श्री.पु.भागवत हे मराठी साहित्यातला एक अभिरुचीसंपन्न प्रकाशक, विचक्षण संपादक आणि ग्रंथसंस्कृतीचे संवर्धक म्हणून ओळखले जातात. उद्या म्हणजे २७ डिसेंबर २०२३ रोजी त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होईल. त्यानिमित्ताने श्रीपुंच्या योगदानाची तपशीलवार मांडणी करणारा ‘वाङ्मयीन युगान्तर आणि श्री. पु. भागवत’ हा ग्रंथ प्रा. सुधीर रसाळ आणि प्रा. वसंत पाटणकर यांनी संपादित केला आहे.
राजहंस प्रकाशनातर्फे नुकत्याच प्रकाशित झालेल्या या ग्रंथाचे ‘मौज प्रकाशन गृह – संचालित नियतकालिके : पार्श्वभूमी’ (सहभागी लेखक : सुधीर रसाळ, जयवंत दळवी, श्रीनिवास विनायक कुलकर्णी), ‘ ‘सत्यकथा’ मासिक आणि ‘मौज’ दिवाळी अंक यातील साहित्य : स्वरूप, वैशिष्ट्ये आणि मूल्य’ (सहभागी लेखक : वसंत पाटणकर, बाळकृष्ण कवठेकर, प्रभा गणोरकर, नरेन्द्र चपळगावकर, वसंत पाटणकर, राजशेखर शिंदे, रणधीर शिंदे, शार्दुल कदम) आणि ‘ ‘मौज’, ‘सत्यकथा’ आणि ‘मौज प्रकाशने’ यांविषयीची मतमतांतरे, आक्षेप आणि वस्तुस्थिती’ (सहभागी लेखक : सुधीर रसाळ, मिलिंद बोकील, वसंत आबाजी डहाके, चंद्रकांत पाटील, भानू काळे, रामदास भटकळ) असे तीन विभाग आहेत.
ग्रंथाच्या शेवटी ‘सत्यकथा’च्या रौप्य महोत्सवी वर्षातला तिसरा म्हणजे जानेवारी १९५८चा संपूर्ण अंकही आहे तसा दिला आहे.
या ग्रंथाच्या तिसऱ्या भागाला रसाळ यांनी लिहिलेल्या प्रास्ताविकाचा हा संपादित अंश…
.................................................................................................................................................................
‘वाङ्मयीन युगान्तर आणि श्री. पु. भागवत’ या ग्रंथाच्या तिसऱ्या भागात श्री. पु. भागवतांच्या वाङ्मयीन कार्यावर घेतल्या गेलेल्या आक्षेपांचा खरेपणा तपासणाऱ्या आणि श्री. पु. भागवतांच्या कार्याचे एकूण मूल्यमापन करणाऱ्या लेखांचा समावेश करण्यात आला आहे. या लेखांच्या लेखकांनी तटस्थपणे आपल्या लेखांचे लेखन केले आहे. या सर्व लेखांचा समारोप करणारा लेख लिहिण्याची विनंती ज्येष्ठ प्रकाशक रामदास भटकळ यांना केली होती. भटकळांचा ‘मौज’, ‘सत्यकथा’ आणि मौजेचा प्रकाशनव्यवसाय यांच्याशी १९५१ पासून निकटचा संबंध होता. ‘सत्यकथा’ मासिकाच्या संपादनात श्री. पु. भागवतांनी आणि ‘पॉप्युलर प्रकाशना’च्या ग्रंथप्रकाशनात रामदास भटकळांनी एकाच वेळी लक्ष घालायला सुरुवात केली. तसेच या दोन्ही प्रकाशनांनी एकाच वेळी नवसाहित्याच्या प्रकाशनास प्रारंभ केला. यानिमित्ताने रामदास भटकळांचा श्री. पु. भागवतांशी निकटचा संबंध आला आणि तो शेवटपर्यंत कायम राहिला.
मौज प्रकाशनाच्या सर्व विभागांचे कामकाज आणि त्यातले चढउतार भटकळांनी जवळून पाहिले आहेत. म्हणून या ग्रंथाच्या संपादकांनी त्यांच्यावर या ग्रंथाचा समारोप करण्याची जबाबदारी सोपवली. त्यांनी ‘मौजपर्व’ या आपल्या समारोपात्मक लेखात श्री. पु. भागवतांच्या कार्यातील बलस्थाने आणि कच्चे दुवे यांचा आढावा घेतला असून या ग्रंथातील लेखांतील भूमिकांचा परामर्षही घेतला आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
सत्यकथेकडे येणाऱ्या साहित्याचे श्री. पु. भागवत संपादन करू लागल्यानंतर सत्यकथेचा दर्जा सुधारत जाऊन वाङ्मयजगतात सत्यकथेला जशी प्रतिष्ठा प्राप्त होत गेली, तसेच सत्यकथेवर आरोप होणेही सुरू झाले. सत्यकथेत प्रसिद्ध होणारे साहित्य हे दुर्बोध असते, हा आरोप तर प्रारंभापासून होत होता. श्री. पु. भागवतांच्या संपादनपद्धतीवर, त्यांच्या वाङ्मयीन भूमिकेबद्दल आणि त्यांच्या सामाजिक स्थितिगतीपासून स्वतःला व सत्यकथा मासिकाला दूर ठेवण्याबद्दलही काही आक्षेप घेतले गेले. उत्तरकाळात सत्यकथेतील साहित्याच्या दर्जाबद्दलही शंका व्यक्त केली जाऊ लागली. अशा सर्व आक्षेपांबाबतचे तथ्य स्पष्ट करणाऱ्या आणि त्याच्या संपादन-प्रकाशनकार्याचे साधार मूल्यमापन करणाऱ्या लेखांचा या भागात समावेश आहे.
एक दर्जेदार वाड्मयीन नियतकालिक म्हणून सत्यकथेला जी ओळख प्राप्त झाली, त्यामागे सत्यकथेसाठी आलेल्या साहित्याचे कलानिकषांच्या आधारे काटेकोर मूल्यमापन करून ते स्वीकारण्याची श्री. पु. भागवतांची पद्धत होती. सुप्त कलागुण असलेल्या लेखनाचे संपादन ते लेखकाशी चर्चा करून करत असत. या संपादनामुळे संपादित लेखनाला कलाकृतीचे रूप प्राप्त होत असे. नव्या रूपातील सत्यकथेच्या प्रारंभकाळात श्री. पु. भागवतांनी सत्यकथेकडे येणाऱ्या लेखनाचे संपादन केले. श्री. पु. भागवत आपल्या मर्जीनुसार लेखकाला त्याच्या लेखनात बदल करायला लावतात, असा आरोप त्यांच्यावर केला जाऊ लागला. काही काळाने सत्यकथेच्या साहित्याचे संपादन थांबवून त्यांनी ते फक्त मौज प्रकाशनाकडे येणाऱ्या पुस्तकांपुरते सीमित करून घेतले. तरीही सत्यकथेतील साहित्याचे संपादन श्री. पु. भागवत करतात, असे गृहीत धरून त्यांच्यावर टीका होत राहिली.
वस्तुतः सत्यकथा मासिकाचे संपादक म्हणून श्री. पु. भागवतांचे नाव ‘सत्यकथे’च्या एकाही अंकावर नाही; तरीही सत्यकथासाठी लेखननिवडीची आणि संपादनाची जबाबदारी श्री. पु. भागवतांवर टाकली जाऊन त्याबद्दल त्यांच्यावर टीकाही केली जाते. हे असे का होते, हे जाणून घेण्यासाठी सत्यकथेचा सुरुवातीचा थोडा इतिहासही पाहिला पाहिजे. १९४५च्या नंतर बदलत गेलेल्या सत्यकथा मासिकावर संपादक म्हणून वि. पु. भागवत यांचे आणि नंतर १९६०पासून पुढे राम पटवर्धन यांचे नाव दिसते. १९४४पासून इंटरच्या वर्गात शिकत असलेले श्री. पु. भागवत हे सत्यकथेच्या संपादनात लक्ष घालू लागले. त्यांच्याच नेतृत्वाखाली सत्यकथा मासिकाचे रूप बदलत जाऊन ते नवसाहित्य आणि नवसमीक्षा घडवणारे, साहित्याचा कलात्मक दर्जा काटेकोरपणे सांभाळणारे नियतकालिक म्हणून मान्यता पावले.
.................................................................................................................................................................
*!#* ‘अक्षरनामा’ दीपावली २०२३ विशेषांक *!#*
वेगळे, नावीन्यपूर्ण, अर्थसंपन्न आणि अंतर्मुख करायला लावणारे चिंतनशील असे १३ लेख...
पाहावाचाअनुभवाइतरांनासूचवा
https://www.aksharnama.com/client/sub_categories_articles/166
.................................................................................................................................................................
सत्यकथेचे असे परिवर्तन घडवण्यात राम पटवर्धन या सत्यकथेच्या अधिकृत संपादकाचा मोठा वाटा होता. परंतु या परिवर्तनाचे श्रेय श्री. पु. भागवतांना दिले जाते. याचे कारण असे की, राम पटवर्धन हे श्री. पु. भागवतांचे कॉलेजातले विद्यार्थी होते आणि भागवतांच्या वाङ्मयीन भूमिकेचे दाट असे संस्कार त्यांच्यावर होते. श्री. पु. भागवतांच्या इच्छेनुसार आपली नोकरी सोडून ते सत्यकथेच्या कार्यालयात काम पाहू लागले. सत्यकथेच्या संपादनात श्री. पु. भागवत आणि राम पटवर्धन यांच्यात चर्चाही होत असत. त्यामुळे राम पटवर्धन आपल्या संपादनकार्यात गरजेनुसार श्री. पु. भागवतांचा सल्ला घेत असत.
याचा अर्थ सत्यकथेच्या संपादकीय धोरणाची चौकट श्री. पु. भागवतांनी निश्चित केली होती आणि राम पटवर्धन या चौकटीतच संपादनाचे कार्य करत असत. असे जरी असले, तरी राम पटवर्धन स्वतःचे वेगळे निर्णय घेऊ शकत असत. हे सर्व लक्षात घेता सत्यकथेच्या संपादकीय धोरणाचे श्रेय श्री. पु. भागवतांना का दिले जाते, हे स्पष्ट होते. येथे हेही लक्षात घेतले पाहिजे की, मौज प्रकाशनगृहाकडे प्रकाशनार्थ आलेल्या पुस्तकांचे संपादन श्री. पु. भागवत स्वतः करत असल्यामुळे संपादक या नात्याने श्री. पु. भागवतांवर होणारी टीका सत्यकथा आणि मौज प्रकाशने या दोहोंच्या संपादनाबद्दल केली जात होती.
सत्यकथेत बदल होऊ लागल्यापासून सत्यकथेवर होऊ लागली टीका पुढीलप्रमाणे होती. सत्यकथेत केवळ रूपवादी साहित्यकृतीच प्रकाशित केल्या जातात, संपादनाच्या नावाखाली संपादक आपली रूपवादी वाङ्मयीन भूमिका लेखकांवर लादतात आणि आपल्याला अपेक्षित असलेला बदल त्यांना त्यांच्या लेखना करायला लावतात. त्यामुळे सत्यकथेत प्रसिद्ध होणारे साहित्य एकाच साच्याचे निर्जीव होऊ लागले. सत्यकथेतून केवळ उच्चश्रूंचे, ‘ब्राह्मणी’, वास्तवापासून तुटलेले साहित्य प्रकाशित होते; अस्पृश्य मानल्य गेलेल्या जातींतून आणि मागासवर्गीयांमधून येऊ लागलेला नवा लेखकवर्ग वेगळ्या प्रकारचे लेखन करत आहे, त्याची पुरेशी दखल मौज-सत्यकथेने घेतली नाही. या काळात अनेक सामाजिक समस्या निर्माण झाल्या, समाजात परिवर्तन होऊ लागले, परंतु या सामाजिक परिवर्तनांची दखलही सत्यकथा-मौजने आणि मौज प्रकाशनगृहाने घेतली नाही, ते केवळ रूपवादी-सौंदर्यवादी साहित्य छापत राहिले.
श्री. पु. भागवतांनी सर्व ललित कलांवर पुस्तके प्रकाशित केली. अनेक कलावंतांची आत्मचरित्रेही प्रकाशित केली. या समाजाच्या परिवर्तनात एक प्रकाशक म्हणून जे करणे आवश्यक आहे ते करणे, हे त्यांच्या सामाजिक जाणिवेचे दुसरे अंग होते. म्हणून त्यांनी वर्तमानात जे काही महत्त्वाचे सामाजिक कार्य सुरू असेल, त्याची दखल घेणारी पुस्तकेही प्रकाशित केली. मार्क्सवादी गोदावरी परुळेकर, गीता साने आणि समाजवादी बाबा आढाव यांच्या सामाजिक कार्यावरची पुस्तके आवर्जून प्रकाशित करणारे प्रकाशनगृह ‘मौज’च.
असे आरोप सत्यकथा-मौज आणि मौज प्रकाशनगृह यांवर म्हणजे पर्यायाने श्री. पु. भागवतांवर सातत्याने केले गेले. या आरोपांच्या सत्यत्वाची चिकित्सा केली जावी, म्हणून ‘ग्रंथप्रकाशनामागील मौज प्रकाशनाचा दृष्टिकोन आणि मौजप्रकाशित ग्रंथांचे वाङ्मयीन व सांस्कृतिक मूल्य’ हा वसंत आबाजी डहाके यांचा लेख या ग्रंथात समाविष्ट करण्यात आला आहे.
विसाव्या शतकाच्या सत्तरच्या दशकात उभ्या राहिलेल्या लघुपत्रिका-चळवळीने सत्यकथेत प्रसिद्ध होणाऱ्या साहित्यावर आणि सत्यकथेच्या वाङ्मयीन भूमिकेवर अनेक आरोप केले. उपर्युक्त आरोपांत या चळवळीने केलेल्या आरोपांचा समावेश आहे. सत्यकथेसंबंधी या चळवळीची काय भूमिका होती आणि ती किती रास्त होती, यावरचा लघुपत्रिकाचळवळीतील कवी चंद्रकांत पाटील यांचा ‘सत्यकथा आणि लघुनियतकालिके’ हा लेखही या ग्रंथात समाविष्ट केला गेला आहे. वसंत आबाजी डहाके आणि चंद्रकांत पाटील यांच्या लेखांतून सत्यकथा, मौज आणि मौज प्रकाशनगृह यांवर करण्यात आलेल्या सर्व आरोपांची मांडणी केली गेली आहे.
सत्यकथा मासिक चालू असतानाच्या काळात श्री. पु. भागवतांच्या संपादनकार्यावर सतत आक्षेप घेतले गेले. सत्यकथा मासिक बंद केल्यानंतर सत्यकथा बंद का केले गेले, ते बंद करणे उचित होते काय - या प्रश्नावर खल सुरू झाला. यातही सत्यकथेच्या स्थगितीला श्री.पु. भागवतांच्या संपादनपद्धतीलाही जबाबदार धरले गेले. तेव्हा सत्यकथेसंबंधीच्या सर्व उपर्युक्त आरोपांमागे प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे श्री. पु. भागवतांच्या संपादनकार्यातील लेखकाला त्याच्या लेखनात श्री. पु. भागवतांच्या कल्पनेप्रमाणे बदल करायला लावण्याची प्रवृत्ती जबाबदार असल्याचा हा आरोप आहे. तेव्हा आपण या ग्रंथातील लेखांच्या आधारे श्री. पु. भागवतांच्या संपादनपद्धतीचे स्वरूप जाणून घेऊन त्यासंबंधीच्या आरोपांचा खरेपणा तपासू.
पहिल्या भागात आपण श्रीनिवास विनायक कुळकर्णी यांचा ‘श्री. पु. भागवतांच्या घरी’ हा लेख पाहिला होता. यात श्रीनिवास विनायक कुळकर्णी यांनी नोंदवलेल्या घटनांमधून एक ऋजू, प्रेमळ, विवेकी, अनाग्रही, परमतसहिष्णू, दुसऱ्याला समजून घेणारे, मैत्रीला मूल्य मानणारे आणि मिस्किल असे श्री. पु. भागवतांचे व्यक्तिमत्त्व आपल्यासमोर उभे राहते. संपादन करताना आपल्या मतांनुसार लेखकाला त्याच्या लेखनात बदल करायला श्री. पु. भाग पाडत काय? याला काही लेखकांनी दिलेला होकार सोडल्यास कसलाही पुरावा नाही. अशा परिस्थितीत श्री. पु. भागवतांच्या व्यक्तिमत्त्वाची ही वैशिष्ट्ये लक्षात घेऊनच श्री. पु. भागवतांवर केल्या गेलेल्या टीकेच्या सत्यतेचा विचार केला पाहिजे.
समाजाचा घटक या नात्याने आपल्यावरही काही जबाबदारी असते, असे श्री. पु. भागवत मानत असत. त्यांच्या सामाजिक जाणिवेला दोन अंगे होती. त्यांपैकी एक म्हणजे या समाजाच्या सांस्कृतिक जीवनाच्या विकासाला हातभार लागेल असे आपल्या प्रकाशनव्यवसायाच्या क्षेत्रात शक्य ते करणे. याच भूमिकेतून त्यांनी ‘मौज’ साप्ताहिकाला एक आकार दिला, राजकारण, समाजकारण, क्रीडा, नाट्य, नृत्य, संगीत, चित्रपट यावरचे चिकित्सक लेखन प्रसिद्ध करून सामान्य वाचकाची वैचारिकता आणि कलाभिरुची संपत्र केली. मराठी नियतकालिकजगतात केवळ ‘मौज’ हेच केवळ एकमेव ‘सांस्कृतिक नियतकालिक’ होते. ‘मौज’ बंद पडल्यावर ‘मौज’ दिवाळी अंकाने हेच कार्य पुढे चालवले.
श्री. पु. भागवतांच्या संपादनकार्याचे स्वरूप स्पष्ट करणारा मिलिंद बोकील यांचा ‘श्री. पु. भागवतांचे ग्रंथसंपादनकार्य’ हा लेख प्रस्तुत ग्रंथात समाविष्ट केला गेला आहे. तसेच श्री. पु. भागवतांनी मंगेश पाडगावकरांना दिलेल्या सविस्तर मुलाखतीत स्वतःची संपादनपद्धती स्पष्ट केली आहे. या मुलाखतीतील श्री.पुं.चे म्हणणे मिलिंद बोकिलांनी त्यांच्या लेखात पुढीलप्रमाणे मांडले आहे-
श्री.पुं.ना पुस्तकाचे हस्तलिखित आवडले की, ते त्या पुस्तकाबद्दल आपल्या शंका, सूचना लेखकाला कळवत. त्यांवर पत्राद्वारे अगर त्याला प्रत्यक्ष भेटून चर्चा करत. लेखकाला त्यांनी केलेल्या सूचनांपैकी ज्या सूचना पटल्या असतील, त्यासंदर्भात लेखक आपल्या लेखनात फेरफार करत असे. श्री. पुं.च्या कळवत. त्यांवर पत्राद्वारे अगर त्याला प्रत्यक्ष भेटून चर्चा करत. लेखकाला त्यांनी केलेल्या सूचनांपैकी ज्या सूचना तो अमान्य करत असे, त्या त्याने बदलाव्या म्हणून श्री. पु. लेखकाला कधीही आग्रह करत नसत. कारण लेखकाला जेव्हा संपादकाचा अभिप्राय पटत नाही, तेव्हा त्याने त्याला आलेला आत्मप्रत्यय प्रमाण मानावा, ही श्री. पुं. ची भूमिका होती. जयवंत दळवींनी ‘संपादक श्री. पुं.’बद्दल म्हटले आहे की, ‘श्री. पु. हे वृत्तीनं आणि बुद्धीनं संपादक होते. मग योगायोगानं प्रकाशक झाले.’
श्री. पु. भागवतांनी काही लेखकांना पत्रांतून आपल्या संपादनपद्धतीबद्दल स्पष्टीकरणे दिली आहेत, यातील काही भाग मिलिंद बोकिलांनी आपल्या लेखात उद्धृत केला असून या सर्व स्पष्टीकरणांत एकच मुद्दा मांडला गेला आहे. तो म्हणजे आपण बदल जरी सुचवत असलो, तरी ते करायला लेखकांना भाग पाडत नाही. श्री. पु. भागवतांच्या या कार्याची व्याप्ती किती विस्तृत होती, हे स्पष्ट करताना मिलिंद बोकील म्हणतात : “आपली प्राध्यापकाची नोकरी सांभाळून श्री. पु. भागवतांनी ५०-५५ वर्षांच्या कालखंडात एकूण पाचशेच्या वर पुस्तकांचे संपादन केले, हा एक जागतिक विक्रमच मानला पाहिजे!”
श्री. पु. भागवत वैचारिक स्वातंत्र्य आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य हे मूल्य मानत असत. सत्यकथेच्या उत्तरकाळात सत्यकथेच्या वाङ्मयीन भूमिकेवर आणि सत्यकथेत प्रकाशित होणाऱ्या लेखनावर टीका करणारे कितीतरी लेख सत्यकथेत प्रसिद्ध झाले. स्वतःची वाङ्मयीन भूमिका स्वायत्ततावादी असूनही मर्ढेकरांच्या स्वायत्ततावादी सौंदर्यशास्त्राबरोबरच लौकिकतावादी सौदर्यशास्त्र मांडणारा रा. भा. पाटणकरांचा ‘सौदर्यमीमांसा’ हा ग्रंथ आणि त्यांचे लेखकांच्या साहित्याचे अभ्यासग्रंथही त्यांनी प्रकाशित केले. अशा ग्रंथप्रकाशनामागे त्यांची भूमिका केवळ ‘अकादमिक’ होती. म्हणूनच त्यांनी भारतीय काव्यशास्त्रावर र पं. कंगले यांचेही ग्रंथ प्रकाशित केले.
या ग्रंथातील बहुसंख्य लेखकांनी आपल्या लेखात त्यांच्या संपादनपद्धतीची अनुकूल किंवा प्रतिकूल अशी दखल घेतली आहे. श्री. पु. भागवतांच्या संपादनपद्धतीबद्दल वसंत आबाजी डहाके आपल्या लेखात म्हणतात : “मौजेने कायम गुणवत्तेचा आग्रह धरला आहे. उच्च दर्जाचे, अभिरुचिसंपन्न असे साहित्य मौजेने दिले. त्यामागे मौजेच्या संपादकांची दृष्टी होती.... लेखकाने आपल्या निर्मितीचा समग्र विचार करावा. कलेच्या कसाला ती उतरावी, यासाठी कष्ट घ्यावे, ही दृष्टी त्यामागे होती. प्रकाशनाच्या व्यवसायात संपादक असतो, असावा; ही संकल्पना मौजेने रूढ केली.”
श्री. पु. भागवतांच्या संपादनाबद्दल प्रभा गणोरकर यांनी – “सत्यकथेसाठी दर महिन्याला कवितांची निवड करताना त्यांनी काही विशिष्ट काव्यविषयक भूमिका (उदा. आकृतिवाद) किंवा वैयक्तिक काव्याभिरुची.... दर्शवल्याचे जाणवत नाही. श्री. पु. भागवत संवेदनक्षम, मर्मदृष्टी असणारे संपादक होते..... उत्तमाची पारख करण्याचा धर्म ते पाळत होते. लेखकांशी त्यांचा नियमित पत्रव्यवहार असे. लेखकांशी ते नियमित चर्चा करत. पुनर्लेखनाच्या सूचनाही करत.” अशी आदरपूर्वक प्रतिक्रिया दिली आहे.
भानू काळे यांनी आपल्या ‘सत्यकथेचा अस्त’ या लेखात सत्यकथेत प्रसिद्ध होणाऱ्या साहित्याच्या घसरलेल्या दर्जाची जबाबदारी श्री. पुं.च्या (मुळात राम पटवर्धन यांच्या) संपादनपद्धतीवर टाकली आहे. श्री. पुं.च्या संपादनपद्धतीबद्दल ते म्हणतात : “याचा एक इष्ट परिणाम असा झाला की, कच्चे किंवा नव्याने लिहू लागणारे लेखक अधिक चांगले लिहू लागले. शरच्चंद्र चिरमुले, सखा कलाल, श्री. दा. पानवलकर वगैरे कथाकारांच्या जडणघडणीत सत्यकथेचा वाटा मोठा आहे. याचा एक दुष्परिणाम म्हणजे सत्यकथेतील साहित्यात शेवटी शेवटी साचेबद्धता येऊ लागली.”
लघुपत्रिका-चळवळीतील कवी चंद्रकांत पाटील यांनीही श्री. पु. भागवतांच्या संपादनपद्धतीबद्दल प्रतिकूल मत नोंदवले आहे. ते म्हणतात : “श्री. पुं.च्या संपादनात जीवनसंबद्धतेचा आग्रह दिसत नाही, मर्ढेकर-गाडगीळांच्या सर्जनशील लेखनातील व्यामिश्रता सत्यकथेतील नंतरच्या लेखनात पार हरवलेली दिसते. किंबहुना श्री. पु. भागवत सत्यकथेसाठीचे साहित्य कोणत्या निकषांवर निवडत, हे कधीही स्पष्ट झाले नाही...”
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
श्रीनिवास विनायक कुळकर्णी यांनी श्री. पुं.चे रेखाटलेले व्यक्तिमत्त्व लक्षात घेता श्री. पु. भागवतांची संपादनपद्धती लेखकाच्या प्रतिभेचा आदर बाळगून त्याला काही सूचना करणारी असली पाहिजे; असे म्हणावे लागते. तेव्हा संपादन करताना श्री. पु. आपल्या मतांबद्दल आग्रही राहून त्याप्रमाणे लेखकाला आपल्या लेखनात बदल करायला भाग पाडत असतील, असे वाटत नाही. श्री. पुं. सारखा व्यासंगी संपादक जेव्हा काही बदल अपेक्षितो, तेव्हा ते केल्याने आपली साहित्यकृती अधिक निर्दोष होईल अशा समजुतीने लेखक असे बदल करून देत असले पाहिजेत.
आता आपण सत्यकथेच्या अस्तामागील कारणांचा विचार करू. सप्टेंबर १९८२मध्ये सत्यकथेचे प्रकाशन थांबले. त्याआधी १९६० च्या दशकात काव्याच्या क्षेत्रात सत्यकथेला आव्हान देणाऱ्या काही घटना घडल्या.
१९६०नंतर मराठी कवितेने आणखी एक वळण घेतले. नारायण सुर्व्यांनी मार्क्सवादी भूमिकेतून एक सोपी, सैल घाटाची कविता लिहायला प्रारंभ केला. ही आकलनसुलभ स्वरूपाची आणि मध्यमवर्गीय वाचकाला अनोखे वाटणाऱ्या कामगारजगताच्या वास्तवाच्या सामग्रीतून घडवली गेलेली कविता अतिशय लोकप्रिय झाली. दलित वाङ्मयीन चळवळीला आधीच प्रारंभ झाला होता. याच सुमारास नामदेव ढसाळ यांचा ‘गोलपिठा’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. या कवितेने काव्यभाषेचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून टाकला. या दोन कवींच्या कवितेच्या परिणामातून त्यांच्या पद्धतीची कविता लिहिणारे अनेक कवी उदयाला आले.
सत्यकथेला आव्हान देणाऱ्या लघुपत्रिका-चळवळीलाही याच सुमारास प्रारंभ झाला. राजा ढाले यांच्या ‘येरू’ या लघुपत्रिकेने ‘सत्यकथेची सत्यकथा’ या लेखातून सत्यकथेवर तोफ डागली. या लेखात ‘सत्यकथे’त प्रकाशित होणाऱ्या वाङ्मयाच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह उभे केले गेले. नव्या जाणिवा आणि नवे रूप घेऊन आलेल्या नव्या पिढीच्या कवितांची दखलही सत्यकथेचे संपादक घेत नाहीत; उलट ठरावीक पद्धतीची साचेबंद कविता छापत राहतात - अशी त्यांची तक्रार होती. म्हणून त्यांनी सत्यकथेच्या अंकाची जाहीर होळी केली.
.................................................................................................................................................................
*!#* ‘अक्षरनामा’ दीपावली २०२३ विशेषांक *!#*
वेगळे, नावीन्यपूर्ण, अर्थसंपन्न आणि अंतर्मुख करायला लावणारे चिंतनशील असे १३ लेख...
पाहावाचाअनुभवाइतरांनासूचवा
https://www.aksharnama.com/client/sub_categories_articles/166
.................................................................................................................................................................
लघुपत्रिका-चळवळीतील कवींनी प्रचलित काव्यभाषा नाकारून आपली काव्यभाषा तयार केली. कवितेच्या वाचकाला या भाषेने आणि या कवितेतील अनोख्या महानगरीय वास्तवाच्या स्फोटक चित्रणाने आकर्षून घेतले. हे घडत असतानाही सत्यकथेतील कवितेची प्रतिष्ठा कायमच होती.
काही कवी स्वतःला लघुपत्रिका- चळवळीचे कवी म्हणवत आणि लघुपत्रिकांबरोबरच सत्यकथेतूनही प्रसिद्धी मिळवत. सुर्वे-परंपरेतील कविता. दलित कविता आणि लघुपत्रिका-चळवळीतील कविता या तिन्ही प्रकारच्या कविता श्री. पु. भागवतांच्या (आणि राम पटवर्धनांच्याही) मानदंडांच्या चौकटीत बसत नव्हत्या. त्यामुळे ‘सत्यकथे’ने या तिन्ही प्रकारच्या कवितांचे अपेक्षित तेवढे स्वागत केले नाही. मराठी वाङ्मयजगतावरचे ‘सत्यकथा-मौज’चे आधिपत्य मोडून काढणे, हे लघुपत्रिकेच्या चळवळीला आवश्यक वाटत असल्यामुळे या चळवळीने सत्यकथेच्या विरोधात आघाडी उघडली.
लघुपत्रिका-चळवळीतील एक कवी चंद्रकांत पाटील यांनी प्रस्तुत ग्रंथासाठी लिहिलेल्या ‘लघुनियतकालिके आणि सत्यकथा’ या लेखात ही चळवळ का उभी राहिली हे स्पष्ट केले आहे. ते म्हणतात : “साहित्य जेव्हा कोंडीत अडकलेले असते, भाषा विशिष्ट वर्गाच्या पारंपरिक भोवऱ्यात अडकून मृतप्राय होते, साहित्याचा जगण्याशी, जगण्यातील व्यामिश्रतेशी संबंध उरत नाही; तेव्हा याविरुद्ध संघर्ष करणे क्रमप्राप्तच असते. याच भूमिकेतून लघुपत्रिकांच्या चळवळीला सुरुवात झाली.”
पुढे ते म्हणतात की, “सत्यकथेत प्रसिद्ध होणारे साहित्य हे वास्तवविन्मुख आणि कृत्रिम स्वरूपाचे आहे; माणसाचे प्रत्यक्ष जगणे आणि या जगण्यात तो भोगीत असलेले ताणतणाव अभिव्यक्त करणे, या उद्दिष्टापासून सत्यकथेत प्रकाशित होणारे साहित्य दूर गेले आहे; ते मध्यमवर्गीय जीवनातील क्षुल्लक दुःखे चित्रित करण्यात समाधान मानताना दिसते.”
श्री. पु. भागवतांची वाङ्मयीन दृष्टी रूपवादी कलावादी होती, हा तत्कालीन वाङ्मयीन जगतात पसरलेला गैरसमजच होता. वाङ्मयाचे केवळ रूप नव्हे तर आशयाभिव्यक्तीचे अभिन्नत्व हे कलामूल्य आहे, असे ते मानत होते. मर्ढेकरांच्या कलाविषयक भूमिकेचा त्यांच्यावर काही प्रमाणात प्रभाव होता. त्यामुळे कलानिर्मितीसाठी स्वीकारला गेलेला आशय जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रातील असो, तो सामाजिक स्वरूपाचाही असू शकेल, फक्त तो आणि त्याचे रूप यांचे अभिन्नत्व प्रस्थापित झालेले असले पाहिजे; हा त्यांचा आग्रह असे.
सत्यकथेसाठी अशा साहित्याच्या निवडीची आणि संपादनाची जबाबदारी त्यांनी श्री. पु. भागवतांवर टाकली आहे. वस्तुतः ‘साहित्य हे जीवनसंबद्ध असायला हवे आणि साहित्यात जीवनातील व्यामिश्र अनुभवांची अभिव्यक्ती होणे आवश्यक आहे’, असे श्री.पुं.नी वारंवार म्हटले आहे. आणि श्री. पु. भागवतांची ही वाङ्मयविषयक भूमिका योग्यच होती, तरी श्री. पु. आपल्या प्रत्यक्ष संपादनात जीवनसंबद्धतेचा आग्रह धरताना दिसत नाहीत. शेवटी श्री. पु. भागवतांच्या संपादनाबद्दल ते म्हणतात : ‘श्री. पु. कोणत्या निकषांवर सत्यकथेसाठी साहित्याची निवड करत असत, हेच कधी स्पष्ट झाले नाही.’
सत्यकथेत प्रसिद्ध होणाऱ्या लेखनाच्या लेखकाला महाराष्ट्रभरच्या रसिक वाचकांची ‘दर्जेदार लेखक’ म्हणून मान्यता मिळते, हे वास्तव लघुपत्रिका-चळवळीला धोक्याचे वाटत होते. अशा मान्यतेमुळे अन्य प्रकारच्या साहित्याचा वाचकवर्गाकडून स्वीकार होण्यात अडचणी येतील, याहीपेक्षा महत्त्वाचे कारण हे की, सत्यकथा प्रकाशित साहित्याच्या असाधारण वाचकप्रियतेमुळे अन्य रूपाचे साहित्य हे साहित्यच नव्हे, अशी रसिकांची धारणा बनून जाईल आणि मराठी साहित्य एकारून जाईल. म्हणून सत्यकथेचे ‘राज्य’ खालसा करण्याचे प्रयत्न या चळवळीने केले असले पाहिजेत.
प्रस्तुत ग्रंथातील भानू काळे यांच्या ‘सत्यकथेचा अस्त’ या लेखात सत्यकथा बंद करण्यामागे आर्थिक कारण होते, हे मान्य करूनही त्याशिवाय शेवटच्या काही वर्षांत सत्यकथेतील साहित्याचा घसरलेला दर्जा हेही एक कारण भानू काळे यांनी नमूद केले आहे. सत्यकथेत प्रसिद्ध होणाऱ्या साहित्याच्या घसरलेल्या दर्जाची जबाबदारी त्यांनी श्री. पुं.च्या (मुळात राम पटवर्धन यांच्या) संपादनपद्धतीवर टाकली आहे. ते म्हणतात : “अनेकदा लेखक मुद्दामच कथा काही खास पद्धतीने लिहीत असत. जो आशय साध्या सरळ शब्दांत मांडता येईल, तो उगाचच समजायला कठीण अशा भाषेत मांडत असत. अनेक भाषिक क्लृप्त्या वापरून अनावश्यक मोडतोड करत असत.
“सत्यकथेच्या संपादकांना तशीच गूढता आणि क्लिष्टता अधिक भावते, अधिक कलात्मक वाटते, असा त्यांचा समज असायचा. तेव्हा ‘सत्यकथा’ जरी बंद केले गेले नसते, तरी त्याची वाङ्मयक्षेत्रातली प्रतिष्ठा टिकली नसती आणि त्याचा वाचकवर्गही कमी होऊन त्याचा आर्थिक तोटा वाढलाच असता; तेव्हा सत्यकथा मासिक योग्य वेळी बंद केले गेले असेही मत दिले गेले, सत्यकथेकडे श्री.पुं.ची प्रमाणके समोर ठेवून तयार केलेले नकली साहित्य येऊ लागले, तसेच त्यांच्या प्रमाणकांवर उतरणारे असली साहित्य येईनासे झाले.”
जेथे निर्माता लेखकही पोचू शकला नाही, असा साहित्यकृतीचा अज्ञात तळ सहजपणे गाठणारी, तरल अशी कल्पनाशक्ती व कलाभिरुची श्री.पुं.ना प्राप्त झाली होती. मग ते एखादा शब्द बदलायला सुचवत आणि तो बदलला की, साहित्यकृतीचे रूप पालटून जात असे. अशी अभिरुची, असे साहित्यकृतीच्या स्वरूपाचे अंतर्ज्ञान श्री. पु. भागवतांच्या आधी कुठल्याही संपादकाला प्राप्त झाले नव्हते. या अर्थाने श्री. पु. भागवत हे एकमेव संपादक होते. परंतु श्री. पु. भागवत संपादनात काही वेळा चुकतही असले पाहिजेत. आपण चुकू शकतो म्हणून ते शेवटी लेखकाचा निर्णय अंतिम मानत.
भानू काळे म्हणतात, “श्री. पुं.च्या अभिरुचीवर आणि मानदंडावर उतरेल असे साहित्यच सत्यकथेकडे येईनासे झाले. शेवटच्या अंकाच्या संपादकीयात असे म्हटले आहे की, ‘शिवाय ज्यासाठी जगायचे ते पुरेसे व मनासारखे साधत नसेल, तर जगणे एवढेच प्रयोजन मानून जीव जगवत राहण्यात स्वारस्य नसते.’ या वाक्यात सत्यकथा बंद करण्यामागचे महत्त्वाचे कारण आले आहे. तेव्हा सत्यकथा बंद करावी लागण्यामागे श्री.पुं.चे संपादन हे अप्रत्यक्ष कारण असल्याचे भानू काळे यांनी नोंदवले आहे.
सत्यकथेच्या शेवटच्या पर्वात सत्यकथेचा दर्जा घसरल्याची दोन कारणे भानू काळे यांनी नोंदवली असल्याचे आपण पाहिले. त्यांपैकी आपल्या लेखनाला श्री.पुं.च्या प्रमाणकांबरहुकूम आकार देऊन ते लेखन श्री.पुं.कडे पाठवले जाऊ लागले. हे दुसरे कारण पटण्याजोगे नाही. श्री.पुं.ची (आणि राम पटवर्धनांची) चिकित्सक वृत्ती आणि नीरक्षीरविवेक सहजपणे करणारी अभिजात अभिरुची लक्षात घेता त्यांना अशा साहित्याचे नकलीपण सहजच कळत असले पाहिजे. असे साहित्य त्यांनी स्वीकारणे ही असंभवनीय गोष्ट आहे!
आपल्याकडे येणाऱ्या साहित्यातूनच संपादकाला अंकासाठी निवड करावी लागते. लेखकाला सुचवूनही तो इष्ट बदल करेलच असेही नाही. आणि जो बदल केला गेला असेल, तो तरी त्याने नीट केला असल्याची खात्री देता येत नाही. अशा परिस्थितीत आलेल्या साहित्यातून त्यातल्या त्यात उजवे लेखन छापावेच लागते. असे दुय्यम दर्जाचे साहित्य 'सत्यकथे'त येऊ लागले. आर्थिक कारणाच्या जोडीला हे दुसरे एक कारण आहे, असे मात्र म्हणता येते.
श्री. पु. भागवतांच्या संपादनासंबंधी या ग्रंथाचा समारोप करणाऱ्या रामदास भटकळांचे मत नोंदवले पाहिजे.
मराठी वाङ्मयाच्या क्षेत्रात आजपर्यंत श्री. पु. भागवत हे एकमेव संपादक झाले असल्याचे बहुतेकांनी म्हटले आहे. मात्र रामदास भटकळांना तसे वाटत नाही. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीपासून मराठीत संपादक होऊन गेल्याचे त्यांनी म्हटले आहे. कादंबरीकार हरिभाऊ आपटे, हरिभाऊ मोटे, गं. दे. खानोलकर राजेंद्र बनहट्टी अशी अनेक नावे त्यांनी नोंदवली आहेत. उत्तम साहित्य मिळवून ते छापणाऱ्याला ‘अभिरुचिसंपन्न प्रकाशक’ म्हणतात. ह. वि. मोटे आणि भटकळांच्या यादीतील सर्व तसे प्रकाशक होते. त्यांनी प्रकाशनार्थ उत्तम साहित्यकृती निवडल्या. सकृद्दर्शनी तिच्यात जाणवणाऱ्या किरकोळ दुरुस्त्या लेखकाकडून करवूनही घेतल्या असतील. परंतु श्री.पुं.चे संपादन या जातीचे नव्हते. ते अपूर्ण, अर्ध्यामुध्या साहित्यकृतीला परिपूर्ण बनवणारे संपादन करत. समोर आलेल्या लक्षणीय साहित्यकृतीला कलासंपन्न बनवू शकणारे, पण तिच्यात सुप्तपणे दडलेले घटक श्री. पुं. ना चटकन जाणवत.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
साहित्यकृतीतील आशयसूत्रावरची लेखकाची पकड कुठे सुटली आहे, लेखक कोठे वाचकानुनयी लेखन करत आहे, त्याच्या भाषेची अभिव्यक्तिक्षमता कोठे कमी पडत आहे, अशा सर्वांचा स्वच्छ नकाशा श्री. पु. भागवतांच्या डोळ्यांसमोर उभा राहत असे. त्यानुसार ते लेखकाला सूचना करत असत. त्या जर लेखकाने स्वीकारल्या तर त्याच्या साहित्यकृतीची कलात्मकता झळाळून जात असे. जेथे निर्माता लेखकही पोचू शकला नाही, असा साहित्यकृतीचा अज्ञात तळ सहजपणे गाठणारी, तरल अशी कल्पनाशक्ती व कलाभिरुची श्री.पुं.ना प्राप्त झाली होती. मग ते एखादा शब्द बदलायला सुचवत आणि तो बदलला की, साहित्यकृतीचे रूप पालटून जात असे. अशी अभिरुची, असे साहित्यकृतीच्या स्वरूपाचे अंतर्ज्ञान श्री. पु. भागवतांच्या आधी कुठल्याही संपादकाला प्राप्त झाले नव्हते. या अर्थाने श्री. पु. भागवत हे एकमेव संपादक होते. परंतु श्री. पु. भागवत संपादनात काही वेळा चुकतही असले पाहिजेत. आपण चुकू शकतो म्हणून ते शेवटी लेखकाचा निर्णय अंतिम मानत.
या ग्रंथातील लेखकांपैकी मिलिंद बोकील, वसंत आबाजी डहाके आणि श्रीनिवास विनायक कुळकर्णी यांनी श्री.पुं.च्या संपादनपद्धतीबद्दल अनुकूल लिहिले आहे. भानू काळे, चंद्रकांत पाटील (आणि मौज प्रकाशनाचे काही लेखक) यांनी प्रतिकूल मत नोंदवले आहे. भटकळांनी फक्त त्यांची ‘एकमेव’ता मात्र अमान्य केली आहे. या ग्रंथातील या सर्व अनुकूल-प्रतिकूल भूमिका पाहता श्री. पुं.च्या संपादनाबद्दलचे निर्णायक असे काही या लेखांत व्यक्त झालेले नाही. या प्रश्नाची तड लावण्यासाठी शेवटी आपणांस श्री. पु. भागवतांच्या एकूण व्यक्तिमत्त्वाचा आधार घ्यावा लागतो.
मौज प्रकाशनगृहाचे संपादक श्री. पु. भागवत असल्यामुळे प्रकाशनगृहातर्फे प्रकाशित करण्यासाठीच्या पुस्तकांची निवड श्री. पु. भागवतांच्या रूपवादी सौंदर्यवादी भूमिकेतूनच होत असे; या प्रकाशनगृहाला सामाजिक दृष्टिकोन नव्हता, मध्यमवर्गीय वाचकांसाठी मध्यमवर्गीय लेखकांची पुस्तके प्रकाशित केली जात, असा मौज प्रकाशनगृह आणि श्री. पु. भागवत यांच्यावर आरोप केला जाई. ज्यात या व अशा आरोपांची वस्तुनिष्ठ तपासणी करण्यात आली आहे, असा वसंत आबाजी डहाके यांचा ‘मौज प्रकाशनगृहाची प्रकाशने’ हा लेख प्रस्तुत ग्रंथात समाविष्ट करण्यात आला आहे. मौज प्रकाशनगृहावर घेतल्या गेलेल्या आक्षेपांसंबंधी वसंत आबाजी डहाके यांनी पुढील भूमिका घेतली आहे.
..................................................................................................................................................................
हेहीपाहावाचाअनुभवा
खटाववाडीत आता ‘मौज’ राहिली नाही!
संजय भागवत : उमदा, निरलस मित्र आणि मिश्किलही!
..................................................................................................................................................................
वसंत आबाजी डहाके यांनी आपल्या साधार अशा विवेचनातून मौज प्रकाशनगृहाची ग्रंथप्रकाशनामागील भूमिका आणि मौज प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ग्रंथांचे वाङ्मयीन आणि सांस्कृतिक मूल्य निःसंदिग्धपणे अधोरेखित केले आहे. मौजेने प्रकाशित केलेल्या ललित वाङ्मयाचा दर्जा असा आहे की, या ललित वाङ्मयाला वगळून वाङ्मयाचा इतिहास लिहिताच येणार नाही.
श्री. पु. भागवतांची वाङ्मयीन दृष्टी रूपवादी कलावादी होती, हा तत्कालीन वाङ्मयीन जगतात पसरलेला गैरसमजच होता. वाङ्मयाचे केवळ रूप नव्हे तर आशयाभिव्यक्तीचे अभिन्नत्व हे कलामूल्य आहे, असे ते मानत होते. मर्ढेकरांच्या कलाविषयक भूमिकेचा त्यांच्यावर काही प्रमाणात प्रभाव होता. त्यामुळे कलानिर्मितीसाठी स्वीकारला गेलेला आशय जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रातील असो, तो सामाजिक स्वरूपाचाही असू शकेल, फक्त तो आणि त्याचे रूप यांचे अभिन्नत्व प्रस्थापित झालेले असले पाहिजे; हा त्यांचा आग्रह असे.
श्री. पु. भागवत वैचारिक स्वातंत्र्य आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य हे मूल्य मानत असत. सत्यकथेच्या उत्तरकाळात सत्यकथेच्या वाङ्मयीन भूमिकेवर आणि सत्यकथेत प्रकाशित होणाऱ्या लेखनावर टीका करणारे कितीतरी लेख सत्यकथेत प्रसिद्ध झाले. स्वतःची वाङ्मयीन भूमिका स्वायत्ततावादी असूनही मर्ढेकरांच्या स्वायत्ततावादी सौंदर्यशास्त्राबरोबरच लौकिकतावादी सौदर्यशास्त्र मांडणारा रा. भा. पाटणकरांचा ‘सौदर्यमीमांसा’ हा ग्रंथ आणि त्यांचे लेखकांच्या साहित्याचे अभ्यासग्रंथही त्यांनी प्रकाशित केले. अशा ग्रंथप्रकाशनामागे त्यांची भूमिका केवळ ‘अकादमिक’ होती. म्हणूनच त्यांनी भारतीय काव्यशास्त्रावर र पं. कंगले यांचेही ग्रंथ प्रकाशित केले.
मौज प्रकाशनगृहाने प्रसिद्ध केलेली ललित वाङ्मयाची पुस्तके पाहिली, तर त्यांचे लेखक केवळ मध्यमवर्गीय होते असे दिसत नाही. पारंपरिक समाजव्यवस्थेनुसार उच्चवर्णीय नसलेले वि.द. घाटे, आनंद यादव, रा. रं. बोराडे, विलास सारंग, अनुराधा पोतदार, संभाजी कदम, यशवंत मनोहर, सखा कलाल इ. हेही त्यांचे लेखक आहेत. यांचे लेखन काही ‘ब्राह्मणी’ संवेदनशीलतेतून घडलेले नाही. ‘ललित वाङ्मयाचा प्रकाशक’ म्हणून केवळ कलामूल्यांच्या कसोटीवर उतरणारी पुस्तके - मग ती कोणाचीही असो - श्री. पु. भागवतांनी स्वीकारली, संपादित केली आणि प्रकाशितही केली.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
समाजाचा घटक या नात्याने आपल्यावरही काही जबाबदारी असते, असे श्री. पु. भागवत मानत असत. त्यांच्या सामाजिक जाणिवेला दोन अंगे होती. त्यांपैकी एक म्हणजे या समाजाच्या सांस्कृतिक जीवनाच्या विकासाला हातभार लागेल असे आपल्या प्रकाशनव्यवसायाच्या क्षेत्रात शक्य ते करणे. याच भूमिकेतून त्यांनी ‘मौज’ साप्ताहिकाला एक आकार दिला, राजकारण, समाजकारण, क्रीडा, नाट्य, नृत्य, संगीत, चित्रपट यावरचे चिकित्सक लेखन प्रसिद्ध करून सामान्य वाचकाची वैचारिकता आणि कलाभिरुची संपत्र केली. मराठी नियतकालिकजगतात केवळ ‘मौज’ हेच केवळ एकमेव ‘सांस्कृतिक नियतकालिक’ होते. ‘मौज’ बंद पडल्यावर ‘मौज’ दिवाळी अंकाने हेच कार्य पुढे चालवले.
मौज प्रकाशन गृहाचीही हीच भूमिका होती. श्री. पु. भागवतांनी सर्व ललित कलांवर पुस्तके प्रकाशित केली. अनेक कलावंतांची आत्मचरित्रेही प्रकाशित केली. या समाजाच्या परिवर्तनात एक प्रकाशक म्हणून जे करणे आवश्यक आहे ते करणे, हे त्यांच्या सामाजिक जाणिवेचे दुसरे अंग होते. म्हणून त्यांनी वर्तमानात जे काही महत्त्वाचे सामाजिक कार्य सुरू असेल, त्याची दखल घेणारी पुस्तकेही प्रकाशित केली. मार्क्सवादी गोदावरी परुळेकर, गीता साने आणि समाजवादी बाबा आढाव यांच्या सामाजिक कार्यावरची पुस्तके आवर्जून प्रकाशित करणारे प्रकाशनगृह ‘मौज’च. आनंदीबाई शिर्के, वि.द. घाटे, पांडुरंग चिमणाजी पाटील इत्यादिकांची, प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे महाराष्ट्राचे समाजजीवन आणि त्यातील ताणतणाव शब्दबद्ध करणारी आत्मचरित्रेही ‘मौजे’नेच प्रकाशित केली. हे सर्वच कार्य अजोड म्हटले पाहिजे.
एक व्यापक सामाजिक-सांस्कृतिक भान असलेले, वाङ्मयासह सर्व कलांवर प्रेम करणारे, व्यापक, समृद्ध आणि अनेक कलांचा आस्वाद घेऊ शकणारी अभिरुची प्राप्त असलेले आणि हे सर्व आपल्या प्रकाशनव्यवसायात उतरवणारे संपादक, प्रकाशक, वाङ्मयचिंतक मराठीत तरी श्री. पु. भागवत हे एकमेव होते.
‘वाङ्मयीन युगान्तर आणि श्री. पु. भागवत’ : संपादक - प्रा. सुधीर रसाळ आणि प्रा. वसंत पाटणकर
राजहंस प्रकाशन, पुणे
पाने – २७५ + ५९ (मोठा आकार, हार्डकव्हर)
मूल्य – ६०० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment