अजूनकाही
आनंद विंगकर यांच्या ‘दस्तावेज’ या कादंबरीत एके ठिकाणी ‘पाडू चला रे भिंत ही मधे आड येणारी,
या मनामनातून बांधूया एक वाट जाणारी’ या ओळी आहेत. जात, धर्म यांची भिंत पाडण्याचा प्रयत्न करून माणसांची मनं जोडणारी वाट सापडते का, याचा शोध घ्यायला लावणारा हा ‘दस्तावेज’ आहे. या कादंबरीत फक्त अशोक या नायकाचा पट नाही, त्याच्यासोबत अनेक पात्रांची उपकथानकं आहेत. त्यात गावातील जातीय संघर्ष प्रकर्षानं आला आहे. दलित आणि गावातील सवर्ण यांच्यातील जगणं पूर्वी कसं होतं, याचा पटही कादंबरी मांडते.
“ज्याची ऐपत असेल ते प्रेत जाळतात, तर बाकीचे गरीब हे सर्व प्रेतं पुरतात. पुरण्यासाठी घमेलं भर मीठ मिळत नाही. म्हणून तसंच पुरतात आन त्याच्यावर दगडा-मातीचा थर लावतात. घारी, गिधाडं, कोल्हा, कुत्री उखरू नये म्हणून त्याच्यावर बोरी-बाभळीच्या काट्या टाकतात आन त्यानंच सजवलेली दिसतात गरिबांची प्रेतं,” असे कादंबरीतील प्रसंग काळीज पिळवटून टाकतात. माणसं असं का वागतात? ज्या दलित-बहुजनांनी त्यांच्यासाठी रात्रंदिवस राबायचं आणि त्यांच्यासाठी मरेपर्यंत झटत राहायचं, त्यांची मेल्यावरही हेळसांड होते, याचे चिंतन करायला लावणारी ही कादंबरी आहे.
यातील तरुण पोरं म्हणतात, “आमच्याच पोरं नवीन जगण्याची दिशा शोधतात. त्यांना बाबासाहेबांमुळे आत्मभान येतं. त्यातून त्यांना माणूस असण्याची जाण होते आणि गुलामी विरुद्ध स्वाभिमान असा संघर्ष सुरू होतो. तो आजही सुरू आहे.
कादंबरीचा सूर अत्यंत प्रामाणिक आहे. लेखकाची समाजाबद्दलची तळमळ त्यातून व्यक्त होते. यातले प्रसंग, त्यात वापरलेले शब्द आणि त्यातून निर्माण होणारी शब्दरूपी चित्रं सतत कृती करण्याची आस देत राहतात. दत्तूअण्णांनी गावात स्वाभिमानानं जगता येत नाही, म्हणून गाव सोडून जायची हाक दिल्यावर अनेक जण त्यांच्यासोबत निघतात. त्यात बाया-पोरांसोबत अनेक जाणती माणसंही असतात.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
खाशाबा, धोंडिबा, कमळाय, शेवन्ता, बाणाय, हरणाय आणि इतर अनेक जण गावी सोडून जात असताना सरपंच अडवतो. त्या वेळी हरणायआजीला हुंदका फुटतो. ती “कशाला राहायचं इथं? टाचा घसीत मारायला? नवरा मेला तर गोरीत टाकायला मीठ मिळालं नाय. ना कफान. गावाची वझी वाहून त्याची हाडं झिजली. फुकटात बैलासारखा वापरून घेतला त्याला. मेल्यावं त्याच्या तिरडीचं सामान मिळालं नव्हतं. कोल्ह्या-कुत्र्यांनी वडून बाहेर काढलं पिरीत. तवा कुणी इचारलं नाय. मेल्यावर सुदिक सरलं नाय त्याच्या देहाचं हाल. नाव घिऊन कशाला इचारतयस हरनाय?”
मग इतरही बाया आणि पोरं बोलू लागतात. म्हणजे एकानं आवाज दिला की, ज्यांनी सोसलं ते सर्व बोलू लागतात, त्यांच्या वेदना मांडू लागतात. त्यातून अनेकांची दुःखं बाहेर येतं. म्हणजे हा प्रसंग बदलाची भाषा बोलतो.
एके ठिकाणी असं येतं की “इथं कुणाच्या म्होरं टिप गाळतीस चला मुकाट्याने. इथं दगडाला पाझर फुटेल. माणसाला नव्ह.” अशा प्रसंगांतून त्या काळातील दलितांच्या जगण्याचा संघर्ष डोळ्यासमोर येतो. वाटत राहतं की, माणसं असं कसं वागू शकतात. एखादा मरणासन्न अवस्थेत आहे, तरीही त्याचे कपडे उतरवून त्याला नागडा करून, त्याची आतडी फाडून त्याला अस्ताव्यस्त केलं जातं. अशी व्यवस्था माणूस म्हणून घेणाऱ्यांना शोभत नाही.
त्या प्रसंगात पुढे काही मतमतांतरं होतात. विठूआजा समजावतो. मग काही दिवस दत्तूअण्णा गावात राहतो, पण त्याचं मन लागत नाही. मग तो गावातील पोरं एकत्र करून, भाकरी बांधून अगीनगाडीनं पोरांना घेऊन मुंबईला जातो. त्याच घोळक्यात अशोकचे वडीलही मुंबईला जातात. अशोक मुंबईत शिकतो. त्याला चार गोष्टी समजतात. नंतर तो परत गावी येतो.
“म्हणा हे सर्व लोक माझे आहेत. जसे या मोर्च्यातील लोकांना वाटतंय, बघा ना नामदेवासारखी सुरवात करा. प्रत्येक मोहल्यातून, गावातून लोक येतील अन गातील- अवघाचि संसार सुखाचा करीन.” या ओळींनी कादंबरीचा शेवट केला आहे. त्या मनात घर करून राहतात. वाटत राहतं की, भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षं झाली, तरीही आज तळागाळातील सामान्य कष्टकरी, कामगार यांना माणूस म्हणून जगता येत नाही. त्यांना कोणत्या ना कोणत्या गुलामीत अडकवून ठेवलेलं आहे. जात, धर्म आणि आता खाजगीकरण, जागतिकीकरण, आधुनिकता यांच्या नावाखाली गरिबी वाढत आहे.
गावातील परिस्थिती बदलण्यासाठी आणि मुलांना शिकवून संघर्ष करण्यासाठी धडपडतो. गावात शिकवणी सुरू करतो. त्यात अनेक मुलं-मुली येतात. त्यांना लिहिता-वाचता आल्यावर तो गावात साक्षरतेचे वर्ग सुरू करतो. प्रौढ नागरिकांनादेखील शिकवण्यासाठी प्रयत्न करतो. लिहिता-वाचता आलं तर माणूस शहाणा होऊ होतो. त्याला व्यवहार समजतो आणि त्याच्यात बदल होतो, म्हणून तो शिक्षणाच्या माध्यमातून परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करत राहतो.
कादंबरीकार विंगकर आपल्या मनोगतात म्हणतात, “मला नव्याने माणसामाणसांत संवाद सुरू करायचा आहे. त्यासाठी भूतकाळ माहीत हवा, अपराधीभावनेसाठी नाही. आजचं वास्तव अधिक सजगतेनं समजण्यासाठी. आणि वास्तव जे कधी स्थिर नसतं. जे नेहमीच बदलणारं, अर्थपूर्ण क्रिया करायला उद्युक्त करणारं. मला तर असं दाखवून द्यायचं आहे, वास्तव जे अंततः बदलतंय.”
यातून लेखकाची भूमिका लक्षात येते. त्या बदलाची नोंद या कादंबरीत पानापानावर दिसते. आज एका बाजूला माणूस प्रगत होत असल्याचं दिसत असलं, तरी अनेकांच्या मनात अजूनही पारंपरिक रितिरिवाज दडून बसले आहेत. त्यामुळे कधी कधी समाजात जातीय संघर्ष उभा राहताना दिसतो. त्यामुळे या साहित्यकृतीतून येणारे विचार आपल्याला कृती करावी, अशी साद घालतात.
जातीय गुलामी संपून वर्गीय गुलामी सुरू असल्याचं चित्र या कादंबरीतून पुढे येताना दिसतं. पूर्वी गावात सरंजामशाही होती, आता लोकशाहीच्या नावाखाली गरीब-श्रीमंत अशी दरी उभी राहिली आहे. त्यातून ‘सत्ताशाही’ तयार झाली. आणि त्यातून समाजातील मोजक्या लोकांनी महत्त्वाची पदं, प्रतिष्ठा मिळवली आहे. सर्व संपत्तीचं एकत्रीकरण काही ठरवीक वर्गाकडे होत आहे. त्यामुळे गरिबांचा आर्थिक संघर्ष वाढला आहे.
लेखकाने आजूबाजूचा भोवताल आधुनिकरणाच्या नावाखाली कसा बदलत आहे आणि त्यातून परत माणसू कसा गुलाम होत आहे, याचीदेखील मांडणी केली आहे. म्हणजे सध्याचा माणूस बेकार कसा होत आहे, तो कर्जात, व्यसनात, वैफल्यात कसा अडकला आहे, याचे अनेक दाखले समोर येतात. त्यामुळे या कादंबरीला एक विशेष महत्त्व आहे.
..................................................................................................................................................................
हेहीपाहावाचाअनुभवा
आपल्या देशातल्या शोषित, पीडितांच्या, दलित-आदिवासींच्या ‘स्वातंत्र्या’ची पहाट अजून व्हायची आहे…
‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ : शोषितांच्या कथा शोषितांनीच सांगाव्यात!
ज्यांनी गरिबी अनुभवली; बेघरपणा, शोषितपणा बघितला, त्यांच्यासाठी हा चित्रपट ‘मस्ट’ आहे
..................................................................................................................................................................
या कादंबरीत भावभावना, प्रेम, आशा, जिद्द, ध्यास, दुःख आणि वेदना यांचे अनेक प्रसंग आलेले आहेत. यातील पात्रांचे दारिद्रय व त्यांच्या गरिबीची वेदना याबद्दल कणव येत राहते, तर सरंजामी श्रीमंतीला असणाऱ्या मग्रुरीचा तिरस्कार वाटत राहतो.
या कादंबरीत पात्राप्रमाणे जी स्थळं येतात तीदेखील बदलाची प्रतीकं असल्याचं जाणवतं. म्हणजे मंदिराची जागा समाजमंदिरं घेतात. गावातील हॉटेल आणि दांडा नसलेला कप काळानुसार भंगरात जातो आणि हॉटेल व नवीन कप त्याची जागा घेतात. अशा पद्धतीनं स्थळ, काळ, वेळ आणि साधनं यांचा वापर कथात्म सूत्र बांधताना केला आहे. त्यामुळे या कथेत अनेक गर्भित अर्थ दडलेले आहेत. ते वाचकाला त्यांच्या त्यांच्या संदर्भानं खुणावत राहतात.
“भांडवलदाराना भांडवल हाच जसा देश, तसंच या मध्यमवर्गाचं बुद्धी हेच भांडवल. ती कुठेही गहाण ठेवून उपजीविका करता येते त्यांना. स्वातंत्र्याची फारशी गरज नसते. आज इथं, उद्या कॅनडा, ऑस्ट्रेलिया. पृथ्वीच्या कोणत्याही कोपऱ्यात ते स्थिरावतात. आणि म्हणूनच त्यांचं राष्ट्र प्रेम फिजूल आहे.”
या वाक्यातून आजच्या बुद्धिवादी मध्यमवर्गाचं जगणं कसं आहे आणि त्यांनी आपलीशी केलेली जीवनशैली कशी आहे, हे अधोरेखित केलं आहे. म्हणजे बुद्धीच्या जीवावर जगणाऱ्यांनादेखील भांडवलदारांनी गुलाम केलं आहे. आपण आधुनिकतेच्या नावाखाली सारं जग जरी फिरत असलो आणि कुठेही रोजगार करत असलो, सुखसोयी मिळवत असलो, तरी व्यवस्थेच्या पातळीवर कसे खाजगी मालकाच्या व सरकारच्या बंधनात आहोत, हे या कादंबरीच्या उत्तरार्धात वाचायला मिळतं.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
ही कादंबरी पुरेसा वेग घेत नाही, असं वाटतं, पण प्रत्येक पानावरची वाक्यं विचार करायला लावतात. त्यामुळे हळूहळू वाचत जात असताना ही कादंबरी कंटाळवाणी वाटू शकते, पण वाचून संपल्यावर अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतात, म्हणून ही कादंबरी ‘दस्तावेज’ आहे.
“म्हणा हे सर्व लोक माझे आहेत. जसे या मोर्च्यातील लोकांना वाटतंय, बघा ना नामदेवासारखी सुरवात करा. प्रत्येक मोहल्यातून, गावातून लोक येतील अन गातील- अवघाचि संसार सुखाचा करीन.” या ओळींनी कादंबरीचा शेवट केला आहे. त्या मनात घर करून राहतात. वाटत राहतं की, भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षं झाली, तरीही आज तळागाळातील सामान्य कष्टकरी, कामगार यांना माणूस म्हणून जगता येत नाही. त्यांना कोणत्या ना कोणत्या गुलामीत अडकवून ठेवलेलं आहे. जात, धर्म आणि आता खाजगीकरण, जागतिकीकरण, आधुनिकता यांच्या नावाखाली गरिबी वाढत आहे. त्यामुळे कष्टाने पिचून जाणाऱ्या गरीब माणसांचा हा ‘दस्तावेज’ आहे... तो धडपडणाऱ्यांसाठी सदैव रस्ता दाखवत राहील!
‘दस्तावेज’ - आनंद विंगकर | लोकवाङ्मय गृह, मुंबई | पाने – ५०४ | मूल्य – ६५० रुपये.
.................................................................................................................................................................
लेखक ज्ञानेश्वर जाधवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथे माध्यम व संज्ञापन अभ्यास विभागात पीएच.डी. स्कॉलर आहेत.
j.dnyan@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment