवर घेते.
१३२)
‘थकलास तुडवुनी निवडुंगाचे रान
का वळून बघशी असे तुझे का कोण
घे दगड उशाला पांघर काळी माती
ह्या जमल्या मुंग्या शोकगीत त्या गाती।।’
जीवन म्हणजे निवडुंगाचे रान तुडवणे. वैराण जमीन, निवडुंगाचे काटेरी फड, सगळा रखरखाट. मनावर ओरखडे उठण्यावाचून ह्या प्रवासात काय हाती लागणार? अवती-भवतीच्या सगळ्या लोकांचे जीवन असेच असते. ह्या दुःखमय वातावरणात कोण कुणाचे असणार आहे? जी काही सुखे हाती लागतात, ती
निवडुंगाच्या फुलासारखी. क्वचित हाती येणारी आणि तीसुद्धा अंगावर काटे असलेली.
सगळे लोक आपापल्या दुःखात रमलेले. कुणाला कुणाकडे लक्ष द्यायला वेळ कुठे आहे? कुणाचे आपले होऊन राहायला वेळ कुठे आहे?
‘थकलास तुडवुनी निवडुंगाचे रान
का वळून बघशी असे तुझे का कोण’
प्रेमाचा आणि कोमल फुलांचा शोध वगैरे काही घेऊ नकोस.
‘घे दगड उशाला पांघर काळी माती’
सरळ मृत्यूची तयारी कर.
‘ह्या जमल्या मुंग्या शोकगीत त्या गाती।।’
आपल्या मृत्यूनंतर कुणी आपल्यामध्ये रस घ्यावा, आपली आठवण काढावी असे वाटत असेल तर मृत्यू नंतर मुंग्या जमतात हे लक्षात ठेव. आपल्या मृत्यूनंतर मुंग्या वगैरे सोडल्या तर आपली कोणीही आपली आठवण काढत नाही, हे लक्षात ठेव.
एवढी ‘डार्क’ रुबाई किणीकरांनी फार क्वचित लिहिली आहे. संवेदनशील माणसाला जीवन अत्यंत निराश आणि उद्विग्न करून टाकते. त्या काळ्या मनोवस्थेतून अशी एखादी कविता वर उसळून आली तर, समजून घ्यायला पाहिजे.
१३३)
‘काट्याची हिरवी छाटी अंगावरती
छातीत दगड अन् कुऱ्हाड मानेवरती
गर्भातच घडते असे कसे हे थडगे
तो योगी लपला निवडुंगीच्या मागे ।।’
ह्या आधीच्या रुबाईची मनोवस्था ह्या रुबाईमध्ये अजून गडद होऊन आलेली आहे. माणसाचे आयुष्य आणि निवडुंगाचे आयुष्य ह्यात खूप साम्य आहे.
‘काट्याची हिरवी छाटी अंगावरती
छातीत दगड अन् कुऱ्हाड मानेवरती’
हिरव्या काट्यांनी भरून गेलेले आयुष्य. काटे हिरवे आहेत एवढेच सुख! निवडुंगाचा फडा मोडला तर आत मऊसर असे काही नसते. सगळे दगडासारखे. लोक तरी अशा झाडाचा का आदर करतील? ते त्याच्यावर कुऱ्हाडच चालवणार! निवडुंगाचे कसले झाड, कसले आयुष्य? साक्षात जिवंत थडगेच ते!
‘गर्भातच घडते असे कसे हे थडगे’
किणीकर लिहितात की - हे असले थडगे म्हणून जगायचे माणसाचे प्राक्तन तो गर्भात राहायला येतो तेव्हाच घडते का? ज्या संवेदनशील लोकांना मानवाचे आयुष्य अतीव दुःखरूप आहे, असे जाणवते, ते अध्यात्माच्या मागे लागतात. योगी बनून ह्या अतीव दुःखरूप मानवी आयुष्यातून सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात ते असतात.
प्रत्येक निवडुंच्या मागे एक योगी लपलेला असतो. कारण प्रत्येक माणसाला कधी ना कधी मानवी आयुष्य मूलतः दुःखरूप आहे, हे कळून चुकणार असते. कोणत्या ना कोणत्या आयुष्यात तो योगाचा अंगिकार करणार असतो. म्हणून किणीकर लिहितात -
‘तो योगी लपला निवडुंगीच्या मागे ।।’
१३४)
‘आभाळ उतरले तपोवनावर आज
गौतमीस आली कल्पांताची नीज
वारुळात शिरले परत वाल्मिकी का ते
भगवंत भेटले भगवी माती म्हणते।।’
गोहत्येचा आरोप झाल्यामुळे गौतम ऋषींनी तपोवनात म्हणजे नाशिकजवळ येऊन तपश्चर्या केली. गंगेचे दुसरे रूप गोदावरीला तिथे अवतरावे लागले. गौतम ऋषींवरील आरोप धुऊन टाकण्यासाठी गंगेला दक्षिण गंगेचे रूप घेऊन यावे लागले.
‘आभाळ उतरले तपोवनावर आज’
एवढी कृपा गौतमी ऋषींच्या तपामुळे तपोवनात अवतरली. तपाला एवढे फळ आल्यावर अजून काय कार्य उरले? आता विश्वाच्या पुढच्या जन्मानंतरच अशा तपाची गरज पडणार. म्हणून
‘गौतमीस आली कल्पांताची नीज’
ह्या तपांची गरज काय? कशासाठी मनुष्याने तप करायचे? प्रगती व्हावी म्हणून तप. देवत्व माणसात उतरावे म्हणून तप. ह्या विश्वात देवत्वाचा आविष्कार व्हावा म्हणून तप! उत्पत्ती आणि लय अशी अनेक चक्रे कल्पिली गेली आहेत. प्रत्येक चक्रात अशी तपे व्हावी लागतात. देवत्वाचे आविष्कार मातीला दाखवावे लागतात. तेव्हा कुठे हळूहळू प्रगती होते.
‘वारुळात शिरले परत वाल्मिकी का ते’
वाल्मिकी ऋषी तप करायला बसले तेव्हा त्यांच्या भोवती मुंग्यांचे वारुळ जमले. कशासाठी हे वारुळ जमले? भगवंत भेटावे म्हणून मातीसुद्धा आसुसलेली असते. इतके मोठे तप चाललेले पाहून, तिलाही भगवंताच्या भेटीसाठी तपस्वी वाल्मिकींच्या शरीराभोवती जमा व्हावे असे वाटले.
‘भगवंत भेटले भगवी माती म्हणते।।’
अजून एक अर्थ म्हणजे वाल्मिकींचे तप हाच भगवंत. त्याला भेटण्यासाठी माती वाल्मिकींच्या भोवती जमा झाली.
१३५)
‘लागली समाधी आभाळाला आज
गौतमीस आलीं कृतार्थतेची नीज
बघ तपोवनावर पडले इंद्रधनुष्य
भगव्या मातीवर नाचे हिरवे हास्य।।’
ही रुबाई, ह्या आधीच्या रुबाईशी जोडलेली आहे. गौतमी ऋषींच्या तपस्येने गोदावरी तपोवनात अवतरली. गोदावरीचे उतरणे, ही आभाळाची समाधी आहे का? मानवी मन विस्कटलेले असते. ध्यान-धारणेमुळे, तपामुळे ते चैतन्याशी एकरूप होते. आभाळ विस्कटलेले असते. ते, त्यातील पाणी, गौतमींच्या तपामुळे नदी बनून एक झाले आणि गोदावरी अवतरली. ही आभाळाची एक समाधीच.
‘लागली समाधी आभाळाला आज’
आपल्या कठोर तपाला एवढे फल प्राप्त झाल्यामुळे गौतमींना कृतार्थेची नीज आली.
‘गौतमीस आलीं कृतार्थतेची नीज’
पाऊस पडून गेल्यावर आभाळावर इंद्रधनुष्य नाचू लागते. इथे तप होऊन कृपेचा पाऊस पडला. एक समाधानाचे इंद्रधनुष्य पृथ्वीवर नाचू लागले.
‘बघ तपोवनावर पडले इंद्रधनुष्य’
पृथ्वीवर सृजनाची सुरुवात झाली.
‘भगव्या मातीवर नाचे हिरवे हास्य।।’
भगव्या मातीवर हिरवे हास्य नाचू लागले. भगवी माती ही तपस्येची प्रतिमा आहे, असे येथे वाटून जाते. तपस्येमुळे गोदावरी आली, तिच्यामुळे सृजन आले. त्यामुळे गौतमी ऋषींची वैराग्यपूर्ण तपस्या हीच खरी माती!
१३६)
‘पेटविण्या चिलीम त्याची, आला सूर्य
उगवते धरित्री पडता त्याचे वीर्य
तो हात कटोरा आहे निरंजनाचा
त्रिभुवनात घुमला रुद्रनाद चिमट्याचा।।’
ही रुबाई नाथपंथीय तपस्व्याचे वर्णन करते आहे. नाथपंथ हा शैवपंथ आहे. शिव अथवा रुद्र ह्यांच्यापासून हा पंथ सुरू झाला. शिव हे ह्या विश्वातील आदियोगी आहेत. ह्या विश्वातील पहिले योगी. ते त्यांच्या तपात मग्न आहेत. चिलिमीत धुंद आहेत. त्यांची चिलीम पेटवून द्यायला साक्षात सूर्य येतो आहे. म्हणजे सूर्य वगैरे सर्व तेज त्यांचे दास आहे. कारण ते त्यांच्यापासूनच तयार झालेले आहे.
‘पेटविण्या चिलीम त्याची, आला सूर्य’
केवळ सूर्यच नव्हे, तर ही धरती आणि तिच्यावरचे सगळे सृजन हे त्यांच्यापासूनच आलेले आहे.
‘उगवते धरित्री पडता त्याचे वीर्य’
नाथपंथात ‘अलख निरंजन’ अशी साद देतात. ह्याचे मूळ स्वरूप ‘अलक्ष निरजंन’ असे आहे. अलक्ष निरजंन म्हणजे ज्याला कोणतेही लक्षण नाही. जो लक्षणांच्या पलीकडचा आहे, असा. निरजंन म्हणजे अंजन नसलेला. काळा डाग नसलेला. कसलाही दोष नसलेला. पूर्ण शुद्ध असलेला. ब्रह्मस्वरूप!
‘तो हात कटोरा आहे निरंजनाचा’
ह्या योग्याचा हात म्हणजे एक निरजंन कटोरा आहे. त्यातून सर्व तपस्या जन्म पावते.
‘त्रिभुवनात घुमला रुद्रनाद चिमट्याचा।।’
नाथपंथियांच्या वेशात चिमट्याला मोठे स्थान आहे. एका बाजूला जोडलेल्या दोन पट्टया म्हणजे हा चिमटा. त्याला घुंगरे लावलेली असतात. ह्या दोन पट्टया म्हणजे शिव आणि शक्ती म्हणजेच पुरुष आणि प्रकृती. ह्यांच्या एकमेकांवर आदळण्यातून सृजनाचा नाद निर्माण होतो. हा सृजनाचा रुद्रनाद त्रिभुवनात निनादत राहतो.
किणीकरांच्या लेखणीतून बाहेर पडलेली ही अफलातून अशी रुबाई आहे.
१३७)
‘ठोकरा खाऊनि मुर्दाड पाय हे थकले
पसरुनी हात, निर्लज्ज हात मरगळले
ती खोटी स्वप्ने पाहुनि डोळे सुजती
श्वानसूक्त गाती कुंभामधल्या अस्थी।।’
नियती, समाज आणि आजूबाजूची माणसे ह्या तीन गोष्टी माणसाला सतत ठोकरा देत असतात. चालून चालून पाय थकत नाहीत, निराशेनी भरलेली चाल पायांना जास्त थकवते.
‘ठोकरा खाऊनि मुर्दाड पाय हे थकले’
नियती कित्येक वेळा अशा वेळा आणते की ज्या लोकांनी ठोकरले आहे, त्यांच्यापुढेच मदतीसाठी हात पसरावे लागतात. ह्या हात पसरण्यातला निर्लज्जपणा मन मारून टाकतो.
‘पसरूनी हात, निर्लज्ज हात मरगळले’
ह्या सर्व परिस्थितीमध्ये हातांमध्ये उभारी राहत नाही. नियती विरोधात असली की आपण जी स्वप्ने पाहतो, त्यातून काही चांगले व्हायच्या ऐवजी आपण अजून अजून गोत्यात येतो. त्यामुळे स्वप्ने खोटी वाटू लागतात.
‘ती खोटी स्वप्ने पाहुनि डोळे सुजती’
पाय, हात आणि डोळे थकले तर जीवनात मृत्यूशिवाय काहीच नको वाटते.
‘श्वानसूक्त गाती कुंभामधल्या अस्थी।।’
मृत्यू कसाही झाला तरी हवा असतो. काही वाईट होणार असले तर कुत्रे रडू लागतात. ह्या रडण्याला किणीकर श्वानसूक्त म्हणतात. शरीर हा घट आहे, कुंभ आहे, असे सतत म्हटले जाते. ह्या शरीरातील अस्थी शरीर तोलून धरण्याऐवजी अभद्रतेची सूचना मिळाल्याप्रमाणे श्वानसूक्त गाऊ लागतात. अशा रुबाया वाचल्या की, किणीकरांसारख्या प्रतिभावंतावर नियतीने किती आघात केले असतील, ह्याची कल्पना येते. मन उदास होते.
१३८)
‘जळल्यावर उरते एक शेवटी राख
ती फेक विडी तोंडातील काडी टाक
जळण्यातच आहे गंमत वेड्या मोठी
दिव्यता अमरता मायावी फसवी खोटी।।’
माणूस जेव्हा निराशाग्रस्त असतो, तेव्हा त्याचा कुठल्याच चांगल्यावर विश्वास उरत नाही. डोळ्यासमोरच्या जीवनाने दगा दिल्यावर डोळ्याच्या आणि मनाच्या पलीकडच्या अध्यात्मावर कुणाचा विश्वास उरावा?
आपण मृत्यू पावल्यावर जी राख उरणार असते, तेच अंतिम सत्य असे वाटू लागते. कसला आत्मा आणि कसले त्याचे सनातनत्व!
‘जळल्यावर उरते एक शेवटी राख
ती फेक विडी तोंडातील काडी टाक’
आपण जळून गेल्यावर जी राख उरते तेच सत्य आहे. विडी ओढत किंवा तोंडात काडी धरून तू अंतिम सत्याविषयी जो विचार करतोस, ह्या जीवनाच्या अर्थाविषयी जो विचार करतोस, ते सर्व झूट आहे. ती तोंडातली विडी किंवा काडी जी काही असेल ते फेकून दे आणि भानावर ये.
‘जळण्यातच आहे गंमत वेड्या मोठी’
ह्या जीवनातील दुःख हेच काय ते खरे. दुःखात जळण्यात मजा मानता आली तर मान. बाकी काही दिव्य सत्याचा वगैरे विचार करू नकोस. त्या फिजूल गोष्टी आहेत.
‘दिव्यता अमरता मायावी फसवी खोटी।।’
‘Some for the Glories of This World; and some
Sigh for the Prophet's Paradise to come;
Ah, take the Cash, and let the Credit go,
Nor heed the rumble of a distant Drum!’
आयुष्याला वैतागलेला उमर खय्याम किणीकरांचीच भाषा बोलतो.
(काही लोक निश्वास टाकतात ह्या जगातील दिव्य गोष्टींच्या नावाने
आणि काही निश्वास टाकतात प्रेषितांनी वर्णन केलेल्या स्वर्गाच्या नावाने;
घे पाहिजे तेवढे कर्ज, आणि विसरून जा परतफेड
घाबरू नकोस कल्पांती होणाऱ्या न्यायाच्या ललकरीने)
१३९)
‘ही जुनीच माती नवी बाहुली व्याली
अन जुनेच कुंपण, नवी मेंढरे आली
या जुन्या नव्यावर कुणी बांधला पूल
या जुन्याच वाटा नवे उमटले पाऊल॥’
जुन्या जैविक नकाशांबरहुकूम, जुने अणू-रेणू वापरून नवीन माणसे जन्माला येतात. जनुकीय अणु-रेणू कित्येक हजार वर्षे झाली म्हातारे झालेले नाहियेत.
‘ही जुनीच माती नवी बाहुली व्याली’
मानवी आयुष्याचे कायदे सनातन आहेत. त्यांच्या बंधनातच माणसाला आयुष्य जगावे लागते. मृत्यू, नियती, सुख-दुःख, मनामुळे निर्माण होणाऱ्या समस्या अशी सर्व कुंपणे आहेत. कुंपणे जुनीच आहेत. त्यात कोंडली जाणारी मेंढरे मात्र नवनवीन असतात.
‘अन जुनेच कुंपण, नवी मेंढरे आली’
हे जुने कायदे, ही जुनी माती आणि सातत्याने येत राहणारी नवी माणसे - ह्या नव्या जुन्यावरचा पूल कुणी बांधला आहे?
‘या जुन्या नव्यावर कुणी बांधला पूल’
ह्या जुन्या वाटांवर नवी पावले कुणाच्या कृपेने उमटतात?
‘या जुन्याच वाटा नवे उमटले पाऊल॥’
१४०)
‘येताना त्याने दार लाविले नाही
जाताना त्याने वळुनि पाहिले नाही
'येइन' म्हणाला, 'पाहीन वाट' - म्हणाली
दारात अहिल्या शिळा होउनी बसली।।’
अहिल्या ही गौतमी ऋषींची पत्नी. संस्कृतमध्ये अहल्या, मराठीत अहिल्या. तर ही अहल्या पंचकन्यांमधली. पंचकन्या ह्या शुद्ध चरित्र्यासाठी ओळखल्या जातात. त्यांची नुसती नावे घेण्यानेसुद्धा पापांचा नाश होतो, असे सांगितले गेले आहे. अहल्येची निर्मिती स्वतः ब्रह्मदेवाने केली. ‘रामायणा’च्या ‘बालकांडा’त लिहिले आहे की, तिची निर्मिती ब्रह्मदेवाने आपल्या शुद्ध सृजनशक्तीने केली.
काही ठिकाणी लिहिले गेले आहे की, ती शुद्ध पाण्यापासून निर्माण केली गेली. ‘भिल्ल रामायणा’त सप्तर्षींनी केलेल्या यज्ञाच्या राखेपासून तिची निर्मिती केली गेली, असेही सांगितले गेले आहे. थोडक्यात एका दिव्य स्त्री-सौंदर्याची दिव्य पद्धतीने केली गेलेली निर्मिती. पण पुढे काय झाले? ब्रह्मदेवाने तिला गौतम ऋषींना दिले. त्यांचे लग्न झाले. गौतम ऋषी अहल्येपेक्षा वयाने खूप मोठे.
दुसऱ्या बाजूला इंद्राला ती हवीहवीशी वाटू लागली. त्याने येऊन तिला सांगितले की, तू माझी हो. तिने नकार दिला. मग इंद्र गौतम ऋषींच्या रूपात आला. अहल्येने त्याचा स्वीकार केला. गौतमांना हे कळल्यावर त्यांनी तिला शाप दिला. ती शिळा झाली. पुढे दीर्घ कालानंतर श्रीरामाने चरणस्पर्श करून तिला शापमुक्त केले. ती परत एकदा गौतम ऋषींची पत्नी झाली.
आता वेगवेगळे प्रश्न उभे केले गेले. तिने इंद्राबरोबर प्रणय केला तेव्हा तिला तो इंद्र होता हे माहीत होते का? ‘बालकांडा’त लिहिले गेले आहे की, तिने इंद्राला ओळखले होते, पण कुतूहलापोटी तिने त्याच्याबरोबर प्रणय केला. काही ठिकाणी लिहिले गेले आहे की, तिला तिच्या सौंदर्याचा गर्व होता आणि त्या गर्वाच्या आहारी जाऊन तिने देवांचा देव आपल्यावर भाळलेला पाहून त्याच्या बरोबर प्रणय केला. तिने जाणून उमजून व्यभिचार केला, असे ‘बालकांड’ म्हणते. पण ‘उत्तराकांडा’त आणि पुराणांमध्ये ती निर्दोष होती, असे उल्लेख येतात.
आता प्रश्न असा की कुतूहल असो, गर्व असो, पतिविषयीची नाराजी असो अथवा फसवले जाणे असो, पतित स्त्रीच्या नशिबी शिळा होणेच येते.
‘येताना त्याने दार लाविले नाही
जाताना त्याने वळुनि पाहिले नाही’
स्त्रीच्या अभिलाषेने आलेला पुरुष येताना आणि जाताना फारशी काळजी घेत नाही. गौतमांना प्रणय कळणार नाही ह्याची काळजी इंद्राने घेतली नाही. पुढे तिला शाप मिळाल्यावर त्याने तिच्याकडे फारसे लक्ष दिले अथवा तिचा फारसा विचार केला ह्याचे उल्लेख सापडत नाहीत.
‘ ‘येइन’ म्हणाला, ‘पाहीन वाट’ - म्हणाली
दारात अहिल्या शिळा होउनी बसली।।’
प्रियकर ‘येतो’ असे मोघम शब्द वापरून जातो. स्त्रीच्या नशिबात ‘शिळा’ होऊन पडणे येते. तेही दारामध्ये. कारण विवाहबाह्य संबंधांनंतर तिच्या नवऱ्याचे घर ‘तिचे’ राहत नाही. प्रियकर तिला बाहेर घेऊन जात नाही. शिळा होऊन राहण्याला रॉय किणीकरांनी एक वेगळाच अर्थ दिला आहे. अहल्येसारख्या अयोनीसंभवा स्त्रीला जे चुकवता आले नाही, तिथे सामान्य स्त्रियांची काय कथा?
१४१)
‘ठेवुनी गळ्यावर हात दिला हातात
जळतात मनाची निरांजने नयनात
ओठात ठेवुनी ओठ मिळेना तृप्ती
आश्चर्य अहो, तेलाविण जळते पणती।।’
गळ्यावर हात ठेवून शपथ घेऊन हातात हात दिला. प्रेमभावना भरून आलेली आहे. मनातले नितळ आणि शुद्ध प्रेम डोळ्यातून व्यक्त होत आहे. दोन डोळे म्हणजे जणू प्रेमज्योतीने तेवणारी निरंजनेच!
‘जळतात मनाची निरांजने नयनात’
आवेगाने ओठांमध्ये ओठ मिसळले गेले आहेत, पण तृप्तीची भावना तयार होत नाहिये. शरीरे एकत्र आली, पाहिजे तेवढा सहवास मिळाला तरी प्रेमभावना तृप्त होत नाहिये. शरीराच्या सहवासाठीच प्रेम नव्हते का? शरीरे एकमेकांत मिसळली गेल्यावर तृप्ती मिळायला नको का? तेल संपून गेल्यावर ज्योत शांत होते, तसे शारीर प्रेमाची तृप्ती झाल्यावर प्रेम शांत व्हायला नको का? ही प्रेमभावना तेलाविण जळणाऱ्या पणती सारखी का जळते आहे?
ह्या प्रेमाला नक्की कशाचा शोध आहे? शरीरापलीकडच्या प्रेमाला नक्की काय हवे असते? त्याची मूळ प्रेरणा काय असते?
.................................................................................................................................................................
या लेखमालिकेतले आधीचे लेख
.................................................................................................................................................................
१४२)
‘घे शब्दकोश, ई-ईश्वर शोधुनि काढ
तो आत्मा दडला कुठल्या शब्दाआड
अर्थाला असते बंधन का शब्दांचे
कोसळून पडले इमले अक्षरतेचे।।’
अक्षरांची अपूर्णता किणीकरांनी अनेक प्रकारे लिहिली आहे. अंतिम सत्य अनिर्वाच्य आहे. ते कुठल्याही शब्दाआड लपलेले नाही. ते शब्दाच्या पलीकडचे आहे. शब्द हा अंतिम सत्याचा भाग आहे. त्याला आपल्यापेक्षा विस्ताराने मोठे असलेले अंतिम सत्य कसे सांगता येईल? एखाद्या भागाला संपूर्णाची अनुभूती कशी असेल? अक्षर म्हणजे जे संपत नाही असे ते! परंतु अंतिम सत्यापुढे ह्या शब्दांच्या अक्षरतेचे इमले कोसळून पडतात.
.................................................................................................................................................................
या लेखमालिकेतले आधीचे लेख
शब्दांना मानवी मनातील विचार पूर्णत्वाने सापडत नाहीत. मनाच्या पलीकडचे काय सापडावे?
.................................................................................................................................................................
१४३)
‘मध्यरात्र झाली, वारा सुटला गार
वेदना म्हणाली, मला नसे घरदार
वेदने, ये अशी जवळ, भरू हे पात्र
ये, पिऊन घे, ही तुझीच आहे रात्र।।’
वेदनेला घरदार नाही. हे सारे विश्वच तिचे घर आहे. ईश्वराप्रमाणेच तिचा सर्वत्र अनिर्बंध संचार सुरू असतो. कारण, जेव्हा जिवाचा आणि शिवाचा भेद झाला तेव्हाच आनंद संपला आणि वेदनेचा जन्म झाला. जिवाचे आणि शिवाचे मीलन झाल्याशिवाय तिचा अंत होत नाही. लोक वेदना विसरण्यासाठी दारू पितात. दारुने वेदना कशी विसरली जाईल? त्यामुळे किणीकरांना वेदनेच्या बरोबर दारू प्यायची आहे. तिच्या सहवासात दारू प्यायची आहे. वेदनेला भोगत भोगत दारू प्यायची आहे. स्वतःला वेदनेच्या मिठीत झोकून द्यायचे आहे. ते म्हणतात -
‘वेदने, ये अशी जवळ, भरू हे पात्र
ये, पिऊन घे, ही तुझीच आहे रात्र।।’
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
१४४)
‘स्मृतिगंध संहिता गाती ऋविज तीन
गांधार उशाशी होता धरुनी मौन
कंठात अडकली श्वासांची जपमाळ
भंगली समेवर ॐ काराची खोळ।।’
ऋत्विज म्हणजे यज्ञ करणारे. तीन ऋत्विज स्मृतिगंध संहिता गात आहेत. तीन ऋत्विज का, तर मनाचे तीन हिस्से कॉन्शस, सबकॉन्शस आणि अनकॉन्शस. मनाच्या तीनही भागात स्मृतींची आवर्तने सुरू असतात. तशी ती आताही सुरू आहेत. फरक फक्तं एवढाच आहे की आता गळ्यातून त्या स्मृतींना प्रतिसाद म्हणून काही उमटत नाहिये. कसलाही हुंकार नाही, कसलेही गान नाही.
कंठात श्वासांची जपमाळ अडकली आहे. ॐकाराची खोळ समेवर भंगली आहे. ॐकार म्हणजे निर्मितीचा पहिला हुंकार. अ उ आणि म् ह्या तीन मात्रांनी बनलेला. सृजन, धारणा आणि मृत्यू ह्या तीन स्थिती त्यात अध्याहृत आहेत. ही तीन स्थितींची खोळ भंगून गेली आहे.
एकतर, हे मृत्यूच्या क्षणाचे वर्णन आहे किंवा मग मुक्तीच्या क्षणाचे. मृत्यूच्या क्षणी पूर्वायुष्यातील दृश्ये दिसतात. श्वास संपतो आणि जीवन, धारणा आणि मृत्यू असे एक आवर्तन संपते. हा मुक्तीचा क्षण आहे, असे अशासाठी वाटते की मुक्तीमध्ये ॐकाराची आवर्तने कायमसाठी संपतात. स्मृती कितीही उमळून आल्या तरी त्यांना प्रतिसाद मिळत नाही.
१४५)
‘माळावर इथेच उजाड विहिरीआड
वार्धक्य पांघरून बसले वेडे झाड
एकदाच गेली सुगंधी वाट येथून
निष्पर्ण मनाला डोळे फुटले साठ।।’
माळावरच्या उजाड विहिरीच्या जवळ एक जुनाट झाड उभे आहे. एक सुगंधी वाट एकदा तिथून निघून गेली. आणि त्याच्या निष्पर्ण मनाला अनेक डोळे फुटले. सुगंधी वाट तिथून गेली म्हणजे काय झाले? त्या माळावरच्या वाटेवरून मृगाची एक सर बरसत गेली काय? त्या वाटेच्या मातीवरून मृद्गंध उसळला काय? त्या पावसाने आणि त्या मृद्गंधाने दिलेले सृजनाचे आमंत्रण त्या झाडाने स्वीकारले काय? त्या पावसाने त्या झाडावर अनेक डोळे फुटले असणार. त्यातून हिरवीगार पर्णे उमलून आली असणार!
..................................................................................................................................................................
लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.
sjshriniwasjoshi@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment