साठचे दशक हे मराठी साहित्यातील परिवर्तनाचे, बदलाचे दशक होते, हे आता सर्वमान्य झाले आहे. या दशकातील लघुअनियतकालिकांची चळवळ, त्या पाठोपाठचा दलित साहित्याचा आकांक्षी उद्रेक आणि आपले वेगळे आणि स्वतंत्र जीवनानुभव असल्याचा आग्रह धरून, आपल्या कृषि-परंपरेशी असलेल्या संबंधांचा साहित्यकृतींमधून शोध घेऊन, त्या परंपरेशी नाते प्रस्थपित करणारी कृषिवल परंपरेच्या साहित्याची चळवळ, या तीनही चळवळींनी साठोतरी काळातील बहुतांशी साहित्य प्रभावित केले आहे. हा प्रभाव अद्यापी पूर्णपणे ओसरला आहे, असे म्हणता येणार नाही.
स्वत:चे व्यक्तिविशिष्ट अनुभवविश्व, वर्तमान वास्तवात अनुभवाला येणाऱ्या सर्वस्तरीय जाणिवा, या अनुभवांचा आपल्या एतद्देशीय परंपरा, संचित यांच्याशी असलेल्या साम्यभेदात्मक संबंधांचा साहित्यकृतींद्वारे घेतलेला शोध / धांडोळा, त्यामधील पेच, ताण यांचे आविष्करण आणि हे अनुभव साकार करण्यासाठी साहित्यकृतीच्या निर्मात्याने अवलंबिलेल्या अनुभवविशिष्ट शैल्या, ही साधारणत: या तीनही वाङ्मयीन चळवळींची समान वैशिष्ट्ये होती.
या चळवळींमुळे आणि त्यामागील वैचारिक भूमिका, स्वीकारार्ह तत्त्वज्ञाने आणि आविष्करणाचे साहित्यविषयक संकेत यांच्या परिणामी मराठीमध्ये कविता, कादंबरी, नाटक, कथा आणि अन्य वाङ्मयप्रकारांमध्ये या काळात सशक्त साहित्यनिर्मिती झाली. आत्मकेंद्री / आत्मनिष्ठ स्वरूपाचे अनुभव, समकालीन वास्तवाला अंतर्विरोधासह साक्षात करणारे वास्तवलक्षी / समूहलक्षी अनुभव, अस्तित्वलक्षी, अस्तित्ववादी, अतिवास्तववादी अनुभव, अतिभौतिकीय स्वरूपाचे अनुभव साकार करणाऱ्या काही साहित्यकृती या काळात निर्माण झाल्या. या अर्थाने साठोत्तरी कालखंड हा आमूलाग्र परिवर्तनाचा, एक प्रकारच्या बंडाचा काळ होता, असे म्हणता येईल.
१९७५च्या आगेमागे आणखी एका विचारधारेचा प्रभाव असलेल्या साहित्याची यामध्ये भर पडली. सामान्यत:, ७५नंतर आपल्याकडे स्त्रीमुक्तीच्या विचारांची प्रभावीपणे मांडणी झाल्यामुळे आणि या विचारांच्या समाजातील काहीएक प्रमाणातील अभिसरणामुळे, रेट्यामुळे सृजनशील लेखिका/कवयित्रींना अनुभवांकडे पाहण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण मर्मदृष्टी प्राप्त होऊन, त्या तोपर्यंतपेक्षा वेगळ्या अनुभवांना साकार करू लागल्या. त्यांच्या साहित्यकृतींमधील अनुभवविश्व, जीवनानुभव परंपरेला प्रश्न विचारणारे होते. तिचे पुनर्वाचन करणारे, तिची चिकित्सा करणारे होते. त्यात रूपबंधाच्या प्रयोगशीलतेचे प्रमाण कमी, म्हणजे जवळपास अस्तित्वातच नसले, तरीही वाचकांना दिड्:मूढ करणारी बंडखोरी होती.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
या कवयित्रींनी आपल्या परंपरांचे, व्यवस्थांचे, वाङमयीन संचितांचे पुनर्वाचन केल्यामुळे त्यांच्या कवितांमधून पुरुषसत्ताक व्यवस्थेकडून स्त्रियांचे होणारे शोषण, त्यांच्या जगण्यावर त्या व्यवस्थेची असलेली जरब-पकड आणि त्याखाली गुदमरणारे त्यांचे जगणे; इत्यादी अनुभव मुक्तपणे व्यक्त होऊ लागले. मात्र या काळातील स्त्री-लिखित कविता एवढ्याच अनुभवांपुरतीच सीमित राहिलेली नाही. अन्यायी, जाचक रूढी, परंपरा, नाकारावेच असे सामाजिक / सांस्कृतिक संचित यांना अर्थपूर्ण नकार देऊन स्वअस्तित्वाचा प्रत्यय देणारे अनुभवदेखील यांपैकी काही कवयित्रींनी साकार केले आहेत.
ही एक प्रकारची विद्रोहाची कविता आहे. अशा प्रकारच्या कवितांचा भार आजच्या स्त्री-लिखित कवितांवर जास्त आहे, हे मात्र खरे! मात्र त्यातही अनुभव-वैविध्य आहे, हेदेखील लक्षात घ्यावयास हवे.
मात्र उपर्युक्त स्वरूपाचे अनुभव, जाणिवा साकार करणाऱ्या बहुतांशी कवयित्री अशा अनुभवांना काव्यबद्ध करून तिथेच थांबतात. त्या पल्याडच्या मूलभूत स्वरूपांच्या अनुभवांपर्यंत किंवा अशा प्रकारच्या अनुभवांमधून प्रत्ययाला येणाऱ्या विचारसूत्रांपर्यंत, जीवनविषयक सत्यांपर्यंत त्यांच्या काव्यात्म व्यक्तिमत्त्वाचा प्रवास होताना दिसत नाही.
कारण तसे घडले असते, तर त्यांच्या कवितांमधून व्यापक जीवनाशय विशाल कालपटाच्या संदर्भांसह किंवा ती पार्श्वभूमी ठेवून साकार झाला असता. अशा अनुभवांमधून प्रतीत होणारी त्यांची व्यासंगी वृत्तीही भावात्मकतेसह त्यांच्या कवितांमधून साकार झाली असती. त्यांच्याकडून या प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण कविता लिहिली गेली असती. मात्र इथे अपेक्षिलेली वैशिष्ट्यपूर्ण कविता कवयित्री सुचिता खल्लाळ यांच्या ‘प्रलयानंतरची तळटीप’ (२०१८) या श्रीरामपूरच्या शब्दालय प्रकाशनाने चांगली निर्मितीमूल्ये राखून प्रकाशित केलेल्या कवितासंग्रहात वाचावयास मिळते. कवयित्री सुचिता खल्लाळ यांचे यापूर्वी ‘पायपोळ’ (२००७) आणि ‘तहहयात’ (२०१५) हे दोन कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत.
खल्लाळ यांनी काव्यलेखनाखेरीज समीक्षात्मक स्वरूपाचे लेखनदेखील केले आहे. त्यांनी लिहिलेली साहित्यकृतींची परिक्षणे विविध वृत्तपत्रांच्या साप्ताहिक पुरवण्या, काही वाङ्मयीन नियतकालिके यांच्यामधून प्रसिद्ध झालेली आहेत. त्यामधून त्यांची स्वतंत्र प्रज्ञा आणि संबंधित साहित्यकृतीकडे बघण्याची वेगळी दृष्टी प्रतीत होते. शिवाय त्यांचे ‘स्त्री कवितेचं भान : काल आणि आज’ (२०१५) हे समीक्षालेखांचे पुस्तक प्रकाशित झालेले आहे. त्याचा संदर्भ-साहित्य म्हणून विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश झालेला आहे.
.................................................................................................................................................................
*!#* ‘अक्षरनामा’ दीपावली २०२३ विशेषांक *!#*
वेगळे, नावीन्यपूर्ण, अर्थसंपन्न आणि अंतर्मुख करायला लावणारे चिंतनशील असे १३ लेख...
पाहावाचाअनुभवाइतरांनासूचवा
https://www.aksharnama.com/client/sub_categories_articles/166
.................................................................................................................................................................
खेरीज, खल्लाळ यांनी ललितलेखन, वैचारिक लेखन केलेले आहे. त्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित देखील झाल्या आहेत. मात्र, त्यांच्या एकूणच कविता वाचताना लक्षात येते ते असे की, वर नमूद केल्याप्रमाणे त्यांनी अन्य प्रकारचे लेखन केलेले असले आणि त्या ‘लिहित्या लेखिका’ असल्या तरीदेखील त्यांची मूळ प्रकृती, व्यक्तिमत्त्व हे अंतत: कवयित्रीचेच आहे. आणि हे त्यांच्या कविता या वाङमयप्रकाराप्रती असलेल्या निष्ठेचेच निदर्शक आहे.
अतएव, आपल्या विचाराधीन असलेल्या ‘प्रलयानंतरची तळटीप’ या कवितासंग्रहाचे स्वरूप समजून घेण्यापूर्वी खल्लाळ यांच्या उपर्युक्त पूर्वीच्या दोन संग्रहांमधील भावानुभवांचे आणि त्यांच्या आविष्करणाचे स्वरूप सूत्ररूपाने समजून घेणे औचित्यपूर्ण ठरेल.
सुचिता खल्लाळ यांच्या २००७ साली प्रकाशित झालेल्या ‘पायपोळ’ (२००७) या संग्रहातील कवितांवर नवथरपणाच्या खुणा अगदी स्पष्टपणे जाणवतात. तो विशेषत: कवितांच्या अभिव्यक्तीसंबंधी जाणवत राहतो. ही अभिव्यक्ती पारंपरिक स्वरूपाच्या रोमँटिसिझमशी संवादी नाते सांगणाऱ्या शब्दकळेतून मुख्यत्वेकरून प्रतीत होत राहते.
असे असले तरीदेखील कवयित्रीच्या त्या विशिष्ट वयातदेखील तिने, तिला हरवलेल्या गत दिवसांची आठवण येत राहणे, आपले जगणे हा एक प्रकारचा प्रवास आहे, या प्रवासात कविताच आपला आधार आहे या जाणिवेचा प्रत्यय येणे, ‘तिला’ गावपातळीवरचे भ्रष्ट वास्तव प्रतीत होणे, ‘तिच्या’लेखी गावाच्या पुनर्वसनाच्या शक्यताच संपुष्टात येणे, प्रेमातली बेहोशी अनुभवल्यानंतर अंतिमत: त्या अनुभवात ‘तिला’ एकाकीपण सहन करावे लागणे, आणि त्या पार्श्वभूमीवर एखाद्या इतिहासातील घटनेलाच कविताबद्ध करावेसे वाटणे, स्पष्टपणे व्यक्त होत नसले, तरीदेखील स्त्रीच्या गुदमरलेल्या दु:खाची जाणीव असणे, इत्यादी आशयसूत्रे साकार केली आहेत.
.................................................................................................................................................................
*!#* ‘अक्षरनामा’ दीपावली २०२३ विशेषांक *!#*
वेगळे, नावीन्यपूर्ण, अर्थसंपन्न आणि अंतर्मुख करायला लावणारे चिंतनशील असे १३ लेख...
पाहावाचाअनुभवाइतरांनासूचवा
https://www.aksharnama.com/client/sub_categories_articles/166
.................................................................................................................................................................
यामधील काही अनुभव / जाणिवा या निश्चितच वास्तवलक्षी आहेत. त्यांच्यामधून कवयित्रीमधील वयापुढची प्रगल्भताही प्रत्ययाला येते. मात्र इथले काही अनुभव हे आत्मकेंद्री स्वरूपाचे आहेत आणि वर नमूद केल्याप्रमाणे ते आणि त्यांची अभिव्यक्ती ही मराठीमधील रोमँटिक परंपरेशी संवादी नाते सांगणारे आहेत. कविता रोमँटिसिझमच्या परंपरेतील असली म्हणून ती वाईट ठरत नाही. परंतु तिच्यावर एकुणातच पारंपरिक अभिव्यक्तीचा, शैलीचा प्रभाव प्रमाणाबाहेर प्रतीत होत असला तर मात्र तिची गुणवत्ता निश्चितच उणावते.
नेमकी हीच गोष्ट खल्लाळ यांच्या या पहिल्या संग्रहातील कवितांबाबत घडलेली आहे. ‘तहहयात’ (२०१५) हा दुसरा संग्रह २०१५ साली प्रकाशित झाला. यामध्ये एकूण ७४ कविता आहेत. आणि त्यामध्ये दोन दीर्घ कविता आहेत. या संग्रहातील कवितांचे प्रथमदर्शनी जाणवणारे वैशिष्ट्य म्हणजे, या कवितांमध्ये कवयित्रीला स्वत:ची अशी शब्दकळा सापडलेली आहे. अगोदरच्या संग्रहामध्ये, वर नमूद केल्याप्रमाणे, शब्दकळेवर रोमँटिसिझमच्या परंपरेशी संवादी नाते सांगणाऱ्या शब्दकळेचा विशेष भार होता.
मात्र या संग्रहातील कवितांवर अशा शब्दकळेचा भार जाणवत नाही. जी बाब शब्दकळेच्या बाबतीत घडलेली आहे, तिच गोष्ट भावानुभवांच्याबाबतीतदेखील घडलेली आहे. या संग्रहामधील कवितांमधून कवयित्रीने जसे जीवनसंबद्ध असे आत्मलक्ष्यी स्वरूपाचे अनुभव साकार केले आहेत.
तसेच ‘जगण्याचे थकलेपण’ व्यक्त करणारे मूलभूत स्वरूपाचे अनुभवदेखील साकार केले आहेत. सभोवतालचे ‘वातावरण-स्थिती’ साकारण्यामधून कवयित्रीने अस्तित्वावस्थादेखील साकार केल्या आहेत. क्वचित व्यवस्थेपुढच्या अगतिकतेचा अनुभवदेखील इथे व्यक्त केला आहे. नातेसंबंधांविषयीचे चाकोरीबाहेरचे वाटावे, असे काव्यात्म-निरीक्षणदेखील साकार केले आहे. संबंधांमधील तुटलेपणाची जाणीवदेखील इथे काव्यरूप घेते. स्त्रियांच्या वेगवेगळ्या वयोगटांतील जाणिवा / अनुभवदेखील इथे व्यक्त केले आहेत. कौटुंबिक संबंधांमधील बदल आणि ताण इथे व्यक्त झाले आहेत.
.................................................................................................................................................................
*!#* ‘अक्षरनामा’ दीपावली २०२३ विशेषांक *!#*
वेगळे, नावीन्यपूर्ण, अर्थसंपन्न आणि अंतर्मुख करायला लावणारे चिंतनशील असे १३ लेख...
पाहावाचाअनुभवाइतरांनासूचवा
https://www.aksharnama.com/client/sub_categories_articles/166
.................................................................................................................................................................
स्त्रीचा आत्मसन्मान व्यक्त करणारी एक प्रकारच्या बंडखोरीची कविताही या संग्रहात आहे. स्वअस्तित्वावस्था विलय पावण्याचा वैशिष्ट्यपूर्ण अनुभवदेखील इथे काव्यरूपात साकार झाला आहे. वस्तुजातामधील घटकांमधील ताटातुटीचा अनुभवदेखील इथे साकार झाला आहे आणि तो निश्चितच वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. सभोवतालची अखेरपर्यंतची गर्दी आणि अस्तित्व यांच्यामधल्या निरर्थक संबंधांचा अनुभवदेखील इथे अनुभवावयास मिळतो.
आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, पुरुषी मानसिकता स्त्रियांचे करीत असलेले खच्चीकरण, सरंजामशाही व्यवस्थेमध्ये स्त्री-जीवनाची होणारी शोकांतिका, एकूणच सामाजिक पर्यावरणात स्त्रीयांकडे बघणारी पुरुषी हिंसक-दृष्टी; इत्यादी मूर्त वास्तवलक्ष्यी दाहक आणि भेदक अनुभव, विशेषत:, अखेरच्या दोन दीर्घ कवितांमधून थेट व्यक्त झाले आहेत. हे सूत्ररूपाने नमूद केलेले भावानुभव हे जसे कवयित्रीच्या ‘कवयित्री’ म्हणून होणाऱ्या भावी विकासाच्या दिशा सूचित करतात, त्यामधून जशी वर नमूद केलेली ‘वयातीत प्रगल्भता’ प्रतीत होते.
तसेच कवितेच्या रूपाविषयीचे जाणते भानदेखील या संग्रहातील कवितांमधून प्रत्ययाला येते. इथे कवयित्री अनुभवोचित असे नवीन शब्द, नव्या प्रतिमा उपयोजिताना दिसते. सारांश, भावानुभव आणि त्यांची आविष्कृती आणि कवितांची शैली या स्तरांवर ‘तहहयात’ हा कवितासंग्रह कवयित्रीचा पुढील काळातील विकासच सूचित करणारा आहे.या दृष्टीने तो निश्चितच महत्त्वाचा आहे.
या पार्श्वभूमीवर विषयांतर्गत ‘प्रलयानंतरची तळटीप’ या प्रस्तुत संग्रहाच्या शीर्षकापासून आणि ख्यातनाम चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या या कवितांमधील भावानुभवाशी समर्पक असलेल्या मुखपृष्ठापासूनच या संग्रहाचे वेगळेपण लक्षात येते. आपल्या कविता एखाद्या प्रलयंकारी मजकुराच्या (खरे तर, घटनानंतरच्या ) केवळ तळटीपा आहेत, अशी कवयित्रीची या कवितांविषयींची प्रामाणिक धारणा आहे. परंतु या कवितारूपी तळटीपांना प्रलयंकारी अनुभवांची / घटनांची स्पष्ट पार्श्वभूमी आहे, हेदेखील कवयित्री या शीर्षकातून ध्वनित करते आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
त्यांनी आपल्या कवितांमागच्या प्रेरणांविषयी निर्देशित केलेला हा अभिप्राय / मतदेखील या कविता संग्रहामधील भावविश्वाचे, काव्यगत अनुभवांचे स्वरूप कसे असू शकेल, या विषयीदेखील वाचकांना पूर्वसूचना देणारे आहे. त्याच बरोबर येऊन गेलेल्या अथवा जगण्याच्या घालमेलीत कवयित्रीच्या अनुभवाला आलेल्या प्रलयानंतरच्या या कविता म्हणजे एक प्रकारच्या तळटीपा असल्याने तो प्रलय समजून घेण्याकरता, अनुभवण्यासाठी वाचकाला त्या उपयोगी ठरू शकतात, असाही भावार्थ त्यामधून सूचित झाला आहे. खेरीज, भीषण, संहारक, विध्वंसक घटनेच्या या केवळ तळटीपा आहेत, असाही भावार्थ त्यातून कवयित्रीला ध्वनित करावयाचा असावा.
मात्र असे असले तरीदेखील कवयित्रीला या कवितांमधील अनुभवविश्वाच्या / जीवनानुभवांच्या वेगळेपणाविषयी सार्थ आत्मविश्वासदेखील आहे. आपण भवतालाला, अस्तित्वात असलेल्या परंपरागत व्यवस्थांना पेलता येणार नाहीत, सुसह्य होऊ शकणार नाहीत, असे ‘निरागस’ अनुभव आपल्या कवितांमधून व्यक्त करत आहोत, याची जाणीवदेखील कवयित्रीला आहे. ही जाणीव कोणत्याही कवीला / कवयित्रीला आपल्या निर्मितीविषयी आवश्यक असणाऱ्या आत्मविश्वासाच्या जाणिवेशी नाते प्रस्थापित करणारी आहे.
मराठीमधील अनेक महत्त्वाच्या कवींनी अशी जाणीव आपल्या कवितांमधून अनुभवसापेक्ष, प्रसंगोपात प्रकट केली आहे. (“मी लिहू पाहतेय नेटाने / चौकटीला न पेलवणारा मजकूर /...अशी एखादी कोरी जागा वाचताना / तुम्ही अडखळलात / तरी मला पुरेसं आहे...”- अभिनय, पृष्ठ २१). हे एक प्रकारचे आपल्या काव्यपरंपरेतील समृद्ध असे संचित आहे आणि खल्लाळ यांनी त्या संचिताशी स्वत:च्या कवितेचे नाते प्रस्थापित केले आहे. स्वाभाविकच ते वैशिष्ट्यपूर्ण आहे.
या संग्रहात एकूण ९१ कवितांचा समावेश आहे. (‘बुद्ध’ या कवितेचे दोन भाग कल्पिले तर हा ९२ कवितांचा संग्रह समजावा लागेल). या कविता ‘चौकटीला न पेलवणारा मजकूर’, ‘बाईपणाचा काळा ठिपका’, ‘कवी मेला तरी चालेल, मरू नये कविता’, ‘तुझ्या पायरीचा काळोख’ आणि ‘कविता दर एका मरणासाठी’, या उप शीर्षकांखाली पाच भागांत विभागल्या आहेत. ही पाचही उपशीर्षके त्या त्या भागातील कवितांमधील भावानुभवांना प्रथमदर्शनी एका सूत्रात गोवणारी वाटत असली, तरीदेखील या प्रत्येक भागात एकापेक्षा जास्त आशयसूत्रांच्याद्वारे अनुभव व्यक्त झाले आहेत. परिणामी, प्रत्येक भागातील अनुभवविश्वाचे स्वरूप सघन आणि व्यामिश्र बनलेले आहे.
अनुभवांची निवड, त्यांचे आविष्करण या दोन्ही पातळ्यांवर या कविता अनुक्रमे ‘स्वतंत्र’ आणि ‘स्व-तंत्र’ आहेत. त्यामधून हे काव्यात्म व्यक्तित्व चिंतनशील असल्याचा प्रत्यय येतो आणि म्हणूनच या कवितांमधून अस्तित्व, समष्टी, भवताल, मानवी संबंध, सृष्टी यांच्याविषयी आणि एकूणच जीवनाविषयीदेखील प्रगल्भ भान व्यक्त होते. ते जितके समकालीन आहे, तितकेच ते कालातीत आहे.
अनुभवांची अशी सघनता आणि व्यामिश्रता कवयित्रीच्या समृद्ध अनुभवविश्वाची निदर्शकच मानावयास हवी. सारांश, अनुभवांची विविधता, त्यांची भेदकता, अनुभवांचे परस्परांशी असलेले संप्रुक्त संबंध आणि त्यातून निर्माण होणारी सघनता आणि व्यामिश्रता ही या कविता संग्रहाची वैशिष्ट्येच आहेत. त्यामुळे या कविता वाचकालाही भवतालाकडे पाहण्याची मर्मदृष्टी देतात, अंतर्मुख करतात आणि अनुभवसंपन्नही करतात.
खल्लाळ या ९०नंतरच्या कवयित्री आहेत. हा काळ जागतिकीकरणाच्या परिणामांचा काळ आहे. भिन्न भिन्न संस्कृतींचा एकमेकांशी परिचय होण्याचा हा काळ आहे. आर्थिक उदारीकरणामुळे एका विशिष्ट वर्गाच्या हाती अतिरिक्त धनसंचय, तर परिघाबाहेरच्या वर्गाचा जगण्यासाठीच संघर्ष, अशी विसंगती या काळात निर्माण झाली. स्व-भाषांवर इंग्रजीचे अतिरिक्त आक्रमण होऊन त्यांची मूळ रूपे शबलीत झाली. याच काळात अतिरिक्त धनसंचयामुळे चंगळवादी शैलीही उदयाला आली. यातूनच निर्माण होणाऱ्या आत्मकेंद्री वृत्तीमुळे माणसामाणसांमधला हार्दिक संवाद कमी झाला. ही सामाजिक-सांस्कृतिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन अगदी मोजक्याच कवी / कवयित्रींनी या काळात वास्तव-समांतर अशी वैशिष्ट्यपूर्ण कविता लिहिली.
मात्र या काळातील बहुतांशी कवींची कविता बदलांचे बाह्य तपशील नोंदवणारी, परिणामी कवितेला ‘कविता’ म्हणून जे ‘रूप’ असावे लागते, ते रूप हरवलेली आहे. काही वेळा तर ती तथाकथित अतिरिक्त बाह्य प्रयोगशीलतेत अडकून पडलेली दिसते. तर काही कवयित्री स्त्रीवादी जाणिवांच्या, म्हणजेच स्त्रियांच्या होणाऱ्या शोषणाच्या अनुभवांच्याच कविता लिहिताना दिसत आहेत. तशा त्या लिहावयासदेखील हव्यात. पण अशा कविताही एका मर्यादित अर्थाने पारंपरिकच म्हणावयास हव्यात.
प्रस्तुत संग्रहातील कवितादेखील याच सामाजिक-सांस्कृतिक पर्यावरणात लिहिली गेली आहे. परंतु तिला स्व-अस्तित्व शोधाची आणि समकाल शोधाची असोशी असल्याने आणि कवयित्रीला केवळ तपशील नोंदवावयाचे नसून प्रत्ययाला आलेले अनुभवच साक्षात करावयाचे असल्याने या संग्रहातील कवितांना ‘कवितारूप’ तर मिळाले आहेच, परंतु त्या नव्वोदतरी काळातील बहुतांशी कवयित्रींच्या कवितांपेक्षा पृथगात्मकही झाल्या आहेत. त्यांच्यात रूपबंधाचे प्रयोग नाहीत, हे खरे, पण विविध जीवनानुभवांना कवितारूप देण्यात त्या खचितच यशस्वी झाल्या आहेत.
या कवितांची शब्दकळा अनोखी आणि ताजी आहे. तिचे उपयोजन कवयित्रीच्या कवितांतर्गत स्वानुभवांचे प्रस्फुरण करणारे, आशयसूत्रांच्याद्वारे विकास साधणारे आहे. इथले प्रतिमाविश्व सर्वक्षेत्रीय आहे (इथे विस्तारभयास्तव उदाहरणे टाळली आहेत). परंतु त्यामधून या कवयित्रीला प्रतिभेची निसर्गदत्त देणगी लाभली आहे, याचाच प्रत्यय येत राहतो.
या संग्रहातील ‘चौकटीला न पेलवणारा मजकूर’ या पहिल्या छेदकात एकूण २० कविता आहेत. अगोदर नमूद केल्याप्रमाणे या सर्व कवितांचे उपर्युक्त सूत्र असले, तरीदेखील या कवितांमधून अन्य विविध आशयसूत्रेही साकार झाली आहेत. भवताल हा एक प्रकारचा नरक आहे, या नरकात आपण दीर्घकाळ झोपून राहिलो, आपणास काळाचे भान राहिले नाही, आपण या अवस्थेत असताना संपूर्ण भवताल बदललेला आहे, पूर्वीचे सगळे रम्य ते नष्ट झाले आहे; अशा दुखऱ्या, वेदनामयी जाणिवा इथे व्यक्त झाल्या आहेत (“बदलती भाषा बदलते व्यवहार बदलते व्याकरण / लकबी उच्चार पेहराव सवयी”-- ए. लां. झोपेतून-पृष्ठ ८ किंवा, “तेव्हा टेकडावरल्या रानगवताच्या फिकट जांभुळग्या तीनपाकळी / फुलासारखी / प्राणाच्या अग्रावरून जरा चवढ्या उंचावताच दिसायची / थेट परमेश्वराची नाळ”—समकाल-पृष्ठ १७ ).
त्यामुळे वर्तमानातील अपरिचित भवतालाशी कवयित्रीचे कसल्याच प्रकारचे नाते तयार होत नाही. म्हणून ती भूतकाळातील नात्यांच्या, संबंधांच्या ‘चिळ्ळंधार झऱ्यां’च्या शोधात उत्खनन करू पाहते, पण तिथेही त्यांचा आधार सापडत नाही. या वर्तमानात या काव्यात्म व्यक्तित्वाला निवड करण्याचे स्वातंत्र्य उरलेले नाही. एक प्रकारचे सूत्रच हरवल्याची, परात्मतेची, शक्तीपातच झाल्याची, समकालात वावरत असूनदेखील मुळं पार मागे कुठेतरी असल्याची, तुटलेपणाची, भोवंडलेपण अनुभवाला आल्याची जाणीव, या छेदकामधील काही कवितांमधून व्यक्त झाली आहे.
हा अस्तित्वशोधाचा अनुभव आत्मलक्षी तर आहेच, परंतु त्यामध्ये अस्तित्ववादी विचारसूत्रही अलगद मिसळून गेले आहे. रम्य भूतकालीन घटकांची किंवा इथे पुसटशा प्रमाणात व्यक्त झालेल्या मरणजाणिवेची कवयित्रीला असलेली ओढ रोमँटिक प्रवृत्तीची निदर्शक असली तरीदेखील ती एक आशयसूत्र बनून इथे व्यक्त झाली आहे. अशा प्रकारच्या रोमँटिसिझमच्या परंपरेशी संवादी आशय प्रक्षेपित करणाऱ्या कविता चांगल्या नसतात, असे समजण्याचे काहीच कारण नाही.
या छेदकामधील कवितांमधून वास्तवलक्षी, सामाजिक स्वरूपाचे अनुभव देखील साकार झाले आहेत. सभोवतालच्या वास्तवाकडे पाहण्याची कवयित्रीची दृष्टी भेदक आहे. नागरी वसाहती आणि त्यांच्यासाठी राबणाऱ्या वस्त्या यांच्यामधला ताण, त्यांच्यामधले एक प्रकारचे आदिबंधात्मक संबंध इथे साकारतात. या कष्टकऱ्यांच्या समर्थ आधारानेच या नागरी वसाहती प्राचीन काळापासून सुखनैव नांदताहेत, ही मर्मदृष्टी देणारी जाणीव इथे व्यक्त झाली आहे.
मृत्यू शाश्वत आहेच, पण कवितादेखील सनातन आहे, ती शिलालेखासारखी असते, हा विश्वास इथे प्रकटतो (एक कविता दर एक मरणासाठी). दोलकाच्या प्रतिकातून अधांतरी जगण्याचे सूचन होते. हा विनाशाचा अनुभव केवळ काव्यगत व्यक्तित्वा पुरताच सीमित राहत नाही. यात सृष्टीच्या विध्वंसाचा अनुभव असतो, त्यातून निर्माण होणारी उदासी, सामसूम एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित केली जाते.
मात्र, अनेकदा बेरकी व्यवस्था स्वत:च्या फायद्यासाठी या वस्त्या नष्ट करते (अवशेष). कोणत्याही चिकित्सेशिवाय गावठी परंपरांचे पालन केले जाते. पांढरपेशी वाङमयीन संस्कृती फोलपटासारखी असते. या व्यवस्थांचे नियंत्रक स्वत:च्या सोयीप्रमाणे इतिहास, भूगोल आणि धर्मशास्त्र यांच्यामध्ये बदल करतात. त्यांचा चेहरा ओळखू येत नाही. परिणामी, कवयित्रीला ही परिस्थिती अराजकसदृश्य वाटत राहते (समकाल). कोणत्याच विचारधारांचा आधार वाटत नाही.
सारांश, हे वास्तव, हा समकाल ‘अब्सर्ड’ झाले आहे. त्याची संगती लागत नाही. या दृष्टीने ‘गोष्ट’, ‘वारी’ या कविता अर्थपूर्ण आणि लक्षणीय आहेत. ‘वारी’मधील आशय, आविष्काराचे नाते तर थेट संत कवितेशी दाखवता येईल. या कवितांमध्ये परिघाबाहेरच्या माणसाविषयी कणव आहे. दांभिक व्यवस्थांविषयी त्वेषाची भावना आहे. प्रसंगी अनुभव व्यक्त करताना चढा स्वर लागला आहे. मात्र असे घडत असताना, या कवितांचे ‘कविता’ म्हणून असलेले रूप डागाळलेले नाही.
‘बाईपणाचा काळा ठिपका’ या दुसऱ्या भागात एकूण १६ कविता आहेत. या एकूणच संग्रहातील कवितांमधून कवयित्रीने एक ‘व्यक्ती’ म्हणून जसा आपल्या अस्तित्वाचा शोध घेतला आहे, तसाच ‘स्त्री’ म्हणून असलेल्या अस्तित्वाचाही घेतलेला आहे. मात्र, या छेदकामधील कवितांमध्ये स्त्रीवादातील एका भूमिकेत अनुस्यूत असलेला पुरुषसत्ताक व्यवस्थेला दिलेला सर्वंकष नकार उमटलेला नाही, तर या ठिकाणी केवळ स्त्रीच्या वाट्याला येणाऱ्या अनुभवांना साक्षात करण्याकडे कवयित्रीचा कल आहे. त्यामुळे त्यातून खेड्यापासून नागरी वसाहतींपर्यन्त स्त्री बजावत असलेल्या वेगवेगळ्या भूमिकांमधील तिच्या कष्टप्रद अवस्थांचे करुण चित्र साकारते.
खेड्यातल्या स्त्रीचे नांदत असताना कुटुंबाचा आणि एकूणच कृषिवल परंपरेचा आधार म्हणून वावरत राहणे (नांदणं), मातृसदृश भूमिकेतून सतत इतरांसाठी जळत राहणे (बाईपणाचा काळा ठिपका), वंशसातत्याच्या प्रक्रियेतील स्वत:ची निर्मितीची भूमिका निमूटपणे पार पाडणे, पुरुषसत्ताक व्यवस्थेने स्त्री-पुरुषांना तत्वज्ञानात्मक संकल्पनांमध्ये बसवून स्त्रीचा सर्व काळात भोगदासी म्हणून वापर करणे, पुरुषसत्ताक व्यवस्थेने स्वमनोरंजनासाठी स्त्रीला विविध रूपांमध्ये अनुभवणे; इत्यादी अनुभव इथे व्यक्त झाले आहेत (शाप, अभोगी). ते जसे व्यक्तीविशिष्ट अनुभव आहेत, तसेच ते स्त्रियांचे प्रातिनिधिक स्वरूपाचे अनुभवही आहेत.
.................................................................................................................................................................
*!#* ‘अक्षरनामा’ दीपावली २०२३ विशेषांक *!#*
वेगळे, नावीन्यपूर्ण, अर्थसंपन्न आणि अंतर्मुख करायला लावणारे चिंतनशील असे १३ लेख...
पाहावाचाअनुभवाइतरांनासूचवा
https://www.aksharnama.com/client/sub_categories_articles/166
.................................................................................................................................................................
शिवाय, हे अनुभव भारतीय तत्त्वज्ञानातील किंवा विदेशी मिथकातील संकल्पना, इतिहासकालिन पर्यावरण यांचे संदर्भ घेऊन व्यक्त झाल्याने त्यांना काळाची विस्तृत पार्श्वभूमी लाभलेली आहे. नव्वोदतरी काळातील स्त्रीवादी जाणिवेतून लिहिल्या जाणाऱ्या कवितांच्या तुलनेत या कवितांची ही पार्श्वभूमी आहे. या दृष्टीने या छेदकामधील ‘नांदणं’, ‘पिळा’, ’शाप’, ‘अभोगी’, ‘आई’, ‘बाया पाणी भरतात’; या कविता महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे बाईच्या अस्तित्वावर उमटलेला बाईपणाचा काळा ठिपका अधिकच गडद होत जातो. याखेरीज ‘उदासगीत’, ‘नाचणठिणगी’, ‘मी विसरून गेले आहे’, या कविता व्यक्तीविशिष्ट अनुभव साकार करतात.
‘कवी मेला तरी चालेल, मरू नये कविता’ हे उपशीर्षक असलेल्या पुढच्या छेदकात फक्त नऊ कविता आहेत. मात्र, कवी आणि कविता यांचे महत्त्व आणि त्यांची वैशिष्ट्यपूर्णता अधोरेखित करणारे हे छेदक आहे. या छेदकामधील कवितांमधून कविता, वेदना, मर्त्यता यांचेच मानुषीकरण केलेले आहे. कविता चक्रवर्ती बीभत्स अनंत सत्तेच्या काळात दु:खाच्या पखाली वाहून नेते, ती पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांची सत्वे परत करू शकते, ती समकालीन अधाशी, हिंसक, नरकसदृश वास्तवात मुक्ताई बनून, अद्वैत ब्रह्माचा भाष्यकार बनून दु:ख जाणिवेतून सुटका करू शकते, वेदनांमुळेच कवालोक आजवरचा अनुच्चारित उद्गार कवितेतून उच्चारू शकतात, नरक जेव्हा प्रभावी ठरेल, तेव्हा कवितेमुळेच मोक्ष प्राप्ती होईल. त्यात जीवनसन्मुख करणाऱ्या परमेश्वराच्या होकारासारखी, प्रलयानंतरच्या तळटिपेसारखी कविता असेलच असेल.
कविता ही कवयित्रीचे मौनच असते, ती निरागस असते, तिच्यात कवयित्रीचा आत्मा अडकलेला असतो आणि नरकाकडून स्वर्गसमक्षतेचा प्रवास करताना, म्हणजेच अशुभाकडून शुभाकडे जाताना तिच्याच साह्याने कवयित्री दिखाऊ सभ्यतेवर वरवंटा फिरवते आणि आदिप्रार्थनेचा घोष करते, ती अनुच्चारित सत्ये उच्चारते; ही काही आशयसूत्रे व्यक्त झाली आहेत (इथे ज्येष्ठ कवी दिलीप चित्रे यांच्या ‘कवी काय काम करतो?’ या लेखाचे स्मरण व्हावे).
इथल्या काही कल्पना किंवा संकल्पना भारतीय समाजजीवनात, तत्त्वज्ञानात रुजलेल्या आहेत. कवयित्रीने अपेक्षित अनुभव प्रक्षेपित करण्यासाठी त्यांचाच अवलंब केला आहे. पुरा-कथांशी कवितेची नाळ जोडली आहे. या कवितांमधून कवयित्रीचे आदिप्रतिमात्मक व्यक्तित्वदेखील साकारते (आणि अर्थातच प्रातिनिधिक अर्थाने कवीचेदेखील!). या दृष्टीने ‘घालमेल’, ‘सर्व हक्क राखीव’, ‘प्रलयानंतरची तळटीप’, ‘न-कथा’, ‘पिंड’, ‘मरू नये कविता’, या कविता अनुभवण्यासारख्या आहेत.
प्रस्तुत संग्रहातील या पुढील छेदकांमधून या काव्यात्म व्यक्तित्वाचा प्रवास आणखी मूलभूत / अपार्थिव प्रश्नांकडे, अनुभवांकडे होताना दिसतो.
कविता ही कवयित्रीचे मौनच असते, ती निरागस असते, तिच्यात कवयित्रीचा आत्मा अडकलेला असतो आणि नरकाकडून स्वर्गसमक्षतेचा प्रवास करताना, म्हणजेच अशुभाकडून शुभाकडे जाताना तिच्याच साह्याने कवयित्री दिखाऊ सभ्यतेवर वरवंटा फिरवते आणि आदिप्रार्थनेचा घोष करते, ती अनुच्चारित सत्ये उच्चारते; ही काही आशयसूत्रे व्यक्त झाली आहेत (इथे ज्येष्ठ कवी दिलीप चित्रे यांच्या ‘कवी काय काम करतो?’ या लेखाचे स्मरण व्हावे).
इथल्या ‘तुझ्या पायरीचा काळोख’ या छेदकात एकूण २४ कविता आहेत. या उप-शीर्षकामधील ‘तू’ म्हणजे कदाचित ईश्वर प्रतिमा असू शकेल किंवा प्रियकराची किंवा प्रिय व्यक्तीची प्रतिमा असू शकेल. त्यांच्याशी कवयित्री सतत संवाद करते आहे. त्यातून उमलून आलेल्या या कविता आहेत. त्यातून काही वेळा अमूर्त स्वरूपाचे अनुभव साकार झाले आहेत. अर्थात त्यांना विशिष्ट घटनांची पार्श्वभूमी असणारच.
इथे अद्वैत भावातून एक प्रकारचे देहाचे समर्पण होऊन सृष्टीच्या निर्मितीची सुरुवात कधी झाली असेल, असे कुतूहल व्यक्त झाले आहे. इथे कदाचित ईश्वरी प्रतिमेच्या शोधात अवघा देहच ‘उन्हं’ होऊन जातो. या काव्यगत व्यक्तित्वाला स्वत:चे जगणे एक वैराण वाळवंट असल्याचा प्रत्यय येतो. परमेश्वरी अस्तित्वाची खात्री वाटत नाही. अखेरीस ते वाळवंट आपल्याला लाभो, अशी विनवणी ते अगतिकपणे करते. पुन्हा हा अनुभव अनेकांचा असू शकतो, म्हणजेच प्रातिनिधिकही असू शकतो.
इथे पुरा-कथांमधील एखाद्या घटनेला औपरोधीक परिमाण दिले जाते (‘एखाद्यानं काळजाची वीट फेकावी / तर सोन्याचा देवच होऊन रोवून उभारावं दुसऱ्यानं’- कडेलोट – पृष्ठ ९७ ). ‘उ:शाप’ या कवितेतदेखील कवयित्रीने एका पुरा-कथेला स्वत:च्या संदर्भात वळवून अनुभव व्यक्त केला आहे. तिथला ‘तू’ देखील ईश्वर, प्रियकर किंवा एखादी प्रिय व्यक्ती असू शकेल. तिचा आधार नसल्याची जाणीव तीव्र होते आणि मग जागृती नकोशी वाटते, स्वत:च्या शापित शिळापणाचीच ओढ लागते. या छेदकामधील ‘बासरी’ ही प्रतिमात्मक आणि प्रतिकाचा वापर केलेली कविता सुंदर आहे. तिथे, बासरी आणि कृष्ण यांच्या संबंधातून पुरुषांच्या धूर्त स्वभावाचा अनुभव साकार झाला आहे.
पुन्हा एका मिथक कथेला समकालीन संदर्भ जोडून घेतला जातो. बासरीने, म्हणजेच स्त्रीने समर्पण केल्यानेच पुरुष-कर्तृत्व बहरते. बासरीमुळेच त्याच्या प्राणातून संगीत उमलते (बासरी). जगण्याचा काळोख उपसताना ईश्वर दुरावत जातो, अपार्थिव होत जातो. एक प्रकारे ‘ट्रान्स’ अवस्थेत व्यक्त केलेला हा अनुभव, सगळे नष्ट होवो, अगदी ‘एकेक करुन झडून पडो / आतल्या कविता’ या जाणिवेवर विराम पावतो (वीस आषाढ, अशा विस्फारल्या निबिडात). ईश्वर प्रतिमा अपेक्षाभंग करते, काळा विठ्ठल समस्तांचा आधार होत नाही, तर मग त्याचे देवपण का नाकारू नये, त्याचे पाषाणपण का मान्य करू नये, असा रोकडा सवाल कवयित्री विचारते. एका वेगळ्या दिशेने आपल्या संत-कवितेशी नाते सिद्ध करणारी ही कविता वैशिष्ट्यपूर्ण आहे (पाषाण).
‘बाईपणाचा काळा ठिपका’ या दुसऱ्या भागात एकूण १६ कविता आहेत. या एकूणच संग्रहातील कवितांमधून कवयित्रीने एक ‘व्यक्ती’ म्हणून जसा आपल्या अस्तित्वाचा शोध घेतला आहे, तसाच ‘स्त्री’ म्हणून असलेल्या अस्तित्वाचाही घेतलेला आहे. मात्र, या छेदकामधील कवितांमध्ये स्त्रीवादातील एका भूमिकेत अनुस्यूत असलेला पुरुषसत्ताक व्यवस्थेला दिलेला सर्वंकष नकार उमटलेला नाही, तर या ठिकाणी केवळ स्त्रीच्या वाट्याला येणाऱ्या अनुभवांना साक्षात करण्याकडे कवयित्रीचा कल आहे. त्यामुळे त्यातून खेड्यापासून नागरी वसाहतींपर्यन्त स्त्री बजावत असलेल्या वेगवेगळ्या भूमिकांमधील तिच्या कष्टप्रद अवस्थांचे करुण चित्र साकारते.
मात्र सृष्टीच्या स्तब्धतेनंतर, विनाशानंतरही पुन्हा सर्जनाची प्रक्रिया सुरूच राहणार आहे, ही लोभस, आश्वासक जाणीव देखील इथे प्रकटली आहे (जीवाश्म). अशी अनेक आशयसूत्रे या छेदकामधील कवितांमधून साकारली आहेत. त्यांना कवयित्रीच्या पार्थिव / ऐहिक, अपार्थिव अनुभवांची पार्श्वभूमी असणारच. इथल्या सगळ्याच अनुभवांचे लख्खपणे आकलन होतेच असे नाही (मात्र हे गुढानुभव नाहीत). कदाचित ते समजून घेताना आपले आकलन कमी पडू शकते, काही अनुभव तर्कातीतही असू शकतात, हे अशा वेळी नम्रपणे मान्य करावे.
मात्र, बटबटीत स्वरूपाचे अनुभव साकार करण्यापेक्षा किंवा अनुभव बटबटीतपणे व्यक्त करण्यापेक्षा वर नमूद केलेल्या अनुभवांना साक्षात करण्याकडे या कवयित्रीचा असलेला कल, ओढा वाचकांना अंतर्मुख करणारा, विचारांना प्रवृत्त करणारा आहे. शिवाय, पुढच्या छेदकातील कवितांमधून व्यक्त होणाऱ्या भावानुभवांकडे होणारा तिचा प्रवास सूचित करणारा आहे.
निसर्गाबद्दलची, अतीताबद्दलची, आध्यात्मिकतेची ओढ, आत्मनाशाची, मृत्यूची, विनाशाची असोशी; हे स्थूलमानाने रोमँटिसिझम अंतर्गतच्या काव्यप्रवृत्तींचे घटक मानले जातात. इथे रोमँटिक’ ही संकल्पना नकारात्मक अर्थाने घ्यावयाची नसते. जगण्याच्या घालमेलीत काही जीवनसत्ये धूसरपणे का होईना, एखाद्या काव्यात्म व्यक्तित्वाला गवसली, तर एका विशिष्ट टप्प्यावर त्याला मरणजाणिवेसारख्या अनुभवांचे आकर्षण वाटू लागणे शक्य आहे.
अन्य कवितांच्या चांगले-वाईटपणाचे जे काही निकष असू शकतात, त्याच निकषांच्या आधारे याही कवितांचे मूल्यमापन करता येऊ शकते. अंतिमत: एकूण कवितेत अनुभव किती उत्कटपणे, तीव्रपणे व्यक्त झाला आहे, यावर कवितेची गुणावगुणता ठरत असते. एक मात्र खरे की, काव्यात्म व्यक्तित्वाचा असा एखादा विकासाचा अटळ टप्पा असू शकतो.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
‘एक कविता दर एक मरणासाठी’ या अखेरच्या छेदकात एकूण २२ (की २३?) कवितांचा समावेश आहे. त्यामध्ये जगण्याचा हा पाषाण सर्वसामान्य माणसे आपापल्या परीने छिलित नेतात आणि आपल्या गरजा भागवतात. परंतु ज्यांना काही वेगळे करावयाचे असते ते लोक आतल्याआतच वाढत जातात, समृद्ध होत राहतात (कदाचित हे प्रतिभावंताबद्दलचे निरीक्षण असू शकते). अशा समृद्धतेला धक्का लावू नये, अशी सूचनावजा जाणीव इथे व्यक्त झाली आहे (आ. वा. अ. पत्थरावर).
सर्वसामान्य माणसे निरर्थक गोष्टी करत राहतात, ती पसारा वाढवत राहतात, त्यांना जगण्याचा सोस सुटत नाही. सारांश, जगणं हा एक भ्रम असू शकतो, अशी जाणीव कवयित्रीला या टप्प्यावर होते (सोस). पूर्वजांचा वारसा नाकारता येत नाही, व्यक्तित्वाला एक प्रकारचे थिजलेपण येते, अशी आत्मलक्षी जाणीव इथे व्यक्त झाली आहे. तिला कदाचित कवयित्रीच्या व्यक्तिगत जगण्याचे संदर्भ असू शकतील. परंतु ती मूलभूत स्वरूपाची आहे (वारसा). काव्यगत व्यक्तित्व आणि भवताल यांच्या मधल्या ताणातून प्रत्ययाला येणारा मृत्यूचा अनुभव इथे साकार होतो.
मृत्यू शाश्वत आहेच, पण कवितादेखील सनातन आहे, ती शिलालेखासारखी असते, हा विश्वास इथे प्रकटतो (एक कविता दर एक मरणासाठी). दोलकाच्या प्रतिकातून अधांतरी जगण्याचे सूचन होते. हा विनाशाचा अनुभव केवळ काव्यगत व्यक्तित्वा पुरताच सीमित राहत नाही. यात सृष्टीच्या विध्वंसाचा अनुभव असतो, त्यातून निर्माण होणारी उदासी, सामसूम एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित केली जाते (‘कोणाच्या जात्या पिढीने कोणाच्या येत्या पिढीला / हस्तांतरित केला आहे / हा उदास सामसूम ऋतू’- जळती दुपार – पृष्ठ १३२).
‘जळती दुपार’, ‘निचरा’, ‘सुसाईड नोट’ या कविता उदाहरणादाखल वाचता येतील. आपल्या निर्मितीचे स्वरूप, त्यातील जाणवलेली वैय्यर्थता आणि तिचा विनाश, असा तिहेरी भावानुभव कवयित्रीने ‘गृहीतकं’ या कवितेत साकारला आहे. ही काव्यगत जाणीव वैशिष्ट्यपूर्ण तर आहेच, परंतु अलीकडच्या काळातील एकूणच स्त्री-लिखित कवितांच्या संदर्भात ती पृथगात्म ठरावी अशी आहे. त्यातून एक प्रकारची परात्मताही ध्वनित होते.
‘कवी मेला तरी चालेल, मरू नये कविता’ हे उपशीर्षक असलेल्या पुढच्या छेदकात फक्त नऊ कविता आहेत. मात्र, कवी आणि कविता यांचे महत्त्व आणि त्यांची वैशिष्ट्यपूर्णता अधोरेखित करणारे हे छेदक आहे. या छेदकामधील कवितांमधून कविता, वेदना, मर्त्यता यांचेच मानुषीकरण केलेले आहे. कविता चक्रवर्ती बीभत्स अनंत सत्तेच्या काळात दु:खाच्या पखाली वाहून नेते
‘बुद्ध’ या दोन भागांतील कवितेत दु:खाची अनिवार्यता प्रकटली आहे. ‘बुद्ध’ या प्रतिमेलाच कवयित्रीने प्रश्न विचारला आहे. ‘जिंदगी : एक संवाद’, ‘मृत्यू : एक संवाद’ या कवितांमध्ये मृत्यू आणि जिंदगी यांचेच मानुषीकरण केले आहे. एकप्रकारे कवयित्रीने मृत्यू आणि स्वत:चे आयुष्य यांच्याकडे तटस्थपणे पाहिले आहे. इथेही परात्मतेचा, विलगतेचा भाव व्यक्त झाला आहे. मृत्यू आपल्यातले श्वापद जागे करीत असला, तरीदेखील तो आपला ‘प्रियकर’ आहे, ‘सखा’ आहे, त्यात आपल्याला सामावून जावयाचे आहे, ही मनीषा कवयित्रीने व्यक्त केली आहे. ही रोमँटिसिझमशी संवादी नाते सांगणारी जाणीवच आहे. पार्थिव / ऐहिक आणि अपार्थिव घटक यांच्या एकात्मिकरणातून, संयोगातून कवयित्रीने मूलभूत स्वरूपाचे अनुभव या छेदकात साकार केले आहेत. आणि ते निश्चितच वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब या छेदकात घडली आहे. या छेदकामधील ‘बाप’ आणि ‘आज माझा वाढदिवस’ या दोन कविता स्पष्टपणे आत्मचरित्रात्मक आहेत. आत्मचरित्रात्मक लेखन जेव्हा थेट काव्यरूपात व्यक्त केले जाते, तेव्हा त्यातून काही वेळा वाचकांना धक्का देण्याची, त्यांची सहानुभूती मिळविण्याची अपेक्षा असते. अशा वेळेस, अनुभवांना कवितारूप मिळण्याची शक्यता फारच उणावते. मात्र या कवितांमध्ये असे घडलेले नाही.
‘बाप’ या कवितेत मृत्यूला सामोरी जाणारी व्यक्ती आणि इतरेजन यांच्यामधील बदलत्या संबंधांनाच कवयित्रीने साक्षात केले आहे. ते मानवी प्रवृतींचे, संबंधांचे वेगळे दर्शन घडवणारे असल्याने वास्तवदर्शी झाले आहे. ‘आज माझा वाढदिवस’ या कवितेतील अनुभव तर तिन्ही काळात फिरणारा आहे. संबंधित प्रसंगातील कवयित्रीची भावावस्था, वडिलांची वेदनाग्रस्त स्थिती, आईची असहाय्यता, मृत्यूचे होणारे दर्शन, कवयित्रीचे सोबतच्या माणसांचे वाचन, तिला प्रत्ययाला आलेले त्यांचे खुजेपण, या अनुभवांमधून उमटणारी तिची काव्यबद्ध प्रतिक्रिया आणि भविष्यकालीन इच्छा यांचा उत्कट प्रत्यय इथे येतो. स्त्रीवादी जाणिवेचा पैलूही त्यात आहे. पण ज्या सृष्टीच्या चक्रातून आपण आलो त्या मातीतच आपला विलय व्हावा, ही प्रगल्भ जाणीवही इथे प्रकटली आहे.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
या प्रत्यक्ष आत्मचरित्रात्मक अनुभवांवर कवयित्रीने भाषेचे, शब्दकळेचे, नादाचे, लयीचे संस्कार केल्यानेच या दोन्ही कवितांमध्ये त्यांना अस्सल कवितारूप मिळाले आहे. या कवितासंग्रहामधील एकूणच काव्यानुभव वाचकाच्या मनात दीर्घकाळ रेंगाळत राहतो, नव्हे तो त्याची दीर्घकाळ सोबतच करीत राहतो. चांगल्या कवितेचेच नव्हे, तर चांगल्या साहित्यकृतीचेही हेच तर वैशिष्ट्य असते.
या संग्रहातून प्रत्ययाला येते ते असे की, इथे भावानुभवांची / आशयसूत्रांची विविधता आहे. या अनुभवांचा आविष्कार उत्स्फूर्त, एखाद्या सहजोद्गारासारखा आहे. या कवितांची शब्दकळा अनोखी आणि ताजी आहे. तिचे उपयोजन कवयित्रीच्या कवितांतर्गत स्वानुभवांचे प्रस्फुरण करणारे, आशयसूत्रांच्याद्वारे विकास साधणारे आहे. इथले प्रतिमाविश्व सर्वक्षेत्रीय आहे (इथे विस्तारभयास्तव उदाहरणे टाळली आहेत). परंतु त्यामधून या कवयित्रीला प्रतिभेची निसर्गदत्त देणगी लाभली आहे, याचाच प्रत्यय येत राहतो. नवीन शब्द तयार करण्याची त्यांची वृत्ती याचेच द्योतक आहे. प्रसंगोपात या अनुभवांना तात्विक सूत्रांचा (तत्त्वज्ञानातील कल्पनांचा), मिथक-कथा, पुरा-कथा यांचा आधार लाभलेला आहे. त्यामधून कवयित्रीच्या व्यासंगी वृत्तीचा प्रत्यय येत राहतो.
मात्र त्यामुळे कवितेच्या रूपाला बाधा पोहचत नाही. काही वेळा समकालीन तात्त्विक चर्चेतील शब्द कवितेत येतात, पण ते भावानुभवांचा अनिवार्य घटक बनूनच होत. त्यामागे कवयित्रीला अभिप्रेत असलेली वैचरिकता एकात्म झालेली असते. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, मराठीतल्या सशक्त काव्यपरंपरांशी हे अनुभव आणि त्यांच्या आविष्काराचे घटक आपले नाते प्रस्थापित करत असले, तरीदेखील कोणत्याही पूर्वसूरींच्या आशय-आविष्काराचा भार या कवितांवर जाणवत नाही.
अनुभवांची निवड, त्यांचे आविष्करण या दोन्ही पातळ्यांवर या कविता अनुक्रमे ‘स्वतंत्र’ आणि ‘स्व-तंत्र’ आहेत. त्यामधून हे काव्यात्म व्यक्तित्व चिंतनशील असल्याचा प्रत्यय येतो आणि म्हणूनच या कवितांमधून अस्तित्व, समष्टी, भवताल, मानवी संबंध, सृष्टी यांच्याविषयी आणि एकूणच जीवनाविषयीदेखील प्रगल्भ भान व्यक्त होते. ते जितके समकालीन आहे, तितकेच ते कालातीत आहे. समकालीन स्त्रीलिखित कवितांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केलेल्या, या कवितासंग्रहामधील कविता आता विकासाच्या एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचल्या असल्याचा प्रत्यय इथे निखालसपणे येतो आणि म्हणूनच सुचिता खल्लाळ यांच्या भविष्यकाळातील कवितालेखनाविषयी कुतूहल वाटत राहते.
(सदर लेखाचा पहिला खर्डा प्रथम ‘युगवाणी’च्या जानेवारी ते जून २०२३च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. इथे तो ‘युगवाणी’च्या सौजन्याने विस्तारित स्वरूपात प्रकाशित केला आहे.)
‘प्रलयानंतरची तळटीप’ - सुचिता खल्लाळ
शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर, | पाने – १७५ | मूल्य - २२५ रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment