रॉय किणीकर हे मराठी साहित्यातलं एक ‘अजब’ प्रकरण आहे. आणि त्याहून ‘गजब’ आहेत त्यांच्या कविता, त्यातही ‘रुबाया’. ‘उत्तररात्र’ हा त्यांच्या रुबायांचा संग्रह. वाचकप्रिय, समीक्षकप्रिय आणि लोकप्रिय ठरलेल्या या संग्रहातील रुबायांचं रसिलं रसग्रहण करणारी ही लेखमाला आजपासून द्वि-साप्ताहिक स्वरूपात - दर शुक्रवारी आणि सोमवारी...
.................................................................................................................................................................
२१)
‘आश्चर्य, कसे हे घडलें निमिषार्धात
जमिनीतुन पाउस पडला अस्मानात
बी पडले, आले अवकाशाचे रोप
वटवाघुळ झाला पिंपळ त्याचा बाप।।’
हे जग म्हणजे एक गूढ आश्चर्य आहे. त्याचा ठाव घेण्याचा प्रयत्न करणारे तत्त्वज्ञानसुद्धा गूढच असणार. ‘आश्चर्य, कसे हे घडलें निमिषार्धात
जमिनीतुन पाउस पडला अस्मानात’
ही ओळ फार गूढ वाटते.
‘जमिनीतून पाऊस पडला अस्मानात’
पाऊस हा निर्मितीचे कारण म्हणून घेतला तर गूढ थोडे उकलते. पाऊस हा निर्मितीचा ‘ट्रिगर’ आहे. येथे जमिनीतून अस्मानात पाऊस पडला आहे. हा पाऊस येथे पृथ्वीवरील सृजनाचे रूपक म्हणून घ्यायला हरकत नाही. ह्या ‘पावसा’ने अस्मानाला - चैतन्य तत्त्वाला - खाली जीवरूपात यायचे आमंत्रण दिले आहे.
‘बी पडले, आले अवकाशाचे रोप
वटवाघुळ झाला पिंपळ त्याचा बाप।।’
पृथ्वीवर बी पडले आणि अवकाशाला खाली यावे वाटले. ते अवकाश एखाद्या वृक्षाच्या रोपाच्या रूपात किंवा माणसाच्या रूपात अवतरले.
‘वटवाघुळ झाला पिंपळ त्याचा बाप’
ही ओळ वाचली की, गीतेच्या पंधराव्या अध्यायातील खालील ओळी आठवततात.
‘ऊर्ध्वमूलमधःशाखमश्वत्थं प्राहुरव्ययम्।। गीता १५.१।।’
ह्या विश्वाच्या पिंपळाच्या मुळ्या - वर, अस्मानात आहेत. म्हणजे हे जग त्या नियंत्याच्या इच्छेने अस्तित्वात आलेले आहे. परमेश्वर ह्या जगाच्या पिंपळाचे मूळ आहे. मूळ जसे झाडाला धरून ठेवते, तसे ईश्वराच्या आधाराने हे जग ‘उभे’ आहे. मूळ जसे झाडाचे पोषण करते, त्याप्रमाणे परमेश्वर ह्या जगाच्या झाडाचे पोषण करतो आहे.
पुढच्या श्लोकात गीता सांगते - त्रिगुणांमुळे ह्या वृक्षाची वाढ होते. इंद्रियांना जाणवणाऱ्या सर्व गोष्टी हा ह्या वृक्षाचा पर्णसांभार आहे. त्याच्या पुढच्या श्लोकात गीता सांगते की, एखादा योगी तटस्थ राहून हा वृक्ष, ही माया तोडू शकतो.
तर असा हा गीतेतील - वर मुळे आणि खाली पर्णसांभार असलेला ह्या जगाचा वृक्ष! पण, किणीकर येथे आपल्या लक्षात आणून देत आहेत की, एका वेगळ्या अर्थाने बघायला गेलं, तर ह्या जगात आईच्या गर्भात बीज रुजते. त्यातून माणूस जन्माला येतो. त्या माणसात त्या परमेश्वराचा अंश राहायला येतो. म्हणजे ते बीज एका अर्थाने परमेशाचा ‘बाप’ झाले.
आता किणीकर त्याही पुढे जाऊन म्हणत आहेत की, ह्या विस्तीर्ण अवकाशाचा खरा बाप हा वटवाघळासारखा उलटा लटकणारा पिंपळ आहे. अवकाश हा शब्द दोन अर्थांनी वापरला जातो. शुद्ध चैतन्याचा अवकाश म्हणजे परमेश्वर, आणि अवकाश म्हणजे मोकळी जागा. अवकाशाचे रोप आले म्हणजे विश्व व्यापून राहिलेली ‘स्पेस’ तयार झाली. अवकाशाचे रोप तयार झाले, ह्याचा दुसरा अर्थ - परमेशाला अंशरूपात उतरून यायला शरीर तयार झाले.
ही माया आणि त्यातून उगवून आलेले हे जग, ह्या सगळ्या अर्थाने त्या वरच्या चैतन्याचे बापच आहे. तो जसा ह्या जगाचा बाप आहे, तसेच ह्या मातीत रुजणारे बीज हेसुद्धा एका अर्थाने परमेश्वराचा बापच आहे.
त्या शुद्ध चैतन्यातून हा पिंपळ उगवतो हे खरे आहे, पण जेव्हा ते चैतन्य जीव-रूपात इथे राहायला येते, तेव्हा हा उलटा पिंपळच त्याचा बाप होऊन राहतो.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
२२)
‘हा मार्ग एकला, नाही सोबत याला
जो गेला येथुनि नाही परतुनि आला
हा मार्ग कठिण, पण आहे रे कनवाळू
जरि पायाखाली रुते जराशी वाळू ।।’
ही रुबाई खरं तर ह्या आधीच्या रुबाईशी आणि त्यातील ह्या जगाच्या उलट्या पिंपळ वृक्षाशी जोडलेली आहे. गीतेच्या पंधराव्या अध्यायातील दुसऱ्या श्लोकाच्या ओळी आहेत-
‘अधश्च मूलान्यनुसन्ततानि
कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके।।१५:२।।’
ह्या वृक्षाच्या फांद्या मुळांसारख्या ह्या जगात खोलवर वाढत राहतात. आणि लोकांना कर्मात अडकवतात.
कर्म कसे तयार होते. कशामुळे तयार होते? कर्म एखाद्या गोष्टीशी जिव्हाळा तयार झाल्यामुळे होते. एखाद्या गोष्टीशी जिव्हाळा तयार होतो, तेव्हा आपण ती गोष्ट आपल्याकडे कायम राहावी म्हणून कुणावर तरी अन्याय करतो, कुणाला तरी त्रास देतो. कर्म असे तयार होते. ह्या जगात आपण खरे तर एकटे असतो.
‘हा मार्ग एकला, नाही सोबत याला
जो गेला येथुनि नाही परतुनि आला’
एकदा आपण येथून गेलो की, आपल्या माणसात आणि आपल्याला आवडणाऱ्या गोष्टींकडे परत येऊ शकत नाही - हे आपल्याला कळत असते आणि म्हणूनच आपण जेव्हा विचार करतो, तेव्हा आपला एकटेपणा आपल्याला त्रास देत असतो. म्हणूनच हा मार्ग फार कठिण आहे.
‘हा मार्ग कठिण, पण आहे रे कनवाळू’
हा मार्ग कठीण असला, पायाखालची वाळू रुतत जरी असली तरी हा मार्ग थोडा कनवाळूही आहे.
‘जरि पायाखाली रुते जराशी वाळू ।’
कारण येथे जिव्हाळा तयार होतो. ह्या संसार-वृक्षाच्या फांद्या अनुबंध तयार करतात. त्यात जीव रमतो. ह्या अनुबंधातून कर्म तयार होते आहे, हे कळत असते, तरीही हे अनुबंध, हा जिव्हाळा आपल्याला आवडत असतो. कर्म तयार झाले तर झाले, असा प्रकट-अप्रकट विचार आपल्या मनात येतो.
एकटेपणा स्वीकारण्यापेक्षा कर्म स्वीकारलेले चांगले! वाळूत पाय रुतला की, वाळू थोडी टोचते, पण ते रुतणे आपल्याला आवडते. हा मार्ग कठीण आहे आणि कनवाळूसुद्धा आहे.
२३)
‘गंगेच्या काठी अखंड चाले यात्रा
वा! गंमत जंमत भरली आहे जत्रा
जा, खेळा मांडुनि घर घरटे घरकूल
सावली - उन्हाचा आहे रे हा खेळ॥’
ही रुबाई अगदी सरळ आहे. मानवजातीचा जो काही प्रवास चालला आहे, तो गंगेच्या काठी चाललेला आहे. गंगेचे भारतीय संस्कृतीतले स्थान तर सगळ्यांना माहीतच आहे. ते मोक्षाचे द्वार आहे. गंगा ही वाहती संकृती आहे. तो भारताचा वाहता इतिहास आहे. त्या सगळ्या प्रवाहाच्या साक्षीने मानवाची अखंड यात्रा सुरू आहे.
किणीकर ‘यात्रा’ आणि ‘जत्रा’ यांमधला फरक किती सहजपणे दाखवून देतात. ‘यात्रा’ हा गंभीर प्रकार आहे. त्याला ऐतिहासिक आणि आध्यात्मिक आब आहे. ‘जत्रा’ ही मजेची गोष्ट आहे. बाजार, खेळणी, रेवडी, पेढे, जिलेबी, गुडदाणी अशी खाऊची दुकाने, असा सगळा माहोल जत्रेत असतो. जत्रेला जाणारी फार कमी माणसे आध्यात्मिक कारणांसाठी जातात.
बहुतांश लोक संसारातल्या गंमती-जमतींमध्ये रमलेले असतात. त्यांना अध्यात्माच्या किंवा संकृतीच्या किंवा इतिहासाच्या प्रवाहाशी काही घेणे-देणे नसते. त्यांना किणीकर सांगत आहेत- मजा करा, आपापले घर, घरटे, घरकुल बांधून सगळा संसार भोगून घ्या.
गंगेच्या प्रवाहाचे भान नसल्याने काही फरक पडत नाही. हा फक्त ऊन-पावसाचा खेळ आहे, हा फक्त सुख-दुःखाचा खेळ आहे. बाकी काहीही असले, तरी सामान्य आयुष्य जगण्याच्या मध्ये काही येत नाही. यात्रा कळत नसेल तर जाऊ द्यात. जत्रा तरी सगळ्यांची आहे.
‘But come with old Khayyam, and leave the Lot
Of Kaikobad and Kaikhosru forgot:
Let Rustum lay about him as he will,
Or Hatim Tai cry Supper—heed them not.’
(या, आनंदी खय्यामबरोबर, मजा करा इकडे
राहू द्या कैकोबाद आणि कैखुस्रोला तिकडे
पडू द्या रुस्तमला पडून राहायचे आहे तिथे
देऊ द्या हातिम ताई ला अन्नछत्रे - लक्ष नका देऊ तिकडे।।)
कैकोबाद, कैखुस्रो, रुस्तम आणि हातिम ताई ह्या पर्शियन संस्कृतीमध्ये दंतकथा बनून राहिलेल्या व्यक्ती आहेत. कैकोबाद आणि कैखुस्रो हे कैकानीद राजघराण्यातले यशस्वी राजे. रुस्तम हा पर्शियाच्या दंतकथेतील भीम. धैर्य आणि ताकदीचे प्रतीक, आणि हातिम ताई हा औदार्याचे प्रतीक.
२४)
‘कुंडली मांडुनी सांगे भविष्य-वक्ता
दिसतील तुला बघ दिवस सुखाचे आता
हां, ठेव दक्षणा, दैव तुझे रे मोठे
बांधशील वाडा, गाइगुराचे गोठे।।’
अगदी साधी रुबाई. भविष्यकार दक्षिणेसाठी ऐकणाऱ्याला जे ऐकावेसे वाटते आहे, ते ऐकवतो आहे. रुबाईकार, कर्मकांडे आणि धर्म ह्यांच्या विरोधात असतात हे आपण पाहिले आहे. अध्यात्म वजा धर्म म्हणजे शुद्ध फसवणूक, अशी ह्या लोकांची धारणा असते.
२५)
‘कोसळला वाडा, ढासळले ते गोठे
गाडला खालती, पुन्हां न दिसला कोठे
बांधिले तिथे मुंग्यांनी वारुळ छान
मुंगी अन् माणुस - मोठे कोण लहान।।’
ही अजून एक साधी आणि सोपी रुबाई. एवढी आस लावून जे घर बांधले, त्याच्या समोर गाई-गुरांचे गोठे बांधले, ते सर्व आता पडले आहेत, ढासळले आहेत. आपल्या कर्तृत्वाने त्यांना बांधणारा माणूसही जमिनीखाली, आपल्या कबरीमध्ये गाडला गेला आहे.
आता त्या ढासळलेल्या वाड्याच्या जागेवर मुंग्यांनी त्यांचे वारुळ बांधलेले आहे. माणूस आणि मुंग्या, दोघांचीही प्रेरणा एकच. दोघांचेही घर बांधणे एकच! त्या घराचा आणि त्या माणूस-मुंग्यांचाही अंत एकच!
मग ह्यातला लहान कोण आणि मोठा कोण? मुंगीला लहान का म्हणायचे आणि माणसाला मुंगीपेक्षा मोठा का म्हणायचे?
२६)
‘हे कालचक्र बघ फिरते उलटे सुलटे
फिरतात त्यातले तिथीमितींचे काटे
सूर्यचंद्र लंबक हलती रात्रंदिवस
हा काळ भोगतो जन्माचा वनवास।।’
हे कालचक्र उलटसुलट फिरत आहे. ऋतुचक्रातील ऋतू एकामागून एक येत जात आहेत. ह्यातील सर्व ऋतू एकामागून एक ह्या पद्धतीने येत असल्याने पहिला कोण आणि शेवटचा कोण, हे कळत नाही.
ह्या कालचक्रातील तिथींचे काटे सतत फिरत आहेत. सूर्य आणि चंद्र हे ह्या कालचक्रातील, ह्या विश्वाच्या घडाळ्यातील लंबक आहेत. आकाश ही ह्या घड्याळाची ‘डायल’ मानली, तर ही लंबकांची प्रतिमा किती सुंदर आहे, हे आपल्या लक्षात येईल. त्यानंतर शेवटची ओळ येते -
‘हा काळ भोगतो जन्माचा वनवास’
ह्या ओळीत ह्या रुबाईचा आशय अजून गहिरा होतो. काल म्हणजे सृष्टीचा निर्माता, पालनकर्ता आणि संहारकर्ता. गीतेच्या पंधराव्या आध्यायात स्वतः श्रीकृष्णांनी सांगितलेले आहे -
‘प्रह्लादश्चास्मि दैत्यानां काल: कलयतामहम् |
मृगाणां च मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणाम् || १५:३०।।’
सर्व दैत्यांमध्ये मी प्रल्हाद आहे, मोजमापासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व गोष्टींमध्ये मी काल आहे. मृगया करणाऱ्या सर्वांमध्ये मी सिंह आहे आणि सर्व पक्षांमध्ये मी गरूड आहे.
असा हा काल, ह्या सर्व सृष्टीचा निर्माता, रक्षणकर्ता आणि संहारकर्ता. स्वतः श्रीकृष्ण. ह्या सृष्टीचे, ह्या विश्वाचे प्रेरणास्थान. हा निर्माता हा सगळा उद्योग करतो आहे, कारण तो एकटा आहे. त्याच्या स्वतःच्या एकटेपणातून हा सर्व पसारा जन्माला आला आहे. हा सगळा पसारा जन्माला आला तरी त्याचा एकटेपणा फिटलेला नाही. हा पसारा जन्मला तरी तो सर्वोच्च पदावरच आहे. त्यामुळे तो एकटाच आहे. ह्या अर्थाने तो वनवासात आहे.
२७)
‘हा देव असे करुणेचा सागर - सिंधू
हा आहे जीवन - अस्तित्वाचा बिंदू
शेवटी सुचावे का हे तत्त्वज्ञान
बघ, गळून पडले हिरवे पिंपळपान।।’
शेवट जवळ आला की, सगळे तत्त्वज्ञान सुचते. देव हा करुणेचा सागर आहे, असे वाटू लागते. देव हा सर्व अस्तित्वाचा केंद्रबिंदू आहे, असे वाटू लागते. कारण आता त्याला भेटायचे असते. आयुष्यात केलेले सगळ्या मर्यादांचे उल्लंघन आठवू लागते. आपले पुढे काय होणार असे वाटू लागते. काही शिक्षा होईल का, अशी भीती वाटू लागते. पुढचा जन्म असेल, तर तो चांगला जन्म मिळेल का, का दुःखपूर्ण जन्म मिळेल, असे विचार मनात येऊ लागतात. देव करुणेचा सागर असेल, तर सगळे निभाऊन जाईल, अशी आशा वाटू लागते. त्यामुळेच अजून एक आशा वाटू लागते - देव करुणेचा सागर असणारच!
किणीकर ह्या सर्व प्रक्रियेवर हसतात. म्हणतात तुला वाटते आहे की, देव करुणेचा सागर आहे - पण ते बघ - जीवनाच्या पिंपळावरचे एक हिरवेगार पान गळून पडले आहे.
जीवन हा एक अश्वत्थ वृक्ष कसा आहे, हे गीतेत आपल्याला सांगितले गेले आहे. त्या पिंपळावरची अनेक हिरवी पाने गळून पडताना आपल्याला दिसतात. अवेळी झालेले अनेक मृत्यू आपल्याला दिसत असतात. जीवनात येणारे दुःख आपल्याला दिसत असते. मग देव हा करुणेचा सागर आहे, असे आपण का समजतो?
तुमच्या ‘विशफुल थिंकिंग’ला प्रतिसाद देण्याएवढा देव कनवाळू नाही. खरं पाहायला गेलं, तर देव कनवाळू असेल, तर आपली दुःखातून सुटका होईल इतपत विचार मनात आल्यामुळेच - देव कनवाळू आहे, ह्या विचारावर माणसाचा विश्वास बसतो इतकंच!
२८)
‘कळसावर ढळला विरक्त भैरव धूप
दरवळला उंबरठ्यावर मंजूळ भुप
रात्रंदिन चाले संकीर्तन भक्तीचे
जरि नसे उघडले दारही गाभाऱ्याचे।’
भैरव राग हा सकाळचा, भूप रात्रीच्या पहिल्या प्रहरातला. दोघांमध्ये एक साम्य आहे. दोन्ही राग भक्ति-रसाने ओतप्रोत भरलेले आहेत. ह्यातला भैरव जास्त गंभीर आहे. त्याला एक आब आहे. त्यामुळे तो विरक्त भक्ती प्रमाणे जास्त सखोल वाटतो. हा भक्तीचा कळस आहे. भक्तीच्या कळसावर हा राग धूपाप्रमाणे भरून राहतो. भूप रात्रीचा. भक्ती मध्ये जास्त भावविव्हल होणारा. ही भक्ती मंजुळ आहे. भाव विभोर आहे. आसमंतात दरवळत राहणारी आहे.
अशा रीतीने रात्रंदिवस भक्तीचे संकीर्तन चालू आहे. गाभाऱ्याचे दार जरी उघडले नसले, तरीसुद्धा हे कीर्तन हा भक्तीचा सोहळा चालू आहे. गाभाऱ्याचे दार उघडलेले नाही आणि तरीही भक्तीचा उत्सव चालू आहे, ह्याचे दोन अर्थ संभवतात.
एक म्हणजे भक्तीला मूर्तीच्या किंवा अगदी भगवंताच्या दर्शनाची आस असली, तरी त्या दर्शनावाचून त्या भक्तीचा उत्सव सुरू राहू शकतो. कारण भक्ती स्वतःच एक दर्शन आहे. खऱ्या भक्ताला देवापेक्षा, त्याच्या भेटीपेक्षा भक्तीचा सोहळा जास्त प्रिय वाटत असतो. भगवंतावरचे प्रेम त्याला भगवंताच्या भेटीपेक्षा जास्त महत्त्वाचे वाटत असते. भगवंताची भेट झाली की, भक्तीचा सोहळा संपेल की काय, अशी भीती त्याला आत कुठेतरी वाटत असते. त्यामुळेच गाभारा उघडला नाही, तरी भक्तीच्या सोहळ्यात काही उणीव जाणवत नाही.
दुसरा अर्थ समजून घ्यायचा असेल, तर मंदिराची रचना आणि माणसाची रचना ह्यातील साम्य समजून घ्यायला हवे. मंदिराची रचना आणि उपनिषदांनी सांगितलेली मानवाच्या अस्तित्वाची रचना एकसारखी आहे.
माणसाचे पाहायला गेलं, तर आधी बाहेर अन्नमय कोष, त्याच्या आत प्राणमय कोष (श्वासातून वाहणारा), त्याच्या आत मनोमय कोष (मनाचे प्रतल) त्याच्या आत विज्ञानमय कोष (बुद्धी आणि साधे ज्ञान) आणि शेवटी आत आनंदमय कोष (आत्मा)…
मंदिरसुद्धा अशाच कोषांचे बनलेले असते. आधी, आवाराची सगळ्यात बाहेरची भिंत, मग आत आंगण, मग देवळाची भिंत, मग आत एक सभामंडप आणि मग गाभाऱ्याची भिंत आणि मग आत देव. माणसाने देवळात जाताना आपल्या अस्तित्वाचे एक एक कोष उतरवत जाणे अपेक्षित असते.
एवढे कोणा भक्ताला जमते? सगळेजण बाह्य भक्तीतच रमलेले असतात. बाह्य भक्तीला कितीही पूर आला तरी तिला आत्मा दिसत नाही. अस्तित्वाचा गाभारा तिला दिसत नाही. ह्या अर्थाने कुणाही भक्तासाठी मंदिराचा गाभारा उघडलेला नाही.
.................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
२९)
‘भरदार कुसुंबी काठ दाटली चोळी
येतसे अपूर्वा उषा सावळी भोळी
रांगोळी घालुन जाई दाराआड
रंगला इथे संध्येचा पश्चिम माड।।’
हे एक शब्दांनी रेखलेले निसर्गचित्र! पहाटे उषेचे आगमन होते तेव्हा पूर्व दिशेच्या आकाशात लाल रंग सर्वत्र दाटून राहिलेला असतो. बाकी सर्व आकाश सावळे असते. ह्या भरगच्च आणि रंगीत आकाशाची चोळी घालून सावळी उषा अवतरलेली आहे.
स्तनांच्या भरगच्चपणामुळे चोळी दाट बसली आहे, असे वाटते. येथे सौंदर्याच्या भरगच्चपणामुळे आकाशाची चोळी दाटून बसली आहे. ह्या दाट चोळीच्या भरगच्चपणात, भरगच्च कुसुंबी रंगाने आणखी भरगच्चपणा आणला आहे.
उभार स्तनांचे आणि त्यावर दाटलेल्या रंगीत चोळीचे सौंदर्य किणीकर आकाशावर आरोपित करत आहेत. ही प्रतिमा सौंदर्याने आणि अर्थाने किती संपृक्त आहे! पूर्वेकडून येणारी अपूर्व सौंदर्याने नटलेली ही उषा आहे.
पुढच्या दोन ओळीत किणीकर एकदम जमिनीवर येतात. आकाशाच्या सौंदर्याकडून मातीतल्या सौंदर्याकडे येतात.
‘रांगोळी घालुन जाई दाराआड
रंगला इथे संध्येचा पश्चिम माड।।’
पूर्वेचा अपूर्व असा हा लाल रंग दारातून आत आला आहे. ही ती उषेने दाराआड घातलेली लाल रंगोळी!
आणि मग शेवटी ह्या संधिकाली, पूर्वेकडे उधळलेल्या लाल रंगात रंगलेला पश्चिम दिशेला असलेला माड!
त्याच्या ऊंच झावळ्यांवर उषेचा लाल रंग पडला आहे. ह्या पूर्वेच्या अपूर्व सौंदर्यात जमीन आणि पश्चिम दिशाही नाहून निघालेली आहे. बालकवींची आठवण यावी, असे हे शब्दचित्र. बालकवींच्या कवितेएवढेच अकृत्रिम सौंदर्याने आणि हळव्या संवेदनेने नटलेले!
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
३०)
‘रोमांचित झाले कितीक येथे युगलं
चुंबने दिली घेतली बिलगुनी जवळ
रंगली एकदा रेंगाळत अपरात्र
वाकले लाजुनी पदराखाली नेत्र।।’
स्त्री-पुरुषांच्या प्रणयाचे वर्णन करणाऱ्या कविता लिहायची पद्धत खय्यामच्या काळात नव्हती. किणीकर ‘आधुनिक काळा’तील कवी होते. इंग्लंडमध्ये वर्ड्सवर्थ आणि कोलरिज ह्यांनी १८००च्या सुमारास, साहित्यात ‘रोमँटिक मूव्हमेंट’ आणली. सामान्य माणसाच्या भावभावना हा कवितेचा विषय असू शकतो, हे ह्या मूव्हमेंटमधील कवींनी ठासून सांगितले. पुढे १८८०च्या सुमारास केशवसुतांनी अशा प्रकारची नवी कविता लिहिली, पण त्या काळाच्या मानाने प्रेमभावना फक्त लिहिली गेली. शारिरिक प्रेमाचे वर्णन कवितेत यायला पुढे ७० वर्षांचा काळ जावा लागला.
किणीकरांनी ह्या प्रकारच्या रुबाया खूप लिहिल्या. किणीकर मुळातले बंडखोर प्रवृत्तीचे कवी होते. मुक्त प्रणायाची वर्णने त्या काळात पु. शि. रेगे आणि रॉय किणीकर ह्यांनी लिहिली. ह्या रुबाईतच बघा -
‘रोमांचित झाले कितीक येथे युगलं
चुंबने दिली घेतली बिलगुनी जवळ’
मुक्त भावनांची मुक्त अभिव्यक्ती! पण भावना मुक्त आणि अनावर असल्या, तरी स्त्री-सुलभ लज्जा ह्या भावनांचा एक अनिवार्य भाग असतो. लज्जेमुळे प्रणय थोडा दुर्लभ होतो. त्यामुळे तो जास्त सुंदर होतो आणि तेवढ्या प्रमाणात तो जास्त जास्त हवाहवासा वाटतो.
इथेही त्या प्रणय मग्न स्त्रीला अपरात्र केव्हा उलटून गेली, ह्याचे भान उरलेले नाही. अचानक प्रकाश आल्यावर तिला भान आले आहे. आणि लज्जेमुळे तिच्या नेत्रांना घाईने सावरलेल्या पदराआड लपावे लागले आहे.
‘रंगली एकदा रेंगाळत अपरात्र
वाकले लाजुनी पदराखाली नेत्र।।’
..................................................................................................................................................................
लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.
sjshriniwasjoshi@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment