अजूनकाही
ज्येष्ठ सामाजिक-राजकीय कार्यकर्ते कॉ. भीमराव बनसोड यांचं ‘पुस्तकादिंचा अंतर्वेध’ हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. यात त्यांनी त्यांना आवडलेल्या ३० पुस्तकांचा परिचय करून दिला आहे. या पुस्तकाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कॉ. मुक्ता मनोहर यांनी प्रस्तावना लिहिली आहे. तिचा हा संपादित अंश...
.................................................................................................................................................................
कॉ. भीमराव बनसोड हे ‘लाल निशाण पक्ष – लेनिनवादी’चे सरचिटणीस. पण या पदाची धुरा सांभाळण्याच्या आधीपासून अनेक वर्षं ते पक्षाचे काम करतायेत. १९४३पासून महाराष्ट्राच्या डाव्या चळवळीत तळागाळातील लोकांच्या म्हणजे कामगार-कष्टकऱ्यांच्या संघटना बांधणारा हा पक्ष. गिरणी कामगारांपासून ग्रामीण भागात शेतमजूर, ऊस तोडणी कामगार, साखरकामगार, मैला कामगार, कोतवाल अशा असंख्य श्रमजीवी जनतेला भिडणारा हा पक्ष. वैचारिकदृष्ट्या मार्क्सवाद व लेनिनवादी विचार अभ्यासाचा पाया असणारा हा पक्ष.
दलित, शहरी कामगार, तसंच ग्रामीण कामगार आणि गतिमान असणारे देश व जागतिक पातळीवरचे राजकारण यांचं सतत भान घेणं या वाटचालीत अपरिहार्यच असतं. अशा व्यापक पटलावर बनसोड यांनी वाचलेली अनेक पुस्तकं व त्यानिमित्तानं केलेलं हे लेखन आहे.
बनसोड एकूणच डाव्या पुरोगामी चळवळींबाबतही सातत्यानं विचार करणारे ‘कृतिशील कॉम्रेड’ आहेत. वेळप्रसंगी डाव्यांमधील विविध विचारधारांच्या एकजुटीच्या विचारपीठांवरही ते क्रियाशील आहेत. त्यांच्या अशा जडणघडणीमध्ये त्यांनी केलेल्या विविध प्रकारच्या वाचनाची आणि पुस्तकांची एक भक्कम साथ आहे. किंबहुना कोणाही डाव्या चळवळीतल्या व्यक्तीला नेहमीच स्वतःला सजग, प्रवाही ठेवणं ही एक आवश्यक बाब असते.
बनसोड यांनी स्वतः वाचलेल्या पुस्तकांपैकी ३० महत्त्वाच्या पुस्तकांबाबत केलेलं हे लिखाण आहे. ही परीक्षणं वेगवेगळ्या नियतकालिकांतून छापून आलेली आहेत. यामुळे चळवळीतल्या किंवा अन्य कोणालाही बनसोड यांचा हा विविध विषयांवर केलेला अभ्यास आणि त्याला त्या त्या विषयांवरील पुस्तकांचा असलेला भक्कम संदर्भ, सामाजिक वास्तव समजून घ्यायला मदतकारक ठरेल.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
...............................................................................................................................................................
मुख्य म्हणजे विविध विषयांवर काम करणाऱ्या किंवा अभ्यास-व्यासंग करणाऱ्या उत्तुंग व्यक्तींच्या वैचारिक-सैद्धान्तिक भूमिकांचाही एक प्रकारे या लेखनात बनसोड यांनी ऊहापोह केला आहे. म्हणून दलित तसेच मार्क्सवादी विचारांचा आवाका समजून घ्यायलाही, हे लेखन मदत करेल.
बनसोड यांच्या परीक्षणांचं एकत्रित पुस्तक छापून येणं आणि ते लोकवाङ्मय गृहासारख्या डाव्या विचाराला वाहून घेतलेल्या प्रकाशनाकडून, ही नक्कीच खूप समाधानाची आणि महत्त्वाची बाब आहे.
सोयीसाठी म्हणून ही पुस्तकं कधी प्रकाशित झाली आहेत, याची नोंद करण्यापेक्षाही त्यांचे तीन विभाग करून समजून घेणं अधिक सोयीचं होईल-
१) मोठ्या विचारवंत व नेत्यांच्या विचार व जीवनावरील पुस्तकं.
२) तात्त्विक व वैचारिक मांडणीवर भर देणारी पुस्तकं
३) साहित्य-माहितीपर पुस्तकं
ही विभागणी सोयीसाठी केली आहे.
पहिल्या विभागात १) स्लेव्ह इंक्विदो, २) राहुल सांकृत्यायन यांच्यावर परिचयात्मक लेख, ३) के. टी. उपदेशे यांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तक, ४) पोस्ट आंबेडकर - आनंद तेलतुमडे, ५) नॉम चॉम्स्की कोणत्या विचारांचे आहेत, ६) रावबहादुर नारायण मेघाजी लोखंडे, ७) दलाई लामा, ८) योद्धा जनसत्याग्रही दादासाहेब गायकवाड, ९) अॅड. बाळासाहेब आंबेडकर, १०) वंदना शिवा, ११) कॉ. कात्रे १२) समीर अमिन यांचा समावेश आहे.
दुसऱ्या तत्त्वज्ञान व वैचारिक विभागात १) कॉ. शिरिष मेढी - मार्क्सवादी तत्त्वज्ञान, २) क्रांत्यांचे शतक - एजाज अहमद, ३) मेडिकल प्रॅक्टिस, ४) साम्राज्यवाद. ५) गांधी-आंबेडकर : अस्पृश्यमुक्ती संघर्ष, ६) लाईफ अॅन्ड डेथ इन शांघाय, ७) समीर अमिन यांच्या मांडणीचे खडन, ८) भारत में सांप्रदाईकता इतिहास और अनुभव - असगर अली या पुस्तकांचा समावेश आहे.
आणि तिसऱ्या साहित्य व माहितीपर विभागात १) प्रा. बंडेलू यांचा काव्यसंग्रह, २) नग्नसत्य, ३) हवाला के देशद्रोही, आतंकवाद व भ्रष्टाचार पर हुकुरानोकी साजिशकी हैरतंगेज तास्तान, ४) ‘हे गीत वामनाचे’ - शाहीर वामनदादा कर्डक ५) ‘बहिष्कृत’ अरुण साधू यांचा समावेश आहे. याशिवाय या विभागत ‘कॉन्सट्रेशन कॅम्प’ आणि ‘एस्केप फ्रॉम सिबेबॉर’ या दोन सिनेमांचीही परीक्षणे आहेत.
या पुस्तकात दोन काव्यसंग्रहांबद्दल टिपणी केलेली आहे. प्रा. प्रियदर्शन बंडेलू यांचे ‘अंतर्वेध’ हे माकड आणि माणूस याबाबतचे दीर्घ काव्य असल्याचे जाणवते. माणसापेक्षा माकड बरे, कारण आता माणसाचे खूपच अधःपतन झालेले आहे, या भोवती हा काव्यसंग्रह आहे. माकडच माणसाशी या काव्यातून संवाद साधते. त्या निमित्ताने प्रा. बंडेलू यांनी आपल्या देशात सुरू असलेल्या आजच्या भयावह घटनांबाबत जणू चिंता व्यक्त करून प्रश्नचिन्ह उमटवले आहे. माकडापासून माणूस कसा उत्क्रांत होत गेला, या अनेक धागे बनसोड यांनी उकलले आहेत. त्यामुळे मूळ काव्याचा आस्वाद घ्यायला नक्कीच मार्गदर्शन होऊ शकेल.
‘हे गीत वामनाचे’ या काव्यसंग्रहाबद्दल लिहिताना शाहीर वामनदादांच्या अनेक प्रभावी कवितांचे दाखले देत लोककला, शाहिरी, यातील परंपरांचाही आढावा घेतला आहे. मूळ प्रभावी कविता उदधृत केल्यामुळे वामनदादांचा काव्यसंग्रह आजही माणसांना चेतवेल, असे वाटते. उदाहरणच द्यायचे, तर ‘भीम माझा कसा होता’ या कवितेत वामनदादा म्हणतात, ‘काय सांगू वामन, भीम माझा कसा होता, सात ठिगळाच्या बंडीला भीम माझा खिसा होता’. हे वाचल्यानंतर हे ‘गीत वामनाचे’चे संकलन करणाऱ्या कॉ. भास्करराव जाधर यांचे आभार मानावेसे वाटतात.
बलात्काराचे वास्तव किती व्यापक आहे, याची जाण येण्याच्या दृष्टीनं त्या प्रश्नाची ओळख बनसोड ‘नग्नसत्य’ या पुस्तकाबाबत लिहिताना करून देतात. त्यात वापरलेला विक्रम वेताळ हा आकृतीबंध आणि वाचकांना तो विषय कसा उलगडत जाईल तेही सांगतात.
‘हवाला के देशद्रोही, आतंकवाद व भ्रष्टाचार पर हुकुरानोकी साजिशकी हैरतंगेज तास्तान’ असं काहीसं बलाढ्य नाव धारण केलेल्या पुस्तकात हवाला प्रकरणाची विस्तारानं माहिती आणि राजकीय हितसंबंधांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. या पुस्तकाचे लेखक पत्रकार विनित नारायण यांनी अनेक दबाव असतानाही हे प्रकरण न्यायालयापर्यंत कसे घेऊन गेलो इत्यादीबद्दलही सांगतात.
अरुण साधू यांच्या ‘बहिष्कृत’ या कादंबरीवर बनसोड यांनी लिहिलं आहे. ही कादंबरी १९७८ साली प्रसिद्ध झालेली. हे पुस्तक एकदा वाचायला घेतल्यावर हातातून सोडवत नाही, असं सांगून त्यातील कथानकाची पकड आपल्या लेखातून बनसोड उलगडून दाखवतात. दलित समस्येवर अतिशय वास्तवाला धरून केलेली मांडणी वाचक म्हणून मनाचा ठाव घेऊन गेल्याचे बनसोड यांनी केलेल्या परीक्षणातून जाणवते. इतरांनी ते जरूर वाचावे, ही त्यांची आग्रहाची मांडणी आहे.
चरित्रात्मक पुस्तकांच्या विभागात १० लेखांचा समावेश आहे. कॉ. मधुकर कात्रे व राहुल सांकृत्यायन यांच्यावर स्वतंत्र स्वरूपाचे लेख आहेत. अर्थातच ही पुस्तकं ज्या व्यक्तींच्या जीवनावर भाष्य करतात, त्यापैकी काही व्यक्तींनी जनजीवनावर खोलवर परिणाम केलेले आहेत. उदा., डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यांचे सहकारी कर्मवीर दादासाहेब गायकवाड. त्यानंतर डॉ. बाबासाहेबांचे वैचारिक वारसदार अॅड. बाळासाहेब आंबेडकर. अशा व्यक्तींच्या विचारांचं स्वतः कॉ. भीमराव बनसोड यांचं आकलन स्पष्ट स्वरूपाचं आहे. त्यामुळे त्यांच्या आकलनाचे निकष पुस्तकांवर भाष्य करताना येणं स्वाभाविकच आहे. ते या लेखांमधून व्यक्त झालं आहे.
अमेरिकन जीवनावर ठसा उमटवलेले विसाव्या शतकातील एक विचारवंत म्हणजे नॉम चॉम्स्की. ‘सत्ता के समाने’ या चॉम्सकी यांच्या अनुवादित पुस्तकाचा संदर्भ समोर ठेवून कॉ. भीमराव यांनी चॉम्स्की यांच्यावर लिहिलं आहे. चॉम्स्की ‘अराजकवादी’ आहेत, असं बनसोड यांनी सांगितलं आहे.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
कॉ. भीमराव यांची वैचारिक बैठक लाल निशाण पक्ष लेनिनवादीच्या वाटचालीतून झालेली आहे. त्यांना मार्क्सवाद व लेनिनवाद यांतील मूलभूत संकल्पनांचं स्पष्ट आकलन आहे. तत्त्वज्ञान व वैचारिक स्वरूपाच्या आठ पुस्तकांचा त्यांनी लेखातून आढावा घेतला आहे. शिरीष मेढी यांच्या ‘मार्क्सवादी तत्त्वज्ञानाचा परिचय’ या पुस्तकाबाबत बनसोड समाधान व्यक्त करतात, विशेषतः मेढी यांनी दिलेले भारतीय तत्त्वज्ञानातले दाखले त्यांना विशेष भावले असल्याचं जाणवतं.
‘क्रांत्यांचे शतक’ हे पुस्तक मार्क्सवादी विचारवंत एजाज अहमद यांच्या ‘फ्रन्टलाईन’ या इंग्रजी पाक्षिकात आलेल्या लेखांचा उदय नारकर यांनी केलेला मराठी अनुवाद आहे. या पुस्तकाचे अवलोकन करताना बनसोड यांनी या साम्यवादी क्रांत्या होऊन जो मोठा काळ गेला आहे, त्या बदलांचे संदर्भ लक्षात घेतलेले आहेत. उदा., शेतीव्यवस्थेतही भांडवलशाही रचना प्रभावी झाल्याने शेतकरी समुदायात जी नवी वर्गरचना तयार झाली, हेही ते अधोरेखित करतात.
अन्य वैचारिक पुस्तकांचे संदर्भ कार्ल मार्क्स यांच्या कागारवर्गीय क्रांतीची आवश्यकता आणि आजच्या काळाचे आव्हान यांच्याशी जोडले जाणे स्वाभाविकच आहे. म्हणून बनसोड यांचं हे पुस्तक मूळ पुस्तकं वाचायला जसं प्रेरित करते, तसंच त्या त्या पुस्तकांची वैचारिक कमतरता अथवा त्यामागे दडलेले सैद्धान्तिक वादही लक्षात घ्यायचे आवाहन करते.
हे पुस्तक वाचणं म्हणजेच ज्वलंत मानवी समस्या सोडवण्याची वाट शोधणं. ज्यांना ती शोधायची आहे, त्यांच्यासाठी संदर्भाचा हा दस्तऐवज आहे.
‘पुस्तकादिंचा अंतर्वेध’ - कॉ. भीमराव बनसोड
लाल निशान प्रकाशन, छत्रपती संभाजीनगर | पाने - ३१७ | मूल्य - ३५० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Ram Jagtap
Fri , 23 February 2024
bhimraobansod@gmail.com हा या पुस्तकाचे लेखक कॉ. बनसोड यांचा मेल आयडी आहे. त्यांच्याशी संपर्क साधावा. ते नक्की सांगतील.
Ketan Shinde
Thu , 22 February 2024
वरील पुस्तक कुठे उपलब्ध होईल