अजूनकाही
‘झुणका-भाकर चळवळीचे प्रवर्तक’, ‘समतानंद’, ‘प्रचारकार्यप्रवीण’, ‘जाहिरातजनार्दन’, ‘लोकमान्य टिळकांचे खास वार्ताहर’ अशी ओळख असलेल्या अनंत हरी गद्रे यांचे ‘समतानंद अनंत हरी गद्रे’ हे चरित्र ‘अंतर्नाद’ मासिकाचे संस्थापक-संपादक, कादंबरीकार आणि चरित्रकार भानू काळे यांनी लिहिले आहे. डायमंड पब्लिकेशन्सच्या वतीने नुकत्याच प्रकाशित झालेल्या या चरित्राला काळे यांनी लिहिलेल्या प्रास्ताविकाचा हा संपादित अंश...
.............................................................................................................................................
‘समतानंद’ अनंत हरी गद्रे हे एकेकाळी महाराष्ट्र गाजवणाऱ्या झुणका-भाकर चळवळीचे प्रवर्तक. अस्पृश्यतानिवारणार्थ महाराष्ट्रात जे प्रयत्न झाले, त्यांत या चळवळीचे स्थान खूप वरचे आहे. सत्यनारायणाची पूजा हे त्यासाठी गद्रे यांनी निवडलेले माध्यम. बहुतेक सर्व समाजस्तरांत बऱ्यापैकी प्रचलित असलेले. या पूजेत नेहमीप्रमाणे दिला जाणारा तूप-साखर घातलेल्या शिऱ्याचा महागडा प्रसाद न ठेवता सर्वसामान्यांना परवडणारा आणि सहजगत्या घरी करता येईल, असा झुणका-भाकर हाच प्रसाद ते ठेवत. विशेष म्हणजे एखाद्या हरिजन जोडप्याच्या हस्ते ही पूजा व्हायची आणि त्याहून विशेष म्हणजे पूजेच्या शेवटी त्या यजमान जोडप्याच्या पायाचे तीर्थ स्वतः गद्रे प्राशन करत. हे अद्भुत दृश्य पाहून सगळेच उपस्थित भारावून जात.
ज्या काळात कोकणस्थ आणि देशस्थ, शहाण्णव कुळी आणि कुणबी, अय्यर आणि अय्यंगार किंवा शेख आणि कुरेशी यांच्यातील वादही पराकोटीचे असत, त्या काळाचा विचार करता, हे अभूतपूर्वच होते. ११ ऑगस्ट १९४१पासून १९६०च्या दशकात अंथरुणाला खिळेपर्यंतच्या दोन दशकांत असे सुमारे साडेतीन हजार सार्वजनिक झुणका-भाकर सत्यनारायण गद्रेंनी केले आणि अवघा महाराष्ट्र ढवळून काढला. समतेसाठी त्यांनी दिलेल्या या योगदानामुळे करवीरपीठाचे शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यांनी त्यांना ‘समतानंद’ ही उपाधी दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर, सेनापती बापट, धोंडो केशव कर्वे, रघुनाथराव धों. कर्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विनोबा भावे, गाडगे महाराज, आचार्य अत्रे अशा अनेक विख्यात समाजसेवकांचा त्यांच्या या कार्याला पाठिंबा होता आणि त्यात हे मान्यवर वेळोवेळी सहभागीही होत असत.
अर्थात एवढ्यापुरतेच गद्रेंचे कार्य सीमित नव्हते. कोकणातील देवरूखसारख्या छोट्या गावात मराठी सातवीपर्यंत शिकून पुढच्या माध्यमिक शिक्षणासाठी ते १९०४ सालच्या सुमारास पुण्याला आले. पण औपचारिक शिक्षणात त्यांना फारशी रुची नव्हती. समाजासाठी आपले सर्वस्व द्यावे अशी ओढ, अशी समर्पणोत्सुक भावना त्यांच्या मनात शाळकरी वयापासूनच होती. विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांच्या साहित्याचा त्या काळात त्यांच्यावर खूप प्रभाव होता. तसाच एखादा आध्यात्मिक गुरू लाभावा, म्हणून त्यांनी त्या तरुण वयात हिमालयाची भटकंतीही केली. तिथे अनेक साधू-संत त्यांना भेटले, पण त्यांच्यापैकी कोणालाच गुरू म्हणून स्वीकारावे असे त्यांना वाटले नाही.
आयुष्यात नेमके काय करावे याचा हा शोध चालू असतानाच त्यांना एक वेगळी वाट खुणावू लागली. ब्रह्मदेशातील मंडाले इथल्या सहा वर्षांच्या कारावासातून सुटका झाल्यावर १९१४ साली लोकमान्य टिळक पुण्याला परतले आणि महाराष्ट्रात एक नवीनच चैतन्य संचारले. लोकमान्यांच्या राजकारणाने गद्रेंना भारावून टाकले. तृषार्त भूमीवर पाऊस बरसू लागावा असे काहीसे घडले. त्याच वेळी मुंबईहून सुरू होत असलेल्या अच्युत बळवंत कोल्हटकर यांच्या ‘संदेश’ दैनिकात ‘लोकमान्य टिळकांचे खास वार्ताहर’ म्हणून त्यांची नेमणूक झाली. होमरूल लीगच्या (स्थानिक स्वराज्यसंस्थेच्या) प्रसारासाठी पुढील चार वर्षांत लोकमान्यांनी देशभर व्याख्यान-दौरे काढले. या सगळ्या दौऱ्यांत गद्रे त्यांच्याबरोबर फिरले आणि लोकमान्यांच्या भाषणांचे वृत्तांत चटपटीत, वाचकस्नेही शैलीत लिहून त्यांनी वाचकसन्मुख वार्तांकनाचा एक आदर्श प्रस्थापित केला. याशिवाय लोकमान्यांच्या राजकीय विचारांचा प्रसार करणाऱ्या छोट्या-छोट्या पुस्तिका लिहायला आणि त्या छापून अगदी स्वस्तात विकारला गद्रेंनी सुरुवात केली. स्वतः लोकमान्यांनी त्यांचा ‘प्रचारकार्यप्रवीण’ अशा उपाधीने गौरव केला.
पण टिळकांच्या निधनानंतर गद्रेंचा राजकारणातला रस एकाएकी कमी झाला. पुणे सोडून ते कारमच्या वास्तव्यासाठी मुंबईला आले. प्रकाशन व्यवसायात पडले. विख्यात ‘मौज’ साप्ताहिकाचे ते संस्थापक आणि पहिले संपादक. १९ मार्च १९२२ रोजी ‘मौज’चा पहिला अंक निघाला. पुढे त्यांनी ‘निर्भीड’ हे साप्ताहिक सुरू केले आणि ते लोकप्रिय करून बरीच वर्षे चालवले. साप्ताहिके चालवत असतानाच केशवकुमार ऊर्फ आचार्य अत्रेंच्या ‘झेंडूची’ फुले या मराठीतील पहिल्या विडंबनगीतसंग्रहापासून वि. स. खांडेकरांच्या ‘दोन ध्रुव’ या कादंबरीपर्यंत काही मोजकी पण वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकेही त्यांनी प्रकाशित केली.
पुढे बोलपटांच्या आक्रमणामुळे जेरीस आलेल्या मराठी रंगभूमीत चैतन्य निर्माण करण्यासाठी त्यांनी दोन-एक तासांत संपतील अशी नऊ नाटके लिहून ती रंगभूमीवर सादरही केली. ५ सप्टेंबर १९३० साली मुंबईत भरलेल्या रौप्यमहोत्सवी मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले.
उत्तम जाहिराती करण्यात त्यांचा हातखंडा होता. ‘हाऊसफुल’ हा आजही सर्रास वापरला जाणारा शब्द ही त्यांचीच निर्मिती. विख्यात चित्रपटनिर्माते सोहराब मोदी यांच्यासाठी ते जाहिराती करत आणि त्यातील नैपुण्यामुळे त्यांना आचार्य अत्रेंनी ‘जाहिरातजनार्दन’ अशी उपाधी दिली.
पुढे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रभावाखाली आल्यावर काही वर्षे त्यांनी हिंदू महासभेचे कामही केले; हैदराबादमुक्तीसाठी झालेल्या भागानगर सत्याग्रहात तुरुंगवासही भोगला.
अशा प्रकारे पत्रकारिता, प्रकाशन, नाटके, जाहिराती, राजकारण अशा विविध क्षेत्रांत गद्रेंनी उत्तम नाव कमावले; पण कुठल्याही एकाच क्षेत्रात दीर्घकाळ रमण्याचा बहुधा त्यांचा स्वभाव नव्हता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तीसच्या दशकात येवले येथील एका सभेत ‘मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही,’ असे जेव्हा जाहीर केले, धर्मांतराचा इरादा स्पष्टपणे व्यक्त केला, तेव्हा गद्रेंना, त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर ‘इलेक्ट्रिकचा शॉक बसल्यासारखे’ वाटले. आपले उर्वरित आयुष्य अस्पृश्यतानिर्मूलनासाठीच देण्याचा त्यांनी निर्णय घेतला. अस्पृश्यता हा हिंदू धर्माला मिळालेला शाप आहे, असे त्यांचे प्रथमपासून मत होतेच.
सुरुवातीला १९३५ ते १९४० या काळात गद्रेंनी महाराष्ट्रात जागोजागी स्पृश्यास्पृश्य सहभोजने आयोजित केली. त्यानंतर त्यांनी अस्पृश्यतानिवारणार्थ झुणका-भाकर सत्यनारायण संप्रदाय सर्वस्व ओतून सुरू केला. हरिजन जोडप्याच्या हस्ते केल्या जाणाऱ्या सत्यनारायण पूजेच्या माध्यमातून त्यांनी आपले हे समाजकार्य केले. धार्मिक अधिष्ठान असेल, तर सामाजिक कार्य अधिक प्रभावी ठरते, धार्मिक सुधारणांसाठीदेखील धर्माचाच आधार घेणे उपयुक्त ठरेल, ही त्यांची धारणा यामागे होती. आपल्याकडे रामकृष्ण परमहंसांपासून पांडुरंगशास्त्री आठवल्यांपर्यंत अनेकांचा हा प्रत्यक्षानुभव आहे. जागतिक स्तरावर विचार केला, तरी रेड क्रॉसपासून साल्व्हेशन आर्मीपर्यंत अनेक प्रभावी आणि प्रदीर्घ काळ चालू असलेल्या सामाजिक कार्यांच्या बाबतीतही हेच खरे असल्याचे आपल्याला आढळते. त्याविषयी या चरित्रात पुढे येणारच आहे.
‘हिंदू धर्माला लागलेला अस्पृश्यतेचा कलंक दूर होवो हीच माझ्या जिवाची तळमळ आहे,’ अशी घोषणा त्यांनी केली. ‘अस्पृश्यतेचे खरे निर्माते अहंकारी ब्राह्मणच आहेत, हे मी तरी कान पकडून कबूल करतो. ब्राह्मणाच्या हातून पूर्वी विषमतेचे पातक घडले, म्हणून आता निरहंकारी व धर्मप्रेमी ब्राह्मणाने हरिजनाच्या पायाचे तीर्थ पिऊन ते पूर्वापार पातक धुवून टाकले पाहिजे,’ असे ते म्हणत. ‘समाजमृत्युहरणं, जातिद्वेषनिवारणं, हरिजनपादोदकं तीर्थं, जठरे धारराम्यहम!’ असा एक स्वरचित मंत्रही ते यावेळी म्हणत. त्यांच्या या क्षमाराचनेला फार महत्त्व आहे व त्याविषयी सातव्या प्रकरणात विस्ताराने लिहिलेच आहे.
त्यांनी एके ठिकाणी लिहिले आहे, अस्पृश्य मानल्या गेलेल्या हरिजनांची सेवा करण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यांची शैक्षणिक उन्नती झाली पाहिजे, त्यांची व्यावसारिक उन्नती झाली पाहिजे, त्यांची आर्थिक उन्नतीही झालीच पाहिजे. पण एवढ्या उन्नतीने कोणाही समंजस व जागृत हरिजनाचे समाधान होणार नाही. हरिजनांना तत्काळ हवी आहे ती सामाजिक समता! ही समता जर आवश्यक बाब नसती, तर सुशिक्षित व सुसंपन्न हरिजनांनी धर्मांतर केलेच नसते! हरिजनांच्या शैक्षणिक व व्रावसारिक क्षुधा भागवल्या जात असतानाच त्यांची सामाजिक समतेची भूकही भागवण्यात आलीच पाहिजे.
हातपार हलत होते, तोपर्यंत ह्याच कामासाठी गद्रेंनी आपले सर्वस्व दिले. पुढे पत्नीचे निधन झाले, तसेच विस्मरणाचा आणि कंपवायूचा त्रास होऊ लागला आणि ते जवळजवळ अंथरुणालाच खिळले, तेव्हाच त्यांचे हे सत्यनारायणाचे व्रत थांबले. ४ सप्टेंबर १९६७ रोजी आपल्या धाकट्या बंधूंच्या घरी कोल्हापूर मुक्कामी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
गेली पंचवीस-तीस वर्षे अनंत हरी गद्रे यांच्या नावाने मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून विशेष कामगिरी बाजवणाऱ्या एखाद्या पत्रकाराला पुरस्कार दिला जातो आणि गिरगावात पोर्तुगीज चर्चसमोरच्या चौकाला मुंबई महानगरपालिकेने त्यांचे नावही दिलेले आहे. पण दुर्दैवाने अगदी वेगवेगळ्या जीवनक्षेत्रांत आपल्या कामाचा अमीट ठसा उमटवणाऱ्या गद्रेंविषयी आजच्या वाचकाला मात्र फारशी काही माहिती नाही. त्यांच्याविषयी एकही पुस्तक लिहिले गेलेले नाही, तसेच त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने काही वृत्तपत्रांतून छापून आलेले पाच-सहा लेख आणि आचार्य अत्रे किंवा सदानंद मोरे यांच्यासारख्या दोन-तीन साहित्यिकांनी अन्यत्र लिहिलेले लेख वगळता त्यांच्याविषयी इतरही फारसे काही लेखन उपलब्ध नाही. या चरित्रातून ही उणीव थोडीफार भरून निघेल, भावी अभ्यासकांसाठी एक दस्तावेज तयार होईल अशी आशा आहे.
ऐतिहासिक व्यक्तींचे चरित्रलेखन हा प्रकार वरकरणी वाटतो, तितका सोपा नाही. ऐतिहासिक व्यक्तींवरच्या लोकप्रिय कादंबऱ्या मराठीत भरपूर लिहिल्या गेल्या आहेत. ‘स्वामी’, ‘झुंज’, ‘झेप’, दुर्दम्य इत्यादी. पण कादंबरी म्हटली की लेखकाच्या कल्पनाविलासाला जो वाव असतो, तो चरित्रात असत नाही; उपलब्ध साधनांच्या पलीकडे जाता येत नाही. प्रत्येकाचे जीवन त्याच्या काळाच्या विशिष्ट चौकटीत घडत जाते आणि ती चौकट बदलल्यावर, नंतर कधीतरी त्या व्यक्तीचे मूल्यमापन करणे अवघड असते. स्वतःकडे न्यायाधीशाची भूमिका घेण्याचा मोह टाळावा लागतो. शिवार, व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वच प्रमुख घटनांची नोंद एखाद्या पुस्तकात घेणे शक्य नसते; इष्टही नसते. मानवी आयुष्य इतके गुंतागुंतीचे असते, की आपली आपल्यालाही पुरती ओळख बहुतेकदा पटलेली नसते; अन्य कोणी ती न्यक्ती पूर्णतः समजून घेणे अशक्यच असणार. चरित्रनायकाचे कार्य वाचकासमोर आणायचे हा तर अशा लेखनाचा उद्देश असतोच; पण त्याच वेळी चरित्रनायकाचे आरतीपूजन किंवा अवास्तव उदात्तीकरण होणार नाही, याचेही भान लेखकाला सतत ठेवावे लागते. सुप्रसिद्ध चरित्रकार द. न. गोखले यांनी चरित्राला ‘व्यक्तिविमर्श’ हा शब्द वापरला आहे आणि तो सार्थ आहे.
गद्रे यांचे चरित्र मी लिहावे असा प्रस्ताव त्यांच्या काही कुटुंबीयांनी गतवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात माझ्यापुढे मांडला, त्या वेळी हे काम माझ्या हातून पार पडेल का याविषयी खरे तर मी खूप साशंक होतो. ज्या व्यक्तीला आपण कधी पाहिलेलेही नाही अशा व्यक्तीविषयी, त्या व्यक्तीच्या निधनाला अर्धशतक उलटून गेल्यानंतर, पुरेशी माहिती मिळवणे तसे अवघडच आहे; विशेषतः दस्तावेज जपून ठेवण्याची फारशी काळजी न घेणाऱ्या आपल्या समाजात. असे वाटले, की हे चरित्रलेखन त्यांच्या मृत्युनंतर लगेचच किंवा निदान त्यांच्या जन्मशताब्दीच्या वेळी, म्हणजे १९९० सालच्या सुमारास व्हायला हवे होते. त्यांचे देवरूख येथील बालपण, पुढे पुण्यातील शिक्षणासाठीचे वास्तव्य, लग्न, संसाराची सुरुवातीची वर्षे वगैरे अनेक महत्त्वाच्या घटना ज्या काळात घडल्या, त्या त्यांच्या आयुष्यातील पहिल्या पंचवीसएक वर्षांची आणि शेवटच्या आजारपणातल्या पाच-सहा वर्षांची अधिक माहिती त्या वेळी मिळू शकली असती; जी आज अगदीच तुटपुंजी आहे. पुढे कळले की, त्या वेळी तसा एक प्रयत्न झाला होता, पण त्याला काही ना कारणांनी मूर्त रूप लाभू शकले नव्हते.
पुढे अधिक विचारान्ती जाणवले की, हे काम निदान आजतरी व्हायला हवे; जितके अवघड वाटते, तितकेच ते आवश्यकही आहे. त्यांना ओळखणारी, त्यांच्या कामाची थेट माहिती असलेली थोडी माणसे तरी आज हयात आहेत; उद्याचे कोणी सांगावे? शिवाय गद्रेंच्या कामाचे, उशिरा का होईना पण, शक्य तितके अचूक दस्तावेजीकरण होणे भावी वाचकांसाठी महत्त्वाचे आहे; भले इतिहासाच्या आजच्या पुस्तकांत त्यांचे नाव नोंदलेले नसेल. आजच्या सेलेब्रिटी-फोकस्ड माध्यमांच्या युगात हे अधिकच लक्षात ठेवले पाहिजे. देवळाच्या कळसाइतकेच महत्त्व पायाच्या दगडांनाही असते!
.............................................................................................................................................
‘समतानंद अनंत हरी गद्रे’ या भानू काळे यांच्या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5168/Samatanand-Anant-Hari-Gadre
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment