ज्येष्ठ पत्रकार-संपादक प्रवीण बर्दापूरकर यांचं ‘लेखणीच्या अग्रावर’ हे पुस्तक नुकतंच नांदेडच्या ‘आनंद मीडिया’तर्फे प्रकाशित झालं आहे. गेल्या साडेचार दशकांत पत्रकारिता करताना बर्दापूरकरांना आलेल्या अनुभवांचं हे आत्मपर प्रांजळ कथन आहे. या पुस्तकाच्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश...
.................................................................................................................................................................
१.
काही गोष्टी तुम्हाला दुहेरी अडचणीत टाकतात. उदा., इंग्रजीत ज्याला ‘बुक ऑन बुक्स’ म्हणतात, त्या प्रकारच्या पुस्तकांची काटेकोर समीक्षा करता येत नाही आणि त्यांचा चांगला परिचयही करून देता येत नाही. कारण ही पुस्तकं हा ‘समीक्षे’चा नाही, तर ‘आस्वादा’चा विषय असतो. पण ही पुस्तकं वाचताना एकीकडे ती जगावीही लागतात, आणि दुसरीकडे तुमचा त्यांच्याशी ‘समांतर’ प्रवास सुरू झालेला असतो. अशी पुस्तकं वाचून झाली, तरी ती खऱ्या अर्थानं संपत नाहीत. त्यामुळे त्यांच्यापासून जरा लांब जाऊन त्यांच्याकडे पुरेशा तटस्थपणे पाहता येत नाही.
प्रस्तुत प्रस्तावना लिहिताना माझी नेमकी तशीच अडचण झालीय. प्रस्तावना ही नेहमी आपल्यापेक्षा अधिकारानं, वयानं ज्येष्ठ व्यक्तीची घ्यायची असते, अशी निदान मराठीत तरी परंपरा आहे (नियमाला अपवाद म्हणून फार तर चार-दहा उदाहरणं सांगता येतीलही कदाचित). त्याचे काही फायदे असतात. त्या व्यक्तीच्या सर्वार्थानं ज्येष्ठत्वामुळे त्या प्रस्तावनेला ‘भारदस्त’पण येतं. शिवाय त्याने केलेली प्रशस्ती ही वाचकांसाठी ‘शिफारस’ असते आणि ‘पुरस्कार’ही. या पुस्तकाकडे कसं पाहावं किंवा या पुस्तकाची थोरवी नेमकी कशात आहे, हे त्या ज्येष्ठ व्यक्तीने सांगितल्यामुळे ते सांगणं ‘स्वीकारलं’ जातं. त्याचबरोबर यातून संबंधित लेखकाचा एकप्रकारे ‘गौरव’ही होतो. असे बहुविध फायदे वा उद्देश बाळगूनच ज्येष्ठांची प्रस्तावना घेतली जाते.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
पण इथं नेमका उलटा प्रकार आहे. एक म्हणजे ही या पुस्तकाची सुधारित आवृत्ती आहे. यापूर्वी ‘दिवस असे की…’ या नावानं या पुस्तकाच्या दोन आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत. म्हणजे ते वाचकप्रियही झालेलं आहे. त्यामुळे त्याची ‘लेखणीच्या अग्रावर’ ही सुधारित आवृत्ती वाचकांनी वाचावी, असं सांगण्याची गरज नाही. शिवाय या पुस्तकाचे लेखक सर्वपरिचित आहेत. त्यांची ‘डायरी’, ‘नोंदी डायरीनंतरच्या’, ‘क्लोज-अप’, अशी काही स्वतंत्र आणि ‘ग्रेस नावाचे गारुड’, ‘आई’, ‘माध्यमातील ती’, ‘कैवल्यज्ञानी’ (पत्रमहर्षी अनंतराव भालेराव स्मरणग्रंथ) अशी काही संपादित, अशी मिळून बारा-पंधरा पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत.
शिवाय त्यांची तब्बल चाळीसेक वर्षांची वर्तमानपत्रांतली कारकीर्द मराठी साहित्य-पत्रकारिता यांच्याशी संबंधित असलेल्यांना ज्ञात आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यापेक्षा २५-३० वर्षांनी लहान असलेल्या माझ्यासारख्या पत्रकारानं या पुस्तकाची ‘शिफारस’ करावी वा ‘पुरस्कार’ करावा, हा लहान तोंडी मोठा घास घेण्याचाच प्रकार म्हणावा लागेल. त्यामुळे या मजकुराकडे ‘प्रस्तावना’ म्हणून न पाहता, ‘अल्पपरिचय’ म्हणूनच पाहावा.
२.
प्रवीण बर्दापूरकर यांचा-माझा प्रत्यक्ष परिचय जेमतेम सहा-सात वर्षांचा. त्याआधी मी त्यांचा वाचक होतो, त्यांचे दै. ‘लोकसत्ता’मधले लेख, ‘डायरी’ व ‘नोंदी डायरीनंतरच्या’ ही सदरं, इतर नियतकालिकांतलं नैमित्तिक लेखन आणि ‘http://blog.praveenbardapurkar.com’ हा त्यांचा तुफान वाचकप्रिय ब्लॉगही वाचत असे. एका मराठी पत्रकार-संपादकानं स्वतंत्र वेबसाईट काढून नियमितपणे त्यावर लेखन करावं आणि ते मोठ्या प्रमाणावर वाचलं जावं, ही माझ्या दृष्टीनं काहीशी अदभुत आणि कौतुकाची बाब होती, आजही आहे. माझ्या माहितीप्रमाणे बर्दापूरकरांएवढा कुठल्याही मराठी पत्रकाराचा ब्लॉग एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाचला जात नसावा. त्यामुळे त्यांच्याशी कधीतरी बोलण्याची इच्छा होती. २०१६मध्ये मी ‘अक्षरनामा’ या मराठी फीचर्स पोर्टलचा संपादक झालो आणि पहिल्या दोनेक महिन्यांतच आमची प्रत्यक्ष ओळख झाली.
नोव्हेंबर २०१६पासून त्यांचा साप्ताहिक ब्लॉग ‘अक्षरनामा’वर ‘सिंडिकेट’ करायला सुरुवात केली. खरं तर हा ब्लॉग त्यांच्या वेबसाईटवर मोठ्या प्रमाणात वाचला जातोच, त्याशिवाय तो चार-पाच जिल्हा दैनिकांमध्येही ‘सिंडिकेट’ होतो. तरीही तो ‘अक्षरनामा’वरही मोठ्या प्रमाणावर वाचला जातो. यातून त्यांच्या लोकप्रियतेची साक्ष पटते. मान्यवर संपादक असूनही ते मजकूर पाठवल्यानंतर ‘आता आपलं काम संपलं, संपादकांनी त्यांचं पुढचं काम करावं’, असं म्हणून मोकळे होत नाहीत; तर मजकूर पुन्हा पुन्हा वाचून त्यातली एखाद-दुसरी मुद्रितशोधनाची वा तपशिलाची चूकही आवर्जून कळवतात. खरं तर बऱ्याचदा त्या चुका फार गंभीर नसतात, त्यामुळे त्या सहज लक्षात येण्यासारख्या असतात, पण तरीही ते कळवतात. त्यातून त्यांचा अचूकतेबाबतचा आग्रह अनुभवायला येतो आहे. ही त्यांची काटेकोर वृत्ती विलोभनीय वाटत आली आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे मी त्यांच्या लेखावर जे काही किरकोळ संपादकीय संस्कार करतो किंवा त्यासाठीचं छायाचित्र निवडतो, ते आवडलं की, ते आवर्जून फोन करून कळवतात. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकार-संपादकांकडून तरुण पत्रकारांना सहजपणे अशी दाद मिळणं, तीही सातत्यानं, हे हल्लीच्या काळात अदभुत आणि दुर्मीळ झालेलं आहे. याही बाबतीत त्यांचं वेगळेपण उठून दिसणारं आहे.
तिसरी गोष्ट म्हणजे, माझं किंवा ‘अक्षरनामा’वरील लेखन वाचून ते त्यांची पसंती-नापसंतीही कळवतात. पण तेव्हाही त्यांचे शब्द समंजसपणा, शालीनता आणि उदारपणा यांची सीमारेषा कधीच ओलांडत नाहीत. ज्येष्ठतेचा, वयाचा, अनुभवाचा आणि ज्ञानाचा दर्प त्यांच्या बोलण्यात तर कधीच नसतो. बरोबरीच्या मित्राशी बोलावं इतक्या सहजपणे समोरच्याशी संवाद साधण्यात त्यांची हातोटी आहे.
त्यांच्या या सगळ्या वैशिष्ट्यांची प्रचिती या पुस्तकातही येतेच. पहिली गोष्ट म्हणजे रूढार्थानं हे आत्मकथन नाही, कार्यकथन आहे. ज्येष्ठ संपादक दत्ता सराफ यांच्या शब्दांत सांगायचं तर ही ‘व्यावसायिक आत्मकथा’ आहे. त्यामुळे यात बर्दापूरकरांच्या पत्रकारितेचा चाळीसेक वर्षांचा वेचक-वेधक प्रवास वाचायला मिळतो.
अर्थात प्रवास व्यावसायिक कारकिर्दीचा असो की रस्त्यावरचा... त्यात हिरवीगार झाडी, नदी-नाले, खाचखळगे, चढाव-उतार, सपाट प्रदेश, खडकाळ-डोंगराळ भूभाग, हिरवळीचे पट्टे, वाऱ्यावर डोलणारी हिरवीगार शेतं, मध्येमध्ये डोंगर-दऱ्या, असे अनेक प्रतल अनुभवायला येतात.
रस्ता निवडणं आपल्या हातात असतं, पण एकदा त्याची निवड केल्यावर आपल्याला त्यात काही बदल करता येत नाहीत. वाहनं बदलता येतात, रस्ता बदलवता येत नाही. पण हेही तितकंसं खरं नाही. हमरस्ता सोडून पायवाटांनी जाता येतंच. मात्र हा प्रवास सरळ असतोच असं नाही. त्यात नागमोडी वळणं, खाचखळगे, खड्डे, चढउतार, अशा गोष्टी लागतात. तरीही तो रम्य असतो. कारण या पायवाटा दर थोड्या अंतरानं दुसऱ्या कुठल्या तरी पायवाटेला जाऊन मिळतात आणि त्यासरशी आपल्या प्रवासाला एक नवीन वळण मिळतं.
शिवाय या पायवाटांचे अनेक प्रकार असतात. काही लहानखुऱ्या असतात, काही चपळ असतात, काही नखरेदार-नाजूक, काही दुतर्फा झाडा-झुडपांनी वेढलेल्या, काही डोंगरचढणीच्या, काही उतारावरून सुसाट खाली जात मध्येच गडप होणाऱ्या, काही नागमोडी पण चपळ चालीच्या, काही उजाड माळरानावरून जड पावलांनिशी जाणाऱ्या असतात. काही पायवाटांचे पुढे पुढे हमरस्ते होतात, तर काही हमरस्त्यांच्या पायवाटा होतात.
बर्दापूरकरांनी पायवाटाही बऱ्याच चोखाळल्या आहेत आणि हमरस्त्यारूनही पुष्कळच प्रवास केला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे अनुभवांचं वैविध्य आहे, श्रीमंती आहे, तशीच सुख-दु:खंही आहेत, पण त्यांच्या शब्दांत उद्वेग-द्वेष-तिरस्कार मात्र सहसा दिसत नाही.
३.
बर्दापूरकर मूळचे मराठवाड्याचे, पण त्यांची पत्रकारितेतली उमेदवारी सुरू झाली सातारच्या ‘ऐक्य’ या दैनिकातून... तीही सत्तरचं दशक संपत असताना. पण तिथं ते फारसे रमले नाहीत. त्यात कोकणातल्या, चिपळूणच्या दै. ‘सागर’मधून त्यांना ऑफर आली आणि ते त्यात रुजू झाले.
कोकणातल्या हिरव्यागार निसर्गाप्रमाणे ‘सागर’मधले त्यांचे सुरुवातीचे दिवसही कोवळे, लुसलुशीत आणि तजेलदार होते. दैनिक छोटंसं असलं तरी संपादक आणि सहकारी ध्येयवादी, ध्येयवेडे होते. या चिपळूणच्या दिवसांतून तत्कालीन ‘प्रादेशिक पत्रकारिता’ किती सरस, संपन्न आणि समृद्ध होती, हे दिसतं.
त्यानंतर ते ‘नागपूर पत्रिके’त गेले. हेही तसं प्रादेशिकच दैनिक. त्यामुळे तिथले त्यांचे दिवसही तितके सरस ठरले. चिपळूणपेक्षा नागपूर सांस्कृतिकदृष्ट्या अधिक संपन्न असल्याने बर्दापूरकरांच्या पत्रकारितेला या काळात अक्षरक्ष: बहर आला. या दैनिकाची वैशिष्ट्यंही त्यांनी सांगितली आहेत. हे दैनिक कुठल्याही एका विचाराचा पुरस्कार करणारं नव्हतं, पण त्यात हिंदुत्ववादी विचारांच्या सहकाऱ्यांची संख्या सर्वाधिक होती. तरीही हिंदुत्ववादी नसलेल्या बर्दापूरकरांना निर्धोकपणे पत्रकारिता करता आली. इथंच त्यांना त्यांची जीवनसाथी – बेगमही भेटली. त्यामुळे हा भाग हृद्य झाला आहे.
‘नागपूर पत्रिके’मध्ये असतानाच बर्दापूरकर ‘मुंबई सकाळ’चे तत्कालीन संपादक माधव गडकरी यांच्यामुळे ‘सकाळ’चे नागपुरातले वार्ताहर म्हणून काम करू लागले. पुढे ते मुंबईच्या ‘लोकसत्ता’मध्ये गेले, तेव्हा त्यांनी त्याचे काम करायला सांगितले. गडकरींसारख्या चौफेर आणि चौकस संपादकांसोबत काम करण्याचा अनुभव समृद्ध ठरला.
इथपासून बर्दापूरकरांचा ‘लोकसत्ता’मधील प्रदीर्घ काळ सुरू होतो. दरम्यान ‘लोकसत्ता’ची विदर्भ आवृत्ती सुरू झाली, गडकरी जाऊन टिकेकर संपादक झाले. बर्दापूरकरही मुख्य वार्ताहर झाले. तिथून ‘लोकसत्ता’चे मुंबई कार्यालय आणि तिथून औरंगाबादला ‘लोकसत्ता’चे ब्युरो चीफ असा प्रवास करून २००३मध्ये ‘नागपूर लोकसत्ता’चे संपादक झाले.
तेव्हा लोकसत्ताच्या संपादकपदावरून टिकेकर निवृत्त होऊन कुमार केतकर संपादक झाले होते. दरम्यानच्या काळात ‘नागपूर लोकसत्ता’ची विस्कटलेली घडी बर्दापूरकरांनी पुन्हा सावरली. जवळपास दशकभराच्या काळातील हे लोकसत्तामधले संपादकपदाचे दिवस हा बर्दापूरकरांच्या कारकिर्दीचा सर्वांत बहराचा आणि रोमहर्षक म्हणावा असा काळ.
या प्रवासात माधव गडकरी, अरुण टिकेकर, सुरेश द्वादशीवार आणि कुमार केतकर, या चार संपादकांची छोटेखानी व्यक्तिचित्रं त्यांनी रेखाटली आहेत. त्याचबरोबर आपल्या काही सहकाऱ्यांची, मित्रांचीही. शिवाय तत्कालीन राजकारण-समाजकारण-साहित्य-कला-संस्कृती या क्षेत्रांतील विविध रोचक अनुभवही सांगितले आहेत.
त्यानंतर बर्दापूरकरांनी दिल्लीत ‘लोकमत्त’चे राजकीय संपादक म्हणून काम केलं, पण अल्पावधीतच तिथून ते बाहेर पडले. ‘लोकमत’मध्ये असतानाच त्यांनी ब्लॉग लिहायला सुरुवात केली होती. नंतर त्यांनी तो नियमित स्वरूपात लिहायला सुरुवात केली. थोड्याच दिवसांत हा ब्लॉग लोकप्रिय झाला. काही दैनिकांनी तो ‘सिंडिकेट’ करायला सुरुवात केली आणि बर्दापूरकर मराठीतले एक यशस्वी ब्लॉग-पत्रकार झाले. म्हणजे बर्दापूरकर व्यावसायिक पत्रकारितेतून निवृत्त झाले असले, तरी लिहिता पत्रकार म्हणून आजही कार्यरत आहेत.
४.
बर्दापूरकरांचं हे पुस्तक प्रामुख्यानं कार्यकथन\व्यावसायिक आत्मकथा असलं, तरी ती १९८० ते २०१४ या काळातल्या मराठी पत्रकारितेची ‘फर्स्ट पर्सन डॉक्युमेंटरी’ही आहे. बर्दापूरकर पत्रकारितेत आले, तेव्हा एकीकडे स्वातंत्र्योत्तर काळातली ध्येयवादी पत्रकारिता नामशेष होत चालली होती, तर दुसरीकडे पत्रकारिता ‘धर्म’ न राहता ‘व्यवसाय’ होऊ लागला होता. पण अजून तिचा धंदा झालेला नव्हता. त्यामुळे तिला समाजात प्रतिष्ठा होती. वर्तमानपत्रांचा तर निर्विवाद प्रभाव होता. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता आपली कामगिरी यथास्थितपणे पार पाडत होती. संपादकांच्या नावानेच वर्तमानपत्रं ओळखली जात होती. खरं तर छोट्या ध्येयवादी वर्तमानपत्रांची जागा तोवर मोठ्या समूहांच्या व्यावसायिक वर्तमानपत्रांनी घेतली होती. तरीही संपादकांचं स्वातंत्र्य बऱ्यापैकी अबाधित होतं. त्यामुळेच दै. ‘लोकसत्ता’चे तत्कालीन संपादक अरुण टिकेकर जाहीरपणे म्हणत की, भांडवलदारांच्या वर्तमानपत्रांनी लोकशाही टिकवण्यात मोलाची भूमिका बजावलेली आहे.
ते खरंही होतं. कारण जाहिरात विभाग संपादकीय विभागापेक्षा वरचढ झालेला नव्हता. जाहिरातदार बेलगामपणे संपादकांच्या केबिनमध्ये घुसून त्यांना ‘सूचना’ करू शकत नव्हते. राजकारणी किंवा उद्योजक संपादकांना ‘आदेश’ देत नव्हते. त्यामुळे वर्तमानपत्रं ‘प्रॉडक्ट’ झालेली नव्हती.
पण या सगळ्याचे बारीक, अस्फूट ध्वनी वर्तमानपत्रांच्या इमारतींमध्ये घुमू लागले होते, हेही तितकंच खरं. पाहता पाहता ऐंशीचं दशक संपून नव्वदचं सुरू झालं. ‘जागतिकीकरण’ नावाचं ‘सर्वग्रासी युग’ सुरू झालं. त्याच्या फेऱ्यात इतर अनेक क्षेत्रांप्रमाणे पत्रकारिताही अडकली. आणि २०१० सालापासून तर तिचा पूर्णपणे ‘धंदा’ झाला, वर्तमानपत्रं केवळ ‘प्रॉडक्ट’ झाली आणि संपादकीय विभागापेक्षा जाहिरात विभागाला महत्त्व आलं. जागतिकीकरणाने ‘जागतिकीकरण-पूर्व’ आणि ‘जागतिकीकरण-उत्तर’ अशी सरळ सरळ सीमारेषा आखून मानवी जगण्याचे दोन भाग केले. त्याला पत्रकारिताही अपवाद राहिली नाही.
बर्दापूरकर या दोन्ही काळात पत्रकार म्हणून अनुभवाच्या, पदोन्नतीच्या वेगवेगळ्या पायऱ्या चढत राहिल्यामुळे त्यांच्या या पुस्तकात ‘जागतिकीकरण-पूर्व’ आणि ‘जागतिकीकरण-उत्तर’ या दोन्ही काळाचं प्रतिबिंब अगदी ठसठशीतपणे उतरलं आहे. त्यातून मराठी पत्रकारिता ‘कुठे होती, कुठे पोहचली’ याचा अगदी लखलखीत आलेख या पुस्तकात वाचायला मिळतो.
त्यामुळे हे पुस्तकही दोन प्रकारे वाचण्यासारखं आहे.
पहिला प्रकार : ‘प्लेन-रीडिंग’. म्हणजे सरळ पुस्तक वाचायला सुरुवात करावी आणि लेखकानं जसं सांगितलंय, तसं समजावून घेत जावं. या वाचनातून बर्दापूरकर नावाचा एक मराठी पत्रकार कसकसा घडत गेला, वार्ताहर ते संपादक असा त्याचा प्रवास कसा झाला, त्यात काय काय उलटसुलट घडलं, तरी या पत्रकारानं मूल्य, परंपरा आणि आदर्श यांचं बोट कसं सुटू दिलं नाही, याचं दर्शन घडतं.
दुसरा प्रकार : ‘बिटविन द लाईन्स रीडिंग’. खरं तर हे पुस्तक ‘बिटविन द लाईन्स’मधूनच वाचायचं पुस्तक आहे. बर्दापूरकरांचे अनुभव नावीन्यपूर्ण, वैविध्यपूर्ण आणि वाचनीय आहेतच, पण त्या अनुभवांतल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची अवनत अवस्था आणि तिची ऱ्हासपरंपरा नेमकी कुठून सुरू झाली, याची साद्यंत माहिती मिळते.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
कुठल्याही क्षेत्राची अवनत अवस्था किंवा ऱ्हास हा वर्षा-दोन वर्षांत होत नसतो, त्यासाठी बराच काळ जावा लागतो. या पुस्तकातून १९९० ते २०१० या जागतिकीकरणाच्या काळात मराठी पत्रकारितेचा कायापालट होता होता, तिचा कसा ‘ऱ्हास’ होत गेला, याचं लख्ख दर्शन होत जातं. एखाद्या मोठ्या, जुन्या चौसोपी वाड्याचे चिरे ढासळायला लागतात, तेव्हा नेमकं काय होत जातं, याचं अतिशय वेधक चित्र बर्दापूरकर यांनी या पुस्तकात रेखाटलंय.
ते वाचल्यावर आपल्या लक्षात येतं की, या ऱ्हासाला केवळ जागतिकीकरण, केवळ संपादक वा त्यांचे सहकारी, केवळ तंत्रज्ञान, केवळ मालक आणि केवळ व्यवस्थापन कारणीभूत नाही… एखादी संस्था लयाला जाते, तेव्हा संस्थात्मक पातळीवर ती सर्वच बाजूंनी कमकुवत झालेली असते. मराठी पत्रकारितेचंही नेमकं तेच झालं. ते कसं झालं, याच्या ‘बिटविन द लाईन्स’ या पुस्तकाच्या पानापानांवर वाचता येतात.
५.
बर्दापूरकर कधीच ‘हस्तीदंती मनोऱ्या’तले पत्रकार झाले नाहीत. त्यामुळे आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत, सर्वत्र त्यांचा संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे.
असो. अजून अकरा वर्षांनी मराठी पत्रकारितेची जन्मद्विशताब्दी साजरी होईल. तेव्हा मराठी पत्रकारिता कुठे असेल? छापील मराठी दैनिकं असतील, पण ती कुठल्या अवस्थेत असतील? माहीत नाही. पण ती जिथं कुठे असतील, तिथंवर ती कशी पोहचली, हे जाणून घेण्यासाठी बर्दापूरकरांचं हे पुस्तक आजच्या इतकंच तेव्हाही महत्त्वाचं ठरेल, हे नक्की.
‘लेखणीच्या अग्रावर’ - प्रवीण बर्दापूरकर
आनंद मीडिया, नांदेड | पाने – २७५ | मूल्य – ५०० रुपये
हे पुस्तक सवलतीच्या दरात, ४०० रुपयांत मिळवण्यासाठी संपर्क करा - ९०४९९ ४४६६६\९४२२१ ७१८८५
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment