अजूनकाही
श्रीनिवास विनायक कुलकर्णी हे मराठीतले एक अदभुत म्हणावेत असे ललितलेखक आहेत. ‘डोह’, ‘सोन्याचा पिंपळ’, ‘पाण्याचे पंख’ आणि ‘कोरडी भिक्षा’ अशी अवघी चार पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. त्यांच्या १९६५ साली प्रकाशित झालेल्या ‘डोह’ या पुस्तकाला २०१५ साली ५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने ‘डोह : एक आकलन’ हे एक निर्मितीमूल्यांपासून लेखनापर्यंत अतिउत्तम दर्जा असलेले नवेकोरे पुस्तक नुकतेच मौज प्रकाशन गृहाने प्रकाशित केले आहे. या पुस्तकाचे संपादन विजया चौधरी यांनी केले आहे. त्यांनी लिहिलेल्या दीर्घ प्रस्तावनेचा हा संपादित अंश...
सोबत या पुस्तकाचे मुखपृष्ठ व मांडणीकार चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी, या पुस्तकाची मूळ कल्पना सुचवणारे मराठीतील एक ज्येष्ठ लेखक भारत सासणे आणि श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांची व्हिडिओ मुलाखत...
श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या ‘डोह’ या ललित लेखसंग्रहाची पहिली आवृत्ती ऑगस्ट १९६५मध्ये प्रकाशित झाली. अल्पावधीतच या पुस्तकाने मराठी साहित्यातील जाणकार रसिकांचे लक्ष वेधून घेतले. मराठी लघुनिबंधाच्या क्षेत्रात रूढ परंपरेपेक्षा काहीतरी वेगळे, नवे व अपूर्व घडले आहे, याची नोंद साहित्यजगताने लगेचच घेतली. साहित्याबद्दल आस्था असणाऱ्या आणि साहित्याकडे विवेचक दृष्टीने पाहणाऱ्या सर्वांनाच या पुस्तकाने पर्दापणातच आकर्षित केले.
पहिल्या १९६५च्या आवृत्तीपासूनच ते आजपर्यंत या पुस्तकाच्या नऊ आवृत्त्या प्रकाशित झाल्या. या पुस्तकाला २०१५मध्ये पन्नास वर्षे पूर्ण झाली. सतत पन्नासहून अधिक वर्षे, एखाद्या ललित लेखांच्या संग्रहाला रसिक व जाणकार वाचकांचा लोभ मिळत राहणे, ही मराठी साहित्यविश्वातील अभिनव घटना आहे, याबद्दल दुमत नसावे.
कुठल्याही साहित्यकृतीचे मोल हे साहित्यबाह्य निकषांवर नव्हे तर साहित्यांतर्गत कलामूल्यांवर ठरत असते. त्या दृष्टीनेही ‘डोह’ समृद्ध ठरले असे म्हणता येईल. कारण पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर लगेचच ‘डोह’ला वृत्तपत्रे, नियतकालिके यांतून समीक्षकांची दाद मिळायला सुरुवात झाली. प्रा. वा.ल. कुलकर्णी, डॉ. सरोजिनी वैद्य, डॉ. आनंद यादव इत्यादी नामवंत समीक्षकांनी ‘डोह’चे मूल्यमापन करून त्यातील सौंदर्यस्थळाचा परिचय सामान्य वाचकांना करून दिला. आशयाची अदभुतता, अनुभवाची समृद्धी, आशय व अभिव्यक्ती यांतील अभिन्नता, तरल व काव्यात्म लेखन, समृद्ध भाषावैभव अशा अनेक निकषांवर ‘डोह’ने आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले.
पूर्वीची सांकेतिकता मोडीत काढून ‘डोह’ने ललित निबंध या साहित्यप्रकाराला नवी परिमाणे प्राप्त करून दिली असे सर्वच समीक्षकांचे मत होते. आजही लघुनिबंध या साहित्यप्रकाराविषयीचे कोणतेही साक्षेपी लेखन ‘डोह’चा उल्लेख झाल्याशिवाय पूर्ण होत नाही, हे आपण जाणतोच!
एखादे पुस्तक जेव्हा सतत पन्नास वर्षांहून अधिक काळ चर्चेत राहते, तेव्हा त्यामागील कारणांचा शोध घेणे अनिवार्य ठरते. असा शोध घेताना, समीक्षकांनी मांडलेली मते तसेच त्यांनी केलेले साहित्यकृतीचे मूल्यमापन, साहित्याच्या अभ्यासकांना मार्गदर्शक ठरत असते. त्या विशिष्ट लेखकाच्या संपूर्ण साहित्याचा अभ्यास करण्यासाठी, तसेच त्या लेखकाच्या साहित्याचे व लेखकाचेही वाङ्मयेतिहासाच्या दृष्टिकोनातून असलेले स्थान निश्चित करण्यासाठी, समीक्षकांनी केलेले विश्लेषण आधारभूत ठरत असते. याच कारणाने ‘डोह’वर आलेल्या व उपलब्ध झालेल्या परीक्षणे\समीक्षालेखांचे संपादन करून अभ्यासकांना ते एकत्रितपणे उपलब्ध करून द्यावेत असे वाटले.
‘डोह’ या पुस्तकावर लिहिले गेलेले लेख संकलित करत असताना श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या इतर पुस्तकांवरील लेखांसह आणखी काही लेखन हाती लागले. ‘डोह’नंतर त्यांचे ‘सोन्याचा पिंपळ’, ‘पाण्याचे पंख’ व ‘कोरडी भिक्षा’ असे तीन ललित लेखसंग्रह प्रसिद्ध झाले. त्याविषयीचे लेख तसेच श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्याविषयी इतरांनी लिहिलेले लेख आणि श्रीनिवास यांनी स्वत:बद्दल लिहिले\बोललेले लेखन उपलब्ध झाले. हे सर्वच लेख एकत्रितपणे संकलित केले, तर ‘डोह’मधील लेखांची निर्मितीप्रक्रिया व त्यामागे असलेल्या लेखकाच्या निर्मितीप्रेरणा, लेखकाची जडणघडण आणि तिचा त्यांच्या लेखनावरील प्रभाव, लेखकाची इतर पुस्तके आणि ‘डोह’ यांतील आंतरबंधाचा शोध असा एक समग्र अभ्यास शक्य होईल असे वाटले.
याच हेतूने, हे सर्वच लेखन या पुस्तकात समाविष्ट करायचे ठरवले. लेखांच्या स्वरूपानुसार व आशयानुसार त्यांचे पाच विभाग केले. १) ‘डोह’वर आलेली परीक्षणे व लेख, २) ‘डोह’सह त्यांच्या इतर पुस्तकांवरील लेख, ३) श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्याबद्दलचे लेख, ४) श्रीनिवास यांचे स्वत:चे लेख\भाषणे, ५) ‘डोह’संबंधी महत्त्वाच्या नोंदी\टिपणे असे ते विभाग होत.
अनुभवाचे व्यापकपण, अनुभवाशी असलेली अविचल निष्ठा, बालानुभवाचे अनोखे चित्रण, वास्तवालाच अदभुतता देण्याची क्षमता, सौंदर्यशाली, सर्जनशील निर्मिती, शब्द आणि अर्थ यांची सायुज्यता अशा अनेक पातळ्यांवर ‘डोह’ने परमोच्च आविष्काराचे गाठलेले शिखर अजून तरी अनुल्ल्यंघ राहिले आहे.
‘डोह’मध्ये निसर्ग, निरागसता, कोमलता, तरल, काव्यात्म प्रकृती यांची बालभावाशी घातलेली सांगड इतकी अजोड आहे की, त्याचे अनुकरण आजपर्यंत तरी होऊ शकलेले नाही. कलाकृतीच्या वाचनानंतर वाचकाला येणारे वैश्विक भान आणि वाचकाला होणारी मुक्त, निखळ व हेतुनिरपेक्ष आनंदाची प्राप्ती हे जर उत्तम कलाकृतीचे गमक असेल तर ‘डोह’ने ते साध्य केले आहे.
साहित्यप्रवाहात, वाचकांच्या मनात आणि अभ्यासकांच्या नजरेत पन्नासहून अधिक वर्षे ‘डोह’ने आपले स्थान अबाधित राखले आहे. त्यामुळेच, एक वाङ्मयीन घटना म्हणून स्थानांकित करून ‘डोह’ला मराठी वाङ्मयाच्या इतिहासात अढळपद मिळायला हवे.
.............................................................................................................................................
डोह : एक आकलन - संपादक : विजया चौधरी
मौज प्रकाशन गृह, मुंबई, मूल्य - ६०० रुपये.
.............................................................................................................................................
.............................................................................................................................................
चंद्रमोहन कुलकर्णी
‘डोह : एक आकलन’ या ग्रंथांचं मुखपृष्ठ करण्यासंबंधी प्रकाशकांनी मला विचारलं, तेव्हा नवीन चित्रं काढायचं नाही, मला असं तत्क्षणीच मनापासून वाटलं, पण तरी मी प्रकाशकांना म्हणालो, ‘बघतो, विचार करतो आणि कळवतो.’
‘डोह’ची माझ्या मनातली प्रतिमा पद्माताई सहस्रबुद्ध्यांनी काढलेल्या चित्रांसहित आहे. ‘डोह’पासून ती प्रतिमा वेगळी करून ते पुस्तक निदान मी तरी हातात घेऊ शकत नाही, वाचू शकत नाही. तेव्हा, मूळचं चित्र बदलून मुखपृष्ठासाठी नवीन चित्र काढण्याचा मी विचार करूच शकत नव्हतो. मुळात, पद्माताईंनी आधी काढलेल्या चित्राच्या ऐवजी तिथं माझं चित्र असणार, ही कल्पनाच मी करू शकत नव्हतो. ‘डोह’साठी चित्रकार म्हणून मी काय चित्रं काढली असती, असा वेगळा विचार मी आत्तापर्यंत केलेलाच नव्हता! करून पाहिला तर झेपेना. म्हणजे, त्या मुखपृष्ठाच्या आणि आतमधल्या चित्रांनी माझ्या मनाचा एक कोपरा व्यापला होता, तो, वाचक म्हणून. माझ्यातला वाचक मला नवीन चित्रं काढायची परवानगी देत नव्हता.
आहे तेच चित्रं वापरण्याचा निर्णय मी घेतला. दोन काळ जोडून घेण्यासाठी, अक्षर मात्र नव्या पद्धतीचं वाटेल, असं केलं. पाठवलं.
पण त्यामुळे पुस्तकाची फक्त नवी आवृत्ती वाटेल की काय, असं प्रकाशकांना आणि नंतर मलाही वाटायला लागलं.
प्रकाशक म्हणाले, नवीन काढून बघा, तुम्हीच!
मी विचार केला, पण मला स्वत:कडून परवानगी मिळेना!
मग पद्माताईंनीच पुस्तकात आतमध्ये काढलेल्या चित्रांमधली दोन-तीन चित्रं घेऊन, जणू पद्माबाईंनीच नव्यानं चित्रं काढलंय, असा भास निर्माण होईल, असं त्यांचं ‘फ्युजन’ केलं.
कमर्शियल आर्टमध्येही कामाचा प्लेझर असतोच की!
(२२ फेब्रुवारी २०२०ची फेसबुक पोस्ट)
.............................................................................................................................................
भारत सासणे
‘डोह’ला पंचावन्न वर्षं झाली. त्या निमित्ताने मराठी भाषा किती आरस्पानी, मुलायम-मखमली, स्वच्छ आणि पारदर्शक होऊ शकते, हे कदाचित पहिल्यांदाच मराठी साहित्याने पाहिले असावे! काळजाचे कप्पे असतात असे म्हणतात, त्यातील काही कप्पे विशेष असतात. समस्त मराठी रसिकांच्या, दिग्गज समीक्षकांच्या, भाषा-अभ्यासकांच्या आणि वाचकांच्या काळजाच्या कप्प्यात ‘डोह’ हे पुस्तक कधी जाऊन पोहोचले हे कुणाच्या सहज लक्षात आले नाही, मात्र पन्नास वर्षांच्या दीर्घ अशा कालावधीमध्ये अनेक मान्यवरांनी विविध नियतकालिकांतून, मासिके व साप्ताहिकांतून ‘डोह’वर विपुल असे मौलिक लिखाण केले. दिग्गजांना ‘डोह’वर असे लिहावेसे वाटले यातच या पुस्तकाचे महत्त्व अधोरेखित होते. मराठी ललित लेखनाचा ‘डोह’ हा अद्भुत असा टप्पा आहे!
मागील पन्नास वर्षांत विविध नियतकालिकांमधून ‘डोह’वर आलेले ते विखुरलेले लेख कष्टपूर्वक संकलित करून त्याचे आकलन सिद्ध करण्याचा विजया चौधरी यांचा प्रयास प्रशंसनीय आहे, उपकारकही आहे. ‘यक्षघरा’ला जाण्याची वाट श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना सापडली आहे आणि त्या वाटेचा नकाशा त्यांनी ‘डोह’ या पुस्तकात जागोजागी सूचित केला आहे. माझ्यासहीत अनेकांना अजून या यक्षघराची वाट सापडलेली नाही. ती सापडेपर्यंत सर्वांसाठी या पुस्तकाचे वाचन अपरिहार्य होऊन जाते…
(‘डोह : एक आकलन’च्या ब्लर्बवरून)
.............................................................................................................................................
‘डोह : एक आकलन’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5179/Doh-Ek-Akalan
.............................................................................................................................................
‘डोह’कार श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांची रविवार, ५ जानेवारी २०२० रोजी प्रिया जामकर यांनी स्वा. सावरकर अध्यासन केंद्र, डेक्कन जिमखाना, पुणे येथे सविस्तर मुलाखत घेतली. त्या मुलाखतीचा हा व्हिडिओ.
भाग पहिला
भाग दुसरा
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment