रॉय किणीकर आध्यात्मिक होते की नाही, मानवी बुद्धीच्या पलीकडे ते गेले होते की नाही, हे कळायला मार्ग नाही, पण त्यांना अध्यात्म बुद्धीच्या पातळीवर तरी चांगलेच उमगले होते, ह्यात शंका नाही!
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
श्रीनिवास जोशी
  • रॉय किणीकर आणि त्यांच्या ‘उत्तररात्र’ या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ
  • Mon , 11 March 2024
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो रॉय किणीकर Roy Kinikar उत्तररात्र Uttarratra रुबाया Rubaiya उमर खय्याम Omar Khayyam

रॉय किणीकर हे मराठी साहित्यातलं एक ‘अजब’ प्रकरण आहे. आणि त्याहून ‘गजब’ आहेत त्यांच्या कविता, त्यातही ‘रुबाया’. ‘उत्तररात्र’ हा त्यांच्या रुबायांचा संग्रह. वाचकप्रिय, समीक्षकप्रिय आणि लोकप्रिय ठरलेल्या या संग्रहातील रुबायांचं रसिलं रसग्रहण करणारी ही लेखमाला आजपासून द्वि-साप्ताहिक स्वरूपात - दर शुक्रवारी आणि सोमवारी...

.................................................................................................................................................................

११)

‘काळोख खुळा अन् खुळीच काळी राणी

संकोच मावला मिठींत सुटली वेणी -

अंजिरी चिरी विस्कटे सुटे निरगाठ

ओठांत चुंबने भरली काठोकाठ।

पुराच्या काळात नदी जशी बेफाट प्रवाहाला शरण जाते, त्याप्रमाणे आपल्या बेफाट इच्छांना शरण गेलेल्या प्रणयिनीचे हे चित्र आहे.

‘काळोख खुळा अन् खुळीच काळी राणी’

काळोख खुळा - हे बेफाम प्रणयाचे रूपक आहे. प्रणयाच्या इच्छा बेफाम झाल्या आहेत.

‘संकोच मावला मिठीत सुटली वेणी’

तिचा संकोच आता प्रियकराच्या मिठीत अधीरपणे सामावला गेला आहे. प्रियकराच्या मिठीत तिने आता स्वतःला झोकून दिले आहे.

‘अंजिरी चिरी विस्कटे सुटे निरगाठ’

केसांच्या चिरीत हळद आणि कुंकू भरल्यामुळे अंजिरी रंग बनला आहे. प्रेमाच्या धसमुसळीत ती चिरी विस्कटून गेली आहे. आणि अर्थातच पातळाची निरगाठ सुटली आहे. येथे किणीकरांनी ‘अंजिरी रंग’ हे शब्द वापरून मामला केसांच्या चिरीच्या पलीकडे नेला आहे. योनीची अंजिरी चिरी उघडली आहे, तिची घडी विस्कटली आहे. तिच्या मुखाची निरगाठ सुटली आहे. ह्या एका ओळीत किणीकरांनी फार मोठा उन्माद चित्रित केला आहे. छोट्या कवीच्या औकातीच्या बाहेरचा हा प्रकार आहे. आणि मग रुबाईच्या शेवटची ओळ येते -

‘ओठांत चुंबने भरली काठोकाठ’

इथे परत काठोकाठ ह्या शब्दाने पूर्णत्वाचा फील दिला आहे. प्रणय-प्रसंगाचे समाधान ह्यात आहे. प्रणय-प्रसंगातून येणार उन्मादी समाधान ह्या शब्दात लपलेले आहे. बिचारा उमर खय्याम! त्याच्या काळात असे काही लिहिण्याची पद्धत नव्हती! किंवा परवानगी नव्हती म्हणा! पण असे काही लिहायचे असते तर तो कमी मात्र पडला नसता, हे नक्की! त्याच्याही लेखणीत प्रेमाचा उन्माद पेलण्याची ताकद होती. खालील सूचक रुबाई वरून आपल्याला त्या ताकदीचा अंदाज येतो.

‘So when that Angel of the darker Drink

At last shall find you by the river-brink,

And, offering his Cup, invite your Soul

Forth to your Lips to quaff—you shall not shrink’

(येईल घेऊन देवदूत काळा सुखाचा पेला

शोधीत काठावर नदीच्या एकट्याला तुला

आणायचे आहे तुझ्या आत्म्याला ओठावर तुझ्या

जेव्हा करेल अर्पण तो ते मादक द्रव्य तुला)

‘एंजल ऑफ डार्कर ड्रिंक’ हा संदर्भ मृत्यूचासुद्धा आहे. मृत्यूचा प्याला जेव्हा मला दिला जाईल, तेव्हा मी माझा आत्मा ओठांवर आणून त्याचा माझ्या ओठांनी स्वीकार करेन. न घाबरता स्वीकार करेन - असा अर्थ ह्या रुबाईचा लावला जातो. पण ‘एंजल ऑफ डार्कर ड्रिंक’ हे संबोधन प्रेयसीला उद्देशून आहे, असा अर्थ गृहित धरला तर ही रुबाई आवेगी प्रणयाचीसुद्धा बनते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

१२)

‘गुदमरली काजळकाठावरची धुंदी

कळवळली हिरवी तळटाचेची मेंदी

पाळणा झुले मांडीवर मिटले ओठ

पदरातुनि फिरली एक तान्हुली मूठ।।

मराठी नवसाहित्यावर फ्रॉइडच्या सायकॉलॉजीचा परिणाम झाला, त्या काळात किणीकर तरुण होते. अरविंद गोखले, वगैरे लघुकथाकार त्या काळात मनोविश्लेषणात्मक कथा लिहीत होते. आपल्याला बाह्य वर्तनातून मानवाचे मन जसे दिसत असते, त्यापेक्षा ते खूप खोल असते. आपल्या स्वतःलाच न उलगडलेल्या अनेक पातळ्यांवर आपले मन काम करत असते, हे त्या काळात सर्व विचार करणाऱ्या लोकांनी मान्य केले होते. वरील रुबाईत पहिल्या तीन ओळी होई पर्यंत काही थांग लागत नाही. वाचक पूर्णपणे अधांतरी राहतो.

‘गुदमरली काजळकाठावरची धुंदी

कळवळली हिरवी तळटाचेची मेंदी

ह्या दोन्ही ओळी प्रणयाच्या भावनेशी निगडित आहेत. प्रणय भावना तयार झाली आहे, पण तिला बाहेर पडण्यासाठी वाट मिळत नाहिये, असे हे गुदमरणे आहे.

ह्या दोन ओळींनंतर एकदम -

‘पाळणा झुले मांडीवर मिटले ओठ’

ही ओळ येते. मांडीवर तान्हे बाळ आहे आणि त्याला मांडी हलवून आई झोपवते आहे. त्याचे ओठ मिटलेले आहेत, म्हणजे त्याचे दूध पिणे झालेले आहे. त्या अर्धवट झोपलेल्या बाळाची मूठ स्तनावरून फिरते अशी पुढची ओळ आहे.

‘पदरातुनि फिरली एक तान्हुली मूठ।।’

ही ओळ समोर आल्यावर पहिल्या दोन ओळींचा अर्थ लक्षात येतो. त्या स्पर्शाने तिच्या मनात फार वेगळ्या स्पर्शांची आठवण झाली आहे. मनात आणि शरीरात प्रणय भावनेने हालचाल सुरू केलेली आहे. ह्या स्पर्शाने त्या भावना तयार झाल्या, अशी मनात आत कुठे तरी अपराधीपणाची भावना तयार झाली आहे. पण प्रणयी भावनांची ओढसुद्धा तेवढीच आहे. तिची ही अवस्था किणीकर पहिल्या दोन ओळीत फार संवेदनशील आणि सूचक शब्दात लिहितात -

‘गुदमरली काजळकाठावरची धुंदी

कळवळली हिरवी तळटाचेची मेंदी

मनाचे हे असे अनेक पातळ्यांवरचे स्वैर भटकणे फ्रॉइडमुळे मानवाच्या लक्षात आले. त्या स्वैर भटकंतीचे मनोहारी चित्र किणीकरांनी अप्रतिम शब्दात रेखाटलेले आहे.

१३)

‘ओठात अडकले चुंबन रुसले गाल

कोयरीत हिरवा चुडा विरघळे लाल

घालता उखाणा फणा रूपेरी खोल

अंकुरले अमृत ढळता नाभी कमळ।।

ही रुबाई म्हणजे एक भन्नाट सृजन चित्र आहे.

‘ओठात अडकले चुंबन रुसले गाल’

गाल आणि ओठ ह्या दोघांनाही चुंबने हवी आहेत, पण प्रियकराचे ओठ तिच्या ओठात अडकून पडले आहेत. त्यामुळे गालांवर अन्याय होत आहे. तिला तो अनुभव हवा आहे. तिचे सर्व शरीर चुंबनांसाठी आसुसलेले आहे.

‘कोयरीत हिरवा चुडा विरघळे लाल’

कोयरी सरळ सरळ योनीची प्रतिमा आहे, पण मग हिरवा चुडा विरघळून लाल झाला, ही काय भानगड आहे? हिरवा रंग सृजनाचा! ह्या सृजनाने योनीचा आणि रक्ताचा लाल रंग घेतला आहे.

‘घालता उखाणा फणा रूपेरी खोल’

ह्या ओळीमधील ‘फणा’ ही सरळ सरळ पुरुषाच्या ताठ लिंगाची प्रतिमा आहे.

मग ‘रूपेरी फणा’ हा काय प्रकार आहे? योनी लाल, तर वीर्य रूपेरी आहे. ताठ लिंग हा फणा आहे, तर वीर्य हे रूपेरी विष आहे. मग उखाण्याचा अर्थ काय? उखाणा म्हणजे नाव काव्याच्या आडून नाव घेणे. एकमेकांचा प्रणयी स्वीकार करणे. उखाण्याचा अजून एक अर्थ म्हणजे कूट प्रश्न. किणीकर येथे ह्या प्रणयाच्या रुबाईला एकदम अध्यात्माच्या कूट प्रश्नाकडे नेतात.

हा फणा रूपेरी खोल खुपसला गेला की काय होते? रूपेरी विष लाल योनीत ओतले गेले की काय होते? अमृताचा जन्म होतो! कसले अमृत? हे चैतन्याचे अमृत आहे. कॉन्शसनेसचे अमृत आहे.

‘अंकुरले अमृत ढळता नाभी कमळ’

वीर्य हे विष आहे कारण वीर्य आणि स्त्री-बीज हे मायेचा भाग आहेत. आत्मा अमृत आहे कारण तो अमर अशा चैतन्याचा अंश आहे. ह्या अनावर विषांच्या संभोगातून अमृत कसे आणि का जन्माला येते हा मुख्य उखाणा आहे, मुख्य कूट-प्रश्न आहे. शिवलिंग योनीमध्ये उभे राहिले आहे. त्याचा रंग काळा आहे. शिवाचे आणि विषाचेही नाते आहे. शिवाच्या समर्थनाने शक्ती सृजनात रममाण होते. लिंग आणि योनी ह्यांच्या एकत्वातून सृजन होते. हे अमृताचे आणि विषाचेही एकत्व आहे.

शेवटी एक बघायचे. ढळलेले नाभी-कमळ म्हणजे काय? ह्याचे दोन अर्थ निघतात. स्त्री गरोदर राहिली की तिची नाभी खालच्या दिशेला जाते. म्हणून अमृत जेव्हा स्त्री मध्ये राहायला येते तेव्हा नाभी-कमळ ढळते. अजून एक अर्थ म्हणजे शेषशायी श्री विष्णू ह्यांच्या नाभी मधून एक कमळ बाहेर आले. त्यात ब्रह्मा बसलेले आहेत. ही सृजनाची सुरुवात. ह्या ब्रह्मदेवांनी आपल्या वीर्यातून सृजनाची सुरुवात केली. ते आपल्या स्थानावरून ढळले तेव्हा सृजनाची सुरुवात झाली.

किणीकर चार ओळी लिहितात आणि आपल्याला केवढा प्रवास घडतो!

१४)

‘वितळली निळाई काळोखातिल आज

अन् आज्ञाताच्या कुशीत पडले बीज

अंकुरला चढला एकान्ताचा वेल

एकदाच येते या स्वप्नाला फूल।।

ही रुबाई म्हणजे एक रत्न आहे.

निळाई हे असीम चैतन्य तत्त्वाचे रूप आहे. ह्या मायेमध्ये ठाई ठाई चैतन्य लपलेले आहे. मायेच्या काळोखात म्हणजे अज्ञानात, चैतन्याची निळाई लपलेली आहे. जसा मानवी शरीराच्या काळोखात आत्मा लपलेला आहे. हा आत्मा, हे चैतन्य तत्त्व आज आपली जागा सोडून, मायेचा पडदा थोडा बाजूला करून खाली उतरले आहे. अज्ञाताच्या कुशीत हे ज्ञानाचे बीज पडले आहे.

‘अंकुरला चढला एकान्ताचा वेल’

ह्या बीजाच्या प्रेरणेने ध्यानाचा, मेडिटेशनचा वेल अंकुरला आणि बहरला आहे.

‘एकदाच येते या स्वप्नाला फूल’

ही ओळ खूप गूढ आहे. ह्या ध्यानाच्या, ह्या तपस्येच्या वेलीला परम ज्ञानाचे फूल येते. अंतिम ज्ञानाचे फूल येते. अंतिम ज्ञान माणसाला एकदाच होणार!

‘एकदाच येते ह्या स्वप्नाला फूल’

आता एकच प्रश्न उरतो - ह्या वेलीला स्वप्न का म्हटले आहे? ध्यान जरी मनुष्याला अंतिम ज्ञानाकडे नेत असले, तरी ध्यानाची पूर्ण अवस्था नाहिये. ध्यानात योगी मनुष्यच असतो. तो संपूर्णपणे अंतिम ज्ञानात्मक झालेला नसतो. म्हणून ध्यानावस्था ही एक प्रकारे स्वप्नावस्थाच आहे.

किणीकर आध्यात्मिक होते की नाही, मानवी बुद्धीच्या पलीकडे ते गेले होते की नाही, हे कळायला मार्ग नाही, पण त्यांना अध्यात्म बुद्धीच्या पातळीवर तरी चांगलेच उमगले होते, ह्यात शंका नाही.

१५)

‘पसरूनी हात आभाळ खालती येई

उंचावुनि टाचा धरती चुंबन देई

जे दिसते नसुनी, असुनि दिसलें नाहीं

अंगाई गाते दिक्कालाची आई।।

चैतन्य आणि माया ह्यांचा खेळ किणीकरांना सतत आकर्षित करत राहिला.

स्त्री-पुरुष आणि त्यांच्या नात्यातून होणारे सर्जन ह्या सगळ्यात किणीकरांना चैत्यन्य आणि मायेच्या खेळाचे प्रतिबिंब दिसते.त्याचप्रमाणे किणीकरांना हे प्रतिबिंब निसर्गाच्या मनोहारी सर्जनातही दिसते. पहिल्या दोन ओळीत आपल्या डोळ्यासमोर एक सुंदर प्रतिमा येते.

‘पसरूनी हात आभाळ खालती येई

उंचावुनि टाचा धरती चुंबन देई

पावसाचे ढग उतरून आलेले आहेत.

‘पसरूनी हात आभाळ खालती येई’

उंच उभी झाडे, वर फोफावणारी गवते, ऊंच उभी गिरिशिखरे आणि उफाणलेल्या पाण्याच्या लाटा जणू त्या ढगांच्या ओठांची चुंबने घ्यायला टाचा ऊंच करून स्वतःला वर उचलत आहेत. अत्यंत सुंदर प्रतिमा!

पण, ह्या रुबाईला खरे वळण खालच्या दोन ओळीत मिळते.

‘जे दिसते नसुनी, असुनि दिसलें नाहीं

अंगाई गाते दिक्कालाची आई।।

जे दिसते नसुनी - पृथ्वी टाचा उंचावून खरंच आभाळाचे चुंबन घ्यायला उभी आहे का? नाही. पण ते चित्र आपल्याला अस्तित्वात नसूनसुद्धा आपल्याला दिसते आहे. आपल्या मनाच्या डोळ्यांना दिसते आहे. पण जे आहे ते मात्र आपल्याला दिसत नाहिये. आभाळ ज्याचे प्रतीक आहे, ते चैतन्य ह्या जड पृथ्वीकडे ओढले जात आहे. ही पृथ्वी हे त्या चैतन्याचेच जड रूप आहे. ही पृथ्वी त्या चैतन्याच्या चुंबनासाठी आसूसली आहे. टाचा ऊंच करून त्या चैतन्याची ऊब शोधत आहे. पृथ्वी सतत उत्क्रांत आहे. जे जड आहे ते जिवंत होण्याच्या मार्गावर आहे. जे जीव अप्रगत आहेत, ते प्रगत जीव होण्याच्या मार्गावर आहेत. जे प्रगत जीव आहेत ते माणूस होण्याच्या मार्गावर आहेत. आणि, मनुष्ये संपूर्ण चैतन्यमय अस्तित्वाच्या शोधात आहेत. उत्क्रांतीची एक सलग मालिका!

‘उंचावुनि टाचा धरती चुंबन देई’

जे दिसत नाही ते दिसते आहे आणि जे दिसायला पाहिजे ते दिसत नाही, ह्याला कारण काय आहे?

‘अंगाई गाते दिक्कालाची आई’

दिक्काल ह्या शब्दाचे दोन अर्थ होतात. दिक् म्हणजे दिशा. काल म्हणजे काळ. दिशा आणि काल असे दोन्ही एकत्र आले म्हणून दिक्कालाचा अर्थ स्पेस-टाईम असा होतो. आईनस्टाइनचा स्पेस-टाईम! फारच आधुनिक अर्थ.

पारंपरिक साहित्यात दिक्काल म्हणजे देशकाल. एखाद्या भूभागातील सांप्रत परिस्थिती. किंवा पृथ्वीवरची सांप्रत परिस्थिती. ह्या दिक्कालाची आई अंगाई गाते आहे म्हणून मानवाला भुरळ पडली आहे आणि त्याला चैतन्य आणि जडाचे मीलन दिसत नाहिये. त्यांचे एकत्त्व दिसत नाहिये.

‘ही दिक्कालाची आई म्हणजे माया!’

मायेच्या आवरणामुळे खरे नाट्य आपल्याला दिसत नाही. पण ह्या नाट्याचा कलावंत मनाला अस्पष्ट सुगावा लागलेला असतो, म्हणून त्याच्या मनाला सृष्टीमध्ये नाट्य दिसू लागते. मन हे सुद्धा मायेच्या अधिपत्याखालीच असते. त्याला मायेची अंगाई गुंगी आणते. जे नाहिये ते त्याला दिसायला लागते, जे दिसायला पाहिजे ते त्याला दिसत नाही. ह्याच धर्तीवरची उमर खय्यामची एक रुबाई आहे -

‘And has not such a Story from of Old

Down Man's successive generations roll'd

Of such a clod of saturated Earth

Cast by the Maker into Human mold?’

(परंपरेच्या उतरंडीच्या वरूनी

उतरत उतरत कथा खालती आली

रूप स्वतःचे ओतून चपखल, केला

मानव त्याने तयार चिखलातूनी)

१६)

‘राहिले तिथे ते तसेच अपुरे चित्र

राहिले तिथे ते तसेच अपुरे पत्र

घटिका पात्र बुडाले कलंडला निःश्वास

पाखरू उडाले पडला उलटा फास

मानवी जीवनातील हेतूंची होलपड आपल्याला बघवत नाही. जे हेतू, जी कार्ये, जी ध्येये हृदयाशी धरून संपूर्ण आयुष्य वेचावे, ते सगळेच्या सगळे मृत्यूची वेळ आली की, अर्धवट सोडून निघून जावे लागते.

‘राहिले तिथे ते तसेच अपुरे चित्र

राहिले तिथे ते तसेच अपुरे पत्र

सगळे हेतू आयुष्यात अर्धे राहतात.

‘घटिका पात्र बुडाले कलंडला निःश्वास’

ही अपूर्णत्वाची थीम संपूर्ण जगाच्या साहित्यात अनेक वेळा मांडली गेली आहे. किणीकरसुद्धा ही थीम मांडतात. पण, किणीकर प्रत्येक वेळी त्या थीमला अस्सल भारतीय थाटात मांडतात हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे.

‘घटिका पात्र बुडाले कलंडला निःश्वास’

घटिका पात्र मुहूर्तासाठी असते. मृत्यूचा मुहूर्त आला की हातातले काम अर्धवट टाकून निघावे लागते.

‘पाखरू उडाले पडला उलटा फास’

आत्म्याला अध्यात्माच्या भाषेत पाखरू म्हटले जाते. कुमार गंधर्वांचे ‘उड़ जाएगा, हंस अकेला’ हे निर्गुणी भजन सर्वांनीच ऐकलेले आहे. नियतीचा फास उलटा पडला ह्यालाही आध्यात्मिक संदर्भ आहे. नियतीचा फास पडला की आत्म्याला जिवामध्ये उतरावे लागते. तो उलटला की सुटका होते. उमर खय्यामची ह्या धर्तीवरची एक रुबाई इथे आठवते आहे -

‘They say the Lion and the Lizard keep

The Courts where Jamshyd gloried and drank deep;

 And Bahram, that great Hunter – the Wild Ass

Stamps o'er his head, but cannot break his Sleep.’

(वाघ नि सरडे फिरती आजि ह्या दरबारातुनी

जमशीद पूर्वी जिथे शोभला राजा म्हणुनी गुणी;

बहराम शिकारी मोठा होता किती, तरी तो पहा

गाढव जाते आज तयाच्या कबरीला तुडवुनी)

१७)

‘देताना खांदा कुजबुजले ते चौघे

अष्टमात मंगळ, शनि राहू होते मागे

संसार असा हा, चला बिचारा सुटला

अन् गंगेकाठी कुंभ रिकामा फुटला।।

कशालाच काही अर्थ नाही अशी अवस्था.

पहिल्या तीन ओळी सरळ जातात. एक मृत्यू. त्या मृताबद्दलची खांदेकऱ्यांची कुजबुज. त्याच्या अपयशी आणि दुःखी संसाराबद्दल चर्चा. आणि निष्कर्ष - चला, बिचारा सुटला! शेवटची ओळ

‘अन् गंगेकाठी कुंभ रिकामा फुटला’

कुंभ फुटणे म्हणजे देहाचा नाश. हे आपण बघितले आहे. गंगेकाठी रिकामा कुंभ फुटला अशी शोकांतिका आहे. वाहती गंगा आहे. इथे गंगा अनेक रूपांनी येते. एवढी मानवी सुखाची गंगा ह्या जगात वाहत असताना, हा कुंभ मात्र कोरडाच राहिला आणि फुटला. इतके भोग भोगूनही, ह्या जगात इतकी तत्त्वज्ञानाची गंगा वाहत असतानाही हा नुसतेच भोग भोगून काही शहाणपण न शिकता, तसाच कोरडा राहिला आणि फुटला. दुःखही भोगायला लागली आणि हाती काहीच लागलं नाही.

गंगेकाठी अग्नी मिळाला की जन्म-मरणाचा फेरा चुकतो अशी श्रद्धा आहे. हा जीव मात्र गंगेच्या काठावर गंगेचा मोक्षदायी स्पर्श न होताच फुटला, असाही एक अर्थ आपल्याला ह्या शेवटच्या ओळीत खुणावतो. काहीही असले तरी जीवन आणि त्याचा फोलपणा, इतकेच नाही, तर एकूण विश्वाच्या निर्मितीमधील फोलपणा किणीकरांना जाणवत राहिला आहे असे ही रुबाई वाचताना वाटत राहते. विश्वाच्या फोलपणावर म्हणा, ह्या निर्मितीच्या फोलपणावर म्हणा - उमर खय्यामची एक रुबाई इथे आठवते आहे.

‘With Earth's first Clay They did the Last Man knead,

And there of the Last Harvest sow'd the Seed:

And the first Morning of Creation wrote

What the Last Dawn of Reckoning shall read.’

(पृथ्वीच्या पाहिल्या मातीमध्येच त्यांनी मळला चिखल, शेवटच्या माणसासाठीचाही…

आणि त्या पाहिल्या मातीतच रोवली त्यांनी बीजे शेवटच्या सुगीचीही;

सृजनाच्या पाहिल्यावहिल्या पहाटेनेच लिहून ठेवले आहे -

जे जे काही वाचणार आहे शेवटची पहाट शेवटचा न्याय करताना ते ते सर्व…)

अष्टमातील मंगळ आणि त्यामागून येणारे शनी आणि राहूच सर्व ठरवणार असतील तर, आपण उगीच दुःख भोगले आणि अर्थहीनतेच्या काठावर कोरडेच फुटलो, असे कुंभाला वाटणारच!

१८)

‘हे लिहिले नाटक, रचिले कोणी गीत

संवाद बसविले, दिले कुणी संगीत

अर्ध्यावर नाटक टाकुनि नायक गेला

शेवटचा पडदा अजुनि नाही पडला।।

ह्या जीवनात आपल्याला वाऱ्यावर सोडून दिले गेले आहे, ही भावना प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी आलेली असते. हे जग म्हणजे एक भयानक नाटक आहे असेही आपल्याला वाटून गेलेले असते. हे असले नाटक कुणी लिहिले असेल, असाही विचार आपल्या मनात येऊन गेलेला असतो.

‘हे लिहिले नाटक, रचिले कोणी गीत

संवाद बसविले, दिले कुणी संगीत’

ह्या नाटकाला अंत नाही हे सुद्धा आपल्याला कळत असते. आपण मरून गेलो तरी हे नाटक संपणार नाही, हे आपल्याला कळून चुकलेले असते. इथे नायकच कुठेतरी गायब झालेला आहे, मग हे नाटक संपणार कसे?

‘अर्ध्यावर नाटक टाकुनी नायक गेला’

आपण ज्याला सृष्टीचा निर्माता म्हणतो, तो ह्या नाटकाचा फक्त लेखक आहे, का तोसुद्धा ह्या नाटकात नायकाचे काम करतो आहे, ह्या विषयी आपल्या मनात संभ्रम असतो. नाही तरी आरती प्रभु ह्यांनी लिहिलेच आहे -

‘पोटाशी धरणारा तो

आणि पोटाशी धरले गेलेले सगळे

दोघांनाही एकमेकांचाच

आधार आहे!

'तो' नायक असेल तर तो हे नाटक अर्ध्यावर सोडून गेला आहे काय? तो गेल्यामुळे हे नाटक असेच अर्थहीनपणे चालूच राहणार आहे काय? अर्थहीनपणे चालत राहिलेल्या नाटकावर पडदा पडणार आहे की नाही?

‘अर्ध्यावर नाटक टाकुनि नायक गेला

शेवटचा पडदा अजूनि नाही पडला।।

उमर खय्यामने हीच भावना फार भव्य शब्दचित्र काढून लिहिली आहे.

‘Earth could not answer; nor the Seas that mourn

In flowing Purple, of their Lord Forlorn;

Nor rolling Heaven, with all his Signs reveal'd

And hidden by the sleeve of Night and Morn.’

(हरवलेल्या निर्मात्याविषयी त्यांच्या;

ना पृथ्वी सांगू शकत काही,

ना समुद्र सांगू शकतो काही वाहताना इकडून तिकडे -

नाही सांगू शकत साक्षात स्वर्गसुद्धा त्याच्या बद्दल अजिबात काही

असावा लपून राहिलेला ‘तो’ दिवस रात्रीच्या बाह्यांमध्ये

नकळत कुणाच्या प्रत्यही

तो असलाच तर कालच्या आड लपून राहिलेला असणार.’

किणीकरांनासुद्धा नाटकाचा शेवट होत नाहिये, ही खंत आहे. कारण नाटक संपल्यावर तो कोण आहे, हे सगळ्यांना कळणारच आहे.

१९)

‘हे कुठून आले आषाढातिल मेघ?

का कुठे चालली मुंग्यांची ही रांग?

हे कसे चालते ऋतुचक्राचे चाक?

असते का उत्तर या प्रश्नांना एक।।

ह्या जगाचा तमाशा हर एक प्रकारे आपल्याला कोड्यात टाकतो आहे. आषाढातील मेघ येतात त्यांची प्रेरणा काय? ही मुंग्यांची रांग कुठे चालली आहे? का चालली आहे? मुंग्यांच्या ह्या रांगेची आणि जाण्यायेण्याची प्रेरणा काय? कोण चालवतो त्यांना रांगेत? ऋतुचक्राचे चाक इतक्या नियमितपणे शतकानुशतके कसे चालते?

शेवटी किणीकर विचारतात - ह्या सर्व प्रश्नांना एक कुठले तरी उत्तर असेल का? असले तर ते बरोबर असेल का? उदा. ह्या जगाच्या अस्तित्वामागचे, ह्या जगाच्या नियमितपणे चालणाऱ्या रहाटगाडग्यामागचे उत्तर आहे - परमेश्वराची लीला. हे सर्व गोष्टींसाठीचे एकच उत्तर झाले! ते उत्तर बरोबर असेल का? उमर खय्यामलाही ह्याच धर्तीवरचा प्रश्न पडला आहे.

‘Into this Universe, and Why not knowing

Nor Whence, like Water willy-nilly flowing;

And out of it, as Wind along the Waste,

I know not Whither, willy-nilly blowing.’

(येतो सारे जगात आपण - माहित नाही का अन् कोठून,

पाण्यासम ते वाहत जाणे पतीत प्रवाही होऊन जाऊन;

जातो आपण जगातून या  - माहीत नाही कोठे, का, ते,

वाऱ्यासम ते निघून जाणे तसेच प्रवाही पतीत होऊन।।)

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

२०)

‘हे चित्र, शिल्प, ही वीणा आणि मृदंग

येतात कोठुनी त्यातिल भावतरंग

हे हातावरच्या भाग्य नसे रेषांचे

आहे हे संचित, देणे भगवंताचे ।।’

कला आणि निसर्ग हा संवेदनशील लोकांचा विसावा असतो. हे रुबाई लिहिणारे लोक मूळचे आध्यात्मिक. किणीकर आध्यात्मिक होते ह्या विषयी कुणाच्या मनात काही शंका असायचे कारण नाही. आता पर्यंत ते अनेक रुबायांमध्ये दिसलेलेच आहे. पुढेही ते दिसत राहीलच. स्वतः उमर खय्याम सूफी होता. पण ह्या लोकांना अध्यात्माच्या अलीकडे जे आहे ते जगून घ्यायचे आहे.

ह्यांचे दारू पिणे हे रूपकात्मक आहे. हे लोक धर्माच्या विरोधात असतात. अनेक रुबायांमध्ये धर्माची चेष्टा केलेली आपल्याला दिसते. पण हे लोक धर्म विरोधी असले तरी पाखंडी नाहीत. त्यांना अध्यात्म हवे आहे. देवावर त्यांची श्रद्धा आहे. धर्मातला कर्मकांडी मूर्खपणा त्यांना सतावत असतो म्हणून ते चिडतात एवढेच. कला आणि निसर्ग हा संवेदनशील लोकांचा विसावा असतो. वरील रुबाईमध्ये किणीकरांना कला कोठून येते हा प्रश्न पडला आहे.

‘हे चित्र, शिल्प, ही वीणा आणि मृदंग

येतात कोठुनी त्यातिल भावतरंग

कला हे एक आश्चर्य तर आहेच, पण अजून मोठे आश्चर्य म्हणजे - कला माणसाच्या मनात भावना का निर्माण करते, हे आहे. कोणी मृदुंग वाजवतो आणि आपल्या चित्तवृत्ती उल्हसित का होतात. असे नक्की काय घडते म्हणून आपल्याला कलेमुळे छान वाटते? कला हातावरच्या रेघांमुळे माणसात राहायला येत नाही. कलेचे वरदान ग्रह आणि तारे देऊ शकत नाहीत. ते वरदान स्वतः भगवंताने दिलेले असते.

‘हे हातावरच्या भाग्य नसे रेषांचे

आहे हे संचित, देणे भगवंताचे ।।’

उमर खय्यामला देव नव्या निर्मितीत दिसतो. नव्या निर्मितीमुळे ज्या भाव-भावना निर्माण होतात त्यात दिसतो-

‘Now the New Year reviving old Desires,

The thoughtful Soul to Solitude retires,

Where the WHITE HAND OF MOSES on the Bough

Puts out, and Jesus from the Ground suspires.’

(वर्ष नवे येऊ घालते तेव्हा इच्छांनाही मोहर फुटत असतो

वेळी अशा ह्या, कलावंत जीव एकांत-वेल्हाळ होत जातो;

दिसतात अशावेळी मोझेस चे पांढरे हात फांद्यांवरच्या बर्फामध्ये

आणि ख्रिस्ताचा श्वास  जमिनीखालून पाझरत वर येत असतो)

इथे बायबलच्या एक्झोडस ह्या भागात देव प्रेषित मोझेसला खिशात हात घालून बाहेर काढायला सांगतो - मोझेस हात बाहेर काढतो तेव्हा ते कुष्ठरोग्याची कातडी जशी बर्फासारखी पांढरी झालेली असते तसे झालेले असतात. देव त्याला परत खिशात हात घालून बाहेर काढायला सांगतो. ह्या वेळी हातांची त्वचा नवी आणि तजेलदार झालेली असते.

हे संक्रमण डिसेंबरातील शुष्क बर्फाने अच्छादलेली धरित्री ते वसंतातली फुललेली तजेलदार धरित्री असे आहे. मृत्यू ते जीवन असा हा प्रवास आहे. देवाच्या आशीर्वादाने झालेला. ख्रिस्ताचे दफन झाल्यावर तो आपल्या कबरीमधून परत वर आला, ही कथा तर सर्वांनाच माहीत आहे. तो बाहेर आल्यावर अनेक कुष्ठरोग्यांचा कुष्ठरोग बरा झाला. इथेही मृत्यू ते नवनिर्माण हा प्रवास, त्या नियंत्याच्या आशीर्वादाने झालेला आपल्याला दिसतो.

ह्या नवनिर्माणाच्या काळात पृथ्वीवरचा हा चमत्कार पाहण्यासाठी कलावंताला एकांतात जावे वाटले तर आश्चर्य काय?

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......