गदिमांचं वलय जसं कधीही न संपणारं आहे, तसंच माडगूळचंही आकर्षण कायम राहणार आहे, हे नक्की!
ग्रंथनामा - झलक
भालबा विभूते
  • ‘गदिमा - मंतरलेले चैत्रबन’​​​​​​​ चे मुखपृष्ठ
  • Thu , 09 January 2020
  • ग्रंथनामा Granthnama झलक गदिमा - मंतरलेले चैत्रबन गदिमा

२०१९ हे गदिमांचं जन्मशताब्दी वर्ष. त्यानिमित्त साहित्य-संस्कृती मंडळाने ‘गदिमा - मंतरलेले चैत्रबन’ हा गौरवग्रंथ नुकताच प्रकाशित केला आहे. तो प्राध्यापक व समीक्षक रणधीर शिंदे यांनी संपादित केला आहे. तब्बल पावणे आठशे पानांच्या या गौरवग्रंथात ८९ लेख आणि तीन परिशिष्टे आहेत. यात पु.ल. देशपांडे, द. वा. पोतदार, पु. भा. भावे, जगदिश खेबुडकर, शांता शेळके, शिवाजी सावंत, द. मा. मिरासदार, अरुणा ढेरे, विनय हर्डीकर, यशवंतराव चव्हाण, शरद पवार, लता मंगेशकर अशा मान्यवर लेखकांचे लेख आहेत. हा त्यातील एक लेख संपादित स्वरूपात...

.............................................................................................................................................

‘नावात काय असते?’ असे शेक्सपिअरने म्हटल्याचे बोलले जाते. खरंच यामध्ये मोठं सत्य लपलेलं आहे. कारण नाव हे फक्त नाव असतं, तोपर्यंत ते नावच असतं. माडगूळ या गावाचंच उदाहरण घ्या ना. काय आहे नावात? हजारो खेडेगावं असतात तसं हे एक खेडेगाव. मात्र आज ते सर्वपरिचित आहे. तथापि, माडगूळशेजारी असलेली रमाजी पाटलाची वाडी, लेंगरेवाडी, सोमेवाडी, बोंबेवाडी हीही गावंच आहेत. पण ती सर्वपरिचित आहेत का? याचाच अर्थ फक्त नावात काहीच नसतं. परंतु एखाद्या गावाला ज्या वेळी वेगळेपण लाभतं, ते काही कारणाने वलयांकित होतं, त्या वेळी मात्र त्या नावाला अर्थ प्राप्त होतो. माडगुळ्याचेही तसेच झाले. पूर्वीच्या दक्षिण सातारा आणि सध्याच्या सांगली जिल्ह्यातील एक छोटेसं खेडेगाव म्हणजे माडगुळे. सांगली, सोलापूर जिल्हा सीमारेषेवर वसलेलं, ५००-६०० लोकवस्ती असलेलं हे गाव भारताच्या नकाशावर आणि प्रामुख्याने महाराष्ट्राच्या नकाशावर ठळकपणे दिसू लागलं ते गजानन दिगंबर कुलकर्णी यांच्यामुळे होय. ज्यांना आपण गजानन दिगंबर तथा ग. दि. माडगूळकर म्हणून ओळखतो, त्यांचे आडनाव कुलकर्णी. मात्र ते कुलकर्णीचे माडगूळकर कधी झाले हे त्यांच्याही लक्षात आलं नसेल. त्यांना मोठेपण लाभत गेलं आणि त्यांच्यामुळे माडगुळ्यालाही आपोआपच मोठेपण मिळालं.

अगदी नावाचाच विचार करायचा झाला तर एक छोटीशी धनगरांची वस्ती असलेलं गाव. ज्या गावाची ओळख त्या गावातील लोकांना आणि त्यांचे पाहुण-पै यांच्यापलीकडे नव्हती. अशी बनगरवाडी लख्ख प्रकाशात आली ती व्यंकटेश माडगूळकर यांच्यामुळे. स्वकर्तृत्वानं व्यक्तींची नावे समाजाला माहिती होतात आणि त्या व्यक्तींमुळे त्यांचे राहण्याचे ठिकाणही प्रसिद्धीस येतात. उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या गदिमा/व्यंकटेश माडगूळकरांमुळे माडगुळे हे प्रसिद्धीस आलं आणि लोकांच्या कुतूहलाचा विषय बनलं.

आपली नवीन माणसांची ओळख होते त्या वेळी जो पहिला प्रश्न विचारला जातो, तो असतो ‘तुमचं नाव काय?’ त्यानंतर क्रमानं येणारा दुसरा प्रश्न ‘तुमचं गाव कुठलं?’ हा दुसरा प्रश्न मला ज्या वेळी विचारला जातो, त्यावेळी त्याचं उत्तर मी जेव्हा ‘माडगुळे’ असे देतो, त्या वेळी प्रश्नकर्ती व्यक्ती स्वाभाविक आश्चर्याने ‘म्हणजे तुम्ही माडगूळकरांच्या गावचे का?’ अशी विचारते त्यावेळी लक्षात येतं, की माडगुळे माझं गाव असलं तरी लोकांसाठी ते ‘माडगूळकरांचं माडगुळे’ असतं.

तर, माडगुळे या गावाविषयी बोलायचं झालं तर मी अधिकारवाणीने सांगू शकतो, कारण माझा जन्म माडगु्ळ्यात झाला. लहानाचा मोठा तेथेच झालो.

सांगोला-आटपाडी रस्त्यावरील एक छोटसं टुमदार गाव म्हणजे माडगुळे. आटपाडीपासून आठ किलोमीटर अंतरावर वसलेलं आणि पश्चिमेस लेंगरेवाडी, उत्तरेस रमाजी पाटलाची वाडी, नाझरे-बलवडी, दक्षिणेस चोपडी-सोम्याची वाडी यांना सोबत घेऊन नांदणारं. सुस्थितीत असलेलं गाव म्हणजे माडगुळे. स्वातंत्र्य चळवळीत या गावाचा सहभाग मोठा होता. गदिमांचा स्वातंत्र्यलढ्यात सहभाग होताच, तसेच सातारच्या प्रतिसरकार चळवळीतही कृतीने सहभागी झाले होते. बाबूराव गणपती विभूते, म्हणजे माझे वडील आणि सुतळी बॉम्ब तयार करण्याच्या प्रकरणात सापडले होते बळवंत मास्तर. नाना पाटलांच्या चळवळीतील क्रांतिकारकांचे आश्रयस्थान म्हणजे माडगुळे. स्वातंत्र्यमिळण्यापूर्वी हे गाव औंध संस्थानाचा एक भाग होतं. छोटंसं गाव परंतु त्याचं भाग्य मोठं. औंधचे संस्थानिक पंत प्रतिनिधींच्या कुटुंबियांचे या गावात सतत येणं-जाणं असे. आप्पा पंतांच्या आठवणी तर या गावाशी मोठ्या प्रमाणात जोडल्या गेल्या आहेत.

खाऊन-पिऊन सुखी असलेल्या गावाचा विस्तार तो काय? ५००-६०० लोकवस्ती, गावाच्या पश्चिमेला महात्मा गांधी विद्यामंदिर. जिल्हा परिषदेची ही एकमेव शाळा. शाळा नव्हे ती तर संस्कारभारती होती. शाळेला वळसा घालून जाणारा वर्षातील आठ-दहा महिने पाणी असलेला ओढा (व्यंकटेश माडगूळकरांचा पांढरा खडक याच ओढ्यातला). शाळेला लागून अब्बास मोमीन यांचं घर आणि शाळेच्या मागे कुंभाराची वस्ती. शाळेच्या पुढे गजानन विभूतेची पिठाची गिरणी व त्याच्या पूर्वेस न्हाव्याची घरं. मध्यवस्तीत रलमारांची घरं, गावाच्या बरोबर मध्यभागी मारुतीचं मंदिर आणि त्याच्या पूर्वेला दलित वस्ती. देवळाला लागून ग्रामपंचायतीचे कार्यालय. गावातली घरं बर्‍यापैकी धाब्याची असायची. गावात पांढरी माती बक्कळ असल्याने आणि तिचा चिवटपणा सिमेंटलाही लाजवेल असा. त्यामुळे बांधकामात तिचा सर्रास वापर व्हायचा. गावाच्या मध्यभागी माडगूळकरांचा वाडा, देवळासमोर बंडा मास्तरांचा वाडा, देवळापाठीमागे रामोशी वस्तीला लागून खंडोबाच्या रत्यावर असलेला गणपू आप्पांचा (माझे आजोबा) बाहेरचा वाडा (वाडा गावाच्या बाहेर असल्याने लोकांनी त्यास बाहेरचा वाडा असेच नाव ठेवलेलं), बंडा मास्तरांच्या वाड्याच्या पिछाडीस ज्ञानोबा पाटलांचा वाडा इत्यादींमुळे गावाच्या सौंदर्यात भर पडलेली होती. सगळी माणसे गावातच राहायची. तशा दोन-तीन वस्त्या होत्या- जशा खंडोबाच्या माळावरची वस्ती, लिंगडे वस्ती, नसल्याची वस्ती वगैरे. परंतु त्यांची घरे गावात होती आणि त्यांचे वास्तव्यही गावात बर्‍यापैकी असायचं. दिवसभर गावात राबता असायचा. सकाळ-संध्याकाळची गावाची रौनक काही वेगळीच. संध्याकाळी गावातल्या वेशीवर, मारुतीच्या पारावर सगळा गाव हमखास भेटायचा. सग्ळ्यांची ख्याली-खुशाली कळायची. गावात ग्रामपंचायत, तरी गावातील चार बुजुर्ग माणसांच्या मार्गदर्शनाखाली गाव सुखी संसारात नांदत होता.

गावाची लोकसंख्या कमी, तशा गरजाही कमी होत्या. पाऊसपाणी चांगलं होतं, मोटंच्या पाण्यावर जी शेती व्हायची, त्याला मळा म्हणायचे. मोटातून दिवसभर पाणी उपसले तरी विहिरीचे पाणी कधी संपलं असे होत नसे. मळ्यातली शेती विहिरीच्या पाण्यावर तर शेतातली शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असारची. त्या काळात पावसानं फारसा दगा दिल्याचं मला तरी आठवत नाही. १९७२च्या दुष्काळानंतर मात्र सगळं निसर्गचक्रच बदललं आणि पावसानं जी दडी मारली ती मारलीच. १९७२ पूर्वी मात्र जूनमध्ये हमखास पाऊस यायचा. वर्षातले आठ-नऊ महिने ओढे वाहत असत. पाण्याच्या उपलब्धतेमुळे सर्वत्र मळे हिरवेगार राहायचे. जणू सगळा गाव हिरव्यागार दुलाईमध्ये विसावून जायचा. अशा स्थितीत विहिरीतून पाणी खेचणारं पहिलं किर्लोस्करचं डिझेल इंजिन गावात आलं ते माडगूळकरांकडे. लेंगरेवाडीच्या बाजूला असलेल्या त्यांच्या शेतात एक भली, मोठी, दगडी बांधीव अशी विहीर आहे. त्या विहिरीवर हे इंजिन बसलेले आणि त्यामुळे त्या विहिरीला नाव पडलं इंजिनची विहीर. त्यानंतर दुसरं अशा प्रकारचे इंजिन बसलं ते आमच्या विहिरीवर आणि मग हळूहळू इंजिनांची संख्या वाढत गेली. तसा विहिरीच्या पाण्याचा उपसाही वाढला. परंतु विहिरींना पाझर मोठ्या प्रमाणात राहिल्याने शेतीला पाणी मात्र कधी कमी पडल नाही. दरम्यान बुधिहाळ तलावाचे काम पूर्ण होऊन गावाला कॅनॉलद्वारेही पाणी पुरवठा होऊ लागला आणि पावसाच्या पाण्यावर असलेली शेतीही पाण्याखाली आली. शेतीचे उत्पादन वाढले. लोकांनी नगदी पिके घेण्यास सुरुवात केली. प्रामुख्याने भुईमुगाचं पीक बुधिहाळाच्या पाण्यावर घेतलं जाऊ लागलं. घरटी किमान दोन-चार ट्रक भुईमुगाच्या शेंगा बाजारात जाऊ लागल्या आणि लोकांच्या हातात रोख पैस खेळू लागला.

माडगूळकरांच्या काळातील आणि अर्थात माझ्याही माडगुळ्याची काही वैशिष्ट्ये सांगता येतील. १९८०च्या दशकात गावगाड्यात बाराबलुतेदारी होती. ती नंतर शिक्षणाच्या प्रसारानं, नवनवीन शोधांमुळं, औद्यागिक क्रांतीमुळे, मुक्त अर्थव्यवस्थेमुळे राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर जी वेगवेगळी स्थित्यंतरे झाली. त्यामुळे आणि इतर अनेकविध घटनांमुळे एकूण समाजजीवनाचा चेहराच बदलून गेला. त्यास माडगूळही अपवाद नव्हतं आणि परस्परांवर समान धाग्याने जोडला गेलेला गावाचा समाज परावलंबी होत गेला. पूर्वी बाराबलुतेदारीमुळे गावाच्या गरजा गावातच भागत होत्या. आणि हे व्यवहार मला आठवतात त्याप्रमाणे वस्तू आणि सेवा यांच्या देवाणघेवाणीवर चालत. गावात न्हावी केस कापण्याचे काम करत, मांग दोरखंड ओढत, तर सुतार शेतीसाठी लागणार्‍या लाकडी अवजारांची जुळणी करत, लोखंडी वस्तू लोहाराकडून मिळत, कुंभार मातीची भांडी, तर व्हलर (चांभार) चामड्याच्या वस्तू बनवण्याचे काम करत असे. अशा प्रकारे गावातल्या गरजा गावात भागत आणि प्राप्त झालेल्या सेवांच्या मोबदल्यात ग्राहक आपल्याकडील अन्नधान्य, भाजीपाला किंवा इतर उत्पादनातील काही हिस्सा त्यांना देत असे.

माडगूळचे एक वैशिष्ट्य सांगितलेच पाहिजे. ते म्हणजे माडगुळे हे सर्वधर्म समभावाचं जीतजागतं उदाहरण होतं. या खेड्यावर स्वातंत्र्यपूर्व काळात गांधीजींच्या विचारांचा प्रभाव जबरदस्त पडलेला असावा. गावात जातीयता फारशी पाळली जात नव्हती. उदाहरणच द्यायचं झालं तर माडगूळकरांच्या घरातील भांडीकुंडी धुण्याचं काम वेताळ महाराची बायको रसी करत असे. यामुळे भांड्याला हात लावल्यावर विटाळ होतो यासच तिलांजली मिळून गेली. आमच्या वाड्यावर तर आमच्या पंक्तीस बसून महार-मांग जेवण करत असत (पाहा - नानासाहेब झोडगे यांचं ‘फांझर’ हे आत्मनिवेदन.) माझ्या चुलत्याचा मुक्काम तर दलित वस्तीतच असायचा. गावातील देवळात दलितांचा वावर असायचाच, परंतु संध्याकाळी गावात होणार्‍या भजनाच्या कार्यक्रमात भजन गाण्याला आणि संगीताला साथ देण्यास त्यांचा मोठा वाटा असायचा.

गदिमांच्या वडिलांना पाहिल्याचं मला आठवत नाही. मात्र त्यांच्या आई बनुताई यांना मी फक्त पाहिलं असं नाही तर त्यांच्याशी भेटलो-बोललो आहे. गदिमांच्या बहिणींच्या बाबतीत माझी माहिती जुजबी आहे. मात्र माडगूळकर कुटुंबातील इतरांच्या संपर्कात मी आलो आहे. त्यामध्ये गदिमांचा समावेश तर आहेच, पण त्याचबरोबर इतर बांधवांचाही आहे. त्यांचे दोन नंबरचे बंधू भालचंद्र कुलकर्णी. अत्यंत हुशार, राजकीय डावपेचात तरबेज आणि मोठा मनु्ष्यसंग्रह असलेले हे गृहस्थ होते. गदिमा काही वेळा म्हणायचे की, भालचंद्र जर वकील झाला असता, तर आमची ओळख भालचंद्र माडगूळकरांचे बंधू म्हणून करून द्यावी लागली असती. तीन नंबरचे बंधू सर्वपरिचित ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कथाकार, कथालेखक, निसर्गप्रेमी आणि शिकारी म्हणजेच व्यंकटेश माडगूळकर. त्यांना तात्या म्हणूनच ओळखले जायचे. त्यांचा आणि माझा तसा फारसा संबंध आला नाही. ते गावी आल्यावर सर्वांच्याबरोबर होणारी भेट किंवा पुण्याला गेल्यावर पुणे आकाशवाणीवर घेतलेली एक १०-१५ मिनिटांची भेट. शामराव हे गदिमांचे चौथे बंधू. यांचा आमच्या कुटुंबाचा अत्यंत घनिष्ठ संबंध होता. ते माझ्या वडिलांचे वर्गमित्र होते. ते माडगुळात राहून शेती पाहत असत. डॉ. अंबादास हे शिक्षण क्षेत्रातील, समाजशास्त्रातील एक अभ्यासू व्यक्ती म्हणून परिचित होते.

योगायोग कसा असतो पाहा, की माडगूळकर कुटुंबातील सर्वांचे मराठी भाषेवर जबरदस्त प्रभुत्व होतं. गदिमा आणि व्यंकटेश माडगूळकर यांनी मराठी वाङ्मयास- ललित वाङ्मय, कथा, कविता, गीते आदींमध्ये दिलेले योगदान, वाङ्मयक्षेत्रात निर्माण केलेले स्वतःचे अढळ स्थान, प्रामु्ख्याने ग्रामीण भागातील जीवन वास्तव, व्यक्ती-वल्ली, समाज व्यवस्था, निसर्ग अशा सर्वांना साहित्यसंसारात मिळवून दिलेलं मानाचं स्थान आणि त्यातून ग्रामीण साहित्य नावाच्या साहित्य प्रकाराची झालेली निर्मिती आणि वृद्धी यांची मराठी वाङ्मयाच्या इतिहासात मैलाचा दगड म्हणून नोंद घेतली गेली आहे.

ऊर्जेचं दुसरं नाव म्हणजे माडगूळकरद्वय. गदिमा आणि व्यंकटेश माडगूळकर म्हणजे बहुआयामी व्यक्तिमत्त्व. व्यंकटेशतात्या कथालेखक, कथाकार, चित्रकार, चित्रपट कथालेखक आणि मनस्वी निसर्गप्रेमी, तर जन्मजात प्रतिभा प्राप्त झालेला दैवी चमत्कार म्हणजे गदिमा. कवी, गीतकार, ललितलेखक, चित्रपट कथालेखक, नाट्य/सिनेमाकर्मी, राजकारणी आणि ज्या अखंडादी काव्यामुळे ग. दि. माडगूळकर हे नाव अजरामर झाले ते गीतरामायणकार, हे दोघेही बंधू मराठी साहित्यास लाभलेले मौलिक हिरे होत. एकाच घरात आखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्याचा दुर्लभ लाभ याच घराला प्राप्त झाला. ही मराठी रसिकांनी आणि साहित्यप्रेमींनी त्यांच्या साहित्य योगदानास दिलेली पोहोचपावतीच आहे.

माडगूळकर बंधूंचे मराठी भाषेवरील प्रभुत्व जसे त्यांच्या लिखाणामधून दिग्दर्शित झालं तद्वतच त्यांच्या ओजस्वी वक्तृत्वातूनही त्याचा अनुभव महाराष्ट्रवासीयांना अनेक वेळा घेता आला. अचूक शब्दांची निवड, त्रास मिळालेल्या अलंकारिकतेची जोड, ललिततेची किनार, मांडणीतील लयबद्धता, सिद्धत्व कलागुण, विचार श्रोत्यांवर बिंबवण्यासाठी आवश्यक असलेलं अभिनय कौशल्य आणि शब्दांची फेक वाखाणण्याजोगी होती. त्यामुळे तर त्यांना सतत ऐकत राहावं असे लोकांना वाटत असे. कथाकथनाचे महाराष्ट्रभर गाजलेले कार्यक्रम हे त्याचे उदाहरण आहे. एवढेच नव्हे तर आजही लोक त्यांचे चाहते आहेत. माडगूळकर कुटुंबियांचा आणखी एक विशेष म्हणजे त्या सर्वांचे मोत्यासारखे वळणदार हस्ताक्षर.

माझं भाग्य मोठं. या पाचही भावंडांचा सहवास मला लाभला (व्यंकटेशतात्यांचा फारसा नाही). तसा माडगूळकरांचा वाडा आणि बाहेरचा वाडा यांच्यातील अंतर फारच कमी आणि मानसिक पातळीवरील अंतर तर अजिबातच नव्हतं. माडगूळकर भावंडांबरोबर त्यांच्या मातोश्री बनुताई यांचा सहवास तर मला खूपच सुखावून जायचा. जणू काही मी यांच्या कुटुंबातील एक सदस्य आहे, अशा मायेनं त्या मला वागवायच्या.

मी महात्मा गांधी विद्यामंदिर, माडगुळे या प्राथमिक शाळेत शिकत असतानाच प्रसंग. गदिमा गावी आलेले होते. त्या वेळी त्यांनी शाळेला भेट दिली. त्या वेळी शिक्षकांनी मला छोटेसे भाषण करायला सांगितले. अर्थात ते भाषण शिक्षकांनी लिहून दिलेले होते. ते भाषण गदिमांसमोर कोणत्याही प्रकारची भीती मनात न ठेवता मी अगदी प्रख्यात व्याख्यात्यासारखं केलेलं असावं, कारण गदिमांनी उत्स्फूर्त प्रतिसादही दिला आणि शाबासकीही दिली. त्यावेळी जे त्यांच्या संपर्कात आलो तो अगदी त्यांच्या अखेरच्या क्षणापर्यंत. माडगूळला आल्यावर त्यांचा मुक्काम बामणाच्या पत्र्यावर असायचा. तेथून त्यांचा मुक्काम हलेपर्यंत आमचे जाणे-येणे होई. गदिमांबरोबर अनेक लेखक मंडळी आलेली असायची. त्यांना पाहता यायचं. गदिमा आपुलकीने आम्हा मुलांची विचारपूस करायचे. त्या वेळी मी त्यांना संदेश मागितला आणि क्षणाचाही विलंब न लावता ‘यशाहूनही प्रयत्न सुंदर’ असा संदेश जीवनभर माझी सोबत करत आहे. वर वाढले तसे आमची समजही वाढत गेली. गदिमा गावी आले की हमखास भेटणं ठरलेलं असायचं. पु्ण्याला गेल्यावर एक-दोन वेळेला पंचवटीवरही मुक्काम केला गेला. पीएच.डी. करत असताना पुण्याला वारंवार जायचो, तेव्हा आवर्जून गदिमांना भेटायचो. एक-दोन वेळेला संध्याकाळच्या वेळी त्यांच्याबरोबर पंचवटीच्या शेजारी रेल्वेफाटक ओलांडून (आता तेथे भुयारी मार्ग काढला आहे.) शेतकी कॉलेजकडे जाणार्‍या रस्त्यावर फिरायला गेलो. शेवटी-शेवटी त्यांचे आणि माझे (वयात ३५-३६ वर्षांचे अंतर असतानाही) संबंध एवढे अनौपचारिक बनले की, वयातलं अंतरही नाहीसे झाले. त्यांच्या मृत्यु होण्यापूर्वी दोन महिने अगोदरचा प्रसंग असावा. ते मोठ्या आजारातून बरे झाले होते, तब्येत खालावलेली होती, अंगावरील कपडे अगदीच डगळ वाटत होते. त्या वेळी मी मजेत सुचवले की, आता हे कपडे अल्टर करून घ्यायला आलेत आणि त्रास त्यांनीही हसत-हसत होकार दिल्याचं मी विसरू शकत नाही.

भालचंद्र माडगूळकर हे आम्हाला प्राथमिक शाळेत शिक्षक होते. सातवीला ते आम्हाला शिकवायचे. त्यावेळी सातवीची परीक्षा तालुक्याला होत असे. त्या परीक्षेत पास होणे दिव्यच असायचे. ते शिकवायचे चांगले, पण त्यांना राजकारणात जास्त रस असायचा. त्यामुळे त्यांची गावातून बदली करण्याचा प्रयत्न सुरू केला. हे आम्हाला कळल्यावर आम्हाला भादिच शिक्षक म्हणून पाहिजेत म्हणून आम्हीही शाळा बंद केल्याचे आठवते.

डॉ. अंबादास माडगूळकर हे शेंडेफळ. ते एमए-पीएच.डी. (समाजशास्त्र). त्यांचा खास संबंध आला तो कोल्हापुरात. मी कोल्हापूरला शिकायला आलो आणि कोल्हापूरवासी झालो. १९७८ला न्यू कॉलेज, कोल्हापूर येथे मी प्राध्यापक म्हणून रूजू झालो आणि त्याच दरम्यान अंबादास माडगूळकर कोल्हापूर येथील सायबर या संस्थेत एमएसडब्ल्युचे विभागप्रमुख म्हणून रूजू झाले. वरदाकाकू (डॉ. अंबादास यांच्या पत्नी) यांनाही माझ्याविषयी फार वाटायचे. त्या ताराराणी विद्यापीठाच्या ज्युनिअर कॉलेजमध्ये मराठी शिकवायच्या. मराठीच्या बारावीच्या अभ्यासक्रमात नानासाहेब झोडगे लिखित ‘फांझर’या आत्मनिवेदनातील काही भाग समाविष्ट करण्यात आलेला होता. ती आठ-दहा पाने योगायोगाने माझ्या संबंधातील होती. तो भाग शिकवत असताना वरदाकाकू ‘आता शिवाजी विद्यापीठात प्राध्यापक असलेला डॉ. भालबा विभूते म्हणजे तो हा भालू’ असे आवर्जून मुलींना सांगत असत.

मला खास आवर्जून उल्लेख करायचा आहे तो शामकाकांचा. गावाकडील शेती कोणीतरी पाहावी म्हणून गदिमांनी शामकाकास गावी जाण्यास सांगितले. वडीलबंधूंची आज्ञा शिरस्त मानून ते माडगूळला आले आणि तेथेच राहिले. कालिंदीकाकू शामकाकांच्या पत्नी. बनूताईंमुळे वाड्यावर येणं-जाणं होतंच ते कालिंदीकाकूंच्या आगमनानं आणखी वाढलं. त्याचं एक कारण म्हणजे वाड्याशी असलेले आमचे संबंध आणि कालिंदीकाकूंची माझ्या आईशी असलेली मैत्री. त्यांना चार अपत्ये. प्रतिभा, मुक्तेश्वर, साधना आणि योगेश. सुट्टीला गावी गेल्यानंतर माझा मुक्काम बर्‍यापैकी माडगूळकरांच्या वाड्यावर असायचा. बहुतांश वेळेला दुपारचे जेवण शामकाकाकडेच असायचं. चुलीवर केलेल्या गरम भाकरी ताटात वाढत कालिंदीकाकूंनी बनवलेल्या जेवणाचा घेतलेला स्वाद आजही डोळ्यांसमोर जसाच्या तसा उभा राहतो. हे सर्व सांगण्याचं कारण म्हणजे या माडगूळकर कुटुंबाच्या संपर्कात अगदी सहजपणे येण्याचं, त्यांचा दीर्घकाळ सहवास लाभण्याचं भाग्य लाभलं, त्याचं एक महत्त्वाचं आणि ठळक कारण म्हणजे मी आणि माडगूळकर कुटुंबीय एकाच गावचे, माडगु्ळ्याचे.

गदिमांची मुलंही- प्रामुख्याने श्रीधर आणि आनंद माडगूळकर दिवाळी/उन्हाळा सुट्टीमध्ये, अर्थात त्यांच्या सोयीनुसार माडगूळला यायची. त्यांच्या येण्याचे आम्हांस कौतुक असायचं. अरे ते आपल्यासारखे खेडेगावात राहत नाहीत, पुण्यासारख्या शहरात राहतात, त्यांचे कपडे तर पाहा किती छान दिसतात, त्यांचा भांग कसा दिसतो पाहा या व इतर अनेक गोष्टींची तुलना आम्ही आमच्याशी करायचो. त्यापैकी आमच्याकडे बरंच काही नसायचं. त्यामुळे आम्हाला त्याचं खूप अप्रूप असायचं. माडगूळला क्रिकेट या खेळाची ओळख त्यांनीच करून दिली. नाहीतर आमचे खेळ म्हणजे हुतूतू, सूरपाट्या, लगोरी, गोट्या, जिबल्या आणि कधीतरी हॉलीबॉल. गदिमांची मुले पुण्याहून येताना आपल्याबरोबर क्रिकेटची बॅट, बॉल, स्टंप घेऊन यायचे आणि हा खेळ करलाच्या शेतावर सकाळ-संध्याकाळ चालायचा. ही मुलं दिवाळीच्या वेळी माडगूळला आली तर मग आम्हा मुलांची संध्याकाळ माडगूळकरांच्या वाड्यासमोरच. वेगवेगळ्या प्रकारचे फटाके, बाँब, फूलबाजे घेऊन फटाके उडवण्याचा त्यांचा कार्यक्रम एक-दोन तास चालायचा आणि तो पाहण्यात आम्ही दंग असायचो. नाही म्हटलं तर आम्हीही फटाके उडवायचो. परंतु लवंगी फटाक्यांची पूर्ण माळ उडवण्याचे भाग्यही आमच्या नशिबात नसायचं. एकेक सुटा फटाका करून ते उडवण्याची मजाही अर्थात काही औरच असारची. टिकल्यांच्या डब्बा मात्र खिशात असायच्या त्या आम्ही दगडावर उडवायचो.

व्यंकटेशतात्या सुट्टीच्या दिवसात माडगूळला नक्की यायचे. छर्‍याची बंदूक बरोबर असायची. बामणाच्या पत्र्यावर असायचा, पण ते तिथे फारसे रमायचे नाहीत. शेतमळ्यातूनच त्यांचा जास्त वावर असायचा. बरोबर रामोशाची पोरं घेऊन ते रानावनात हिंडत. शेतातली ज्वारी आणि करडईही काढून शेतात वाळत पडलेली असायची. ही करडई खाण्यासाठी कांडे करकोच्याचे थवेच्या थवे शेतावरून उडत असत. त्यांची शिकार करण्यात तात्यांना मजा यायची. माडगूळला मुक्काम असेपर्यंत रोज एखादा पक्षी पाडल्याशिवाय ते घरी फिरकत नसत. पाडलेला कांडेकरकोचा रामोशांची पोरं पकडायची आणि त्यांचे पंख छाटून शेतातच तीन दगडाची चूल करून त्यावर त्याचं कोरड्यास बनवायची. खाण्यापिण्याचा सगळा कार्यक्रम संपल्यावरच ही मंडळी गावात परतायची.

गदिमांचं गावाकडं येणं झालं तर ते शक्यतो सुट्टीच्या (खंडोबाची जत्रा) दरम्यान असायचं. गदिमा माडगूळला येण्याची बातमी अगोदर वाड्यावर पोहचलेली असायची. एरवी शांत असलेल्या वाड्यावर गडबड सुरू झाली की समजायचे, गदिमा येणार आहेत. चौसोपीवाडा आतून-बाहेरून स्वच्छ व्हायचा, वाड्याचं पुढचं-मागचं अंगण लखलखीत व्हायचं, शामकाकांची स्वागतासाठीची धावपळ सुरू असायची. गावातही एक प्रकारचं चैतन्याचं वातावरण तयार व्हायचं. सगळ्या गावालाच गदिमा येण्याचं अप्रूप असायचं. गदिमांनी गावाचं नाव सगळ्या महाराष्ट्रात मोठं केलं, याचा सार्थ अभिमान गावाला होता. त्यामुळे आपल्या घरातीलच कोणीतरी येतंय या भावनेनं गावही त्यांच्या स्वागताच्या तयारीला लागलेलं असायचं. गदिमांना पद्मश्रीने सन्मानित केल्यानंतर त्यांचं गावात झालेलं आगमन आणि लोकांनी त्यांचा केलेला सत्कार आजही डोळ्यांसमोर उभा राहतो. त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम गावातील मारुतीच्या पारावर आयोजित केला होता. आम्ही नेहमीच तो पार पाहत आलो. सायंकाळच्या वेळी गावाचा मुक्काम तेथेच असायचा. शेतातून दमूनभागून आलेली मंडळी शिळोप्याच्या गप्पा मारायला रात्री पारावरच जमायची. परंतु तो पार जेव्हा गदिमांच्या सत्कारासाठी तयार झाला त्यावेळी त्या पाराचं खरं देखणेपण आमच्या लक्षात आलं. काही काळ हा आमचा नेहमीचाच पार आहे ना? असे स्वतःला चिमटा काढून विचारावेसे वाटले. पाराबरोबर मंदिराचा सर्व परिसर तर प्रकाशमय झालाच होता, परंतु संपूर्ण गावच एक नवं रूपडं घेऊन परत जन्माला आल्याचा भास होत होता. आपलं लेकरू एवढं मोठं होऊन गावाला येतंय हे गावालाही कदाचित कळलं असावं. गदिमांची मिरवणूक ५१ बैलजोड्यांच्या बैलगाडीतून काढण्यात आली. बेंदराला जसं बैलांना सजवलं जातं तसं त्यांना आजही सजवलं होतं. अंगावर झुली पांघरलेले, शिंगांना गोंडे बांधलेले आणि गळ्यातील घुंगुरांचा आवाज करत बैलजोड्याही सजलेल्या होत्या. ५१ बैलजोड्या आणि त्याच्या मागं सजवलेली बैलगाडी आणि त्यात विराजमान झालेले गदिमा आणि इतर त्यास मिळालेली माडगूळवासीयांची प्रेमाची जोड हे सगळं काही अवर्णनीय होतं. अगदी शब्दांच्या पलीकडलं. जिथे शब्दच स्तब्ध होतात असा हा प्रसंग!

गदिमांच्या गावाकडे येण्यानं गावात एक प्रकारची ऊर्जा निर्माण व्हायची. माडगूळकरांच्या वाड्याबरोबर बामणाचा पत्राही आता लोकांचं लक्ष वेधून घ्यायचा. खरं तर बामणांचा पत्रा बांधला गेला तो शेतकामाची औजारं ठेवण्यासाठी. माडगूळकरांची शेती गावाला लागूनच. तो भूभाग ‘पाव’ म्हणून ओळखला जातो. त्यास ‘पाव’ का म्हणतात मला अद्याप न उलगडलेलं कोडं आहे. परंतु पावावरील शेतीसाठी पाण्याची सोय व्हावी म्हणून एक विहीर खणली होती आणि तिला जोडूनच हा बामणाचा पत्रा बांधला होता. तथापि, गदिमा माडगूळला येताना त्यांच्याबरोबर साहित्यिक, मित्रही असायचे. त्यांना वाड्यावर ठेवल्यास त्यांची सरबराई योग्य होणार नाही, या कल्पनेतून विहिरीशेजारी बांधलेल्या गाईच्या गोठ्यावर पत्र्याचे छत चढवण्यात आले. पुढे मागे मोकळे पटांगण होतंच आणि यातून बामणाचा पत्रा जन्मास आला, अशी माझी माहिती आहे. गदिमा गावी येण्याची सूचना मिळताच बामणाचा पत्रा जागा व्हायचा. तेथील शेतीउपयोगी सामान हलवले जायचे. भिंती रंगवल्या जायच्या. पत्र्याशेजारील परिसर स्वच्छ करणे, हा मुख्य कार्यक्रम व्हायचा. पत्र्यासमोरील पटांगणावर, ओढ्याची वाळू अंथरली जायची. चारही बाजूंनी व्हंडीच्या पिकात लपलेच्या बामणाच्या पत्र्यावर गावातून येण्याच्या वाटेची डागडूजी केली जायची.

मला आठवते त्याप्रमाणे माडगूळला इलेक्ट्रिसिटी १९६६-६७च्या दरम्यान आली. त्या अगोदर गावातला अंधार इतर खेडेगावांप्रमाणेच रॉकेल तेलाच्या चिमणीनेच दूर व्हायचा. काही लोकांकडे कंदिल असायचे. गावातील रस्त्यावरही कंदिलांचाच उजेड असायचा. सायंकाळच्या वेळी रस्त्यालगतचे दिवे लावण्याचे काम अगदी नित्यनियमाने, न चुकता, ग्रामपंचायतीचा शिपाई मार्तंड वाघमारे करायचा. ते त्याचे दिवे लावणं बघणंसुद्धा एक आनंदपर्व असायचं. गदिमा आणि त्यांची मित्रमंडळी बामणाच्या पत्र्यावरून गावात रात्रीच्या भोजनासाठी आल्यावर परतीची वाट कंदिलाच्या प्रकाशान उजळून निघायची. ते काम बापू रामोशी भक्तिभावानं करायचा. या उजेडात जसाजसा बामणाचा पत्रा जवळ यायचा तसा पत्र्यावरील लख्ख प्रकाश सगळ्यांचंच लक्ष वेधून घ्यायचा. गदिमा आलेत म्हणून बामणाच्या पत्र्यावर शामकाकांनी गॅसबत्तीची सोय केलेली असायची.

गॅसबत्तीच्या प्रकाशात अण्णांच्या साक्षीने कधी गप्पांचा फड रंगायचा, तर कधी पंचक्रोशीतील भजनी मंडळी आपल्या कलागुणांना वाट करून द्यायची. गावातली कलाकार मंडळी कोणाच्याही दिग्दर्शनाशिवाय अत्यंत उत्साहात सोंगी भजनं करत. रात्र जागवली जायची. एक ना अनेक प्रत्येकाला गदिमांच्या समोर यायचं असायचं. गदिमाही या सर्वांच्या प्रेमाने ओथंबून जायचे. रात्र-दिवस, विश्रांती, लेखनाची वेळ, माणसं-लहानमोठी असला कसलाही विचार डोक्यात न आणता गदिमा प्रत्र्येकाला वेळ देत. दिवसभर रानामळ्यात काबाडकष्ट करून थकलेले लोक इतर वेळी देवळासमोरील पारावर बूड टेकायची, मात्र गदिमा गावी आल्यावर त्यांचे पाय आपोआप बामणाच्या पत्र्याकडे वळायचे आणि पार ओस पडायचा. पायालाही त्याचं दुःख होत नव्हतं, कारण त्यालाही गावाच्या आणि गदिमांच्या ऋणानुबंधाची जाणीव होती. सर्व लोकांच्या बोलण्यातून गावगाड्याची इत्यंभूत माहिती, पावसापाण्याचा वृत्तांत, पीकपाण्याची स्थिती आणि घराघरांतील व्यवहार यांची बित्तंबातमी माडगूळकरांना कळायची. एरवी मोजकंच बोलणारी मंडळीसुद्धा गदिमांसमोर खुलायची, मोकळी व्हायची.

माडगूळला आल्यावर माडगूळकर न चुकता खंडोबाला जात असत. गावाच्या पूर्वेला खंडोबाचं देवालय गावपंढरीच्या साथीने उभं आहे. तिथे वर्षातून एकदा जत्रा होते. गदिमा जत्रेच्या वेळेला असतील तर मग गावकर्‍याची मजाच असायची. गावच्या पांढरीशी गदिमांचं नातं जन्मजन्मांतरीचं असावं. कारण पुण्याच्या शेतकी कॉलेजच्या रत्यावर फिरत असताना गदिमा मला म्हटल्याचं आठवतं- ‘भालू, पांढरीची खूप ओढ लागली आहे. आता माडगूळला मुक्कामाला यावं असं वाटतं.’

माडगूळची व्यक्ती मग ती कोणत्याही स्तरातील असो पुण्याला गेली आणि पंचवटीवर अण्णांना न भेटता परत आली, असं कधी घडलं नाही. पुण्याला गेल्यावर पंचवटीवर जावं, गदिमांना भेटावं, ख्याली-खुशालीच्या चार गोष्टी आळवायच्या, त्यास तिखटमीठ लावून इकडे गावकर्‍यांना सांगायचं, यात त्यांना खूप धन्यता वाटायची.

आता आपण गदिमांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करत आहोत. मागे वळून पाहताना गदिमांच्या माडगूळचा आज मागमूसही आढळत नाही. कालोघात गावं बदलतात, परंतु एवढी बदलतात हे पटत नाही. १९७२च्या दुष्काळानंतर या गावाने पाऊस असा कधी बघितलाच नाही. पिण्याचे पाणीसुद्धा टँकरच्या पाण्याने पिणारे माडगूळ पाहिल्यावर हे गाव हिरव्या रंगाची शाल पांघरल्याचे गाव होते, यावर कोणाचा विश्वासही बसणार नाही. गावाशेजारचे ओढे आटलेत, व्यंकटेशतात्यांच्या पांढर्‍या खडकाचे अस्तित्वही शिल्लक नाही. सकाळ-संध्याकाळ जिवंत असलेलं गाव आता भकास झालं आहे. लोक लांब शेतात जाऊन राहू लागले आहेत. गावातील वाड्यांचा दिमाख संपला असून ते हळूहळू भग्नावस्थेकडे चाललेत. माडगूळकरांचा वाडा तर बंद आहे. फक्त वाड्यासमोर गदिमांचा वाडा असा एक फलक दिसतो. सायंकाळचं सगळ्यांचं भेटीचं ठिकाण असलेला पार बिचारा एकटाच विजनवासात राहतो आहे. बामणाचा पत्रा आता बेवारस झाला आहे. गावात आज दलित वस्ती मात्र टिकून आहे, ही एक जमेची बाजू. त्यांनीही स्थलांतर केलं असतं तर माडगूळ गाव ते हेच का, असं म्हणावं लागलं असतं.

लोक जगताहेत. आता शेती यंत्राच्या साहाय्याने होत असल्यानं बैल हा प्राणी दुर्मीळ झाला आहे. पूर्वी घरटी बैलजोडी असल्याल्या बैलांच्या गोठ्याचा नामोनिशानाही राहिलेला नाही. आधुनिकतेच्या सुविधा मुबलक प्रमाणात आल्या आहेत. ज्या गावात चलपत्राच्या बाळूकडे आम्ही एकमेव सायकल पाहिली. त्या गावात घरटी किमान मोटरसायकल आहे, चारचाकीही आहेत, ज्वारी, व्हंडी, भूईमुग या पिकांची जागा आता फळपिकांनी घेतली आहे. लोकांनी डाळींब पिकाकडे मोर्चा वळवला आहे. पीकही बर्‍यापैकी निघत, पैसाही आहे. परंतु या नादात जमिनीखालचं पाणी एवढं उपसलंय की, आता हजार-हजार फूट जमिनीखाली गेलं तरीही पाणी मिळत नाही. अलीकडे मात्र टेंबूचं पाणी माडगूळला आलंय. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तरी सुटला आहे. काही प्रमाणात शेतीलाही पाणी मिळतं. पण पावसामुळे खुलणारा निसर्ग मात्र नाहीसा झाला आहे. असं असलं तरी माडगूळ गावाचं महत्त्व काही कमी झालेलं नाही. कारण माडगूळकरांनी त्यास अजरामर करून ठेवलं आहे.

ग. दि. माडगूळकर या नावाचं वलय जसं कधीही न संपणारं आहे, तसंच माडगूळकरांच्या माडगूळचंही आकर्षण लोकांना कायम राहणार आहे, हे नक्की!

.............................................................................................................................................

लेखक भालबा विभुते शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून प्रौढ व निरंतर शिक्षण विभागाचे संचालक म्हणून निवृत्त झाले आहेत.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......