अजूनकाही
महादेव माने यांच्या ‘वसप’ या कथासंग्रहातील दहा कथा म्हणजे वेगवेगळ्या अंगाने मानवी नात्यावर वेळोवेळी वाईट परिस्थितीची जी छाया (वसप) पडते, त्याचंच शब्दरूप. ही कथा ग्रामविश्वाचे अनेकानेक सूक्ष्म कंगोरे उलगडून दाखवते. या प्रत्येक कथेचा नायक पुरुष असला, तरी कथा कुठेही पितृसत्ताक होऊ न देण्याचं भान लेखकानं कसोशीनं पाळलं आहे. ग्रामीण कृषिधिष्ठित अभावग्रस्त जीवनाशी दोन हात करतानाच्या प्रत्येक कथेतील स्त्री-पुरुष परस्पर साहचर्याच्या खुणा ठळकपणे या कथांमध्ये दिसतात. त्यामुळेच या कथा स्त्रीवादी भिंगातून पाहणं रोचक ठरतं.
वाचनानं प्रगल्भता लाभली की, माणूस ‘माणूसपणा’च्या जास्त जवळ पोहचतो, याचं उत्तम उदाहरण वडाप ड्रायव्हर सदूच्या रूपात दिसतं. त्याच बरोबर वाचनामुळे नवरेशाहीच्या पितृसत्ताक अहंभावातून बाहेर पडून एक पुरुष स्त्रीचं मन कसं समजून घेऊ शकतो, हेही.
लग्नानंतर सुरुवातीला काही वर्षांत मूल होत नाही म्हणून, सामाजिक तुच्छतेची बळी ठरणारी आपली बायको कोणतीही तक्रार न करता कुटुंबाला हातभार लावण्यासाठी धुणीभांडी करताना पाहून, कधी काळी गुलाबाच्या पाकळ्यासारखे असणारे तिचे हात आता बारदानागत खरबरीत झालेली पाहून सदूचे कातर होणारे मन नवरा-बायको नात्याचा खरा पाया सांगून जाते.
इतकेच नव्हे तर ‘हातावरच्या नशिबाच्या रेषा तर ज्यानं नशीब लिवलंय त्यालासुद्धा कळणार न्हाईत’ असे म्हणून समस्त कष्टकरी स्त्रियांची वेदना लेखक शब्दांत पकडतो. बायकांचा जल्मच कष्टाचा. किती सोसायचं, हा प्रश्न उपस्थित करून सदू म्हणतो की, बाईच्या गळ्यात एकदा लोढणं पडलं की, मालक कसा का असेना तिला ते फक्त हमालासारखं ओढावं लागतं.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
...............................................................................................................................................................
स्त्रीचं आणि एखाद्या पक्षिणीचं स्वातंत्र्य यात लेखकाला पक्षिणी मुक्त वाटतं, तर स्त्री बंदिस्त वाटते. ‘पटलं नाही तर पाखरं घर बदलतात, पण बाईला तीही मुभा हा समाज देत नाही, कारण ‘बाई म्हणून जन्माला येणं हाच तिचा दोष आहे’, ही मानसिकता आजही दिसते. वडापमध्ये बसलेल्या लेकुरवाळीच्या मनाची घालमेल वाचताना सदू म्हणतो की, ‘नळाखाली लावलेली बादली भरून ओसंडून जावी अशी तिची अवस्था झाली होती.’
मातीला जाऊन आलेल्या वडापमधील बायकांचे मृत्यूविषयी बोलणं एकीकडे आणि त्याच वेळी ‘धकधक करने लगा’ या गाण्यावर चेकाळून जाणारी कॉलेजची मुलं दुसरीकडे, हे विरोधाभासी चित्रही लेखकानं अचूक टिपत नवी पिढी कोणत्या दिशेने निघाली आहे, याचंही सूचन केलं आहे. सोन्याच्या मोहापायी नकारात्मकतेच्या टोकावर पोहचलेला सदू केवळ त्याच्या मनातील स्त्रीविषयी असलेल्या आदरभावनेमुळे परत येऊ शकतो. चार मण्यांसाठी एकट्या लेकुरवाळीला आडरानात सोडून देणं त्याच्या मनाला पटत नाही. स्त्रीकडे आदरानं पाहण्याची दृष्टी प्रत्येक पुरुषाला लाभावी, हेच यातून लेखक सुचवू पाहतो.
‘सुरुंग’ या कथेतील यल्लव्वा खंबीर कष्टकरी स्त्रीचं प्रातिनिधिक रूप आहे. संगीच्या रूपाने लेखकानं ग्रामीण समाजातील उपवर मुलीकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन, तिच्या लग्नासाठी आई-वडिलांना येणारं कर्जबाजारीपण आणि त्यातून त्यांची होणारी जीवघेणी फरफट मांडली आहे. ‘गावाबाहेर आडरानात पोरगी सांभाळायची मजी पदरात इस्तू बांदल्यागत व्हतंय. समद्याचीच नदार काय सारखी नसती. जकडं तकडं गेल्यालं बरं असतंय’, ही उपवर मुलीबद्दलची पारंपरिक भावना आजही ग्रामीण समाजात कायम आहे, हे वास्तव लेखक अधोरेखित करतो.
‘पाण’ कथेमधील सापाच्या अदृश्य भीतीच्या सावटाखाली धास्तावलेली गिरजा लेखकानं हूबेहब उभी केली आहे. हरबऱ्याची भाजी खुडताना, समोर फणा काढून उभा असलेला नाग नि त्यानं केलेला दंश, त्यात शांता म्हातारीचा झालेला दुर्दैवी मृत्यू हे वाचताना, ग्रामीण कष्टकरी शेतकरी, शेतमजूर स्त्री मृत्यूच्या किती अनंत शक्यता पदरात बांधून न डगमगता राबत असते, याची कल्पना येते.
‘मेडकं’ कथेतील आकणा म्हातारी एकल स्त्रीच्या जगण्याची उसवलेली वीण आणि एकट्या स्त्रीच्या जगण्याचा कष्टप्रद पट मांडते. पतीच्या माघारी होणारी आर्थिक नि मानसिक ओढाताण मांडताना दारका जवळ मन मोकळं करताना आकणा म्हणते की, ‘त्येनी असतं तर, छपरावर मंगलुरी कवलं घाटली असती... मागल्या दिवाळीत त्येनी मला म्हंटल हुतं, आवंदा तुला योक दागिना करायचा हाय म्हणून. तवर परमेसरानं माझा हिरा नेला की गं... तेवच माझा दागिना हुता!’ पती विरहाचं हे आकणाचं दुःख फक्त तिच्या एकटीचं न राहता समस्त विधवा स्त्रियांचं प्रतिनिधित्व करतं.
‘मेडकं’ ही कथा मला स्त्रियांच्या संदर्भात आणखी एका दृष्टीनं महत्त्वाची वाटते. कृष्णाकाठच्या महापुराचे रौद्ररूप, त्या काळात जेव्हा फक्त जीव वाचवणं महत्त्वाचं होतं, तेव्हाही संसार वाचवण्यासाठी जीवाचा आटापिटा करणाऱ्या स्त्रिया दिसतात. स्त्री आणि पाळीव पशू यांच्यातल्या आत्मीय नात्याची साक्ष देणारी ही खूप सुंदर कथा आहे.
‘आवशिद’ कथेतील सुंदरा मावशी म्हणजे सरळमार्गी कष्टकरी स्त्रीचं रूप आहे. पपईला औषध लावून पिकवणाऱ्या शामुअण्णाच्या पापात कधीच भागीदार व्हायचं नाही, ही तिची भूमिका महत्त्वाची वाटते. एक टन पपई झाडावरून उतरवणारी मुमताज कष्टाला किती पक्की आहे, हे लेखक सांगतोच, पण तिच्या माध्यमातून एका ग्रामीण मुस्लीम स्त्रीचं कष्टमय जीवन, तिची बोलीभाषा, ‘उपरसे गावमे हमारा अकेला घर हैं, झगडा अपनेको परवडेगा क्या?’ ही सामाजिक असुरक्षिततेची भावना हेदेखील खुबीनं अधोरेखित करतो.
या संग्रहातील सर्वांत अस्वस्थ करून गेलेली कथा म्हणजे ‘पंख छाटलेला गरुड’. खरं तर ही कथा फक्त ग्रामीण भागात घडते आहे, या एकाच निकषावर तिला ‘ग्रामीण कथा’ या कप्प्यात टाकून मोकळं होता येणार नाही. यातली शाली आणि काशी या हतबल मुली या केवळ गावातच नाही, तर कोणत्याही शहरात असू शकतात. स्त्रीला सृजनाचं दान देणारं गर्भाशय हे प्रसंगी तिच्या जगण्याच्या कितीतरी बाजू अंकित करणारं पुरुषसत्तेच्या हातातलं खेळणं कसं होऊ शकतं आणि त्यातून तिची काय फरफट होऊ शकते, हे लेखकाने फार ताकदीनं मांडलं आहे.
स्त्री चळवळीने जात, धर्म, प्रदेश अशा महत्त्वाच्या गोष्टींकडे फारसं गांभीर्यानं पाहिलेलं नाही. त्यामुळे स्त्री म्हणून सर्वच स्त्रियांचे प्रश्न सारखे असू शकत नाहीत, या वास्तवाकडे दुर्लक्ष झालेलं दिसतं. त्यातूनच पुढे काळ्या स्त्रियांचे प्रश्न स्वतंत्रपणे पाहणारा ‘काळा स्त्रीवाद’ उदयाला आला. भारतातही दलित स्त्रियांच्या प्रश्नावर स्वतंत्रपणे विचार व भाष्य करणारा ‘दलित स्त्रीवाद’ उदयास आला. शहरी अभिजन स्त्री आणि ग्रामीण कष्टकरी, दलित, आदिवासी, बहुजन स्त्री यांच्या जगण्यात नक्कीच तफावत असते, हे लक्षात आलं.
अलीकडे LGBTQ प्रश्नाकडेसुद्धा महिला चळवळीने लक्ष वळवलं आहे. पण या सर्वांमध्ये बुद्धीनं मतिमंद पण शरीरानं परिपूर्ण अशा मतीमंद स्त्रियांचे प्रश्न नेमके काय? त्यासाठी स्त्री चळवळ म्हणून काही भूमिका घेणं आवश्यक आहे का, यावर फारशी चर्चा होताना दिसत नाही.
या पार्श्वभूमीवर ‘पंख छाटलेला गरुड’ ही कथा महत्त्वाची वाटते. एक ‘स्त्री’ म्हणून, ‘मतिमंद’ म्हणून आणि त्यातही ‘मतिमंद स्त्री’ म्हणून, असे त्रिस्तरीय शोषण या स्त्रियांच्या वाट्याला येतं. त्यामुळे त्यांचे प्रश्न अधिकच गुंतागुंतीचे बनतात.
‘My body My Right’ अर्थात ‘माझे शरीर माझा हक्क’ ही आग्रही भूमिका स्त्रियांनी घेतली, ही फार अभिनंदनीय गोष्ट आहे. पण या कथेतील शाली आणि काशी यांसारख्या स्वत:च्या शरीराचं कोणतंच भान नसणाऱ्या, मात्र निसर्गानं स्त्री म्हणून परिपूर्णता दिलेल्या स्त्रियांच्या बाबतीत कसं पाहायचं? ही कथा वाचली नि मेंदूला अक्षरशः झिणझिण्या आल्या.
वयात आलेल्या आपल्या मतिमंद मुलीची काळजी करणारा आणि आपल्या मतिमंद मुलीला कुणीतरी फसवलं, त्यातून तिला मोकळं करण्यासाठी धडपडणारा बाप दादासाहेब आणि शामा यांच्या रूपानं लेखकाने इतके अप्रतिम रेखाटले आहेत की, त्यांच्या मुलींसह आणि एकूणच भवतलासह ते आपल्या समोर उभे राहतात.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
................................................................................................................................................................
‘जिचा काहीच दोष नाही, पण कुणाच्या तरी अत्याचाराचा बळी ठरलेल्या, तो नेमका कोण? त्याने काय केलं? आणि आता नेमकं आपल्याला इथं दवाखान्यात का आणलं गेलंय? अशा प्रश्नांची उत्तरंच माहिती नसलेल्या शालीच्या गर्भपाताचा दवाखान्यातील प्रसंग वाचताना कोणत्याही संवेदनशील माणसाचे डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत.
स्त्रीला उपभोग्य वस्तू मानून तिचं आयुष्य उद्ध्वस्त करणारे पुरुष हे माणूस नसून फक्त ‘वखवखलेले नर’ असतात, हे कटू सत्य लेखकाने खूप धाडसानं मांडलं आहे. त्यासाठी त्याच्या लेखणीला सलामच करायला हवा.
‘वसप’ ही शीर्षककथा, ‘अडकित्ता’, ‘अवशिद’, ‘मेंढीकिडा’ या कथांचा जातवास्तवाच्या अनुषंगानं वेगळा विचार करता येईल, असं मला वाटतं. ‘भगदाड’ ही कथा वाचताना एक वाचक म्हणून मनाची झालेली घालमेल शब्दांत व्यक्त करणं मला तरी अवघड वाटतं. वाचकांनी ही कथा मुळातून वाचावी. लेखक महादेव माने यांनी ‘वसप’च्या माध्यमातून मराठी साहित्यविश्वात एक दमदार पाऊल टाकलं आहे. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि पुढील लेखनास खूप खूप शुभेच्छा.
‘वसप’ : महादेव माने | ग्रंथाली, मुंबई | पृष्ठ – १८२ | मूल्य - २५० रुपये.
.................................................................................................................................................................
लेखिका डॉ.सुनीता बोर्डे-खडसे यांची ‘फिंद्री’ ही कादंबरी प्रकाशित झालेली आहे. त्या स्त्री साहित्याच्या अभ्यासिका आहेत.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment