एकविसाव्या शतकात ‘आंबेडकरी तत्त्वज्ञाना’त लिहिली जाणारी कविता कशी असेल, याचं उत्तर म्हणजे ‘बीइंग’ हा कवितासंग्रह
ग्रंथनामा - झलक
नितिन भरत वाघ
  • ‘बीइंग’ या कवितासंग्रहाचं मुखपृष्ठ
  • Tue , 08 December 2020
  • ग्रंथनामा झलक बीइंग Being विजय अशोक इंदुशोकाई Vijay Ashok Indushokai नितिन भरत वाघ Nitin Bharat Wagh नामदेव ढसाळ Namdeo Dhasal दिनकर मनवर Dinkar Manvar आंबेडकरी कविता Ambedkari Kavita दलित कविता Dalit Kavita

‘बीइंग’ हा विजय अशोक इंदुशोकाई या तरुण कवीचा पहिलावहिला कवितासंग्रह नुकताच नाशिकच्या आऱ्हान मीडियास्मिथसतर्फे प्रकाशित झाला आहे. या संग्रहाला नितिन भरत वाघ यांनी लिहिलेलं हे टिपण… या कवितासंग्रहाचं वेगळेपण अधोरेखित करणारं…

.................................................................................................................................................................

प्रत्येक समाजाच्या काही अलिखित मात्र गृहित आणि कठोरपणे पाळल्या जाणाऱ्या धारणा व संकेत असतात. त्याबद्दल कोणी बोलत नाही, तरी सार्वमतानं त्या धारणा मूकपणे यंत्रासारख्या त्या समाजाकडून पाळल्या जातात. भारतीय समाजातील जातीयता अशी मानसिक धारणा आहे, जी सगळा समाज मूकपणे पाळत असतो. जातीयतेचं हे सतत जाणवत राहणारं अस्तित्व झोंबीसारख्या समाजात वावरत असताना कसं एखाद्या त्वचारोगासाखं उभरून येतं, ते विजयच्या कविता वाचताना अधोरेखित होतं. जे नामदेव ढसाळांनी, त्याही आधी तुकारामांनी भोगलेली जीवनव्यथा नित्य आहे तशीच आहे.

थोडक्यात हा समाज काही बदलायला तयार नाही, परिणामी सडून गेलेला आहे. ही सडकी बाजू दाखवण्याचं काम दर पिढीत कोणी ना कोणी दाखवून देतं. आंबेडकरी दलित कवितेच्या एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकाच्या अंती हे काम विजय करतोय. मात्र ती केवळ दलित कविता नाही, तर एकूणच मराठी कवितेचा नवा स्वर आहे. असा स्वर जो याआधी मराठी कवितेत ऐकू आलेला नाही.

वर म्हटल्याप्रमाणे समाजात वावरताना आपापल्या अस्तित्वाचे अदृश्य आणि असह्य दबाव असतात, असे दबाव जे व्यक्तीला कडेलोटाच्या टोकावर नेऊन सोडतात. हा या तणावातून, दाबातून आणि असहायतेतून आपोआपच विद्रोहाचा आणि नकार देण्याचा स्वर आतून फुटतो. असा स्वर म्हणजे विजयने लिहिलेल्या कविता आहेत. ज्ञानातून किंवा अनुभवजन्य अनुभूतीतून आलेला हा नकार आहे. या कविता केवळ भावनावश होत, आतल्या उकळीला बाहेर फेकून देणं नाही, तर आपल्यावर होणारा अन्याय आणि भेदभाव याचं भान शिक्षणामुळे, ज्ञानामुळे आलेलं आहे. आणि या ज्ञानातून, जागत्या जाणिवेतून निर्माण झालेला हा विद्रोह आहे. त्याला जाणिवेचं जागतं भान आहे.  

.................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5249/Upare-Vishwa

.................................................................................................................................................................

भारतीय सामाजिक आणि सांस्कृतिक व्यवस्थेत भाषा हे वर्चस्ववादाचं एक प्रमुख हत्यार राहिलं आहे. या वर्चस्वाच्या राजकारणातून भाषेचं शुचितासाधन म्हणून शुद्ध-अशुद्ध अशा विकृत संकल्पना राबवल्या गेल्या. मात्र या भाषा शुचितेच्या शुद्ध-अशुद्धतेच्या विटंबनेनं बहुजन समाजातील शिकणाऱ्या मुलांचं किती अपरिमित नुकसान केलं, हे राजन गवस यांनी आपल्या एका लेखात फार सविस्तर दाखवून दिलं आहे. भाषा आपल्या परीनं भाषा असते, ती शुद्ध वा अशुद्ध असत नाही. निव्वळ सांस्कृतिक वर्चस्ववादासाठी हे शुद्ध-अशुद्धतेचे खेळ आहेत. एखादी भाषा शुद्ध किंवा अशुद्ध ठरवण्याचा अधिकार कुणाचा असतो?

भाषा ही काय एका समूहानं, एका जातीनं निर्माण केलेली नसते, तर ती संपूर्ण समाजाच्या प्रयत्नांचा आविष्कार असतो. कोणत्याच भाषेवर कोणीच पूर्ण हक्क सांगू शकत नाही. मात्र भाषेवर असा हक्क सांगण्याचा प्रकार भारतीय समाजात झालेला आहे. साडेतीन टक्के समूह वगळता समाजातल्या जवळजवळ सगळ्यांना संस्कृत भाषा ऐकण्याचा, शिकण्याचा अधिकार काढून घेतलेला होता.

आता जी भाषा ज्या लोकांना शिकण्याचा आणि ऐकण्याचा अधिकारच नव्हता, तर ती भाषा त्या न शिकणाऱ्या, न ऐकणाऱ्या लोकांच्या भाषेची मातृभाषा कशी असेल? तरी संस्कृतला भारतीय भाषांची जननी म्हणून लादलं गेलं आहे. काय संबंध आहे?

तर इथं संबंध येतो सांस्कृतिक भाषेच्या राजकारणाचा. या सांस्कृतिक वर्चस्वाला सर्वांत आधी आव्हान दिलं ज्ञानेश्वरांनी. आपली भाषा कशी असावी, हा अधिकार ज्याचा त्याचा असतो. माझी भाषा मी ठरवणार. माझं ज्ञान माझ्या भाषेत मांडणार. माझं म्हणणं माझ्या भाषेत मांडणार.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा प्रमाणभाषा आणि अभिव्यक्तीची भाषा या दोन स्वतंत्र आणि भिन्न बाबी आहेत. शास्त्रीय परिभाषा एकवाक्यतेसाठी आवश्यकच असते, यात दुमत नाही. विषयांची माहिती, ज्ञानव्यवस्था यासाठी प्रमाणभाषेचा आग्रह धरला पाहिजे. पण एखाद्याचं बोलणं किंवा अभिव्यक्त होणं हे शुद्ध-अशुद्ध म्हणू नये.

या शुद्ध-अशुद्धतेच्या नियमावलींना फाट्यावर मारत, भाषेची सशक्त मोडतोड करत, भाषेचा संकर करत विजयने आपली भाषा निर्माण केली आहे. प्रमाणभाषेचा वापर नाही म्हणून प्रमाणव्याकरण न वापरता आपल्या कवितेच्या भाषेचं संकरीत व्याकरण विजयच्या कवितेत आहे. ते मुळातच प्रमाणव्याकरणात नसल्यानं कुणाला या कवितांमध्ये व्याकरणिकदृष्टीनं भरपूर चुका वाटू शकतात. मात्र वर म्हटल्याप्रमाणे आपल्या भाषिक अभिव्यक्तीसाठी निर्माण केलेलं संकरित व्याकरण विजयने निर्माण केलेलं आहे. हे इथं स्पष्ट करण्याची गरज आहे. या कवितांमधले अनेक अहिराणी, गुर्जर भाषेतील शब्द बहुतेक प्रथमच मराठीत येत आहेत.

ज्ञानाची सगळी कवाडं ओलांडूनसुद्धा त्वचेसारखी चिकटलेली जात सोलून काढता येत नाही. तसंच ज्ञानाचा आणि जातीचा काहीच संबंध नसतो, या वास्तवाला मांडणारं पटल या कवितांमध्ये आहे.

नामदेव ढसाळांच्या कवितेमुळे ‘दलित कविते’ला एक स्पष्ट व थेट आकाश आणि अवकाश प्राप्त झालं. मात्र ढसाळांच्या कवितांची सावली एव्हढी प्रखर आणि गडद होती की, त्या सावलीच्या बाहेर ‘दलित कविता’ निघूच शकली नाही. या सावलीच्या बाहेर पडण्याची शक्यता आणि क्षमता विजयच्या कवितांमध्ये आहे. आपल्या अस्तित्वाच्या बाहेर पडू पाहणारी खरी ‘आंबेडकरी कविता’ लिहिली ती दिनकर मनवर यांनी. नामदेव ढसाळ आणि त्यांच्या प्रभावात लिहिलेली कविता पूर्णपणे आंबेडकरी कविता नव्हती.

ढसाळांची कविता खूप नंतर आंबेडकरी झाली. आंबेडकरी कविता म्हणजे ज्यात आंबेडकर आणि बुद्ध आहेत ती कविता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ज्ञानाआधारे समाजपरिवर्तनाची जाणीव आणि त्या प्रयत्नांना मार्गदर्शन करणारी बुद्धाची सम्यक विवेकाची जाणीव, अशा दोन जाणिवांनी ‘आंबेडकरी कविता’ निर्माण होते.

ढसाळांच्या कवितेत बुद्ध जाणीव प्रकटली ती ‘या सत्त्तेत जीव रमत नाही’ या संग्रहानंतर, त्याआधी त्यांची कविता मार्क्स आणि डाव्या विचारांच्या परिघातली होती. दिनकर मनवर यांची कविता मात्र अगदी सुरुवातीपासूनच अस्सल आंबेडकरी कविता आहे. बुद्ध तत्त्वज्ञानाच्या आविष्काराशिवाय आंबेडकरी कविता असू शकत नाही. आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानात मार्क्स असू शकत नाही. ‘बुद्ध की कार्ल मार्क्स’ या प्रश्नाचं उत्तर बाबासाहेबांनी फार स्पष्टपणे देऊन ठेवलं आहे. बुद्धांच्या दु:खमुक्तीच्या तत्त्वज्ञानाला कवेत घेतल्यावरच बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचा, जीवनदृष्टीचा विचार पूर्ण होतो. दिनकर मनवर यांच्या कवितेमध्ये ही जीवनदृष्टी आणि तत्त्वज्ञान पूर्ण रूपानं दिसून येते.

तर विजयच्या कवितेत या तत्त्वज्ञानाच्या प्राथमिक शक्यता पूर्णांशानं दिसतात. दु:खमुक्तीच्या दिशेनं जाण्याआधी दु:ख आहे हे समजणं, जाणवणं आवश्यक असतं. या दु:खाची समज या कवितांमध्ये आहे. हे दु:ख जाणवतं जातवास्तवाच्या अंगानं. जातवास्तव सुटत नाही किंवा बदलत नाही. हे जातनिहाय भेदभावात जाणवतं. या जाणवण्याला भाषेची मोडतोड करत नियम झुगारून देत, स्वत:ची नवी भाषा निर्माण करत विजय कवितेत उतरवतो.

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

एकूण परिपक्व कविता विजयने लिहिली आहे. एका बैठकीत वाचण्यासारखा हा संग्रह नाही. पुरेसा वेळ दिल्याशिवाय आणि बैठक मारल्याशिवाय या कविता हाती लागत नाहीत. केवळ दलित-आंबेडकरी जाणिवेच्या कविता म्हणून त्यांच्याकडे बघता येत नाही.

इथं मला विलास सारंग यांची फार आठवण येतेय, कारण ज्या पद्धतीनं भाषा या कवितांमध्ये मोडलेली आहे, ती सारंगांना खूप आवडली असती.

दुसरा मुद्दा आंतरसंहितात्मता : विजयच्या कवितांमधली आंतरसंहितात्मता क्लिष्ट आहे. अनेक विषयांतले संदर्भ या कवितांमध्ये येतात. इतकी गुंतागुंतीची कविता मराठी साहित्यव्यवस्था कशी स्वीकारते, हे आता पाहायचं आहे.

एकविसाव्या शतकात आंबेडकरी तत्त्वज्ञानात लिहिली जाणारी कविता कशी असेल, याचं उत्तर म्हणजे ‘बीइंग’ हा कवितासंग्रह.

.................................................................................................................................................................

बीइंग – विजय अशोक इंदुशोकाई, आऱ्हान मीडियास्मिथस, नाशिक, पाने – २२२ (हार्डबाऊंड), मूल्य - ३६० रुपये

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5250/Being

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......