सीरिया, येमेन आणि इराक या तीन युद्धग्रस्त भागांत रुग्णसेवा देण्यासाठी गेलेल्या एका भारतीय ऑर्थोपेडिक सर्जनने घेतलेले विलक्षण अनुभव मांडणारे मराठीतले पहिले पुस्तक म्हणजे ‘डॉक्टर ऑन अ वॉरफ्रंट’ हे होय. डॉ. भरत केळकर लिखित हे पुस्तक नुकतंच मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे. त्यातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश...
.................................................................................................................................................................
लहानपणी दिवाळीत मातीचा किल्ला बांधताना त्यावर मोठ्या हौसेने मावळे, त्यांचे घोडे आणि फौज ठेवायचो मी. पुढे शाळकरी वयात प्रत्येक मराठी मध्यमवर्गीय घरातील मुलाच्या हातात जी पुस्तकं असतात, ती शिवचरित्र सांगणारी पुस्तकं माझ्याही हातात आली. शिवाजी महाराजांचा पराक्रम, त्यांच्या शूर मावळ्यांनी मिळवलेले थरारक विजय आणि फत्ते केलेल्या मोहिमा वाचताना काहीतरी अद्भुत वाचतोय असं वाटत राहायचं.
अभ्यासाचे विषय बदलले तशी शिवाजी महाराजांची युद्धनीती आणि डावपेच सांगणारी पुस्तकं काहीशी मागे पडत गेली, पण त्या काळात देशाची चीन, पाकिस्तानबरोबर युद्धं झाली आणि बांगलादेश मुक्तीसंग्रामही याच काळाने बघितला. ही युद्धं हा माझ्या पिढीच्या अनुभवाचा एक ठळक भाग बनला. या युद्धांमध्ये भारताच्या वाट्याला आलेले लखलखीत विजय आणि जिव्हारी लागलेला एखादा पराभव याच्या बातम्या वाचताना, युद्धकथा ऐकताना मनात उमटलेल्या विविध भावनांच्या लाटांची गाज आजही मनात खोलवर कुठेतरी वाजते आहे.
सर्वसामान्य भारतीयाला असलेला युद्धाचा अनुभव म्हणायचा तर एवढाच. यापलीकडे युद्धाची तीव्रता आणि झळा अनुभवण्याची वेळ सुदैवाने कधी सामान्य माणसाच्या वाट्याला येत नाही. त्यामुळे युद्धामधील क्रौर्य आणि त्यात भरडून निघणाऱ्या सामान्य माणसाच्या आयुष्याची वाताहत याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही. पुस्तकाच्या गोष्टीतील राजाने दिलेला शिरच्छेदाचा हुकूम म्हणजे प्रत्यक्षात काय असेल, याचा कधी विचारही आपण करू शकत नाही.
थोडक्यात काय, वयाच्या जवळजवळ पन्नाशीपर्यंत युद्ध नावाची गोष्ट माझ्याही आयुष्याच्या परिघावर दूर कुठेतरी होती. त्याच्या परिणामाचा विचार कधी मनातसुद्धा आला नव्हता.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
एमएसएफच्या पहिल्या मोहिमेवर निघालो, तेव्हा आपण एका धगधगत्या अग्निकुंडात प्रवेश करतो आहोत, याची जाणीव मनात होती; पण सुन्न करून टाकणारी मानवी क्रौर्याची आणि अगतिकतेची एवढी परिसीमा अनुभवाला येईल असं मात्र वाटलं नव्हतं! माझ्या आजवरच्या अनुभवाचा भाग असलेली युद्धं आणि या तीन मोहिमांच्या निमित्ताने झालेलं यादवी युद्धाचं दर्शन या दोघांची तुलना होऊच शकत नाही, इतकी अमानुषता या युद्धांमध्ये दिसू लागली आहे. तंत्रज्ञान आणि विज्ञान याच्या प्रगतीचे एकीकडे अचंबित करणारे अनुभव आपण दैनंदिन जीवनात घेत असताना, हेच तंत्रज्ञान आणि प्रगत विज्ञान यांच्या मदतीने विकसित केली गेलेली अनेक अस्त्रं आणि शस्त्रास्त्रं जगभरातील युद्धात वापरली जाताना दिसतात, तेव्हा ‘विज्ञान शाप की वरदान'’हा सनातन प्रश्न डोकं वर काढत असतो!
२०१४ साली मी सीरियातील माझी पहिली मोहीम करून परतलो. त्यानंतर दहा-अकरा महिन्यांतच सीरियातील एका छायाचित्राने जगभरातील नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं. तुर्कस्तानी समुद्राच्या किनाऱ्यावर पडलेल्या आयलान कुर्दी या तीन वर्षांच्या मुलाच्या निश्चेष्ट शरीराचं छायाचित्र २ सप्टेंबर २०१५ रोजी प्रसिद्ध झालं आणि काही क्षणांत ते जगभरातील जवळजवळ प्रत्येक मोबाईल स्क्रीनपर्यंत पोहोचलं.
सीरियात सुरू असलेल्या युद्धात निराश्रित झालेलं आयलानचं कुटुंब युरोपमध्ये आश्रय घेण्यासाठी निघालं होतं. आठ प्रवाशांची क्षमता असलेल्या त्यांच्या बोटीमध्ये १६ प्रवासी भरल्याने ती रबरी बोट बुडाली आणि त्यात आयलानचा बुडून मृत्यू झाला. समुद्राच्या वाळूत पालथ्या पडलेल्या त्या मृतदेहाच्या छायाचित्राने जगभरात कमालीची खळबळ उडाली आणि सीरियातील यादवीचं जळजळीत स्वरूप जगासमोर आलं.
या छायाचित्रामध्ये दिसणाऱ्या आयलानच्या वयाचीच मुलं रक्तबंबाळ अवस्थेत माझ्या टेबलवर उपचार घेण्यासाठी आली होती. आयलानचं छायाचित्र बघत असताना मला त्या मुलांची तीव्रतेने आठवण आली. घराच्या आसपास फुटलेल्या बॉम्बमधील लोखंडी कपचे शरीरात घुसल्याने जखमी झालेल्या या मुलांनी आपले हात-पाय गमावले होते. शस्त्रक्रियेनंतर शुद्धीवर आल्यावर त्यांचे प्रश्न होते, ‘माझ्या हाताचा पंजा कुठे आहे?', ‘मी घरी परत कधी जाणार?’ काय सांगणार होतो मी त्यांना? त्यांच्या नजरेला नजरही भिडवणं कठीण होतं. त्यांच्या प्रश्नांवर फक्त गप्प राहत होतो मी.
.................................................................................................................................................................
*!#* ‘अक्षरनामा’ दीपावली २०२३ विशेषांक *!#*
वेगळे, नावीन्यपूर्ण, अर्थसंपन्न आणि अंतर्मुख करायला लावणारे चिंतनशील असे १३ लेख...
पाहावाचाअनुभवाइतरांनासूचवा
https://www.aksharnama.com/client/sub_categories_articles/166
.................................................................................................................................................................
मध्यपूर्वेतल्या अनेक अरब देशांमध्ये २०११मध्ये ‘अरब स्प्रिंग’ म्हणून ओळखला जाणारा सशस्त्र उठाव झाला. ही त्या त्या देशांतल्या नागरिकांची, तरुणांची चळवळ होती, कारण या तरुणांना स्वातंत्र्य आणि संघर्षरहित आयुष्य हवं होतं. त्याची सुरुवात झाली ट्यूनिशियापासून. या देशामध्ये नागरिकांचा उद्रेक झाला. राज्यकर्त्यांनी आपल्या सैन्याला नागरिकांचा उठाव चिरडून टाकण्याचा हुकूम दिला, परंतु सैन्याने त्याला नकार दिला. कारण ते त्यांच्याच देशाचे नागरिक होते! राज्यकर्त्यांना मग नागरिकांच्या बऱ्याच मागण्या मान्य कराव्या लागल्या.
या घटनेमुळे मध्य आशियामधील अनेक देशांत आपल्या मागण्यांसाठी नागरिक सक्रिय झाले. याच उठावाचं लोण सीरियात पसरलं. आंदोलन करणारे तरुण रस्त्यावर आले. सीरियाचे अध्यक्ष बशर असद यांनी सगळ्या बळानिशी आणि जगभरातून मदत घेत हे आंदोलन अक्षरश: चिरडलं आणि बघताबघता सीरियाच्या यादवी युद्धाचं रूपांतर जागतिक युद्धात झालं. चार लाखांहून अधिक मृत्यू, किमान दहा लाख माणसं निराश्रित आणि पाच लाखांहून अधिक माणसं परागंदा करणाऱ्या या युद्धाने देशाची पुरती वाताहत झाली. अर्थात सीरिया हे अशा प्रकारे युद्धात होरपळत असलेल्या देशांचं एक उदाहरण आहे.
आज जगाच्या नकाशाकडे नजर टाकली तर धुमसत असलेल्या अनेक देशांमधील युद्धातून उठत असलेल्या धुराचे ढग नजरेस पडतात. अफगाणिस्तान, येमेन, इराक, मेक्सिको, टर्की, सोमालिया, उत्तर आफ्रिकेतील मघरीब व साहेल भागातील देश, लिबिया अशा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कारणांसाठी संघर्ष पेटलेला दिसतो.
कुरुक्षेत्र, पानिपत, कलिंग, सीरिया, येमेन, इराक, युक्रेन नावं फक्त वेगवेगळी; इथली युद्धं, इथल्या अराजकाचा परिणाम आणि इथल्या नागरिकांचं अंधारमय भविष्य, या गोष्टी अगदी सारख्या आहेत. कोणत्याही देशातल्या समस्या टोकाला गेल्यानंतरच युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते. थोडक्यात, त्या समस्येवर उत्तर म्हणून ते युद्ध लढलं जातं. युद्धाच्या शेवटी त्या समस्येवरच समाधान मिळावं अशी अपेक्षा असते. पण मी ज्या तीन परिस्थितींचा साक्षीदार झालो, त्या बघून मला नाही वाटत युद्ध कोणत्या समस्येला उत्तर देत असेल. मग युद्ध नक्की काय देतं?
अंतर्गत बंडखोरी, सशस्त्र दहशतवादी गट, त्यांना पाठिंबा देणारे स्थानिक राजकीय व धार्मिक गट, आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या दहशतवादी संघटना, शस्त्रास्त्र व अमली पदार्थांचे दलाल, गुंडांच्या नामचीन टोळ्या, त्यांना पैसे, शस्त्रास्त्रं, मनुष्यबळ अशा सर्व आघाड्यांवर पाठिंबा देणाऱ्या महासत्ता यांनी जगाच्या रंगमंचावर मोठ्या प्रमाणात हा खेळ मांडला आहे.
त्यात सर्व बाजूंनी बळी जाणारा, सर्वस्व गमावणारा, घर, देश, भूमी यातून उखडून फेकला गेलेला आहे तो म्हणजे सामान्य माणूस. या तिन्ही मोहिमांमध्ये मी बघितला तो हा सामान्य माणूस. दिशा आणि भविष्य नसलेला तरुण वर्ग आणि असहाय अशी लहान मुलं आणि स्त्रिया!
१९९४मध्ये आफ्रिकेत रवांडा देशातील हुतुस आणि तुत्सी या दोन जमातींमध्ये ठरवून केलेला लाखो लोकांचा नरसंहार एमएसएफच्या लोकांच्या समोर आणि अवतीभवती झाला होता. आपत्तीत होरपळलेल्या लोकांना वैद्यकीय सेवा देणाऱ्या या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तेव्हा हताशपणे “You cannot stop a Genocide with Doctors” असे उद्गार काढले होते. ‘Only the dead have seen the end of war’ असं एक वाक्य काही वर्षांपूर्वी कुठेतरी वाचलं होतं. त्याचा प्रत्यक्ष अनुभव मी या तीन मोहिमांच्या निमित्ताने घेत होतो. सतत वाढत जाणारी युद्धं, हिंसा यांना आटोक्यात कोण आणणार? हा आज जगापुढील एक महत्त्वाचा प्रश्न आहे.
२०१६मध्ये मी येमेनला गेलो होतो, तेव्हा तैजमध्ये, जिथे प्रत्यक्ष यादवी युद्धं चालू होतं, त्याच्या जवळच आमचं हॉस्पिटल होतं. पहिल्याच आठवड्यात बॉम्बस्फोटात जखमी झालेला एक माणूस आला, पाच-सहा दिवसांनी त्याची मुलगी गोळीबारात जखमी होऊन आली, ते परत जाण्याच्या वेळेला त्या मुलीची आई अशीच जखमी होऊन आली. उपचारानंतर हे कुटुंब त्याच भागात परत गेलं. मला प्रश्न पडायचा, युद्ध करणारे आपला हिंसाचार सुरूच ठेवणार आणि डॉक्टरांनी मात्र हे सगळं नजरेआड करून, विसरून आपलं कर्तव्य करत राहायचं, हे असंच चालू राहणार का? मग बाकी समाजाला आपली जबाबदारी कधी कळेल?
मानवतेलाच वेठीला धरणारी अशी युद्धपरिस्थिती मला खूप जवळून बघायला, अनुभवायला मिळाली. एकाच वेळी मानवता आणि अमानवीयता यांचा प्रत्यय येत होता. हे अनुभव घेताना युद्ध नेमकं कोणामधलं आणि ते कशासाठी, हेच कळेनासं झालं. जगातील अनेक देशांत आज अशी परिस्थिती आहे. युद्धखोर देशांमधील सामान्य जनतेला हा रोजचा संघर्ष नको असतो. सतत अस्थिरतेच्या काट्यावर टांगलेलं आयुष्य आणि भविष्य कोणाला हवं असणार?
एमएसएफतर्फे सेवा देत असलेल्या हॉस्पिटल्सवर बॉम्ब टाकू नये व हल्ला करू नयेत, असे संदेश युद्धात भाग घेणाऱ्या सगळ्या गटांना, देशांना वारंवार दिलेले असतात, तरीसुद्धा येमेन, अफगाणिस्तान येथील एमएसएफच्या हॉस्पिटल्सवर हवाई हल्ले झाले आणि वैद्यकीय सेवा बंद करावी लागली. जीवन-मरणाच्या सीमेवर झुंज देत असलेले अनेक रुग्ण वैद्यकीय मदतीला वंचित झाले. डॉक्टर्स आणि वैद्यकीय सेवा सुन्न झाली!
मानवतेलाच वेठीला धरणारी अशी युद्धपरिस्थिती मला खूप जवळून बघायला, अनुभवायला मिळाली. एकाच वेळी मानवता आणि अमानवीयता यांचा प्रत्यय येत होता. हे अनुभव घेताना युद्ध नेमकं कोणामधलं आणि ते कशासाठी, हेच कळेनासं झालं. जगातील अनेक देशांत आज अशी परिस्थिती आहे. युद्धखोर देशांमधील सामान्य जनतेला हा रोजचा संघर्ष नको असतो. सतत अस्थिरतेच्या काट्यावर टांगलेलं आयुष्य आणि भविष्य कोणाला हवं असणार?
स्वस्थ कौटुंबिक आयुष्य, पोट भरण्यासाठी नोकरी व्यवसाय आणि शांत, सुसंस्कृत समाजजीवन एवढ्याच सामान्य माणसाच्या आपल्या आयुष्याकडून अपेक्षा असतात. ते देणारा सत्ताधारी कोण आणि कोणत्या पक्षाचा असावा, जागतिक राजकारणात कोणाचं वर्चस्व असावं, सत्ता, मग ती आर्थिक वा धार्मिक असो वा साधनसंपत्तीच्या अधिकारासाठी असो, कोणाच्या हाती असावी यावर त्या सामान्य जनतेचं काही मत असतं असंही नाही. या नाड्या कोणाच्या हाती असाव्यात, याबाबत त्याचा काहीही आग्रह नसतो. पण दुर्दैवाने याच लोकांची युद्धात सर्वाधिक होरपळ होताना मी बघितली आणि अनेकदा मन उदास झालं.
इराकमध्ये, मोसुलला मी गेलो होतो ते युद्ध संपल्यानंतर. त्या वेळेचं ते उद्ध्वस्त शहर आणि तिथली हजारो दुर्दैवी माणसं बघून एका क्षणात मनात विचार येऊन गेला, सीरिया आणि येमेन इथली युद्धं संपल्यानंतर तिथल्या अनेक शहरांचं, वस्त्यांचं भविष्य हेच असणार आहे. या जाणिवा माझ्या रोजच्या आयुष्यातला एक खूप मोठा भाग बनतात, सतत अस्वस्थ करत राहतात. मात्र या सगळ्यात एका गोष्टीने हायसं वाटतं, एमएसएफसारख्या संस्था आज आहेत आणि त्यांच्या मदतीने जगभरातील अनेक डॉक्टर्स काही प्रमाणात का होईना, या रुग्णांच्या जखमा बऱ्या करण्यासाठी झटत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना नेहमीच यश येतं असं नाही.
युद्ध हे कोणत्याच प्रश्नाचं उत्तर नाही, कुठल्याही समस्येचं समाधान नाही. ते केवळ आणि केवळ परिणाम देतं. असे परिणाम, जे माणसाला माणसातून उठवतात... जे माणसाला माणूस असण्याची लाज वाटायला भाग पाडतात... माणसाचं माणूसपण नाकारतात... आणि मग मी काय मदत करणार आहे या लोकांना? मी केलेल्या तुटपुंज्या उपचाराने त्यांच्या शारीरिक जखमा भरतीलही, पण त्या भरल्यावर कुठे जातील हे लोक? त्यांचं आयुष्य उभं राहायला तेवढं पुरेसं आहे? माझे हे छोटेसे प्रयत्न असा काय फायदा करून देणार या लोकांचा?...
गेल्या आठ वर्षांतला अनुभव सांगतो की, युद्ध करणाऱ्या दोन्ही बाजू बऱ्याचदा आपल्या विरोधी पक्षाला वैद्यकीय मदत मिळणार नाही, याची काटेकोरपणे दक्षता घेतात. या युद्धामध्ये मदत म्हणून आलेल्या डॉक्टरांना कधीकधी आपले प्राण गमवावे लागले आहेत. मोसुलहून परत आल्यावर मला युद्धासंबंधीच्या या जाणिवांनी खूप त्रास दिला...
कुरुक्षेत्र, पानिपत, कलिंग, सीरिया, येमेन, इराक, युक्रेन नावं फक्त वेगवेगळी; इथली युद्धं, इथल्या अराजकाचा परिणाम आणि इथल्या नागरिकांचं अंधारमय भविष्य, या गोष्टी अगदी सारख्या आहेत. कोणत्याही देशातल्या समस्या टोकाला गेल्यानंतरच युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते. थोडक्यात, त्या समस्येवर उत्तर म्हणून ते युद्ध लढलं जातं. युद्धाच्या शेवटी त्या समस्येवरच समाधान मिळावं अशी अपेक्षा असते. पण मी ज्या तीन परिस्थितींचा साक्षीदार झालो, त्या बघून मला नाही वाटत युद्ध कोणत्या समस्येला उत्तर देत असेल. मग युद्ध नक्की काय देतं?
तीनही ठिकाणांचे अनेक लोक आपल्या नजरांनी आणि आपल्या वेदनांमधून हा प्रश्न मला विचारत होते. सीरियामधल्या त्या पाच वर्षांच्या मुलाने मला सकाळी उठल्याउठल्या पहिला प्रश्न केला होता, ‘माझी आई कुठे आहे?’ त्याचा पुढला प्रश्न होता, ‘माझे पाय कुठे गेले?’ जगातला कोणताही माणूस काय उत्तर देऊ शकत होता, या प्रश्नांवर?
आपल्या पत्नीला आणि मुलीला डोळ्यांसमोर मरताना बघून जीव वाचून पळालेला तो माणूस असो, झतारीच्या निर्वासितांच्या छावणीत आपलं गतवैभव विसरून आइस्क्रीम विकणारा तो सीरियन उद्योगपती असो, येमेनमधील हॉस्पिटलमध्येच राहण्याचा हट्ट करणारं ते कुटुंब असो, मोसुलमधल्या आपल्या घराचे, संसाराचे भग्नावशेष दाखवणारा डॉक्टर असो, आपल्या नातेवाइकांच्या जखमांच्या फोटोंचा कोलाज आपल्यासोबत घेऊन येणारी ती स्त्री असो किंवा प्रचंड निरागस डोळ्यांनी खायला अन्न, पांघरायला पांघरूण मागणारी ती छोटी मुलगी असो, या सगळ्यांना जगण्यासाठी दिशा दिसत नाहीयेत.
..................................................................................................................................................................
हेहीपाहावाचाअनुभवा
..................................................................................................................................................................
आज यांच्या डोळ्यांसमोर केवळ आणि केवळ काळोख आहे. तिथून पुढे जावं म्हणालात, तर त्या अंधारात पाऊल टाकायला सोबत नाही, कशाचीही मदत नाही आणि परत जावं म्हणालात तर जिथे परत जायचं आहे ते सगळं उद्ध्वस्त झालं आहे. आणि मग पुन्हा तोच प्रश्न युद्ध काय देतं?...
बाकी सारं जाऊ दे, ते धड जगूही देत नाही... युद्ध हे कोणत्याच प्रश्नाचं उत्तर नाही, कुठल्याही समस्येचं समाधान नाही. ते केवळ आणि केवळ परिणाम देतं. असे परिणाम, जे माणसाला माणसातून उठवतात... जे माणसाला माणूस असण्याची लाज वाटायला भाग पाडतात... माणसाचं माणूसपण नाकारतात...
आणि मग मी काय मदत करणार आहे या लोकांना? मी केलेल्या तुटपुंज्या उपचाराने त्यांच्या शारीरिक जखमा भरतीलही, पण त्या भरल्यावर कुठे जातील हे लोक? त्यांचं आयुष्य उभं राहायला तेवढं पुरेसं आहे? माझे हे छोटेसे प्रयत्न असा काय फायदा करून देणार या लोकांचा?...
एकामागोमाग एक विचार माझ्या मनावर आदळत असतात. खिन्न होतो मी, निराश वाटतं. श्वास वरखाली होऊ लागतात. आणि मी माझ्या खुर्चीवर बसून डोळे मिटून घेतो. माझ्या डोळ्यांसमोर येतो झतारी निर्वासित कॅम्पमधला एक छोटा तंबू. त्याच्या भोवती तिथे राहणाऱ्या काही लोकांनी चौकोनात एक छोटीशी बाग फुलवली होती. बागेत वेगवेगळ्या रंगांची खूप फुलं उमलली होती. त्या प्रचंड रुक्ष वाळवंटासारख्या दिसणाऱ्या निर्वासितांच्या छावणीत तो एक चौकोन खूप उल्हसित करणारा होता.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
या उल्हासाची मला जाणीव होते आणि मग मीच स्वत:ला सांगतो, या सगळ्या निराशाजनक वातावरणात एमएसएफ, रेडक्रॉस अशा रुग्णसेवेला वाहून घेतलेल्या संस्था आहेत. तुटलेल्या पायांना आधार देणाऱ्या अनेक आंतरराष्ट्रीय ‘एनजीओ’ आहेत. निर्वासित छावण्यांमध्ये अनेक स्वयंसेवी संस्था तिथे राहाणाऱ्या लोकांना शिक्षण, प्रशिक्षण, वैद्यकीय सुविधा, रोजगाराच्या संधी मिळतील याची काळजी घेत आहेत. तुटून उद्ध्वस्त झालेल्या त्या आयुष्याचे तुकडे पुन्हा गोळा करून, त्याला एक नवीन आकार देण्याचा प्रयत्न करत आहेत, हेही सगळं माझ्या डोळ्यांसमोर येतं.
माणुसकी अजून कुठेतरी शाबूत आहे, टिकून आहे म्हणून हायसं वाटतं. या सगळ्यामुळे ही आयुष्यं हरवलेली माणसं पुन्हा पहिल्यासारखं जगू शकतील याची शाश्वती नसली, तरी ते जगणं तरी सोडणार नाहीत याची खात्री मात्र नक्की होते.
रानातल्या उन्मळून पडलेल्या वटवृक्षांची सावली हरवते, परत त्याच वटवृक्षांच्या साथीने, त्याच्या अंगावरच अनेक छोटीछोटी झाडं नव्या पालवीनिशी जन्माला येतात. माणूस ज्या जमिनीत थांबतो, तिथे तो काही काळात रुजतो आणि पुन्हा नव्याने उगवतो. तो तसाच उगवत राहीलही. परंतु मुळात आहे त्याच जागेवरून उखडला जाऊ नये, ह्यासाठी एक माणूस म्हणून आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. माझ्या या अनुभवातून एक गोष्ट ठामपणे समोर आली. आपली विचारसरणी ‘वैश्विक’ असायला हवी. माणसाला ‘माणूस’ म्हणून आपल्याला बघता यायला हवं.
‘डॉक्टर ऑन अ वॉरफ्रंट’ - डॉ. भरत केळकर | मनोविकास प्रकाशन, पुणे | मूल्य – २८० रुपये
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment