प्रसिद्ध कवी देवा झिंजाड यांची ‘एक भाकर तीन चुली’ ही पहिलीवहिली कादंबरी नुकतीच न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस, पुणे यांच्यातर्फे प्रकाशित झाली आहे. या कादंबरीला झिंजाड यांनी लिहिलेल्या मनोगताचा हा संपादित अंश…
.................................................................................................................................................................
‘महाराघरी गाणं, मांगाघरी वाजवणं, कुणब्याच्या घरी दाणं अन् बामनाघरी लिव्हणं’ अशी असमान, हीन मांडणी ज्यानं केली, तो तर निघून गेला; पण त्याच विषारी विचारांची पेरणी काही स्वार्थी अन् प्रतिगामी लोकांकडून हेतुपूर्वक समाजात वेगवेगळ्या काळात सातत्यानं चालूच राहिली. बहुजनांनीही मागचा पुढचा विचार न करता, ते हीन विचार मुकाटपणे स्वीकारले अन् त्याप्रमाणेच वागूही लागले. त्यानंतर त्या विचारांप्रमाणे सुरू झालेलं वागणं हे बहुजनांच्या इतकं अंगवळणी पडलं की, रूढी, परंपरा अन् संस्कृतीच्या नावाखाली ते सगळं स्वतःवर लादून घेतलेलं जगण्याचा अविभाज्य भाग आहे, असं वाटू लागलं. त्यातल्या बऱ्याच चालीरिती ज्या अजूनही आपण कवटाळून बसलो आहोत, त्या झुगारायला तयार नाही.
अशा अनिष्ट रूढींमुळे समाजाचं प्रचंड नुकसान तर झालंच; पण त्यात सगळ्यात जास्त भरडल्या गेल्या आहेत, त्या बहुजन स्त्रिया. अनेक वाईट व अमानवी परंपरांच्या जोखडाखाली दबलेल्या स्त्रिया कित्येक वर्षे होरपळतच राहिल्या; परंतु पुरुषसत्ताक व्यवस्थेतही त्यांच्या बाजूनं ठामपणे उभी राहणारी काही थोर माणसं वेगवेगळ्या कालखंडात जन्माला आली, म्हणून तरी जरा बरं झालं.
स्त्रियांना पायातली वहाण समजून त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या स्वकीयांनासुद्धा शासन करणारे ‘कुळवाडीभूषण’ छत्रपती शिवराय अन् त्यानंतरही कृतिशील विचार मांडणारे जोतीराव, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, पंडिता रमाबाई, राजाराममोहन रॉय, संत गाडगेबाबा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विठ्ठल रामजी शिंदे, शाहू महाराज, गोपाळ गणेश आगरकर, कर्मवीर भाऊराव पाटील, तुकडोजी महाराज यांच्यामुळे तरी बहुजन समाजाची ससेहोलपट थोडीफार कमी होण्यास मदत झाली.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
या सगळ्यांच्या वेगवेगळ्या काळातल्या योगदानामुळे तरी वर्तमान परिस्थिती थोडीफार बरी आहे; पण पूर्वीच्या काळी कोवळ्या वयात एखाद्या मुलीचा नवरा जर अकाली वारला, तर तिला आयुष्यभर पांढऱ्या कपाळानं खाली मान घालून मन मारूनच जगावं लागे. कारण विधवेनं पुनर्विवाह करणं म्हणजे काहीतरी अक्रीत, महापातक केल्यासारखं होतं. हे पिढ्यांपिढ्यांच्या कृतीतून अन् अंधानुकरणातून चालत आलेलं होतं.
अशाच प्रकारचं अमानवी प्रतिगामित्व झुगारून द्यायचा प्रयत्न जर एखाद्या स्त्रीनं काही वर्षांपूर्वी केला असेल, तर समाज तिला सहजासहजी स्वीकारणार नाही अन् सुखानं जगूही देणार नाही, हे माहिती असतानाही सगळं उलथवून टाकण्याची भाषा करणारी ती स्त्री नेमकी कशी असेल? समाजाच्या रूढ चालीरितींविरोधात जाऊन अन् केवळ पोकळ पुरोगामी विचार न मांडता प्रत्यक्ष कृती करणाऱ्या त्या अगतिक स्त्रीची समाजात काय किंमत असेल? पुरुषच नाही, तर स्त्रियासुद्धा विधवेच्या पुनर्विवाहाकडे बघताना कशी नाकं मुरडत असतील? तिची कशी अवहेलना करत असतील?
अशी स्त्री कायमच पुरुषांच्या बापाची पेंड आहे, असं गृहीत धरून कुणीही तिच्या पदराला हात घालून तिला भोगू पाहत असेल, तेव्हा तिच्यातली वाघीण कशी चवताळत असेल? अशी स्त्री ज्या कुटुंबात राहत असेल, त्यांच्या भावकीनंच जर तिचं शोषण केलं असेल; तेव्हा ती त्याविरुद्ध बांगड्या मागं सारून प्रतिकार करत असेल, तर भावकीनं तिचा कसा छळवाद मांडला असेल? शाळेचं तोंडसुद्धा बघितलेलं नसतानाही शिक्षणाशिवाय गरिबीवर मात करायची ताकद दुसऱ्या कशातच नाही, असं जर ती सांगत असेल अन् तिच्या लेकराची शैक्षणिक फरफट होऊनही ती कशी हरत नसेल?
जुनाट बुरसटलेल्या पायवाटा सोडून अशी बंडखोर अशिक्षित स्त्री ही स्त्री-मुक्तीच्या नव्या वाटा कशा शोधत असेल? स्वतःच्याच घरात निर्वासितांसारखं जीवन जगूनही अन् आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर सतत उपेक्षेची जन्मठेप भोगूनसुद्धा शापितासारखं जीवन व्यतीत करणारी स्त्री खंबीरपणे कशी लढली असेल? तिच्या याच बंडाची अन् संघर्षाची गोष्ट कादंबरीत मांडण्याचा मी पोटतिडकीनं प्रयत्न केलाय.
अगदी काळीज पिळवटून टाकणाऱ्या दुःखभोगाची ही गोष्ट लिहिताना माझी नुसती घालमेल होत होती; पण मनाची केविलवाणी उलथापालथ सांभाळूनही लिहितच राहिलो. मुळात आमच्या कित्येक पिढ्यांना लेखनाची परंपरा अजिबात नव्हती. माझी आईसुद्धा शिकलेली नव्हती. ती अतिशय साधीभोळी, अडाणी स्त्री होती. तिच्या खांद्यावर कुटुंबाला जगवण्यासाठी संघर्षाचा जू परिस्थितीनं लादला तर होताच; पण स्वतःच्या अस्तित्त्वावर घाला घालू पाहणाऱ्या पुरुषप्रधान समाजव्यवस्थेविरुद्ध दंड थोपटून तिला दिवसरात्र झुंजावं लागत होतं. अशा आईच्या पोटी माझा जन्म झाला होता. त्यामुळे माझ्याही वाट्याला तिरस्कारच येत गेला; पण सगळं सहन करत अन् तिचा जीवनसंघर्ष बघत बघतच मोठा झालो.
त्यातूनच प्रेरणा मिळत राहिली. उपाशी पोटाला जगवण्यासाठी ती करत असलेला आटापिटा अन् तिच्या अविश्रांत कष्टाच्या ओव्या ऐकतच मी मोठा झालो. तिच्या आतड्याला पडलेला पीळ पाहून स्वतःची दुःखे मला मोहरीएवढी वाटू लागली. बापाचं छत्र फार लहानपणी नाहीसं झालं होतं, त्यामुळे ‘चूल आणि मूल’ याच्यापलीकडे जाऊन आईच माझा बाप झाली. तिची सगळी परवड, घुसमट, तडफड, जिद्द, चिकाटी मी जवळून पाहत होतो. म्हणूनच तर स्त्रीच्या भूमिकेत शिरून स्त्री-मनाचा अधिक चांगल्या पद्धतीने विचार करू शकलो.
मुलगी, सून, आई, तरुण विधवा बाई, अगतिक आई, उतारवयातली बाई ही सगळी रूपं अन् त्यानुसार भूमिका घेऊन येणाऱ्या प्रत्येक अरिष्टाला तोंड देणारी आई मी लहानपणापासून घरातच बघत आलो होतो. त्यामुळे स्त्रीला समजून घ्यायला फार लांब जावं लागलं नाही. हळूहळू विवेकी होत गेलो. कविता लिहून मन मोकळं करू लागलो. नंतर आवाका वाढत गेल्यानं हळूहळू दीर्घ लिहू लागलो. त्यातूनच ही कादंबरी आकाराला येऊ शकली.
२०१७ साली सुरू झालेली, शरीर व मनाचीही प्रचंड दमवणूक करणारी ही लेखनप्रक्रिया आत्ताशी संपलीय. मागं वळून पाहताना आज थोडा जरी हा लेखनप्रवास आठवला, तरी जे काही लिहिलंय त्याबद्दल समाधान वाटू लागतं. कारण बाह्यजगतातले सगळे दैनंदिन व्यवहार पार पाडून, नोकरी करून, आरोग्य सांभाळून, आर्थिक अडचणींवर मात करून हे सगळं लिहिण्यासाठी मन:स्थिती तयार करत वेळ काढणं, खरं तर फार जिकिरीचं काम होतं; पण जे काही मनात साचलं होतं, जे अनेक वर्षे खदखदत होतं ते सगळं जगासमोर आणलंच पाहिजे, हा माझा ठाम निर्धार होता. म्हणून तर ही कादंबरी पूर्णत्वास नेता आली.
या कादंबरीसाठी दिलेला एकूण वेळ जर मोजला, तर तो भरतो तब्बल साडेआठशे तास. दिवसभर काम करून संध्याकाळी घरी येऊन शिणल्या देहानं वेळ मिळेल, तसा दोन तास ते पाच तास बसून लिहिल्यानं कंबरेची मात्र पूर्ण वाट लागून जात होती. एखाद्या दिवशी तर जास्त वेळ लिहिल्यानं मांडी घालून जेवायला बसणंही मुश्कील होत होतं. कधीकधी तर वाटायचं की, नको हा त्रास, पण भूतकाळाच्या डोहातून ही संघर्षगाथा बाहेर काढल्याशिवाय आपल्याला निवांत जगता येणार नाही, म्हणून तर खूप निग्रहानं सगळा गाळ उपसत राहिलो. थोडं थोडं म्हणत खूप लिहून होत होतं.
एवढ्या दीर्घ लेखनाची पहिलीच वेळ असल्यानं अनेक चुका घडत होत्या. कित्येकदा पुनर्लेखन करावं लागत होतं. आठ खर्डे करूनही मन समाधानी होत नव्हतं. आदरणीय भालचंद्र नेमाडे यांनी म्हटलं आहे की, ‘कादंबरी ही दीर्घकाळ चालणाऱ्या युद्धासारखी, लेखकांना कागदाच्या ढिगाशी जखडून ठेवणारी भयस्वप्नासारखी आणि अमानुष अशी कृती असते.’ याचा तंतोतंत अनुभव मला या दीर्घ लेखनप्रक्रियेच्या दरम्यान आला.
मुळातच दीर्घ लेखनासाठी तितक्याच दीर्घ चिंतनाचीही गरज असते. त्यात खूप सातत्य लागतं. कथासूत्र टिकवून ठेवताना वाचकाच्या भूमिकेत शिरूनही आपल्याला कादंबरीकडे तटस्थपणे पाहावं लागतं. हे सगळं करताना प्रचंड दमछाक होत होती. संयम ठेवावा लागत होता.
या कादंबरीतले अनेक प्रसंग जसेच्या तसे उभे करताना जिथं जिथं काही प्रसंग घडले, तिथला तो भवताल माहिती असणं गरजेचं तर असतंच अन् लिखाण्याच्या दृष्टीनं प्रसंग उभा करण्यासाठी फायद्याचंही ठरतं. म्हणूनच तर माझं अख्खं बालपण जरी खेड्यात गेलं असलं, तरीसुद्धा जिथं जिथं काही महत्त्वाच्या घटना मी मांडल्या आहेत, तिथल्या अनेक ठिकाणी अनवाणी पायांनी कडक उन्हात बऱ्याचदा शेकडो किलोमीटर पायपीटसुद्धा करून आलो. तिथला भूगोल नव्यानं समजून घेतला.
विहिरी, बारवा, रानातले काट्याकुट्यांचे आडरस्ते, ओढे, गावं, डोंगर आणि खळीसुद्धा पायांना पुन्हा एकदा जवळून दाखवली. पायाला फोड येऊन ते फुटलेही. अनेकदा डोळेही हृदयाला शरण गेले. सगळं ऐकून, पाहून काळजात गलबलून आलं. हाताच्या मुठी कधीकधी आपोआप वळल्या गेल्या. धीर धरून सगळं समजून-उमजून घेतलं. सहन केलं. वेगवगेळ्या गावातल्या जुन्या खोडांशी हितगुज केलं. त्यांचे खरबुडे हात हातात घेऊन एक-एक प्रसंग जिवंत करत करत पुढं जात राहिलो. त्यातूनच ग्रामीण सामाजिक वास्तवाचा अन् सामाजिक जाणिवेचा अतिशय गंभीरपणे वेध घेणारा तीन पिढ्यांचा विशाल पट मला मांडता आला.
समाजातील अतिशय वाईट प्रवृत्तींविरुद्ध दिलेली कडवी झुंज अतिशय जबाबदारीपूर्वक अन् गांभीर्य न हरवता मांडणं गरजेचं होतं. कारण माझ्या माहितीनुसार आजवर ग्रामीण भाग आणि त्याच्याशी निगडित लेखन म्हटलं की, त्यातली गावंढळ भाषा, गबाळेपणा, दैन्य, दारिद्रय, साधेपणा, अडाणीपणा, रासवटपणा, गावची पाटीलकी, गावचं राजकारण इत्यादी सगळ्या गोष्टी जास्त गांभीर्यानं न मांडता सतत विनोदी अंगानंच साहित्यात मांडल्या गेल्यात.
तसेच गाव-खेड्याच्या इतरही अनेक गोष्टी नेहमी विनोदी अंगानं उभ्या तर केल्या गेल्याच, पण त्या तशाच पद्धतीनंच सिनेमातही केवळ मनोरंजनासाठी उथळपणे दाखवल्या गेल्या. पण लक्ष्मण माने, बाबाराव मुसळे, रा. रं. बोराडे, आनंद यादव, शरणकुमार लिंबाळे, वासुदेव मुलाटे, चंद्रकांत नलगे इत्यादी महत्त्वाच्या लेखकांनी ग्रामीण वास्तव अतिशय प्रभावीपणे उभं केलं, हे मात्र नाकारून चालणार नाही. त्यांचंच बोट धरून अनेकांनी गावखेडं अन् तिथल्या माणसांचं अगतिकीकरण सशक्तपणे उभं करण्याचा चांगला प्रयत्नही केला. त्यात भास्कर चंदनशिव, शेषराव मोहिते, द. ता. भोसले, सुशील धसकटे, महेंद्र कदम, राजन गवस, आसाराम लोमटे, नवनाथ गोरे, ऐश्वर्य पाटेकर यांनीही खूप महत्त्वाचं योगदान दिलं आहे, असं मला वाटतं.
ही सगळी गांभीर्यानं लिहिणारी मंडळी मला नेहमी प्रेरणा देत आलीत. त्यामुळे आपणही जे काही लिहू ते अतिशय जबाबदारीनं अन् अभ्यासपूर्ण लिहू अशी खूणगाठ मीही मनाशी बांधली. त्यामुळेच जीव ओतून संवेदनशीलपणे मी जातवास्तव, ग्रामीण कष्टकरी, शोषित, उपेक्षित अन् गांजलेल्या स्त्रीचं जगणं, भोगणं मांडू शकलो.
मी जसा कळता झालो; तेव्हापासून हे प्रकर्षानं जाणवत गेलं की, शेतीशी अजोड नातं असूनही ग्रामीण भागातल्या स्त्रीची परवडच मुळात शेतीच्या कामातून होत आलीय. त्यातून स्त्रियांची सुटका कधी झालीच नाही. पूर्वीच्या काळी तर साध्या पिठाच्या गिरणीचं सुखसुद्धा मूठभर बायकांच्याच हाताला परवडत होतं, पण त्याहून अधिक जात्यावर राबणाऱ्या हातांची संख्या जास्त होती. असे अनेक हात जातं ओढून आपला संसार चालवत असत. ती जात्याची घरघर केवळ जात्याची घरघर नव्हती, तर ती समस्त कष्टकरी आणि दारिद्र्यात जीवन कंठणाऱ्या बायांची पिढीजात घरघर होती. मरमर होती.
स्वतःच्या मनातलं दुःख जात्याच्या कानात सांगताना अनेक बाया स्वतःला विसरून जायच्या. मला त्याचं नेहमी अप्रूप वाटायचं. कारण त्यातल्या बऱ्याच बाया या निरक्षर असूनही अतिशय सुंदर व आशयघन ओव्या म्हणत. त्या ओव्या चिंताग्रस्त, अभावग्रस्त, दुष्काळग्रस्त, वैफल्यग्रस्त परिस्थितीचं दळण असायचं. जात्याचा खुंटा हातात घेतला की, बायांना आपोआप कंठ फुटायचा अन् त्याच ओव्या जगण्याची नवी उमेद वाढवण्यास मदत करायच्या.
रानात जरी गेलं, तरी कष्ट करताना म्हटलेल्या भलऱ्या त्यांच्या मनगटात बळ भरायच्या. अशा कष्टकरी स्त्रियांचं हे असं चुंभळीसारखं दबून जाणारं आयुष्य; जेव्हा गरज असेल, तेव्हा त्यांचं वापरलं जाणं; गरज संपली की, अडगळीत फेकून दिलं जाणं; स्त्रियांना शूद्रासारखं वागवणं, हे क्लेशदायी अन् शापित जगणं मांडत असताना या सगळ्यांच्या मुळाशी असलेला मनुवादी रूढीपरंपरांचा खूप मोठा पगडा आपल्या समाजावर होता. अजूनही तो कमी होण्याचं नाव घेत नाहीये, हा विचार माझ्या मनाला सतत व्यथित अन् अस्वस्थ करत होता. याच प्रवृत्तीचा फटका सगळ्या बहुजनांना आजवर बसत आलाय.
इथल्या वर्णवादाचा, जातिवादाचा अन् संरजामशाही वृत्तीचा निषेध करताना स्वतःच्याच जातीत होणारी कुचंबणा वाट्याला आलेली आमच्यासारखी अनेक गरीब कुटुंबं आजूबाजूला होती. त्यात सगळ्यात जास्त फरफट झाली ती स्त्रियांचीच. त्यामुळे मी माझ्यापरीनं अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी स्त्री उभी करण्याचा प्रयत्न केला आहे. अशी स्त्री की, जिला माहिती आहे आज तिच्या अंगणात काढलेली रांगोळी उद्या पुसली जाणार आहे; तरीही लढाऊ बाणा न सोडता संकटावर कसं तुटून पडावं? कृतिशील क्रांतीची ज्योत क्षीण होऊ न देता यशाची खात्री नसलेल्या अंधारातही वाट दाखवणारी मशाल बनून कसं ढणढणत राहावं?
आपल्याच हातांनी स्वतःच्या मनावर निखारे ठेवून एकट्या स्त्रीनं निर्भयपणे कसं जगावं? मायेचं एकही माणूस जवळ नसतानाही डोळ्यात पाणी न आणता आयुष्याची दीर्घकालीन लढाई न थकता कसं लढत राहावं? घरांच्या भिंतींना पोतेरा देणारे मुकाट व समंजस हात कधीकधी आई भवानीचा अवतार घेऊन अन्यायाच्या छातीत भाला कसे खुपसू शकतात?
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
................................................................................................................................................................
खरं तर हे सगळं शब्दात पकडणं फार अवघड अन् वेदनादायी होतं, पण यातनांच्या वणव्यात सापडलेल्या अन् दररोज वनवास भोगूनही आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अग्निपरीक्षांना सामोऱ्या जाणाऱ्या स्त्रियांचं जगणं हेच खऱ्या अर्थानं माझ्या लेखनाला प्रेरणा देणारं ठरलं. म्हणून तर सगळं जसंच्या तसं मांडलं.
साहित्य म्हणजे दुसरं तिसरं काही नसतं, तर अनुभवाच्या अनुषंगाने घेतला जाणारा आत्मशोध असतो. स्वतःला समृद्ध करत जाणारे अनेक अनुभव, नवनिर्मिती अन् त्यातून मिळालेला आनंदही मला कधीच विसरता येणार नाही, हेही तितकंच खरंय.
आता ही कादंबरी आपल्या हवाली करत आहे. या कादंबरीच्या रूपानं तुमच्या आयुष्यात कधी ना कधी अन् कुठे ना कुठे घडलेल्या जिवंत अनुभवांना नक्कीच भिडता येईल, एवढं मात्र खात्रीशीरपणे सांगतो. अगदी भयाण वास्तव वाटेल असा विशाल पट उभा करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. आता इथून पुढं सर्व गुणदोषांसकट माझ्या लिखाणावर व्यक्त होण्याची विनंती मी आपल्याला करत आहे. वाचक म्हणून आपला तेवढा अधिकार आहेच. थांबतो.
नाळ तोडायच्या आधीपासून चितेपर्यंत, बाळहंबरापासून हंबरड्यापर्यंत ज्या स्त्रियांचा जीवनप्रवास प्रचंड वेदनादायी अन् संघर्षमय झाला, अशा जगातल्या सगळ्याच जातिधर्मांच्या असंख्य अनामिक स्त्रियांना अन् माझ्या प्रिय आईला ही कादंबरी समर्पित करत आहे.
‘एक भाकर तीन चुली’ - देवा झिंजाड
न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस, पुणे | पाने – ४२४ | मूल्य – ४५० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment