केवळ इंग्रजी, मराठी, हिंदीच नव्हे, तर इतरही भाषांमध्ये अनुवादाचं काम करणाऱ्या अनुवादकांसाठी हे पुस्तक मार्गदर्शक व्हावं, असा प्रयत्न मी केलेला आहे
ग्रंथनामा - झलक
लीना सोहोनी
  • ‘अनुवादाकडून अनुसर्जनाकडे’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Wed , 21 February 2024
  • ग्रंथनामा झलक लीना सोहोनी Leena Sohoni अनुवादाकडून अनुसर्जनाकडे Anuwadatun Anusarjanakade

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध अनुवादिका लीना सोहोनी यांचं ‘अनुवादाकडून अनुसर्जनाकडे’ हे पुस्तक नुकतंच मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात त्यांनी गेल्या ३५ वर्षांच्या अनुवादक म्हणून केलेल्या कामाचा मागोवा घेतला आहे. या पुस्तकाला त्यांनी लिहिलेल्या मनोगताचा हा संपादित अंश…

.................................................................................................................................................................

मी १९८७ साली अनुवादाला सुरुवात केली. ३५ वर्षांचा काळ तसा काही कमी नाही. या काळात मी विपुल लेखन केलं. ५०च्या वर अनुवादित पुस्तकं, त्याशिवाय प्रसंगोपात मासिकांमधून, दिवाळी अंकांमधून, दैनिकांमधून, नियतकालिकांमधून आणि अलीकडच्या काळात ऑनलाईन मराठी आणि इंग्लिश ब्लॉग्जमधून मी नियमितपणे वाचकांच्या भेटीला येतच राहिले. वर्षाच्या ३६५ दिवसांमधले वार्षिक कौटुंबिक सहलीचे फार तर १५ दिवस सोडले, तर राहिलेल्या दिवसांत दररोज माझा आणि लेखणीचा संबंध येत असतो.

तरीपण मला माझी खरी ओळख ज्या साहित्यप्रकाराने मिळवून दिली, तो म्हणजे अनुवाद. ज्या अनुवादाने आपल्याला इतकं भरभरून दिलं, त्याचे थोडे तरी पांग फेडावे, यासाठी काहीतरी करायचं खूप दिवसांपासून मनात होतं. साहित्यिक अनुवादासाठी काही पुरस्कार ठेवता आला, तर तोही ठेवावा, असा एक विचार मनात डोकावून गेला.

त्यानंतर एक दिवस अचानक बोलताबोलता माझे प्रकाशक श्री. अनिल मेहता यांनी ही कल्पना मांडली की, तुम्ही आजवर इतके यशस्वी अनुवाद केलेत, इतके पुरस्कार मिळवलेत, अनुवादाच्या कार्यशाळा घेता, विविध ठिकाणी तुमच्या मुलाखती येत असतात. तुम्ही तुमच्या या अनुवादाच्या प्रदीर्घ प्रवासाबद्दलच का नाही लिहीत? नुसती कल्पना मांडून ते थांबले नाहीत, तर त्यांनी या गोष्टीचा पाठपुरावा केला, म्हणून आज या पुस्तकाने मूर्तरूप धारण केलं आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

...............................................................................................................................................................

खरं तर मी अनुवादाला सुरुवात करण्यापूर्वी कोणताही कोर्स केला नव्हता, अनुवादाच्या तांत्रिक अंगांचं काही प्रशिक्षण घेतलं नव्हतं. माझी आजी दळू लागली आणि जात्यातून झरझर पीठ पडू लागलं की, तिच्या गळ्यातून ओवी बाहेर पडत असे. पाण्यात पडलं की, आपोआप पोहायला लागावं, तसंच काहीसं माझंही अनुवादाच्या बाबतीत झालं. मी लहानच होते त्या वेळी. गाठीला पूर्वानुभव तर शून्यच होता; पण इंग्रजी भाषेबद्दल आपुलकी होती, त्यातील बारकाव्यांची पुरेशी समज होती, मुख्य म्हणजे आवड होती आणि मातृभाषा मराठीवर विलक्षण प्रेम होतं. तिची थोडीफार सेवा आपल्या हातून घडावी, ही प्रामाणिक इच्छा होती. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे मनातले विचार सरळ, साध्या पण स्पष्ट शब्दांत कागदावर उतरवणं जमत होतं. बस, एवढ्याच भांडवलावर मी स्वतःला साहित्याच्या या महासागरात खुशाल झोकून दिलं.

हे पुस्तक लिहिण्याचं काम हाती घेतलं; पण काहीच आराखडा मनात ठरवलेला नाही. जसं सुचेल तसं लिहून काढलं. माझा गेल्या ३५ वर्षांचा अनुवादाचा प्रवासही असाच झालेला आहे, कोणत्याही पूर्वनियोजनाशिवाय!

माझ्यासारखे केवळ भाषेच्या प्रेमापोटी या क्षेत्रात येऊ इच्छिणारे कुणी तरुण अनुवादक असतील, किंवा माझ्या अनुवादित पुस्तकांवर आणि माझ्यावर प्रेम करणारे वाचक असतील, त्यांनी कुतूहलापोटी जरी हे आगळंवेगळं आत्मकथन वाचलं, आणि त्यातून त्यांना दिशा मिळाली, तर मला खूप समाधान वाटेल.

मी स्वतः भाषाशास्त्राचा काही औपचारिक अभ्यास केलेला नाही. त्यासंबंधीचा काही कोर्स केलेला नाही. एम.ए. करत असताना भाषाशास्त्र आणि साहित्यिक अनुवाद, हे दोन्ही विषय आम्हाला अभ्यासक्रमात होते, ही गोष्ट खरी आहे; पण त्यापलीकडे जाऊन मी कोणत्याही पूर्वतयारीशिवाय एकदम अनुवाद करायला सुरवात केली आणि मग करतच राहिले.

मग असं असताना अनुवादासारख्या गहन विषयावर पुस्तक लिहिण्याचं हे धारिष्ट्य माझ्यात आलं तरी कुठून, असा प्रश्नही काहींना पडेल. अशांना मी केवळ इतकंच सांगेन की, माझ्या अनुभवांचं गाठोडं उलगडून त्यामध्ये मी आजवर गोळा केलेले चार रोमहर्षक अनुभव तुमच्यापुढे ठेवून तुमचं मनोरंजन करणं, मला भेटलेले वाचक, त्यांनी माझ्यावर केलेलं प्रेम, माझ्या आयुष्यात आलेल्या काही सिद्धहस्त लेखकांच्या निवडक आठवणी, त्यांच्या भेटीगाठींचे प्रसंग या विषयीच्या काही गोष्टी वाचकांशी शेअर करणं, हा एक हेतू हे पुस्तक लिहिण्यामागे आहे.

अनुवाद या विषयाचा शोधनिबंध लिहू इच्छिणाऱ्यांना यातून काही सामग्री मिळेल, अशी फारशी शक्यता नाही. तसं बघायला गेलं तर अभिनयाचं काहीही प्रशिक्षण न घेता एखाद्या अभिनेत्याने धीर करून रंगभूमीवर पदार्पण करावं आणि भान विसरून स्वतःला भूमिकेत झोकून द्यावं, तसंच काहीसं माझं झालंय. मी भाषाशास्त्रज्ञही नाही आणि अनुवादविज्ञानाची गाढी अभ्यासकही नाही. मला अनुवाद आपसूक जमत गेला आणि मी चुका करत शिकले, त्यातल्या खाचाखोचा समजून घेतल्या.

गमतीची गोष्ट अशी की, मी आधी अनुवादक म्हणून काम करू लागले. माझे चार-पाच अनुवाद प्रसिद्ध झाले आणि त्यानंतर मी अनुवादाच्या शास्त्राचा आणि तंत्राचा व्यवस्थित अभ्यास केला, किंबहुना तो करणं मला भाग पडलं. मी जेव्हा ‘लज्जा’ या बहुचर्चित पुस्तकाचा अनुवाद केला, तेव्हा त्याचा बराच बोलबाला झाला. त्या अनुवादाला प्रतिष्ठित असा राज्यशासनाचा पुरस्कार मिळाला.

त्यानंतर माझ्यासमोर अनेक संधी आपोआप चालून आल्या. त्यातील एक संधी म्हणजे शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी ‘अनुवाद’ हा विषय नव्याने सुरू करण्याचं ठरलं व त्यासाठी मानद प्राध्यापक म्हणून मला निमंत्रित करण्यात आलं.

तो अभ्यासक्रम निश्चित करण्यापासून त्या कोर्सचं स्वरूप काय असावं, कोणती पुस्तकं नेमावी, परीक्षा कशी घ्यावी ही संपूर्ण जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली. पदव्युत्तर विद्यार्थ्यांना अनुवादासारखा अवघड विषय सोपा करून शिकवणं, ही काही लहानसहान बाब नव्हती. मग मी शिकवायला सुरुवात करण्याआधी विद्यापीठाच्या ग्रंथालयात कित्येक दिवस बसून या विषयाचा अभ्यास केला. असंख्य पुस्तकं वाचून नोट्स काढल्या. या पुस्तकाची पूर्वतयारी करताना त्याचा मला खूप उपयोग झाला.

माझ्या पुस्तकातून मी स्वत:च्या याच प्रवासाविषयी बोलणार आहे. माझ्या या प्रवासात काही पुस्तकांचं मला मोलाचं मार्गदर्शन झालं. अशी खरं तर अनेक पुस्तकं आहेत; पण डॉ. भोलानाथ तिवारी यांनी लिहिलेली ‘अनुवाद विज्ञान’ आणि ‘भाषा विज्ञान’ ही पुस्तके, त्याचप्रमाणे जे. सी. कॅटफोर्ड या विख्यात भाषाशास्त्रज्ञाने लिहिलेल ‘Linguistic Theory of Translation’ या पुस्तकांमधून मला जे काही शिकायला मिळालं, त्यामुळे मी असं म्हणेन की, प्रत्येक अनुवादकानं ही पुस्तकं अवश्य संग्रही ठेवली पाहिजेत. आणि हो, सर्वांत शेवटी आपले गुगल महाराज! हा तर अनुवादकाचा बेस्ट फ्रेंड! त्याला विसरून कसं चालेल?

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

मी स्वतः आजवर फक्त इंग्लिशमधून मराठीत अनुवाद केला आहे. साहजिकच माझ्या या पुस्तकामधली बरीचशी उदाहरणंसुद्धा माझीच असतील, मी ज्यांचा अनुवाद केला आहे, अशा पुस्तकांमधलीच असतील; पण त्याचबरोबर मी हिंदी साहित्यातीलही विपुल उदाहरणं दिली आहेत. यामागे दोन कारणं आहेत, एकतर हिंदी ही आपली राष्ट्रभाषा असून, ती आपल्या आयुष्याचा अगदी लहानपणापासून अविभाज्य भाग झालेली असते. माझं स्वतःचं तर हिंदी भाषेवर विशेष प्रेम आहे.

याशिवाय दुसरं कारण म्हणजे मी गेल्या काही वर्षांत अनुवादाच्या ज्या अनेक कार्यशाळा घेतल्या, त्यांमध्ये इंग्रजी-मराठी प्रमाणेच हिंदी-मराठी या दोन भाषांच्या अनुवादाचं काम करणारे अनेक अनुवादक सहभागी झाले होते. त्यावरून माझ्या असं लक्षात आलं की, या पुस्तकात इंग्रजी आणि मराठीप्रमाणेच हिंदी भाषेतील अनेक उदाहरणं द्यायला हवीत.

याशिवाय जर्मन, फ्रेंच, नेपाळी, तेलुगू अशा इतर भाषांमधीलही उदाहरणे शोधून दिली आहेत; कारण या पुस्तकातून मला अनुवादाची एकूण प्रक्रिया कशी चालते, याचा साधकबाधक विचार वाचकांसमोर ठेवायचा आहे, त्याचप्रमाणे केवळ इंग्रजी, मराठी, हिंदीच नव्हे तर इतरही भाषांमध्ये अनुवादाचं काम करणाऱ्या अनुवादकांसाठी हे पुस्तक मार्गदर्शक व्हावं, असा प्रयत्न मी केलेला आहे.

‘अनुवादाकडून अनुसर्जनाकडे’ - लीना सोहोनी

मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे | पाने - २५२ | मूल्य – ३७० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......