देव आनंद हा हिंदी चित्रपटसृष्टीमधला पहिला ‘रोमँटिक हिरो’ म्हटला, तर त्याचा वारसा थेट शाहरुख खानपर्यंत येतो. आणि मग वाटेत लागतात शम्मी कपूर, राजेश खन्ना आणि ऋषी कपूर
ग्रंथनामा - आगामी
मीना कर्णिक
  • ‘प्यार का राग सुनो : देव आनंद ते शाहरुख खान – एक रोमँटिक प्रवास’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Sat , 02 March 2024
  • ग्रंथनामा आगामी प्यार का राग सुनो : देव आनंद ते शाहरुख खान – एक रोमँटिक प्रवास Pyaar ka Raag Suno

‘प्यार का राग सुनो : देव आनंद ते शाहरुख खान – एक रोमँटिक प्रवास’ हे द्वारकानाथ संझगिरी, मीना कर्णिक आणि हेमंत कर्णिक यांनी संयुक्तपणे लिहिलेलं पुस्तक ९ मार्च २०२४ रोजी मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसतर्फे मुंबईत समारंभपूर्वक प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने या पुस्तकाच्या एक लेखिका मीना कर्णिक यांचं लिहिलेलं हे मनोगत…

.................................................................................................................................................................

देव आनंदच्या मृत्यूनंतर जवळपास दहा वर्षांनी आणि माझी साठी उलटल्यानंतर मी देव आनंदच्या प्रेमात पडले. अगदी नेमकं सांगायचं तर २०२२च्या जानेवारी महिन्यात. (२०२१च्या डिसेंबर महिन्यात त्याच्या मृत्यूला दहा वर्षं झाली होती.) यूट्युबवर उगीचच फेरफटका मारत असताना ‘तेरे घर के सामने’ दिसला, पुन्हा बघावासा वाटला.

मग अल्गॉरिदमच्या नियमानुसार यूट्युबच्या मुखपृष्ठावर देव आनंदचे सिनेमे मला दिसू लागले. तेव्हा लक्षात आलं की, त्याच्या बहुतेक सगळ्या सिनेमांची नावं आपल्याला माहीत असली, तरी ते सगळे आपण बघितलेले नाहीत. आपण राज कपूरचे खूप सारे सिनेमे बघितलेले आहेत, दिलीपकुमारचेही बरेच सिनेमे पाहिले आहेत, पण देव आनंदवर आपण थोडा अन्यायच केलाय असं वाटलं.

त्याचं एक कारण राज कपूर आणि दिलीपकुमारच्या तुलनेत त्याचा अभिनय कमी दर्जाचा आहे, असं वाटणारी, म्हणणारी खूप माणसं आजूबाजूला होती. त्याच्या वाकड्या चालण्याची टिंगल कानावर पडलेली होती. देव आनंद सगळीकडे देव आनंदच दिसतो, हे मत ठामपणे मांडलं गेलेलं होतं. त्याची गाणी मनात ठसली आहेत हे खरं, पण त्या तुलनेत त्याच्या सिनेमांमध्ये आपण फार रमलेलो नाही, असं वाटून ‘तेरे घर के सामने’ नव्याने बघायला घेतला आणि काहीतरी बदललं.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

...............................................................................................................................................................

त्या एका वर्षात मी देव आनंदचे चांगले वाईट असे तब्बल ८८ सिनेमे बघितले. बरेचदा यूट्युबवर त्याच्या गाण्यांचे व्हिडिओ पाहिले. त्याच्यावरचं प्रेम कमी होत नाहीये, याची जाणीव झाली आणि आपल्याला त्याची भुरळ पडण्याचं नेमकं कारण काय आहे, याचा शोध घ्यायला हवा असं वाटलं. गंमत म्हणजे, माझ्या अवतीभोवतीच्या अनेक बायकांचा आणि मुलींचा देव आनंद ‘फेवरिट’ असल्याचं त्यांच्याशी गप्पा मारताना लक्षात आलं. अगदी सत्तरीतल्या बाईपासून ते पंचविशीतल्या मुलीपर्यंत ही रेंज होती. आणि अचानक एक दिवस उत्तर गवसलं.

‘देव आनंदची गाणी पाहताना काही वेळा शाहरुख खानची आठवण येते,’ माझी वहिनी म्हणाली आणि डोक्यात लख्खं प्रकाश पडला. हा विचार माझ्याही मनात आलेला होता, पण तोवर कुणाला तसं बोलून दाखवायचं धाडस झालं नव्हतं. आपल्याखेरीज आणखीही कुणालतरी असं वाटतंय, हे जाणवलं आणि मी प्रचंड खूष झाले. हेच मत माझ्या तिशीतल्या भाचीनेही व्यक्त केलं, तेव्हा तर मला मजाच वाटली. ‘आत्या, देव आनंदला पाहताना आपल्या चेहर्‍यावर एक हसू उमटतं. जसं शाहरुखला बघताना होतं तसंच.’

आता देव आनंदचे सिनेमे पाहताना मी जाणीवपूर्वक शाहरुखला शोधू लागले. शाहरुखचे सिनेमे पाहताना देव आनंद कुठे दिसतोय ते पाहू लागले आणि काहीतरी सापडू लागलं. दोघांमधलं साम्य, फरक, त्यांच्या नायिका, त्यांची गाणी, बायकांबरोबरच पुरुषांनाही आकर्षित करणारं त्यांचं व्यक्तिमत्त्व! देव आनंद काय किंवा शाहरुख खान काय, दोघेही आपल्या नायिकेकडे पाहतात, तेव्हा या संपूर्ण जगात तिच्याइतकी सुंदर कोणीच नाही, असे भाव त्यांच्या चेहर्‍यावर असतात. आपोआपच प्रेक्षक म्हणून आपल्यालाही ती नायिका जगातली सर्वांत सुंदर स्त्री वाटू लागते. ते आपल्या नायिकेला सतावतात (हे असं वागणं आक्षेपार्ह आहे, ही आजची जाणीव, पण आपल्या हिंदी सिनेमांमधून नायक हे असेच वागत आलेत. फरक इतकाच की, या नायकाच्या सतावण्यामध्ये ‘वासना’ नसते, त्याला थेट नायिकेशी लग्नच करायचं असतं, म्हणजे त्याचा उद्देश ‘पवित्र’ वगैरेच असतो. असो.) तेव्हा यांच्या ‘चार्म’समोर तिचं काही  चालणारच नाही, याची खात्री आपल्यालाही असते.

देव आनंद काय किंवा शाहरुख खान काय, त्यांच्या ‘चार्म’पासून स्वत:ला दूर ठेवताच येत नाही. मुलग्यांनाही नाही, मुलींना तर नाहीच नाही. सिनेमा दिग्दर्शक असलेला माझा भाचा, समीर विद्वांस, एकदा म्हणाला, ‘खूप दमून घरी गेल्यानंतर काही वेळा रात्री शांतपणे, मनाला सुखावणारं काही बघावं असं वाटलं की, मी देव आनंदच्या गाण्यांचा व्हिडिओ बघू लागतो. खूप मस्त वाटतं. त्याच्या चार्मचं काय करायचं कळत नाही इतका तो भारी वाटतो. आणि काही जण जेवढी टिंगल करतात तेवढा तो वाईट नट होता, असं तर मला वाटतच नाही. ग्रेट नसेल, पण मीडिऑकर अजिबात नव्हता.’

देव आनंदच्या तुलनेत शाहरुख खान अधिक चांगला अभिनेता आहे. मुख्य म्हणजे तो इव्हॉल्व झालाय. पण दोघांमधल्या रोमान्सचं काय?’

देव आनंद हा हिंदी चित्रपटसृष्टीमधला पहिला ‘रोमँटिक हिरो’ म्हटला, तर त्याचा वारसा थेट शाहरुख खानपर्यंत येतो. आणि मग वाटेत लागतात शम्मी कपूर, राजेश खन्ना आणि ऋषी कपूर. रोमान्सचा हा प्रवास आपण शोधायला घेतला, तर असा विचार मूळ धरू लागला तो त्यामुळेच. खरं तर मी ऋषी कपूरची चाहती. शम्मी कपूर हा काही माझ्या पिढीचा हिरो नव्हे. माझ्या लहानपणी राजेश खन्नाच्या प्रचंड लोकप्रियतेचे किस्से खूप ऐकायला मिळत. माझ्या एका दूरच्या नातेवाईक मुलीने त्याच्या छायाचित्राशी लग्न केल्याचं कानावर पडलं होतं. मुली कशा त्याच्यासाठी वेड्या झाल्या आहेत, हे चवीने सांगितलं जायचं. मात्र, शाळेत असताना ‘बॉबी’ बघितला आणि रोमान्स वगैरे काही फारसं कळत नसतानाही ऋषी कपूर आवडू लागला.

ही वॉज माय फर्स्ट क्रश. मग वय वाढलं तसं त्याच्याविषयी वाटणारं ‘प्रेम’ही संपुष्टात आलं. उघड्या डोळ्यांनी सिनेमे पहायला शिकू लागले. सिनेमातलं चांगलं-वाईट किंचित का होईना, पण उमगायला लागलं होतं. जागतिक सिनेमाशी ओळख होऊ लागली होती आणि ऋषी कपूर नावाचा कोणी स्टार आपला हिरो होता, हे मी जणू विसरूनही गेले.

त्यातून अमिताभ बच्चन नावाचा ‘अँग्री यंग मॅन’ तोवर भारतीय प्रेक्षकांच्या आयुष्यात आला होता. त्याच्या अभिनयाने तमाम जनतेला भारावून टाकलं होतं, पण ‘अँग्री यंग मॅन’कडे ‘रोमँटिक’ नायक म्हणून कसं बघता येणार? आणि बच्चनची फॅन असण्यासाठी त्याची गरजही नव्हती. रोमान्सची व्याख्याच त्याने बदलून टाकली.

प्रेमात पडायचं असेल, प्रेम व्यक्त करायचं असेल, तर माझ्याकडे नका येऊ. आयुष्याला सामोरं जायचं असेल, झगडायचं असेल तर माझे सिनेमे बघा, असा जणू बच्चनचा स्टँड होता. तरीही, ‘कभी कभी’ पाहताना त्याच्यातला हरलेला प्रियकर मनाला स्पर्शून गेलाच. किंवा त्याही आधी, अगदी ‘दो अंजाने’मधला सुरुवातीचा त्याचा असहाय्य नवरा लक्षात राहिला होता. आणि त्याही आधी ‘सौदागर’मधला पद्मा खन्नाच्या प्रेमात पडून नूतनला ‘प्यार का राग सुनो’ फसवणारा त्याचा नायक विसरता येणं शक्यच नव्हतं. पण बच्चनचं नाव घेतलं की, हे सिनेमे आठवत नाहीत. आपण नावं घेतो ती ‘शोले’, ‘दिवार’, ‘त्रिशूल’ यासारख्या सिनेमांची.

२०१७मध्ये ऋषी कपूरच्या ‘खुल्लम खुल्ला’ या इंग्रजीमधल्या आत्मचरित्राचं मराठी भाषांतर कराल का असं विचारणारा ‘इंद्रायणी साहित्य’च्या सागर कोपर्डेकर यांचा फोन आला. मी नाही म्हणण्याचा प्रश्‍नच नव्हता. त्यानंतर काही वर्षांपूर्वी पुण्याच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ऋषी कपूरचा सन्मान करण्यात आला होता. दुसर्‍या दिवशी त्याची जाहीर मुलाखतही झाली.

त्या वेळी ऋषीचं आत्मचरित्र मराठीत भाषांतर होऊन आलंय, अशी माहिती देत डॉ. जब्बार पटेल यांनी स्टेजवरून माझा उल्लेख केला. ‘प्रेक्षकांमध्ये मी असेन तर स्टेजवर ये’ असंही ते म्हणाले. दुर्दैवाने मी तेव्हा तिथे नव्हते, पण असते तरी त्याच्याशी काय बोलले असते कोण जाणे!

थोडक्यात, तेरा वर्षांची असतानाच्या वयातला माझा ‘रोमँटिक हिरो’ म्हणून मी ऋषी कपूरकडे बघितलं होतं. ऋषी कपूरच्या कारकिर्दीची अखेर आणि शाहरुख खानची सुरुवात साधारण एकाच सुमाराला झालेली. एव्हाना मी एखाद्या ‘रोमँटिक हिरो’ची ‘फॅन’ होण्याच्या वयाच्या पलीकडे गेलेले असले, तरी शाहरुखची जादू चालली नाही, अशी मुलगी, बाई त्या काळात असणं कठीणच होतं. शाहरुख खानने भारतातल्या तमाम तरुण तरुणींचं मनोविश्‍व व्यापून टाकलं. ही जादू आजही कमी झालेली नाही. त्या वेळी शाळा-कॉलेजात असलेली आणि त्याच्या प्रेमात पडलेली मुलींची पिढी मध्यमवयीन झाली, पण शाहरुखचं स्थान अढळ राहिलंय.

अशा काळात मला अचानक देव आनंद सापडणं, हे सुरुवातीला माझं मलाच नवलात पाडणारं होतं. या वयात या नायकाने आपल्याला अशी भुरळ का पाडली असावी? त्याच्या प्रेमातून बाहेर पडायची अजूनही आपली तयारी का नसावी? त्याच्यात आणि शाहरुखमध्ये आपल्याला जाणवलेलं साम्य आणखी कुणाकुणाला जाणवू शकेल?

या सगळ्या प्रश्‍नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करत असताना माझ्या नवर्‍याने, निखिलने (वागळे) एक दिवस मला म्हटलं, ‘एवढा अभ्यास करतेयस देव आनंदचा तर काहीतरी लिही त्यावर.’ काही लिहिण्याच्या उद्देशाने मी त्याचे सिनेमे पाहत नव्हते. अभ्यास करण्याच्या दृष्टीने तर नाहीच नाही. मी केवळ माझ्या आनंदासाठी ते बघत होते. पण या बोलण्याने नकळत मनात काहीतरी चक्र सुरू झालं असावं. त्यातूनच मी पहिल्यांदा माझा जुना सहकारी पपूला, म्हणजे द्वारकानाथ संझगिरीला व्हॉट्सऍप करून देव आनंद मला कसा आवडू लागलाय, ते आवर्जून सांगितलं. कारण पपू त्याच्या कॉलेजच्या दिवसांपासून देव आनंदचा चाहता होता आणि आजही आहे. त्याच मेसेजमध्ये आणखी एका गोष्टीची आठवण मी पपूला करून दिली होती.

‘चंदेरी’ या आमच्या मॅगझिनच्या निमित्ताने मी देव आनंदना तीनेक वेळा भेटलेले होते. एकदा त्याच्या ऑफिसमध्ये ‘सच्चे का बोलबाला’ या त्यांच्या सिनेमासाठी त्यांची मुलाखत घेतली होती. नंतर एकदा मेहबूब स्टुडिओमध्ये दुसर्‍या कामासाठी गेलेले असताना देव आनंद आपल्या सिनेमाचं शूटिंग करताहेत, हे कळलं म्हणून सहज तिथे डोकावले. त्यांना भेटले, तर त्यांनी नावानिशी माझं स्वागत केलं आणि मी भारावूनच गेले. मात्र, पहिल्यांदा मी त्यांना भेटून आमच्या ऑफिसमध्ये परतले आणि देव आनंदशी हात मिळवून आलेय, असं जाहीर केलं, तेव्हा पपूने चट्कन माझा हात हातात घेतला होता, जणू देव आनंदच्या स्पर्शाची अनुभूती तो घेत होता. खूप एक्साईट झाला होता.

माझ्या मेसेजमध्ये मी पपूला तो कसा एक्साईट झाला होता, त्याची आठवण करून दिली. दरम्यानच्या काळात स्वत: पपूही देव आनंदला अनेकदा भेटून आलेला होता, त्याच्याशी त्याने गप्पा मारलेल्या होत्या. त्यामुळे निखिलने डोक्यात सोडलेला किडा गंभीरपणे घ्यायचा, तर पपूला त्यात सामील करून घ्यायला हवं असं वाटलं. कारण आता काही देव आनंद नावाचा हा माणूस आपल्या आयुष्यातून जाणार नाही, हे माझ्या लक्षात आलं होतं. पपूसाठी तर तो नेहमीच त्याच्या आयुष्यात होता.

‘देव आनंद ते शाहरुख खान : हिंदी सिनेमातला रोमान्सचा प्रवास’ असा विषय ठरला आणि आमच्या चर्चांना सुरुवात झाली. हेमंत कर्णिक, माझा भाऊ, सुरुवातीला या चर्चांमध्ये पपूचा मित्र म्हणून सामील झाला आणि नंतर या पुस्तकाचा भाग होऊन गेला.

आमच्या तिघांच्या चर्चांमधून हळूहळू पुस्तकाने आकार घ्यायला सुरुवात केली. देव आनंद आणि शाहरुख खानमध्ये असलेलं साम्य, देव आनंद आणि शम्मी कपूर यांचं नातं, राजेश खन्नाचं सुपरस्टार होणं, ऋषी कपूरने अमिताभ बच्चनच्या काळात हिंदी सिनेमामधला रोमान्स जिवंत ठेवणं आणि तिथून शाहरुख खानपर्यंत येणं...

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

या सगळ्याविषयी गप्पा व्हायला लागल्या, वाद झाले, सहमती झाली, निरनिराळ्या पुस्तकांचे संदर्भ आले, ती पुस्तकं वाचून काढणंही आलंच. २०२२च्या जानेवारी महिन्यात सुरू झालेल्या माझ्या वेडेपणाला एक दिशा मिळू लागली होती. २०२३च्या जून महिन्यापासून आम्ही प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. पुन्हा एकदा ‘अभ्यास’ म्हणून देव आनंद, शम्मी कपूर, राजेश खन्ना, ऋषी कपूर आणि शाहरुख खान यांचे सिनेमे एकापाठोपाठ एक बघताना रमून जायला व्हायचं. थोडा नॉस्टॅलजिया, थोडं वर्तमान आणि खूप सारी मजा.

२६ सप्टेंबर १९२३ हा देव आनंदचा जन्मदिवस. त्याच्या जन्मशताब्दीनिमित्त देशभरातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये त्याच्या चार सिनेमांचा एक महोत्सव भरवण्यात आला होता. मुंबईच्या पीव्हीआरमध्ये मोठ्या पडद्यावर ‘गाईड’, ‘सीआयडी’, ‘ज्युवेल थीफ’ आणि ‘जॉनी मेरा नाम’ पाहताना एक वेगळाच आनंद मिळाला. अनेक तरुण मुलंमुली देव आनंदचे सिनेमे पहायला आल्याचं पाहून छानही वाटलं.

आमच्या या सगळ्या नायकांचा हा रोमँटिक प्रवास तुम्हालाही तेवढाच आनंद देईल ही अपेक्षा. आणखी एक. या सगळ्यांचा आणि त्यांच्या नायिकांचाही उल्लेख पुस्तकामध्ये एकेरीत केला गेलाय. त्यात अपमान किंवा अनादर अर्थातच नाही. हे कलावंत किंवा अगदी आपले क्रिकेटपटूही आपल्याला आपले वाटतात. घरात गप्पा मारताना आपण त्यांचा उल्लेख एकेरीमध्येच करतो. त्यात जिव्हाळा असतो, आपलेपणा असतो आणि त्यांच्यावरचा हक्कही असतो. इथेही तोच उद्देश आहे.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......