अजूनकाही
सामाजिक कार्यकर्ते सुरेश सावंत यांचे ‘गुंता आणि उकल’ हे पुस्तक उद्या मुंबईत समारंभपूर्वक प्रकाशित होत आहे. अक्षर प्रकाशनातर्फे प्रकाशित होत असलेल्या या पुस्तकातील हा एक लेख...
.............................................................................................................................................
या पुस्तकाला लिहिलेल्या ‘पूर्वकथना’त सुरेश सावंत म्हणतात -
मी मुळात एक सामाजिक-राजकीय कार्यकर्ता आहे. लेखन हे आनुषंगिक आहे. सामाजिक-राजकीय कामात परिस्थितीच्या मापनाचे-भूमिकांचे जे प्रश्न वा पेच सामोरे येतात, ते फार काळ तसेच ठेवणे शक्य नसते. लोक त्याबद्दल मत विचारत असतात. लोकांनी नाही विचारले तरी त्यांनी काय करावे, कसा विचार करावा, हे सांगणे कार्यकर्त्याचे काम असते. सगळेच कळले असेल असे नाही. पण जेवढे कळले तेवढे सांगणे, पुढे आणखी कळले की त्यात भर घालणे, समजा चुकले तर ते दुरुस्त करणे ही नित्य प्रक्रिया असावी लागते. या पुस्तकातील लेख हे या प्रकारचे आहेत. त्या त्या वेळच्या प्रश्नांची, समजाच्या गुंत्याची माझ्या आकलनाच्या मर्यादेत केलेली ती उकल आहे. उकल करण्याचा हाच प्रकार बरोबर वा त्यातून पुढे आलेली दिशा हीच एकमेव आहे, असा दावा अर्थातच माझा नाही. काही नवे आयाम नंतर लक्षात येतात. त्यातून आधीच्या मांडणीचा विकास होतो. या पुस्तकात एकाच विषयावरील दोन किंवा तीन लेखही आहेत. ते याच गरजेतून लिहिलेले आहेत.
.............................................................................................................................................
“पत्रकारांनी तटस्थ असले पाहिजे. त्यांनी कोणत्याही भूमिकेचे, विचारसरणीचे बांधील असू नये. त्यांनी नेहमी न्यायाची बाजू घ्यायला हवी. त्यांनी पक्षपाती असता कामा नये.” -एक नामांकित संपादक. एका पत्रकारितेतील पुरस्कार समारंभात बोलत होते.
“कार्यकर्त्यांनी नेहमी मन खुले ठेवले पाहिजे. विचारांची झापडं लावता कामा नयेत. वैचारिक गुलामगिरीच्या आजच्या माहोलात आपले स्वातंत्र्य प्राणपणाने जपले पाहिजे.” - एक ज्येष्ठ कार्यकर्ते. एकेकाळी चळवळीतून आलेले. आता फंडिंग एजन्सीच्या एनजीओ नेटवर्कमधील एक ‘पार्टनर’. याच नेटवर्कच्या मूल्यांकन बैठकीत बोलत होते. या बैठकीच्या मेलवरील इतिवृत्तात ही चौकट मला वाचायला मिळाली.
“माझी कोणतीही भूमिका नाही. मी कोणत्याही हेतूने लेखन करत नाही. जे विचार मनात येतात ते कल्पनाशक्ती व सर्जनशीलतेच्या आधारे शब्दबद्ध करतो. एका कादंबरीत एक विचार मांडला असेल, तर दुसऱ्या कादंबरीत त्याच्या विरोधीही विचार असू शकतो. माझं लिखाण हे केवळ साहित्यमूल्यांची जोपासना करणारं असतं. ठरावीक विचारसरणीतून लिहिलेलं साहित्य काळाच्या कसोटीवरही टिकत नाही. आपल्याकडील साहित्यिक वैचारिकतेत वाहत जातात. अशा प्रचारकी साहित्याला मूलभूत साहित्य म्हणता येत नाही.” - सुप्रसिद्ध ज्येष्ठ कन्नड साहित्यिक भैरप्पा. १० एप्रिलच्या ‘लोकसत्ते’तील त्यांच्या सविस्तर मुलाखतीतील ही विधाने.
अशा महनीय मंडळींचं हे म्हणणं ऐकलं, वाचलं की सामान्य श्रोते, कार्यकर्ते, वाचक यांच्यावर एक संस्कार व्हायची दाट शक्यता असते; तो म्हणजे, माणसाला भूमिका असू नये. त्याला कोणती विचारसरणी असू नये. त्या त्या वेळी जे मनाला पटेल-भावेल त्याप्रमाणे वागावे.
मला हे मान्य नाही. या तिघांशीही मी सहमत नाही. माणसाला भूमिका, बाजू, विचारसरणी असायला हवी, या मताचा मी आहे, हे आधीच नोंदवतो. माझ्या या मताच्या विरोधी कोणी असेल तर त्याचाही मी आदर करतो. मी लोकशाही, विचारस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे त्याचे मला पटत नसले तरी त्याच्या मताचे, ते व्यक्त करण्याच्या त्याच्या अधिकाराचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे; हेही मला कबूल आहे.
पण असे म्हणणारी मंडळी स्वतः भूमिकारहित आहेत, असे मला वाटत नाही. त्यांची म्हणून एक भूमिका असते. तीच ते मांडत असतात. मात्र त्यातून ऐकणाऱ्यांचा बुद्धिभेद करतात. पर्यायाने त्यांची फसवणूक करतात. ती नकळत, अजाणतेपणी असू शकते हा संशयाचा फायदा त्यांना द्यायला मी तयार आहे. पण फसवणूक होते ही वस्तुस्थिती आहे.
कशी होते ही फसवणूक?
आधी एक लक्षात घ्यायला हवे की, माणसाचे मन कोरे वगैरे काही नसते. ज्ञानेंद्रियांद्वारा ज्या संवेदना, अनुभव त्याला मिळत असतात, त्यांच्या विश्लेषणातून तो काही सूत्र काढत असतो. अशा सूत्राच्या साहाय्याने तो पुढील अनुभवांचा अर्थ लावतो. यातून त्याचे सूत्र विकसित होत राहते. लहान मूल आकर्षणापोटी मेणबत्तीच्या ज्वाळेत हात घालते. चटका लागला की, हात झटकन मागे घेते. अशा वारंवार येणाऱ्या अनुभवातून आगीत हात घातला की, चटका लागतो हे त्याच्या समजाचे सूत्र तयार होते. वडीलधारी मंडळी त्याला असे करण्यापासून रोखत असतात, हाही अनुभव या सूत्र तयार होण्याच्या प्रक्रियेत त्याच्या गाठीशी असतो. त्यातूनच ‘आगीत हात घातला की, चटका बसतो. म्हणून आगीपासून दूर राहावे’ हे शहाणपण, विचारसूत्र, भूमिका त्याच्या मनात तयार होते; किंवा वडीलधाऱ्यांनी आधीच तयार केलेले हे शहाणपण, ही भूमिका स्वानुभवातून आता त्याचीही होते.
हे विचारसूत्र, भूमिका वस्तुनिष्ठ आहे. जगाच्या पाठीवर कोठेही, कोणत्याही समाजात, कोणत्याही काळी आगीत हात घातला की चटका बसणारच. एखाद्याचा हात बधिर असेल तर चटका जाणवणार नाही, पण आगीत जास्त काळ ठेवला तर भाजणार हे नक्की.
ज्याला आपण वैचारिक सूत्र, भूमिका, विचारसरणी म्हणतो त्यांचे तसे नसते. म्हणजे ‘आग व चटका’ इतके वस्तुनिष्ठ नसते. उदाहरणादाखल विचारसरणी विरोधकांच्या हल्ल्याचे सर्वसाधारणपणे मुख्य लक्ष्य असलेले ‘समाजवाद’ हे विचारसूत्र घेऊ. मानवेतिहासाच्या टोळी, गुलामी, सरंजामी, भांडवली या टप्प्यांनंतर येणारी ती अवस्था आहे. त्या अवस्थेत उत्पादन साधनांची मालकी खासगी न राहता समाजाची होईल. उत्पादन नफ्यासाठी न होता गरजेसाठी होईल. प्रत्येक जण आपल्या कुवतीनुसार काम करेल व त्याला गरजेइतके मिळेल. उपजीविकेच्या साधनांची अशाश्वतता नष्ट होईल. माणसाचे माणूसपण संपन्न करणे, हे या व्यवस्थेचे प्रयोजन असेल. ...इ. इ.
इथे टोळी, गुलामी, सरंजामी, भांडवली इथपर्यंतच्या टप्प्यांबाबत गणिती एकमत नसले तरी जवळपास सहमती आहे. समाजवादाचे विरोधकही या टप्प्यांना तसे नाकारताना दिसत नाहीत. तो घडून गेलेला इतिहासही आहे. तो तसा घडलाच नाही हे म्हणण्याची फारशी सोय नाही. त्यांचे मत भांडवलशाहीच्या आजच्या मापनाविषयी वेगळे असते. भांडवलशाहीनंतर समाजवाद वगैरे काही अवस्था असेल हे त्यांना मान्य नसते. माणसाची मूळ प्रेरणा वैयक्तिक नफा हीच असल्याने, सामुदायिक मालकी वगैरे काही अस्तित्वात येणेच शक्य नाही; असे त्यांचे म्हणणे असते.
असे का होते?
सामाजिक व्यवहारात अनेक हितसंबंध असतात. त्यांच्या दिशेचा अंदाज बांधणेच आपल्या हाती असते. त्यासाठी भूतकाळातील घटनांचा उपयोग होतो. तत्कालीन सामाजिक हितसंबंधांच्या अंतर्विरोधातून समाज कसा बदलत आला, त्याचा अभ्यास या बदलांच्या व गतीच्या भविष्यातील दिशा सूचित करतो. या मापनात मनुष्य म्हणून मापनाचे प्रामाणिक फरक पडतात. तसेच कोण कोणत्या हितसंबंधांचा वाहक आहे, त्यावरूनही त्याच्या इच्छेचा प्रभाव त्याच्या मापनावर पडत असतो.
त्यामुळे वैचारिक विचारसूत्र वस्तुनिष्ठ नसते. या विचारसूत्रांची मांडणी, चर्चा, त्याआधारे व्यवहार, चळवळी (सामाजिक-सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय इ.), त्यांचे मूल्यांकन, त्यातून चळवळीची व मांडणीची फेरआखणी अशा क्रमातूनच ही विचारसूत्रे सिद्ध होत असतात. हा काळ दीर्घ असतो. दरम्यान बरेच चढउतार असतात. अशा वेळी भूमिकांच्या अनंत छटा प्रकटणे अगदी स्वाभाविक आहे.
पण त्या छटा भूमिकांच्या; भूमिका नसण्याच्या नव्हे. ‘आमची काही भूमिका नाही’ हीही एका भूमिकेचीच छटा असते. प्रचलित भूमिकांच्या ठळक वर्गवारीत कदाचित ती नसेल. त्या अर्थाने ती त्यातील एखाद्या वर्गवारीला बांधलेली नसेल. कदाचित एकाच वेळी अनेक वर्गवाऱ्यांतील विविध छटा धारण करत असेल. पण म्हणून ती भूमिका नाही असे असू शकत नाही. माणसाच्या विचारप्रक्रियेच्या नैसर्गिक रचनेत भूमिका नसणे बसू शकते असे मला वाटत नाही.
‘पत्रकारांनी तटस्थ असले पाहिजे’ असे म्हणताना सध्याच्या ठळक विचारसरणींपैकी, एखादीला बांधून घेऊ नये असे वक्त्याला म्हणायचे असते. कारण पत्रकारांनी ‘न्यायाची बाजू’ घ्यावी असा जो पुढचा सल्ला वक्ता देतो, त्यात ‘न्यायाची बाजू कोणती’ ही भूमिका आहे. मुंबईतील गिरण्यांच्या जमिनीची विभागणी करताना एकतृतीयांश जमीन गिरणी कामगारांच्या घरांसाठी दिली जाईल हे ठरले. तथापि, नंतर एकतृतीयांश म्हणजे गिरणीचा आजचा सांगाडा सोडून उरलेल्या जमिनीच्या एकतृतीयांश असा अर्थ लावण्याची चलाखी सरकारकडून केली गेली. अशा वेळी पत्रकारांनी न्यायाची बाजू घ्यायची याचा अर्थ या चलाखीविरोधी उभे राहायला हवे व ते आपल्या माध्यमांतून पुढे आणायला हवे. त्याचा पाठपुरावा करायला हवा. (काही अपवाद वगळता सर्वच पत्रकारांनी वा त्यांच्या मालक माध्यमांनी ही न्यायाची भूमिका घेतली असा अनुभव नाही. इथे नाही तसा कष्टकऱ्यांच्या इतर अनेक न्याय्य लढ्यांतही नाही.) एकदा न्यायाची बाजू ठरली की, पक्षपात हा आलाच. मग ‘पक्षपाती असू नये’ हा वक्त्याचा सल्ला विसंगत ठरतो. पक्षपात निरपेक्ष असावा, स्वतःचा स्वार्थ लक्षात घेऊन नसावा, ज्याच्यावर खरोखर अन्याय होतो आहे, त्याच्या बाजूने असावा असे त्यांनी म्हणायला हवे. ‘छोटी धरणे की मोठी धरणे’ याबाबत पत्रकार-संपादक यांची आंदोलनकर्त्यांविषयी वेगळी भूमिका असू शकते. पण पुनर्वसनाची योग्य व्यवस्था न लावता जर गावे पाण्याखाली जाणार असतील, तर त्या गावांच्या बाजूने उभे राहणे हा पक्षपात या पत्रकारांनी करायलाच हवा. तो न्याय्य आहे. त्यांच्या धरणांबाबतच्या भूमिकेमुळे तो झाकोळता कामा नये.
नव्या, हुन्नरी पत्रकारांपुढे केवळ तटस्थ राहावे, विचारसरणीला बांधून घेऊ नये, पक्षपाती असू नये... असे म्हटल्याने त्यांचा गोंधळ होतो. काय मूल्य घेऊन पुढे जावे हे त्यांना कळत नाही. सोयीचे ते कर, कोणाशीही एकनिष्ठ राहू नको, ना विचारांशी-ना समूहांशी असाच त्याला अर्थ लागण्याची शक्यता असते. त्यामुळे भूमिका नको हा प्रचार करणे हीच एक प्रतिगामी भूमिका ठरते.
भैरप्पा एकीकडे माझी कोणतीही भूमिका नाही असे म्हणतात, परंतु, त्यांच्या त्या मुलाखतीतून त्यांनी आपली भूमिका (किंवा अनेक भूमिकाच) मांडल्या आहेत. एका कादंबरीत एक विचार तर दुसऱ्या कादंबरीत दुसरा विचार मी मांडतो असे ते म्हणतात. याचा अर्थ दोन वेगळ्या कादंबऱ्यांत दोन वेगळ्या भूमिका ते मांडतात असे फार तर म्हणू. पण भूमिकाच मांडत नाही असा त्याचा अर्थ होत नाही. माझी कोणतीही भूमिका नाही याऐवजी, माझी कोणतीही एक भूमिका नाही; असे त्यांनी म्हणणे योग्य ठरले असते. ‘प्रचारकी साहित्य हे मूलभूत साहित्य नव्हे’ किंवा ‘वैचारिकतेत साहित्यिकांनी वाहत जाणे अयोग्य’ ही त्यांची भूमिका आहे. तिचा विचार करावा असे मलाही वाटते. ‘ठरावीक विचारसरणीतून लिहिलेले साहित्य काळाच्या कसोटीवर टिकत नाही’ हीही त्यांची भूमिका आहे. पण मला ती अमान्य आहे. जगातील श्रेष्ठ गणल्या गेलेल्या साहित्यिकांत बहुधा अशा विचारसरणीवाल्या साहित्यिकांचीच संख्या अधिक भरेल. विचारसरणी व्यक्त करणारा प्रबंध लिहिणे व विचारसरणी असलेल्या लेखकाने साहित्यकृती निर्मिणे या वेगळ्या गोष्टी आहेत. प्रबंधाला साहित्यमूल्य नसते. साहित्याला ते असते. त्याच्यावरूनच साहित्यकृतीचे मापन करावे. पाऊणशे वर्षांपूर्वी आपल्याकडे झालेल्या ‘जीवनासाठी कला की कलेसाठी कला’ या वादात ती कला असायला हवी याबाबत कोणाचेच दुमत नव्हते. तेच इथे आहे. लेखक कोणती विचारसरणी बाळगतो यापेक्षा, तो प्रसवत असलेले साहित्य हे ‘साहित्य’ आहे का, याबाबत भैरप्पांसारख्या मोठ्या साहित्यिकांनी दक्ष राहायला हवे.
भैरप्पा या मुलाखतीत साहित्यालगतच्या तसेच त्या कक्षेबाहेरच्या अनेक बाबींवर भूमिका मांडताना दिसतात. उदा. ‘मुळात लग्नाचा उद्देश वंशवृद्धी हाच आहे. लग्न म्हणजे स्त्री-पुरुषाने एकत्र येऊन वंशवृद्धीसाठी केलेली व्यवस्था, असं भारतीय संस्कृती मानते. पाश्चात्त्य संस्कृतीत पुरुष-पुरुष, स्त्री-स्त्री अशीही लग्नं होतात, त्याला तिकडं मान्यता आहे. पण यातून वंशवृद्धी होणार नसेल तर त्याला लग्न का म्हणावं?’ किंवा ‘अटलबिहारी वाजपेयी हे उदारमतवादी आणि मवाळ व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या काळात हे सर्व चालून गेलं. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सगळ्याच्या विरोधात कठोर पावलं उचलली आणि मग त्यातून त्याला ‘असहिष्णुता’ असं नाव दिलं गेलं.’
या मुलाखतीत नोंद नसलेले असे इतर अनेक भूमिकांचे वाद भैरप्पा खेळलेले आहेत. त्यांच्या ‘आवरण’ या कादंबरीतील ‘टिपू सुलतान हा धार्मिक उन्मादी असून त्याच्या दरबारात हिंदूंची कदर केली जात नसे’ या भूमिकेवरून त्यांच्यात व अनंतमूर्ती तसेच गिरीश कर्नाड यांच्यात बराच वाद झडला होता. स्त्रीविषयक कायद्यांचा भारतीय महिला कसा गैरवापर करतात, याची मांडणी असलेल्या ‘कवलु’ या कादंबरीवरूनही बरेच वादळ उठले होते.
मुद्दा हा की, ‘लोकसत्ते’च्या मुलाखतीत भैरप्पा म्हणतात त्याप्रमाणे ‘मला कोणतीही भूमिका नाही’ हे खरे नव्हे; त्यांच्याकडे भरपूर भूमिका आहेत. मुलाखतीत ते भूमिका हीच समस्या दर्शवतात. परंतु ते तसे नसून पुरोगामी, सेक्युलर मंडळींच्या भूमिका ही त्यांना समस्या वाटत असावी.
कार्यकर्त्यांना वैचारिक गुलामगिरीपासून मुक्त राहण्याचा एनजीओच्या ज्येष्ठ कार्यकर्त्याचा सल्ला हाही खरे म्हणजे डाव्या विचारांपासून दूर राहण्याचा सल्ला आहे. फंडिंगवरच सर्व गुजारा, चैन व कार्यकर्तेपणाची प्रतिष्ठा विसंबून असणाऱ्यांसाठी; तो इशारा व दिलासा आहे- समाजोपयोगी काम जरूर करा, काही अधिकारांची आंदोलनेही उठवा. क्रांतिगीते गा. विद्रोही घोषणा द्या. पण आपापले रिंगण सोडू नका. व्यापक राजकीय पर्याय तयार करू नका. (आजच्या मोदी सरकारला एनजीओंचं एवढंही काम अंगावर येतं. ते त्यांच्या मागे हात धुऊन लागलेत.)
‘भूमिका नको’ पंथातल्या काहींना, त्यांच्या निरागस अजाणतेपणाच्या संशयाचा फायदा अजूनही देऊ. पण तो देऊनही मला हा आरोप करावाच लागेल-
जे सरळ सरळ म्हणता येत नाही, तसे म्हटल्याने जवळ येणारेही काही दूर जातील यासाठीचा ‘भूमिका नको-विचारसरणी नको’ हा चकवा आहे. पुरोगामी चळवळीला घेरून तिला दिशाहीन करण्याचा एक बनाव आहे.
आंदोलन, ऑगस्ट २०१६
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment