इंद्रधनुष्य पाहताना आपल्याला वेगवेगळ्या रंगांच्या छटांचा अनुभव येतो, त्याचप्रमाणे हे पुस्तक वाचताना चेखवच्या कथांच्या विविध रंगच्छटा अनुभवायला मिळतील!
ग्रंथनामा - झलक
इर्शाद वडगांवकर
  • ‘रादुगा : अंतोन चेखवच्या निवडक रशियन कथा’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Tue , 26 December 2023
  • ग्रंथनामा झलक रादुगा Raduga अंतोन चेखव Anton Chekhov

‘रादुगा’ या पुस्तकात इर्शाद वडगांवकर यांनी जगप्रसिद्ध रशियन लेखक अंतोन चेखव यांच्या रशियन कथांचा मराठी अनुवाद केला आहे. नुकत्याच डायमंड पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित झालेल्या या पुस्तकाला अनुवादकाने लिहिलेल्या मनोगताचा हा संपादित अंश...

.................................................................................................................................................................

एकोणिसाव्या शतकात ‘कथा’ या साहित्यिक रूपबंधाला आकार देत, खर्‍या अर्थानं तिचा पाया घालण्याचं काम अ‍ॅलन एडगर पो, मोपासा, ओ हेन्री आणि अंतोन चेखव यांसारख्या मंडळींनी केलं, असं मानलं जातं. ‘लघुकथा’ या साहित्य प्रकाराला स्वत:च्या प्रतिभेने एका वेगळ्या उंचीवर नेणार्‍या चेखवच्या कथांचे जगातल्या जवळपास सर्वच प्रमुख भाषांत अनुवाद झाले आहेत; अजूनही होत आहेत. त्याच्या कुठल्या ना कुठल्या साहित्यकृतीचा अभ्यास होत नसेल, असं एकही विद्यापीठ सापडणार नाही. जगभरात विविध भाषांमध्ये कथानिर्मिती करणार्‍या लेखकांवर चेखवचा प्रभाव जाणवतोच. त्याच्या नाटकांचे प्रयोग वेगवेगळ्या प्रतिष्ठित रंगमंचावर होत राहतात. ‘हाऊ टू राईट लाईक चेखव’सारखी नवख्या लेखकांसाठीची पुस्तकं ग्रंथालयात दिसतात.

माणूस नावाचा प्राणी, त्याचं जगणं, बोलणं, वागणं, विचार करणं, स्वप्न बघणं, प्रेम करणं, द्वेष करणं, त्याग करणं, फसवणूक करणं... थोडक्यात, माणसाच्या अस्तित्वाच्या केंद्रबिंदूपासून त्याचा संपूर्ण परीघ समजून घेण्याचा आणि तो कलात्मकरित्या मांडण्याचा प्रयत्न अनेक लेखक-कलावंतांनी केलेला आहे; करत आहेत. त्यात त्यांना जे काही गवसलं, त्याद्वारे आपलं अपूर्ण जीवन अधिक सुंदर, अधिक अर्थपूर्ण करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. अशा कलावंतांच्या यादीत चेखव आणि त्याच्या कथेचं स्थान बरंच वरचं आहे.

बी.ए. प्रथम वर्षाला ‘द लॉटरी तिकीट’ या कथेमधून चेखवची पहिली ओळख झाली. वास्तव जीवनातल्या अपूर्ण इच्छांचा सल आणि दिवास्वप्नांमधून त्या पूर्ण करण्याचा निरर्थक, अयशस्वी प्रयत्न यांच्या विरोधाभासातून निर्माण होणारी सामान्य माणसांची हतबलता खूपच भावली. धमकले सरांनी त्यांच्या शैलीत शिकवलेली ‘द बेअर’ ही चेखवची एकांकिका खास लक्षात राहिली. शत्रुत्व आणि व्यक्तीच्या सुप्त इगोवर प्रेमभावना कशी प्रबळ ठरते, हे त्याच्या या फार्समधून मी अनुभवलं.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

तेव्हापासून चेखव नेणिवेत घट्ट बसला, तो कायमचाच! रशियन समजायला लागल्यावर मी त्याच्या कथा मूळ रशियनमध्ये वाचू लागलो आणि हादरलोच! रशियनमध्ये चेखव विश्‍वास बसणार नाही इतकं सोपं, साधं, सरळ लिहितो. छोटी छोटी वाक्यं, वर्णनाचा कुठलाही फापटपसारा नाही, संक्षिप्तता अगदी काटेकोर पाळलेली, तरीही कुठेही कृत्रिमता वाटत नाही. त्याच्या कथांचा आशय आणि शैली - दोन्हींनी मनाची पकड घेतली.

एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवत असताना ‘बेगर’ ही चेखवची कथा अभ्यासक्रमात होती. कथा खूपच आवडली होती. सहज विचार आला, ‘ही कथा आपल्या मित्रांसाठी आपण रशियनमधून मराठीत अनुवादित केली तर? आपल्याला जे सापडलंय, ते इतरांनादेखील दाखवण्याची आपली सुप्त इच्छा असतेच ना!’ मग अनुवादाचा तसा प्रयत्न केला. तो ‘साम्यवादी’च्या २०१८च्या अंकात छापून आला. मग ठरवलं की, चेखवच्या अशाच छोट्या छोट्या कथा घेऊन आपल्या मित्रांसाठी त्यांचा अनुवाद करत राहू. हे अनुवाद जवळच्या मित्र-मैत्रिणींशी शेअर करत होतो.

या अनुवादांमधून त्यांचा रशियन साहित्याकडं थोडा ओढा निर्माण व्हावा, हा माफक उद्देश माझ्या डोळ्यांसमोर होता. त्यात मी थोडाबहुत सफलदेखील होत होतो, कारण बर्‍याच जणांकडून तशा प्रतिक्रिया मिळत होत्या. त्यात मी रशियन साहित्य-इतिहासाच्या संदर्भात लेख आणि ब्लॉग लिहायला लागल्यावर ‘या अनुवादाचं पुस्तक स्वरूपात काही करता येतं का पाहा’ असं काहींनी सुचवलं.

.................................................................................................................................................................

*!#* ‘अक्षरनामा’ दीपावली २०२३ विशेषांक *!#*

वेगळे, नावीन्यपूर्ण, अर्थसंपन्न आणि अंतर्मुख करायला लावणारे चिंतनशील असे १३ लेख...

पाहावाचाअनुभवाइतरांनासूचवा

https://www.aksharnama.com/client/sub_categories_articles/166

.................................................................................................................................................................

त्या दृष्टीने विचार करता, चेखवच्या बाबतीत मला एक दिशा मिळाली - त्याच्या कथांच्या अनुवादाचं एक पुस्तक! पण त्यासाठी चेखव अगोदर नीटपणे समजून घ्यावा लागणार होता... कामाला लागलो. त्याच्या इतर बर्‍याच कथा सर्वप्रथम वाचून काढल्या. चेखववर इंग्रजीतून, रशियनमधून लिहिलेलं बरंचसं समीक्षणात्मक वाचत गेलो. चेखवला एक कथाकार, एक कलाकार म्हणून समजून घेऊ लागलो, तशी त्याच्या कथांची खोली आणि घनता अधिकच स्पष्ट कळू लागली.

विशेषत: विजय पाडळकर यांच्या ‘कवडसे पकडणारा कलावंत’ या चेखववरच्या मराठीतल्या पुस्तकानं खर्‍या अर्थानं माझ्या अनुवादाच्या प्रवासाला एक योग्य दिशा दिली. चेखवच्या साहित्यावरचं आणि जीवनावरचं इतकं सुंदर लिखाण माझ्या वाचनात त्यापूर्वी कधी आलं नव्हतं. चेखव त्याच्या कथांमध्ये कसा विरघळून गेला आहे, त्याचं जीवन त्याच्या कथेशी कसं एकरूप झालं आहे, हे समजण्यासाठी मला या पुस्तकाचा खूप उपयोग झाला.

अनुवादाच्या बाबतीत एक ठरवलं की, ‘आपण आपल्या पद्धतीनं चेखव मांडण्याचा प्रयत्न करू या’. मध्यंतरी काही कथा ‘वर्णमुद्रा’ आणि ‘परिवर्तनाचा वाटसरू’मध्ये प्रकाशित झाल्या. त्यानंतर दोन-अडीच महिन्याआड एक, अशा पद्धतीनं अनुवाद चालू ठेवले. कथा निवडताना थोडी काळजी घेतली. याअगोदरही चेखवच्या बर्‍याच कथांचे मराठीत काही सुंदर अनुवाद झाले आहेत. अनिल हवालदार, सुमती कानेटकर, सुनीती देशपांडे आणि इतर काही अनुवादकांचे अनुवाद माझ्या वाचनात होते.

ठरवलं की, पूर्वी अनुवाद झालेल्या कथा शक्यतो टाळून आपण नव्या कथांसह चेखवचं कथाविश्‍व वाचकासमोर उभं करण्याचा प्रयत्न करू. त्याच्या कथालेखनाचे बहुतेक पैलू वाचकांसमोर ठेवता येतील, अशी आपली निवड असली पाहिजे. त्या हेतूने एका ‘थीम’वरची शक्यतो एकच कथा मी निवडली आहे. एक-दोन कथांचा अपवाद वगळता चेखवच्या दीर्घ कथांचा समावेश या संग्रहात केलेला नाही. तसेच त्याने वर्तमानपत्र आणि नियतकालिके यांसाठी सुरुवातीच्या काळात लिहिलेल्या उपहासगर्भपर, प्रहसनपर लघुकथांचा समावेशही जाणीवपूर्वक टाळला आहे.

चेखव हा माणसांवर आणि जीवनावर त्यांच्यातल्या चांगल्या-वाइटासह भरभरून प्रेम करणारा कलाकार आहे. आपण माणसं ‘प्रजाती’ म्हणून कसे आहोत किंवा आपल्या आजूबाजूची माणसं एखाद्या नेमक्या परिस्थितीत कशी वागतात, याचं त्याला भारी कुतूहल! सामान्य माणसाची शक्तिस्थळं आणि त्याची अंगभूत दुर्बलता, मर्यादा आणि हतबलता ही चेखवच्या कथांमध्ये वारंवार आढळणारी काही आशयसूत्रं आहेत. कलाकार म्हणून तो ती प्रतिमानं त्याच्या कथांमध्ये पेरतो. त्याद्वारे आपल्याला स्वत:ची आणि आपल्या अवतीभवती पाहण्यात असणार्‍या व्यक्तींची सतत आठवण होत राहते. मग चेखवच्या कथा या केवळ एकोणिसाव्या शतकातल्या रशियन समाजाच्या कथा न राहता, त्या आपल्या स्वत:च्या कथा होतात.

विशेष भर आहे, तो त्याने १८८४ ते १८९०च्या दरम्यान लिहिलेल्या ‘कथा’ या साहित्य प्रकारातल्या ‘प्रॉपर’ कथा. कारण याच कालखंडात त्याच्यातल्या कथालेखकाचा पूर्ण विकास झाला होता. ‘कथा’ या साहित्यप्रकाराला रशियन वाङ्मयविश्‍वात आणि नंतर जागतिक पातळीवर एक खास ओळख आणि दर्जा प्राप्त करून देणार्‍या कथा त्याने याच कालखंडात लिहिल्या होत्या. गमतीची आणि आर्श्‍चयाची बाब म्हणजे, त्या वेळी तो तिशीच्या आत होता. इतक्या लहान वयात इतकी कलात्मक परिपक्वता आणि प्रगल्भता कुठून बरं आली असेल? त्यानंतर चेखव बहुतांशी दीर्घकथेकडे आणि नाट्यलेखकाकडे वळलेला दिसून येतो.

मला समजलेला, भावलेला चेखव रशियन साहित्याचा एक विद्यार्थी म्हणून मी या संग्रहातल्या कथांद्वारे मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. तरीही कथांची निवड परिपूर्ण नसून वैयक्तिक आहे आणि माझे प्रयत्न प्रामाणिक आहेत, इतकंच मी म्हणून शकेन.

एकविसाव्या शतकातल्या मराठी वाचकाने रशियासारख्या भिन्न संस्कृती असलेल्या, दूरच्या भूमीवरच्या, साधारणत: १३०-४० वर्षांपूर्वी लिहिलेल्या कथा आज का म्हणून वाचाव्यात, असा प्रश्‍न जर मला कोणी विचारला, तर एक सहवाचक म्हणून मी त्याचं उत्तर देईन. या कथा आपल्याशी ‘स्पेस-टाईम’ ओलांडून ‘रिलेट’ करतील; आपल्याच जगण्याबद्दल आपल्याला छोट्या-मोठ्या कहाण्या सांगतील; कदाचित आपल्या नजरेतून सुटलेल्या आपल्याच दुर्गुणांवर, विसंगतींवर बोट ठेवतील; आपल्याभोवती आपण स्वत: तयार केलेले कोश दाखवतील आणि झालंच तर आपल्या आयुष्यातल्या दररोज घडणार्‍या सापेक्ष शोककहाण्या उलगडून दाखवतील.

स्थल-कालाची सीमारेषा ओलांडून ‘रिलेट होणं’ हेच कोणत्याही कलेचं मर्म नसतं का? अगदी हलक्या-ङ्गुलक्या विनोदापासून जीवनाच्या महत्त्वाच्या प्रश्‍नांवर तत्त्वज्ञानात्मक, गंभीर भाष्य करणारा चेखव या कथांमधून सापडेल. पण तो हे सर्व ठरवून करत नाही, तर ते ओघानेच त्याच्या कथेत येतं. त्याच्या कथेत केंद्रस्थानी असते, ती ‘माणसाची गोष्ट’!

..................................................................................................................................................................

हेहीपाहावाचाअनुभवा

‘प्रॉफेट साँग’ : आयर्लंडमधल्या हुकूमशाहीच्या आगमनाची चुणूक दाखवणारी ‘बुकर’प्राप्त कादंबरी

‘आम्हीही भारताचे लोक’ : हे पुस्तक केवळ परिषदेचा दस्तावेज न होता, त्याला संदर्भग्रंथाचंही मोल यावं, या दृष्टीने आम्ही प्रयत्न केला आहे…

श्री. पु. भागवत : व्यापक सामाजिक-सांस्कृतिक भान असलेले, वाङ्मयासह सर्व कलांवर प्रेम करणारे संपादक, प्रकाशक आणि वाङ्मयचिंतक

‘पत्र आणि मैत्र’ : मराठी साहित्यव्यवहाराचे आणि विशेषत: मुद्रण\प्रकाशन-संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या ग्रंथातून लेखक, वाचक आणि समीक्षक ही त्रिपुटी नेमकी कशी आहे, हेही उमगते

दिलीप माजगावकर मराठी प्रकाशनक्षेत्रात ‘मशागतीच्या माळीकामा’त रमले. त्यांनी वाचकांच्या मनात चांगल्या साहित्याची जाण पेरली

‘आठवणी व संस्मरणे’ : स्वातंत्र्यपूर्व काळात समाजाची निरलस सेवा करणाऱ्या बहुजन समाजातील एका कर्तबगार स्त्रीची, ‘भगिनी जनाक्का’ची जीवनकथा

..................................................................................................................................................................

मुळात चेखव मला एक विनोदी लेखक वाटतो. त्याच्या बर्‍याचशा (अगदी गंभीर स्वरूपाच्या) कथांमधली माणसं आपल्याला विनोदी, हास्यास्पद वाटतील, पण पाडळकर म्हणतात त्याप्रमाणे ‘या हास्यास्पदतेमागे कारुण्याचा फाटका पदर आहे.’ ही माणसं मोठी स्वप्नं बाळगून आहेत, पण ती पूर्ण करण्यासाठी अर्थपूर्णरित्या झगडताना, धडपडताना दिसत नाहीत. बहुतांशी माणसं आयुष्यानं समोर वाढून ठेवलेल्या अन्यायाला, अपमानाला निमूटपणे सामोरं जाऊन मान तुकवतात. तरीदेखील चेखव त्यांना ‘जज’ करत नाही. तो स्वत:ला कधीही न्यायाधीशाच्या भूमिकेत ठेवत नाही. चेखवला प्रिचींग, उपदेश देणं मुळातच आवडत नाही. प्रश्‍नांची उत्तरं देण्याचा दावा करण्यापेक्षा योग्य प्रश्‍न, परिस्थिती कलेच्या माध्यमातून मांडणं याकडे त्याचा कल दिसतो. किंबहुना तो सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक प्रश्‍नांची वाचकासमोर उगाचच सरबत्ती लावत नाही.

पेशाने डॉक्टर असल्यामुळे कदाचित त्याला त्याच्या साहित्यिक जबाबदारीचं वस्तुनिष्ठ भान होतं. त्याच्या भावाला त्यानं लिहिलेल्या एका पत्रात तो स्वत:च्या लेखनाची चौकट अगदी स्पष्टपणे मांडतो : १) राजकीय, सामाजिक, आर्थिक प्रश्‍नांबाबत लांबलचक लिहिणं टाळणं, २) काटेकोर वस्तुनिष्ठता, ३) माणसं आणि घटनांचं वास्तव चित्रण, ४) टोकाची संक्षिप्तता, ५) खरेपणा/अस्सलपणा. ठोकळबाजपणाला तिलांजली आणि ६) सर्वच गोष्टींबाबतची करुणा. त्याच्या कथा वाचताना त्याची ही लेखनाची चौकट आपोआपच नजरेत भरत जाते.

चेखवने एकूण पाचशेच्या वर कथा लिहिल्या. त्यांतल्या बहुतेक त्याने उमेदीच्या काळात पैसे कमावून आपली गुजराण करण्यासाठी लिहल्या. तरीही त्याच्यातला कलावंत त्याच्या कुठल्याही कथेतून आपल्याला सहज भेटतो. कलेसाठी म्हणून तो ज्या वेळी लेखणी चालवू लागतो, त्या वेळी त्याच्यातला परिपक्व आणि समजुतदार कलाकार आपल्यासमोर एक रोचक जग उभं करतो.

लेखनप्रपंच सांभाळतच या कलाकाराने आयुष्यभर डॉक्टरी पेशामध्ये असंख्य रुग्णांना तपासून, त्यांच्या रोगांचं निदान करून त्यांवर औषधं दिली, परंतु साहित्याच्या पेशात त्यानं माणसांच्या मानसिक-सामाजिक दुर्गुणांवर, समस्यांवर ‘रेडिमेड औषध’ देण्याचं टाळलेलं दिसतं. त्यामुळं त्याच्या कथांचा शेवट कधीही ‘क्लोज एण्डींग’ स्वरूपाचा नसतो. चेखव वाचकासाठी ‘स्पेस’ ठेवतो. एक लेखक म्हणून तो स्वत:ला केवळ आणि केवळ एक कलाकार समजतो. म्हणूनच त्याच्या कुठल्याही कथेला विचारसरणीचा, प्रचाराचा वास येत नाही.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

मात्र चेखवला कोणतीही सामाजिक जाणीवच नव्हती, असा याचा अर्थ नाही. त्याचं साहित्य वाचताना त्याची सामाजिक, नैतिक जाणीव त्याच्या कथांमध्ये खोल झिरपलेली दिसून येते. त्याची मानवी जीवनाबद्दलची कलात्मक जाणीव त्याने सांगितलेल्या माणसांच्या कहाण्यांमध्ये सर्वत्र व्यापून राहिलेली आपल्याला जाणवते.

चेखव हा माणसांवर आणि जीवनावर त्यांच्यातल्या चांगल्या-वाइटासह भरभरून प्रेम करणारा कलाकार आहे. आपण माणसं ‘प्रजाती’ म्हणून कसे आहोत किंवा आपल्या आजूबाजूची माणसं एखाद्या नेमक्या परिस्थितीत कशी वागतात, याचं त्याला भारी कुतूहल! सामान्य माणसाची शक्तिस्थळं आणि त्याची अंगभूत दुर्बलता, मर्यादा आणि हतबलता ही चेखवच्या कथांमध्ये वारंवार आढळणारी काही आशयसूत्रं आहेत. कलाकार म्हणून तो ती प्रतिमानं त्याच्या कथांमध्ये पेरतो. त्याद्वारे आपल्याला स्वत:ची आणि आपल्या अवतीभवती पाहण्यात असणार्‍या व्यक्तींची सतत आठवण होत राहते. मग चेखवच्या कथा या केवळ एकोणिसाव्या शतकातल्या रशियन समाजाच्या कथा न राहता, त्या आपल्या स्वत:च्या कथा होतात.

रशियन भाषेत ‘रादुगा’ म्हणजे इंद्रधनुष्य. ज्याप्रमाणे इंद्रधनुष्य पाहताना आपल्याला वेगवेगळ्या रंगांचा, त्यांच्या छटांचा अनुभव येतो, त्याप्रमाणे हे पुस्तक वाचताना चेखवच्या कथांच्या विविध रंगच्छटा अनुभवायला मिळतील. वाचकांना आणि चेखव-प्रेमींना या कथा आणि त्यांचा अनुवाद आवडेल, भावेल अशी आशा वाटते.

‘रादुगा : अंतोन चेखवच्या निवडक रशियन कथा’

अनुवाद - इर्शाद वडगांवकर

डायमंड पब्लिकेशन्स, पुणे | पाने – १६८ | मूल्य – २५० रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीवर २५ टक्के सवलत मिळवण्यासाठी पहा -

https://dpbooks.in/products/raduga

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......