‘सोलापूर जिल्ह्याचे शिल्पकार : भाग १’ - सोलापूरच्या संघर्षमयी इतिहासाचे ताणेबाणे उलगडणारे पुस्तक!
ग्रंथनामा - झलक
पन्नालाल सुराणा
  • ‘सोलापूर जिल्ह्याचे शिल्पकार : भाग १’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Tue , 05 March 2024
  • ग्रंथनामा झलक सोलापूर Sopapur सोलापूर जिल्ह्याचे शिल्पकार Solapur Jilhyache Shilpkar

प्रा. डॉ. चंद्रकांत चव्हाण यांचे ‘सोलापूर जिल्ह्याचे शिल्पकार : भाग १’ हे पुस्तक नुकतेच प्रगती मल्टिमीडिया सर्व्हिसेसतर्फे प्रकाशित झाले आहे. यात त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील ३० कर्तबगार स्त्री-पुरुषांचा परिचय करून दिला आहे. या पुस्तकाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पन्नालाल सुराणा यांनी लिहिलेल्या सविस्तर प्रस्तावनेचा हा संपादित अंश…

.................................................................................................................................................................

सोलापूरचे प्रा. डॉ. चंद्रकांत संदीपान चव्हाण यांनी लिहिलेल्या जिल्ह्यातील ३० निवडक कर्तबगार स्त्री-पुरुषांचा संक्षिप्त परिचय करून देणाऱ्या लेखांचा हा संग्रह आहे. या नामवंतांपैकी अप्पासाहेब वारद यांचे कार्य हे १९व्या शतकात झाले. माढ्याचे जी. डी. साठे, हाजी हजरत खान अशा पाच-सात जणांचे कार्य हे २०व्या शतकाच्या पूर्वार्धातील आहे, तर बाकीच्यांचे स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळातले आहे.

पुण्यश्लोक अप्पासाहेब वारद यांनी सोलापूर जिल्ह्यात तसेच जवळच्या कर्नाटक व आंध्रामध्ये आडत दुकाने काढली होती. मुंबईलाही आडत दुकान सुरू केले होते आणि जपानमध्येही दुकान काढण्याच्या प्रयत्नात ते होते. पण काळाने अचानक झडप घातली. त्या काळातल्या देशातल्या मोजक्या प्रमुख श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांची गणना होत असे. सोलापुरातील नरसिंग गिरजी या नावाने असलेल्या कापड गिरणीच्या उभारणीत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. किंबहुना ती ‘वारद गिरणी’ म्हणूनच ओळखली जात होती. सोलापूर परिसरात आधुनिक शाळा विशेषतः मुलींसाठीचे हायस्कूल त्या काळात सुरू करण्याला त्यांनी मदत केली होती. संस्कृत पाठशाळा व वीरशैव धर्माची माहिती देणारी पुस्तके प्रकाशित करण्यालाही त्यांनी भरपूर सहाय्य दिले.

२०व्या शतकाच्या सुरुवातीलाच सोलापूर हे मुंबई इलाक्यातील चौथ्या क्रमांकाचे औद्योगिक केंद्र मानले जात होते. या भागात त्या काळी थोडा कापूस होत होता. मुख्य म्हणजे बहुतेक प्रदेश दुष्काळप्रवण आणि मोठे उद्योग नसलेला असल्याने कमी मजुरीवर काम करणारे स्त्री-पुरुष मोठ्या संख्येने उपलब्ध असायचे. मुंबई-मद्रास (आता चेन्नई) या ब्रॉडगेज रेल्वेमार्गावरील सोलापूर हे महत्त्वाचे स्टेशन असल्याने मुंबईच्या उद्योगपतींना येथे येणे-जाणे सुलभ झाले. इथल्या बहुतेक कापडगिरण्या त्यांनीच सुरू केल्या. लोकांच्या हाताला पुरेसे काम नसल्याने कमी मजुरी देणारा विडी वळण्याचा धंदाही वाढला. लांबच्या चंद्रपूर जिल्ह्यातून तेंदूपत्ता पानपुडे व जवळच्या एक-दोन जिल्ह्यांतून तंबाखू आणून विडी वळण्याचा उद्योग अनेक गरिबांच्या घरा-घरांत सुरू झाला. हातमागाचा जुना परंपरागत उद्योग होता, त्याला तेलंगणातून आलेल्या कारागिरांची मोठी मदत झाली.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

...............................................................................................................................................................

मुंबईच्या खालोखाल कापड गिरणी कामगारांची तगडी संघटना कम्युनिस्टांनी सोलापुरात सुरू केली. भारत सरकारने १९०४ साली सहकारी चळवळीचा कायदा केला. जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सहकारी यंत्रणेमार्फत कर्ज पुरवण्याच्या कामात माढ्यात जी. डी. साठे यांनी सुरुवात केली.

सोलापूरचे दानशूर हिराचंद नेमचंद हे स्वतः मोठे व्यापारी व शिक्षणसंस्थांना भरपूर सहाय्य करणारे म्हणून प्रसिद्धीस पावले होते. शहरातील शतकपूर्ती केलेल्या सध्याच्या ‘हिराचंद नेमचंद वाचनालया’ची स्थापना ही हिराचंद शेठजीच्या जन्मानंतर लगेच झाली होती. म्हणून ते तिला आपली धाकटी बहीण मानत. पुढे तिच्या शताब्दीच्या म्हणजे १९५७ साली त्या वाचनालयाला हिराचंदजीचे नाव देण्यात आले.

१९३५ साली जपानने चीनवर हल्ला केला होता. त्या वेळी चीन व भारत हे दोन्ही देश ब्रिटिश साम्राज्याच्या प्रभावाखाली होते व दोन्ही देशात स्वातंत्र्य चळवळी सुरू झाल्या होत्या. जपानी आक्रमक चिनी नागरिकांवर पाशवी अत्याचार करत होते. लढाईत अनेक सैनिक जखमी होत होते. त्यांची सुश्रुषा करण्यासाठी भारताने वैद्यकीय मदत पाठवावी, असे आवाहन चीनमधील राष्ट्रीय चळवळीने काँग्रेसला केले होते. त्यानुसार काही डॉक्टरांचे पथक चीनला गेले. त्यात सोलापूरचे डॉ. द्वारकानाथ कोटणीस होते. रणांगणावर गोळीबार चालू असतानाही तिथे जखमी होवून पडलेल्या सैनिकांना वैद्यकीय सहाय्य देण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून डॉ. कोटणीस हे अथक परिश्रम करत होते. त्यांनी पुढे तिथल्याच एका तरुणीशी लग्न केले व अखेरपर्यंत तेथेच राहिले. त्यांच्यावर ज्येष्ठ चित्रपट निर्माते व्ही. शांताराम यांनी ‘डॉ. कोटणीस की अमर कहानी’ हा चित्रपट काढला, जो सबंध आशिया खंडात गाजला.

प्रा. चंद्रकांत चव्हाण यांच्या या लेखसंग्रहात डॉ. कोटणीसांवर मोठा लेख आहे. तसेच १९२५ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या दलित जातीसाठीच्या वसतिगृहाचा उल्लेख आहे. त्याची जबाबदारी ज्यांच्यावर सोपवण्यात आली होती. त्या जिवाप्पा उर्फ अण्णासाहेब ऐदाळे यांना १९३७ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर या मजूरवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या जागेवर बाबासाहेबांनी उभे केले व ते विजयी झाले. त्यामुळे सोलापूर भागातील मजूर व दलित वर्ग यांचा आवाज विधानसभेत उठवू लागला.

आमदार ऐदाळे यांच्यावरील लेखात त्या वेळच्या सामाजिक स्थितीचे चित्र उभे झाले आहे. स्वतः ऐदाळे यांच्या एका भाचीचे लग्न पाळण्यातच लावण्यात आले होते. ती पुढे हायस्कूलमध्ये शिकू लागल्यावर सासरचे लोक तिला नांदायाला न्यायला आले, तेव्हा अण्णासाहेबांनी त्यांना विरोध करून परत पाठवले. पर्यायाने तशा सर्वच मुलींना नवे जीवन प्राप्त झाले. बहुतेक सर्व सामाजिक व्यवहारात समतेवर आधारलेले वळण अंगीकारले जावे, यासाठी आमदार ऐदाळे किती प्रयत्नशील होते, याचे वर्णन लेखकाने चांगले केले आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळातील हाजी हजरत खान यांचा परिचयही प्रा. चव्हाण यांनी चांगला करून दिला आहे. सोलापुरातील नामवंत बांधकाम कंत्राटदार व भारताचे उद्योगरत्न वालचंद हिराचंद यांच्याप्रमाणे हजरतखान यांनी अनेक सार्वजनिक बांधकामे केली. विशेषतः लक्ष्मी-विष्णू मिलच्या काही भागाचे बांधकाम, सिव्हिल हॉस्पिटलची इमारत, रेल्वे स्टेशनसमोरील टपाल खात्याची इमारत आदी अशा अनेक अतिशय देखण्या इमारती त्यांनी बांधल्या.

१९४६ साली बॅ. जीना हे आपल्या पाकिस्तानच्या प्रचारासाठी सोलापूरला आले होते. हजरत खान यांचा मुलगा सर अब्दुल लतीफ यांनी पाकिस्तानात यावे असा त्यांनी आग्रह धरला. तेव्हा आपल्या काही सहकाऱ्यांना एकत्र जमवून लतीफ यांनी जिनाना सांगितले की, ‘हेच आमचे वतन आहे. आमचे पूर्वज येथेच जन्मले व येथेच दफन झाले आहेत आणि आमचीही तशीच इच्छा आहे.’

स्वातंत्र्य चळवळीतील मोठे नेते तुळशीदास जाधव, यांनी ९ वर्षे गिरणी कामगार म्हणून व नंतर लोकल बोर्डाच्या शाळेत शिक्षक म्हणून काम केले. नंतर पूर्ण वेळ चळवळीसाठी दिला. सोलापूर शहरातील मेकॅनिकी चौकात सत्याग्रह केला. पोलिस त्यांना तिरंगा झेंडा फेकून द्यायला सांगत होते. पण त्यांनी जिद्दीने झेंड्याची काठी धरून ठेवली. पोलिसांचे अनेक तडाखे खाल्ले व शेवटी दीर्घ तुरुंगवासाची सजा भोगली.

भाई छन्नूसिंग चंदेले स्वातंत्र्य चळवळीत भाग घेत असतानातच शहरातील प्रचंड संख्या असलेल्या मजूरांच्या प्रश्नात लक्ष घालत होते. कम्युनिस्टांनी त्यांची संघटना बांधायला सुरुवात केली, त्या वेळी छन्नूसिंगांनी त्या कार्यकत्यांना भरपूर सहकार्य केले. १९५६ साली राज्य पुनर्रचना झाली. इतर काही ठिकाणी एका भाषेचे एक राज्य करण्यात आले. मात्र मुंबई शहरावर गुजरातचाही हक्क आहे असा ,आग्रह काही जणांनी धरल्यामुळे मुंबईचे विशाल द्वैभाषिक करण्यात आले. काँग्रेसमध्ये विधानसभा नेतृत्वाचा वाद सुरू झाला. तेव्हा भाऊसाहेब हिरे यांच्या विरोधात यशवंतराव चव्हाणांना निवडून आणण्यात छत्रसिंग यांनी मोठी कामगिरी बजावली.

पुढे मात्र ग्रामीण भागातील नेतृत्वाला पुढे आणायचे या हेतूने यशवंतराव चव्हाणांनी छत्रूसिंगऐवजी करमाळ्याचे नामदेवराव जगताप यांच्या हातात सूत्रे सोपवली. या दोन्ही नेत्यांवरील लेख वाचकांना पडद्यामागील हालचालींची चांगली माहिती देणारे आहेत.

कामगारांचे शहर असणाऱ्या सोलापूरात त्यांची संघटना उभारण्याच्या कामी काही उच्चजातीय ध्येयवादी कार्यकत्यांनी पुढाकार घेतला असला, तरी फार लवकर कामगारातूनच नेते पुढे आले. वर उल्लेख केल्याप्रमाणे शेजारच्या तेलुगूभाषीक दुष्काळी पट्ट्यातील अनेक स्त्री-पुरुष सोलापूरात कामगार म्हणून काम करू लागले. त्यातूनच कमी शिकलेले, पण विलक्षण संघटनाकौशल्य असलेले कॉ. व्यंकप्पा मडूर हे संघटनेचे नेते म्हणून महत्त्वाची भूमिका बजावू लागले. पुरेसा महागाईभत्ता मिळावा, यासाठी त्यांनी खूप धडपड केली. स्वतः कामगार नसताना ते गिरणीत आलेच कसे, या कारणावरून त्यांच्यावर खटला भरला गेला व शिक्षा भोगावी लागली. पण त्यांनी आपली जिद्द सोडली नाही. वेगवेगळ्या जातीच्या कामगारांची एकजूट उभी करण्यात त्यांनी खूप शक्ती पणाला लावली. कामगारांसाठी बांधल्या गेलेल्या घरकुलातील काही गाळे मातब्बर लोकांना देण्याचा घाट अधिकाऱ्यांनी घातला होता. तो मडूर यांनी हाणून पाडला. त्यांनी नगरपालिका निवडणूक लढवली व पुढे आमदार म्हणूनही महत्त्वाची कामगिरी बजावली.

जिल्ह्यात काँग्रेस चळवळीचे वर्चस्व असताना कामगार संघटनेत तो विचार रुजू नये, हे काही जणांना खटकत होते. डॉ. आंत्रोळीकर व छन्नूसिंग यांनी कामगारातून नवे नेतृत्व उभे केले. स्वतः कुस्तिगीर व क्रीडापटू असलेल्या आबासाहेब किल्लेदारांना त्यांनी राष्ट्रीय गिरणी कामगार संघाचे अध्यक्ष केले. मिळालेल्या संधीचे त्यांनीही सोने केले. कामचुकारपणा करू नका असे वळण देत देत त्यांनी आपली संघटना मजबूत पायावर उभी केली. १९४८ सालच्या बी. आय. आर. अॅक्टनुसार त्यांच्या संघाला प्रातिनिधिक म्हणून मान्यता मिळाली. त्यामुळे कामगारांचे अनेक प्रश्न चर्चा व वाटाघाटीतून त्यांना सोडवता आले. आबासाहेब हे सोलापूर शहराचे नगराध्यक्ष म्हणून निवडले गेले. जुन्या मातब्बर सभासदांना बाजूला सारून एक कामगार शहराचा पहिला नागरिक बनला. हा एकप्रकारे इतिहासच झाला. पुढे आबासाहेब आमदार म्हणूनही निवडून आले होते.

या संग्रहात फक्त दोनच महिलांवर लेख आहेत. पंडिता सुमतीबाई शहा यांनी आपले सर्व जीवन जैन धर्माच्या प्रसारासाठी वेचले. धर्माचा सखोल अभ्यास होता व आचरणही साध्वीसारखे होते. सोलापूरातील मोठे जैन शिक्षणसंकुल त्यांनी उभे केले. धर्मप्रचारार्थ त्या जपानमध्ये गेल्या होत्या. आणि अमेरिकेतल्या सर्वधर्मपरिषदेतही त्यांनी जैन धर्माची माहिती प्रभावीपणे मांडली होती.

दुसऱ्या महिला म्हणजे मीनाक्षीबाई साने. या कम्युनिस्ट पार्टीच्या निष्ठावंत व झुंझार कार्यकर्त्या होत्या. सोलापूरातील विडी कामगारांचा पहिला संप त्यांनी यशस्वीरित्या घडवून आणला, ज्याची देशभर चर्चा झाली. चळवळीतल्या एका सहकाऱ्याबरोबर त्यांनी विवाह केला. पण त्याची पुरुष वर्चस्ववादी वृत्ती पाहून त्याला सोडले व दुसऱ्या सहकाऱ्याला जीवनसाथी मानले. या घटनेचे वादळी साद-पडसाद उमटले. पण मीनाक्षीबाई डगमगल्या नाहीत. विचारांशी प्रामाणिक राहणे हे त्यांनी सर्वो परी मानले. वैयक्तिक जीवनातील या घटनेचा आपल्या चळवळीतील कामावर कसलाही परिणाम होऊ न देता, त्यांनी अखेरपर्यंत कामगार संघटनेचे काम चिकाटीने केले. पक्षाच्या धोरणांबद्दल मतभेद झाल्यावर त्यांनी तेही लपवून ठेवले नाहीत.

‘बळी’ या कादंबरीने अवघ्या महाराष्ट्राला सोलापूरातील सेटलमेंट या अजब प्रकाराची ओळख करून दिली. १९व्या शतकात ब्रिटीश सत्ताधाऱ्यांनी उपजिविकेचे हक्काचे साधन नसलेल्या काही वंचित व भटक्या जातींना कायद्याने गुन्हेगार ठरवले व त्यांना तारेच्या कुंपणाच्या आतच राहायची सक्ती केली. रोज पोलिस ठाण्यावर हजेरी द्यावी लागायची. त्या स्त्री-पुरुषांना आधुनिक शिक्षणाबरोबर माणुसकीचे हक्क म्हणजे काय याची ओळख करून देण्याचे काम मालतीबाई बेडेकर आदी कार्यकर्त्यांनी केले.

सगळ्या जातीलाच कायमचे गुन्हेगार म्हणणे हे चुकीचे आहे. त्यांच्यात शिक्षण प्रसार करावा व जबाबदार नागरिक म्हणून वागण्याचे वळण लावावे. असे प्रयत्न करणाऱ्या ध्येयवादी स्त्री-पुरुष कार्यकत्यांनी ते कुंपण काढले जावे, अशी मागणी लावून धरली. १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी स्वतः सोलापुरात येऊन त्या जाती जमातींना मुक्त केले. त्यातीलच एक नागरिक भीमराव जाधव यांनी धडाडीने समाज सुधारवण्याचे काम चालवले व शहराचे महापौरपदही भूषवले.

अशाच एका प्रवर्गात असलेले चंद्राम चव्हाण गुरुजी यांनी आपल्या जातबांधवांना शिक्षण घ्यायला प्रवृत्त केले. रानात शेत नाही व गावात घर नाही, अशी स्थिती असलेल्या समाजबांधवांना स्वतःचे छोटेसे छप्पर असावे यासाठी चव्हाण गुरुजींनी सत्ताधाऱ्यांच्या मागे लागून विजापूर रस्त्यावर नेहरूनगर ही वसाहत उभारली व शेकडो लोकांना स्वतःचे घरकुल मिळवून दिले.

भंडारकवठे येथील दीनानाथ कमळे गुरुजी हेही या सर्व चळवळीत सतत क्रियाशील राहिले. मागास जातीजमातीतील मुलामुलींना शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देण्यावर त्यांनी भर दिला. राजकीय क्षेत्रात क्रियाशील असल्याने पुढे बॅरिस्टर अंतुले यांच्या मंत्रीमंडळात कमळे गुरुजींना मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी दक्षिण सोलापुर तालुक्यात माध्यमिक शाळा काढण्यासाठी संस्था सुरू केली. आणि १२-१५ गावात तशा शाळा काढल्या. जिल्ह्याच्या व राज्याच्या कडेवर असलेल्या या गावांकडे सरकारी योजनांचा प्रवाह पोहोचावा यासाठी गुरुजींनी भगीरथ प्रयत्न केले. या सगळ्यांवरचे पुस्तकातील लेख वाचकांना खूप नवी माहिती देणारे आहेत.

लोकांना पोटाला भाकर मिळण्यासाठी हातांना काम मिळवून दिले पाहिजे व त्यासाठी आधी शेतजमिनीला पाणी दिले पाहिजे, असा व्यापक ध्येयवाद उराशी बाळगलेले भाई गणपतराव देशमुख यांनी स्वतःला विकासकामात गाडून घेतले होते. जिल्ह्यात स्थापन झालेल्या पण लवकरच राज्यातूनही नामशेष होऊ लागलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या कामाची धुरा त्यांनी खांद्यावर घेतली. दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांच्या जमिनीवर जी बांधबंदिस्ती केली, त्या रक्कमेचा मोठा कर्जाचा बोजा सरकारने शेतकऱ्यांवर टाकला होता. हा जुलूम होता. ती कर्जे सरकारने माफ केली पाहिजेत, या मागणीसाठी गणपतरावांनी मंत्रालयावर प्रचंड मोर्चा नेला व तो यशस्वी झाला.

सांगोला मतदारसंघातून गणपतराव १० वेळा निवडून गेले. हा त्यांचा विक्रम राज्यशास्त्रीय ग्रंथातही नोंदवण्यात आला आहे. त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून जशी ठाशीव कामगिरी केली, तसेच दोनदा बिगरकाँग्रेस मंत्रीमंडळात मंत्री म्हणून अनेक चांगल्या गोष्टी केल्या. सांगोला तालुक्याला सिंचन सोय मिळणे अवघड असले तरी होईल तेवढे सरकारने केले पाहिजे, असा लकडा त्यांनी लावला. सांगोल्याला शेतकऱ्यांची सहकारी सूतगिरणी त्यांनी उभी करून यशस्वीपणे चालवली व आशिया खंडात त्याची कीर्ती पसरवली. महिलांना काम मिळावे म्हणून त्यांनी आधी छापखाना सुरू केला होता, पण गरजेच्या मानाने तो फारच किरकोळ होता. म्हणून त्यांनी महिलांची सहकारी सूत गिरणी उभारण्याचाही विक्रम केला. आधुनिक काळातल्या या युगकर्त्याचा ठसठशीत परिचय प्रा. चव्हाण यांनी फार प्रभावीपणे करून दिला आहे.

सोलापूरचे त्या वेळचे अग्रगण्य व्यापारी हिराचंद नेमचंद दोशी यांनी व्याजबट्ट्याच्या धंद्याकडे न वळता सर्व लक्ष व्यापारावर केंद्रित केले. हळूहळू नव्या यंत्राच्या सहाय्याने कारखानदारी वाढवायचे दिवस आले होते. पण हिराचंद शेठजींचे थोरले चिरंजीव वालचंद यांनी सुरुवातीला बांधकाम कंत्राटे घेण्यावर भर दिला. थोड्याच कालावधीत ते मुंबईत दाखल झाले. त्या वेळी सागरी वाहतूक सगळी युरोपीय भांडवलदारांच्या हातात होती. त्या क्षेत्रातही स्वदेशीचे बीजारोपण करण्यासाठी वालचंदनी जहाजबांधणीचे काम सुरू केले. जोडीला विमान निर्मितीलाही सुरुवात केली. पण दुसरे महायुद्ध सुरू झाले असल्याने सरकारनेच ते दोन्ही उद्योग ताब्यात घेतले. वालचंद दुसऱ्या उद्योगाकडे वळले.

रावळगाव येथे साखर कारखाना उभा केला. सातारा येथील कुपर यांच्या शेती अवजारे निर्माण करण्याच्या उद्योगात त्यांनी लक्ष घातले व तो कारखाना लवकरच ताब्यात घेतला. पुढे विविध यंत्राची निर्मिती करणारे कारखाने त्यांनी सुरू केले. मुंबईत प्रिमियर ऑटोमोबाईल कारखाना काढला. पुढे त्यांचे बंधू लालचंद यांनी तो नावारूपाला आणला. या दोन्ही उद्योगपतीवरचे लेख चांगले झाले आहेत.

सोलापूरचे भूषण असलेले एम. बी. उर्फ अप्पासाहेब काडादी हे व्यापारच करत होते. त्यांनी छोटे छोटे उद्योग सुरू करण्याला मदत केली. पुढे त्यांनी सहकारी क्षेत्रातला सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना सुरू केला. वायपट खर्चाला आळा घालून कसोशीने व्यवस्थापन सांभाळले. अप्पासाहेबांनी त्या कारखान्याला नावारूपाला आणले. अवघ्या राज्यात त्याचा आदर्श गिरवला जाऊ लागला.

अप्पासाहेबांचे व्यक्तिमत्त्व उत्तुंग होते. स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतल्याने त्यांनी तुरुंगवास भोगला होता. सार्वत्रिक निवडणुकीत आमदार तसेच पुढे खासदार म्हणूनही निवडून आले आणि तत्त्वशुद्ध राजकरणाचा आदर्श निर्माण केला. सोलापूरचे कुलदैवत सिद्धेश्वर देवस्थान याचे विश्वस्त व पुढे मुख्य म्हणून निवड झाली. या संस्थेच्या वतीने अप्पासाहेबांनी अनेक माध्यमिक शाळा सुरू केल्या व गावाच्या मध्य भागात संगमेश्वर कॉलेजची उभारणी केली. हॉस्पिटलही सुरू केले.

शिक्षणक्षेत्रात वेगवेगळे उपक्रम करणारे बार्शीचे कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्यावर प्रा. चव्हाणांनी विस्तृत लेख लिहिला आहे. स्वतः नगरपालिकेत कारकून म्हणून नोकरी करणाऱ्या जगदाळे मामांना एक गरीब मुलगा ‘मला बार्शी शहरात राहून शिक्षण घ्यायचे आहे, पण राहण्याजेवणाची सोय नाही’, असे म्हणाला. त्याची व्यवस्था लावण्यासाठी म्हणून मामांनी जी सुरुवात केली, त्यातून नावाजलेले वसतिगृह आकाराला आले. स्वातंत्र्य चळवळीतील अनेक भूमिगत कार्यकर्त्यांना ते मदत करत असत. सगळ्या पुढाऱ्यांची सुटका झाल्यावर तुफान सेनेचे प्रमुख असलेले क्रांतिसिंह नाना पाटील यांची सभा त्यांनी बार्शीत योजिली होती. जवळपासच्या गावातले अनेक जण आमच्या गावात तुम्ही शाळा चालू करा, असे म्हणू लागले. म्हणून मामांनी श्री. शिवाजी शिक्षणप्रसारक मंडळाच्या वतीने सोलापूर व शेजारच्या उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी माध्यमिक शाळा चालू केल्या.

पुढे बार्शीत तीन-चार कॉलेजांचा समूहही उभा केला. असेच प्रयत्न मंगळवेढा या छोट्याशा तालुक्यात रतनचंद शहा यांनी केला. त्यांनी उभ्या केलेल्या शाळा व कॉलेज ग्रामीण मुलामुलींना मोठी संधी उपलब्ध करून देत आहेत. कर्मवीर रुग्णालयही सुरू केले.

याच जातकुळीतील सोलापुरचे भाऊसाहेब गांधी यांनी मोजक्याच, पण अतिशय दर्जेदार शिक्षणसंस्था सुरू केल्या. आर्टस्, सायन्स, कॉमर्स एज्युकेशन आदी कॉलेजेस उभारण्याला सुरुवात झाली. त्या संस्था नावारूपाला आल्यावर इंजिनिअरिंग कॉलेजही सुरू करण्यात आले. भाऊसाहेबांच्या या कामगिरीचे वर्णन प्रा. चव्हाणांनी खूप रेखीवपणे केले आहे.

पंढरपूरचे औदुंबर पाटील यांनी विद्यार्थी असताना आपल्या येवती गावातील सरकारी डाक बंगला जाळण्याचे काम स्वातंत्र्य चळवळीचा भाग म्हणून केले होते. पुढे ते अतिशय जबाबदार व्यापारी, साखर कारखानदार व शिक्षणसंस्थापक बनले. तसेच विठठ्ल सहकारी साखर कारखाना उभारला व त्याची क्षमता ३५०० टनापर्यंत वाढवली. बहुतेक साखर कारखान्यांची क्षमता १२०० ते २४०० टन असते. पण औदुंबर अण्णांच्या प्रयत्नामुळे या कारखान्यांने नवी उंची गाठली. यातून पंढरपूरच्या सर्वागीण विकासाला चालना देण्याचे काम औदुंबर अण्णांनी केले.

सोलापूर जवळील कुमठा या गावचे ब्रह्मदेव माने यांना उल्लेखनीय वारसा मिळालेला होता. त्यांचे वडील छोटे किराणा दुकान चालवत असत. कोणी रात्री २ वाजता उठवून एक आण्याचा खाण्याचा सोडा मागे व कोंडीबा त्याची गरज भागवत. एवढ्या किरकोळ कामासाठी ऐन मध्यरात्री कशाला त्रास घेता, असे मित्रांनी विचारले तेव्हा, ‘रात्री कोणाचे पोट दुखायला लागले, तर त्याला औषध नको का द्यायला?’ असे उत्तर त्यांनी दिले. ही सामाजिक बांधीलकी अंगी बाणवलेले ब्रह्मदेव माने वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी गावचे सरपंच म्हणून निवडून आले. पुढे ते आमदारही झाले. जिल्हा परिषदेच्या वतीने माढा येथे हायस्कूल करण्याचा अभिनव निर्णय त्यांनी घेतला होता. पुढे सहकारी बँक व ती कामगारांसाठी सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम त्यांनी सुरू केला. आजूबाजूच्या शिक्षण संस्थांना त्यांनी वेळोवेळी मदत केली.

जिल्ह्याच्या दक्षिण टोकाला असलेल्या माळशिरस तालुक्यात सहकारी संस्थांचे जाळे उभे करण्याचे काम शंकरराव मोहिते-पाटील यांनी केले. ते सुरुवातीला सैन्य भरतीचेही काम करत होते. नीरा नदीच्या कालव्याच्या पाण्यावर त्या भागात ऊस होऊ लागला होता. त्या जोरावर चितळेनगर, माळीनगर, श्रीपूर असे खाजगी साखर कारखाने भांडवलदारांनी उभे केले होते. शेतात घाम गाळणाऱ्या शेतकऱ्याला त्याच्या मेहनतीचा पुरेसा मोबदलाही मिळत नाही. हे पाहून त्या क्षेत्रात सहकारी उद्योग उभे केले पाहिजे, असे शंकररावांना वाटले. चितळेनगरचा कारखाना विकायला निघाला होता. तो विकत घेण्यासाठी शंकररावांनी स्वतःची १५० एकर जमीन व घर जागा गहाण ठेवून कर्ज उभारले. नंतर कारखाना चांगला चालवला.

पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांना मिळालेले काँग्रेसचे तिकिट कोणीतरी कापले. तेव्हा जिद्दीला पेटून शंकररावांनी अपक्ष म्हणून निवडणुक लढवली व जिंकली. आणि शेतकरी कामगार पक्षांचे सभासद झाले. आपल्या भागातील महिलांना रोजगार मिळावा, यासाठी एक छापखाना सुरू केला. पुढे दुधाचा व्यवसाय वाढवायची मोहिम त्यांनी हाती घेतली. तुम्ही दोन गाई पाळल्या तर मामलेदारपेक्षा जास्त उत्पन्न मिळू लागेल असे ते गावकऱ्यांना सांगत. दुधाची सामुदायिक खरेदी करून पुण्याला पाठवायची व्यवस्था केली. त्यामुळे दूध उत्पादकाला चांगला पैसा मिळू लागला. ते स्वतः भरपूर वाचन करत व चांगले भाषण देत. पुण्याच्या सुप्रसिद्ध वसंत व्याख्यानमालेमध्ये व्याख्यान देण्याचा मान त्यांना मिळाला होता.

सोलापूरहून माढ्याला जाताना वाटेत एक सुबकसे गाव लागते. मधोमध विस्तीर्ण पटांगण आणि कडेला ग्रामपंचायतीची दिमाखदार इमारत हे पाहून एकदम प्रसन्न वाटते. मोहोळ तालुक्यातल्या या छोट्याशा गावाचा कायापालट करण्याचे काम बाबुराव पाटील अनगरकर यांनी केले. तेही शेतकरी कामगार पक्षाचे सभासद झाले होते. कौटुंबिक व राजकीय अदावतीवरून त्यांच्यावर जिल्हा हद्दपारीचा आदेश बजावला गेला होता. सगळ्या संकटांना तोंड देत बाबुरावनी आपले सार्वजनिक कार्य चालू ठेवले. शिक्षणप्रसार व शेतीविकासासाठी सहकारी चळवळीचे जाळे वाढवण्यात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली.

बाबुराव अण्णासारखीच डोक्यावरील झोकदार गांधी टोपीप्रमाणे ज्यांचे व्यक्तिमत्त्व तरतरीत होते, ते विरुपाक्षाप्पा गुरप्पा शिवदारे हे सहकार्य चळवळीतील बिनीचे शिलेदार होते. १९४२ साली त्यांनी सत्याग्रही म्हणून नाव नोंदवले होते, पण वय कमी असल्याने त्यांना परवानगी देण्यात आली नाही. वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्याबरोबर १९४४ साली त्यांनी एकट्याने सत्याग्रह केला व दीड वर्ष तुरुंगवास भोगला. घरची साधारण स्थिती असल्याने ते एका दुकानी नोकरी करू लागले. फावल्या वेळी व विशेषतः संध्याकाळी दुकाने बंद झाल्यावर ते जवळपासचे व्यापारी व मुनीम यांच्याशी गप्पा मारत व स्वातंत्र्य चळवळीची माहिती देत. घरची शेती फार थोडी व पूर्ण जिरायत होती. तशा शेतांची उत्पादनक्षमता वाढवण्याच्या दृष्टीने सरकारने तसे संशोधन करावे, असा आग्रह त्यांनी त्यावेळचे महसूल मंत्री भाऊसाहेब हिरे यांच्याकडे धरला. त्यातूनच मुळेगाव बीजगुणन केंद्राची स्थापना झाली.

काटकसरीने संसार करत करत शिवदारे यांनी विधानसभेची निवडणुक लढवली. आमदार म्हणूनही ठळक काम केले. १९५५ ते २००३ या काळात ते डीसीसी बँकेच्या कामात लक्ष घालत होते. ग्राहकांना जीवन उपयोगी वस्तू स्वस्त भावात मिळाव्यात यासाठी सहकार्य भांडाराची मालिका उभारण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता. देशात अनेक विकास योजना झाल्या आहेत. त्यांचे दर्शन घेण्यासाठी आपल्या भागातील ४५० शेतकऱ्यांची देशव्यापी सहल घडवली.

सोलापूर शहरात कृषी उत्पादन बाजार समिती कायदा लागू होऊ नये, असा आग्रह ‘चेंबर ऑफ कॉमर्स’ आणि काही संघटनांनी धरला. पण आडते व व्यापारी यांच्याकडून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक थांबण्यासाठी तो कायदा लागू व्हावा यासाठी शिवदारे यांनी चिकाटीने प्रयत्न केले व यशस्वीही झाले. या समित्यांच्या कामकाजाचा मोठा अनुभव त्यांच्या गाठीशी असल्याने पुढे नव्या मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीवर सरकारने शिवदारे अण्णांना अध्यक्ष म्हणून नेमले व त्यांनी त्याची चांगली घडी बसवली. खादी विक्रीकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. या क्षेत्रात नव्याने पाऊल ठेवणारे कार्यकर्ते व कर्मचारी यांना त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

या जिल्ह्याचा चेहरामोहरा सोलापूर, विजापूर, उस्मानाबाद आदी चार-पाच जिल्ह्यातील वाचकांना रोज सकाळी दाखण्याचे काम करणारे थोर साधक रंगा वैद्य यांनी १९४२च्या स्वातंत्र्य चळवळीत तुरुंगवास भोगला होता. सर्वोदय विचारांचे आकर्षण असल्याने विनोबांच्या ‘भूदान आंदोलना’त त्यांनी आपली १२ एकर जमीन दान दिली होती. आपल्या परिसरातील खेडूतांना ताडगूळ व तत्सम ग्रामोद्योग करायला ते प्रोत्साहन देत असत. पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर थोडा काळ त्यांनी नोकरी केली. पण शहरातल्या ‘सोलापूर समाचार’ या दैनिकात संपादक बाबुराव जक्कल यांच्या सांगण्यावरून ते नियमित लिहू लागले. बातम्या जमवण्याचे कामही उत्साहाने करू लागले. अशी पहिल्या पायरीपासून पत्रकारितेची सुरूवात केलेले रंगा वैद्य यांनी पुढे मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्षपदही भूषवले होते.

‘समाचार’ दैनिकाचा आवाका बेताचा होता, तर रंगाण्णांना उंच उडी मारायची होती. अप्पासाहेब काडादी यांनाही शहरात चांगले दैनिक चालावे असे वाटत होते. त्यांनी एकत्र येऊन दैनिक ‘संचार’ सुरू केले व ते परिसरातील लोकजीवनाचा स्वाभाविक भाग बनले. अगदी कडेकपारीतील बातम्यांनाही प्रसिद्धी देण्याचे धोरण त्यांनी अवलंबले. आणि चोखंदळ वाचकांना चालू घडामोडीवरील साक्षेपी भाष्य वाचायला मिळावे, यासाठी त्यांनी अनेक स्त्री-पुरुष लेखकांना ‘संचार’ वर्तमानपत्राशी जोडून घेतले. प्रादेशिक पातळीवरील दैनिकात ‘संचार’ला अग्रस्थान मिळाले आहे.

सर्व प्रकारच्या चळवळी आणि घडामोडी यांना प्रसिद्धी देण्याचे पथ्य पाळत असतानाच आपला पुरोगामी दृष्टिकोन त्यांनी वाचकापर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी कसोशीने प्रयत्न केला. ही फार महत्त्वाची कामगिरी बजावलेल्या रंगाण्णांना अचानकच या जगाचा निरोप घ्यावा लागला. तरी त्यांचे स्मरण अनेक जणांना आजही प्रेरणा देणारे ठरते.

या ३० लेखांचा संग्रह वाचणाराला ग्रामीण जीवनाचे, राजकीय जीवनाचे, तसेच संघर्षमयी विकासाच्या इतिहासाचे सगळे ताणेबाणे पाहायला मिळतात व वाचकांच्या विचारांना चांगलीच चालना मिळते.

‘सोलापूर जिल्ह्याचे शिल्पकार : भाग १’ – प्रा. डॉ. चंद्रकांत चव्हाण,

प्रगती मल्टिमीडिया सर्व्हिसेस, सोलापूर | पाने – ४१६ | मूल्य – ४८० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......