निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
श्रीनिवास जोशी
  • रॉय किणीकर आणि त्यांच्या ‘उत्तररात्र’ या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ
  • Fri , 12 April 2024
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो रॉय किणीकर Roy Kinikar उत्तररात्र Uttarratra रुबाया Rubaiya उमर खय्याम Omar Khayyam

१०१)

‘गर्भात उषेच्या फिरे तान्हुले स्वप्न

अन् कळवळले आकाशाचे अंत:करण

मखरातुन काळोखाच्या कुंती उठली

न्हाणुली कुमारी लेकुरवाळी झाली।

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत.

निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.

‘गर्भात उषेच्या फिरे तान्हुले स्वप्न

अन् कळवळले आकाशाचे अंत:करण

ह्या निर्मितीच्या स्वप्नामुळे शुद्ध चैतन्य कळवळून जाते. निर्मितीतून जन्मणारे दुःख त्याला कळते आहे. सुखाच्या इच्छेतून निर्मिती होते, त्यातून तात्कालिक सुख तयार होते, पण सगळ्या निर्मितीचा अंत दुःखातच होतो. ह्या निर्मितीमधून होणाऱ्या दुःखनिर्मितीचे उदाहरण किणीकर देतात-

‘मखरातुन काळोखाच्या कुंती उठली

न्हाणुली कुमारी लेकुरवाळी झाली।

मायेने स्त्रीमध्ये मातृत्वाची आस रचलेली असते. हे काळोखाचे मखर. सूर्याच्या आशेने तिने मंत्र म्हटला आणि झाले काय? पराक्रमाची निर्मिती झाली, पण त्याबरोबर तिच्या आणि कर्णाच्या आयुष्यात किती दुःख तयार झाले! निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे.

‘गीते’च्या आठव्या अध्यायात श्री कृष्ण हे दोन मार्ग सांगतात आणि ते माणसाला कुठे नेतात, ते सांगतात-

‘शुक्लकृष्णे गती ह्येते जगत: शाश्वते मते।

एकया यात्यनावृत्तिमन्ययावर्तते पुन: ।।८-२६।।

हे आहेत दोन मार्ग, एक प्रकाशाचा आणि दुसरा अंधाराचा (एकाला देवांचा मार्ग म्हणतात, आणि एकाला पूर्वजांचा मार्ग म्हणतात.). प्रकाशाच्या मार्गाने गेलेले परत पृथ्वीवर (जन्माला) येत नाहीत. अंधाराच्या मार्गाने गेलेले पुन्हा (जन्म घेऊन) (निर्मितीसाठी) पृथ्वीवर येतात. भारतीय अध्यात्मविचारातील सर्व कानेकोपरे किणीकरांनी धुंडाळले होते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

१०२)

‘देणार काय मी सूर्य उद्या जर आला

मागेल मला दे पाणी आंघोळीला

कोरड्या किनारी फिरे कल्पना वेडी

मृगजळात रूतली तिची बिचारी होडी।

तारुण्यात चर्चा करण्याची फार हौस असते. उन्माद असतो म्हणा ना! चर्चेतून, विचार करण्यातून, विविध कल्पनांच्या आहारी जाण्यातून हाती काही लागत नाही, हे हळूहळू लक्षात येते. उद्या सूर्य उगवून आंघोळीला पाणी मागणार आहे, ह्या कल्पनेइतक्याच सर्व कल्पना आणि सर्व चर्चा हास्यास्पद असतात. त्यातून मानवी जीवनाचा अर्थ वगैरे काही हाती लागत नाही. उमर खय्यामसुद्धा हाच विचार मांडताना दिसतो-

‘Myself when young did eagerly frequent

Doctor and Saint, and heard great argument

About it and about: but evermore

Came out by the same door where in I went.’

(होतो तरुण जेव्हा जात असे मी चर्चा करायला,

पंडितांचे, विद्वानांचे विविध विचारही ऐकायला,

लवकरच कळले मला, आत जातो ज्या दाराने मी

बाहेरही त्याच दाराने, चर्चेत मला यावे लागत आहे.)

अशा ह्या चर्चांचे आणि मानवी विचारांचे वांझोटेपण किणीकरांनीसुद्धा शेवटच्या दोन ओळीत अत्यंत सुरेख शब्दात मांडले आहे -

‘कोरड्या किनारी फिरे कल्पना वेडी

मृगजळात रूतली तिची बिचारी होडी।

१०३)

‘हे शून्य भयंकर घनता न दिसे त्याची

शून्याला एकच भीति असते अस्तित्वाची

प्रलयंकर शून्ये फिरती विश्वाभवती

अन् आकर्षुनी गिळती विश्वातिल वसती।।

ही रुबाई ‘ब्लॅक होल’च्या संदर्भात आहे. अल्बर्ट आईस्टाइनने १९१६ साली ‘ब्लॅक होल’ची संकल्पना मांडली. ‘ब्लॅक होल’ला ‘ब्लॅक होल’ हे नाव जॉन व्हीलर ह्या खगोलशास्त्रज्ञाने १९६७ साली दिले. ह्या शून्याची घनता दिसत नाही, असे किणीकर म्हणतात. ह्याला कारण असे की, ‘ब्लॅक होल’मध्ये एवढे गुरुत्वाकर्षण असते की, त्यातून प्रकाशदेखील बाहेर पडू शकत नाही.

पृथ्वी जर ‘ब्लॅक होल’मध्ये खेचली गेली, तर ‘ब्लॅक होल’च्या प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे तिचा आकार अंगठ्याच्या नखाएवढा होईल. प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे ‘ब्लॅक होल’मध्ये सगळ्या गोष्टी अस्तित्वे खेचली जातात. त्यामुळे किणीकर म्हणतात की -

‘शून्याला एकच भीति असते अस्तित्वाची’

अशी अनेक ‘ब्लॅक होल्स’ विश्वामध्ये असंख्य आहेत. ती आजूबाजूचे छोटे-मोठे तारे, त्यांचे ग्रह, आजूबाजूचे वायूंचे मेघ आणि प्रकाश अशा सर्वांना आपल्यामध्ये खेचत असतात. एक प्रकारचा महाप्रलयच हा! म्हणून किणीकर लिहितात -

‘प्रलयंकर शून्ये फिरती विश्वाभवती

अन् आकर्षुनी गिळती विश्वातिल वसती।।

१०४)

‘गडगडून आले माथ्यावर आभाळ

थयथयती मंजुळ पायांतिल लय चाळ

लचकला स्वरांचा तुरा निळ्या डोळ्यात

इंगळी डसे इरकली मोरपंखात।।

किणीकरांनी रेखाटलेले हे अप्रतिम शब्दचित्र आणि त्यातच आकाराला आले आहे एक भावचित्र. आभाळ भरून आल्यावर मोर नाचू लागला आहे. त्याच्या पायात जन्मतःच लयीचे मंजूळ चाळ बांधलेले असतात. ते लयीचे चाळ थरथरू लागले आहेत.

डोळ्यात आनंद दाटून आला आहे आणि त्या आनंदाची अभिव्यक्ती केकावलीमध्ये झाली आहे. पहिल्यांदा हा केकावलीचा तुरा मोराच्या डोळ्यात लचकला आणि मग केकावलीचे स्वर त्याच्या कंठातून बाहेर पडले. हे सारे अर्थातच मीलनासाठी सुरू आहे. त्याला वासनेची इंगळी डसलेली आहे. ती सुंदर वासना आपला मोरपंखी पिसारा फुलवून तो व्यक्त करतो आहे-

‘इंगळी डसे इरकली मोरपंखात।।’

१०५)

‘हा ग्रंथ फाटला उरले मधले पान

ते अपूर्ण होते की, उरले विस्मरण 

ती दोनच पाने : पहिले अन् शेवटचे

राहिले शेवटी तसेच वाचायाचे ।।

आपण एवढी वर्षे जगतो. आपल्या गतआयुष्याचा विचार करताना आपल्या हातात काय उरते. काही आठवणी, काही स्मरणे? का बहुतांश गोष्टी विस्मरणात जातात. जास्त काय उरते? स्मरण की विस्मरण? उत्तर आठवणाऱ्या गोष्टी जास्त की, विस्मरणात गेलेल्या गोष्टी जास्त ह्या विषयी विचार करून मिळेल. विस्मरण मागे उरते. हा किणीकरांनी मांडलेला भेदक विचार आहे. आपल्याला हादरवून टाकणारा! जीवनाचे पुस्तक कालाच्या ओघात टराटरा फाटून जाते. अपूर्णत्व हाताला लागते.

‘हा ग्रंथ फाटला उरले मधले पान

ते अपूर्ण होते की, उरले विस्मरण’

मधले पान जे मागे उरले त्याला काय नाव द्यायचे? अपूर्णत्व की विस्मरण? आपल्याला जीवनात सर्वांत जास्त काय डाचत राहिलेले असते? अपूर्णत्व की, आपण विस्मरणात जाणार ह्याचे दुःख? मागे अपूर्णत्व राहत नाही. फक्त विस्मरण उरते!

जीवनाचे पहिले पान जन्माचे, शेवटचे मृत्यूचे. ही दोन पाने कुणालाच कधीच वाचता आलेली नाहीत. पहिले आणि शेवटचे पान वाचता येत नाही आणि मागे जे मधले पान उरते ते विस्मरणाचे! असले कसले हे पुस्तक? कधी कधी वाटते की, ही साधी रुबाई आहे की, आध्यात्मिक? कारण अध्यात्मात विस्मरण म्हणजे मुक्ती. ते फक्त विस्मरण उरते, हा विचार ‘अष्टावक्र गीते’मध्ये फार प्रभावीपणे मांडला गेला आहे.

पण येथे विस्मरणात जाणे म्हणजे मुक्ती प्राप्त करून घेणे. तुम्हाला ब्रह्मरूप व्हायचे असले, तर तुम्हाला ‘स्व’ विसरायला लागतो. तुम्हाला स्वतःला, तुमच्या गुरूला, तुम्हाला त्याने दिलेल्या शिकवणीला, सगळ्या सगळ्याला विसरून जावे लागते.

‘हरो यद्युपदेष्टा ते हरिः कमलजोऽपि वा । तथापि न तव स्वाथ्यं सर्वविस्मरणादृते । (१६-११)’

अगदी शिव किंवा विष्णू किंवा स्वतः ब्रह्मा जरी तुमचा गुरू असला, तरीसुद्धा त्यांना विसरल्याशिवाय तुम्हाला शांती मिळणार नाही. किणीकरांनी ‘अष्टावक्र गीते’तील विचारसुद्धा पचवले होते तर! ह्या रुबाईमधील विस्मरण साध्या अर्थाने घ्यायचे की, आध्यात्मिक हा वाचकांचा निर्णय आहे.

१०६)

‘ठेव ते जुने अन् जीर्ण शब्द बाजूला

घे शपथ पुन्हा हा लाव खडा कानाला

उखळात घालुनी हात, भुगा तो काढ

का चघळत फिरशी मेलेले ते हाड।।

माणूस आयुष्यभर शब्दात सत्य आणि शहाणपण शोधतो. काय हाती लागते? म्हणून किणीकर म्हणतात-

‘ठेव ते जुने अन् जीर्ण शब्द बाजूला

घे शपथ पुन्हा हा लाव खडा कानाला

शब्दांचा काथ्याकूट करून काही मिळत नाही.

‘उखळात घालुनी हात, भुगा तो काढ’

कुत्रा जसे हाड चघळत राहतो, तसे आपण शब्द चघळत राहतो.

‘का चघळत फिरशी मेलेले ते हाड।।’

विचार आणि शब्द ह्याविषयीची उद्विग्नता हा तत्त्वज्ञांचा फार आवडता विषय आहे. उमर खय्याम हा स्वतःला त्रास करून घेणारा माणूस नाही. शब्द आणि विचार वांझोटे आहेत, हे जाणवल्यावर तो दुसरी सोयरीक करतो-

‘You know, my Friends, with what a brave Carouse

I made a Second Marriage in my house;

Divorced old barren Reason from my Bed,

And took the Daughter of the Vine to Spouse.’

(मित्रांनो गाजवले अखेर मी शौर्य, आणि घातला धिंगाणा,

केले मी दुसरे लग्न, पहिली बायको घरात असताना,

हाकलले मी वांझोट्या विचारांना, माझ्या शय्येवरून

आणि त्यांच्या जागी आणले मदिरेला, माझी बायको म्हणून.)

१०७)

‘मी व्यास वाल्मिकी ज्ञानाई मी लिहिली

पाण्यात परंतु ओवी वाहुनि गेली

जरी काच तडकली वात जळे आतील

मी जाईन जेथे चंद्र - सूर्य येतील ।।

माणसातील ज्ञानाचे प्रेम, शुद्ध ज्ञानाचे प्रेम अमर आहे. ज्ञान हे चैतन्याचेच एक रूप आहे. व्यास आणि वाल्मिकी म्हणजे तरी काय? ज्ञानाच्या मूर्तीच त्या. ज्ञान आणि चैतन्य अमर आहेत. पण ह्या जगात जेव्हा ज्ञान व्यक्त होते, तेव्हा ते कालच्या ओघात वाहून जाते. ते परत परत अभिव्यक्त व्हावे लागते.

ज्ञान अमर असले, तरी ते धारण करणारी ओवी वाहून जाते. पण दिव्याची काच तडकली तरी आत ज्योत जळत राहते. जिथे जिथे चैतन्य जाते, तिथे तिथे चंद्र आणि सूर्य त्याच्या मागे मागे येतात! चैतन्य, ज्ञान आणि प्रकाश सगळे एकच आहे. हे एकत्व ‘गीते’च्या दहाव्या अध्यायात सुंदर पद्धतीने मांडले गेले आहे.

‘तेषामेवानुकम्पार्थमहमज्ञानजं तम: ।

नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता ।।१०-११।।

(योग्यांवर) करुणा करून मी स्वतःला त्यांच्यामध्ये प्रस्थापित करतो. मी ज्ञानाचा झगझगता दीप उचलून धरतो आणि त्यांच्या मनातील अज्ञानाचा संपूर्ण नाश करतो.

.................................................................................................................................................................

या लेखमालिकेतले आधीचे लेख

रॉय किणीकर रुबाईची परंपरागत ताकद आणि भारतीय आध्यात्मिक जीवनदृष्टी ह्यांच्या मिलाफातून एक वेगळेच जादूभरले रसायन तयार करतात…

रॉय किणीकर आध्यात्मिक होते की नाही, मानवी बुद्धीच्या पलीकडे ते गेले होते की नाही, हे कळायला मार्ग नाही, पण त्यांना अध्यात्म बुद्धीच्या पातळीवर तरी चांगलेच उमगले होते, ह्यात शंका नाही!

रॉय किणीकर ‘आधुनिक काळा’तील बंडखोर प्रवृत्तीचे कवी होते. म्हणून त्यांनी शारिरिक प्रेमाच्या रुबाया लिहिल्या...

रॉय किणीकर मोठे ठरतात ते त्यांच्या जीवनदृष्टीमुळे. त्यांच्या जाणीवेला एकाच वेळी मानवी जीवनातले आदर्श आणि पाशवीपणासुद्धा दिसतो!

किणीकरांच्या कवितेतील आशयघनता पचवायची असेल, तर खूप विचार करायला लागतो. ह्या अर्थाने ते मर्ढेकरांच्या खूप जवळचे आहेत

.................................................................................................................................................................

१०८)

‘मी शब्द परंतू मूर्तिमंत तू मौन

मी पंख परंतू क्षितिजशून्य तू गगन

काजळेरेघेवर लिहिले गेले काही

(अन्) मौनाची फुटली अधरावरती लाही।।’

अप्रतिम रुबाई! व्यक्त आणि अव्यक्तातील नाते किणीकरांना आयुष्यभर भूल पाडत राहिले. ते विविध प्रकारे त्यावर लिहीत राहिले. मी व्यक्त आहे, मी शब्द आहे, हे जगद्नियंत्या तू अव्यक्त आहेस, मौनरूप आहेस. मी क्षितिजे कवेत घेण्याचा प्रयत्न करणारा पंख आहे, तू क्षितिज नसलेले गगन आहेस. मी पंखांनी तुला कसे कवेत घेणार?

माझ्यात तुझाही अंश आहे. मी तुझाच अंश असेल, तर केवळ मी व्यक्त अवस्थेत आहे, म्हणून माझी ही अपूर्ण अवस्था आहे का? मी व्यक्त आहे म्हणून अपूर्ण आहे का?

‘काजळेरेघेवर लिहिले गेले काही

(अन्) मौनाची फुटली अधरावरती लाही।।’

माझ्या काजळावर तू काही लिहून ठेवले आहेस. व्यक्त होण्याची इच्छासुद्धा तुझ्यातूनच निर्माण झालेली आहे. त्यामुळेच तुझ्या मौनाची लाही माझ्या ओठावर फुटली आणि अव्यक्ताची इच्छा शब्द म्हणून बाहेर आली आहे. विचार करणारे सर्वच निर्मात्यावर म्हणा किंवा निर्मितीवर म्हणा निरतिशय प्रेम करत असतात. ‘गीते’तील दहाव्या अध्यायात म्हटलेलेच आहे -

‘अहं सर्वस्य प्रभवो मत्त: सर्वं प्रवर्तते ।

इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विता: ।।१०-८।।

मी सर्वांचा जन्म आहे आणि माझ्यातून सगळ्या कर्मांची आणि सगळ्या गतीची सुरुवात होते. हे जाणून सर्व प्रज्ञावंत माझ्यावर निरतिशय प्रेम करत राहतात.

.................................................................................................................................................................

या लेखमालिकेतले आधीचे लेख

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

रॉय किणीकरांना कवी म्हणून जी प्रतिष्ठा मिळायला पाहिजे होती, ती त्यांच्या आयुष्यात आणि नंतरही मिळाली नाही…

या दुनियेत प्रेषित म्हणून आलेले, बुद्ध म्हणून आलेले, अवतार म्हणून आलेले सगळे मृत्यू पावलेले आहेत. प्रेषित असो, बुद्ध असो, अवतार असो, देव असो, कुणालाही मरण चुकत नाही

शब्दांना मानवी मनातील विचार पूर्णत्वाने सापडत नाहीत. मनाच्या पलीकडचे काय सापडावे?

ह्या दुनियेची रीतच उफराटी आहे. खरं तर देव माणसातच लपलेला आहे, असे अध्यात्म ओरडून ओरडून सांगते आहे. तरीही माणूस दगडाच्या मूर्तीत ‘देव’ शोधायला जातो

.................................................................................................................................................................

१०९)

‘ही वाट वेगळी तुझी, नसे रे त्यांची

ही दुनिया आहे केवळ हसणाऱ्यांची

दाखवू नको रे डोळे ते भिजलेले

जा तुडवित काटे, रक्ताने जरी भरलेले।।’

दुःखाचे सगळ्यात वाईट काय असेल, तर दुःख एकट्याने भोगावे लागते.कारण, लोक तुम्हाला हसतात.

त्यामुळे लोकांसमोर रडणेही अशक्य होते. उमर खय्यामला सगळ्याच मानवांप्रमाणे दुःखाला सामोरे जावे लागले. तो आपल्या रुबाइत लिहितो - 

‘Khayyam, who stitched the tents of science,

Has fallen in grief's furnace and been suddenly burned;

The shears of Fate have cut the tent ropes of his life,

And the broker of Hope has sold him for nothing!’

(खय्याम, ज्याने उभारले शामियाने शास्त्राचे आणि गणिताचे -

कोसळला तो दुःखाच्या आगीत आणि जळाले सर्वस्व त्याचे;

नियतीच्या कात्र्यांनी कापले दोर जीवनाच्या तंबूचे त्याच्या,

आणि आशेच्या दलालाने विकून टाकले कवडीमोलाने त्याला)

विकून टाकले जाण्याच्या भावनेत असहाय्य एकटेपणा आहे. जीवनात आशाच जर राहिली नाही, तर मग काय राहिले? असहाय्य एकटेपण! किणीकरांना रक्तबंबाळ करणारे!

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

११०)

‘कानावर ठेवुनि हात, घालतो साद

घ्या पहा आणले तुमच्यासाठी शब्द

अन् सांगा उकलुनि देवाचे ते कोडे

देवळात गेला देव घालुनि माझे जोडे।।

देवाने मानवाला स्वतःच्या प्रतिमेत ढाळले की मानवाने देवाला स्वतःच्या प्रतिमेत ढाळले? कोण कोणा मध्ये लपलेला आहे? किणीकर मानवाला आव्हान देत आहेत - घ्या हे शब्द आणि त्यांचा उपयोग करून देवाचे कोडे उलगडून दाखवा. ते पुढचे आव्हान देत आहेत - मी माझे जोडे काढून देवळात जाण्याचा प्रश्न नाही, खरं तर देवच माझे जोडे घालून देवालयात गेला आहे. मी त्याच्या रूपात नसून तोच माझ्या रूपात आहे. हे माझे वाक्य खोटे करून दाखवा. उमर खय्यामने एक रुबाई ह्याच विचारावर लिहिली आहे-

‘Then of the THEE IN ME who works behind

The Veil, I lifted up my hands to find

 A lamp amid the Darkness; and I heard,

 As from Without—“THE ME WITHIN THEE BLIND!” ’

(त्यानंतर माझ्यामधल्या तुझ्याबद्दल - जो काम करतो पडद्यामागून,

मी उचलले माझे हात शोधण्यासाठी अंधारात दिवा

- आणि ऐकू आला एक आवाज मला माझ्या बाहेरुन -

तुझ्या आत मी नाही, माझ्या आतमध्ये तू आहेस वेड्या.)

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......