‘डिंपल पब्लिकेशन’चे येत्या २६ जानेवारी रोजी सुवर्ण महोत्सवी वर्ष सुरू होत आहे. त्या निमित्ताने रविवारी २८ जानेवारी संध्याकाळी मुंबईत एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यात कथा-कादंबरीकार प्रा. अविनाश कोल्हे यांची ‘वाळूचे किल्ले’ ही नवी कादंबरी प्रकाशित होत आहे. या कादंबरीत त्यांनी मुंबईतील एका व्यक्तीच्या आयुष्याची शोकांतिका सांगितली आहे. या कादंबरीला त्यांनी लिहिलेल्या आगळ्यावेगळ्या अर्पणपत्रिकेचा हा संपादित अंश…
.................................................................................................................................................................
मी सप्टेंबर १९८०मध्ये पुणं सोडून मुंबईकर झालो, तरी पुण्याला नियमित जाणं-येणं सुरू होतं. आजही आहे. तेव्हा पुण्याला गेलो की, प्रा.स.शि. भावेसरांना भेटणं व्हायचंच. नंतर कधी तरी भावेसरांचं साप्ताहिक सदर ‘उत्तरमीमांसा’ ‘माणूस’मध्ये सुरू झालं. सदर लेखनाच्या गमती-जमती सांगताना सर अनेकदा श्री. ग. माजगावकरांबद्दल सांगायचे.
१९८५ सालं उजाडलं. ते ‘माणूस’चं रौप्यमहोत्सवी वर्ष होतं. त्या निमित्तानं पुण्यातल्या डेक्कनवरच्या ‘पूनम’मध्ये एक दिवसभराचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याला मी उपस्थित नव्हतो. त्यात विनायकराव कुलकर्णी, शरद जोशी, भावेसर वगैरेंची भाषणं झाली. या सोहळ्याला उत्तर देताना माजगावकर म्हणाले होते-
‘‘सैन्यात एखादी व्यक्ती कितीही कार्यक्षम असली, तरी तिला विशिष्ट वय पूर्ण केल्यानंतर निवृत्त करतात. मी जेव्हा १९६१मध्ये ‘माणूस’ सुरू केला, तेव्हा ते २० वर्षं चालवावं, असं मी ठरवलं होतं. त्या हिशेबानं मी ‘माणूस’ १९८१ साली बंद करणार होतो, पण तेव्हा मित्रांनी आग्रह केला आणि ‘रौप्यमहोत्सवी वर्षापर्यंत तरी चालवा,’ अशी गळ घातली. आता रौप्यमहोत्सवी वर्ष आलेलं आहे. मला ‘माणूस’ बंद करण्याची इच्छा आहे. मात्र जर एखादा योग्य तरुण समोर आला, तर त्याच्याकडे जबाबदारी सोपवून मी निवृत्त होणार आहे. मला तशी घाई नसली, तरी आता मात्र मी मित्रांच्या आग्रहाला बळी पडणार नाही.’’
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
काही दिवसांनी रूटीनप्रमाणे भावेसरांना रविवारी भेटायला गेलो. गप्पा मारताना मी ‘माणूस’च्या कार्यक्रमाचा उल्लेख केला आणि ‘माणूस’ बंद होण्याबद्दल विचारलं. भावेसर अचानक म्हणाले, ‘तू ही जबाबदारी का स्वीकारत नाहीस? तुला सहज जमेल’. सरांच्या आवाजात नेहमीची सहजता होती, माझा मात्र घसा कोरडा पडला. ‘माणूस’चा संपादक व्हायचं? तोपर्यंत मी जरी विविध विषयांवर भरपूर वृत्तपत्रीय लेखन केलेलं होतं, तरी संपादन केलेलं नव्हतं. शाळा-कॉलेजात असताना जसं अनेक लेखक-कवींनी हस्तलिखित मासिकं किंवा भित्तीपत्रं संपादित केली होती, तसासुद्धा अनुभव मला नव्हता.
तेव्हा मला जाहिरात कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी होती. नुकतंच लग्न झालं होतं. वसईला स्वत:चा कोरा करकरीत फ्लॅट होता. जाहिरात कंपनीतील नोकरी मन लावून करायची, संध्याकाळी गिरगावात ‘सत्यकथा’च्या कार्यालयात राम पटवर्धनांकडे गप्पा मारायला जायचं, ही माझी मुंबईकर झाल्यापासूनची सवय होती.
पटवर्धनांनीसुद्धा मी ही जबाबदारी घ्यावी, असं सुचवलं. मी चक्रावलो. मराठी साहित्यातील हे दोन मान्यवर. माझ्याबद्दल यांना एवढा विश्वास कसा वाटतोय? लेख लिहिणं वेगळं आणि संपादन करणं वेगळं, याचं मला भान होतं.
नंतरच्या एका पुण्याच्या खेपेत भावेसर मला माजगावकरांच्या कार्यालयात घेऊन गेले. हा काळ बहुधा डिसेंबर १९८५ असावा. भरपूर गप्पा झाल्या. माजगावकर जरी सहज गप्पा मारत असले, तरी धारदार नजरेनं माझं निरीक्षण करत आहेत, मला जोखत आहेत, याचा मला अंदाज होता. तेव्हा असं ठरलं की, मी अधूनमधून ‘माणूस’साठी लेखन करावं, १९८६च्या दिवाळी अंकापर्यंत असं चालू द्यावं, मग ‘माणूस’बद्दल निर्णय घ्यावा. त्यानंतर मी ‘माणूस’मध्ये महिन्याला एक असे जवळजवळ अर्धा डझन लेख लिहिले.
यातील आज आवर्जून उल्लेख करावा असा एक दीर्घ लेख म्हणजे ‘पीडित मुक्तीचे धर्मशास्त्र’. हा लेख मार्च १९८६मध्ये ‘माणूस’मध्ये प्रसिद्ध झाला. फेब्रुवारी १९८६मध्ये ख्रिश्चन धर्मातील कॅथलिक पंथाचे पोप जॉन पॉल (दुसरे) भारताच्या दौऱ्यावर आले होते. ते वसर्इलासुद्धा आले होते. हे निमित्त घेऊन मी लिबरेशन थिऑलॉजीच्या अंगाने चर्चमध्येसुद्धा कसं पुराणमतवादी विचार विरुद्ध पुरोगामी विचार यांचा संघर्ष सुरू आहे, याचं तपशीलवार विवेचन केलं होतं.
राम पटवर्धनांमुळे मला साप्ताहिक ‘टाईम’, ‘न्यूजवीक’ वाचायची सवय लागली होती. त्यामुळे मला लॅटिन अमेरिकेतील ख्रिश्चन धर्मगुरू फादर लिओनार्दो बॉफ वगैरे नावं माहिती होती. त्यांनी कशी ‘लिबरेशन थिऑलॉजी’ची मांडणी केली होती, परिणामी त्यांना १९८५ साली व्हॅटिकनने कसं मर्यादित अर्थानं बहिष्कृत केलं होतं वगैरे. त्याच्या आधारे मी लेख लिहिला.
लेख प्रसिद्ध झाल्यानंतर तो पुण्याच्या ‘श्रमिक विचार’ या लाल निशाण पक्षाच्या मुखपत्रानं पुनर्मुद्रित केला. माजगावकरांना फार आनंद झाला. हा आनंद दुहेरी होता. एक म्हणजे ‘लिबरेशन थिऑलॉजी’ वगैरेची माहिती मराठी वाचकांना पूर्णपणे नवीन होती. दुसरे म्हणजे ‘माणूस’च्या संभाव्य संपादकाचा लेख कम्युनिस्टांच्या मुखपत्रानं पुनर्मुद्रित केला होता.
बघता बघता ‘माणूस’चा १९८६ सालचा दिवाळी अंक प्रसिद्ध झाला. त्यात माजगावकरांनी एक निवेदन दिलं की, पुढचे काही नक्की होर्इपर्यंत ‘माणूस’ साप्ताहिक रूपात बंद करत आहोत. मात्र त्रैमासिक रूपात ‘माणूस’ वाचकांच्या भेटीला येईल. हे निवेदन वाचून माझा विरस झाला. माझी निराशा व्यक्त करायला भावेसर नव्हते. त्यांना ३ ऑक्टोबर १९८६ रोजी मृत्यूने गाठलं होतं.
१९८६च्या दिवाळीनंतर माजगावकर एकदा मुंबईला आले आणि मला भेटायला बोलावलं. तोपर्यंत मला अहमदाबाद येथे ‘मुद्रा’ या जाहिरात कंपनीत गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळाली होती आणि एक जानेवारी १९८७ रोजी नव्या ठिकाणी रुजू हजर व्हायचं होतं. ‘मुद्रा’ ही जाहिरात कंपनी अंबानी उद्योगसमूहाची होती. त्या काळी ‘मुद्रा’कडे ‘ओन्ली विमल’च्या आणि ‘रसना’च्या जाहिराती होत्या. तेव्हा ‘रसना’ची मॉडेल अंकिता झवेरी ही चिमुरडी सर्व भारतात प्रसिद्ध होती. तिची कॅचलाईन ‘I love you Rasana’ तेव्हा घराघरातील लहान मुलांच्या ओठांवर होती. अशा एजन्सीत मला नोकरी मिळाली होती. केवळ मुंबईच नव्हे, तर महाराष्ट्र सोडण्याची संधी, वरचं पद आणि भरपूर पगार. मी ढगात होतो.
माजगावकर लगेच मुद्द्यावर आले. जानेवारी १९८७पासून ‘माणूस’ त्रैमासिक स्वरूप काढावं… वर्षभरात दिवाळी अंकासह चार विशेषांक काढावे….सर्व सुरळीत होत आहे असं जर दिसलं, तर एक जानेवारी १९८८पासून ‘माणूस’ पुन्हा साप्ताहिक स्वरूपात काढावं, अशी त्यांची योजना होती. मी तात्काळ होकार दिला. ‘मुद्रा’च्या नोकरीला नकार कळवला, तेव्हा करत असलेल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि १ जानेवारी १९८७ रोजी ‘माणूस’मध्ये रूजू झालो.
माजगावकरांच्या मार्गदर्शनाखाली पहिला विशेषांक काढला आणि तो म्हणजे २६ जानेवारीचा ‘प्रजासत्ताक दिन विशेषांक’. तोपर्यंत ‘माणूस’मध्ये राजहंस प्रकाशनाची जबाबदारी दिलीप माजगावकराकडे आणि ‘साप्ताहिक माणूस’ श्री.गं.कडे, अशी कामाची विभागणी झाली होती. श्रीभाऊ (एव्हाना मी माजगावकरांना ‘श्रीभाऊ’ म्हणायला लागलो होतो) फक्त संपादक नव्हते, तर मालक-संपादक होते. त्यामुळे त्यांच्यात संपादकीय सर्जनशीलता, अनुभव आणि आर्थिक व्यवहार, यांचा उत्तम संगम झाला होता. याचा मला अनेकदा फायदा झाला.
मी १९८७ हे वर्ष ‘माणूस’चं पूर्ण वेळ संपादन केलं. त्या निमित्तानं मी दर पंधरा दिवसांनी पुण्याला जात असे. तेव्हा शनिवारी दुपारी एक बैठक ‘माणूस’च्या कार्यालयात, तर दुसरी श्रीभाऊंच्या घरी होत असे. पहिल्या वर्षात प्रजासत्ताक दिन विशेषांक, पर्यटन विशेषांकासह दिवाळी अंक असे चार अंक संपादित केले. १९८७चा दिवाळी अंक दर्जेदार मजकूर, खप आणि जाहिरातींच्या दृष्टीनं फार चांगला गेला.
पण तोपर्यंतसुद्धा ‘माणूस’च्या भवितव्याबद्दल श्रीभाऊंच्या मनाचा निर्णय होत नव्हता. त्यांना वाटतं होतं की, अशा प्रकारे त्रैमासिकाचा पर्यायसुद्धा चांगला आहे. यात वाचकांना दीर्घ आणि वैचारिक मजकूर देता येतो. याबद्दल माझ्या मनांत शंका नव्हती. फक्त ऐन तिशीमध्ये मला पूर्ण वेळ त्रैमासिक संपादित करण्यात रस नव्हता. म्हणून मग मी जानेवारी १९८८मध्ये पुन्हा एकदा जाहिरात कंपनीत नोकरी स्वीकारली आणि पुढची जवळपास चार वर्षे म्हणजे १९९१ सालापर्यंत त्रैमासिक स्वरूपातल्या ‘माणूस’चं संपादन केलं.
ही अर्पणपत्रिका म्हणजे त्या साडेचार-पाच वर्षांत ‘श्री. ग. माजगावकर’ या नामवंत संपादक-विचारवंताबरोबर मला काम करण्याची जी दैवदुर्लभ संधी मिळाली, त्या दरम्यान मला जीवनभर पुरतील असे जे संस्कार मिळाले, त्याबद्दल व्यक्त केलेली कृतज्ञता आहे.
श्रीभाऊंच्या मार्गदर्शनाखाली मी अनेक विशेषांकांचं संपादन केलं. या सर्व प्रवासात त्यांनी मला नेहमी अतिशय आदरानं वागवलं आणि अनेकदा माझ्या अननुभवांवर पांघरूण घातलं. माझ्या संपादकीय निर्णयात कधीही ढवळाढवळ केली नाही. पहिल्या विशेषांकात म्हणजे प्रजासत्ताक दिन विशेषांकात अॅल्विन टॉफलरच्या ‘फ्युचर शॉक’ या गाजलेल्या पुस्तकाचा दीर्घ परिचय प्रसिद्ध केला होता. या पुस्तकात टॉफलरने माणसाचं भविष्यातील जगणं कसं असेल, तंत्रवैज्ञानिक प्रगती माणसाच्या जीवनात कसे अमूलाग्र आणि कल्पनातीत बदल घडवून आणेल, वगैरेंबद्दल भाकितं केली होती.
एवढा मोठा लेख वाचताना वाचकांना मानसिक ‘रिलीफ’ मिळावा म्हणून आशयानुरूप व्यंगचित्रं असावी, ही माझी कल्पना श्रीभाऊंनी उचलून धरली. त्यानुसार मी दादरच्या श्रीनिवास हेबळे यांच्याकडे गेलो. त्यांनी मस्त खुसखुशीत चित्रं काढून दिली. ती श्रीभाऊंसुद्धा आवडली. अंक प्रसिद्ध झाला. त्याचं यथोचित कौतुक झालं. मात्र हेबळेंनी सातशे रुपयांचं बिल दिलं. मला तेव्हा लेखक-चित्रकारांच्या मानधनाबद्दल काहीही अंदाज नव्हता. श्रीभाऊंच्या लक्षात आलं की, ही रक्कम फार म्हणजे फारच जास्त आहे. मात्र त्यांनी एका शब्दानं मला बोल न लावता सातशे रुपयांच्या धनादेशावर सही केली. ‘यापुढे आधी मानधनाची रक्कम ठरवून घेत जा’ असा मोलाचा सल्ला दिला. हा सल्ला मला पुढे अनेक ठिकाणी कामी आला.
‘माणूस’मध्ये मुंबईकर लेखकांचं लेखन आहे त्यापेक्षा जास्त प्रमाणात यावं, असं आम्ही ठरवलं होतं. त्यानुसार वसंत आबाजी डहाकेंचा मार्केझच्या ‘Chronicle of a death foretold’ या कादंबरीवरचा दीर्घ लेख, प्रशांत कुलकर्णी आणि अभिमन्यू कुलकर्णी या तरुण व्यंगचित्रकारांची चित्रं, दुर्गाबाई भागवतांचे लेख, डॉ. अरुण बाळ यांचे लेख, भीमसेन देठे या तरुण दलित लेखकाच्या कथा, अंबिका सरकार यांची कादंबरी वगैरे लेखन ‘माणूस’मध्ये प्रसिद्ध झाले.
मी जसा अगदी ढोबळ मानानं ‘डावा’ होतो आणि आहे, त्याचप्रमाणे श्रीभाऊ ढोबळ मानानं ‘उजवे’ होते. त्यांची संपादकीय भूमिका सर्वसमावेशक आणि लवचीक होती. ते अनेकदा त्यांच्या भूमिकेच्या विरोधात असलेलं लेखनसुद्धा प्रसिद्ध करत असत, मात्र संपादकीयातून विरोधी लेखांत मांडलेल्या भूमिकेचा प्रतिवाद करत असत. याचं एक उदाहरण देतो. श्रीभाऊंच्या मनात स्वयंसेवी संस्थांबद्दल विशेष प्रेम होतं. ते स्वत: ‘श्रीग्रामायन’शी संबंधित होते.
त्या काळात जगभर विचारवंतांमध्ये स्वयंसेवी संस्थांबद्दल चर्चा सुरू होती. ‘द मार्क्सिस्ट’ या डाव्यांच्या मासिकात साथी प्रकाश करात यांचा या विषयावर दीर्घ लेख प्रकाशित झाला होता. यात त्यांनी स्वयंसेवी संस्थांवर सैद्धान्तिक भूमिकेतून जबरदस्त टीका केली होती. हा लेख ‘माणूस’मध्ये प्रकाशित व्हावा, अशी माझी इच्छा होती. श्रीभाऊ तयार झाले. लेख प्रसिद्ध झालासुद्धा. मात्र संपादकीयात श्रीभाऊंनी एक प्रश्न उपस्थित केला- ‘ही प्रतिकूल मार्क्सवादी भूमिका कितपत योग्य आहे?’ हा वैचारिक मोकळेपणा आज दुर्मीळ आहे.
श्रीभाऊंच्या संपादनाची एक खासीयत म्हणजे लेखांना समर्पक पोटमथळे देणं. त्यांच्या मते एखाद्या वाचकानं जर फक्त पोटमथळे वाचले, तरी त्याला लेखातील मध्यवर्ती सूत्रं समजलं पाहिजे. श्रीभाऊंच्या विचारविश्वात सामाजिक सुधारणा, शेतीचा विकास वगैरे मुद्द्यांना महत्त्वाचं स्थान होतं. त्या तुलनेत साहित्य, सिनेमा, कला, नाटक वगैरे त्यांच्या आस्थेचे विषय नव्हते. मात्र या क्षेत्रात काय सुरू आहे, कोण काय लिहीत आहे वगैरेंवर त्यांचं बारीक लक्ष असायचं.
मी तेव्हा वसई रोडला राहत होतो. भाऊ पाध्येसुद्धा तेथे राहत होते. मी भाऊकडून हिंदी सिनेमावर बरेच लेख लिहून घेतले. श्रीभाऊंना ‘माणूस’चं अवतारकार्य कोणतं याबद्दल अतिशय स्पष्ट जाण होती. चित्रपटसृष्टीवर भाऊचे लेख प्रसिद्ध करणाऱ्या श्रीभाऊंनी आशिष राजाध्यक्ष किंवा इकबाल मसूदचे सिनेमाविषयक सैद्धांतिक लेखन प्रसिद्ध केलं नसतं. त्यांना ‘माणूस’च्या वाचकांचा अचूक अंदाज होता.
‘माणूस’ साप्ताहिक ‘सत्यकथा’ आणि ‘किर्लोस्कर’ यांच्या मध्ये उभं आहे, असं ते मला नेहमी सांगत. एखादी चांगली कथा-कविता ‘माणूस’च्या दिवाळी अंकात आली नाही, तर त्यांना फारसं वैषम्य वाटत नसे. पण महाराष्ट्रातील राजकारण, समाजकारण, शेती वगैरे विषयांवर जर महत्त्वाचा लेख ‘माणूस’कडे आला नाही, तर मात्र ते फार अस्वस्थ होत.
त्यांनी मला एकदा शरद जोशींच्या चळवळीवर ‘योद्धा शेतकरी’ हा दीर्घ लेख कसा ऐन दिवाळीत त्यांच्याकडे आला, काहीही झालं तरी तो दीर्घ लेख छापायचाच असा निर्णय घेऊन मग त्यांनी दिवाळी अंकासाठी आधी स्वीकारलेले, कंपोझ केलेले अनेक लेख बाजूला ठेवले आणि १९८०च्या दिवाळी अंकात विजय परुळकरांचा ‘योद्धा शेतकरी’ हा दीर्घ लेख प्रसिद्ध केला!
श्रीभाऊंसारख्या नामवंत संपादकाच्या मार्गदर्शनाखाली मला संपादनाचे धडे गिरवता आले. त्या आधी मी अनेक वर्षं ‘सत्यकथा’त नियमित जात होतो. राम पटवर्धनांसारख्या दर्जाबद्दल काटेकोर असलेल्या संपादकाला संपादन करताना बघणं वेगळं आणि ‘माणूस’सारख्या दबदबा असलेल्या मासिकाचं प्रत्यक्ष संपादन करणं वेगळं.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
................................................................................................................................................................
श्रीभाऊंचे माझ्यावर खोल संस्कार आहेत. त्यामुळे आजही दिवाळी अंक चाळले आणि ढिसाळ संपादन दिसलं की, डोक्यात राग शिरतो. श्रीभाऊ ‘माणूस’च्या अंकांच्या अनुक्रमणिकासुद्धा किती काळजीपूर्वक तयार करत! त्यांच्या मते अनुक्रमणिका म्हणजे अंकात शिरण्याचा दरवाजा. तेथे वाचकांचं यथोचित स्वागत झालं पाहिजे.
‘माणूस’चे दिवस कसे भुर्रकन उडून गेले! एके दिवशी हा उपक्रम थांबवण्याचा निर्णय झाला. मला अंदाज आला की, माझ्या आयुष्यातलं काही तरी फार चांगलं कायमचं संपत आहे. ‘माणूस’ बंद झाल्यानंतर अनेक मान्यवरांनी मला त्यांचे अंक संपादित करण्याची ऑफर दिली. मी आजपर्यंत नम्रपणे नकार देत आलो आहे. श्रीभाऊंबरोबर काम केल्यानंतर आता इतरांबरोबर मला काम करता येणार नाही, याची मला खात्री होती.
श्रीभाऊंसारखा दर्दी, उमदा, उदारमतवादी, नव्या विचारांचं स्वागत करणारा, आपल्या तरुण संपादकाच्या मागे भक्कमपणे उभा राहणारा, चांगल्या लेखनाला दाद देणारा संपादक यापुढे होणे नाही, असं माझं मत आहे. या कादंबरीच्या अर्पणपत्रिकेच्या निमित्तानं तो चार-पाच वर्षांचा काळ डोळ्यांसमोर उभा राहिला. श्रीभाऊंच्या स्मृतींस अभिवादन करून मी माझी ही कादंबरी त्यांना अर्पण करतो.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment