अजूनकाही
शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते विजय यशवंत विल्हेकर यांचे ‘फकिरीचे वैभव’ हे आत्मकथन लवकरच मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. त्यातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश...
..................................................................................................................................................................
सहा-सात महिन्यांनी पुन्हा मुंबईला जायचा प्रसंग आला. आमच्या नगरातील विधवा काकू. तिला बाहेरूनच कळले की, मी मुंबईला जाणार आहे. तिनं मला घरी बोलावलं. तिची आतील गोष्ट सांगितली. तिची तरुण मुलगी परिवाराच्या दारिद्रयाला सावरण्यासाठी मुंबईला पळून गेली होती. तिने मला लेकरू म्हणून विश्वासात घेतले. मुलीला परत आणण्याचा आग्रह करायला लागली. पुरावा म्हणून तिने पाठवलेल्या मनिऑर्डरच्या पावत्या होत्या. ती प्रत्येक महिन्याला, पंधरवड्यात आईला आवर्जून पैसे पाठवायची. तरुण मुलीच्या जाण्याने बाई खंगून गेली होती. तिच्या खंगलेपणामुळे भारून जाऊन मी आगाऊपणाने, ‘तू काहीच काळजी करू नको. मी तिला कोणत्याही परिस्थितीत परत आणतो’ असा नेहमीच्या स्वभावाप्रमाणे आगाऊ विश्वास दिला. तिचा फोटो घेतला. निघालो.
या कामात गुन्हेगार, शूटर मित्राची बरी मदत होईल, अशी आशा मनात दडून होती; पण त्याच्या भेटीची अनिश्चितता अस्वस्थ करत होती. मुंबई रेल्वेत बसलो. पोहोचलो. मूळ कार्यक्रम आटोपून या कामाला लागलो. ज्या परिसरातील डाकघरामधून मनिऑर्डर आली होती, तो परिसर वेश्या व्यवसायाचा होता. इथं पन्नास हजार स्त्रिया देहविक्रयाचा व्यवसाय करत होत्या. या क्षेत्राला रात्रीच दिवस निघायचा. नटलेल्या मुलींनी रात्र उजाडलेली असे. मी साध्या मनाने मुलीचा फोटो घेऊन, स्त्रीशोधाच्या नादात चौफेर फिरत होतो. प्रत्येक ठिकाणी हिडीस-फिडीस व्हायची, नवं तरुण गिऱ्हाईक आलं समजून. कामुक छेडछाड करायचे. मग आपण ‘बहेनजी’ म्हणून आपली येण्याबाबतची भूमिका मांडायचो. ‘बहेनजी, मैं गाँव के माँ के जवान लडकी को ढूँढने आया हूँ. मेरे आने का मकसद निराला है. मुझे आपकी मदत की बहोत जरूरत है.’
असं म्हटलं की, त्या दूर सरायच्या; पण त्यांचा या परिक्षेत्रात ‘बहीण’ म्हणून कधी उल्लेखच होत नसावा. त्या कारणाने माझ्या बहीण म्हणण्याचा परिणाम साधायचा. एका केरळी तरुणीने मला एकांतात नेले. तिच्या मातृभाषेबरोबरीनेच तिचे मराठी भाषेवर प्रभुत्व होते. ती माझी समजूत काढत होती. अशा संशोधनासाठी रात्रीची वेळ अत्यंत चुकीची आहे. धंद्याच्या धकाधकीत तुमची कुणीच दखल घेणार नाही. आपण दुपारी एक-दीड वाजता आला की, मी मदत करीन, असं आश्वासित करून परत पाठवलं.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki
..................................................................................................................................................................
दुसऱ्या दिवशी न चुकता अगदी वेळेवर पोहोचलो. वस्तीतील खाणाखुणा आदल्या दिवशीच माहीत होऊन गेल्या होत्या. या क्षेत्राबद्दल कथा, कविता, कादंबऱ्यांमधून खूप वाचलं होतं; पण लैंगिकतेच्या विश्वव्यापाराचे प्रत्यक्ष दर्शन मनाला कमालीचे अस्वस्थ करून गेले होते. ‘हा खरा अस्वस्थ तरुणींचा उद्ध्वस्त वर्तमान होता.’ किती मुली, कोणकोणत्या प्रदेशातल्या, किती बोली, भाषा, धर्म, जातींचा एकत्र मेळ. विविधतेत एकता इथं दिसत होती. मुंबईत फिरताना एक क्षण असा नाही गेला की, गुन्हेगार शूटर मित्राची आठवण आली नसेल. त्याच्याशी साम्य साधणारा चेहरा दिसला की, क्षणभर थबकायचो. परवा त्याच्या झोपडपट्टीत चक्कर मारून आलो होतो. त्याचा पत्ताच नव्हता. तो असता तर संशोधनाला आगळी गती आली असती. कदाचित या धंद्यांच्या डॉनच्याच भेटीला नेले असते. तिथूनच चौकशी सूत्रं हलवली असती. काहीच इलाज नव्हता. फोनाफोनीचं तंत्रज्ञान विकसित व्हायचं होतं.
गल्ल्याबोळांतून ठरल्याप्रमाणे ठिय्यावर पोहोचलो. मदत करणारी एकदिवसीय मैत्रीण वाटच पाहत होती. एकदम साध्या पेहरावात शुभ्र पांढरी साडी नीटनेटकी घातलेली. डोक्याला तिच्या देवाचे पांढरे गंध लावलेली. एखाद्या घरंदाज कुटुंबातील सुज्ञ, सालस, सोज्ज्वळ गृहिणीसारखी माझ्या पुढ्यात उभी होती. सावळ्या देहाभोवती गुंडाळलेली पांढरी साडी. डोक्यावर पदर. ती खूपच उठून दिसत होती. तिचे आकर्षक डोळे, आतल्या माणसाने वाचावेत असेच होते. तिच्या डोळ्यांतील पाणावलेपणात सुप्त वेदनेचे प्रतिबिंब स्पष्ट झळकताना दिसत होते. चालत आम्ही तिच्या खाजगीतल्या खोलीतील सोप्यात बसून बोलत होतो. मी मुलीची पूर्वपीठिका विशद केली. वडील वारलेल्या परिवाराची जबाबदारी, कधीच मोलमजुरीला न गेलेल्या आईवर आली. बारक्या चिल्यापिल्यांचा परिवार - एकटी कुठे पुरेल म्हणून घरातील मोठी मुलगी रोजगाराच्या शोधात मुंबईत आली आणि मी तिला शोधायला आलो. मी तिला फोटो दाखवला. तिने बारकाईने न्याहाळला. ओळखत किंवा पाहिलं नसल्याची प्रतिक्रिया डोळ्यांनीच दिली. कधी आली, किती वर्षं झाले, याच डाकक्षेत्रामधून आलेल्या मनिऑर्डर फॉर्मचा कानोसा घेतला. काहीतरी अचानक सुचल्यासारखं जाणवून उभी झाली.
‘चला, आपण एका भागात जाऊन येऊ’ म्हणत आम्ही बाहेर निघालो. कामुक नजरांची आक्रमणं झेलत, आम्ही त्या वस्तीतून वाट काढत निघालो. थोडं चालत आल्यावर चौकात ऑटो केला. थोडं दूर गेल्यावर ऑटो थांबला. ‘आपण कुण्या तरुणीच्या शोधात आलो, असं कुणालाच सांगू नका’ असा गंभीर सूतोवाच दिला, ‘त्यामुळे तुमच्या जीवाला धोका संभवतो.’ चालत वस्तीत गेलो. तिने ‘देहविक्रय स्त्रियांचे प्रबंधकार’ म्हणून परिचय करून दिलेला. उद्ध्वस्त स्त्रीप्रश्नावर अभ्यास करणारे, वगैरे... तिचं परिचयसूत्र सुरूच होतं. तिच्या कल्पकतेचं खूपच कौतुक वाटलं. आपण मराठी वाङ्मयाच्या विद्यार्थिनीसोबत फिरत असल्याचा भास होत होता. चहूकडच्या नजरचाचणीत आम्हाला ती गवसली नाही. फिरताफिरता खूप वेळ झाला.
..................................................................................................................................................................
हेही वाचा : ...आणि आणीबाणी लादण्यासारखे भयंकर पाऊल इंदिराजींनी उचलले!
..................................................................................................................................................................
जिला शोधायला आलो ती सापडली नाही; पण जिव्हारी लागणारं सत्य बाहेर आलं. बहुतेक चौकशीतल्या तरुण मुली, शेतकरी परिवारांतून आल्या होत्या. शेतीदारिद्रयाला कंटाळून, होरपळून, बापाचे ओझे हलके करावे म्हणून त्यांनी हा वेदनामय मार्ग स्वीकारला होता. मातीवर जीव लावणाऱ्या जिवांची झालेली ही माती उघड्या डोळ्यांनी पाहवत नव्हती. वेदनांचे असंख्य डंख जिवाला होत होते. या वस्तुस्थितीनं माझे मन पोखरून निघाले होते. आता परत फिरणे आवश्यक होते. परत निघालो.
परतीत मैत्रिणीची शिक्षण व इतरबाबत चौकशी केली. कला विभागातील पदवीधर वडिलांची खेड्यात शेती. चार बहिणी, एक भाऊ असा परिवार. भाऊ सर्वांत लहान. ‘सर्व बहिणी माझ्यापाठच्या. सर्व लग्नाला आलेल्या. वडिलांची श्रमधावपळ न पाहिलेलीच बरी. त्यांच्यापेक्षा आईची खूपच ओढाताण होती. वडील चिडले, की मोठी म्हणून आई माझ्यावरच चिडायची. एक दिवस खूप राग आला. रागाच्या भरात गाव सोडून निघाले. असा राग कोणालाच येऊ नये. आईवडिलांच्या अत्यंत प्रेमापोटी वाटणाऱ्या रागाने व माझ्या नशिबाने मला या मुंबईत आणले.’
हे सांगताना ती जुन्या स्मृतीत बुडाली होती. आतून बाहेरून गदगदली होती. मी तिच्या डोक्या-पाठीवरून सांत्वन हात फिरवला. दोन दिवसांच्या भेटीत आम्ही जन्मोजन्मीचे सवंगडी वाटत होतो. मुक्कामाचे ठिकाण आले. तिने चहा-जेवणाचा आग्रह केला. अत्यंत प्रेमपूर्वक आग्रह नाकारला. तिने ओल्या डोळ्यांनी निरोप दिला. त्या मैत्रिणीच्या भेटीनं, तिचे विदारक जीवनविषयक अनुभव ऐकून, माझी संवेदनक्षमता आणखी वाढली.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
शोधमोहिमेत शूटर मित्र असता तर त्यांनी या क्षेत्रातील किती खतरनाक अनुभव सांगितले असते. मोहिमेतील त्याची कमतरता, अनुपस्थिती सतत जाणवत होती. धावपळ करत मुक्काम गाठला. मुक्कामाचे जुनी-नवी वृत्तपत्रं बॅगेत भरली. परत प्रवासाला निघालो. रेल्वे धरली. रेल्वेत पडता पडता जुने वृत्तपत्र चाळत होतो. त्यात धक्कादायक बातमी नजरेत पडली. ज्याची प्रत्येक क्षणाला आठवण होत होती, त्या आमच्या शूटर मित्राच्या फोटोसह त्याच्या खुनाची बातमी होती. बातमी वाचून खूपच हळहळ वाटली. आत चर्रऽ झालं. सख्खा मित्र गेल्याची सल झाली. क्षणभर असं वाटलं की, आपल्या भेटीमुळे त्याची संघर्षक्षमता खालावल्याने तर त्याचा खून झाला नसेल? असा अपराधबोध आयुष्यभर मनाला चाटत राहला. हा मित्र नसण्याची आजही तितकीच सल आहे.
अशा मातीतील जीवांची माती झालेली पाहिली, की आपल्याही जिवाची माती होते. विठ्ठल वाघ सरांच्या शब्दांत सांगता येईल -
मातीला पडती प्रश्न, प्रश्नाला उत्तर नाही
पोसून जगाला अवघ्या, राहते उपाशी आई!
..................................................................................................................................................................
फकिरीचे वैभव’ या आत्मकथनाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5222/Fakiriche-Vaibhav
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment