रॉय किणीकर रुबाईची परंपरागत ताकद आणि भारतीय आध्यात्मिक जीवनदृष्टी ह्यांच्या मिलाफातून एक वेगळेच जादूभरले रसायन तयार करतात…
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
श्रीनिवास जोशी
  • रॉय किणीकर आणि त्यांच्या ‘उत्तररात्र’ या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ
  • Fri , 08 March 2024
  • ग्रंथनामा रॉय किणीकर Roy Kinikar उत्तररात्र Uttarratra रुबाया Rubaiya उमर खय्याम Omar Khayyam एडवर्ड फिटझ्-जेरल्ड Edward Fitz-Gerald

रॉय किणीकर हे मराठी साहित्यातलं एक ‘अजब’ प्रकरण आहे. आणि त्याहून ‘गजब’ आहेत त्यांच्या कविता, त्यातही ‘रुबाया’. ‘उत्तररात्र’ हा त्यांच्या रुबायांचा संग्रह. वाचकप्रिय, समीक्षकप्रिय आणि लोकप्रिय ठरलेल्या या संग्रहातील रुबायांचं रसिलं रसग्रहण करणारी ही लेखमाला आजपासून द्वि-साप्ताहिक स्वरूपात - दर शुक्रवारी आणि सोमवारी...

.................................................................................................................................................................

१)

‘दमलास, थांब ये, बैस, ठेव ते ओझे

हे नसे तुझे रे, नाही घर हे माझे

घे उचल, हा इथे भरला आहे पेला

जो गेला येथुनि नहीं परतुन आला।।’

रॉय किणीकरांमध्ये खूप धूमधाम आहे, निराशा आहे, तळमळ आहे, पश्चात्ताप आहे, माया आहे, प्रेम आहे, रसिकता आहे. सगळ्या सगळ्या भावना आहेत. सुखावणाऱ्या भावना आहेत आणि हैराण करणाऱ्याही भावना आहेत. पण ह्या सगळ्या ‘हैरानगी’ला किणीकर पुरून उरतात. चांदण्याच्या चमचमाटाच्या मागे प्रशांत अवकाश असते, त्याच्यावर त्या चांदण्याचा काहीही परिणाम होत नसतो. अवकाश सनातन असते. चांदणे क्षणभंगूर असते. त्याचप्रमाणे, किणीकरांना कुठेतरी माहीत होते की, हा सगळा जीवनाचा पसारा, ही ‘हैरानगी’ - हा सगळा खेळ आहे. त्याला खेळासारखेच खेळले पाहिजे.

म्हणून कुणी रस्त्यात गुंतून पडलेला हैराण यात्रेकरू दिसला की, किणीकर त्याला म्हणतात -

‘दमलास, थांब ये, बैस, ठेव ते ओझे’

त्याला ते सांगतात - तू एवढा का राबतो आहेस, आयुष्याचे ओझे का बनवले आहेस? हे आयुष्याचे ओझे तू कुणासाठी वाहून नेतो आहेस? लोक आपल्या घरासाठी राबतात तसे तू का राबतो आहेस. हे आयुष्य, ही पृथ्वी म्हणजे काय तुझे घर आहे काय? लक्षात घे, हे तुझे घर नाहिये. आणि हे माझेही घर नाहिये. सो रीलॅक्स!

‘नसे तुझे रे, नाही घर हे माझे’

त्याला ते सांगतात- हे ओझे, हे घर आपले नाहिये म्हणजे ही लीला आहे. हे जग म्हणजे एक बेशुद्धी आहे. एक मद्य आहे. हे आयुष्य मद्यासारखे पी. काळजी न करता हे आयुष्याचे मद्य एन्जॉय कर!

‘घे उचल, हा इथे भरला आहे पेला’

कारण हे अस्तित्व एकदा गेले की, परत येणार नाहिये.

‘जो गेला येथुनि नाही परतुन आला’

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

२)

‘या इथे कुणाला माहित नाहीं गाव

नाहींच विचारित कुणी कुणाला नाव

रे दिवस बुडाला अर्ध्या वाटेवरती

ये, पिऊन घे, ही रात्रीपुरती वसती।।’

रुबाईकार, मग तो उमर खय्याम असो की, अजून कोणी असो, ह्या कवींची रसिक जीवनदृष्टी आपल्या पटकन लक्षात येते. पटकन लक्षात येत नाही, त्यांना जाणवलेली ह्या जीवनातली अर्थहीनता. त्यांच्या रसिकतेचा उगम मानवी जीवनाच्या अर्थहीनतेत असतो. हे जीवन अर्थहीन आहे. येथे काय योग्य आणि काय अयोग्य हे कोणालाच नक्की कळत नाही. येथे कोणी कुणाचा नाही. सगळी अंदाधुंदी आहे. असे असेल जास्त विचार का करायचा? अशा अवस्थेत सौंदर्यपूर्ण जीवनदृष्टी ठेवून रसिकतेने जगून घेणे चांगले असा विचार ह्या रसिकतेमागे असतो. 

आपण कोण आहोत, कुठून आलो आहोत, हे येथे कुणालाच माहीत नाही.

‘या इथे कुणाला माहित नाहीं गाव’

आपण कोण आहोत हे कुणालाच माहीत नसल्यामुळे इथे कुणी कुणाला नावसुद्धा विचारत नाही. सगळे आपल्या स्वतःच्या शोधात मग्न आहेत.

‘नाहींच विचारित कुणी कुणाला नाव’

ह्या स्वतःच्या शोधात अर्धे आयुष्य संपून गेले. तारुण्य संपून गेले

‘रे दिवस बुडाला अर्ध्या वाटेवरती’

आता उत्तर आयुष्याची रात्र बाकी उरली आहे. त्यानंतर कदाचित जन्म-मरणाचे, दिवस- रात्रीचे दुसरे चक्र सुरू होईल. त्यामुळे -

‘ये, पिऊन घे, ही रात्रीपुरती वसती’

.................................................................................................................................................................

३)

‘छे, अफाट गर्दी, कोलाहाल कल्लोळ

आश्चर्य, अरे बघ यांचा गेला तोल

ओरडती, रडती, उघडा उघडा दार

एकदां पिऊ द्या गाव राहिला दूर।।’

आयुष्यातील कोलाहल आणि कल्लोळ रुबायांमध्ये मांडण्याची एक परंपरा आहे. एखाद्या काव्यप्रकारात काय मांडायचे, त्याची अभिव्यक्ती कशी असावी, ह्याविषयी एक परंपरा बनून जाते.

सुख मिळवायची एक होड ह्या दुनियेत सगळ्यांना लागून राहिलेली असते. किणीकर आणि खय्याम ह्या दोघांनीही त्याविषयी लिहिले आहे. विषय एकच आहे, पण फरक बघण्यासारखा आहे. ह्या दृष्टीने खय्यामची खालील रुबाई बघण्यासारखी आहे. भाषांतर अर्थातच एडवर्ड फिटझ्-जेरल्डचे आहे.

‘And, as the Cock crew, those who stood before

The Tavern shouted--"Open, then, the Door!

You know how little while we have to stay,

And, once departed, may return no more.’

(पहाटपासून येथे, होड लागली आहे

मद्यालय उघडा, सुरू ओरडा आहे

ना कळे तुम्हा का जीवन थोडे आहे

जो गेला येथूनी, येणार पुन्हा का आहे?)

किणीकर हाच विषय हाताळत आहेत. ह्या रुबाईच्या पहिल्या तीन ओळी अगदी सरळ जातात.

‘छे, अफाट गर्दी, कोलाहाल कल्लोळ

आश्चर्य, अरे बघ यांचा गेला तोल

ओरडती, रडती, उघडा उघडा दार’

येथपर्यंत किणीकर एकदम परंपरेच्या मार्गाने जातात. आणि अचानक एक अस्सल भारतीय तिढा लिहून जातात…

‘एकदां पिऊ द्या गाव राहिला दूर’

हा कुठला गाव दूर राहिला आहे? ह्या पिणाऱ्या लोकांच्या गावातीलच हे मद्यालय नाही का? हे मानवाच्या जीवनाच्या अर्थाचे गाव आहे. हे कदाचित आत्म्याच्या शुद्ध अस्तित्वाचे गाव आहे. आयुष्याचा अर्थ हाती लागत नाहिये, म्हणून आम्हाला पिऊ द्या. किंवा मग आमच्यातले शुद्ध तत्त्व आमच्या हाती लागत नाहिये, तोपर्यंत आम्हाला ही माया, ही सुख-दुःखे पिऊन घेऊ द्यात.

कोलाहल अर्थहीनतेमुळे तयार झाला आहे. खय्याम आणि किणीकर ह्यांच्यातला हा समान धागा आहे. पण किणीकर ह्या धाग्याला नंतर एक वेगळाच पीळ देतात. सुन्न होण्यावाचून आपल्या हातात काहीच राहत नाही. रुबाईची परंपरागत ताकद आणि भारतीय आध्यात्मिक जीवनदृष्टी ह्यांच्या मिलाफातून एक वेगळेच जादूभरले रसायन तयार होते. किणीकर मोठे ठरतात ते त्यांच्यामुळे असे क्षण आपल्या हाती लागतात म्हणून!

.................................................................................................................................................................

४)

‘हा धनाढ्य, पंडित, कलावंत हा नेता

हा मुनी, महात्मा, कविश्रेष्ठ हा दाता

मागितले त्यांनी शेवटच्या घटकेला

पीणार कशाने? फुटका त्यांचा पेला।’

किणीकर ह्यांच्याकडे एक विदुषकी जीवनदृष्टी होती. एक सुंदर मिश्किलपणा होता. त्यातून अशा ओळी तयार होतात.

धनाढ्य, पंडित, कलावंत - सगळेच मोठे लोक. पण, कितीही यश मिळाले तरी जीवनेच्छा संपत नाही. सुखाची इच्छा संपत नाही. कितीही यश मिळाले तरी मायेची तृष्णा तशीच राहते. शेवटच्या क्षणी ह्या मायेच्या मद्याचा एकतरी घोट त्यांना हवा असतो. किणीकर मिश्किलपणे लिहितात - पण ही माया भोगणार कशाने? हे सुखाचे मद्य पिणार कशाने? शरीराचा प्याला फुटून गेला आहे. ही खरं तर वेदांतातील दृष्टांतावर आधारित रुबाई आहे, असे मला वाटते.

एका माणसाच्या मागे वाघ लागतो म्हणून तो वेलीचा आधार घेऊन विहिरीत उतरू लागतो, पण खाली ‘आ’ वासून एक अजगर त्याच्याकडे पाहात असतो. तो माणूस वेलीला तसाच लोंबकळत राहतो. तेवढ्यात त्याच्या लक्षात येते की, दोन उंदीर त्या वेलीची मुळे कुरतडत आहेत. आता काहीही झाले, तरी मृत्यू निश्चित आहे, असे त्याच्या लक्षात येते. तेवढ्यात वेलीच्या फुलातून मधाचे दोन थेंब त्याच्या समोर वेलीच्या पानावर पडतात. त्याला वाटते - हे मधाचे थेंब माझ्या जिभेवर आले, तर काय मजा येईल. अशी ही सुखलोलुपता!

‘मागितले त्यांनी शेवटच्या घटकेला

पीणार कशाने? फुटका त्यांचा पेला।।’

.................................................................................................................................................................

५)

‘इतिहास घडविला त्यांची झाली कीर्ती

इतिहास तुडविला त्यांची देखिल कीर्ती

गहिवरला अश्रू कीर्ति - स्तंभावरला

पिंडास कावळा अजून नाही शिवला।।’

एखाद्या माणसाच्या मानेवर एखादे भूत सततचे बसलेले असावे, तसे रुबाईकारांच्या मानेवर मानवी जीवनातील अपूर्णतेचे भूत कायमचे बसलेले असते. कीर्ती झाली म्हणजे माणसाला सगळे मिळते का? ज्यांनी भव्य दिव्य पराक्रम करून इतिहास घडवला त्यांना कीर्ती मिळाली.

‘इतिहास तुडविला त्यांची देखिल कीर्ती’

इतिहास तुडवला म्हणजे नक्की काय केले गेले? चेंगीझ खान, आयव्हन द टेरीबलसारखे क्रूरकर्मा होऊन गेले, त्यांना मनात ठेवून ही ओळ लिहिली गेली आहे काय? त्यांची अपकीर्ती झाली. म्हणजे कीर्तीच की!

का आपल्या जीवनकालापर्यंतची परंपरा मोडून नवीन काही केले, त्यांच्यासाठी इतिहास तुडवण्याची प्रतिमा वापरली आहे? अनेक समाजसुधारक इथे किणीकरांना अभिप्रेत आहेत का?

जे काही असेल ते असो, किणीकर ह्या ना त्या प्रकारच्या कर्तृत्वाबद्दल किंवा अपकर्तृत्वाबद्दल बोलत आहेत. आता ह्या लोकांच्या कीर्तीचे जे स्तंभ सगळ्या दुनियेच्या मनात उभे आहेत त्या स्तंभांवर कुणी अश्रू ढाळले असते तर ठीक होते. पण असे काही साधे लिहिले तर ते किणीकर कसले? ते लिहितात -

‘गहिवरला अश्रू कीर्ती स्तंभावरला’

अश्रू गहिवरला म्हणजे काय? ह्यावर विचार होण्याआधीच किणीकर लिहून जातात-

‘पिंडास कावळा अजून नाही शिवला’

इथे आपल्याला संशय यायला लागतो की हे अश्रू ज्यांनी कीर्ती मिळवली त्यांचेच तर नाहीत ना? कीर्ती मिळाली तरी समाधान मिळते का? कीर्ती मिळाली की सर्व इच्छा पूर्ण होतात का? संपृक्ती मिळते का? तृप्ती मिळते का? का मानवाचे कर्तृत्व ही फक्त त्याच्या अहंकाराची अभिव्यक्ती आहे?समाधान हे कर्तृत्वाच्या पलीकडे गेल्यावर मिळते असे किणीकरांना सुचवायाचे आहे का? अश्रूलाही गहिवर फुटावा अशी ही मानवी कर्तृत्वाची शोकांतिका आहे, असे किणीकरांना म्हणायचे आहे का?

किणीकर जे भणंग आयुष्य जगले त्याचे खरे कारण - त्यांच्या मनात सतत जागत असलेली मानवी कर्तृत्वाच्या फोलपणाची प्रखर जाणीव - हे होते का?

.................................................................................................................................................................

६)

‘या पाणवठ्यावर आले किति घट गेले

किति डुबडुबले अन बुडले वाहुनि गेले

किति पडुनि राहिले तसेच घाटावरती

किति येतिल अजुनि नाही त्यांना गणती ।।’

किणीकरांच्या अनेक रुबाया आपल्याला कळल्या आहेत, असे आपल्याला वाटते, पण त्यांच्यात लपलेला गूढ अर्थ कित्येकदा आपल्या लक्षात आलेला नसतो. वरची रुबाई तशीच आहे.

पाणवठा म्हणजे हे जग आणि घट म्हणजे माणसे हे लक्षात घेतले की अर्थ लक्षात आला, असे आपल्याला वाटते. पण, पाणवठा नक्की कशाला म्हटलेले आहे? घाट म्हणजे काय? घट पाणवठ्यावर येऊन पाणी घेऊन जाण्या ऐवजी बुडतात का? काही घट वाहून का जातात? काही घट घाटावर पडून का राहतात, असे प्रश्न आपल्या मनात आले की, ही रुबाई खूप गूढ वाटू लागते.

वेदांतात घट हे देहाचे प्रतीक मानले गेले आहे. घटाच्या आत अवकाश असते, बाहेरही अवकाश असते. त्याचप्रमाणे देहात शुद्ध चैतन्य तत्त्व असते आणि त्याच्या बाहेरही शुद्ध चैतन्य तत्त्व असते.

मग हे घट ज्या पाणवठ्यावर येत आहेत, तो पाणवठा कसला आहे? हे पाणी कसले आहे? ह्या पाण्यावरचा घाट कसला आहे? हे पाणी म्हणजे मानवाचे मन आहे का? मानवाच्या इच्छा आहेत का? वेदांताने मानलेले अंतःकरण चतुष्ट्य आहे का? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार आहे का? का हे पाणी म्हणजे फक्त विचार आहे? अध्यात्माच्या भाषेत विचारांना पाणी म्हटले गेलेले आहे.

ह्या पाण्याभोवती बांधला गेलेला घाट तत्त्वज्ञानाचा घाट आहे का? मानवी विचारांच्या पाण्यामध्ये, मानवी भावनांच्या पाण्यामध्ये, अनेक घट डुबडुबले आहेत. बुडून गेले आहेत. काही घट तत्त्वज्ञानाच्या घाटावर पडून राहिले आहेत.

ही रुबाई जेवढी आकर्षक आहे तेवढीच गूढही आहे - किणीकरांसारखीच!

.................................................................................................................................................................

७)

‘मृदगंध उमलला, आले मृग - नक्षत्र

चालली अवेळी ओलेती अपरात्र

वाकली जरा पिळताना ओला पदर

आतून जरासे हलले अर्धे दार।।’

किणीकरांची ही एक अप्रतिम रुबाई! किणीकर कित्येकदा फार अप्रतिम ओळी लिहून जातात. उपमा वगैरे अलंकार कवितेत महत्त्वाचे असतातच पण कवितेची खरी जान तिच्यात व्यक्त झालेल्या तत्त्वज्ञानाप्रमाणे तिच्यातील प्रतिमांतच असते. प्रतिमा जितक्या गूढ आणि सुंदर असतात, तितक्या प्रमाणात त्या कवितेचे मोल वाढत जाते.

‘मृदगंध उमलला, आले मृग - नक्षत्र

चालली अवेळी ओलेती अपरात्र’

मृग नक्षत्र आले, पाऊस पडला, मृदगंध दरवळला सगळे ठीक आहे. सामान्य कवी असता तर त्याने ह्या माहोलातून एखाद्या सुंदर युवतीला ओले वगैरे करून चालवले असते.

पण किणीकर लिहितात -

‘चालली अवेळी ओलेती अपरात्र’

अंगावर काटा याव्यात अशा ह्या ओळी!

ह्या ओळीत मला रमायला होते. माझ्या डोळ्यासमोर घराच्या खिडकीत बसून ही ओलेती रात्र बघणारे किणीकर येतात.

तेवढ्यात पुढची ओळ येते -

‘वाकली जरा पिळताना ओला पदर’

येथे ओलेत्या युवतीची एक भन्नाट प्रतिमा साकार होऊ लागते.

पुढे किणीकर लिहितात -

‘आतून जरासे हलले अर्धे दार’

येथे ही प्रतिमा अनेक अर्थांचे प्रकाश पसरवू लागते.

पदरामागचे हे कसले अर्धे दार आहे?

तिच्या वक्षांच्या मधली फट थोडी थरथरली का?

का आकाशातील वक्षांसारखे ढग थोडे फाकले आणि त्यातून थोडे चांदणे दिसले? का हा किलकिल्या होणाऱ्या दाराचा संदर्भ त्या युवतीच्या योनीशी आहे? मृग नक्षत्रातल्या पावसाने येऊ घेतलेल्या सृजनाशी आहे?

किणीकरांच्या हातून लिहिली गेलेली ही रुबाई आहे. अद्भुत रुबाई! अशी रुबाई मर्त्य मानव ठरवून लिहू शकत नाही. ती त्याच्या ह्यातून अनाहूतपणे लिहिली गेलेली असते.

ह्याच अर्थाने मर्ढेकर लिहून गेले आहेत काय?

‘आभाळाच्या पल्याड स्पंदन

टिपरी त्याची ह्या मडक्यावरी…’

.................................................................................................................................................................

८)

‘चांदणे सांडले गालावरती चिंब

पदरात झिरपले पुनवेचे प्रतिबिंब

दे भरूनि आणखी, पुन्हा भरू दे पेला

एकदाच आला क्षण गेला तो गेला।’

ही अजून एक सुंदर प्रतिमा!

‘चांदणे सांडले गालावरती चिंब

पदरात झिरपले पुनवेचे प्रतिबिंब’

पहिल्या नजरेत चांदण्यात उभ्या असलेल्या युवतीचे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. गोऱ्या गालावरून चांदणे वगैरे परावर्तित होते आहे. पुनवेचा चंद्र जसा गोलाकार आणि भरभरून असतो तसे तिचे वक्ष पदरातून डोकावत आहेत.

आणि ह्या युवतीला कवी मद्य मागतो आहे आणि म्हणतो आहे की, कृपया माझा प्याला मद्याने भर - हा सौंदर्याने भरलेला क्षण मला मद्याच्या साथीत एन्जॉय करू देत. पण, ह्या रुबाईच्या पहिल्या ओळीत ‘सांडले’ हा शब्द का आला, ह्याचा आपण विचार करू लागलो, तर ह्या रूबाईतील प्रतिमा एक वेगळेच रूप घेते.

ह्या शब्दाचा विचार करत असताना माझ्या डोळ्यासमोर एक प्रतिमा आली. एक विस्तीर्ण मैदान आहे, त्यावर चांदणे ‘सांडलेले’ आहे. त्या मैदानात एक जलाशय आहे. त्यात पुनवेचा चंद्र झिरपला आहे.

उमर खय्यामच्या रुबायांच्या बहुतेक आवृत्यांवर एक सुंदर मैदान, एक जलाशय, एक झाड आणि त्या झाडाखाली पहुडलेला शायर असे चित्र असते. त्या शायर महाशयांच्या हातात अर्थातच पेला असतो आणि एक युवती तो पेला भरत असते.

हीच प्रतिमा किणीकरांनी किती सुंदर केली आहे बघा! चांदण्यात न्हालेली युवती असो वा पृथ्वी, किणीकर त्या काव्यानुभवाला फार फार सुंदर शब्द-प्रतिमांत बांधून अजरामर करतात.

‘Here with a Loaf of Bread beneath the Bough,

A Flask of Wine, a Book of Verse—and Thou

Beside me singing in the Wilderness—

 And Wilderness is Paradise enow’

(हातात तुझिया मद्याची ती सुरई

खालती पसरली पक्वांनांनी रजई

मनात कविता आणि सुरांची राई

ह्या विस्तीर्ण काननी स्वर्गची ठाई ठाई)

सुखाच्या दोन कल्पना. कुणाच्या ओळी जास्त सुंदर आहेत, कुणाची साकी जास्त सुंदर आहे - किणीकरांची की, उमर खय्यामची? वाचकांनी ठरवायचे आहे!

.................................................................................................................................................................

९)

‘हा असा राहुदे असाच खाली पदर

असा राहुदे असाच ओला अधर

ओठात असू दे ओठ असे जुळलेले

डोळ्यात असू दे स्वप्न निळे भरलेले।।’

आहे तो क्षण प्रेयसीबरोबर भोगून घ्यायचा, ही रुबाईकरांची मुख्य प्रेरणा असते. उन्नत वक्ष माझ्यासाठी असेच उघडे राहू देत. माझ्या चुंबनाने ओले झालेले तुझे ओठ असेच ओले राहू देत. माझे आणि तुझे ओठ असेच जुळलेले राहू देत.

इथपर्यंत ही रुबाई सरळ जाते. मग ती उलगदपणे एक वळण घेते.

‘डोळ्यात असू दे स्वप्न निळे भरलेले’

हे स्वप्न निळे का आहे?

आपल्या डोळ्यात हे निळे स्वप्न असेच भरलेले राहू देत - असे किणीकर का म्हणत आहेत?

हा आसमानाचा निळा आहे का? का पाण्याचा निळा आहे?

असीम सौंदर्याच्या असीम निळ्या रंगाचे हे स्वप्न आहे का?

का अजून काही आहे?

पाश्चात्य जगात, विशेषतः पाश्चात्य पेन्टिंग्जच्या दुनियेत निळा रंग विश्वास, एकमेकांवरची श्रद्धा ह्यांचे प्रतीक म्हणून वापरतात.

एकमेकांवरच्या प्रेमाचे आणि विश्वासाचे हे निळे स्वप्न आहे का?

पाश्चात्य जगात निळा रंग स्वर्गाचे प्रतीक म्हणूनही वापरतात.

डोळ्यात सुखाच्या ह्या स्वर्गाचे स्वप्न असेच भरलेले राहू देत, असे तर नाही किणीकरांना सुचवायचे?

का हा रंग भावनांच्या विषारीपणाचा आहे? त्यांच्या डंखाचा आहे?

म्हणजे हा भगवान शंकरांच्या गळ्याचा निळा आहे? हा निळा रंग विषाचा आहे? भगवान शंकर जे विष प्याले, ते कसले विष आहे? अध्यात्माची भाषा ज्यांना माहीत आहे, त्यांना माहीत आहे की, हे विष भावनांचे आहे. आपल्या भावना आपल्याला ह्या पृथ्वीवर गुंतवून ठेवतात. आपल्याला विविध कर्मे करायला लावून पुढचे जन्म अनिवार्य करतात. आपल्याला मुक्तीपासून दूर ठेवतात. म्हणून त्या विषारी!

भगवान शंकर भावनांचे विष प्याले. आणि आपल्या तपामुळे त्यांच्या पार गेले. मुक्त राहिले. म्हणजेच त्यांनी हे विष पचवले.

ह्या रुबाईत अनिवार प्रेमाचे बंधन आहे. हे हवेहवेसे वाटणारे बंधन आहे. हे हवेहवेसे वाटणारे विष आहे. हे विष कायम जवळ राहावे, असे तर हे स्वप्न नाही?

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

१०)

‘ही रात्र आजची पुन्हा न भेटायाचे

हे दार आतुनी पुन्हा न लागायाचे

मिटु नकोस डोळे अर्ध्यावर मिटलेले

पुसु नकोस ओघळ स्वप्नांचे फुटलेले।।’

मानवी आयुष्याची, नात्यांची आणि सुखाची अस्थिरता संवेदनशील रुबाईकारांना नेहमीच अस्वस्थ करते. पण, रुबाईकार नुसतेच संवेदनशील नसतात. त्यांच्या संवेदनशीलतेने त्यांना मानवी जीवनाच्या मूल तत्त्वांकडे नेलेले असते. अध्यात्माकडे नेलेले असते. जीवनाची अत्यंत दुःखदायक अस्थिरता त्यांनी जाणीवपूर्वक स्वीकारलेली असते. 

विरह आणि मृत्यू त्यांनाही त्रास देतो, पण ह्या अस्थिरतेच्या डोळ्यात डोळा घालून बघण्याची त्यांच्यात हिंमतही असते. स्वर्गीय सुखाची रात्र समोर उभी आहे. पण त्या रात्रीनंतर पुढे विरह उभा आहे. कदाचित मृत्यूही असेल.

‘ही रात्र आजची पुन्हा न भेटायाचे

हे दार आतुनी पुन्हा न लागायाचे’

आत्ता ह्या क्षणी सुख दोघांच्याही समोर उभे आहे. आणि त्यानंतर पुढे कायमचा विरह!

‘मिटु नकोस डोळे अर्ध्यावर मिटलेले

पुसु नकोस ओघळ स्वप्नांचे फुटलेले।।’

हा त्यांच्या प्रेमाचा उंबरठा आहे. तिचे डोळे अर्धे मिटलेले आहेत. जे सुख समोर उभे आहे त्यापासून ती हळूहळू दूर चालली आहे का? डोळे संपूर्ण मिटणे म्हणजे नात्यापासून ‘साईन-ऑफ’ होणे आहे का? प्रेमापासून दूर जाणे आहे का? सगळे विसरून पुढचा प्रवास सुरू करणे आहे का?

ह्या रुबाईतील सगळ्यात महत्त्वाची ओळ म्हणजे -

‘पुसु नकोस ओघळ स्वप्नांचे फुटलेले’

चक्काचूर झालेल्या स्वप्नांचे ओघळ पुसायचे नाही आहेत. त्यांनी पाठलाग केला तर तो स्वीकारायचा आहे का? हे विरहाचे दुःख स्वीकारून जगायचे आहे का?

हे दुःख स्वीकारणे म्हणजेच अस्थिरतेला स्वीकारणे आहे का?

तुमची स्वप्ने पूर्ण होओत अथवा त्यांचा चक्काचूर होवो, तुम्ही स्वतःच काही काळाने त्यांच्यासह ह्या पृथ्वीवरून निघून जाणार आहात. मग डोळ्यातल्या अश्रूंचे ओघळ आपण पुसतो, तसे स्वप्नांचे ओघळ कशाला पुसायचे?

उमर खय्याम ची अशीच एक रुबाई आहे -

‘The Worldly Hope men set their Hearts upon

Turns Ashes—or it prospers; and anon,

Like Snow upon the Desert's dusty Face

Lighting a little Hour or two—is gone’

(ह्या जगती मनुष्ये देती, स्वप्नांना हृदये त्यांची

कधी होती स्वप्ने पूर्ण - कधी राखही होते त्यांची;

ही स्वप्ने - म्हणजे स्फटिक हिमाचे, पडलेले वैराणी

उगवता सूर्य अन् होते पळभरात वाफ तयांची)

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......