खाद्यसंस्कृतीच्या एखाद्या गाढ्या अभ्यासकाने हा विषय जसा हाताळला असता, त्यापेक्षा टिकेकरांची हाताळणी अगदी सहज, सुलभ आणि गोष्टीवेल्हाळ आहे.
ग्रंथनामा - झलक
सुहास कुलकर्णी
  • अरुण टिकेकर आणि ‘इति-आदि’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 07 February 2020
  • ग्रंथनामा Granthnama झलक इति-आदि ITI-AADI अरुण टिकेकर Arun Tikekar

‘इति-आदि : दैनंदिन चीजवस्तूंचा उगमापासून आजपर्यंतचा कुतूहलजनक प्रवास’ हे ‘लोकसत्ता’चे माजी संपादक अरुण टिकेकर यांचं पुस्तक नुकतंच रोहन प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाला पत्रकार, संपादक सुहास कुलकर्णी यांनी लिहिलेली ही प्रस्तावना...

.............................................................................................................................................

अरुण टिकेकरांची वीस-बावीस मराठी पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. एखादा अपवाद वगळता बहुतेक पुस्तकं १९९० नंतर प्रकाशित झाली आहेत. पुस्तकांचे विषय, समतोल विचार आणि लिखाणाची शैली यांमुळे त्यांची पुस्तकं मी तेव्हापासून हमखास मिळवत आलो आणि वाचत आलो. पुढे त्यांच्याशी ओळखपाळख झाली आणि त्यांचं वाचन, ग्रंथप्रेम, ग्रंथसंग्रह यांचा जवळून अनुभव घेता आला. गेल्या दहा-पंधरा वर्षांत ओळखीचं रूपांतर स्नेहात होत गेलं आणि ते काय लिहिताहेत, त्यांचं कोणतं पुस्तक कोण प्रकाशित करतंय, डोक्यात कोणते विषय आहेत वगैरे चर्चांचा मी भाग बनत गेलो.

२०१५ मध्ये त्यांचं `कालांतर’ हे पुस्तक प्रकाशित झालं. त्याच्यापाठोपाठ ‘इति-आदि’ हे पुस्तक प्रकाशित व्हायचं ठरलं होतं. शिवाय मराठी समाजाच्या वैचारिक पीछेहाटीविषयी लिहायचंही त्यांच्या मनात होतं. त्यादृष्टीने त्यांनी दोन-तीन लेख २०१५ च्या दिवाळी अंकांमध्ये लिहिलेही होते. परंतु अचानक १९ जानेवारी २०१६ रोजी टिकेकर गेल्यामुळे त्यांच्या आगामी पुस्तक प्रकल्पांना पूर्णविराम मिळाला. पण ‘इति-आदि’ लिहून पूर्ण झालेलं असल्याने हे पुस्तक आता वाचकांसमोर येत आहे.

या पुस्तकाला लेखकाचं मनोगत नाही. ते लिहिण्याआधीच टिकेकरांचं निधन झाल्याने प्रकाशक प्रदीप चंपानेरकर यांनी ही जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. खरं पाहता या पुस्तकाचा विषय माझ्या अभ्यासाचा नाही; कुतूहलाचा मात्र आहे. समकालीन राजकारण व गेल्या दोन शतकांतील महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास हा माझ्या आवडीचा विषय. टिकेकरांचा व माझा एकत्र संवादाचा विषयही. परंतु तरीही प्रदीप चंपानेरकरांनी ही जबाबदारी माझ्यावर सोपवली, याचं कारण माझा टिकेकरांशी असलेला स्नेह हेच असणार. त्यांचा स्नेह आणि स्मृती मनात ठेवूनच ही प्रस्तावना लिहीत आहे.

‘इति-आदि’ या पुस्तकात आपल्या खाद्यसंस्कृतीचा आणि घरगुती वापरातील वस्तूंच्या इतिहासाचा धांडोळा घेण्यात आला आहे. हा विषय टिकेकरांच्या अकॅडमिक अभ्यासाशी संबंधित नाही. ते प्राय: मुंबई शहराच्या इतिहासाचे प्रतिष्ठाप्राप्त तज्ज्ञ. शिवाय महाराष्ट्राच्या प्रबोधनपर्वाचे ख्यातकर्त अभ्यासक. पण टिकेकरांचा वाचन-वावर इतक्या विविध क्षेत्रांत होता की, ते एकाच वेळेस अनेक विषय वाचू शकत आणि त्यावर लिहू शकत. तरीही खाद्य संस्कृतीचा इतिहास हा खासच वेगळा विषय. पण गंमत म्हणजे टिकेकर कुतुहलाचा भाग म्हणून या विषयात शिरले असणार आणि त्यात केलेल्या मुशाफिरीतून लिहिते झाले असणार. कदाचित खाद्य-पेयापासून पेहरावापर्यंत आणि अन्न-वस्त्र-निवाऱ्यांपासून चित्रपट-नाटक-वाङमयादी कलांपर्यंतच्या बाबींना पारंपरिक इतिहास-लेखनाच्या साधनांमध्ये स्थान नसल्याने त्यांनी या बाबींचा शोध घेण्याचा विचार केला असावा. कदाचित काहीतरी वेगळं लिहावं या इच्छेतून ते या विषयात उतरले असण्याची शक्यताही आहेच. काही असो; खाद्यसंस्कृतीच्या एखाद्या गाढ्या अभ्यासकाने हा विषय जसा हाताळला असता, त्यापेक्षा टिकेकरांची हाताळणी अगदी सहज, सुलभ आणि गोष्टीवेल्हाळ आहे. त्यामुळे त्यांच्या मुशाफिरीत आपण वाचकही सामील होतो आणि त्यांच्यासोबतच खाद्यसंस्कृतीच्या विविध अंगांचा आस्वाद घेऊ लागतो.

वाचक या मजकुरात गुंततो याला काही कारणं आहेत. एकतर टिकेकरांची रसाळ, गोमटी भाषा. त्यांच्या लिखाणाला गेल्या दोनशे वर्षांतील भाषासौंदर्याचा सुगंध आहे. त्यांच्या लेखनाला जुन्या पिढीने कमावलेलं सौष्ठव आहे. इतकी चांगली भाषा हल्ली कुठे वाचायला मिळते? मिळालीच तर त्यात क्लिष्टता, पंडिती जडपणा आणि अभिजात उग्रता असते. पण टिकेकरांच्या या लिखाणात नितांतसुंदर सहजता आहे. हा विषय लिहिण्याचा आनंद ते स्वत: घेत असल्याचं हा मजकूर वाचताना वाटत राहतं. त्यामुळेच त्यांच्यासोबत आपणही या आनंदात सहभागी होऊ शकतो. ‘माझ्या वाचनात मला ज्या अजबगजब गोष्टी कळल्या त्या तुम्हाला सांगतो’, असा या लेखनाचा बाज आहे. त्यामुळे वाक्यागणिक नवनवी माहिती आपल्याला कळत जाते आणि आपण या सुग्रास माहितीचा आस्वाद घेऊ लागतो. दुसरी गोष्ट म्हणजे, टिकेकरांचं वाचन बहुविद्याशाखीय असल्यामुळे त्यांचं लेखन आपल्याला समृद्ध करत जातं. इतिहास, भूगोल, साहित्य, भाषाशास्त्र, समाजशास्त्र, व्युत्पत्तीशास्त्र, मानववंशशास्त्र अशा कितीतरी अभ्यासशाखांतील संबद्ध माहिती ते आपल्याला उलगडून देतात. त्याशिवाय वैद्यक, उद्योग-व्यापार, आहारशास्त्र वगैरेंमधील आवश्यक संदर्भही पुरवतात. त्यामुळे त्यांचं बोट धरून चालताना मौज तर येतेच, शिवाय लहान मुलं आजी-आजोबांकडून गोष्ट ऐकताना ‘आणखी सांगा, आणखी सांगा’ असं म्हणतात, तसंही म्हणावंसं वाटतं. टिकेकरही त्यात्या विषयातील गमतीशीर, चमकदार आणि चमत्कृतीपूर्ण माहिती सांगत जातात. या माहितीमुळे आपण या पुस्तकात रमत जातो.

या पुस्तकात रमण्याचं आणखी एक कारण म्हणजे टिकेकरांची मानवी जीवनाविषयीची आतुरता आणि आत्मीयता. मानवी जीवन कसकसं उलगडत गेलं आणि समृद्ध होत गेलं, नाना खाद्यपदार्थ आणि जीवनोपयोगी घरगुती वस्तूंतून ते कसं दिसतं, याचा उलगडा हे पुस्तक वाचताना होतो. विविध धान्य-भाज्या-फळं-पदार्थ-पक्वान्न आणि सुई-आरसा-मच्छरदाणी-पंखा-कात्री-दागिने-भांडीकुंडी अशा जीवनोपयोगी वस्तू यांचा माणसाच्या इतिहासाशी आणि त्याच्या अलीकडच्या विकासाशी असलेला संबंध टिकेकर आपल्याला जोडून दाखवतात. आपल्या हल्लीच्या दैनंदिन जगण्यात सवयीच्या बनलेल्या चीजवस्तू आपल्या जगण्यात’ कोणत्या काळात आल्या, जगाच्या कोणत्या संस्कृतीतून कोणामार्फत आपल्यापर्यंत पोहोचल्या, या वस्तूंचे उल्लेख आपल्या प्राचीन साहित्यात कुठे सापडतात, कोणत्या वस्तू किंवा कोणती खाद्यं कोणत्या प्रांतांमध्ये केव्हापासून स्थापित आहेत आणि कोणते पदार्थ कोणत्या वस्तूपासून कसकसे बनत नि बदलत गेले असं बरंच काही टिकेकर सांगत जातात. हे सर्व सांगताना जन-महाजन-अभिजन या श्रेणींच्या सामाजिक-सांस्कृतिक सवयींचा आणि त्यांच्या प्रतिष्ठेच्या कल्पनांचा धागा ते जोडून दाखवतात. शिवाय कशाकशाबद्दलच्या लोकसमजुती, लोकविभ्रम, लोकसंकेत, दंतकथा, उक्त-म्हणी असंही जाता जाता सांगतात. या सर्व माहितीच्या भांडारात आपण शिरत जातो आणि प्रसंगी हरवतही जातो. वाचताना ही माहिती आपल्याला गुंगवून टाकते खरी, पण ती विविध विद्या शाखांतून मिळवलेली असल्याने एकाच वाचनात ही सर्व माहिती आपल्या मेंदूत साठवणं अवघड होऊन बसतं.

आपल्याला अचंबित करणारी ही माहिती त्यांनी कुठून कुठून मिळवली आहे, हे ते लिहिता लिहिताच सांगतात. त्यातून त्यांच्या चौफेर वाचनाचा आवाका आपल्याला कळतो. त्यांच्या लिखाणात विश्वरकोश, संस्कृतिकोश या एतद्देशीय कोशांप्रमाणेच इंग्रजी भाषेतील जुन्या-नव्या अनेक कोशांचा उल्लेख येतो. ‘फिलॉसॉफिकल अँड पोलिटिकल हिस्टरी ऑफ सेटलमेंट अँड ट्रेड ऑफ युरोपियन्स’पासून ‘इंग्लिश थ्रू द एजेस’ अशा एरवी आपल्याला माहीत नसलेल्या अनेक ग्रंथांचा ते सहज उल्लेख करतात. त्याशिवाय नाना इतिहासकार, संशोधक, ब्रिटिश अधिकारी, संत, ह्यू-एन-त्संगसारखे प्रवासी, तत्त्वज्ञ यांच्याही साक्षी देतात. महानुभावांपासून बौद्धवाङ्ममयापर्यंत आणि ‘भोजनकुतुहलम’, ‘मानसोल्लास’, ‘तांबुलपुराण’, ‘काव्येतिहास’ संग्रहापासून कुणाकुणाच्या चरित्र, आत्मचरित्र आणि दप्तरनोंदींपर्यंत अनेक ठिकाणांहून एखाद्या मधमाशीप्रमाणे ते मधु-माहिती गोळा करून आणतात आणि त्यावर सुयोग्य प्रक्रिया करून आपल्यासमोर ठेवतात. आपल्या वाचनाचा, अभ्यासाचा आणि व्यासंगाचा कोणताही अडथळा ते वाचकाला येऊ देत नाहीत, हेही त्यांच्या येथील लिखाणाचं वैशिष्ट्य म्हणायला हवं. त्यांचं विवेचन आस्वादक असल्याने वाचक अडखळत नाही, त्यांच्यासोबत विहरत राहतो. मोठा आवाका असलेला लेखकच ही गोष्ट साध्य करू शकतो, हे सांगणे न लगे.

या पुस्तकातील सर्वच लेख वाचनीय असले, तरी खाद्यसंस्कृतीचा धांडोळा घेणारे लेख मला विशेष आनंद देऊन गेले. माणसाचं जीवन अन्नाच्या शोधार्थ घडत नि बदलत गेलेलं असल्याने अन्नपदार्थांना मानवी संस्कृतीत महत्त्वाचं स्थान असणं स्वाभाविक आहे. त्यामुळे माणसाचं आर्थिक, सामाजिक, भौतिक आणि धार्मिक जीवनही अन्नपदार्थांनी प्रभावित झालेलं असणार. गेल्या पन्नास-साठ वर्षांत खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासाकडे गांभीर्याने पाहिलं जाऊ लागल्याने याबाबत अधिक प्रकाश पडू लागला आहे. त्यातून नवनव्या गोष्टी वाचकांसमोर येऊ लागल्या आहेत. आपल्याकडे उपवासाला धार्मिकदृष्ट्या मोठं महत्त्व आहे. या उपवासात खाल्ल्या जाणाऱ्या. पदार्थांवर नजर टाकली, तर नव्याने उपलब्ध होणाऱ्या  माहितीतून अनेक गमती कळू लागल्याचं लक्षात येतं. उदाहरणार्थ, महाराष्ट्रीय संस्कृतीत उपवासात चालणाऱ्या आणि न चालणाऱ्या  पदार्थांची विभागणी झालेली आहे. त्यानुसार साबुदाणा, बटाटा वगैरेंपासून बनलेले पदार्थ उपवासाला चालतात, पण नेहमी आहारात असणारे पोहे आणि उपमा मात्र उपवासाला चालत नाही. यात दोन गमती दडलेल्या आहेत. पहिली म्हणजे बटाटा आणि साबुदाणा (जो टॅपिओका नावाच्या वनस्पतीपासून बनतो) हे मूळ भारतीय उपज नाहीत. बटाटा दूर दक्षिण अमेरिकेतून जगभर पसरला आणि साबुदाणाही दक्षिण अमेरिकेतून पोर्तुगीज आणि स्पॅनिश लोकांमार्फत आशियात पोहोचला. याचा अर्थ, परदेशी लोकांनी भारतात आणलेल्या पदार्थांना आपल्याकडे उपवासाच्या जिनसांचा मान मिळाला आणि पोहे-उपमा या ‘आपल्या’ पदार्थांना मात्र वर्ज्य मानलं गेलं. दुसरं म्हणजे भारतातच काही प्रांतांमध्ये उपवासात चालणाऱ्या पदार्थांमध्ये पोह्यांचा मात्र समावेश होतो म्हणे. असं का, याला अनेक कारणं असणार. खाद्यसंस्कृतीच्या (आणि त्यामुळे मानवी संस्कृतीच्या) इतिहासात अशा हजारो विसंगतींचा भरणा आहे. त्यांतील काहींचा उलगडा या पुस्तकात झाला आहे.

टिकेकरांनी पुस्तकात सांगितलेल्या अशा काही गोष्टींचा उल्लेख इथे केल्याशिवाय राहवत नाही. त्यातून या पुस्तकात कोणत्या प्रकारची रंजक माहिती आणि ज्ञानात भर टाकणारी निरीक्षण वाचायला मिळणार आहे, याचा वाचकांना अंदाज येईल. आपल्या कोकणातील हापूस आणि पायरी या दोन आंब्याच्या जातींच्या नावामागचं रहस्य अनेकांना माहीत असेल. ‘हापूस’ हा ‘अल्फान्सो’ आणि ‘पायरी’ हा ‘पेरेस’ या पोर्तुगीज अधिकाऱ्यांच्या नावाचा अपभ्रंश आहे. या आंब्यांना मुळात कोणत्यातरी नावाने ओळखलं जात असेलच. पण आता त्यांची मूळ नावं मागे पडून नवी पण अपभ्रंशित नावंच प्रचलित झाली आहेत. अशा चीजवस्तूंची नावं कशी पडली, कशी घडली, का आणि कुठे बदलली याचा टिकेकर पुस्तकभर वेध घेतात. उदा. आंबा हा शब्द मूळ संस्कृतातून आलेला आहे, हे आपल्याला माहीत आहे. पण ‘मँगो’ हा शब्द कुठून आला, हे माहिती आहे का? आंब्याला तमिळ भाषेत ‘मान-गाय’ म्हटलं जातं. या शब्दाचं इंग्रजांनी ‘मँगो’ केलं.

सीताफळाबद्दलचा खुलासाही मजेशीर आहे. रावण सीतेला आकाशातून पळवून नेताना तिच्या डोळ्यांतून जे अश्रुबिंदू पडत गेले, त्याचे फळवृक्ष झाले आणि त्याचा माग काढत राम लंकेपर्यंत पोहोचला, असं मानलं जातं. या मान्यतेतूनच या फळाला नाव दिलं गेलं-सीताफळ. सीताफळाशिवाय त्या जातीच्या अन्य फळांना रामफळ, हनुमानफळ, शिवफळ अशी नावंही दिली गेली. प्रत्यक्षात हा दंतकथेतून निर्माण झालेला लोकविभ्रम आहे, असं टिकेकरांनी म्हटलंय. सीताफळ हे मूळ शीतफळ असणार, कारण ते शीत ऋतूत येतं, असा तर्क त्यांनी मांडलाय. सीताफळाबद्दल आणखी दोन गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत. एक म्हणजे, सीताफळ आपल्याकडे सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी आणलं असं आताआतापर्यंत मानलं जात होतं. पण थायहर (इसपूर्व दुसरं शतक) आणि कर्नाटकातील काकतीय (बारावं शतक) या दोन मंदिरांवरील शिल्पांत सीताफळाची शिल्पं असल्याचं ताजं संशोधन टिकेकरांनी नोंदवलं आहे. दुसरी गंमत म्हणजे, सीताफळ हे वरपांगी खडबडीत, अनाकर्षक आणि डोंगरदऱ्यात मिळणारं फळ असल्याने त्याला पूर्वी अभिजन-महाजन हात लावत नसत. पण त्याचे गुण कळू लागल्यानंतर श्रीमंतही ते खाऊ लागले आणि त्यामुळे त्याची किंमत सामान्यांना परवडेनाशी झाली. फळागणिक, धान्यागणिक आणि पदार्थागणिक अशा अनेक गंमती आणि डोळे उघडणारी माहिती या पुस्तकात ठासून भरली आहे.

काळ्या मिरीला संस्कृतमध्ये पिप्पली म्हणतात. या पिप्पलीवरून इंग्रजीत पेप्पर हा शब्द आला असं सांगतानाच टिकेकर आणखी एक माहिती सहजपणे देतात. पेप्पर ही चीज भारताने पश्चिमेला दिलेली असली तरी ‘आपली’च वाटणारी मिरची म्हणजे रेड पेप्पर मात्र पश्चिमेने जगाला दिली आहे! मिरचीची पहिली नोंद मध्य अमेरिकेत इसपूर्व ५००० वर्षांपूर्वीची आहे, असं टिकेकरांनी म्हटलं आहे. केळी हे फळ आणि त्यापासून बनणारं शिकरण हे पक्वान्न आता घरोघरी अवतरत असलं तरी पुण्यात पेशव्यांच्या काळापर्यंत केळ्याचं प्रस्थ नव्हतं, अशी नोंद टिकेकरांनी केलीय. केळं हे फळ इस पूर्व २००० वर्षांपूर्वी मलेशिया वगैरे दक्षिण-पूर्व आशियातून भारतात आलं आणि देशात अनेक ठिकाणी पिकू लागलं, तरी कोकणात आणि देशावर केळी पिकवण्यास योग्य हवामान नसल्याने पेशवाईपर्यंत इथे केळी पिकत नसत, असं त्यांचं म्हणणं आहे. केळ्याचं विजयनगरच्या साम्राज्यात प्रस्थ होतं आणि तिकडे उत्तरेत बादशहा जहांगीरला वेलची केळी आवडत, असंही त्यांनी नोंदवलं आहे. केळीचं इंग्रजी नाव ‘बनाना’ आहे. पण हे नाव अरबांनी ठेवलं आहे म्हणे. कारण अरबीत बोटाला ‘बनान्’ म्हणतात आणि केळी अरबांना बोटांसारखी दिसली!

टिकेकरांनी लिहिलेल्या या पुस्तकात वैविध्यही आहे, सुपारी कातरणाऱ्या उपकरणाला आपण अडकित्ता म्हणतो. पण का म्हणतो? कारण आपल्या शेजारच्या कर्नाटकात सुपारीला अडक म्हणतात, आणि अडक कापतो तो अडकित्ता, असं नामकरण कन्नड भाषिकांनी केलं आहे. तो शब्द जसाच्या तसा आपण तिकडून उचलला आहे. पण याचा अर्थ सुपारी फोडणाऱ्या उपकरणाला मराठीत स्वत:चं असं नावच नाही! पूर्वी आपल्याकडे त्यालापोफळ-फोडणं’ असं म्हटलं जात असे. पण नंतर हे नाव जणू विरूनच गेलं. जिलबी या पक्वान्नाबद्दलही सांगायलाच हवं. जिलबी हा पदार्थ पर्शियातून अरेबियामार्गे आपल्याकडे आला, असं म्हटलं जातं. जिलेबिल, जिलिबी, झिलबी असे त्याचे पाठभेद आहेत. आपल्याकडे सोळाव्या शतकातील एका संस्कृत हस्तलिखितातही `जलेबी’ आणि तिचं संस्कृत नाव `जलवल्लीका’ यांचाउल्लेख सापडतो. कोण कुठली अरबस्थानातून आलेली जिलबी, पण ती आता आपल्या सण-उत्सवांच्या ‘सेलिब्रेशन’चा अविभाज्य भाग बनून गेली आहे!

टिकेकरांनी ज्या अनेक शब्दांचा माग या पुस्तकात काढला आहे, त्यांतील चौरस आहाराबद्दलची माहिती मोठी रंजक आहे. चौरस आहार हा शब्द चार रसांना जागृत करणारा आहार अशा अर्थांनी आपल्याकडे वापरला जातो. पण चौरस शब्दाचा चार रसांशी काही संबंध नाही, असं टिकेकर आपल्याला सांगतात. आपल्याकडे चार रस नव्हे; तर सहा रस गृहित धरलेले आहेत, असा बारकावा ते आपल्या लक्षात आणून देतात आणि चौरस आहार हा शब्द आपला नसून ‘स्क्वेअर मील’चा तो अनुवाद आहे, असं नोंदवतात. पूर्वी जहाजांवरचे नाविक एका चौकोनी लाकडी थाळीतून जेवण करत त्यावरून स्क्वेअर मील हा शब्द तयार झाला असल्याचा जो अंदाज वर्तवला जातो, त्याकडे टिकेकर निर्देश करतात. शिवाय आणखी एक शक्यतेकडे ते लक्ष वेधतात. अमेरिकन सैनिकांना जेवताना ताठ बसण्याची सक्त असे. त्यामुळे त्यांचं सामूहिक बसणं चौरस आकाराचं दिसत असल्याने त्यांच्या जेवणाला ‘स्क्वेअर मील’ म्हणत असत, अशीही उत्पत्ती टिकेकरांनी सांगितली आहे. त्याचप्रमाणे हँडग्रेनेड (म्हणजे हातबाँब) हा शब्दही फ्रेंच लोकांना ‘पोमोग्रेनेट’ (म्हणजे डाळिंब) या शब्दावरून सुचल्याचं इतिहासकार मानतात, असं टिकेकरांनी नोंदवलं आहे. अशी कितीतरी रोचक माहिती या पुस्तकात आहे. ती वाचून वाचकांची उत्सुकता चाळवेल आणि वाचक टिकेकरांच्या या पुस्तकाचा आस्वाद घ्यायला उत्सुक होतील, अशी आशा वाटते.

शेवटी एकच. हे पुस्तक वाचत असताना आता टिकेकर आपल्यात नाहीत याची जाणीव सतत चुटपूट लावून जाते. त्यांच्या तब्येतीने त्यांचा साथ दिली असती तर वाचकांना समृद्ध करणारं लेखन ते करत राहिले असते, असं वाटत राहतं. आपल्याकडे एकेका विद्याशाखेत आणि त्यातही एकेका विषयात तज्ज्ञता मिळवण्याची पद्धत पडली आहे. त्यामुळे लेखक, अभ्यासक, संशोधक आपापल्या क्षेत्रापुरता अभ्यास करताना व त्या अनुषंगाने लिहिताना दिसतात. टिकेकरांचे स्वतःच्या अभ्यासाचे विषय होते, पण त्यांना इतर अनेक विद्याशाखांमध्ये आणि विषयांमध्ये रस होता. हे पुस्तक त्याचं ठळक उदाहरण आहे. अध्यापन, पत्रकारिता, संपादन, दुर्मीळ पुस्तकांचं जतन, प्रबोधन, संस्थात्मक जबाबदाऱ्या वगैरे भूमिकांमध्ये ते आयुष्यभर गुंतलेले असूनही विविध विषयांमध्ये मुशाफिरी करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. कदाचित अशा विषयांच्या वाचनात व लेखनात विरंगुळा शोधण्याचाही त्यांचा प्रयत्न असेल. हा विरंगुळा त्यांना आनंददायी ठरत होता, असं हे पुस्तक वाचत असताना लक्षात येतं. हे सुख त्यांना अधिक काळ लाभतं तर वाचकही समृद्ध होत गेले असते, असं त्यामुळेच वाटत राहतं.

पण ते होणं नव्हतं. असो.

.............................................................................................................................................

‘इति-आदि’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5195/Iti-Ityadi

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......